दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांची समग्र कविता, ‘एकूण कविता’ पॉप्युलर प्रकाशनाने नुकतीच प्रसिद्ध केली. “माझ्या ‘एकूण कविता’ वाचकांनी एकत्र पाहाव्यात अशी माझी इच्छाच नव्हती; तर तात्त्विक हट्टही होता आणि मी कवितेमध्ये जितका पूर्णपणे गुंतलो आहे, तितका इतर कशातही नाही. म्हणून ‘एकूण कविता’ हे माझे आयुष्यातले मुख्य विधान आहे असं मी म्हणेन,” अशा ठाम धारणा असणाऱ्या कवीची समग्र कविता, डॉ.रणधीर शिंदे यांची प्रस्तावना, तीन परिशिष्टे आणि चित्र्यांचे आणि चित्र्यांच्या साहित्यावर असलेल्या लेखनाचे तपशील सांगणारी संदर्भसूची असा ऐवज असणारा तब्बल ९८७ पृष्ठांचा हा ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल पॉप्युलर प्रकाशनाचे अभिनंदन करायला हवे.
वयाच्या सोळाव्या वर्षापासून कविता करायला सुरूवात केलेल्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांची समकालीन जग पचवत भाषेच्या अंगाने काळाला आव्हान देणारी, अव्याहत उधाणलेली कविता वाचक-समीक्षक-संशोधक-भाषांतरकारांना लागोपाठ स्तिमित करत झालेली आहे. चित्रे केवळ नवा आशय घेऊन आले नाहीत, तर कवितेची स्वतंत्र शैली आणि अत्यंत भावावेगी, सर्वसमावेशक जीवनदृष्टीसुद्धा घेऊन आले. जगभरातल्या प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, उत्तर-आधुनिक साहित्य आणि अन्य कलांचीही विलक्षण समज आणि आकलन त्यांना होतं आणि त्याबरोबरच मराठीतल्या भक्तीसंप्रदायातल्या अद्भुत कवितेशी आपली नाळ पक्की जोडून त्यांनी आपल्या काव्यगत ‘स्व’साठी स्वयंभू सृष्टीच उभारली, असे आपल्याला ह्या ग्रंथात समाविष्ट केलेल्या सुमारे ९३३ कवितांच्या आधाराने म्हणता येते. त्यांच्या काव्यगत ‘स्व’ ची अपरिमित व्याप्ती ही एकूण मराठी कवितेच्या परंपरेत अतिशय ठळक आणि अमिट आहे. कवी म्हणून त्यांचे अस्तित्व हे माध्यम असल्यासारखेच होते. “बाहेरचं जग माझ्याद्वारा वाहून जातं भाषेत,” (‘ही जीभ’) अशी त्यांच्या एका कवितेची ओळ आहेच. त्यांच्या कवितेतल्या ‘स्व’चे इतके व्यापक आणि विस्तृत असणे, ही खरेतर त्यांच्या कवितेची देणगीच आहे. ह्या ‘स्व’ने अद्भुत सृजनऊर्जेतून ज्या ज्या साहित्य आणि कलापरंपरांशी आपली नाळ जोडून घेतली त्या त्या परंपरांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा अशी शब्दांकित होते :
ज्या परंपरेचा वणवा घुसलाय माझ्या अंगात
तिला वावगी नव्हती कोणतीच विस्तारती अरण्य.
जीभ जी मी जोपासली सातशे वर्षं
स्वतंत्र प्रज्ञेच्या परंपरेत आणि अशा मुलुखात
जिथं भसाड्या भजनांनी पोखरून काढला
मग्रूर कर्मठांचा धर्म आणि मोकळी केली
भक्तीमधून भावनेची अचाट शक्ती.
