निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे. उत्क्रांतीच्या विविध अवस्थांत या भूतलावर माणसानं विविध प्रकारचा निवारा शोधला. स्वतःसाठी निवारा निर्माण केला. त्यातून ‘घर’ ही संकल्पना विकसित झाली. पण माणसासाठी घर हा केवळ भौतिक अवकाश नसतो. माणूस त्याचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवन या अवकाशात जगत असतो. त्याच वेळी प्रदेश, राज्य, देश अशा भौगोलिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटकांशी ‘घर’ या संकल्पनेचा मोठा संबंध आहे. जगातील विविध मानवी संस्कृतींमधील ‘घर’ या संकल्पनेत जसं वैश्विक साम्य आहे, तसंच खास वैशिष्ट्यही अंतर्भूत आहे. या लेखात रशियातील घर आणि इतिहासाच्या विविध टप्प्यांत त्याचे विविध संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
इतिहासाकडे दृष्टीक्षेप
प्राचीन रशियातील लोक तेथील भौगोलिक वैशिष्ट्यांशी सुसंगत अशा ‘इज्बा’ (Izba) या झोपडीवजा घरात राहत असत. स्लाव भाषांत झोपडीसाठी ‘खाता’ (khata) असाही एक शब्द आहे. रशियन घरांची एक खास पारंपरिक शैली होती. ‘इज्बा’ म्हणजे बहुधा लाकडी फळ्यांचं किंवा ओंडक्यांचं, एक वा दोन मजली घर. त्याला पाच किंवा सहा भिंती, दोन-तीन किंवा क्वचित चार गेबल असलेलं छप्पर आणि पोटमाळ्यावर एक वा दोन खोल्या असत. छपराच्या कडांना मुरड घातलेल्या पागोळ्या असत. एकाच छपराखाली एक झोपडी आणि प्रशस्त पॅसेज किंवा एकाच छपराखाली मागे व पुढे अशा दोन झोपड्या आणि त्यांच्या मध्ये प्रशस्त पॅसेज आणि ऐसपैस पडवी, अशी त्याची रचना असे. रशियन घराला व्हरांडा असतो किंवा नसतो. घराच्या आजूबाजूने लाकडं उभी, खांबांसारखी जोडून बनवलेलं कुंपण असतं.
पारंपारिक ‘इज्बा’चा बाह्य आणि अंतर्भाग पाईन वृक्षाच्या ओंडक्यांपासून बनवत. त्यात दगड, धातू किंवा काचेचा वापर करत नसत. दोन ओंडक्यांमधील फटी नदीच्या मातीनं भरत. या लाकडी बांधकामासाठी बहुधा दोर, कुऱ्हाड, चाकू आणि फावडे अशी साधनं वापरत. करवती, खिळ्यांचा वापर फारसा नव्हता. १५व्या शतकानंतर ‘इज्बा’च्या अंतर्भागात मध्यभागी ‘ऊबशेगडी’ असलेली दिसते. खोलीचा मोठा भाग तिने व्यापलेला असे. घरात सर्वांसाठी ‘खात’ नसे. त्यामुळे अनेक सदस्य शेगडीच्या वरच्या जागेत झोपत. ‘इज्बा’चा बाह्यभाग लाकडावर उच्च प्रतीची कलाकुसर करून सुशोभित केलेला असे. विशेषत: खिडक्या रंगीत आणि अतिशय सुंदर असत.
२० व्या शतकात रशियात प्रचंड औद्योगिकीकरण आणि शहरीकरण झालं. दारिद्र्य आणि अभावग्रस्तता यामुळं लाखो लोक शहरांकडे वळले. १९१७ साली क्रांतीकाळात रशियातील साधारण ८०% लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती. १९९० पर्यंत जवळजवळ तेवढीच लोकसंख्या शहरांत होती. क्रांतीनंतर बोल्शेविक पक्षानं रशियन उच्चकुलीन लोकांच्या मोठ्या इमारती ताब्यात घेतल्या आणि त्यातील खोल्या अनेक कुटुंबांना राहण्यासाठी दिल्या. १९२० ते १९५० च्या दरम्यान मोठ्या संख्येनं सोव्हिएत कुटुंबं ‘कम्यून फ्लॅट’मध्ये (communalka) राहात. असंख्य लोक अतिशय प्रतिकुल परिस्थितीत, सैन्याच्या बराकींत किंवा सामूहिक निवासांत (dormitory) राहत. समाजवादी रशियात खाजगी मालमत्ता नसल्यानं नागरिकांची निवास व्यवस्था शासनाकडं होती. ‘प्रत्येक कुटुंबासाठी खाजगी फ्लॅट’ हे शासनाच्या घरविषयक धोरणाचं उद्दिष्ट होतं. परंतु लोकांच्या गरजा आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा फार कमी होता. म्युनिसिपल अधिकारी किंवा सरकारी खाती दर माणशी निश्चित झालेल्या जागेनुसार घरांचं वाटप करत. कम्यूनमध्ये जाणीवपूर्वक वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतील लोकांना एकत्र मिसळले जाई. एका खोलीत आख्खं कुटुंब राहत असे. पॅसेज, स्वयंपाकघर व बाथरूम सर्वांसाठी एकच असे. मुलं ही सामूहिक जबाबदारी असे. जराही खाजगीपणा (privacy) नसे. खरं तर त्यासाठी रशियन भाषेत शब्दच नाही. ‘कम्यून’ला पाणी व वीज सेवा परवडत असे; कारण त्याला शासनाचं अनुदान असे. १९५०च्या दशकात व्यापक प्रमाणात बांधकाम सुरू झालं. १९६०च्या दशकातील राष्ट्राध्यक्ष निकीता ख्रुश्चोवच्या कारकीर्दीत कमी दर्जाची, कमी खर्चाची, काँक्रीट ब्लॉकची तीन ते पाच मजली अपार्टमेंट बांधली गेली. ती अजूनही ‘ख्रुश्योव्का’ वा बोली भाषेत ‘ख्रुश्योबा’ या नावानं ओळखली जातात. रशियन भाषेत झोपडपट्टीला ‘त्रुश्योबा’ असा शब्द आहे. त्याच्याशी जुळणारा हा शब्द तयार झाला. पण तरीही उद्दिष्ट साध्य झालेलं नव्हतं.
