Skip to content Skip to footer

हाक २५

हाक

हाकारणे ही मानवी नातेसंबंधांतील एक आदिम प्रेरणा आहे. जेव्हा एखादी गोष्ट, एखादे निरीक्षण किंवा चिंतन आपल्या मनात फार काळ राहू शकत नाही, तेव्हा आपण हाक मारतो. व्यक्तिगत आयुष्यातील शांत कोपऱ्यात घडणाऱ्या काही घटनांची किंवा आपल्या सार्वजनिक जीवनातील विशिष्ट प्रसंगाची उजळणी करण्यासाठी आपण साद घालतो. इतरांना बोलावून गुजगोष्टी करत, त्यांचे प्रतिसाद घेत,आपण आपल्या कल्पनांवर विचार करतो आणि त्याआधारे कृती ठरवतो. पुढचा मार्ग आखताना मागे वळून पाहतो. अशा तऱ्हेने, हाकेद्वारे अव्याहत बदलत राहणाऱ्या भूत-वर्तमान-भविष्याशी आपण जोडून घेतो. 

हाकारा | hākārāची २५वी आवृत्ती साजरी करताना ‘हाक । Call’ ह्या शीर्षकातील सार-संकल्पनेच्या विविध रूपांचा आणि त्यांच्या कलात्म अभिव्यक्तीचा शोध घेताना आम्हांला विशेष आनंद होत आहे.

घडून गेलेल्या एखाद्या घटनेला किंवा अनुभवलेल्या भावनेला प्रतिसाद देत आपण हाक मारतो. अशी घटना किंवा भावना इतकी महत्त्वपूर्ण, लक्षणीय किंवा महत्त्वाचा बदल घडवणारी असू शकते की तिचे विशिष्ट नामकरण करणे आणि इतरांशी ती सामायिक करणे आवश्यक ठरते. आपल्याला जाणवलेल्या सत्यतेची इतरांकडून पडताळणी करून घेताना, ‘इतर’ व्यक्तीपर्यंत पोहोचून तिलाही ‘तसेच’ वाटते की काही वेगळे, हे तिला हाक मारून आपण विचारून घेतो. हाकारण्याच्या अशा देवाणघेवाणीतून आपण अनुनाद शोधतो, खात्री करून घेतो, मान्यता किंवा निर्वाळा मिळवू पाहतो. साद देऊन स्वतःच्या अनुभवांबद्दल इतरांचे दृष्टिकोन जाणून घेताना, आपण केवळ सहमतीची अपेक्षा करत नसतो; तर आपल्याला पडलेल्या कोड्याची उत्तरेही शोधत असतो.

हाक ह्या संकल्पनेचे आणि हाक मारण्याच्या कृतीचे स्वरूप ह्याविषयी चिंतन मांडण्यासाठी हाकारा | hākārāच्या पारावर आपले स्वागत आहे. 

निरंतर बदलणाऱ्या सामाजिक-राजकीय पटावर, व्यक्तीला किंवा समाजाला साद घालण्याचे कोणते मार्ग असतात ? एखाद्या छोट्या वा मोठ्या घटनेसाठी हाक देण्यातून आपल्या स्वत्वाचे इतरांबरोबरचे नाते कसे पुनर्भाषित होते ? जेव्हा एखादी हाक ऐकली जात नाही, किंवा चलाख व्यक्ती, व्यवस्था अथवा सत्ताव्यवस्था ह्यांच्याकडून ती दडपली जाते तेव्हा विचारवंत आणि निर्मिक म्हणून आपण कसे व्यक्त होतो ? आणि सरतेशेवटी, जे जग अद्याप अस्तित्वात आलेले नाही, अशा जगासाठी ‘साद घालणे’ म्हणजे काय असू शकते ? ह्या आणि अशा इतर प्रश्नांना समोर ठेवून आपले साहित्य जरूर पाठवा.