‘ज्या परंपरेचा वणवा..’ (स्मरणपत्र)
अचूक, तंतोतंत, घडीव शब्द, संमोहित करून टाकणारी लय, जे जे आहे ते ते संवेदनेच्या, आकलनाच्या आवाक्यात आणू शकणारी एकाचवेळी आधुनिक आणि उत्तर-आधुनिक देखील अशी प्रगल्भ जीवनदृष्टी आणि वरचेवर आश्चर्यकारकपणे विकसित होत जाणारे अत्यंत अपारंपरिक शैलीत व्यक्त होणारे आशय, भाषा आणि लयीच्या बेफाम प्रपाती ओघात इतिहास, जगातल्या विविध संस्कृती, सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक ऱ्हास, वैज्ञानिक दृष्टीकोण, समकालीन जगण्यातले अनेकविध प्रश्न, अस्थैर्य आणि निरंतर भ्रमंती, स्त्री-पुरूष संबंध, ईश्वर, मृत्यू, विश्वाची उत्पत्ती अशी न सुटलेली आणि पुन्हा पुन्हा मोहात पाडणारी कोडी असे आणि आणखी कितीतरी विषय लीलया ओवले जातात. विश्वातल्या चेतन-अचेतन घटकांशी सारख्याच तीव्रतेने, उत्कटतेने, आस्थेने तत्काळ संबंध प्रस्थापित करून एका विशेष पारलौकिक तंद्रीत विश्वरहस्यांशी तादात्म्य पावत भक्ती आणि शक्तीचा ओघ अखंड ठेवणाऱ्या सुसंस्कृत आणि उधाणलेल्या त्यांच्या ‘स्व’ला स्थळकाळाची अरण्यं खरोखरच वावगी नव्हती. भाषेच्या माध्यमातून अविरतपणे काही शोध घेताना आशयाशी एकंकार झालेल्या त्यांच्या कवितेतील ‘स्व’ची कितीतरी उदाहरणे ह्या संग्रहात वाचता येतील. ‘पिसाटीचा बुरूज’, ‘जुलाय १९५६’, ‘काळी चित्तीण वावरते भासांच्या रात्रीत’, ‘शक्तीची प्रार्थना’, ‘सिंफनी तिसरी’, ‘तीव्र कोमल निळी सिंफनी’, ‘स्मरणपत्र’, ‘चिरलौकिक’, ‘सॅफायर सिंफनी’, ‘जोहान्न् सेबॅस्टियन बाख्’, ‘मृत्यू’, ‘मालकौंस’, ‘ओवी (१९९४)’, ‘मॅजिक मोहल्ला’ अशा बऱ्याच कविता उदाहरणादाखल विचारात घेता येतील. भाषेतून व्यक्त होताना आपल्या संवेदनेची तीव्रता पणाला लावत चेतन-अचेतन, आतले-बाहेरचे असे सगळेच संदर्भ आवेगाने कवेत घेत चित्रे भाषा आणि लयीने संस्कारित केलेले स्वयंभू विश्व निर्माण करतात. त्यांच्या कवितेतला ‘स्व’ हा स्वागतशील, प्रसरणशील, उत्कट भावावेगी, ऐंद्रिय संवेदनांचे आर्तव रिचवणारा आणि उत्तरोत्तर अवैयक्तिक होत जाण्याचे आध्यात्मिक/अधिभौतिक सामर्थ्य लाभलेला आहे.
चित्र्यांच्या कवितेत आरंभापासूनच स्पर्शसंवेदन अगत्याने प्रचूर असले तरी दृक, श्राव्य, गंध आणि चव ही संवेदनेही अतिशय तीव्रतेने शब्द धारण करतात. कितीतरी वेळा केवळ अभूतपूर्व वाटाव्यात अशा प्रतिमा आणि प्रतिमाने योजून चित्रे कवितेत अतिशय दुर्मिळ असा बहुसंवेदनमेळही साधतात. ह्यात त्यांची भाषेवरची हुकमत थक्क करून टाकणारी आहे. अशा पद्धतीने अभिव्यक्त होताना चित्रे भाषेचा असा सर्वंकष उत्सव करतात की, कवितेतल्या अर्थांची विस्तारत जाणारी व्याप्ती समजून घेताना आपल्या ज्ञानेंद्रियांची तीव्रता पणाला लागावी! ह्या संदर्भात चित्रे आणि सुप्रसिद्ध मेक्सिकन कवी ओक्ताव्हियो पास ह्यांच्यात आश्चर्य वाटेल इतके साम्य आहे. पण अंगभूत आध्यात्मिक उर्मीतून स्वाभाविकपणे अवैयक्तिक आणि इंद्रियातीत होऊन विराट विश्वाशी एकंकार होण्याच्या व्याकूळ आणि तीव्रतर संवेदनेमुळे चित्र्यांच्या कवितेतला ‘स्व’पासच्या कवितेतल्या ‘स्व’पेक्षा अधिक व्यापक ठरतो. ह्या साधारण निरीक्षणासाठी चित्र्यांची ‘शक्तीची प्रार्थना’ आणि पास ह्यांची ‘मैथुन’ ह्या कवितांचा तौलनिक विचार करता येईल.
अवैयक्तिक होणे, स्थळकाळापलीकडे जाणे, इंद्रियातीत असण्याच्या अवस्थेपर्यंत येणे यांसाठी चित्रे ह्यांच्या कवितेला संगीताची साथ असल्याचे लक्षात येते. ‘संगीतात काळ श्राव्य होतो’ असे त्यांचे एक विधान आहेच. संगीताचे अंतरंग त्यांच्या कितीतरी कवितांचे अंगभूत घटक आहेत. त्यासाठी या संग्रहातल्या ‘तीव्र कोमल निळी सिंफनी’, ‘सुन्नाट (Sonata)’, ‘लालभडक राखी’, ‘दुसरी सिंफनी’, ‘मियाँ का मल्हार’, सिंफनी तिसरी’, ‘संपूर्ण मालकौंस: अवरोहातला ऋषभ : भूगंधर्व रहिमत खाँ’, ‘आली कैसे पिया बिन जिया तरसत है’, ‘जोगिया’, ‘केदार’, ‘संपूर्ण मालकौंस’, ‘अलेग्रो इन्नीचेन्तो’, ‘चवथा ब्रांडेनबुर्ग काँचेर्तो: ‘जी’ मेजरमध्ये : आलेग्रो, आरांते, प्रेस्तो-२’ ह्या कविता अभ्यासता येतात. निखळ अनुभूतीच्या विलक्षण तंद्रीत चित्र्यांचे बहुसंवेदनमेळ साधण्यासाठी भाषा पणाला लावण्याचे अद्भुत कौशल्य ‘चवथा ब्रांडेतबुर्ग काँचेर्तो..’ ह्या कवितेत प्रत्ययाला येते:
`विद्राव्य स्वरांच्या प्रकाशमय बागा:
बहरता बहरता झडणा-या आकाशासारख्या.
आश्चर्यकारक कारुण्याची कोवळी उन्हं;
व्हायोलिनच्या गजांतून धावणाऱ्या दोन बासऱ्या
मध्येच निश्चलतेत गिरकी घेऊन आपण.
अल्लडपणे गुंजारव करणाऱ्या भुंग्याभोवती
आपोआप मिटणारं नादाचं कमळ.
नंतरची उघडलेल्या मस्तकातली
सुरेल पावलांची दाही दिशा पाऊलवाट
प्राणांच्या गवतामधून जाणारी ठळक आणि लाल
बाग विरघळत तिच्या जागी दिसणारं
मूळ अरण्य परमेश्वरी प्रतिभेचं
एकाच साध्या नियमाने उकललेला विराट गुंता
पुन्हा बासरी, पुन्हा व्हायोलिन, पुन्हा त्याच गती
मुखड्यासारख्या : पण बदलत्या चर्येच्या
आता सगळं आभाळसुद्धा सोपं झालेलं.
छेडलेल्या तारांतून बासऱ्यांच्या आठवणी
पृथ्वीवर येताना. अचानक शेवटची कॉर्ड
वाजण्यापूर्वीचे द्विदल झंकार पुन्हा तीच गत.
बहुसंवेदनमेळ साधण्याच्या अनुभवासाठी ‘नंदिताचा आवाज’ ह्या अप्रतिम कवितेचेही उदाहरण घेता येईल. त्या कवितेच्या काही ओळी:
मी विजूला म्हणालो
नंदिताचा आवाज मला फार आवडतो
तो ताजा, टवटवीत, उत्फुल्ल
आणि पांढऱ्या शुभ्र पाकळ्यांचा
तगरीच्या फुलांसारखा
खूप साधा आणि सुंदर वाटतो
लहानपणच्या आठवणीतला..
..नंदिताचा आवाज फोनवर ऐकताना
काहीतरी अद्भुत अबस्ट्रॅक्ट
कोमल स्पर्शासारखं फ्रेश
आणि मुख्य म्हणजे पांढरंशुभ्र
जाणवतं
..आणि ती समक्ष असताना
स्थूलपणे ती नंदिता असते
आणि सूक्ष्मपणे ती आवाज असते
माझ्यावर तिचं पोर्ट्रेट
काढलं जात असतं
फलकासारखा माझा मला
मी जाणवतो
एका उत्फुल्ल पांढऱ्या शुभ्र
विसराळूपणात
ओथंबलेला
मला लागलेला ब्रश असतो
नाहीसा झालेला
..मी तर पूर्ण मोकळा होतोय आता
कॅन्व्हसवरच्या पोतासारखा
तंतुमय संवेदनामय झालोय
वाद्यावरल्या झिणझिण्यांसारखा
शांतता होऊन मोहरलोय
ह्या विसराळूपणात
माझा होतोय
संपूर्ण विलय.
चित्र्यांच्या सृजनऊर्जेने अभिव्यक्तीची अनेक दालने स्वत:साठी खुली करून पाहिली. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी कवितेखालोखाल चित्रकला, चित्रपट ही देखील होती. प्रत्येक ऐंद्रिय संवेदन पूर्णपणे आणि स्वतंत्रपणे आणि शिवाय सुघटित एकंकार बहुसंवेदनमेळ पूर्णत्वाने अभिव्यक्त करण्याचा त्यांच्या सृजनध्यासाचेच अधिष्ठान त्यामागे असावे.
बा.सी.मर्ढेकर आणि पु.शि.रेगे यांच्या आणि त्यानंतरच्या कवितेचा अभ्यास, आकलनासाठी मराठी समीक्षेने उभारलेले सगळे आराखडे चित्र्यांच्या कवितेने ओलांडून पार केले आणि आजतागायत त्यांची कविता ‘मला आस होती नभे धुंडण्याची’ पासून ते ‘उजियारी मुस्कुराहटों के पीछे’ पर्यंत आपल्याला आव्हान देतेच आहे. त्यांच्या कवितेत अतिशय सहज अंतर्भूत होणारी विश्वाची व्याप्ती ही केवळ हतबुद्ध करणारी आहे. त्यांच्या कवितेतून मराठी भाषेचे सामर्थ्य आणि समृद्धीही लक्षात येते. सृजनाची अफाट ऊर्जा असणाऱ्या, अपरंपार कुतुहलाने चेतन-अचेतन सृष्टीतल्या प्रत्येकच घटकाशी आत्मिय नाते प्रस्थापित करण्याची अपार आस असणाऱ्या आणि आपल्या सृजनाचा पिंड ज्या साहित्य-कलापरंपरांनी घडवत आणला त्या परंपरांविषयी कृतज्ञभाव असणाऱ्या या कवीला ‘एका भुंड्या टेकाडासारख्या समाजात मी कवी झालो’ अशी ओळ लिहावी लागली ही बाब उत्तरोत्तर ‘प्रगती’ करत जाणाऱ्या आपल्या ‘वैश्विक’ जीवनदृष्टीत सृजनाचे मोल सूचित करणारीच आहे. पण शेवटी, कोणत्याही आणि कितीही गुंतागुंतीच्या काळाला आव्हाने सृजनानेच निर्माण केलेली आहेत:
एकदा आत्महत्येच्या कड्यावर
तीन महिने उभा राहिलो
नंतर एक गूढ झोप घेऊन
उठलो, स्वच्छ होऊन.
..सगळी माणसं ज्या कड्यावर
कधी ना कधी येऊन उभी राहतात
ते तर माझं जन्मस्थान होतं.
(६८३, ‘एकदा आत्महत्येच्या कड्यावर’)
‘एकूण कविता: दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांची समग्र कविता’ हा अतिशय संग्राह्य ग्रंथ झाला आहे. आपल्या विस्तृत प्रस्तावनेत डॉ.रणधीर शिंदे नमूद करतात त्यानुसार दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांचे एकूण वाङ्मयीन आणि अन्य कलांमधले योगदान ही खरे तर सांस्कृतिक फलश्रुतीच आहे.