१९८० च्या दशकात शहरांत खाजगी गृह निर्माण प्रकल्प होते. तेव्हाही लेनिनग्रादसारख्या शहरात जवळजवळ १/३ नागरिक ‘गृह सुविधा यादीत’ होते. ज्या लोकांकडे दर माणशी ५ चौरस मीटर. (५४ चौ. फुट) या नियमापेक्षा जास्त जागा होती ते सहकारी बांधकाम प्रकल्पात स्वत:चे वैयक्तिक पैसे घालून सहकारी फ्लॅट मिळवू शकत. पण केवळ सुस्थितीतील लोकांनाच हे परवडत असे. तिथं एक चौरस मीटर जागेची किंमत सरासरी एक महिन्याच्या वेतनाइतकी असे. १९८०च्या दशकाच्या सुरूवातीस हे प्रमाण दर माणशी नऊ चौरस मीटर पर्यंत आलं आणि ते हळूहळू वाढू लागलं. ही जागा देताना शासन कुटुंबाकडे आधीच असलेली जागा आणि जर त्यांच्याकडे पूर्वीपासूनच ‘दाचा’ (summer cottage) असेल, तर तेही लक्षात घेत असे. राहणीमान सुधारण्याचा आणखी एक मार्ग होता. तो म्हणजे ‘अदलाबदल’ करणं. कम्यून फ्लॅटमध्ये एका खोलीत राहणारं कुटुंब जर घटस्फोट किंवा इतर काही कारणानं विभक्त झालं, तर ते दोघं त्यांच्या खोलीच्या बदल्यात वेगवेगळ्या कम्यून फ्लॅटमध्ये दोन लहान खोल्या मिळवत असत. ज्यांना एकच मोठी खोली मिळाली असेल ते ‘एकत्र प्रवास करताहेत’ असं म्हणत, तर ज्यांनी अदलाबदल करून दोन अलग खोल्या घेतल्या असतील ते ‘एकमेकांपासून अलग होताहेत’ असं म्हटलं जाई.
आता उत्तर-सोविएत काळातही रशियन संविधान नागरिकांना सभ्य जीवन जगण्याचा अधिकार देतं. त्यामुळे घर, काम, शिक्षण व वैद्यकीय सेवा यावर प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. सोविएत युनियन कोसळल्यावर अनेक नागरिकांना ते पूर्वी राहात असलेल्या शासनाच्या फ्लॅटची मालकी मिळाली. खाजगी मालमत्ता बाळगणं कायदेशीर झालं. परंतु फ्लॅटच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. गरज वा नाईलाज म्हणून अजूनही अनेक मध्यमवर्गीय कुटुंबं जुन्या, सोविएतकालीन ‘कम्यून फ्लॅट’मध्ये राहतात. ‘नवश्रीमंत’ रशियन लोकांनी मात्र जमिनी विकत घेऊन ऐशोरामी बंगले बांधले आहेत. गरीब आणि श्रीमंत यातील दरी आता घरांच्या स्वरूपावरून स्पष्ट होते.
आज घर मिळवण्याचे पाच मार्ग त्यांना उपलब्ध आहेत. एकतर स्वत:च्या पैशांनी घर खरेदी, वारसा, भाडे तत्वावर किंवा नोकरीच्या कराराअंतर्गत नागरिक घर मिळवतात. याशिवाय ज्यांना या मार्गांनी घर घेणं शक्य नाही त्यांना सामाजिक निवासात कोणत्याही व्यावसायिक अधिभाराविना किमान भाडे तत्वावर राहण्याची सुविधा मिळते. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या अक्षम किंवा विशेष श्रेणीतील दिव्यांग, निराधार, दुसऱ्या महायुद्धातील ज्येष्ठ नागरिक, रशियाचे वीर नायक इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये सामाजिक निवासात सरकारी नियमानुसार प्रत्येकास २० चौ.मी. इतकी जागा मिळते. इथे शासन व व्यक्तीमध्ये करार होतो. तिथे त्या नागरिकासोबत कुटुंबातील सदस्यांनाही नोंदणी करून राहता येतं. स्थानिक प्रशासन व गृहसमितीकडे अर्ज व आवश्यक कागदपत्रे देऊन घराची मागणी केल्यावर क्रमानुसार जागा उपलब्ध होते. सोविएत काळातील अनेक बिगरखाजगी अपार्टमेंट या श्रेणीत येतात. आज रशियातील लोक मोठ्या प्रमाणावर अशा सामाजिक निवासात राहतात.
घर आणि घरी
घराशी संबंधित काही म्हणी रशियन भाषेत प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, “पाहुण्यांकडे गेलं तर छान वाटतं, पण स्वत:च्या घरी जास्त छान वाटतं.”, “स्वत:च्या घरात भिंती सुद्धा मदत करतात.”, “घरी आपल्याला हवं तसं (वागा), पण सार्वजनिक जीवनात मात्र जसं सांगितलं आहे तसं (वागलं पाहिजे).” यासारख्या म्हणी रशियन लोकांचा स्वत:च्या घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यक्त करतात.
जगातील साधारणपणे सर्वच संस्कृतीत असतं तसं रशियन लोक दोन वेगवेगळी आयुष्यं जगतात. एक कामाच्या जागी, घराबाहेरील समाजात आणि दुसरं घरी. कोणाही रशियन माणसाला स्वत:च्या घरी, स्वत:चे कुटुंबीय-मित्रमंडळीच्या सहवासात सुरक्षित, उबदार वाटतं. तणावविरहित वातावरणात परस्परांचे अनुभव वाटून घेणं, काळजी घेणं सुखदायी असतं, मानवी असतं. महत्त्वाचं म्हणजे तिथं त्याला स्वत:च्या अंतर्मनाशी संवाद साधता येतो.
