साहित्यविषयक नियतकालिकाला समजून घ्यायचं असेल, तर ते ज्या समाजात प्रकाशित होतं त्या समाजाला आणि त्या समाजातील वाचनसंस्कृतीला समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. वाचनसंस्कृतीत वाचन म्हणजे केवळ एक कौशल्य नसतं, तर तो इतिहास, भाषा, भूगोल आणि उपलब्ध संवाद-माध्यमांतून आकाराला येणारा एक सामाजिक व्यवहार असतो तसेच, ती एक बौद्धिक कृतीही असते. वाचनसंस्कृती ही केवळ वाचकांची बेरीज नसते. ग्रंथालयं, प्रकाशन-संस्था, शैक्षणिक केंद्रं, संस्कृतीशी संबंधित विविध घटक, आणि एकूण मानवी समुदाय ह्यांच्यामधील संवादांतून वाचनसंस्कृती विकसित होत वर्धिष्णू होत असते. अशा संस्कृतीत साहित्यिक आणि संस्कृतीविषयक साहित्य प्रकाशित करणाऱ्या नियतकालिकांचं स्थान महत्त्वाचं असतं. एकूण संस्कृतीत नियतकालिकांना मिळणारा जनाधार नेहमीच मोठा नसला, तरी ही नियतकालिकं लेखक आणि वाचक तसंच वर्तमान आणि भूतकाळ ह्यांच्यामधील दुवा असतात. स्वतंत्र रीतीने प्रकाशित होणारी पुस्तकं ज्याप्रमाणे स्वयंपूर्ण असतात तशी नियतकालिकं नसतात. नियतकालिकं मूलतः ‘क्षणिक’, कधी-कधी मालिका-रूपात प्रकाशित होणारी, आणि प्रतिसाद देण्याच्या भूमिकेतून आपल्यासमोर येतात. प्रकाशित होताना नियतकालिकं विशिष्ट प्रश्न विचारतात, चर्चा घडवतात, आदान-प्रदानाच्या शक्यता निर्माण करतात, निघून जातात आणि परत प्रकाशित होतात. नियतकालिकांची ही लय स्थितिशील नसते, तर सातत्यपूर्ण, प्रवाही आणि संवादी असते. हाकारा । hākārā हे नियतकालिक गेली आठ वर्षं ह्या लयीत निर्मिती करत राहिलं आहे. पंचविसावा अंक प्रकाशित करताना क्षणभर थांबून हाकारा । hākārāच्या लयीकडे निरखून पाहण्याचा प्रयत्न ह्या लेखाच्या माध्यमातून केला आहे. हाकारा । hākārāच्या प्रकाशनातून आपण काय केलं, काय शिकलो, आणि पुढे कुठे जायचं आहे, असे काही प्रश्न मनाशी ठेवत मराठीतील आणि इतर भाषांतील साहित्यिक नियतकालिकांच्या दीर्घ परंपरांच्या संदर्भात स्व-प्रवासाविषयी चिंतन मांडण्याचा प्रयत्न ह्या विचार-विरामातून केला आहे.
साहित्यविषयक नियतकालिकं
साहित्यविषयक नियतकालिकांचा इतिहास म्हणजे मूलतः मानवी समुदायातील बौद्धिकतेचा आणि सर्जनशील साहित्याला आणि कलाकृतींना सादर करण्याच्या विविध पद्धतींचा इतिहास आहे. नियतकालिक-प्रकाशनाची सर्वात प्रारंभिक ओळखण्यायोग्य रूपं आपल्याला सतराव्या शतकातील युरोपात दिसतात. त्या काळी, सुरुवातीला नव्याने येऊ घातलेल्या आणि विस्तारणाऱ्या मुद्रण-विश्वात वाचकांना मार्गदर्शन करत, नवीन पुस्तकांच्या नोंदी करत, तसंच विचार-कल्पनांची जाहिरात करत नियतकालिक-प्रकाशनाचा प्रवास सुरू झाला. पुढे, अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात, साक्षरता वाढली आणि मुद्रण-तंत्रज्ञान स्वस्त झालं, तसा साहित्यिक समीक्षा हा एक स्वतंत्र प्रकार म्हणून उदयास आला. समीक्षा प्रकाशित करण्याबरोबर, द एडिनबरा रिव्ह्यू आणि द अथेनियम ह्यांसारख्या प्रकाशनांनी ‘गंभीर’ साहित्य म्हणजे काय हे ठरवण्यास मदत केली, वाचकांची अभिरुची जोपासली, साहित्यिकांच्या कारकिर्दी घडवल्या आणि काहींना अंधारातही ठेवलं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘लघुनियतकालिक’ परंपरा — छोटी, प्रयोगशील, आर्थिकदृष्ट्या अस्थिर पण संपादकीयदृष्ट्या धाडसी — अशी प्रति-परंपरा उभी राहिली. द लिटल रिव्ह्यू सारख्या प्रकाशनांनी जेम्स जॉइस ह्या विख्यात आयरिश लेखकाच्या युलिसिज ह्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या कादंबरीचं मालिका-रूपात प्रकाशन केलं आणि दाखवून दिलं की प्रस्थापित प्रकाशनसंस्थाच उत्तम साहित्यिक आणि त्यांचं प्रयोगशील साहित्य प्रकाशित करत नाहीत. तर, परिघावर काम करणाऱ्या, कमी पैशांत चालणाऱ्या, नफाखोरीने काम करण्यापेक्षा उत्कटतेने प्रकाशन करणाऱ्या छोट्या अनियतकालिकांच्या माध्यमातून प्रयोगशील साहित्य-निर्मिती होते. आजही ही परंपरा जागतिक स्तरावर ग्रांटा आणि द पॅरिस रिव्ह्यू ह्यांसारख्या नियतकालिकांनी जिवंत ठेवली आहे.