अपेक्षित साहित्य आणि कलाकृती : कथात्म साहित्य, नाट्यात्म कथनरूपे, चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक लेखन, प्रवासवर्णने, दृश्यरूपात्मक अभिव्यक्ती, चित्रकृती, छायाचित्रे, चित्रपट आणि चित्रफिती, प्रयोगात्म सादरीकरणे,आणि काष्ठ, कागद इत्यादी विविध साधनद्रव्यांचे सर्जक आविष्कार.

साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख : २५ मार्च २०२६.

अंक-प्रकाशन : मे २०२६.

लिखाण / कलाकृती पाठवण्यासाठी सूचना

इ-पत्राद्वारे आपले साहित्य पाठवणे अपेक्षित नाही. आपले साहित्य इथे दुवा दिलेल्या गूगल-फॉर्मद्वारेच पाठवावे, ह्याची कृपया नोंद घ्यावी. साहित्य पाठवण्यासंबंधीच्या सूचना खाली पाहू शकता. 

आशुतोष पोतदार
संपादक, हाकारा । hākārā

पल्लवी सिंह
साहाय्यक संपादक, हाकारा । hākārā

कार्यकारी संपादक-मंडळ : अनघा मांडवकर, सत्या गुम्मुलूरि, सोहनी हर्षे, आणि मयूर सलगर.

संपादन-सहकार्य : अस्मिता चौधरी.


लिखाण / कलाकृती पाठविण्यासाठी सूचना

१. हाकारा | hākārā हे सर्वांसाठी निःशुल्क उपलब्ध असलेले आंतरजालावरील विद्वत्प्रमाणित द्वैभाषिक (मराठी-इंग्रजी) नियतकालिक आहे. आपले लिखाण वा कलाकृती हाकारा | hākārā-च्या प्रस्तावित आवृत्तीच्या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेले असावे. आपले लिखाण किंवा कलाकृती संकल्पनेला अनुसरणारे नसेल; तरी आपल्या सर्जनशील तसेच संशोधनात्मक लिखाणात किंवा कलाकृतीत नवी मांडणी, नावीन्यपूर्ण रचना किंवा जुन्या मांडणीला पुढे घेऊन जाणारे वैशिष्ट्य असल्यास, त्यांचाही समावेश अंकात केला जाईल.

२. आपले लिखाण, कलाकृती गूगल फॉर्मच्या माध्यमातून पाठवावी.

३. लिखित मजकूर फक्त वर्ड-डॉक्युमेंट फाईलमध्ये पाठवावा. (मजकुराच्या रचना समजण्यासाठी मजकुराची पीडीएफ फाईलही सोबत पाठवावी). इंग्रजीतील लिखित मजकूर ‘टाइम्स न्यू रोमन’ (१२ आकाराचा) टंकामध्ये, ओळींमध्ये दुहेरी अंतर ठेवलेला असावा. मराठीतील मजकूर युनिकोडमध्ये टंकित केलेला असावा. लेखकांना त्यांचा मजकूर ठरावीक मांडणीत किंवा रचनेत प्रकाशित होणे अपेक्षित असल्यास तसे सुरुवातीला लेखन पाठवताना जरूर कळवावे.

४. दृश्य कलाकृती असल्यास त्यांचा आकार कमीत कमी १५० रिझोल्यूशन ठेवावा. कलाकृतीचे शीर्षक, माध्यम, आकार आणि वर्ष यांबाबतची माहिती सोबत जोडावी. जर तुम्ही ‘दृश्यांगण / Panorama’ या विभागात प्रकाशित करण्यासाठी दृश्य कलाकृती पाठवू इच्छित असाल, तर तिचा आकार १००० x ६०० पिक्सेल्स असा असावा.

५. कृपया दृक्श्राव्य धारिका (फाईल) लेखनातच समाविष्ट करून पाठवू नयेत. व्हिमिओवर, यूट्यूबवर किंवा सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असलेल्या अन्य तत्सम माध्यमांमध्ये प्रसारित केलेल्या दृक्श्राव्य कृतींचे दुवे पाठवावेत, ते आम्ही लेखनासोबत देऊ शकतो. कलाकृती, चित्रे, प्रतिमा लेखकाच्या किंवा कलाकाराच्या स्वतःच्या नसतील, तर त्यांच्या मूळ स्रोताची माहिती द्यावी. प्रतिमा / दृक्-श्राव्य साधने स्वामित्वाधिकार-मुक्त स्वरूपाची असावीत; किंवा त्यांचा वापर करण्यासाठी संबंधित स्रोतांकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.