अनेक रशियन लोकांच्यात एक सुखद आपलेपणा, घरगुतीपणा असतो. त्यात त्यांच्या देशाचा गंध जाणवतो. अनोळखी व्यक्तीबाबत स्वागतशील खुलं मन, कुतुहल, भाव व्यक्त करायची इच्छा हे खास रशियन वैशिष्ट्य आहेच; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसर्यासाठी वेळ देणं, कुणासाठी घालवलेल्या वेळेची पर्वा नसणं या सार्या परदेशी माणसांना आनंद देणार्या गोष्टी आहेत. त्या आपल्याला पाश्चात्त्य लोकांकडे, अमेरिकन, ब्रिटिश लोकांकडे आढळत नाहीत.
राजकीय दडपशाहीच्या काळात रशियन लोक कसं जगत होते, काय विचार करत होते, असा प्रश्न रशियाबाहेरील अनेक लोकांच्या मनात असतो. अनेक वयोवृद्ध, ज्येष्ठ लोक त्या दिवसांच्या स्मृती जागवतात. एक काळ असा होता की लोक शासनसत्तेशी स्वत:ला जोडून घेऊ शकत नव्हते. बाह्यत: ते त्यांना याची पर्वा नसल्याचं दाखवत असत. त्यामुळं ते शरण गेल्यासारखे वाटत. परंतु शासन व्यक्तीच्या अंतर्मनाला स्पर्श करू शकत नाही. रशियन लोकांना मित्रांसोबत स्वयंपाकघरात असताना स्वातंत्र्य, मोकळेपणा जाणवे. ते एकमेकांशी संवाद साधत. मन मोकळं करत. अंतर्मनातील विचार प्रकट करत.
स्वयंपाकघर हे खरोखरच रशियातील सामाजिक जीवनाचं केंद्र आहे. परदेशी लोकांनी रशियन लोकांच्या स्वयंपाकघरांत जायची, रशियन लोकांना त्यांच्या घरात पहायची संधी घालवू नये. रशियन लोकांना समजून घ्यायचा यापेक्षा जास्त चांगला मार्ग नाही. त्यांच्यासोबत खाणं-पिणं किंवा स्वयंपाकघरात जेवणाच्या टेबलापाशी बसून चहाचे घुटके घेत गप्पा मारणं, विनोदी किस्से सांगणं, ऐकणं, हसणं, हे सारंच आपल्याला त्यांच्या जवळ घेऊन जातं. त्यांचा पाहुणचार उत्स्फूर्त असतो. तो त्यांच्या संस्कृतीचा अंगभूत गुण आहे. रशियन लोक त्यांच्याजवळ जे काही असेल ते पाहुण्यांसोबत वाटून घेतात. पाहुण्यांना स्वत:च्या घरीच असल्यासारखं वाटायला लावतात. टेबलावर जेवण वाढून घ्यायची पद्धत अनौपचारिक असते. जेवण चविष्ट असेल, पाहुण्यांना छान वाटेल, असं पाहिलं जातं. इतक्या प्रकारचे रूचकर पदार्थ बनवणं यांना कसं बरं परवडत असेल, असं कदाचित पाहुण्यांना आश्चर्य वाटू शकतं. फ्रेचांच्या ‘बॉन अॅपेटाइट!’ सारखं जेवणाची सुरूवात सर्वांना ‘प्रियात्नवऽ अपिचीता!’ (Good Appetite!) असं म्हणून होते. मित्र वा नातेवाईकांपैकी कुणीही अचानक येऊन जेवणात सहभागी होऊ शकतात. मग वातावरण चैतन्यमय होतं. संवाद हा सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. रशियन लोक खाण्या-पिण्याच्या वेळी खुले होतात. आपलं अंतर्मन मोकळं करतात.
रशियात कुणाच्या घरी पाहुणे म्हणून जाताना बहुधा भेटवस्तू घेऊन येतात. तशी जुनी प्रथा आहे. एखाद्या वेळी पाहुण्यांनी त्यांच्या घरातल्या एखाद्या वस्तूचं फार कौतुक केलं तर काहीवेळा उत्स्फूर्तपणे, पाहुणचार म्हणून ती वस्तू पाहुण्यांना दिली जाते. मग अशा वेळी नकार देणं अवघड होतं. कुणी कुटुंबाची, मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तर रशियन लोकांना आवडतं. त्यांनाही तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला आवडतं. ही औपचारिकता नसते. त्यांना खरंच त्यात रस असतो. रशियन यजमानाच्या हृदयापर्यंत जायचा सर्वात जलद मार्ग म्हणजे लगेच स्वत:च्या व्यक्तिगत बाबींबद्दल बोलणं. तुमची सुख-दु:खं, यश-अपयश याबद्दल मोकळेपणानं सांगणं. मग तुम्ही एक संवेदनशील माणूस आहात, पाश्चात्त्य माणसांसारखे ‘थंड’ नाही, असं ते मानतात.
रशियन लोकांच्या जीवनात कुटुंब आणि मुलं याला फार महत्त्व आहे. घरं उपलब्ध नसणं, महागाई, खाजगी अवकाशाचा अभाव, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, घटस्फोट अशा असंख्य सामाजिक समस्यांनी ग्रस्त असतानाही ते घरात रमतात. शहरांत एक मूल असलेली अनेक कुटुंबं असली तरीही एकापेक्षा जास्त मुलं असणं ही त्यांना कौतुकाची बाब वाटते. विदेशी लोकांचं घर, कुटुंब, ते रिकाम्या वेळात काय करतात याचे फोटो पहाण्यात रशियन लोकांना रस असतो. ते कोणता व्यवसाय करतात, कसा करतात याबद्दल त्यांना कुतुहल असतं. त्यांचा पगार किती आहे? घर स्वत:चं आहे का? त्यात किती खोल्या आहेत? हे सगळं ते सहजपणे विचारतात.