भारतात, आणि विशेषतः मराठीत, ह्या नियतकालिक-परंपरेची स्वतःची एक वेगळी वंशावळ आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मराठी नियतकालिकं केवळ साहित्य-प्रकाशनचंच नव्हे, तर समाजसुधारणा, भाषिक अस्मिता आणि राजकीय विचार ह्यांचंही माध्यम बनली आहेत. मराठी साहित्य-संस्कृतीत लघुनियतकालिकांची परंपरा विशेषतः साठ-सत्तरच्या दशकापासून खोलवर रुजली आहे. साहित्यविषयक नव्या सौंदर्यात्मक कल्पनांबरोबर मुख्य प्रवाहातून वगळलेल्या समाजघटकांना आवाज देण्यासाठी लघुनियतकालिकं प्रकाशित झाली.
नियतकालिक-संस्कृतीशी माझी ओळख कोल्हापुरात राहत असताना साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा, चित्रलेखा अशा लोकप्रिय मराठी नियतकालिकांद्वारे झाली. पण आमच्या पंचक्रोशीत प्रकाशित होणारी छोटी-मोठी हस्तलिखितं तसंच मर्यादित स्वरूपात प्रकाशित होणारे अंक माझ्यासारख्या अनेकांच्या साहित्यिक जडणघडणीत महत्त्वाचे होते. जवळच्या गावांत एक साहित्यिक मित्र सायक्लोस्टाईल केलेले अंक शबनम पिशवीतून अभिमानाने वितरित करायचा. तर काहीजण, स्वतःच्या आणि इतरांच्या कवितांची हस्तलिखितं नियमितपणे व्यक्तिशः देत असत. असं साहित्य हे व्यापक अशा प्रकाशन-व्यवस्थेचा भाग नव्हतं, पण ते छोटे-छोटे वाचकगट आणि साहित्यिक ह्यांच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देत असे. विशेषकरून, शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेताना (अ)नियतकालिक संस्कृतीने माझं वाचन अधिक समृद्ध केलं. वाचा सारख्या अनियतकालिकाशी जोडलेले माझे प्राध्यापक प्रकाश देशपांडे-केजकर ह्यांनी मला प्रयोगशील लघुनियतकालिक-परंपरांची ओळख करून दिली. नंतर, सतीश काळसेकरांसारख्या परंपरेत सक्रिय योगदान दिलेल्या संपादक-लेखकाच्या माध्यमातून माझं वाचनक्षेत्र अधिक विस्तारलं. कोकणातून प्रकाशित होणाऱ्या दर्शन सारख्या नियतकालिकांशी आलेल्या संपर्काने मला मराठी नियतकालिक-संस्कृतीची व्याप्ती आणि त्यातील चैतन्य जाणवलं. पुढे, जसजशी भारतातील इतर भाषांतील नियतकालिक-संस्कृतीशी ओळख झाली, तसतसं, नियतकालिक-संस्कृती जाता जाता घडणारी किंवा एक पूरक साधन म्हणून विकसित होत नसते, तर ती साहित्यविषयक संस्कृतीतील एक अविभाज्य, प्राथमिक रूप म्हणूनअसते, याचं भान आलं.
हाकारा । hākārāची सुरुवात
नऊ वर्षांपूर्वी नुपूर देसाई ह्यांच्याबरोबर हाकारा । hākārāची सुरुवात आणि मांडणी करताना मनात विशिष्ट विचारधारा किंवा साहित्यविषयक विचारसरणी नव्हती. साहित्य आणि समाज बदलण्याच्या महत्त्वाकांक्षेने किंवा साहित्यिक परंपरेवर आपला ठसा उमटवण्याच्या आविर्भावातून हाकारा । hākārā सुरू केला नाही. तर, हाकारा । hākārāबद्दलचा विचार वैयक्तिक धारणेतून आला होता. स्वतःचं लिखाण, नाट्यप्रयोग आणि इंडिया फाउंडेशन फॉर द आर्टस् ह्या कलाक्षेत्राला अनुदान देणाऱ्या संस्थेत काम करताना जो जनसंपर्क होत होता, तो केवळ कविता, कथा आणि नाटकाशी निगडित लेखकांशीच नव्हता. तसंच, नुपूर ह्यांच्या माध्यमातून दृश्यमाध्यमातील कलाकारांशी आणि अभ्यासकांशीही आमचा संवाद होत असे. विविध माध्यमांना जोडणाऱ्या व्यासपीठाची गरज आम्हां दोघांना तसंच आमच्याशी जोडल्या गेलेल्या मित्र-मैत्रिणींना जाणवत होती. एकाच ज्ञानशाखेशी चिकटून न राहता किंवा विशिष्ट सौंदर्यात्मक भूमिकेला समर्पित राहून काम करण्यापेक्षा मराठी आणि इंग्रजी भाषेतील ज्ञान आणि सर्जनात्मक अविष्कार समोर ठेवून दृश्य आणि शब्द, सर्जनशीलता आणि संशोधनविषयक विचार संवादी स्वरूपात मांडता येईल अशा माध्यमाची गरज आम्हांला जाणवत होती. ह्यातून २०१७ सालापासून हाकारा । hākārā चं प्रकाशन सुरू केलं.