डॉ शिंदे ह्यांनी प्रस्तावनेत मराठी कवितेच्या परंपरेत चित्र्यांची कविता, चित्र्यांचे अन्य कलांमधील योगदान, चित्र्यांच्या कवितेतील विविध आशयसूत्रे, भाषाशैली यांविषयी अभ्यासाला चालना देणारी मांडणी केली आहे. चित्रे ह्यांच्या सगळ्या कवितांचा असा संग्रह येणे हे अतिशय आवश्यक होते. ते काम इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर पूर्ण झाले. परंतु, हे ‘समग्र’ संकलन म्हटल्यामुळे चित्र्यांच्या अन्य कलांतल्या भरीव योगदानाबद्दल माहिती देणारे, प्राथमिक विवेचन करणारे आणखी दोन-तीन लेख त्यात असते तर ते चित्र्यांच्या तीव्रतर सृजनसत्त्वावर आणखी प्रकाश टाकणारे निश्चितच झाले असते. तशी साधक-बाधक माहिती डॉ.रणधीर शिंदे यांनी त्यांच्या प्रस्तावनेत कवितेवर भाष्य करताना दिलेली आहेच. परंतु, सृजनऊर्जा आणि अभिव्यक्तीच्या अनेकविध वाटा गांभीर्याने चालणाऱ्या चित्र्यांबद्दलचे कुतूहल अधिक जागे व्हावे म्हणून आणि त्यांच्या बहुविध योगदानाबद्दल जरा अधिकपणे अशी माहिती, विवेचन असावे म्हणून असे लेख असते तर ते संशोधक-अभ्यासकांना सहाय्यभूतच ठरले असते.
अप्रतिम सर एकूण कवितेचा आस्वावादात्मक पातळीवरील केलेला ऊहापोह समीक्षात्मक पातळीवर कधी घेऊन जातो हे कळतही नाही आपल्या भाषेचे प्रवाहीपण अप्रतिम आणि सुंदर आहे.
उत्तम लेख. संक्षिप्त पण नेमका आढावा घेणारा.
रणधीर शिंदे यांची प्रस्तावना हा तर संशोधनात्मक दस्ताऐवज आहेच;पण त्या प्रस्तावनेच्या निमित्ताने तुम्ही लिहिलेला लेख चित्र्यांच्या कवितेत ‘खोलवर कसे उतरायचे’ याची किल्ली देणारा पासवर्ड हाती लागावा,इतका महत्त्वाचा वाटला.
आभार!
बहुआयामी सर्जनाच्या वाटा धुंडाळणारा
दि.पु.चित्र्यांसारखा ‘कलावंत’ एकंदर मराठी साहित्यविश्वात तसा अपवादात्मक आहे.परंतु चित्र्यांच्या सर्जनाचा विचार करतांना तो ‘कविता’, ‘चित्रकला’,’समीक्षा’ असा तुटक आणि कप्पेबंद झाला आहे.
अशा वतर्तुळबंद विश्लेषणाला छेद देणारी रणधीर शिंदे यांची प्रस्तावना हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.मात्र त्यातही पुन्हा कवितेच्या गाभ्याचा शोध मध्यवर्ती आहे.या पार्श्वभूमीवर आपला हा लेख तसा संक्षिप्त आहे खरा;पण कवी,समीक्षक,सर्जक कलावंत असलेल्या चित्र्यांच्या कवितेत आणि त्याहीपेक्षा त्यांच्या एकंदरीत सर्जनात खोलवर ‘कसे उतरायचे’ याचा पासवर्ड मिळवून देणारा आहे.
बहुआयामी सर्जनाच्या वाटा धुंडाळणारा
दि.पु.चित्र्यांसारखा ‘कलावंत’ एकंदर मराठी साहित्यविश्वात तसा अपवादात्मक आहे.परंतु चित्र्यांच्या सर्जनाचा विचार करतांना तो ‘कविता’,’चित्रकला’,’समीक्षा’ असा तुटक आणि कप्पेबंद झाला आहे.
अशा वर्तुळबंद विश्लेषणाला छेद देणारी रणधीर शिंदे यांची प्रस्तावना हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.मात्र त्यातही पुन्हा कवितेच्या गाभ्याचा शोध मध्यवर्ती आहे.या पार्श्वभूमीवर आपला हा लेख तसा संक्षिप्त आहे खरा;पण कवी,समीक्षक,सर्जक कलावंत असलेल्या चित्र्यांच्या कवितेत आणि त्याहीपेक्षा त्यांच्या एकंदरीत सर्जनात खोलवर ‘कसे उतरायचे’ याचा पासवर्ड मिळवून देणारा आहे.
उत्तम मांडणी केली आहेस। रणधीरची भूमिका जशी नेमकी उलगडलीस तशी तुझी पण कवितेकडे पाहण्याची दृष्टी लक्षात आली।