रशियात एकमेकांना भेटल्यावर आणि निरोप घेताना हस्तांदोलन करणं हा रिवाज आहे. स्त्रीनं स्वत:हून हस्तांदोलनासाठी हात पुढे केल्याशिवाय पुरूष तिच्याशी हस्तांदोलन करत नाहीत. पाहुण्या स्त्रीच्या हाताचं कुणी हलकं चुंबन घेतलं तर आश्चर्य वाटू नये. परंतु उंबरठ्यावर हस्तांदोलन करणं मात्र अशुभ मानलं जातं. ते कधीच करायचं नाही. यजमानिणीसाठी फुलं घेऊन गेलात तर फारच छान. तिला खूप आनंद होईल. हां, पण एक काळजी घ्यायला हवी. फुलं नेहमी विषम संख्येतच, म्हणजे एक, तीन, पाच अशीच द्यायची असतात. पण पुन्हा त्यातही ‘तेरा’ फुलं कधीही न्यायची नाहीत. अशा काही जुन्या अंधश्रध्दा अजूनही अस्तित्वात आहेत. सम संख्येतील फुलं अशुभ मानली जातात.
रशियन घराच्या दरवाजापाशी जाताच अनेकदा सिगारेटचा धूर, वास जाणवतो. धुम्रपानविरोधी मोहिम काही वर्षांपूर्वी रशियात सुरू झाली. पण एकूणच धूम्रपान करणार्यांचं प्रमाण रशियात फार जास्त आहे. किशोरवयीन मुलांच्यातही हे प्रमाण सर्वात जास्त आहे. धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू पावणार्या लोकांची संख्या १९९६ नंतर प्रचंड वाढली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे रशियात सिगारेटमधील टार आणि निकोटिनचं प्रमाण खूप जास्त असतं. अनेक सिगारेटी फिल्टरशिवाय विकल्या जातात. हिवाळ्यात फ्लॅट किंवा ऑफिसच्या खिडक्या घट्ट बंद केलेल्या असतात. अशा वेळी धूम्रपानाचा सर्वांनाच त्रास होतो. फार गारठा नसेल तर खिडकी उघडायची विनंती करता येते. कोणाच्याही घरी गेल्यावर पायातले चप्पल-शूज बाहेर काढून ठेवणं योग्य असतं. रशियन लोक बाहेरची पादत्राणं घरात घालत नाहीत. तुम्ही स्वत:हून ती बाहेर काढून ठेवली तर त्यांना आनंद होतो. ते खुशीनं तुम्हाला त्यांच्या घरातलं स्लीपर घालायला देतात.
रशियन लोकांचं आइस्क्रीमचं वेड पाहून पाश्चात्त्य लोकांनाही आश्चर्य वाटतं. हिवाळ्यात, प्रचंड गारठ्यात, तापमान शून्याखाली कितीतरी डिग्री असतानाही ते बाहेर आइस्क्रीम खातात. रशियन आइस्क्रीम फार छान असतं. त्यांचा आवडता स्वाद ‘वॅनिला’ आहे.
रशियन लोकांना ‘चहा’चं प्रचंड वेड आहे. ते रशियातलं सर्वात आवडतं पेय आहे. चहाच्या वापरात ग्रेट ब्रिटन नंतरचं रशिया हे दुसरं राष्ट्र आहे. रशियाची निम्मी लोकसंख्या दिवसातून कमीत कमी पाच कप तरी चहा पिते. त्यांना काळा चहा आवडतो. टी बॅग फक्त बिझनेसमन आणि विद्यार्थ्यांना प्रिय आहेत. कारण त्यांच्यासाठी वेळ महत्त्वाचा असतो. ‘ग्लास होल्डर’ ही खास रशियन वस्तू आहे. विदेशी लोकांसाठी ही एक नवीच संकल्पना असते. काचेच्या पारदर्शी ग्लाससाठी नक्षीकाम केलेला धातूचा ‘ग्लास होल्डर’ असतो. त्याला एक हँडल असत. चहा ग्लासमध्ये घालून कुणी असं ग्लास होल्डरला धरून चहा पिताना पहाणं हे एक छान दृश्य असतं.
सर्वसाधारण रशियन फ्लॅट
बहुतेक मध्यमवर्गीय रशियन लोक आज ज्या घरांत वा फ्लॅटमध्ये राहतात ते त्यांना पूर्वी सोविएत शासनाकडून मिळालेले आहेत. त्यांच्या फ्लॅटमध्ये लिव्हींग रूम (दिवाणखाना), बेडरूम, अभ्यासिका अशी काटेकोर विभागणी नसते. छोट्या, कमी खोल्यांच्या फ्लॅटमध्ये हे शक्य नसतं. पण कुटुंबात जर लहान मूल असेल तर मात्र मुलांची खोली नेहमी वेगळी असते.
फ्लॅटमधील सर्वात मोठी खोली म्हणजे दिवाणखाना. तिथं कॉट नसते. पण तिथे असलेल्या सोफ्यावर रात्री घरातील कुणीतरी झोपतं. भिंतींवर वॉलपेपर असतो. रशियाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक घरात गालिचा असतो. रशियन लोकांना गालिचे खूप आवडतात. ते फक्त फरशीवरच गालिचे घालत नाहीत तर अगदी भिंतींवरही लावतात. विशेषत: सोफ्याजवळ किंवा पलंगाजवळच्या भिंतीवर तो लावतात. यामुळं रशियन घराला एक पौर्वात्य छटा मिळते.
कुटुंबातील सर्व सदस्यांची घरात एकत्र जगण्याची जागा म्हणजे स्वयंपाकघर. बराचसा फुरसतीचा वेळ लोक तिथंच घालवतात. कुटुंबातील सर्व मंडळी, कधीकधी जवळचे लोक, मित्रमैत्रिणी, नातेवाईक असे पाहुणेही इथं आरामात बसू शकतात. बहुतेक वेळी फोन याच खोलीत असतो. शिवाय छोटा टीव्ही संच असतो. भिंतीवर छानसं रंगचित्र असतं. छानशी सजावट असते. स्वयंपाकघरात फक्त जेवण बनवत नाहीत. तिथं रशियन लोक अक्षरश: जगतात. डिश वॉशर, मायक्रोवेव्ह अशा वस्तू मध्यमवर्गीय रशियन कुटुंबासाठी महाग आणि चैनीच्या बाबी आहेत. वॉशिंग मशीन आणि फ्रीज या वस्तू मात्र आता प्रत्येक कुटुंबात असतातच. रशियन घरात सर्वात महत्त्वाची आणि मानाची जागा भिंतीवरचं पुस्तकांचं शेल्फ आणि कपाटं यांना असते. घरात पुस्तकं असणं हे कुटुंबाच्या सांस्कृतिक स्तराचं निदर्शक असतं.
पूर्वी रशियन घरातील मोठ्या खोलीत दरवाजाच्या समोर, कोपर्यातील भिंतीवर नेहमी धार्मिक प्रतिमा असे. आता घरात कुणी धार्मिक, श्रद्धाशील असो वा नसो, भिंतीवर किंवा पुस्तकांच्या शेल्फच्या जवळपास अशी प्रतिमा दिसते.
‘दाचा’
‘दाचा’ ही रशियन सांस्कृतिक जीवनात अत्यंत लोकप्रिय बाब आहे. ‘दाचा’ म्हणजे उन्हाळ्यात राहण्यासाठी शहराबाहेरचं छोटं दुसरं घर. आपला एक ‘दाचा’ असावा असं प्रत्येक रशियन माणसाला वाटत असतं. हवा चांगली असेल तर तिथं सहकुटुंब आठवड्याची सुट्टी घालवावी, असं त्याचं स्वप्न असतं. काहीजणांचं स्वत:च्या मालकीचं असं घर असतं. तर काहीजण उन्हाळ्यात ते भाड्याने घेऊन तिथे काही दिवस राहतात. दीर्घ हिवाळा आणि हिमवृष्टी यामुळं रशियात लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहाता येत नाही. मग उन्हाळ्यात सुटीच्या दिवसांत ‘दाचा’मध्ये राहून मोकळी हवा, जमीन व अवकाश अनुभवण्याचं मोठं आकर्षण शहरी लोकांना असतं. बागेत भाज्या, फळझाडं लावायची, नदीत डुंबायचं, मासे पकडायचे, रानात जाऊन मशरूम-बेरीज् गोळा करायच्या अशा निवांत जीवनाची ओढ सर्वांनाच असते. त्यामुळं उन्हाळ्यांत सुटी सुरु झाली की हमरस्त्यांवर शहराबाहेर जाणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कार, ट्रॅम, बस, ‘इलेक्त्रिच्का’ (इलेक्ट्रिक) ट्रेन लोकांनी भरून जातात. ‘दाचा’वर राहणाऱ्या लोकांना ‘दाच्निकी’ म्हणतात. अन्तोन चेखव या लेखकाची ‘अॅट अ समर व्हिला’ ही एक विनोदी, तर ‘समर पीपल’ या नावाची एक दीर्घकथा प्रसिद्ध आहे.
रशियात ‘दाचा’ पहिल्यांदा त्सार पीटर द ग्रेटच्या काळात निर्माण झाले. प्राचीन रशियन भाषेत ‘दाचा’चा अर्थ ‘काहीतरी दिलेलं’ असा होता. त्सारच्या निष्ठावान जहागिरदारांना दिलेल्या या खेड्यातील लहान इस्टेटी असत. श्रीमंत उच्चभ्रू लोक ‘दाचा’ सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरत. तिथे मास्करेड, नृत्य, संगीत, मेजवान्या आयोजित करत. औद्योगिकीकरणानंतर शहरी लोकसंख्या वाढली. शहरांतील रहिवाशांना किमान काही दिवसांसाठी तरी तिथल्या प्रदूषित वातावरणातून सुटका करून घेण्याची इच्छा असे. १९व्या शतकाच्या अखेरीस रशियन समाजातील मध्यम व उच्च मध्यमवर्गीय लोकांसाठी ‘दाचा’ हा शहराबाहेर जाण्याचा आवडता छंद बनला. १९१७ च्या क्रांतीनंतर बहुतेक सर्व ‘दाचां’चं राष्ट्रीयीकरण झालं. अनेक ‘दाचा’ कारखान्यातील कामगारांसाठी सुटीतील घरे म्हणून राखून ठेवले गेले. लाखो कामगार कुटुंबांसाठी ‘दाचा’ म्हणजे जीवनाचा मुक्त, संपन्न अनुभव घेण्याची संधी होती. राजकीय नेते व वरिष्ठ शासकीय अधिकारी, वैज्ञानिक, लेखक, कलाकार अशा सांस्कृतिक उच्चभ्रूंना खाजगीरीत्या ‘दाचा’ देण्यात आले. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर अब्खाजियामधील गाग्रा शहराजवळ इओसिफ स्तालिनचा आवडता ‘दाचा’ होता.
पूर्वी ‘दाचा’ म्हणजे फक्त एक छोटंसं लाकडी घर असे. तिथं वीज, पाणी नसे. पण भाज्या लावण्यासाठी जमिनीचा प्लॉट असे. स्वत:ची जमीन विकत घेऊन हवं तसं घर बांधण्याची संधी लोकांना नव्हती. शिवाय फुरसतीचा वेळ व उर्जा खर्च करण्यासाठी लोकांजवळ इतर फारसे पर्याय नव्हते. त्यामुळे सोविएत काळात ‘दाचा’ अत्यंत लोकप्रिय बनले. दुसऱ्या महायुद्धानंतर शासनानं जमिनीचे छोटे तुकडे वितरीत करायला सुरुवात केली. परंतु ‘दाचा’ला काही कायदेशीर मर्यादा होत्या. ६४६ चौ. फुटापेक्षा मोठं घर बांधण्यास परवानगी नव्हती. राहण्यासाठी जागा व तळमजला असं त्याचं स्वरूप कायद्यानं मान्य होतं. त्यामुळे लोक घराच्या छतावर पोटमाळ्यासारखी खोली बांधत. कुटुंब, मित्र-मंडळी, नातेवाईक असे सर्वजण एकत्र जगण्याचा आनंद लुटत. उन्हाळ्यात मुलं आई किंवा आजी-आजोबांसोबत तीन महिने तिथे राहत. तिथेच ती सायकल चालवायला शिकत. तळ्यात पोहत. मासे पकडत. आणि पहिल्यांदा प्रेमातही पडत. ‘दाचा’वरील बगिचांमधून मोठ्या प्रमाणावर ताज्या भाज्या व फळांचं उत्पादन होत असे. अन्नाची टंचाई झाली की त्या उत्पादनावर संपूर्ण कुटुंबाला जगता येई. अनेक कुटुंबं ‘दाचा’वर पिकवलेल्या स्वत:च्या उत्पादनाबाबत समाधानी असत.
आता उत्तर-सोविएत काळात खूप काही बदललं आहे. कोणीही ‘दाचा’साठी हवी तेवढी जमीन खरेदी करू शकतं. खाजगी मालकीचे कितीतरी ‘दाचा’ पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते ‘कॉटेज’ बनले आहेत. अनेक ‘दाचा’ मालक बाजारासाठी पिके घेतात. परंतु आजही रशियन लोकांना वर्षातील काही दिवस, आठवडे तिथे घालवण्याची ओढ असते.
एखाद्या व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित वास्तू संग्रहालयाच्या स्वरूपात जतन करण्याची मोठी परंपरा रशियात आहे. यामध्ये ऐतिहासिक वास्तू स्मृती घर-संग्रहालय, साहित्यिक घर-संग्रहालय यांचा समावेश होतो. अशा वास्तू एकतर संरक्षित केल्या जातात किंवा विश्वासार्ह ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे त्यांची नव्याने निर्मिती केली जाते. या पुनर्निर्मितीच्या कामात अनेकदा सामुहिक स्मृतीचा वापर केला जातो. वास्तूच्या अंतर्भागाची मांडणी किंवा पुनर्मांडणी केली जाते. अशा घरात पूर्वी कधी राहिलेल्या व्यक्तींच्या जीवन कहाणीचा वस्तू व वास्तूच्या अवशेषांतून पुनर्प्रत्यय घेता येतो. गतकाळातील सामाजिक जीवनाचा अंश वर्तमानात पाहता येतो.
रशियात १७२६ मध्ये त्सार पीटर द ग्रेट(पहिला) याचं स्मृती घर-संग्रहालय इस्तोनियातील नार्वा इथे बांधण्यात आलं. परंतु ती पहिली स्मृती वास्तू जतन झाली नाही. रशियात १९८० च्या दशकापर्यंत अशी १३० स्मृती घर संग्रहालये निर्माण झाली. दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेली अनेक घर-संग्रहालये पुन्हा बांधली गेली.
जगप्रसिद्ध लेखक ल्येव तल्स्तोइ (लिओ टॉलस्टॉय, १८२८ -१९१०) याचं ‘यास्नया पल्याना’ (Bright Glade) हे घर-संग्रहालय सर्वात लोकप्रिय आहे. मॉस्कोपासून २०० कि.मी. अंतरावर स्थित या इस्टेटीत लेखकाचा जन्म झाला. तिथेच तो लग्नानंतर पत्नी सोफ्या हिला घेऊन आला. तिथेच अभ्यासिकेत बसून त्यांनं बारीक हस्ताक्षरांत ‘वॉर अँड पीस’ (१८६२-१८६९) आणि ‘आन्ना करेनिना’ (१८७३-१८७७) या कादंबऱ्या लिहिल्या. दररोज रात्री सोफ्या त्याच्या लेखनाचे खर्डे वाचून स्वच्छ प्रत बनवत असे. त्यात तो पुन:पुन्हा बदल करत असे. सोफ्याने ‘वॉर अँड पीस’ पूर्ण होण्याआधी सात वेळा लिहून काढली होती. ते सर्व खर्डे तिने व्यवस्थित जतन करून ठेवले. ज्या घरात ल्येवचा जन्म झाला त्याच दिवाणावर त्यांची १३ मुले जन्मली. (त्यातील ४ मुलांचा बालपणीच मृत्यू झाला). तो दिवाण आजही त्याच्या लिहिण्याच्या टेबलाजवळ ठेवलेला आहे. लेखक अन्तोन चेखव, इवान तुर्गेनेव, मक्सीम गोर्की, चित्रकार वलिन्तीन सिरोव, ईल्या रेपिन अशा त्या काळातील सांस्कृतिक व कला क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या व्यक्ती पाहुणे म्हणून ‘यास्नया पल्याना’मध्ये येत, त्याच्याशी संवाद साधत. १९१०मध्ये तल्स्तोइचं निधन झाल्यानंतर तिथेच त्याला दफन करण्यात आलं. त्याच्या कबरीशी संबंधित एक अतिशय हृद्य कहाणी प्रसिद्ध आहे. लहानपणी खेळताना एकदा त्याचा मोठा भाऊ निकलाइनं सर्वांना सांगितलं की त्याच्याजवळ एक ‘वैश्विक सुखाचं गुपित’ आहे. ते उघड झाल्यावर सर्व लोक सुखी होतील, कुणी आजारी पडणार नाही, कुठल्याच अप्रिय गोष्टी घडणार नाहीत, कुणी रागावणार नाही, सगळे परस्परांवर प्रेम करतील. त्यानं एका हिरव्या काठीवर ते ‘गुपित’ कोरलं आहे आणि ती काठी ‘यास्नया पल्याना’च्या रानात घळीच्या अगदी कडेला पुरली आहे. निकलाइच्या या कल्पित गोष्टीचा प्रभाव आयुष्यभर तल्स्तोइवर राहिला. मृत्यूपूर्वी अनेकदा ल्येव तल्स्तोइनं अशी इच्छा व्यक्त केली होती की त्याचं दफन तिथेच व्हावं, जिथे निकलाइनं ‘हिरवी काठी’ पुरली आहे. त्याच्या इच्छेनुसार त्याच जागी त्याला दफन करण्यात आलं. त्यावेळी तल्स्तोइ जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक होता. त्याची कीर्ती केवळ त्याच्या साहित्य कृतींपुरती सीमित नव्हती. त्याच्या नैतिक व धार्मिक कार्यावरसुद्धा ती आधारलेली होती. प्रत्येक रशियन माणसाला त्याचे शब्द, त्याचं लिखाण माहीत असतं. आपल्या ८२ वर्षाच्या दीर्घ आयुष्यात त्यानं साहित्याबरोबरच धर्म व सामाजिक प्रश्नांवर व्यापकपणे लिहिलं. अनेक वादग्रस्त विषयांवर भाष्य केलं. जगाच्या सर्व भागांतून लोक त्याला पत्रे लिहित. आजही रशियास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी ‘यास्नया पल्याना’ या त्याच्या इस्टेटीला प्रत्यक्ष भेट देणं, त्याचं घर-म्युझियम, त्यानं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्थापन केलेली शाळा आणि त्याची कबर पाहणं हा रोमांचक अनुभव असतो.
क्लीनमधील महान संगीतकार प्योत्र चीकोव्स्कीचं घर-म्युझियम, म्येलिखवमधील अन्तोन चेखवची इस्टेट आणि मॉस्कोसह अनेक शहरांतील इमारतीत जतन केलेली विविध लेखकांची घरं हा रशियाचा सांस्कृतिक ठेवा आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात यातील बहुसंख्य स्मृती वास्तू उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्या पुन्हा बांधल्या गेल्या.
फ्योदर दस्तयेवस्कीची घरं
मला अजूनही आठवतं, १९८८ मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये पीपल्स फ्रेन्डशिप विद्यापीठानं ‘सेंट पीटर्सबर्ग ऑफ फ्योदर दस्तयेवस्की’ अशी एक अनोखी साहित्य सफर आयोजित केली होती. ती सहल खास आम्हा रशियन भाषा-साहित्याच्या विद्यार्थी-शिक्षकांसाठी होती. त्यात दस्तयेव्स्की आणि त्याच्या व्यक्तिरेखांच्या घरांची भेट घडवून आणली जाते. एका इमारतीतील दस्तयेवस्कीच्या फ्लॅटमध्ये त्याचं स्मृती-घर जतन केलेलं होतं. तिथे प्रवेश करण्यासाठी नेहमीसारखी बेल वाजवल्यावर आतून पर्यटकांचं स्वागत करणारी तरुणी दरवाजा उघडत असे. त्याच्या सर्व वस्तू घरात जशाच्या-तशा ठेवलेल्या असत. जणू दस्तयेवस्की अजून तिथे काम करत असावा असा भास होत असे. फ्योदर दस्तयेव्स्कीचा जन्म मॉस्कोत झाला, पण त्यानं त्याचं बहुतेक सर्जनशील जीवन सेंट पीटर्सबर्गमध्ये व्यतीत केलं. हे शहर त्याच्या कथा-कादंबऱ्या आणि त्यातील व्यक्तिरेखांचा अक्षय स्रोत बनलं. ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या त्याच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा नायक रजिओन रस्कोल्निकव हा तरुण सेंट पीटर्सबर्गमधील एका इमारतीत छोट्याशा खोलीत राहतो. त्या खोलीचं भाडं द्यायलाही त्याच्याकडे पैसे नसतात. तो शहराच्या रस्त्यांवरून भटकत असताना वृद्ध सावकार अल्योना इवानव्ना हिच्या खूनाची योजना त्याच्या मनात येते. तो ती योजना तडीला नेतो. परंतु गुन्ह्याची अपराधी भावना त्याला अक्षरश: विवेकाच्या कडेलोटापर्यंत घेऊन जाते.
“जुलैच्या सुरुवातीस कमालीच्या उष्म्यात संध्याकाळी एक तरुण एस- गल्लीतील रहिवाशांकडून भाड्याने घेतलेल्या अगदी छोट्या खोलीतून बाहेर रस्त्यावर आला आणि संथपणे, काहीशा द्विधा मनोवस्थेत का- पुलाच्या दिशेने निघाला.” ही कादंबरीची सुरुवात आहे. कादंबरीचा नायक रजिओन रस्कोल्निकव, तो जिचा खून करतो ती अल्योना इवानव्ना, नायिका सोन्या आणि इतर व्यक्तिरेखा जिथे राहतात ती घरं, रस्ते, चौक, दुकाने, पब, वेश्यागृहे आणि इतर महत्वाच्या घटना घडतात ती ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना लेखकाच्या कल्पनाविश्वात कादंबरीतील व्यक्तिरेखा कशा जगत होत्या, याची कल्पना येते आणि त्याचवेळी १९व्या शतकातील मध्यमवर्गीय जीवन समोर येतं.
दुसरं महायुद्ध आणि घर: ‘पाव्लव घर’
युद्धकाळात जर्मन सैन्यानं सोविएत युनियनमधील १७१० शहरं, ७० हजार गावं व खेडी, ३२ हजार कारखाने-उद्योग, ६० लाख इमारती, हजारो दवाखाने, शाळा, ग्रंथालयं जाळली होती. २.५ कोटी लोक शक्तिहीन झाले होते. मालमत्तेचं नुकसान २६०००० कोटी रुबल झालं. ९ मे, १९४५ या दिवशी युरोपातील युद्ध थांबलं. या युद्धात सोविएत युनियनची भंयकर हानी झाली. सैन्य आणि नागरी हानीचा समावेश केला तर सोविएत युनियनमधील मृत्यूचे अंदाजे आकडे २.७ कोटीपर्यंत जातात. युद्ध समाप्तीनंतर आपली घरं सोडून दूर गेलेले लोक खेड्यांत-शहरांत परतले. सोविएत सैन्यातील लाखो सैनिक व अधिकारी नागरी सेवेत परतले. जर्मनीच्या तुरुंगांत कैदी बनलेले लाखो नागरिक देशात परतले. जर्मन सैनिकांच्या ताब्यातून मुक्त झालेल्या उद्ध्वस्त घरांत पुन्हा राहण्यासाठी लोकांना देशभरातून मदत आली. युद्धानं दिलेल्या भळभळत्या जखमा, जिवलग व्यक्तींचे मृत्यू, अत्याचार, उद्ध्वस्त नाती-कुटुंबं, खोल वेदना आणि दु:खं यांचं प्रत्ययकारी चित्रण रशियन साहित्यात पहायला मिळतं. यातील ‘पाव्लव घर’ आजही एक प्रेरणादायी स्मारक बनून उभं आहे.
स्तालिनग्रादचा लढा हा सोविएत लोकांच्या शौर्याचा अविस्मरणीय आविष्कार होता. २३ ऑगस्ट, १९४२ ते २ फेब्रुवारी, १९४३ या काळात हे युद्ध झालं. ‘ऑपरेशन बार्बरोसा’ अयशस्वी झाल्यानंतर वोल्गा नदीपाशी वसलेलं स्तालिनचं नाव असलेलं शहर जिंकणं हिटलरसाठी प्रतिष्ठेचं होतं. शिवाय कॉकेशसमधील तेलसाठा आणि वोल्गा नदीवर नियंत्रण आवश्यक होतं. स्तालिनग्राद (Stalingrad) शहर (पूर्वी स्तलिस्तीन, आजचं वल्गग्राद Volgograd) हे सुरुवातीलाच जर्मनीच्या बॉंबफेकीमुळे बेचिराख झालं होतं. दररोज साधारण एक हजार विमानं स्तालिनग्रादवर बॉम्बफेक करत होती. त्या संघर्षातील शौर्याची काही उदाहरणं लोकांच्या स्मृतीत अमर झाली आहेत. सार्जंट याकव पाव्लव (१९१७-१९८१) या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सोविएत सैनिकांचा एक गट एका चार मजली इमारतीतून लाल सैन्य पोहोचेपर्यंत ५८ दिवस हल्ला आणि बचाव करत होता. इमारतीच्या प्रवेशापाशी त्यांनी फॅसिस्ट सैनिकांचे मृतदेह रचून ठेवले होते. ती इमारत म्हणजे स्तलिनग्रादच्या लढ्यातील एक किल्लाच होता. आज ‘पाव्लव हाऊस’ ही प्रसिद्ध इमारत ऐतिहासिक स्मारक बनून उभी आहे. स्तलिनग्राड लढ्यावरील अनेक चित्रपटांत ती आपल्याला दिसते. अशी अनेक घरं-स्मारकं स्तालिनग्रादमध्ये आजही पहायला मिळतात.
दोन कविता
बुलात अकुद्झ्हावा (१९२४–१९९७)
हे वास्तुकारा, घर बांध एक माझ्यासाठी..
हे वास्तुकारा, घर बांध एक माझ्यासाठी..
चेष्टा नाही करत मी,
खरंच बांध,
म्हणजे त्यावर जंगलं वाढतील
अन पक्षी गातील
एक घर बांध माझ्यासाठी, माझ्यावर प्रेम करत,
बांध, सूक्ष्म विचार करून बांध,
म्हणजे ते खास असेल,
अगदी स्वत:सारखं,
आणि फक्त स्वत:सारखं.
तू डिझाईननुसार नको बांधू ते,
मानकांनुसारही नको बांधू, –
आपल्या संवेदनांच्या सामर्थ्याप्रमाणं,
हृदयाला साद देत,
उत्साहानं बांध.
तू बांध ते – कवितेसारखं लिही,
कॅनव्हासवर – चित्र काढत .
तुझ्या आत्म्याच्या रेखाचित्रानुसार,
अगदी अंत:करणापासून,
जोखीम घेऊन बांध.
***
तो अखेरीस त्या घरात आला..
तो, अखेरीस, त्या घरात आला,
जिथे स्वप्न पाहत होती ती त्याचं शतकानुशतकं,
जिथे जाण्यासाठी अधीर होता तो स्वत:च शतकानुशतकं,
खरंच, तिनंही तसं ठरवलं होतं, नि त्यानंही.
शपथेवर सांगतो, प्रेमच होतं हे,
बघ तरी – ही तर प्रेमाचीच करणी.
पण ठावूक आहे का तुला, देवालाही बोलावलंस तरी,
प्रेमाचा अर्थ समजणं खरंच शक्य आहे का?
नि उशीराचा पाउस खिडकीत साद घालत होता,
नि ती अबोल होती, तो ही अबोल होता.
नि तो वळला, निघून जाण्यासाठी,
नि ती नाही धावत त्याच्या छातीवरकडे.
नि, शपथेवर सांगतो मी, की प्रेमच होतं हे,
बघ तरी: ही तर प्रेमाचीच करणी.
पण ठावूक आहे का तुला, देवालाही बोलावलंस तरी,
प्रेमाचा अर्थ समजणं खरंच शक्य आहे का?
Tolstoy व इतर लेखकांच्या घरांची वर्णने वाचली होती. दस्तेयेव्स्कीच्या ‘व्हाईट नाईट्स’ या कथेत येणारी घरांची वर्णने तर मला अतिशय प्रिय आहेत. Tolstoyच्या फादर सर्गीयस सारख्या कथांतून येणारी सरंजामदारांच्या आणि सामान्य शेतकऱ्यांच्या घरांची वर्णने वाचून तर मला प्रत्यक्षात तिथे जाऊन आल्यासारखे वाटत असे. परंतु रशियन घरांवर इतके सुंदर लिखाण माझ्यातरी वाचनात कधी आले नाही. (माझे अपुरे वाचन, हेच कारण असावे.) अतिशय प्रेमाने लिहिलेला हा लेख आहे ज्यात घरांच्या ‘घरपणाबद्दल’ सांस्कृतिक भान ठेवून लिहिले आहे. त्यात रशियन लोकांच्या जगण्याची रीत सामावलेली आहे. याचवेळी राजकीय कारणांनी घरांच्या एकूण व्यवस्थेत होत गेलेले बदलही अतिशय नेमकेपणाने टिपले आहेत.
लेखिकेचे म्हणजे पानसरे यांचे आणि ‘हाकारा’च्या संपादकांचे – आशुतोष आणि नुपूर यांचे – मन:पूर्वक आभार!
मनापासून आभार. 🙂
Excellent and very sensitive article about Russian life and writers and their home !