द्वैभाषिकतेचा पाया
हाकारा । hākārāच्या मांडणीमागची एक प्रेरणा बहुभाषिकतेत आहे. भारताची सांस्कृतिक परंपरा सहजरीत्या बहुभाषिक आहे. विशेषकरून, मी ज्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाच्या आसपास वाढलो आणि शिकलो, तेथील समाज-संस्कृतीचा विचार करताना बहुभाषिकत्व सहज जाणवतं. लहानपणापासून मराठी आणि कन्नड ह्या दोन भाषांमध्ये होणारी सहज देवाणघेवाण मी अनुभवत आलो आहे. शिवाय, माझ्यासारख्या अनेकजणांचं शिक्षण मराठी तसंच इंग्रजी भाषांच्या सान्निध्यात झालं आहे. ह्यामुळे, सुरुवातीपासून हाकारा । hākārāचं स्वरूप द्वैभाषिक असणं आमच्यासाठी महत्त्वाचं राहिलेलं आहे. मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांत प्रकाशित करताना मराठी संस्कृतीतील प्रदीर्घ आणि प्रवाही द्वैभाषिक तसंच बहुभाषिक परंपरा ह्यांची जाणीव आमच्यात प्रबळ राहिलेली आहे. आमचे मित्र आणि कवी सुहास एकसंबेकर ह्यांनी संपादित केलेल्या कविता कोल्हापूरची ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत प्रकाश देशपांडे-केजकर लिहितात : “कोल्हापूरच्या कवितेला जवळपास तीनशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. ती खंडित असली तरी आपल्याला अभिमान वाटावा अशी ती संपन्न आहे. बहिणाबाई या सतराव्या शतकातल्या संत कवयित्रीने या परंपरेचा पाया घातला. त्यांची कविता ही कर्मकांडाचा निषेध करणारी, धार्मिक आणि सामाजिक अनाचाराचा क्रोध करणारी, धर्मभेद, जातिभेद, लिंगभेद न मानणारी आणि प्राचीन तत्त्ववादी कवितेचा उदारमतवादी आणि उदात्त वारसा जपणारी कविता आहे.” पुढे, प्रकाश देशपांडे-केजकर सांगतात, “दोन शतकांच्या खंडानंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धार्त फारसी कवितेचा प्रभाव मराठीत आणून सोडणाऱ्या माधव ज्युलियन यांची कोल्हापूर ही काही काळ कर्मभूमी होती. त्यांच्यामुळे कोल्हापूरच्या द्वैभाषिक कवितेची परंपरा अधिक समृद्ध झाली. या फारसी कवितेतूनच सुफी कवितेचा प्रवाह उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात आला तसा कोल्हापुरात आला. माधव ज्युलियन जसे त्याकाळी असलेल्या रोमँटिक कवितेचे पाईक होते, तसे रेंदाळकरही होते.”१ इथे नमूद करावंसं वाटतं की हाकारा । hākārā अशा द्वैभाषिक परंपरेशी स्वतःला जोडू पाहत आहे, आणि ते इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये प्रकाशित होतं, असं असलं तरी द्वैभाषिक परंपरा हा मराठी वाङ्मयीन परंपरेचा सहज भाग आहे, ह्या पायावरतीच हाकारा । hākārā सारखी नियतकालिकं उभी आहेत. हाकारा । hākārā प्रकाशित करताना हा इतिहास आम्हांला महत्त्वाचा वाटतो, कारण तो आमच्या नियतकालिकाच्या द्वैभाषिकतेला सद्यःकालीन गरजेपलीकडे ऐतिहासिक परिप्रेक्ष्याचा आधार देतो. पाश्चात्त्य नियतकालिकांच्या प्रारूपांचे अनुकरण न करता किंवा जागतिकीकरणातील इंग्रजी भाषेच्या आकर्षणाऐवजी मराठीत असलेल्या बहुभाषिकतेच्या प्रवाहांचा विचार करत आम्ही मराठी साहित्य-संस्कृतीत आधीपासूनच असलेली, भाषिक सीमा ओलांडून अधिक खोल संवाद साधण्याची प्रवृत्ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.
एका बाजूला जग खुलं झालं असं वाटतानाच, वेगवेगळ्या भाषांमधील संबंध कमी-कमी होत चालले आहेत. वरवरच्या पातळीवर दोन भाषांतील लोक काय करत आहेत हे समजतं. पण त्याबद्दल खोलवर जाऊन चर्चा होऊ शकली, तर सर्जनशीलतेत तसंच संशोधनक्षेत्रात मोलाची भर पडू शकते. हे घडवून आणण्याचा प्रयत्न आम्ही मराठी आणि इंग्रजी भाषेतील आदान-प्रदानातून करू इच्छितो. त्यासाठी, अनुवादाचा प्रयत्न आम्हांला महत्त्वाचा वाटतो. मराठी आणि इंग्रजीद्वारे वेगवेगळ्या भाषांतलं साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो. अर्थात, अनुवाद प्रकाशित करताना मराठी आणि इंग्रजीशिवाय वेगवेगळ्या भाषांतील ज्या परंपरा आहेत, त्यांचाही परिचय व्हावा, असा प्रयत्न आहे. आदान-प्रदानासाठी निव्वळ लिखित परंपरांकडे न पाहता दृश्य-माध्यमांचाही आम्ही विचार केला आहे. आंतरशाखीय कलाव्यवहाराकडे आणि ज्ञानव्यवहाराकडे डोळसपणे पाहत दृक्श्राव्य माध्यमातील अभिव्यक्तीची, देवाणघेवाणीची इच्छा मनात बाळगून वेगवेगळ्या कलाकारांना आणि कलासमीक्षकांना आम्ही हाकारा । hākārāसाठी योगदान देण्यासाठी बोलावत असतो. एक प्रसंग मला नेहमी आठवतो : आम्ही एका अंकात कृष्णात खोत ह्यांचं मराठी कथन प्रकाशित केलं, तेव्हा इतरभाषिक वाचकांनी विचारलं, “कृष्णात खोत कोण आहेत ?” ह्या साध्या प्रश्नातून समकालीन मराठी लेखनाबद्दल — त्याच्या आशयाबद्दल, सामाजिक बदलाशी असलेल्या नात्याबद्दल, त्याच्या औपचारिक प्रयोगांबद्दल — उत्सुकता निर्माण होऊन लेखनाबद्दल संवाद सुरू झाला. जागतिकीकरणाच्या ह्या व्यापक प्रक्रियेत मराठी तसंच इतर भाषांमध्ये लोकांपर्यंत न पोहोचलेल्या साहित्याची तसंच लेखकांची ओळख करून देण्यातून किंवा त्यांच्या साहित्याच्या अनुवादातून शक्य होतं. ह्यातून, भाषिक समतोल साधण्यास मदत झाली आहे.
हाकारा । hākārā चालवत असताना आमच्यासमोर कोणतं प्रारूप आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. नियतकालिकांची मोठी परंपरा भारतातच नव्हे, तर जगभरात आहे. ठिकठिकाणी लोक प्रयोग करत असतात आणि नवीन काही उभं करू पाहत असतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर, मुराळी हे नियतकालिक. मुराळीतून लोकांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन दिलं जातं. वरवर पाहता, मुराळीच्या अंकाचं स्वरूप साधं आहे. तो गारगोटीच्या भागातून निघतो. त्याचा कागद खूप साधा असतो, त्याची मांडणी खूप साधी असते. भोवतालच्या स्थानिक परंपरा, आपल्या स्थानिक पातळीवर लिहिणारे वेगवेगळ्या समाजगटांतून आलेले लोक ह्यामध्ये लिहीत असतात. त्याच वेळेला, विवेक नारायण या कवी-मित्राने सह-स्थापित केलेलं अलमोस्ट आयलंड नावाचं नियतकालिक इंग्रजीतून प्रकाशित होतं. तेही पाहण्यासारखं आणि वाचण्यासारखं असतं. हे नियतकालिक केवळ भारतातल्या कवींची आणि लेखकांची ओळख नाही करून देत, तर आशियाई परंपरेतल्या लेखकांचं आणि कलाकारांचं साहित्य लोकांसमोर आणतं. शिवाय, वर्ड्स विदाउट बॉर्डरसारखं नियतकालिक, जे अमेरिकेतून ऑनलाईन प्रकाशित होतं आणि त्याचा अनुवादित साहित्यावर मोठा भर आहे. तर, अशा वेगवेगळ्या नियतकालिकांच्या पार्श्वभूमीवर भाषिक आणि दृश्य अवकाशात हाकारा । hākārāची मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ह्याचबरोबर, मराठीमध्ये खेळ, तसंच मुक्त शब्द ह्यांसारख्या नियतकालिकांत आंतरशाखीयता आणि वेगवेगळ्या कलांचा अंतर्भाव दिसून येतो. तसंच, मायमावशीमध्ये अनुवाद आणि अनुवाद-प्रक्रियांबद्दल विस्तृत आणि गांभीर्याने चर्चा होतं असते. ह्या सर्वांतून, आम्हांला नवनवीन शिकायला मिळत राहतं. त्यातून आपल्याला हवं ते घेऊन आम्ही हाकारा । hākārāची मांडणी करतो.
संपादन-प्रक्रिया
साहित्यक्षेत्रात आणि कलाक्षेत्रात आम्हांला जाणवलं की नियतकालिकं छापून प्रकाशित होतात, पण लोकांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा असतात. बऱ्याच वेळा आपण कविता किंवा इतर साहित्य पाठवलं, तरी त्याची पोच मिळत नसते. पाठवलेल्या साहित्याचं काय बरं-वाईट होतंय, हे आपल्याला कळत नाही. आपली संपादकाबरोबर कोणती चर्चा होत नसते किंवा संपादक आपल्याबरोबर चर्चा करण्यास उत्सुक नसतात. आपलं साहित्य फक्त प्रकाशित केलं जातं, ते प्रकाशित केल्यानंतर आम्हांला धन्यता वाटते; त्याच्या पलीकडे जाऊन संपादकाचं आणि लेखकाचं जे नातं असायला हवं ते आम्ही मिस करत होतो. आपलं नाटक जेव्हा आपण एखाद्या नियतकालिकाकडे पाठवतो, आपण आपलं पुस्तक सुद्धा नियतकालिकाकडे पाठवतो, तेव्हा पलीकडून आपल्याला काहीच ऐकू येत नाही की आपण काय नि कसं लिहितो. मला असं वाटलं की फक्त रिव्ह्यू प्रकाशित करणं किंवा एखाद्या कवितेबद्दल, कादंबरीबद्दल, चित्राबद्दल काही प्रकाशित करणं हाच केवळ हाकारा । hākārāचा हेतू नसून, त्याच्यामध्ये काहीएक संवाद साधता येईल का ? म्हणूनच आज आम्ही एखाद्या अंकाची चर्चा करत असू, तर एका वर्षानंतर येणाऱ्या अंकाची चर्चा आम्ही सुरू करत असतो. ह्यातून पुढील अंकाची मनात जुळणी करतच संपादकीय प्रक्रिया सुरू ठेवतो. मग कुठला तरी एखादा अमेरिकेमध्ये लिहिणारा लेखक असेल, युरोपमध्ये असेल, एखादा केरळमध्ये लिहिणारा लेखक असेल, चित्रकार असेल, तर त्याला ही पण अपेक्षा असते की आम्हांला तुमचा संपादक म्हणून प्रतिसाद हवा असतो. आम्ही तो देतो. आम्हांलाही त्यातून नवनवीन गोष्टी समजायला मदत होते. नव्या-जुन्या लेखकांशी, कलाकारांशी चर्चा करणं, आपल्याला काय प्रकाशित करायचं आहे आणि ते का प्रकाशित करायचं आहे ह्याबद्दलची स्पष्टता मिळवणं, वाचकांच्या आणि आणि समाजाच्या अपेक्षा काय आहेत आणि आम्ही त्यांतील कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकतो, ऑनलाईन प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकात कोणते धोके पत्करावे लागतात, जे काही आपण करत असतो त्यातून साहित्य आणि कलारूपांविषयी आमचं भान कसं विकसित होणार आहे, ह्यांबद्दल जागरूक राहून हाकारा । hākārā प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. हाकारा । hākārāच्या एकूण प्रक्रियेचा हा महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रक्रियेत, साहित्यिक, कलाकार आणि अभ्यासक ह्यांचा अंक-निर्मितीतील सहभाग वाढतो, तसंच सातत्यपूर्ण संवादातून आम्हांलाही नवनवीन दृष्टिकोन कळतात. हाकारा । hākārāसाठी लिहिणारे नवे आणि जुने लेखक, कलाकार ह्यांच्याशी चर्चा करताना आम्हांला काय प्रकाशित करायचं आहे आणि ते का प्रकाशित करायचं आहे ह्याबद्दलची स्पष्टता मिळते; वाचकांच्या आणि समाजाच्या अपेक्षा ओळखता येतात; ऑनलाईन प्रकाशनातील धोकेही समजतात; आणि ह्या सर्वांतून साहित्याविषयीचं व कलारूपांविषयीचं आमचं भान अधिक विकसित होत जातं. हाकारा । hākārā प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेतील हा सतत जागरूक ठेवणारा भाग आहे.