६. पाठवलेल्या साहित्याच्या पुनरावलोकन-प्रक्रियेसाठी आपले पूर्ण नाव, संपर्काचे तपशील, थोडक्यात ओळख, आणि आपल्या कलाकृतीविषयीचा वा लिखाणाचा गोषवारा हे सर्व सोबत जोडावे.

७. हाकारा | hākārā-कडे पाठवलेली कलाकृती वा लिखाण इतरत्र कुठेही प्रकाशित झालेले नसावे. तसेच, हाकारा | hākārā-चे संपादक वा संपादक-मंडळ त्यांचे पुनरावलोकन करत असलेल्या कालावधीत ते प्रकाशनासाठी इतरत्र पाठवलेले नसावे, याची काळजी घ्यावी.

८. संशोधनपर लिखित साहित्याची मर्यादा २५००-३००० शब्द इतकी असावी. असे साहित्य पाठविताना ते मॉडर्न लॅंग्वेज असोसिएशन (एमएलए) शैलीत पाठवावे.

९. लेखक व कलाकारांनी लिखाणातील सर्व माहिती, नावे, ठिकाणे, तारखा, अवतरणे, उतारे व प्रतिमा यांबाबतच्या तपशिलांची सत्यासत्यता पडताळून मगच आपले लिखाण पुनरावलोकनासाठी आमच्याकडे पाठवावे. तसेच, अनुवादकांनी अनुवादित मजकूर हाकारा | hākārā-मध्ये प्रकाशित करताना त्यांच्याकडे मूळ लेखक, प्रकाशक वा संपादक यांची परवानगी असावी.

१०. प्रकाशनासाठी विचाराधीन असलेल्या कलाकृती वा लिखाण याबाबतचा निर्णय करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल. निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपल्याला  निर्णय कळवला जाईल.

११. प्रकाशनासाठी स्वीकारलेले लिखाण वा कलाकृती यांचे संपादक पुनरावलोकन व संपादन करतील. त्याकरिता, काही सूचना वा बदल यांचा विचार करण्याच्या प्रक्रियेत संपादकांना सहभागी व्हायला आवडेल.

१२. लिखाणाचे वा कलाकृतीचे स्वामित्व-अधिकार संबंधित लेखकाकडे किंवा कलाकाराकडे राहतील. हाकारा | hākārā-तील मजकूर वा प्रतिमा इतरत्र प्रकाशित करायचे असल्यास संपादकांना पूर्वसूचना द्यावी. कृपया पुनःप्रकाशित मजकुरासोबत हाकारा | hākārā-चा श्रेयनिर्देश पुढीलप्रमाणे जरूर करावा : 

हाकारा | hākārā हे मराठी आणि इंग्रजीतून आंतरजालावर प्रकाशित होणारे नियतकालिक आहे. संकेतस्थळाला www.hakara.in येथे भेट द्या.

१३. हाकारा | hākārā-मध्ये प्रकाशित साहित्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन देऊ शकत नाही. पण येत्या काळात ते शक्य व्हावे याकरिता आर्थिक पाठबळ उभे करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत.

१४. आपल्याला काही विचारायचे असेल किंवा साहित्य पाठवायचे असेल, तर कृपया info@hakara.in या इ-पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधावा.

१५. हाकारा । hākārā-चा ISSN 2581-9976 असून, या नियतकालिकाचा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त नियतकालिकांच्या यादीत (यूजीसी केअर-लिस्टमध्ये) समावेश आहे.

१६. हाकारा | hākārā-मध्ये साहित्य / कलाकृती प्रकाशित करण्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही.