१.
मी झाड पाहतो तेव्हा
संपूर्ण असतं झाड
एक संपूर्ण घटना अस्ते झाडं पाहणं
झाड पाहतांना फुलं नस्तात संपूर्ण
नि केवळ झाड अस्तं. संपूर्ण अस्तं
सोबत अस्तं झाड. झाड पाहतांना
फळं नस्तात संपूर्ण. संपूर्ण अस्तं झाड. झाड पाहतांना
नुस्त्या फांद्या अस्तात निष्पर्ण. झाडासोबत नेहमीच
पाहणं तर संपूर्णच अस्तं कायम, नि झाड अस्तं संपूर्ण
संपूर्ण पानं, फळं, फुलं असलेलं हिरवंगार अस्तं झाड
म्हणजे हेच तर अस्तं चित्र संपूर्ण. सुफळ. निनादणारं झाडाचं
म्हणजे संपूर्ण अस्तं झाड पाहणं. म्हणून मी पाहतो झाड नेहमीच
मी झाड पाहतो. पुनःपुन्हा पाहतो झाड
तेव्हा एक रूह अस्ते झाडावर विसावलेली
नि घनघोर अस्ते विस्तारलेली सावली झाडाची
सावलीत झाडं पाहणं. संपूर्ण झाड पाहणं अस्तं
झाड पाहणं ही एक अतिशय सहज अशी
नैसर्गिक घटना आहे म्हटलं तर कुणासाठीही
तरीही झाडं पाहणं ही गरजंय प्रत्येकाची असं कुठाय?
माझी आहे. म्हणून मी झाड पाहतो. संपूर्ण पाहतो
गरज नसतानाही झाडासोबत
झाडाची सावलीही संपूर्ण पाहतो
म्हणजे अपूर्ण नस्तंच झाड कधीच सावली शिवाय
तरीही प्रत्यक्षात झाड पाहणं अपूर्ण अस्तं सावलीशिवाय
म्हणून संपूर्ण पहातो, सावली सोबत झाड
२.
मी झाड पाहतोय नि झाड मला पाहतं
ही घटना अस्ते म्हटलं तर परस्परावलंबी
एकाने दुसऱ्याला पाहण्यासारखी झाडागत
खरं तर दोन्हीही झाडंच पाहतात एकाचवेळी
म्हणजे रियाझ अस्तो तो पाहण्याचा
संपूर्ण सुफळ. वाचता वाचता मुखोद्गत होणारा वाचण्याचा
नि सतत सतत उसवत राहणारा तर्जुमा इबादती
म्हणून मी झाडाला शोधतो. नि संपूर्ण पाहतो
नि झाड मला शोधतं. नि संपूर्ण पाहतं
मं… तरीही का सुटून जातं कुणीतरी एक दोघातलं मागे?
म्हणजे काय घडतं नेमकं
जेव्हा एक झाड दुसऱ्यात जातं रुजत नि बहरतं सोबतीनं
तेव्हा काय घडत असतं दोघांदरम्यान?
किंवा एक झाड जे रुजत नाही दुसऱ्यात कधीच
जे वाढतं. सुटं सुटं. सोबत, काय घडतं नेमकं तेव्हा?
म्हणजे ते पाहणं अस्तं का दोन झाडांचं, दरम्यानचं दोघातलं
की अशारीरी अस्तं काही मायावी, देठ खुडून नेणारं
की अस्तं बेनाम काहीतरी सुटलेलं दोघातलं नकळत दोघांच्या?
म्हणजे अस्तं का विस्कटलेलं. जुळून आलेलं अकल्पित काहीतरी
म्हणजे स्पिरीच्युअल अस्तं का ते काही मुठीत न मावणारं?
की अस्तं रोजमर्राचं सावलीसारखं विनाअट मागे मागे येणारं
नि डोळ्यातून कोसळणारं फरेबी, सांडत आलेलं, निस्टून गेलेलं?
– मी झाडाला पाहतो नि झाडं मला पाहतं
३.
मी पाहतोय. प्रदीर्घ पाहतोय
पुरातनंय पाहणं. पुरातन आजन्मय
म्हणजे, जसा की कवितेच्या ओळींआड दबा धरून
बसलेला अस्तो समुद्र. तो कवितेत पाहिलेला
पहिला समुद्र अस्तो डोळ्यातला खरं तर
नि तो तर अस्तोच अस्तो हरदम कोसळत
समुद्र अस्तोच अस्तो. पाहणं अस्तं समुद्र
नि कवितेतही अस्तो समुद्र. अथांग अस्तो
म्हणजे समुद्र अस्तो खरं तर एक अवयव
स्पर्शून घेता येणारा. देहातलं मीठ चाखणारा
नि कवितेचं शरीरंय समुद्र उधाणलेला. मी पाहतो
म्हणजे पॅरललंय समुद्र कवितेतला. नि कविता देहाधीन
म्हणजे समांतरंय वीण दोघांची, विस्कटता येणारी सहजच
म्हणजे प्राचीनेय पाहणं दोघांचं. म्हणून वाफ होते दोघांची
वाफ होणं नैसर्गिकय. नि परंपरागतही. जसा आदीमय समुद्र
मी पाहतोय खूप दूरपर्यंत. अतिप्राचीनेय पाहणं
जसं की हे एक चित्रंय. रिअॅलिस्टिक. प्राचीनेय ते
नि दडलाय रंगाच्या आड समुद्र. ही घटना म्हटली तर अर्वाचिनेय
नि छुपारूस्तुमय समुद्र. जो मी पाहतोय, तो चित्रातचंय
म्हणजे चित्रातचंय त्याचा रूतबा नि आदीमय वजूद त्याचा
म्हणजे चित्रातला समुद्र पाहणं व्हर्जनंय साक्षात वर्तमानातलं
प्रत्यक्षातल्या समुद्राला पाहण्याचं उतावीळ आवेगी
नि ही घटना अगदी नैसर्गिकंय. म्हणून नैसर्गिकये पाहणं
– प्राचीनंय पाहणं
४.
मी पाहतोय. तो समुद्रंय
नि उतावीळ तर सारखीचये
नि दोघातली वीण सारखीचये
स्पर्शानं खाऱ्या विस्करणारी
नि, दोघातलं पाहणं ही म्हटलं तर
एक व्यक्तिगत घटनाय. पण कायमचंय पाहणं
कायमचं पाहणं हा इतिहासये इथला
म्हणजे घटनाय विशिष्ट वर्तमानातली
किंवा भूतकाळातील सुद्धा पुन्ह्यांदा घडू शकणारी
अकस्मात पाहणं फरेबंय. नि फरेबीच तरंय शरीर
शरीर वर्तमानंय. भूतकाळंय शरीर. शरीर पाहणं भविष्यय
शरीराचं पाहणं आत्म्याचं पाहणंय. आत्म्याला पाहणं शरीरंय
नि शरीरंय झाड झपाटलेलं, डेराय रूहचा पाक पडलेला
झाडाचं झपाटणं शरीराचं झपाटणंय. रूहंय
मी पाहतोय. पाहणंय रूह-ए-तमन्ना. कशीशंय पाहणं
मं कसा यणारेय करार जर तल्खलीये पाहणं. नि निरासीये
सरीरंय फक्त सरीर पाहणं. नि सरीर तर इबादतंय नेहमीच
मी पाहतोय. पाहणं ऊर्जाय. उसवत जाणारी आरपार
बिस्मीलंय वाफ होणं. वाफ होणंय पाहणं. पाहणंय धुवाँ धुवाँ
निरस्तंय पाहणं, पाहणंय काय उरलं काय राहिलं शिलकीत
शिलकीतलं पाहणंय संपूर्ण पाहणं, संपूर्ण पाहणंय उरलेलं कायाय?
मी पाहतोय. पुनःपुन्हा पाहतोय आखीरची बंदिशय पाहणं
मी पाहतोय, कवितेचं पाहणं चित्रंय. नि चित्रं कविताय
नज्मय पाहणं. पहाणं कताअतय. रुबाईय पाहणं संपूर्ण
पाहणंय उतरंड कवितेतली शब्दांची. पाहणंय कविता संपूर्ण
देहाची मांडामांडय पाहणं. पाहणं ऊरूसेय हरदम देहाचा
नि रंगयेत पाहणं. रंगरेजय पाहणं.
५.
झाडाला काय पर्यायेय?
कुणाला विचारू हा प्रश्न…काय पर्यायेय?
ईश्वराला झाड विचारणं ही एक स्पिरीच्युअल घटनाय
की अफवाय त्याचं असणं. यत्र. तत्र. सर्वत्र पसरलेली
नि झाड तर ईश्वराची संपूर्ण निर्मितीय. संपूर्णय पाहणंय
ईश्वराचं. झाडाला पाहणं ईश्वराला पाहणंय. इबादतंय
मं… ईश्वराला काय पर्यायेय?
कविता एक पर्यायेय ईश्वराला. आदिमंय. डिव्होशनलंय
कवितेत ईश्वरंय माणसासारखाचंय. डिट्टोय. माणूसच ईश्वरंय
एक थकला भागला माणूसंय ईश्वर कवितेत हरदमंय
भूकय पाहणं ईश्वराला, ईश्वरच भूकय सदोदीत
मं… भुकेला काय पर्यायेय?
ईश्वराचं माणसांना पाहणं कनवाळूय. इनायतंय ईश्वर
नि ईश्वर कनवाळूय कवितेत. चित्रात. दोघातंय
नि करूणा भाकणं कविताय. हाकंय देठातली ओलंय
नि माणूस एक झाडंय, ईश्वराची निर्मितीय. अनाकलनीयय
नि झाड अंगणातंय. ते गजबजून जाणारेय नक्कीच
पाना-फुलांनी. वस्तीला पाखरंयेत. झाड विसावाय
विसावाय पाहणं नि सावलीय झाड. सावली विसावाय
सावली पाहणं झाडंय. अमर्यादय. बेहद्दय पाहणं झाड
मं… सावलीला काय पर्यायेय?
झाड पाहणं इबादतंय. इबादंतय पाहणं. झाड जुनूनंय
मजहबी नाहीये पाहणं, माँहजबीये. नि झाड जामीनंय
दरख्वास्तंय पाहणं. इल्तिजाय. अरजंय पाहणं. आखरी आरजूँय.
प्रतिमा सौजन्य : प्रकाश नेवासकर
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
10 Comments
गणेश कनाटे
मराठी कवितेत बऱ्याच दिवसांनी एक उत्तम, अस्सल, बघणे या अनुभव प्रक्रियेच्या मुळाशी जाऊन आशय शोधणारी कविता लिहिली गेली आहे.
मंगेश भाऊ, तुसी genuine कवी हो!
सुचिता खल्लाळ
कविता पर्यायंय ईश्वराला- सुंदरच !
उर्दूमिश्रित लहेजा,देहातीत अध्यात्म आणि पाहणं..
अप्रतिम कविता !!
विलास गावडे
मित्रा,
हिला कविता म्हणावं की चित्रं? की चित्रमय कविता? दोन्ही एकमेकात विलक्षणपणे बेमालूमपणे एवढ्या मिसळून गेलेल्या पहिल्यांदाच अनुभवायला मिळाल्या! तू ग्रेट आहेस आणि तुझी ही कविताही तितकीच ग्रेट आहे! मानाचा मुजरा दोघांनाही!👌👌👌
दागो.काळे
मंगेश झाडांकडे एक वस्तुमात्र म्हणून पाहत नाही,माणसांमधील अपरिहार्य घटितांमध्ये,त्याच्या जाणिवांच्या विविध स्तरावर समावेश करतो.त्याची झाड या नात्याकडे पाहण्याची अलौकिक दृष्टी अव्दैताच्या जवळ जाणारी आहे.मंगेश कवितेकडे जाण्याचा रियाज भक्कम आणि सुंदर आहे.काका…
Ashutosh Diwan
बरेच ऊर्दू शब्द असल्याने कळली नसावी.
धर्मवीर पाटील
शब्द नाहीत. निव्वळ अप्रतिम! ग्रेट!
धर्मवीर.
पांडुरंग सुतार
खरे तर शब्द अपुरे पडतात या कवितेसाठी ..
झाडे सगळीकडे आहेत , आपल्या अंतर्मनातही…
मला देखील असा शोध लावायचा आहे झाडांचा , आतून बाहेरून …
अभिनंदन मित्र ….
कृपेश महाजन
समुद्राच्या तळाशी जाऊन तळातली रेती घेऊन आल्याचा फील आला….
सोपं सहज आणि तेवढंच गहन!…
गुंतागुंत अतिशय सरळ केलीत…’कविता पाहिली’ असं म्हटल्यास वावगं ठरू नये!…
-कृपेश महाजन
Dasoo vaidya
माझी आवडती कविता..!
mohan shirsat
मंगेशभाई
एक संपन्न अनुभव एका संपन्न कवीने आपल्या संपन्न शब्दांतून संपन्न साधनेतून मांडला आहे.झाड हे चराचरसृृृृृृष्टीचं आहे.यातून मानवी जीवनाचं काव्यात्मक नातं शोधणं ही एक संपन्नतेचं आहे.नेहमीप्रमाणे मंगेश काळेंची काव्यशैली जाणवते.ह्या कविता वाचताना अधिक संपन्नतेचा अनुभव घेतला भाई !