वर्षातून तीन वेळा प्रकाशित होणारा हाकारा । hākārāचा प्रत्येक अंक हा एका विषयाला वाहिलेला असतो. त्याबद्दलची खुली हाक (कॉल) आम्ही देतो. त्या हाकेत आम्ही ठरवलेल्या विषयाबद्दल आम्हांला काय म्हणायचं आहे, त्याबद्दल मांडतो, आणि साहित्य किंवा कलाकृती मागवून घेतो. इथे आम्हांला असं वाटतं की साहित्य मिळवण्यामध्ये, त्याच्या निवडीमध्ये जास्तीत जास्त लोकशाही प्रक्रिया असली पाहिजे. इथे जेव्हा साहित्य पाठवलं जातं, चित्र पाठवलं जातं, एखादी कविता पाठवली जाते, तर त्या माणसाला — पाठवणाऱ्या कवीला, लेखकाला, साहित्यिकाला, कलाकाराला, चित्रकाराला — कळायला हवं की माझ्या साहित्याचं नेमकं काय होतंय, ते प्रकाशित होतंय की नाही, ते होणार असेल तर किती महिन्यांनी प्रकाशित होणार आहे. ते ह्या अंकात प्रकाशित होणार नसेल तर कधी होणार आहे, ह्याचा अंदाज लेखकालाही वा कलाकारालाही असायला हवा. त्याला स्पष्टता द्यायला हवी, असं वाटतं. हाकारा । hākārāकडे साहित्य पाठवणाऱ्यांप्रती संवादात पारदर्शकता असायला हवी असं आम्हांला खूप वाटतं, आणि त्यासाठी आमचा एक प्रयत्न सुरू असतो. त्यामुळे इ-मेलद्वारे वेबसाईटवर बऱ्याच क्वेरीज येतात, प्रश्न येतात, आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत असतो. कॉलबरोबर आवश्यक सर्व माहिती दिलेली असते, तरी ह्याची शेवटची तारीख काय आहे, असं पण विचारणारे लोक आहेत; पण तरी त्यांना शांतपणे, शेवटची तारीख ही आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
सुरुवातीच्या काळात, हाकारा । hākārāच्या नव्या आवृत्तीचा विषय हाकारा । hākārāच्या टीममधून ठरवायचो. पुढे असं झालंय की गेल्या दोन वर्षांमध्ये आमचे लेखक पण नव्या आवृत्तीचा विषय ठरवू लागले, आमचे चित्रकार पण ठरवू लागले. ज्यांनी आतापर्यंत हाकारा । hākārāमध्ये आपलं साहित्य, आपलं चित्र, आपली कला प्रकाशित केलीय, तेही थीम सुचवू लागले. अशी चर्चा झाली की मग आम्ही त्यांना असं म्हणतो की, आपण ही थीम घेऊ या, पण ह्याबद्दलची संकल्पना चार ओळींत तुम्ही पाठवून देऊ शकता का ? मग आम्ही त्या चार ओळी मागतो, त्यावर चर्चा करतो, आणि मग ती थीम फायनल करतो. एकदा साहित्य आल्यानंतर, त्याचं सबमिशन झाल्यानंतर त्याचा रिव्ह्यू पण करतो. आमच्याकडे एका अंकासाठी जवळजवळ ऐंशी ते शंभर सबमिशन्स येतात, त्यांतून वीस ते पंचवीस आपल्याला निवडायचे असतात. आता ह्यांच्यामध्ये बरेचसे ओळखीचे असतात, मित्र-मैत्रिणी असतात, माहीत असणारे चित्रकार असतात, मोठे सीनियर साहित्यिक असतात, चित्रकार असतात. पण, ह्या सर्वांच्या प्रेमाचा वा सीनिऑरिटीचा दबाव न घेता काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आमच्या प्रक्रियेवरती ज्यांचा विश्वास आहे, ते लोक खूप आनंदात असतात. दुसरी महत्त्वाची बाब आम्ही हाकारा । hākārāत पाळतो की जे आधी छापून आलं आहे — मग ते छापील अंकांत असो वा ऑनलाईन — ते पुनर्प्रकाशित करत नाही. बऱ्याच वेळेला असे मेल येतात की, माझा पाच वर्षांपूर्वी ह्या ह्या नियतकालिकामध्ये लेख आलाय, तो आपल्याला परत छापता येईल का ? तर, तो कितीही चांगला असला, तरी असं धोरण ठेवलं आहे की ते तसं नाही करायचं. एकदा सबमिशन झालं की त्याचे रिव्ह्यू होतात. रिव्ह्यू पण संपादकमंडळ आहे ते करतं. पण, त्याशिवाय आमच्याकडे आलेलं एखादं चित्र बघण्यासाठी आम्ही तज्ज्ञ नसू, तर, तसंच एखाद्याने फिल्म पाठवलेली असेल, एखादी कथा पाठवलेली असेल, समीक्षा पाठवलेली असेल किंवा लेख पाठवलेला असेल; आम्हांला जर जमत नसेल ते बघायला, रिव्ह्यू द्यायला, तर त्यातल्या एक्स्पर्ट लोकांना ते पाठवतो. हाकारा । hākārāची प्रत्येक गोष्ट ही विना-मोबदला असते. आम्ही आमचेच पैसे घालून काम करतोय गेली आठ वर्षं. आम्ही कुठल्याही प्रकाशनसंस्थेशी निगडित नाही. सगळ्यांत आव्हानात्मक काम आहे, ते कॉपीरीडिंगचं आणि प्रूफ्ररीडिंगचं. मी परवा मराठी नियतकालिक-प्रकाशनाचा अनुभव असणाऱ्या मित्राशी बोलत होतो की, हे आपण कसं करू शकतो ? आपल्याला पूल ऑफ प्रूफरीडर्स, पूल ऑफ कॉपीरीडर्स मिळू शकेल का ? आपल्याला त्यांची काहीएक व्यवस्था उभी करता येईल का ? असा आम्ही विचार करत होतो. असा पण एक विचार निघाला की आपल्याला प्रूफरीडर्स किंवा कॉपीरीडर्ससाठी एखादा कोर्स चालवता येईल का ? कुठल्या विद्यापीठात होऊ शकेल का ? इथे विद्यापीठातून ह्याचा विचार आपण करू शकता, आणि अशा प्रकारची मदत करू शकता. कारण खूप वर्तमानपत्रांतून प्रूफरीडिंग न केलेलं साहित्य प्रकाशित होतं असतं. खूप चुका होत असतात. आमच्याही चुका होत असतात. कारण प्रूफरीडिंग, कॉपीरीडिंग हा एक्स्पर्ट्स डोमेन आहे. एखादा संपादक चांगला असेल, पण तो उत्तम प्रूफरीडर, कॉपीरीडर असेलच असं नाही. त्यासाठी वेगळी टीम लागते, जशी वर्ड्स विदाउट बॉर्डर नावाचं एक नियतकालिक निघतं, त्यांच्याकडे ती मोठी टीम असते. बाहेरच्या देशांमध्ये अशी सोय असते. पण आपल्याकडे दुर्दैवाने ती नाहीये.
प्रकाशनानंतर लोकापर्यंत अंक पोहोचवण्यासाठी विशेष काम करावं लागतं. सुरुवातीच्या दिवसांत, वर्षभर आम्ही वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचो. लोकांना सांगायचो की, तुमचं प्रकाशित झालेलं साहित्य शेअर करा, हा अंक शेअर करा. अलीकडे असं झालं की माऊथ-पब्लिसिटीतून हाकारा । hākārā पोहोचतो. आपल्या-आपल्या गतीने वाचक / आस्वादक हाकारा । hākārāला प्रसिद्धी देतात. सुरुवातीला फेसबुकवरून लोकांपर्यंत पोहोचत होता अंक. नंतर फेसबुक ह्या माध्यमाच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्या. फेसबुक हे एका बाजूला आपल्याला खूप ओपन आहे असं वाटतं, पण दुसऱ्या बाजूला ते ठराविक गटांपुरतं मर्यादित आहे, असं वाटतं. किंवा, फेसबुक हे स्वतःला हायलाईट करण्याचं व्यक्तिगत माध्यम आहे, असं वाटायला लागलंय. त्यामुळे मग इंस्टाग्रामसारखं, ट्विटरसारखं माध्यम जास्त ओपन वाटायला लागलं. किंवा साधे इ-मेल जरी पाठवले, तरी ते मदतीचं ठरतं किंवा व्हॉट्सॲप सारखं माध्यमही खूप मदतीचं ठरतं.
पहिली काही वर्षं आम्ही आयएसएसएन नंबर किंवा यूजीसीकडून मान्यता घेतली नव्हती. पण, नंतर वाटलं की तसं केल्याने अधिक मोठ्या नेटवर्कचा भाग होऊन नवे लेखक, कलाकार आणि वाचक जोडले जातील. पण ह्याची दुसरी बाजू अशी आहे की यूजीसीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याची वेगळी दबावक्षेत्रं पण वाढायला लागली. प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांची मागणी जास्त वाढायला लागली. अशा तऱ्हेने आपलं संपर्कक्षेत्र वाढतं, पण त्याच्या मर्यादाही दिसायला लागतात. सुरुवातीपासून ठरवलं आहे की कोणाला आपला एपीआय वाढवण्यासाठी आपलं लेखन प्रकाशित करायचं असेल, तर ते हाकारा । hākārāमध्ये प्रकाशित नाही करता येणार. बऱ्याच वेळेला आलेल्या लेखनावरून कळतं, कोण कशासाठी लिहीत आहे ते. अर्थात, हे सुरुवातीला कळत जावं लागलं. स्डँडर्ड रिसर्च पेपर आम्ही प्रकाशित करायचं बहुतेककरून टाळतो. अगदीच वेगळा विषय असेल, चांगला असेल, तर तो रिव्ह्यू करून देतो. पण काही वेळेला आम्हांला मेल येतात — भारतभरात वेगवेगळ्या विद्यापीठांतून-महाविद्यालयांतून शिकवणाऱ्या शिक्षकांकडून की, आपल्या हाकारा । hākārāमध्ये पेपर पब्लिश होतील का ? आपण वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतोय, हे बरं वाटतं, पण त्याचबरोबर रिव्ह्यूची प्रक्रियाही अधिक चोख आणि पारदर्शक ठेवण्याची गरज जाणवत आली आहे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो.
बऱ्याच वाचकांना हाकारा । hākārā जवळचा वाटतो. कारण, एक तर, तो ऑनलाईन असल्याने मुक्तपणे, हवं तेव्हा हाकारा । hākārā उघडता येतो आणि वाचता किंवा पाहता येतो. इथे फ्री स्पेस आहे. दुसरं म्हणजे, ती स्पेस डेमॉक्रिटिक स्पेस आहे. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवून इथे लोक आपल्या प्रतिक्रिया देत असतात. लोकांना हे दिसतं की इथे कुठलं कुठलं साहित्य प्रकाशित होतंय, कुणाची चित्रं प्रकाशित होतायत, इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये काय प्रकाशित होतंय. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे, मला असं वाटतं की हाकारा । hākārāसाठी लिहू इच्छिणारे किंवा लिहिणारे बरेचजण इंडिपेंडंटली लिहितायत, जे कुठल्या विद्यापीठाशी किंवा ॲकॅडमिक क्षेत्राशी निगडित नाहीयेत. मुक्त पत्रकारिता करणारे, मुक्त लेखन करणारे लेखक, जे स्वतःच्या बळावर लिहितायत, ज्यांना त्या अर्थाने कोणतंही आर्थिक बळ नाहीये, ज्यांना कुठल्या एपीआयसाठी कुणावरती अवलंबून राहण्याची गरज नाहीये, अशा तऱ्हेच्या स्पेसमधनं हाकारा । hākārā आकार घेतंय.
हाकारा । hākārāचा अंक प्रकाशित होतो, तेव्हा पहिल्या दिवशी अनेक जण अंक वाचतात. नंतरही वाचत राहतात. ऑनलाईन माध्यम असल्याने वितरणात सुलभता असते. ऑनलाईन प्रकाशित होत असल्याने कुठल्याही प्रिंट माध्यमापेक्षा, छापील नियतकालिकापेक्षा हाकारा । hākārā जास्त जणांपर्यंत पोहोचतं. शिवाय, आपण टॅग करत असताना मराठीमध्ये तसेच इंग्रजीमधून टॅग वापरला तर त्याची व्याप्ती वाढते, हे अलीकडच्या काळात आमच्या लक्षात आलं. अर्थात, ज्यांना आंतरजालावरील बलस्थानांचा अंदाज आहे, त्यांनी आम्हांला हे दाखवून दिलं. त्याचबरोबरीने, आम्ही हाकारा । hākārā मोबाईल-फ्रेंडली पण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आव्हानं आणि पुढील प्रवास
हाकारा । hākārā प्रकाशित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत अनेक अनुभवसमृद्ध क्षण येतात, परंतु त्याचबरोबर काही आव्हानंही प्रकर्षाने जाणवतात. एक म्हणजे, आपण फक्त ऑनलाईन नियतकालिक चालवतो, म्हणून किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, म्हणून त्या संख्यात्म बाबींचा विचार करण्याबरोबर त्याच्या दर्जासाठीसुद्धा प्रयत्न करावा लागेल. वाचकांचा आणि श्रोत्यांचा अटेन्शन स्पॅनही कमी असतो. ऑनलाईन येणारा हा वाचकवर्ग फेसबुकवरच्या आणि ट्विटरवरच्या छोट्या अवकाशात रुळलेला असतो. ह्याचं एक प्रत्यंतर आमच्याकडे जे साहित्य येतं त्यातही दिसतं. फेसबुकवर लिहिल्या जाणाऱ्या लेखनाच्या लांबी-रुंदीचं साहित्य मोठ्या प्रमाणात येतं. लोकांना असं वाटतं की फेसबुकची पोस्ट किंवा एखादी कविता जशी फेसबुकवर टाकली जाते, तेच कन्टेट आपण हाकारामध्ये प्रकाशित करू शकतो. म्हणजे, ऑनलाईनच्या माध्यमाकडे बघण्याची दृष्टी अजून विकसित झाली पाहिजे, त्या अर्थाने ती होत नाहीये. ते मोठं आव्हान आहे. दुसरं म्हणजे, ऑनलाईनच्या माध्यमातून प्रदीर्घ लेखन करणं हे एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान आज आमच्यासमोर येताना दिसतंय. सीरियसली वाचणाऱ्या वाचकांनी, फेसबुकची पोस्ट वाचणं किंवा इंस्टाग्रामची पोस्ट वाचणं किंवा व्हाट्सॲपवरती एखादा फॉर्वर्ड केलेला मेसेज वाचणं हा भाग म्हणजेच ऑनलाईनचा अंक वाचणं नसून, त्याच्या पलीकडे जाऊन एक गांभीर्याने चर्चा करण्याची स्पेस म्हणून हाकारा । hākārāकडे बघावं, आणि त्यासाठी अनेक शक्यता आजमावाव्यात, असं आम्हांला वाटतं. बऱ्याच जणांनी असं सुचवलं की हाकारा । hākārā वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतं. पण तो आमचा फोकस नाहीये आणि कधी नसणार आहे. कारण फक्त साहित्य प्रकाशित करणं आणि त्याद्वारे लोकांशी संवाद साधणं हाच हाकारा । hākārāचा हेतू आहे. त्याच स्पेसमधून आम्ही आपल्याशी संवाद साधू इच्छितो. एखादा सेमिनार करणं, एखादी चर्चा घडवून आणणं, आपली रीच वाढवण्यासाठी कुठले ऑफलाईन कार्यक्रम करणं, हा काही आमचा हेतू नाही. कारण त्या अर्थाने आम्ही त्याच्याकडे फक्त प्रकाशन म्हणून पाहतोय.
सांगायला आनंद वाटतो की हाकारा । hākārāमध्ये लेखनाच्या बरोबरीने त्याच्या मांडणीवरही आम्ही भर देतो. मांडणीमध्ये सुद्धा आम्हांला इंटरेस्ट आहे. म्हणजे, जे काही कन्टेन्ट आलं, ते कशा पद्धतीने प्रकाशित करता येईल, कसं क्युरेट करता येईल, त्याचं कसं डिझाईन करता येईल, आणि त्यातून कशी अधिक व्यापक चर्चा करता येईल, ह्याचा आम्ही विचार करतो. ह्या अर्थाने, हाकारा । hākārā साहित्यिक नियतकालिक असलं, तरी तरी त्यापलीकडे व्यापक अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून आम्ही ह्या नियतकालिकाकडे बघू इच्छितो. एका बाजूला, साहित्यिक अंग स्ट्राँग ठेवून, त्याचबरोबर दृश्य कलामाध्यमांबद्दल पण आम्ही विचार करत असतो. अर्थात, अधिक मूलभूत पातळीवरील आमच्यासमोरचं आव्हान म्हणजे मजकूर आल्यावर तो प्रकाशनयोग्य करण्यासाठी वेगवेगळी आव्हानं असतात. उदाहरणार्थ, युनिकोड सिस्टीममध्ये अनेक वेळा सहज फॉन्ट मिळून मराठी मजकूर टाइप करता येत नाही. कारण, लिहिणारे टेक्नोलॉजी-फ्रेंडली नाहीयेत. मराठीकरिता शब्दकोश, बहुपर्यायी शब्दकोश सहज ऑनलाईन उपलब्ध नाहीयेत. मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रोग्रॅममध्ये इंग्रजी शब्द आपण ओपन केला तर तिथे उजव्या बाजूला एक राईट क्लिक केल्यानंतर संदर्भासाठी शब्दकोश सहज दिसतात. ऑनलाईन स्पेसमध्ये, विशेषतः मराठीबाबत, आपल्याला ह्या बऱ्याच मर्यादा दिसतात. अर्थात, ऑनलाईन माध्यमाची बलस्थानंही आपल्याला दिसतात. सहजतेने एखादं चित्र किंवा एखादा व्हीडिओ आपण मिळवू शकतो आणि तो वापरू शकतो. इथे, भौगोलिक सीमांपलीकडे वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सामील करून घेऊन चर्चा घडवून आणू शकतो. एकमेकांना मुक्तावकाश आणि स्वातंत्र्य देत-घेत आपण संवाद साधण्यासाठी विविध शक्यता आजमावू शकतो. संवादाच्या विविध पद्धतीही आपण शोधून काढून त्या अवलंबू शकतो. त्यासाठी, हाकारा । hākārā हे नियतकालिक सदैव उत्सुक असतं व असेल.
सर्वप्रथम, केवळ ऑनलाईन स्वरूपामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचणं जरी शक्य होत असलं, तरी त्या वाढत्या संख्येबरोबरच सामग्रीचा दर्जा उत्तम ठेवण्याचं आणि तसा तो कायम राखण्याचं आव्हान नेहमीच असतं. केवळ वाचकसंख्येत वाढ करून चालत नाही; वाचकांच्या बौद्धिक आणि नेटकेपणाच्या अर्थपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विचारपूर्वक आणि काटेकोरपणे संपादन करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. हाकारा । hākārā फक्त क्षणिक आणि निव्वळ करमणूक-प्रधान वाचनासाठी नसून, ही गंभीर चर्चेला आमंत्रण देणारी एक जिवंत जागा आहे — ही जाणीव वाचकांपर्यंत पोहोचवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. विचारांना चालना देणारं आणि विविध स्तरांवर चर्चा घडवून आणणारं एक गंभीर संवादाचं व्यासपीठ म्हणून अंक-प्रकाशन करणं आम्हांम्हाला महत्त्वाचं वाटतं. ह्यातून, वेगवेगळ्या भाषांतील साहित्याच्या परस्परसंवादाची दारं खुली होतात. अशा रीतीने, वाढत्या वाचकवर्गासोबत दर्जा राखणं, दीर्घ व गंभीर लेखनासाठी वाचकांना प्रेरित करणं, तसंच मराठी साहित्याला जगभरातील व्यापक भाषिक अवकाशाशी जोडणं ह्यांतून आम्ही शिकत जातो, आणि नियतकालिकाचा प्रवास अधिक समृद्ध होत जातो.
लिखित साहित्याच्या दर्जाला साजेशी मांडणी साधत, तंत्रज्ञानाच्या शक्यता आजमावत, आणि मुक्त, सर्जनशील संवादाचं जिवंत व्यासपीठ राखण्याच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहत आम्ही प्रवास करू इच्छितो. आम्ही विनामोबदला-तत्त्वावर काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या जिवावर हाकारा । hākārā चालवतो चालतं. आमच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्वी राजपुरिया, सृजन इनामदार, मितवा अभय वंदना, अनघा मांडवकर, मयूर सलगर, पल्लवी सिंह, सत्या गुंमुळुरी, सोहनी हर्षे, अस्मिता चौधरी अशा मित्र-मैत्रिणी आपलं योगदान देत आले आहेत. त्यांना जमेल तसा ते वेळ देतात आणि आमचा प्रत्येक अंक सिद्ध होतो. त्याशिवाय, अनेक अनुवादक आणि दृश्य माध्यमांतील कलाकार वेळोवेळी मदत करतच असतात. हाकारा । hākārā कडे आस्थेने पाहणारे हे सहकारी वेगवेगळ्या ठिकाणांहून आपापल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांतून वेळ काढून काम करत असतात. सहकारी बदलत गेले, काही पद्धती, तंत्रं बदलत गेली, पण नियतकालिकाला काळानुरूप जिवंत व समकालीन ठेवण्यासाठी सतत शिकणं, गरजेप्रमाणे स्वतःत आणि कामात बदल करणं, आणि वाचकांशी मुक्त संवाद ठेवणं ह्या भूमिका मात्र काय राहिलेल्या आहेत. सभोवतालच्या घडामोडींचा अभ्यास करून, त्यातून होणारे बदल ओळखून, आणि त्यांचा प्रभाव समजून घेत नियतकालिकाच्या आशयात व मांडणीत योग्य बदल करणं हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं राहिलेलं आहे, आणि ह्यापुढेही महत्त्वाचं राहील.
संदर्भ
१. प्रकाश देशपांडे-केजकर, प्रस्तावना, कविता कोल्हापूरची, संकलन/संपादक: सुहास एकसंबेकर, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई, २००८.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
