मूळ हिंदी लेखक: गुलजार

मराठी भाषांतर : बलवंत जेऊरकर


विमल दा



back

त्या दिवसाला लोक ‘जोग-स्नान’ असं म्हणतात. अलाहबादच्या गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगमावार स्नान केल्यानं सगळे रोग बरे होतात, पापं धुतली जातात आणि तो माणूस शंभर वर्षांपर्यंत जगतो- असं सांगतात सगळेजण.

मी विमलदांना विचारलं, “तुम्ही मानता का या गोष्टी?”

विमलदा हसले – “शास्त्रांमध्ये लिहिलंय असं.”

अॅस्ट्रॉनॉमीनुसार बारा वर्षांनंतर हा दिवस येतो. सूर्याभोवती भ्रमण करत जेव्हा नऊच्या नऊ ग्रह एका रेषेत येतात आणि या दिवशी सूर्योदयाचा पहिला किरण या संगमावर पडतो, त्या दिवशी इथं कुंभमेळा भरतो. अनेक महिन्यांपासून इथं तयारी सुरू असते कारण इथं करोडोंच्या संख्येनं भाविक येतात. अलाहबादपासून प्रयागपर्यंत खांद्याला खांदा घासला जातो. पंचक्रोशीतल्या वीसेक गावात मुंगी शिरायला जागा नसते. याला पूर्ण कुंभमेळा असंही म्हणतात. कुंभमेळा खूप दिवस चाललेला असतो परंतु शेवटचे चार दिवस महत्त्वाचे असतात, नववा दिवस जोग-स्नानाचा असतो.

१९५२ साली या मेळ्यात मोठी दुर्घटना झाली होती, जवळ जवळ एक लाख लोक मृत्युमुखी पडले होते. आजपर्यंत कुणालाही या दुर्घटनेचं नेमकं कारण माहिती नाही. खूप चौकशी कमिट्या झाल्या, खूप इन्क्वायऱ्या झाल्या.. काही लोक म्हणतात नागा साधूंचे हत्ती पिसाळले होते त्यामुळे चेंगराचेंगरी सुरू झाली. या चेंगराचेंगरीमुळं होमगार्ड्स आणि मिलिटरीने बनवलेले तकलादू पूल कोसळले. लोक घाबरून सैरावैरा पळू लागले, लोक खाली पडले, तुडवले गेले. हजारएक नावांना गंगेत जलसमाधी मिळाली. कुंभमेळ्याच्या इतिहासात इतकी मोठी दुर्घटना कधी घडली नाही.

समरेश बसु यांनी या दुर्घटनेवर नंतर कादंबरी लिहून काढली, ‘अमृत कुंभ की खोज में’ आणि विमल रॉय, ज्यांना सगळे ‘विमलदा’ म्हणतात – ते या कादंबरीवर सिनेमा बनवू लागले होते. मी विमलदांचा असिस्टंट होतो. कधी-कधी त्यांच्या चित्रपटात गाणंही लिहित होतो आणि पहिल्यांदाच त्यांच्यासोबत या सिनेमाचं स्क्रिप्ट लिहित होतो. कदाचित विमलदांना अशा एका रायटरची गरज होती जो त्यांच्या सवडीनुसार त्यांच्यासोबत बसू शकेल, त्यांच्यासोबत डिस्कस करेल आणि दृश्य टिपून घेईल. दुसरं कारण असं की मला बंगाली आणि हिंदी दोन्ही भाषा येत होत्या. कादंबरी बंगाली भाषेत होती आणि स्क्रिप्ट लेखन हिंदीत सुरू झालं होतं. सवड मिळेल तेव्हा ते कादंबरीवर काम करायचे. कादंबरीच्या समासात असंख्य नोट्स होत्या. असं वाटतं होतं की कादंबरीच्या ओळींमध्ये अजून एक कादंबरी लिहिली आहे. कागदांवर लिहिलेले नोट्स देखील कादंबरीतील पानांवर जागोजागी पिनेनं टाचलेले होते. एकतर कादंबरी मोठी होती त्यात या घुसवलेल्या कागदांमुळे असं वाटत होतं की कादंबरीला पोट आलंय. या कादंबरीला दुसऱ्या कादंबरीकडून दिवस गेले आहेत. शिवण उसवू लागली होती. प्रत्येक व्यक्तिरेखेचे इतके बारीक तपशील होते की जणू कादंबरी विमलदांच्या रक्तात उतरली होती. कुणीतरी त्यांच्या रक्तप्रवाहात ओतली होती.

“ही कादंबरी कधी वाचली तुम्ही”, मी एकदा विचारलं होतं.

“१९५५ मध्ये. क्रमशः प्रकाशित होत असताना.”

“कशात?”

“कलकत्त्याच्या आनंद बाजारमध्ये.” याच काळात समशेर त्यांच्याच संस्थेमध्ये काम करत होता.

“तुम्ही ओळखायचा समशेरला?”

“हं”, विमलदा बरंच थांबून थांबून बोलायचे आणि त्यांचं ‘हं’ तर कमालच होतं. एक ‘हं’, हजार अर्थ. मला वाटलं या बाबतीत त्यांना जास्त बोलायचं नाही. असंही कमीच बोलायचे. परंतु, सिगरेटचे दोन झुरके मारल्यावर स्वतःच सांगू लागले.

“ओरिजनली समशेरनं खऱ्या नावानं कादंबरी छापली नव्हती. ‘कालकूट’ नावानं कादंबरी प्रकाशित व्हायची.”

“हं,” – मी थोडी वाट पाहिली.

मग ते म्हणाले, “दहा पंधरा भागांनंतर मध्यंतर आला होता. मी थोडा अस्वस्थ झालो होतो, मी आनंद बाजारला पत्र लिहिलं तर समशेरचं उत्तर आलं. तेव्हा कळलं की..” यावेळी ते खोकत खोकत उठले आणि सिगरेट फेकण्यासाठी बाल्कनीपर्यंत गेले.

कादंबरीत प्लॉट नव्हता पण व्यक्तिरेखा जिवंत होत्या. विशेषतः ज्याच्या नजरेतून ती सांगितली गेली आहे तो रायटर. त्यांच्या डायरीतले काही भाग विमलदा मला पुन्हा पुन्हा वाचायला लावायचे . कादंबरीच्या सुरुवातीला एक खचाखच भरलेली ट्रेन ‘प्रयाग’ स्टेशनवरून अलाहबादला रवाना होते. पोहोचायला थोडा वेळ राहिला आहे. लोक उत्साहात भजन गायला सुरुवात करतात. ट्रेनच्या वर बसलेले लोक जोरजोरात उद्घोष करत आहेत. ट्रेन हळूहळू अलाहबाद स्टेशनवर येते आणि प्रवाशांचा लोंढा अशा तऱ्हेनं बाहेर पडतो जणू एखाद्या ब्लॅकहोलमधून बाहेर पडत असावा. याच गर्दीत आपला क्षयरोग बरा व्हावा, शंभर वर्षांचं आयुष्य मिळावं म्हणून जोग स्नानासाठी आलेला बलराम लोकांच्या पायाखाली तुडवला गेला, मेला तो.

विमलदांनी जरा आक्षेप घेतला – “समशेरनं हा मृत्यू  लवकर घडवून आणला.”

मी अत्यंत आदरानं माझं म्हणणं मांडलं, “दादा, हा एक मृत्यू कादंबरीच्या एकूण कथानकाकडे संकेत करतोय आणि बॅलन्स देखील करतोय.”

“हं, पण सिनेमासाठी जरा लवकर! नंतर बघू. तू पुढं वाच, तू पुढं वाच.”

पुढं-पुढं करत स्क्रिप्टला तीन वर्षं लागली. १९६२ ची ही गोष्ट आहे. दरम्यान विमलदांनी दोन सिनेमे बनवले. ‘बंदिनी’ आणि ‘काबुलीवाला’. परंतु, अमृतकुंभवर काम अजून सुरू होतं. काही छोटे-छोटे सीन शूटदेखील झाले. विशेषतः ते आऊटडोअरचे सीन होते. कुंभमेळ्याची ती दृश्यं कृत्रिम पद्धतीनं शूट केली जाऊ शकत नव्हती. आम्ही दुसऱ्या मेळ्यामध्ये जाऊन शूट करू लागलो. अलाहबादच्या संगमावर अजून एक मेळा भरतो. दरवर्षीचा माघ मेळा. १९६२ च्या हिवाळ्यात आम्ही शूटिंगची तयारी करू लागलो कारण नंतर दोन वर्षांनीच पूर्ण कुंभमेळा भरणार होता.

माघ मेळ्याची तयारी करत असतानाच विमलदांची तब्येत ढासळू लागली होती. ताप असताना देखील काही दिवस ते अॉफिसला येत होते. अॉफिसमध्ये बसल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. त्यांच्याबद्दल असं म्हणलं जायचं की सिनेमाबरोबर त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्या उशाला सिनेमाचे रीळ ठेवले तरी ते गाढ झोपी जातील.

नंतर काही दिवस ते ऑफिसला आले नाहीत तेव्हा आम्हाला काळजी वाटू लागली. मी त्यांच्या घरी गेलो. माझ्या सोबत त्यांचे सिनियर कॅमेरामन कमल बोस होते. विमलदा बाहेर व्हरांड्यात बसले होते. समोर चहा आणि चेस्टरफिल्ड सिगरेटचं पाकीट. नेहमीप्रमाणे बोटांमध्ये सिगरेट.

आम्ही तब्येतीची विचारपूस केली तेव्हा म्हणाले की, “मी अलाहबादला येऊ शकणार नाही. तुम्ही लोक जा. मेळ्यातून शॉट्स आणा.” नंतर तासभर आम्हाला शॉट्स सांगू लागले. ‘कुंभ’चं स्क्रिप्ट त्यांना जवळपास तोंडपाठ झालं होतं. शॉट्सच्या तपशीलादरम्यान सिगरेटचे झुरके ओढायचे, खोकायचे आणि चहाचे घोट घ्यायचे.

कमलदा एकदा बंगालीत म्हणाले देखील की तुम्ही एकतर सिगारेट प्या किंवा काम तरी करा पण प्रत्येक वेळी ‘हं’ म्हणत स्क्रिप्टबद्दल बोलायचे.

अलाहबादला जात असताना घटकबाबूंनी सांगितले की विमलदांना कॅन्सर झाला आहे.

“विमलदांना ठाऊक आहे?”

“नाही.”

गळ्याची की कशाची तरी पाइप की ट्यूब सांगितली घटकबाबूंनी. कमलदा म्हणाले, “पण त्यासाठी तर सिगरेट हानिकारक आहे.”

“हो. पण विमल एेकत नाही. त्याला कसं समजवायचं तुला कॅन्सर आहे. तू उद्या मरणार आहेस असं सांगू का? तो खूप घाबरट आहे.” सुधीश घटक आमचे मॅनेजर होते आणि विमलदांच्या न्यू थिएटर्सच्या जमान्यापासूनचे दोस्त देखील होते.

अलाहबादमध्ये शूटिंग करताना विचित्र बेचैनी जाणवत होती. काम चांगलं चाललं होतं पण मनात नसल्यासारखं. नेहमीसारखा उत्साह नव्हता. कमलदा अजून गप्प होते. मी देखील गप्प होतो. काहीतरी बोलायचं होतं पण बोलू शकत नव्हतो. मनात विमलदांच्या कॅन्सरच्या  भीतीचं सावट पसरलं होतं आणि हे कोरलं गेलं होतं की हे शूटिंग व्यर्थ आहे. हा सिनेमा होऊ नाही शकणार. विमलदा आता जास्त दिवस जिवंत राहणार नाहीत पण हे म्हणून दाखवणं अवघड होतं.

परत आल्यावर कमलदांनी मला विचारलं, “विमलदा हा सिनेमा का बनवत आहेत?”

“मी विचारलं होतं एकदा..”

“‘मग? काय म्हणाले?”

मी त्यांना माझ्या आणि विमलदांच्या एका सिटींग बद्दल सांगितले. विमलदा म्हणाले होते, “तो जो रायटर आहे ना.. ज्याच्या नजरेतून ही कथा सांगितली आहे.. आणि तो अमृताच्या शोधात आहे.. मला असं वाटतं..तो मी आहे. तो ज्या प्रकारे अमृताच्या शोधात गेला आहे ना.. ज्यामुळे माणसाला शंभर वर्षांचं आयुष्य लाभतं..” ते सिगरेटच्या धुरात खोकले.. चेहरा लालबुंद झाला.. थोडं शांत झाल्यावर म्हणाले.. “मी देखील या अमृताच्या शोधात आहे..”

काही गोंधळलेल्या स्थितीत मी त्यांना विचारलं, “तुम्हाला खरंच शंभर वर्षांचं आयुष्य पाहिजे?”

“हं.”

ती गोष्ट त्या दिवशीच संपली. दुसऱ्या एका प्रसंगावेळी ते मला म्हणाले, “शंभर वर्षांचा अर्थ मोजून शंभर वर्षं नव्हे. याचा अर्थ आहे मनुष्य अमर होतो, हे अमृत पिऊन.”

“ते कोणतं अमृत आहे?” विमलदा खूप वेळ खूप दूरवर पाहात राहिले.

आता वाटतंय की बहुतेक त्यांना समजलं होतं की त्यांना कॅन्सर  आहे. म्हणाले, “संस्कृती! मला या मातीच्या संस्कृतीचा भाग बनायचं आहे ज्यामुळे..” त्यांना म्हणायचं होतं, ज्यामुळं जिवंत राहीन, अनश्वर राहीन.. ..पण बोलले नाहीत.

मुंबईला परत आल्यावर विमलदांचा आजार बळावला. पण त्या न थकणाऱ्या दिग्दर्शकाने अजून एका चित्रपटाची सुरुवात करण्याचा निश्चय केला होता. त्यावेळी ‘सहारा’ असं त्या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं होतं.

“आणि अमृतकुंभ?” मी विचारलं.

“तो तर होत राहील. १९६४ ला बारा वर्षं पूर्ण होतील. पूर्ण कुंभमेळा पुन्हा एकदा भरेल. त्यानंतर तो चित्रपट पूर्ण करू.”

१९६४ ला अजून वेळ होता आणि असं वाटत होतं की विमलदांजवळ जास्त वेळ नाही. ‘सहारा’ सुरू झाला. तीन-चार दिवसांचं शूटिंग झालं आणि एके दिवशी विमलदा सेट सोडून निघून गेले. त्यानंतर ते स्टुडिओत आले नाहीत. त्यांना समजलं होतं की त्यांना कोणता आजार झालाय. हॉस्पिटलमध्ये काही टेस्ट्स झाल्या. मग उपचारासाठी ते लंडनला गेले पण लवकरच निराश होऊन परतले .

“मला माझ्या घरी मरायचं आहे.” ते कुणालातरी म्हणाले होते. या भीषण आणि त्रासदायक काळात त्यांनी काही दिवस काढले. अॉफिस बंद असायचं. युनिटनं एक चित्रपटदेखील सुरू केला – ‘दो दुनी चार’. पण मन लागत नव्हतं. विचित्र वातावरण. सगळ्यांना ठाऊक होतं, कोणत्याही क्षणी विमलदांच्या मृत्यूची बातमी येऊ शकते. ही भीती देखील होती आणि प्रतीक्षा देखील. एका विचित्र उदासीचं सावट.

एके दिवशी विमलदांनी मला बोलावलं आणि विचारलं, “तू अमृतकुंभच्या स्क्रिप्टवर काम करतोयस ना?”

मला कळेना की काय सांगू? त्यांच्याकडे पाहिलं तरी रडू यायचं. छटाकभर वजन कमी झालं होतं त्यांचं. सोफ्याच्या कोपऱ्यात कुशनसारखे…. कुशन ठेवल्यासारखे. उचललं तर तळहातात मावतील.

नाराज झाले. “तुला म्हणालो होतो की बलरामाचा मृत्यू  लवकर झाला आहे. ते दृश्य तिथून काढून मेळ्यात घेऊन जा. नऊ दिवसाच्या पूजेच्या सुरूवातीला पहिल्या दिवशी त्याचा मृत्यू  होतो.”

मी गप्प होतो. ते पुन्हा म्हणाले, “उद्यापासून रोज संध्याकाळी आपण स्क्रिप्टवर काम करायचं. या वर्षी पूर्ण कुंभमेळा आहे. डिसेंबरमध्ये सुरू होईल.”

मी म्हणालो, “हो. ३१ डिसेंबर पासून नऊ दिवसांची पूजा सुरू होईल. जोग-स्नान ८ जानेवारी १९६५ ला आहे.”

“हं,” असं म्हणून ते गप्प बसले.

दृश्यबदलानंतर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटलो. विमलदांना आता स्क्रिप्ट तोंडपाठ होतं. त्यांनी त्यांच्याकडचं पुस्तक मागवलं. शिवण पूर्णपणे उचकटली होती. पानं जीर्ण झाली होती. काही इतर दृश्यांबद्दल चर्चा झाली आणि पुन्हा तेच बलराम –

“बलरामाचा मृत्यू  अजून पुढं घेऊन ये. हे फार घाईत होतंय.”

मी थोडा वाद घातला पण त्यांचं मन राखण्यासाठी.

“खरंतर रायटर आणि श्यामा एकमेकांपासून विलग झाल्यानंतर हा मृत्यू  होऊ दे. पूजेच्या पाचव्या दिवशी आणि मेळ्यात शूटिंग कराल तेव्हा लक्षात ठेवा की..”

स्क्रिप्ट फायनल करण्यासोबतच विमलदा शूटिंगची तयारी देखील करायचे. घटकबाबूंना खूप सूचना दिल्या जायच्या आणि ते आज्ञाधारकपणे टिपून देखील घ्यायचे.

