
१.
एक नकाशा असतो देश
जो बदलत जातो प्रत्येक युद्धानंतर.
२.
जमिनीचा तो तुकडा
भरतो आहे हळूहळू
थडग्यांनी
उद्या कदाचित भरेल हे शहर
आणि परवा सगळा देशही.
३.
तिरंग्याचं वाढू लागलंय उत्पादन
कधी गुंडाळले जाताहेत ते
शवावर
तर कधी शिरावर
पगडीबंद आवाज धडाडत फिरतो आहे नाक्यानाक्यावर
त्याच्या डोक्यात देश
सुरक्षित असल्याचं सांगत.
४.
तो म्हणाला
सुरक्षित आहे माझ्या मुठीत हा नकाशा
त्यावरच्या नद्या पर्वत जंगलांच्या रेषा
आणि पशूपक्षीही.
माणसं संपत जातील हळूहळू
पण मी काळजी घेईन या रेषा हलणार नाहीत नकाशावरून याची.
५.
कदाचित विधानसभा,
नाहीतर लोकसभा
एका युद्धात एवढे जिंकले तरी खूप झाले
६.
वेशभूषा स्पर्धेत उभा आहे तो मुलगा
सैनिकी पोषाख करून
त्यानं गनही चालवली
आवाज करत तोंडातून.
आवाज वाढत चाललाय चहूबाजूंनी
अशक्य झालंय शांतता राखणं
सीमेवर.
७.
शांततेचं रेशनिंग होतं युद्ध काळात
बायका उभ्या आहेत रेशनच्या रांगेत.
८.
माझ्या मनात चालू आहे युद्ध
हजारो कलेवरं पडली आहेत रणांगणावर
मी शोधते माझं प्रतिबिंब त्यांच्यात
तर काहीच दिसत नाही काळोखाशिवाय.
केवळ पोकळी
अमर्याद
व्यापून राहिलेली सार्या अस्तित्वाला.
युद्ध संपण्याची वाट पहातेय मी.
९.
आभासी जगात खेळलं जातंय रोज नवं युद्ध.
भयाण शांतता पसरली आहे
शहरात
युद्ध सुरू होण्याआधीच.
१०.
माणसं उन्मादी
वाजवताहेत ढोल शंभर मारले गेले म्हणून
काढतात रांगोळ्या
सीमेवर घातलेल्या रक्ताच्या सड्यावर
बेचिराख आयुष्याची राख फासून कपाळावर
माणसं वाजवतात शंख
अन्
साजरा करतात जल्लोष
फुलं उधळत प्रेतयात्रेत.
११.
माणसं भेटत नाही एकमेकांना
स्पर्शाची उत्कट ओढ असतानाही
भेटत राहातात डोळ्यांनीच
सीमा घालून घेतल्यात माणसांनी
स्वतःभोवती.
आणि सीमेवर मात्र
भिडताहेत ते एकमेकांना
घायाळ करण्यासाठी
पुरेसा असतो का एक विषाणू युद्धाचा
जग संपवण्यासाठी?
१२.
डोक्यात होताहेत हजारो स्फोट
कोणत्या सीमारेषेवर
गस्त घालतंय माझं मस्तक?
आणि कधीपासून?
१३.
त्याला लटकावून आत्महत्येच्या झाडावर
ते फुंकतात शंख सनातन धर्माच्या नावानं
माणसं मरत राहातात
डोक्याला लावलेल्या घोड्याच्या निशाण्यानं.
प्रेतांचे खच वाढत गेले तरी
घुसमटीला फुटतो आवाज
उगवतं एक हिरवं पान
लहरतात शब्दांची फुलपाखरं त्यातल्या अर्थासकट
आणि पसरत जातात वणव्यासाऱखी
आसमंतात.
१४.
श्वास घेणं कठीण होतं माणसांना
तेव्हा फुंकावं लागतं रणशिंग.
काळ्या मातीला तगून राहाण्यासाठी
नांगरावं लागतं स्वतःलाच
पाऊस पडल्यावर
कदाचित दूर होतील
काजळी चढलेले युद्धाचे ढग आणि
होईल स्वच्छ हवा.
माणसं घेतील श्वास खुल्या आकाशात
असा दिवस उगवू शकतो का युद्धाच्या ढगाआडून?
चित्र सौजन्य : अनिमेश माहाता
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
3 Comments
दागो.काळे
नीरजा,
तुमच्या कविता वाचल्या.
या युध्दातून माणूस वाचवणे अत्यंत कठीण आहे.कवितेत आलेलं वास्तव भविष्यकाळातील स्थितीकडे निर्देश करणारे आहे.हे युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित नाही.माणसांमाणसांतील सीमा अवरुध्द झालेल्या आहेत.प्रत्यक्ष सीमेवर चाललेले युद्ध कोणत्यातरी सत्तेच्या अस्तित्वासाठीही असू शकते.त्याला राजकीय स्थैर्यासाठीची कीनार असू शकते.ती युध्दे आता युध्दे राहिलेली नाहीत.आयुधेही नाहीत राहीली आयुधे त्यांना महासत्तेची स्वप्न पडायला लागली आहेत.खरे तर आता माणसांच्या आत चाललेल्या युध्दाची आणि माणसांमाणसांतील सीमा अवरुध्द होण्याची भीती अधीक आहे.आपल्याला तिरंगे निर्माण करावयाचे नाहीत.आपल्याला एका समष्ठीसाठी वस्र विणायचे आहे.अखंड ज्यात तिन्ही रंगाचे अवशेष असतील माणूसपणाचे.त्याच्या अखंड असतेपणासाठी.
आपली कविता वाचून अनेक भावना निर्माण झाल्यात.चांगल्या कवितेसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.
दागो.काळे
Vinayak Pandit
भाषा, प्रांत, जात, धर्म, पक्ष, राष्ट्र, तत्त्वज्ञान, मूल्य अनेक अस्मितांचा कल्लोळ. त्यांची युद्ध, हिंसा, खूनखराबा
याला उतारा अस्मिता विरहित समाज?
माहीत नाही.
पण राष्ट्रवाद विरोधी टागोरांनी दोन गाणी दोन शेजारी राष्ट्रांची राष्ट्रगीते आणि तरीही दोघांत खास सलोखा नाहीच
माधव डोळे
खूपच विचार करायला लावणारी कविता