१.
वाचता वाचता
पानांवर ओळी ओळी
गेल्या खोलं लागे तळ
हाती लागता लागेना
मनाच्या मनाची कळ
किती उपसले मन
केले रिकामे पोहरे
खळखळ पुन्हा तळे
आकळाचे गढुळते
शोध घेता पानोपानी
साता उत्तरांचा कुणी
उभा पेच सनातनी
निरूपणे नवी जुनी
तीच उकल तेच आख्यान
तोच अभंग कसा गावा
सुखावी वेळूतली ओल
वाजावा अलगूज नवा
ओलं ओथंबलेलं मन
ओळंबतं अर्थानिशी
माघारी ते मन जेव्हा
मनातल्या मनापाशी
मनाचा मनाशी जो मेळ
हस्तमुद्रा हातांविना
नाचऱ्या सावल्यांचे खेळ
पानांवर त्यांच्या खुणा
पानांवर ओळी ओळी
शब्द निशब्दांचा थवा
शीळ घुमते आर पार
ना विधान नाही दावा
२.
आशयाची आणीबाणी
सव्वा लाखाची झाकली मूठ
द्यूतातली भयोत्सुक उताविळी
उपड्या ओंजळीत ओतप्रोत
अंतहीन आशयशून्य पोकळी
लिहिले जातात तावामागून ताव
जसे द्रौपदीचे न सरणारे पदर
जणुकाही एखादं उघडंवाघडं सत्य
करतात शिताफीनं नजरेआड
विजनवासी होतात
जी सत्ये छद्मवेषी
पुन्हा वेशीवर उभी
नव्या दाव्यानिशी
म्हणे असली तर असू देत
लाडकी सत्ये जिची तिला
जशी गुरंढोरं कच्चीबच्ची
आंजारायला गोंजारायला
केकाटतील ती शिवाशिवीच्या खेळात
त्यांचे हाकारे पिटारे उधळलेल्या डावात
जितकी संहारक महायुद्धं सत्तेसाठी
तितकीच संहारक ती गलीगलीतली अटीतटी
विरतील विभिन्नतेचे ऊबदार पदर
आटतील स्निग्ध संदिग्द्धतेचे झरे
की उखडतील समेटाच्या उत्सुक वाटा
सुस्पष्ट सत्याच्या स्वधारजिण दौडीत
घडते वादविवादांची रणधुमाळी
पडतात प्रमेयांचे रथीमहारथी धारातीर्थी
शेवटी सगळेच पराभूत आणि
शाबूत रहाते आशयाची आणीबाणी
३.
अंधाराचं बेट
संहितेच्या पलिकडे
प्रयोगाच्या अलिकडे
अंधाराशी एकरूप
नाट्यगृहात दिग्दर्शक
अंधारातल्या छेदांमधून
भळभळतं खुपरं भान
खपली सारखं साकळतं
स्वगतात संवादात मौनात
नाटक पानफुटीसारखं फुटतं
वावटळीसारखं वेढून टाकतं
लिहू पाहू करू पाहणाऱ्यांचं
अंधारं अतरंगी सतरंगी बेट
अंधाऱ्या ऐलतटावर
आकाराला येतं
प्रयोगाच्या पडावातून
अंधारापार साकारतं
प्रसंगाप्रसंगातून पसरतं
अंकांमधून शिखर गाठतं
प्रवेशांच्या लाटांवरून
पैलतटावर आदळतं
काळाच्या वाळूत झिरपतं
अंत:प्रवाहात ओसरतं
पडल्या वाऱ्याच्या नेपथ्यात
वादळी वारं झोंबत रहातं
प्रयोगांमागून प्रयोगात
हार्डबाऊंड वेष्टणात
नाटक मुरत जातं
अंधारातल्या अंधारात
४.
मनमांजर
अघळपघळ रात्रीकडून
दिवसाकडे कूस वळवत
विचारांच्या सुस्त सूत्रातून
ते आळोखे पिळोखे देतं
माझ्या अवघडल्या मानेशी
करकरत्या सांध्यांभोवती
सुजट हुळहुळ्या पावलांत
ते लागट सलगीनं घोटाळतं
उगवणारा एकन एक दिवस
ऐहिकाच्या पायरीवर बसून
ते टक्क जागी राखण करतं
कधी बंद डोळ्यात रमतं
जागेपणाच्या ऊन्हात
मिचमिच्या डोळ्यांच्या
झोपाळू डोक्यावर
सदा कान टवकारतं
डोळाभर अंधारातल्या
उन्हाच्या चुकार तिरीपेत
तरंगणारे संकेतांचे धुळकण
ते आशाळभूतपणे हुंगतं
‘जिवा शिवा दार उघड
पुढ्यात टाक एखादी
ताजी कवितेची मासोळी’
उत्सुकतेनं ते गुरगुरतं
मग मटकावतं मासोळी
चाटून कोरं होतं स्वत:
पुन्हा दबा धरून बसतं
मनात काव्यार्थी कावा
५.
भाषांगराग
आठवणीच्या टापू बाहेर
ओसाड देशात कधीकाळी
धूळाक्षरांची वळणं गिरवत
खळखळत गेल्या ओळी
आता दिसते कधी चवाठ्यावर
कविता धापा टाकत उभी
हरिश्चंद्रासारखी हवालदिल
तिचं पद्यात डगमगतं पाऊल
विश्वकोशात उदंड
तर्कवितर्कांची उतरंड
मध्यात ती नजरबंद
कधीची जीव पाखडते
सुटकेच्या वाटेवर
ती रोख मोजून देते
कनवटीचे सगळे
छंद वृत्त मात्रा गण
अन्वयार्थांचं पाणी वाहून
रापलेल्या तटस्थ हातांनी
ती उतरवून टाकते
स्वत:चे भिजट प्रपाठी पदर
तेव्हा कुठं
स्वरांचं वारं आत बाहेर खेळतं
तिचे श्वास
निखाऱ्यासारखे फुलतात
वारा जी धुन घेऊन येतो
ती त्या श्वासांच्या लयीत
उचंबळते ओसरते पसरते
कविता तिची तिला पावते
६.
तृतीयपुरुषी बहुवचनी
मौनाची तुटते माळ
निखळतात मूके अक्षरांचे मणी
मौनाच्या शांत विहारात
टप टप टपटपतात ‘मी’
उठते तळमनावरची धूळ
होतो अक्षरांचा फुंफाटा
मंत्रजागराच्या गजरात
सापडतात हरवतात ‘मी’
उच्चारातल्या अशांत उद्भेदात
निमूट उरल्या अंतर्मुखतेत
निरुंद निमुळत्या आत्मलक्षी वेधात
आकारतात आकरसतात ‘मी’
एकाक्षरी क्षणांच्या शिडात भरतात
अवधानाच्या लाटांवर हिंदकळतात
पणती पणती जागेपणात
ते मिणमिणते ‘मी’ वाहत जातात
आरतीप्रभू जे निदान करतात
त्या ‘जाणीवज्वरा’च्या ग्लानीत
उमजेच्या उंचसखल प्रदेशात
मग सावरतात कोसळतात ‘मी’
शब्दशरण लोटांगणात
अर्थ-निरर्थांचे हात जोडतात
नमस्काराच्या अक्षाभोवती
दाही दिशा धुंडाळतात ‘मी’
प्रार्थनांच्या सर्वदूर स्वरात
प्राणांच्या परसदारात
अगोचराच्या अन्योन्य साक्षीने
उमलतात उसवतात ‘मी’