दोन-तीन दिवसांनी बलरामाचा मृत्यू  पुन्हा बदलला.. आता मृत्यू स्क्रिप्टच्या सुरुवातीपासून उचलला जाऊन स्क्रिप्टच्या अखेरच्या सिक्वेन्सपर्यंत पोहोचला. तरीही विमलदांचं समाधान झालं नाही. दोन-तीन महिन्यांच्या चर्चेमध्ये बलराम कधी दोन दिवस आधी मरायचा कधी चार-पाच दिवस त्याला जीवदान मिळायचं. परंतु हा मृत्यू  हळूहळू पुढं जायचा. अचानक मी एकदा गेलो तेव्हा ते खूप खूष होऊन म्हणाले, “आत्ता अगदी योग्य जागा मिळाली त्या सीनला. जोग-स्नानाच्या दिवशी उजाडताच जेव्हा सूर्याचा पहिला किरण संगमावर पडतो…. तेव्हा..” उत्साहात ते थोडं खोकले. त्याचं अवघं शरीर खिळखिळं झालेलं . “तेव्हा बलरामाचा मृत्यू  होतो. हा पहिला मृत्यू क्लायमॅक्सच्या स्टॅम्पेडला बॅलन्स करेल. बलराम जोग-स्नानाच्या दिवशी मरेल.”

मी ‘हो’ म्हणालो, घटकबाबूंनी देखील स्वीकृती दर्शवली. विमलदा खूप उत्साहात दिसले.

“सुधीश एक सिगरेट दे.”

“‘का अचानक काय झालं?”

ते बंगालीत बोलत होते. “अरे, दे ना.”

“नाही, नाही! सिगरेट मिळनार नाही.”

“का? काय होईल?”

“प्यायची नाही. डॉक्टरांनी सांगितलंय प्यायची नाही.”

विमलदांच्या खोल गेलेल्या डोळ्यातले अश्रू डोळ्यात दफनही होऊ शकले नाहीत आणि परत आतही जाऊ शकले नाहीत. तिथंच पडल्या पडल्या थरथरू लागले. मला सहन नाही झालं. मी काहीतरी कारण काढून बाहेर आलो. पुन्हा गेलो नाही. त्यांची अवस्था माझ्याच्यानं सहन होत नव्हती. माझ्यासारखीच सगळ्यांची अवस्था झाली होती. एक भीती एक प्रतीक्षा.

१९६४ झपाट्यानं संपत चाललं होतं आणि विमलदा देखील.. त्यांचं बिछान्यावरून उठणं-बसणं बंद झालं होतं. घटकबाबू अखेरपर्यंत त्यांच्यासोबत होते. रात्रभर त्याच खोलीत झोपायचे, एका आराम खुर्चीत.

विमलदा निवर्तले तेव्हा घटकबाबूंनी सांगितलं, “मी खोकण्याचा आवाज एेकून जागा झालो. बघितलं तर विमल बिछान्यात बसून  सिगरेट पीत होता. मी विचारलं, ‘हे काय करतोयस?’ तर म्हणे, ‘सिगरेट पितोय.’ मी उठायचा प्रयत्न केला नाही, तिथूनच ‘पिऊ नकोस’ असं म्हणालो; तर म्हणाला, ‘काय होईल? ओढली नाही तेव्हा काही नाही झालं, ओढण्यानं काय होईल?’ त्याला पुन्हा खोकला आला, श्वास गुदमरला. पुन्हा श्वास आला. मी पुन्हा म्हणालो, ‘विमल, बस कर. फेकून दे, नको ओढूस.’

“काय पहिला दिवस आहे का? मी तर किती दिवसांपासून सिगरेट ओढतोय. आज तुझे डोळे उघडले तर धाक दाखवतोयस?” विमलनं आरामात सिगरेट ओढली आणि झोपी गेला. कायमचा, पुन्हा उठला नाही.

मला बातमी समजली तर इतके दिवस डोक्यावर लटकणारी भीतीची टांगती तलवार गळून पडली आणि श्वास येताच अश्रूंना वाट मिळाली. ८ जानेवारी १९६५ चा दिवस होता तो – ‘जोग-स्नानाचा दिवस!’


गुलजार प्रसिध्द भारतीय कवी, गीतकार, पटकथाकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत.
बलवंत जेऊरकर भाषांतरकार आहेत. ते हिंदी साहित्याचे मराठी भाषेत भाषांतर करतात. मंगेश डबराल, राजेश जोशी, पवन करण आणि अमृत राय यांच्या साहित्याचे भाषांतर केलेल्या बलवंत जेऊरकर यांना भाषांतरासाठी डॉ नीळकंठ रथ अनुवाद पुरस्कार, साहित्य अकादमी आणि बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्राप्त झाले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *