Skip to content Skip to footer

‘तुला जवळ घेऊ?'(एक अरोमँटिक कॉमेडी)।मूळ इंग्रजी नाटक : कारी बार्कले ।मराठी अनुवाद : आशुतोष पोतदार

Discover An Author

  • Playwright, Director and Researcher

    Kari Barclay is a playwright, director, and researcher based in Cleveland, Ohio, USA. In scholarship and in practice, Kari looks at the intersection of politics, sexuality and performance. Kari has written and directed plays in New York and across the USA at Ars Nova, Cleveland Public Theatre, Richmond Triangle Players, and Stanford University, among other theaters. Kari is the author of Directing Desire, a book about consent and directing in the aftermath of the #MeToo Movement, and articles in a variety of journals in theater and performance. Kari serves as Assistant Professor of Theater at Oberlin College.

    कारी बार्कले हे अमेरिकेतील क्लीव्हलँड, ओहायो येथे राहणारे नाटककार, दिग्दर्शक आणि संशोधक आहेत. आपल्या संशोधनपर लेखनातून तसेच सर्जनशील कृतींतून कारी राजकारण, लैंगिकता आणि सादरीकरण ह्यांच्यातील संबंधांकडे पाहतात. त्यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क आणि इतर भागातील आर्स नोव्हा, क्लीव्हलँड पब्लिक थिएटर, रिचमंड ट्रँगल प्लेयर्स आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ह्यांसारख्या नाट्यसंस्थांसाठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. कारी ह्यांनी #MeToo चळवळीनंतरच्या काळात संमती (Consent) आणि दिग्दर्शन ह्या विषयांवर डायरेक्टिंग डिझायर ह्या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे. ह्याव्यतिरिक्त, सादरीकरण आणि नाटक ह्याविषयीचे त्यांचे लिखाण विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे. ओबेर्लिन कॉलेज (अमेरिका) येथे कारी नाटक या विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.   

  • Writer, Translator, Editor and Faculty

    आशुतोष पोतदार हे नाटककार, एकांकिकाकार, कवी, कथाकार, अनुवादक, संपादक आणि संशोधक-अभ्यासक असून ते मराठी आणि इंग्रजी ह्या भाषांत लेखन करतात. त्यांची नाटक, कवितासंग्रह, अनुवाद, आणि संपादित ग्रंथ ह्या प्रकारांत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते पुण्यातील फ्लेम विद्यापीठामध्ये रंगभूमी आणि प्रयोग-अभ्यास विभाग (अभिकल्प, कला आणि प्रयोग प्रशाला) येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून साहित्य आणि नाटक ह्या विषयांचे अध्यापन करतात. आशुतोष हाकारा | hākārā-चे संपादक आहेत.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer known for his one-act plays, full-length plays, poems, and short fiction. He writes in both Marathi and English and has seven published books to his credit. He is currently an Associate Professor of Literature and Drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art, and Performance) at FLAME University, Pune. He is the editor of हाकारा | hākārā.

तुला जवळ घेऊ? : मराठी अनुवादाविषयी

मागील वर्षी, अमेरिकेतील नाटककार आणि ओबेर्लिन महाविद्यालयात नाटकाचे अध्यापन करणाऱ्या कारी बार्कलेला आणि मला जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तसेच अमेरिकन रंगभूमीवर झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी ‘न्यू डायरेक्शन्स इन ग्लोबल फेलोशिप’अंतर्गत कोलॅबोरेशन करून संशोधन करण्याची संधी मिळाली. आम्ही दोघेही नाटक लिहिणारे आणि नाटक शिकवणारे. एकमेकांच्या नाट्यलेखन-प्रक्रिया समजून घेणे, तसेच एकमेकांच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत गेल्या चाळीस वर्षांतील नाटक जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून कसे बदलत गेले आहे याबद्दल विचार-मंथन करणे हा या फेलोशिपचा उद्देश होता. याअंतर्गत, आम्ही दोघांनी पुण्यात तसेच क्लीव्हलँडमध्ये नाटके बघितली, नाट्यसंस्थांना भेटी दिल्या आणि नाट्य-कलाकारांशी संवाद साधला. 

कारी बार्कलेच्या कॅन आय होल्ड यू? या नाटकाचा मी केलेला तुला जवळ घेऊ? हा अनुवाद म्हणजे माझ्यासाठी अनोळखी असणाऱ्या जीवनधारणा आणि अनुभवविश्व यांत मी केलेला प्रवास होता. हे नाटक अलैंगिकतेविषयी आहे. म्हणजे, कारीच्या या नाटकातील पात्रे एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांच्यात लैंगिक आकर्षण नाही. लैंगिक आकर्षणाच्या अभावाला आणि त्यातून आकाराला येणाऱ्या अत्यंत खाजगी स्तरावरच्या भावविश्वाला कारी नाट्यात्म भाषेत मांडतो. असे करत असताना, तो अलैंगिकतेच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या नातेसंबंधांना अमेरिकेतील समलैंगिकतेचा पुरस्कार करणाऱ्या सामाजिक चळवळीशी जोडतो, हे या अनुवादाच्या निमित्ताने मला समजून घेता आले. कॅन आय होल्ड यू? हे नाटक अमेरिकेतील विशिष्ट अशा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भांत घडत जाते. विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात आंतरजालावरच्या सामूहिक कृती आणि लेखन यांतून अलैंगिकतेवर आधारलेल्या नातेसंबंधांचा विचार समोर येऊ लागला. तसेच, त्यांना पूरक अशी सामाजिक चळवळ आकाराला आली. अर्थात, अलैंगिक नातेसंबंधांची चर्चा फक्त अमेरिकेतच आणि विसाव्या शतकातील दशकापुरती मर्यादित नाही, हे आपल्याला कारीने ‘हाकारा’च्या विद्यमान अंकामध्ये लिहिलेल्या Asexuality in Translation: ‘Can I Hold You?’ Across Linguistic Borders या लेखावरून ध्यानात येईल. 

तुला जवळ घेऊ? हा अनुवाद करताना मला तीन मुद्दे समजून घेता आले. पहिला, अमेरिकेत राहणारा माझा समकालीन नाटककार सध्याच्या काळाविषयी काय विचार करतो. दुसरा, स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याला नाट्यात्म आयाम देताना नाटककार आपल्या अभिव्यक्तीचे रूप कसे शोधतो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, स्त्री-पुरुष या द्विलिंगाधारित भाषिक रचनेत नांगर टाकून असणाऱ्या मराठी भाषिक रूपांच्या पार्श्वभूमीवर द्विलिंग-विरहित सामाजिक रचनेचे प्रारूप समोर ठेवून लिहिल्या गेलेल्या इंग्रजी नाटकाचा अनुवाद करताना उभी ठाकणारी आव्हाने. 

व्यक्तिगत स्तरावर अलैंगिकता अनुभवत असतानाच, कारीने, अमेरिकेतील एल.जी.बी.टी.क्यू.आय.ए. (लेस्बियन-गे-बायसेक्शुअल-ट्रान्सजेंडर-इंटरसेक्स-क्वीअर-असेक्शुअल) विचारव्यूहातील द्विलिंगधारणांपलीकडे तसेच लिंगभेदांपलीकडे जाण्यासाठी उभ्या राहिलेल्या सामाजिक तसेच राजकीय चळवळीचा भाग बनत कॅन आय होल्ड यू? या नाटकाचे लेखन केले आहे. २०१७च्या आसपास जेव्हा कारीने हे नाटक लिहिले, तेव्हा त्याच्या आजूबाजूला अलैंगिकतेबद्दलची आणि अलैंगिकतेवर आधारित नातेसंबंधांविषयीची जागरूकता कमी होती. स्वतःचे अनुभव समोर ठेवून कारी आजूबाजूच्या लोकांशी अलैंगिकतेबद्दल बोलत राहिला. पण सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. स्वतःच्या अनुभवांना वाट करून देण्याबरोबर समाजात जवळजवळ ‘अदृश्य’ असणाऱ्या त्याच्यासारख्या लोकांना आणि समूहांना ओळख प्राप्त करून देणे हा त्याचा उद्देश होता. सॅन फ्रान्सिस्कोमधील अलैंगिकतेच्या स्पेक्ट्रमवरल्या लोकांसाठी असणाऱ्या मीट अप्सना हजर राहून लोकांना भेटणे, समलिंगी तसेच भिन्नलिंगी लोकांना डेटिंग करताना येणारे अनुभव समजून घेणे, लैंगिक संबंधांसाठी येणारा दबाव आणि अलैंगिकतेमुळे येणारे एकटेपण यांतून आपल्यासारखे लोक कोणते अनुभव घेतात आणि त्या अनुभवांना कसे सामोरे जातात यांच्या नोंदी ठेवणे, यांतून कारीचे नाटक आकाराला आले. लैंगिकतेच्या पलीकडे जात, ‘निखळ मैत्री’ ची स्वप्ने पाहत प्लेटॉनिक नातेसंबंधांना कल्पिणारे कॅन आय होल्ड यू? हे नाटक वंशभेदी आणि लिंगभेदी अस्मितांच्या छेदनबिंदूवर (intersectionवर) अलैंगिकतेचा विचार मांडते. अलैंगिकतेविषयीचे नाट्यात्म जग मांडताना, रंगकर्मी असणाऱ्या कारीने नाटकाच्या तालमीतून कलाकारांना निर्मिती-प्रक्रियेत सहभागी करून घेत, अमेरिकेतील सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भांत मुख्यधारेतून दूर असलेल्यांच्यात आपलेपणाची सामूहिक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. 

सर्जनशील लेखक आणि अभ्यासक म्हणून माझे लेखन आणि विचारविश्व् स्त्री-पुरुष-लिंगभेदाच्या पायावर उभारलेले आहे. माझ्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी स्त्री-पुरुष नातेसंबंध आहेत. स्त्री-पुरुषातील लैंगिकता म्हणजे मानवी असणे, आणि लैंगिक आकर्षणाचा अभाव ही एक समस्या आहे, अशी कल्पना करणाऱ्या सामाजिक संस्था, रीती आणि नियम या चौकटींत माझ्याभोवतीचे विश्व आहे. या पार्श्वभूमीवर, कॅन आय होल्ड यू? या नाटकाशी आपले नाते काय, हा प्रश्न अनुवादप्रक्रियेदरम्यान माझ्या मनात उभा राहिला. वर उल्लेखलेले मला ज्ञात नसलेले कारीचे विचार आणि भावविश्व, तसेच लिंगभेदांवर बेतलेली सत्ताकारण-व्यवस्था समजून घेण्यासाठी हे नाटक आणि आनुषंगिक चर्चा माझ्यासाठी महत्त्वाची होती. 

महत्त्वाचे म्हणजे, मराठीत हे नाटक आणताना सर्वनामे आणि क्रियापदे अशी भाषिक रूपे वापरताना माझ्यासमोर उभी ठाकलेली आव्हाने ही लिंगाधारित समाजव्यवस्था आणि भाषिक रूपे यांमधील परस्परपूरक संबंधांबद्दल मला विचार करण्यास प्रवृत्त करणारी होती. तुला जवळ घेऊ? या अनुवादित संहितेच्या सुरुवातीला मी स्पष्ट केले आहे, त्याप्रमाणे नाटकातील चार पात्रे — ज्यांच्याभोवती हे नाटक फिरते — जन्माने स्त्रिया असली, तरी ती द्विलिंग-चौकटीपलीकडच्या लिंग-ओळखीचा पुरस्कार करणारी आहेत, या दृष्टिकोनातून नाटककाराने पात्रे रचली आहेत, आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी योजलेली पूरक इंग्रजी भाषिक रूपे आकाराला येतात. पण या नाटकाचा मराठीत अनुवाद करताना,  द्विलिंग-चौकटीपलीकडच्या लिंग-ओळखीचा पुरस्कार करणाऱ्या सर्वनामांचा आणि क्रियापदांचा वापर करणे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरले. अर्थात, या आव्हानाचे सूचन मी अमेरिकेत असताना कारी आणि त्याचा लॅटिन अमेरिकन पार्टनर अलहांदरा यांच्याशी बोलताना केले होते. मराठीप्रमाणे इतर काही भाषांत या नाटकाचा अनुवाद करताना भाषिक रूपे वापरण्याविषयीचा अनुभव तसाच आव्हानात्मक ठरलेला आहे, असे निरीक्षण त्या दोघांनीही नोंदवले होते. यातून मार्ग काढण्यासाठी, कारीने सुचवल्याप्रमाणे, चारही पात्रे द्विलिंग-चौकटीपलीकडच्या लिंग-ओळखीचा पुरस्कार करत असली, तरी स्त्री म्हणून जन्मलेल्या या पात्रांसाठी स्त्री-वाचक सर्वनामांचा आणि पूरक क्रियापदांचा वापर करण्याविषयी एकमत झाले. अर्थातच, नाटककाराने मांडलेले विचारविश्व अनुवादातून चपखलपणे पोहोचवण्यात यामुळे बाधा येईल. पण मराठीतील ‘नपुंसकलिंगी’, अनेकवचनी किंवा आदरार्थी सर्वनामे आणि पूरक क्रियापदे वापरण्यातून होणारा घोळ टाळण्यासाठी आणि अनुवादाच्या सोयीसाठी सर्व पात्रांसाठी स्त्री-लिंगी सर्वनामे आणि पूरक क्रियापदे तुला जवळ घेऊ?मध्ये वापरली आहेत. 

नाटकाच्या मराठी अनुवाद-प्रक्रियेदरम्यान भाषिक रूपे, मूळ नाटकातील अभिव्यक्ती पोहोचवण्याच्या माझ्या प्रयत्नात कारी बार्कले आणि अलहांदरा यांची मदत झाली, तशीच मोलाची मदत ‘हाकारा’तील सहकारी अनघा मांडवकर यांची झाली. 

अशा प्रकारे, तुला जवळ घेऊ? हा अनुवाद करतानाची विचार-प्रक्रिया आणि भाषिक प्रक्रिया मला बरंच काही शिकवून गेली. व्यक्तिगत स्तरावर, माझ्यासाठी मागचे वर्ष खूप त्रासाचे आणि ताणाचे होते. एका टप्प्यावर, मी आणि कारी करीत असलेले संशोधन पूर्ण होण्याबद्दल मी साशंक होतो. पण सर्व अडचणींवर आणि आव्हानांवर मात करून मी अमेरिकेला त्याच्या महाविद्यालयात संशोधन करण्यासाठी आणि व्याख्यानांसाठी जाऊ शकलो. तोही पुण्यात येऊ शकला. माझ्याप्रती त्याने दाखवलेली सम-अनुभूती, आस्था आणि कामाप्रती दाखवलेला आदर यांतून फेलोशिपअंतर्गत आमचे कार्य अर्थपूर्णरीत्या पार पडले. तसेच, भविष्यकालीन संशोधन आणि लेखन-योजना यांची आखणीही सुरू झाली. 

प्रतिमा सौजन्य : कारी बार्कले

फ्लेम विद्यापीठ, पुणे येथील आशुतोष पोतदार यांनी ओबेर्लिन महाविद्यालय (यू. एस. ए. ) च्या कारी बार्कले यांच्या मूळ इंग्रजी नाटकाचा केलेला मराठी अनुवाद ‘जी. एल. सी. ए. ग्लोबल क्रॉसरोड्स इनिशिएटिव्ह’च्या ‘न्यू डायरेक्शन्स इन ग्लोबल स्कॉलरशिप’ या कार्यक्रमांतर्गत ‘ड्रामाटर्जीज ऑफ ग्लोबलायझेशन’ या सहयोगी संशोधन प्रकल्पाचा हा एक भाग होता.या प्रकल्पासाठी मेलॉन फाउंडेशनच्या अनुदानांतर्गत द ग्रेट लेक्स कॉलेजेस असोसिएशनने त्यांच्या ग्लोबल क्रॉसरोड्स इनिशिएटिव्हद्वारे सहकार्य केले होते.

Ashutosh Potdar (FLAME University, Pune) translated a play, Can I Hold You? written by Kari Barclay (Oberlin College, USA) into Marathi. This was part of their collaborative research project, “Dramaturgies of Globalization,” under the GLCA Global Crossroads Initiative’s New Directions in Global Scholarship program. Support for this project was provided by the Great Lakes Colleges Association through its Global Crossroads Initiative, which was made possible by a grant from the Mellon Foundation.

Post Tags

Leave a comment