भाग ५
१२
जेम बारा वर्षांचा झाला होता. त्याच्याबरोबर राहणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं होतं. तो चंचल आणि लहरी झाला होता. त्याची भूक प्रचंड वाढली होती आणि मला त्रास देऊ नकोस म्हणून त्यानं इतक्या वेळा मला सांगितलं होतं, की मी शेवटी ॲटीकसकडे गेले होते : “त्याला जंत झाले असतील का?” ॲटीकस म्हणाला की तसलं काही नाहीये, जेम आता मोठा होतोय. तू त्याच्याशी जरा शांतपणे वाग आणि त्याला कमीतकमी त्रास दे.
गेल्या काही आठवड्यातच जेम इतका बदलला होता. मिसेस ड्युबोजना जाऊन फार दिवस लोटले नव्हते. त्यांना वाचून दाखवायला जाताना मी बरोबर असेल तर त्याला बरंच वाटायचं. आता मात्र काय करावं आणि काय करू नये, याबद्दलच्या त्याच्या कल्पना जशा काही एका रात्रीत बदलल्या होत्या आणि त्या तो माझ्यावर लादू बघत होता: कितीतरी वेळा त्याची मजल मी काय करावं हे सांगण्यापर्यंत गेली होती. अशाच एका बाचाबाचीनंतर जेम ओरडला, “जरा पोरींसारखं व्यवस्थित वागायला लाग आता !” ते ऐकून मात्र मी भोकाड पसरलं आणि कॅलपर्नियाकडे धावले.
“मिस्टर जेमचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस बघ..” ती मला सांगायला लागली.
“मिस्टर जेम?”
“हो, आता तो मिस्टर जेमच होणार.”
“इतका काही मोठा नाहीये तो,” मी म्हणाले, “त्याला कोणतरी बदडून काढला म्हणजे ताळ्यावर येईल. पण मी काही इतकी मोठी नाहीये.”
“बाळा,” कॅलपर्निया म्हणाली, “मिस्टर जेम मोठे होत असतील तर मी तरी काय करणार..आजकाल त्यांना एकटं राहायचं असतं. पोरांसारखं वागायचं असतं. तेव्हा तुला एकटं वाटलं तर सरळ स्वैपाकघरात येत जा. इथे आपल्याला पुष्कळ गोष्टी असतात करायला.”
उन्हाळ्याची सुरुवात तर बरी होणार असं दिसत होतं. जेमला हवं ते करूदे. डील येईपर्यंत कॅलपर्निया चालली असती. मी स्वैपाकघरात गेले तसं मला बघून तिला आनंद झालेला दिसला. तिचं काम बघताना मुलगी होण्यात पण काहीतरी कौशल्याचा भाग आहेच, असं मला वाटायला लागलं.
पण उन्हाळा आला तरी डील मात्र आला नाही. त्यानं मला एक पत्र आणि एक फोटो पाठवला. पत्रात आपल्याला नवीन बाबा मिळाल्याचं त्यानं म्हटलं होतं आणि त्याचा फोटो पाठवतोय असंही सांगितलं होतं. त्याला मेरिडीयनमध्येच राहावं लागणार होतं कारण त्या दोघांनी मिळून मच्छीमार बोट बांधायचं ठरवलं होतं. त्याचे बाबाही ॲटीकससारखेच वकील होते, पण ॲटीकसपेक्षा बरेच लहान होते. डीलचे नवीन बाबा अगदी छान दिसत होते. त्याला इतके छान बाबा मिळाले म्हणून मला आनंदच वाटत होता पण बाकी मी पार दुःखी झाले होते. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तू काही काळजी करू नकोस. पुरेसे पैसे साठले की मी येऊन तुला घेऊन जाईन आणि तुझ्याशी लग्न करेन. माझ्या पत्राचं उत्तर दे. असं त्यानं शेवटी लिहिलं होतं.
मला एक कायमचा प्रियकर मिळाला होता म्हणून काही त्याच्या इथे नसण्याची भरपाई होणार नव्हती. माझ्या ते कधी लक्षात आलं नव्हतं पण उन्हाळा म्हटला की माशांच्या तलावाशी धूर काढत बसून राहिलेला डील, बू रॅडलीला बाहेर काढायचे गुंतागुंतीचे बेत रचत असताना चमकणारे डीलचे डोळे, उन्हाळा म्हणजे जेमचं लक्ष नसताना डीलनं सराईतपणे पुढे होऊन घेतलेली माझी पापी, मधूनच एकमेकांची वाटणारी ओढ. डीलबरोबर आयुष्य कसं नेहमीसारखं असायचं. त्याच्याशिवाय राहणं अगदी असह्य होतं. मी चांगली दोन दिवस उदास होते.
हे पुरेसं नाही म्हणून की काय, राज्य विधीमंडळाची आणीबाणीची बैठक ठरली आणि ॲटीकस दोन आठवड्यांसाठी आम्हाला सोडून निघून गेला. राज्याचं बुडणारं जहाज गव्हर्नरला तातडीनं सावरायचं होतं, बर्मिंगहॅमला कामगार धरणं धरून बसले होते, पावासाठीच्या शहरा-शहरातल्या रांगा वाढत चालल्या होत्या आणि देशातले लोक आणखी गरीब होत चालले होते. जेमच्या आणि माझ्या जगापासून मात्र या सगळ्या घटना कितीतरी दूर होत्या.
एके दिवशी सकाळी माँटगोमरीॲडव्हर्टायझरमधलं एक व्यंगचित्र बघून आम्ही आश्चर्यचकित झालो. त्यावर लिहिलं होतं, “मेकोम्बचा फिंच”. त्यात अर्धी पँट घातलेला अनवाणी ॲटीकस दाखवला होता. त्याला एका मेजाला बांधलं होतं: तो अगदी चिकाटीनं एका पाटीवर काहीतरी लिहित होता आणि काहीशा उथळ दिसणाऱ्या पोरी त्याच्याकडे बघून “यू-हूss!” असं ओरडत होत्या.
“त्याचं कौतुकच केलंय इथे,” जेमनं समजावलं. “तो जी कामं करतो नाs ती कोणी केली नाहीत तर होणारच नाहीत.”
“अँ?”
सध्या नवीनच धारण केलेल्या गुणांबरोबर जेम वैताग येण्याइतका आगाऊपणाही करायला लागला होता.
“अगं म्हणजे प्रांतांची कर गोळा करण्याची व्यवस्था ठरवायची आणि तसलंच काय काय. ते काम करायला फारसं कोणाला आवडत नाही.”
“तुला काय माहीत?”
“तू जा बरं इथून. मी पेपर वाचतोय.”
जेमच्या मनासारखं झालं. मी एकदाची स्वयंपाकघरात निघून गेले.
तिकडे मटार सोलता सोलता कॅलपर्निया एकदम म्हणाली, “आता या रविवारी तुमच्या चर्चचं काय ?”
“काही नाही. ॲटीकसनं पैसे देऊन ठेवलेत आमच्याकडे. चर्चला देण्यासाठी.”
कॅलपर्नियानं डोळे बारीक केले आणि तिच्या डोक्यात काय चाललंय ते मला बरोब्बबर कळलं. “कॅल,” मी म्हणाले, “आम्ही अगदी छान वागू. इतक्या वर्षात आम्ही चर्चमध्ये कुठे काय केलंय?”
कॅलपर्नियाला नक्कीच तो रविवार आठवत असणार. पाऊस पडत होता. बरोबर आमचा बाबाही नव्हता आणि शिकवणाऱ्या बाईही. आम्हाला असं वाऱ्यावर सोडून दिलेलं असल्यानं सगळ्या वर्गानं मिळून युनिस ॲन सिम्प्सनला एका खुर्चीला बांधलं आणि भट्टीच्या खोलीत ठेवलं. नंतर तिला तसंच विसरून आम्ही वरती चर्चमध्ये गेलो आणि शांतपणे प्रार्थना ऐकत बसलो. तेवढ्यात रेडीएटरच्या पाईपमधून जोरजोरात आदळआपट ऐकू आली. कोणीतरी जाऊन बघितलं आणि युनिस ॲनला घेऊन आलं. आपल्याला मुळीच असला खेळ खेळायचा नाही, असं ती म्हणत होती. तिची पुरेशी श्रद्धा असेल तर ती जळणार नाही, असं जेमचं म्हणणं पडलं होतं.
“आणि कॅल, ॲटीकस काही आम्हाला पहिल्यांदाच एकटं सोडून गेलाय थोडाच?” मी म्हणाले.
“हो, पण दरवेळेस तुमच्या बाई बरोबर असतील असं ते बघतात. यावेळेस काहीच बोलले नाहीत.. .. विसरले बहुतेक.” कॅलपर्निया डोकं खाजवता खाजवता एकदम हसली. “उद्या तू आणि मिस्टर जेम माझ्यासोबत याल चर्चला ?”
“खरंच?”
“चालेल?” कॅलपर्निया हसली.
कॅलपर्निया एरवी मला खसखसून आंअंघोळ घालायची म्हणावं तर त्या शनिवार रात्रीची आंघोळ काही औरच होती. तिनं मला सगळ्या अंगाला दोनदा साबण लावायला लावला. प्रत्येक वेळेस अंगावर पाणी घेताना टबात नवीन पाणी काढलं. माझं डोकं बेसिनमध्ये खुपसून ते तेल लावून साबणानं धुतलं. जेमवर आता ती बरीच वर्षं झाली विश्वास ठेवायला लागली होती. त्या रात्री मात्र तिनं त्याच्या भानगडीत नाक खुपसलं. झालं ! त्यानं जो काही आरडाओरडा केला: “आता या घरात साधी अंघोळ करताना पण सगळे बघत उभं राहणारेत का ?”
दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीपेक्षा आधीच आमचे कपडे ‘डोळ्याखालून घालायला’ लागली. कॅलपर्निया रात्रीची आमच्याकडे थांबायची तेव्हा स्वंयपाकघरातच एका खाटेवर झोपायची. त्या दिवशी सकाळी ती खाट आमच्या रविवारच्या कपड्यांनी भरून गेली होती. माझ्या झग्याला तिनं इतका स्टार्च केला होता, की मी बसल्यावर तो तंबूसारखा उभा राहत होता. तिनं मला पेटीकोट घालायला लावला आणि कंबरेभोवती गुलाबी रंगाचा पट्टा घट्ट बांधला. माझे चामड्याचे बूट तिनं घासूनपुसून त्यात पार चेहेरा दिसेपर्यंत लख्ख केले.
“आपण काय जत्रेला चाललोय? एवढी तयारी कशाला ?” जेम म्हणाला.
“मं sकोणी म्हणायला नको, मी माझ्या पोरांची आबाळ करते म्हणून,” ती पुटपुटली.
“मिस्टर जेम, त्या सूटवर हा टाय कसा काय चांगला दिसेल? हिरवाय तो.”
“मग काय झालं?”
“सूट निळाय! दिसत नाही का?”
“हा हा” मी ओरडले. “जेम रंगांधळाच आहे.”
रागानं त्याचा चेहरा फुलला तेवढ्यात कॅलपर्निया म्हणाली, “आता गप बसा बरं. फर्स्ट पर्चेसला जाताना तुमच्या तोंडावर हसू पाहिजे मला. “
फर्स्ट पर्चेस आफ्रिकन एम. ई. चर्च हे शहराच्या दक्षिण दिशेच्या हद्दीबाहेर होतं. लाकूड कापण्याच्या कारखान्याचे रूळ दिसायचे त्याच्या पलीकडे. चर्चची इमारत अगदी जुनी, रंगाचे पोपडे उडालेली अशी होती. मनोरा आणि घंटा असलेलं ते मेकोम्बमधलं एकुलतं एक चर्च. गुलामगिरीतून मोकळ्या झालेल्या गुलामांच्या पहिल्या कमाईतून बांधलेलं म्हणून त्याचं नाव फर्स्ट पर्चेस. निग्रो लोक रविवारी तिथे प्रार्थनेला जमायचे आणि एरवी गोरे लोक तिथे जुगार खेळायचे.
चर्चचं आवार विटांपासून तयार केलेलं होतं. शेजारची दफनभूमीही विटांचीच बांधली होती. दुष्काळात कोणी मेलं तर पावसानं जमीन ओलसर होऊन मऊशार होईपर्यंत त्याचं शरीर बर्फाच्या थराखाली झाकून ठेवत असत. तिथल्या काही थडग्यांचे पुढचे दगड उखडले होते. नवीन थडगी गडद रंगाच्या काचेनं आणि कोकाकोलाच्या फुटक्या बाटल्यांनी सजवली होती. काही अस्वस्थ आत्म्यांच्या थडग्यांपाशी विजेपासून रक्षण करणाऱ्या काठ्या लावलेल्या होत्या. लहान बाळांच्या थडग्यांशी जळालेल्या मेणबत्त्यांचे तुकडे होते. तर अशी ती एकदम प्रसन्न दफनभूमी होती.
चर्चच्या आवारात आलो तसं स्वच्छ तयार होऊन आलेल्या निग्रोंचा कडवट गोड वास नाकात शिरला. केसांना लावायचं सुगंधी जेल, हिंग, जळकी मेणबत्ती, कलोन,तंबाखू, पेपरमिंट आणि फुलांच्या पावडरीचा वास असे सगळे वास एकमेकांत मिसळून गेले होते.
मला आणि जेमला कॅलपर्नियाबरोबर येताना बघून त्यांच्यातले पुरुष एकेक पाऊल मागे झाले आणि त्यांनी आपापल्या हॅट काढल्या. बायकांनी हाताची घडी घातली. आदरानं दखल घेतलेली दाखवायची त्यांची ही पद्धत होती. बाजूला होऊन त्यांनी आम्हाला चर्चच्या दारापर्यंत जायला लहानशी वाट करून दिली. कॅलपर्निया माझ्या आणि जेमच्या मधून चालत होती आणि चालता चालता रंगीबेरंगी कपड्यात तयार होऊन आलेल्या शेजाऱ्यांना नमस्कार करत होती.
“ए कॅलबाई, काय करून राह्यली तू?” मागून कोणीतरी म्हणालं.
कॅलपर्नियानं आमच्या खांद्यांवर हात ठेवले आणि आम्ही थांबून मागे वळून पाह्यलं. मागे एक उंच निग्रो बाई एका पायावर भार टाकून उभी होती. कंबरेत डाव्या हातचं कोपर खुपसून हाताचा तळवा आमच्याकडे दाखवत ती बोलत होती. तिचं डोकं लहानसं आणि वाटोळं होतं, डोळे वेगळेच म्हणजे बदामाच्या आकाराचे होते, नाक सरळ होतं आणि ओठ धनुष्यासारखे होते. ती जवळपास सात फूट उंच वाटत होती.
कॅलपर्नियाचा हात माझ्या खांद्यात रुतलेला मला जाणवला. “काय पाह्यजे तुला लुला?” तिनं विचारलं. ती ज्या सुरात ते बोलली तसं बोलताना मी तिला कधीच ऐकलं नव्हतं. ती थंडपणे आणि तुच्छ स्वरात बोलत होती.
“तू गोऱ्यांच्या पोरांना निगर चर्चला कशाला आणलं ते विचारतेय मी.”
“ते माझ्यासोबत आलेत,” कॅलपर्निया म्हणाली. पुन्हा एकदा मला तिचा आवाज काहीतरी विचित्रच वाटला. ती त्या सगळ्या लोकांसारखीच बोलत होती .
“तर काय, आठवडाभर तू फिंचच्या घरी सोबत करतेस.”
गर्दीत कुजबूज सुरू झाली. “घाबरू नकोस,” कॅलपर्निया माझ्या कानात कुजबुजली पण तिच्या हॅटवरचे गुलाब ऐटीत थरथरले.
लुला आमच्याकडे यायला लागली तशी कॅलपर्निया म्हणाली, “ए निगर, थांब तिथंच.”
लुला थांबली खरी पण म्हणाली, “गोऱ्यांच्या पोरांना इथे आणायचं काम नाय.. ..त्यांना त्यांचं चर्च हाय की . आपल्याला आपलंय. हे आपलं चर्च हाय. काय कॅलबाई?”
कॅलपर्निया म्हणाली, “दोन्हीकडे एकच देव आहे नं?”
जेम म्हणाला, “कॅल, चल आपण जाऊ घरी. या लोकांना आपण नको आहोत..”
मलाही तसंच वाटत होतं: त्यांना आम्ही तिथे यायला नको होतो. मला ते जाणवलं होतं आणि तसं मला दिसतही होतंच. ते सगळे एकेक करून पुढे येत होते. आमच्या आणखी जवळ सरकत होते. पण वर पाहिलं तर कॅलपर्नियाच्या डोळ्यात मला आश्चर्यच दिसलं. मी पुन्हा त्या वाटेकडे पाहिलं तर लुला निघून गेली होती. तिच्याजागी काळ्या लोकांचा एक जमाव उभा होता.
त्यांच्यापैकी एकजण गर्दीतून पुढे आला. तो झीबो होता. कचरा उचलणारा. “मिस्टर जेम,” तो म्हणाला, “तुम्ही इथे आलात म्हणून आम्हाला खूप बरं वाटलंय . लुलाकडे लक्ष देऊ नका. रेव्हरंड साईक्सनं तिला चर्चमध्ये आणून सरळ करायची धमकी दिलीये म्हणून ती भांडत असते. कधीपासनं सगळ्यांना अशीच ताप देत असते. डोक्यात काहीतरी फालतू कल्पना असतात आणि अंगात नुस्ता माज भरलाय.. ..तुम्ही सगळे आलात म्हणून आम्हाला खरंच बरं वाटलंय.”
मग कॅलपर्निया आम्हाला चर्चच्या दाराशी घेऊन गेली. तिथे रेव्हरंड साईक्सनं आमचं स्वागत केलं आणि ते आम्हाला पुढल्या रांगेत घेऊन गेले.
फर्स्ट पर्चेस चर्चला आतून रंग दिलेला नव्हता आणि छताला गिलावाही केलेला नव्हता. पितळी महिरपीत अडकवलेले केरोसीनचे दिवे भिंतींना लटकलेले होते. बसायला पाईनच्या लाकडापासून तयार केलेले बाक होते. ओकपासून तयार केलेल्या खडबडीत मंचामागे प्रेमस्वरूप ईश्वर असं लिहिलेला गुलाबी रंगाचा विटका फलक लटकत होता. हंटनं काढलेल्या द लाईट ऑफ द वर्ल्ड च्या चित्राची आवृत्ती सोडली तर चर्चमध्ये सजावट म्हणावी अशी तेवढी एकच होती. पियानो, ऑर्गन, प्रार्थनेची पुस्तकं, चर्चमध्ये होणारे कार्यक्रम असा एरवी आम्हाला दर रविवारी दिसणारा कोणताही बडेजाव तिथे नव्हता. आत अंधुक प्रकाश होता. हळूहळू लोक जमत होते आणि आतला दमट ओलसरपणा पळून जात होता. प्रत्येक बाकाशी एक स्वस्तातला पुठ्ठ्याचा पंखा होता.
कॅलपर्नियानं मला आणि जेमला खूण करून एका टोकाला बोलावलं आणि ती आम्हा दोघांच्या मध्ये बसली. तिनं पर्समध्ये हात घालून रुमाल बाहेर काढला, त्याच्या एका टोकाला बांधलेली गाठ सोडली आणि त्यातून काही नाणी बाहेर काढली. मग मला आणि जेमला तिनं दहा सेंट्सचं एकेक नाणं दिलं. “आमच्याकडे आहेत,” जेम कुजबुजला. “ते राहू देत तुमच्याकडेच. तुम्ही माझ्याबरोबर आलायत.” कॅलपर्निया म्हणाली. जेमच्या चेहेऱ्यावर क्षणभर गोंधळ दिसला. आपल्याजवळचे पैसे तसेच ठेवून देणं कितपत बरोबर आहे ते त्याला ठरवता येत नव्हतं. पण अंगभूत सौजन्यामुळे तिनं दिलेले पैसे त्यानं खिशात ठेवले. जराही न बिचकता मीही तेच केलं.
“कॅल,” मी खुसफुसत विचारलं, “प्रार्थनेची पुस्तकं कुठेत?”
“आमच्याकडे नसतातच.”
“पण मग तुम्ही कसं काय..?”
“श्शू..” ती म्हणाली. रेव्हरंड साईक्स मंचावर उभे राहून एकटक सगळ्यांकडे बघत त्यांना नजरेनंच शांत करत होते. ते बुटके आणि जरासे आडव्या बांध्याचे होते. त्यांनी काळ्या रंगाचा सूट, काळाच टाय आणि पांढरा शर्ट घातला होता. खिडक्यांच्या दुधाळ काचांमधून येणाऱ्या उजेडात त्यांच्या घड्याळाची सोनेरी रंगाची साखळी चमकत होती.
ते म्हणाले, “बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याकडे खास पाहुणे आले आहेत. मिस्टर आणि मिस फिंच. तुम्ही सगळेच त्यांच्या वडिलांना ओळखता. आता प्रार्थनेला सुरुवात करण्याआधी मी काही निवेदनं वाचून दाखवतो. “
रेव्हरंड साईक्सनी काही कागद वरखाली केले आणि त्यातला एक निवडून तो हातभर अंतरावर धरून वाचायला सुरुवात केली, “सिस्टर ॲनेट रिव्ह्जच्या घरी पुढल्या मंगळवारी मिशनरी समाजाची बैठक आहे. सर्वांनी आपापले शिवण घेऊन यावे.”
दुसरा एक कागद समोर धरून त्यांनी वाचला, “आपला बंधू, टॉम रॉबिन्सनची अडचण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. लहानपणापासून तो आपल्या चर्चचा अगदी एकनिष्ठ सदस्य आहे. आज आणि पुढच्या तीन रविवारी जमा होणारा निधी त्याच्या पत्नीला हेलनला मिळेल ..तिला घरखर्चात मदत म्हणून.”
मी जेमला चिमटा काढला, “हा टॉम रॉबिन्सन म्हणजे..”
“श्शू!”
मी कॅलपर्नियाकडे वळले पण तोंड उघडायच्या आतच तिनं मला गप्प केलं . हिरमुसून मी रेव्हरंड साईक्सकडे लक्ष द्यायला लागले. ते मी शांत बसायचीच वाट बघत असावेत. “संगीत संयोजकांनी पहिली प्रार्थना सुरू करायला हरकत नाही.” ते म्हणाले.
झीबो जागेवरून उठून दोन ओळींच्या मधल्या जागेतून चालत आमच्यासमोर येऊन थांबला . जमलेल्या लोकांकडे तोंड करून तो उभा राहिला. त्याच्या हातात एक जीर्ण झालेलं प्रार्थनेचं पुस्तक होतं. ते उघडून तो म्हणाला, “मी दोनशे त्र्याहत्तरावी प्रार्थना गाणार आहे.”
आता मात्र खूपच झालं. “प्रार्थनेची पुस्तकंच नसतील तर आम्ही कसे काय गाणार?”
कॅलपर्निया हसली. “थांब गं जरा,” ती कुजबुजली, “कळेलच तुला.”
झीबोनं घसा खाकरून वाचायला सुरुवात केली. त्याचा आवाज लांबून ऐकू येणाऱ्या तोफांच्या गडगडाटासारखा वाटत होता.
“नदीपल्याड तो एक प्रदेश”
आश्चर्य म्हणजे झीबोच्या मागोमाग शेकडो आवाज एका सुरात गाऊ लागले. शेवटच्या अक्षरानंतर भरून राहिलेल्या प्रतिध्वनीतून झीबोचा स्वर ऐकू आला “तोच खरा सुखाचा देश”
पुन्हा एकदा चहूकडून संगीत उचंबळून आलं, शेवटचे सूर रेंगाळत असतानाच झीबो पुढली ओळ गाऊ लागला: “श्रद्धा तारेल आम्हा नेईल पैलतीरी”
यावर जमाव थोडासा अडखळला, झीबोनं पुन्हा एकदा ती ओळ व्यवस्थित म्हटली आणि मग सगळ्यांनी त्याच्यामागून ती गायली. मग झीबोनं पुस्तक मिटलं. त्याच्या मदतीशिवाय गाण्याचा हा इशारा होता.
शेवटून दुसऱ्या ओळीचे सूर विरत असताना झीबो म्हणाला, “दूरच्या त्या सुखनिधानी, त्या चमकत्या नदीकिनारी”
त्याच्यामागोमाग अनेक आवाजात एकेक ओळ ऐकू येत होती. साध्याशा चालीत बांधलेली ती प्रार्थना संपली तेव्हा वातावरणात एक गंभीर सुरावट भरून राहिली होती.
मी जेमकडे पाहिलं. तो डोळ्यांच्या कोपऱ्यातून झीबोकडेच बघत होता. आत्ता घडलेल्या गोष्टीवर माझाही विश्वास बसत नव्हता पण आम्ही दोघांनीही ते ऐकलं होतं.
त्यानंतर रेव्हरंड साईक्सनी ईश्वराला दुःखी आणि पीडितांवर कृपा करण्याचं आवाहन केलं . ही पद्धत आमच्या चर्चपेक्षा मुळीच वेगळी नव्हती. फक्त रेव्हरंड साईक्सनी काही विशिष्ट लोकांकडे देवाचं लक्ष वेधून घेतलं .
त्यांच्या प्रवचनात पापाचा उघडउघड धिक्कार होता. मागच्या भिंतीवर लावलेलं ब्रीदवाक्यच त्यांनी थेट बोलून दाखवलं. हातभट्टीची दारू, जुगार आणि अनोळखी बायांपासून धोका असल्याचा इशारा त्यांनी आपल्या माणसांना दिला. दारूचे बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांपासून वस्तीला पुष्कळच त्रास होऊ शकतो पण बायका त्यापेक्षाही वाईट होत्या म्हणे. स्त्रीजात कशी अपवित्र आहे हा उपदेश समस्त पाद्र्यांना सतत करावासा वाटतो , हे पुन्हा एकदा माझ्या लक्षात आलं. आमच्या चर्चमध्येही हे नेहमीचंच होतं.
मी आणि जेम हेच प्रवचन दर रविवारी ऐकत आलो होतो . अपवाद फक्त एकच होता. चुकीच्या मार्गाला लागलेल्या व्यक्तींवर टिप्पणी करण्यासाठी रेव्हरंड साईक्स त्यांच्या व्यासपीठाचा वापर जास्तच मोकळेपणानं करत होते: जिम हार्डी गेले पाच रविवार चर्चला आला नव्हता, शिवाय तो आजारीही नव्हता. कॉन्स्टन्स जॅक्सनला वर्तणूक सुधारण्याची तंबी देण्यात आली. शेजाऱ्यांशी भांडल्यामुळे तिच्यावर मोठंच संकट कोसळणार होतं . वस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणी इतकं द्वेषाचं वातावरण तयार केलं होतं म्हणे.
रेव्हरंड साईक्सनी प्रवचनाचा समारोप केला. मग ते व्यासपीठासमोर एका टेबलाशी उभे राहिले आणि देणगी देण्याची विनंती केली. मला आणि जेमला हा प्रकार नवीनच होता. एकेक करून माणसं पुढे येत होती आणि काळ्या रंगाच्या कॉफीच्या रिकाम्या डब्यात आपल्याजवळची सुटी नाणी टाकत होती. जेम आणि मीही त्यात सामील झालो. आमच्या नाण्यांचा खणखणाट ऐकू आला तशी “थँक्यू , थँक्यू” अशी हलक्या आवाजातली कुजबुज कानी पडली.
आश्चर्य म्हणजे रेव्हरंड साईक्सनी तो डबा टेबलावर उपडा केला आणि नाणी हातात घेऊन मोजली. ताठ होत ते म्हणाले, “एवढे पुरेसे नाहीत. दहा डॉलर्स जमायला हवेत.”
जमावात जरा खळबळ झाली. “हे पैसे कशासाठी आहेत ते तुम्हाला चांगलं माहितेय.. टॉम जेलमध्ये आहे. हेलन तिच्या लहान मुलांना सोडून कामावर जाऊ शकत नाही. प्रत्येकानं आणखी दहा दहा सेंट दिले तर पुरेसे पैसे जमतील..” रेव्हरंड साईक्सनी चर्चच्या मागे उभ्या असलेल्या कोणालातरी हात करून सांगितलं, “अलेक, दारं बंद कर. दहा डॉलर्स जमल्याशिवाय कोणीही इथून जाणार नाही.”
कॅलपर्नियानं तिच्या पिशवीत हात घालून एक जीर्ण झालेली चामडी थैली बाहेर काढली. त्यात नाणी होती. “नाही हं कॅल,” तिनं एक चकाकतं नाणं काढून दिलं तसा जेम कुजबुजला. “आम्ही आमचे पैसे देतो. स्काऊट, दे तुझे पैसे इकडे.”
चर्चमध्ये आता गुदमरायला लागलं होतं. रेव्हरंड साईक्सनी जमलेल्या लोकांना घाम गाळायला लावून पैसे गोळा करण्याचा घाट घातलाय हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. पंख्यांची करकर चालू होती, माणसं अस्वस्थपणे एका पायावरून दुसऱ्या पायावर भार देत उभी होती, तंबाखूचं व्यसन असणाऱ्यांची चलबिचल चालली होती.
रेव्हरंड साईक्सच्या करड्या आवाजानं मी दचकले, “कार्लो रिचर्डसन, तू इकडे आला नाहीस अजून.”
खाकी पँट घातलेला एक कृश माणूस वर आला आणि त्यानं एक नाणं डब्यात टाकलं. जमलेल्या लोकांमध्ये संमतीदर्शक कुजबुज झाली.
मग रेव्हरंड साईक्स म्हणाले, “ज्यांना पोरंबाळं नाहीत त्या प्रत्येकानं आणखी एक एक दहा सेंटचं नाणं टाका. मग बरोबर पैसे जमतील.”
हळूहळू मोठ्या कष्टांनी दहा डॉलर्स जमा झाले. दार उघडलं आणि गरम हवेच्या झोतानं आम्हाला हायसं झालं. झीबोनं आणखी एक प्रार्थना म्हटली आणि चर्च प्रकरण संपलं.
मला थांबून इकडेतिकडे फिरून बघायचं होतं पण कॅलपर्नियानं मला पुढे ढकललं. झीबो आणि त्याच्या कुटुंबाशी गप्पा मारायला ती चर्चच्या दाराशी थांबली. मग मी आणि जेमसुद्धा रेव्हरंड साईक्सशी बोलायला लागलो. मला प्रश्नांवर प्रश्न होते. पण मी स्वतःला आवर घालत कॅलपर्नियाला त्याची उत्तरं विचारायची असं ठरवून टाकलं.
“तुम्ही इकडे आलात याचा आम्हाला विशेष आनंद झाला,” रेव्हरंड साईक्स म्हणाले. “तुमचे वडील आमच्या चर्चचे चांगले स्नेही आहेत.”
आता मात्र माझी ताणलेली उत्सुकता तुटली: “तुम्ही सगळे टॉम रॉबिन्सनच्या बायकोसाठी निधी का गोळा करत होतात?”
“तू ऐकलं नाहीस?” रेव्हरंड साईक्सनं विचारलं. “हेलनला तीन लहान लहान मुलं आहेत आणि तिला कामावरही जाता येत नाही..”
“ती त्या मुलांना बरोबर का नाही घेऊन जात?” मी विचारलं. शेतावर काम करणाऱ्या निग्रो लोकांमध्ये तशी पद्धतच होती. कामाच्या ठिकाणी जी काही सावली मिळेल तिथे आईबाप आपापल्या बारक्या पोरांना ठेवून द्यायचे.. सहसा ती बाळं कपाशीच्या दोन ओळींमधल्या सावलीत बसायची. ज्यांना अजून बसता येत नसायचं त्यांना आया पाठुंगळी बांधायच्या नाहीतर कापसाच्या गोणीवर ठेवून द्यायच्या.
रेव्हरंड साईक्स जरा घुटमळले. “मिस जीन लुईस, खरं सांगायचं तर हेलनला आजकाल काम मिळण्याची मारामार झालीये.. ..मला वाटतं, आता तोडणीची वेळ आली की मिस्टर लिंक डियस घेतील तिला कामावर.”
“असं का रेव्हरंड?”
त्यांनी काही उत्तर द्यायच्या आतच कॅलपर्नियाचा हात माझ्या खांद्यावर पडला. त्याचा भार जाणवून मी म्हणाले, “आम्हाला तुम्ही इथे येऊ दिलंत त्याबद्दल आभार.” जेमनंही माझंच अनुकरण केलं आणि आम्ही घरी निघालो.
“कॅल, टॉम रॉबिन्सन तुरुंगात आहे आणि त्यानं काहीतरी वाईट केलंय मला माहितेय पण हेलनला का कोणी कामावर घेत नाहीये?” मी विचारलं.
कॅलपर्निया गडद निळ्या रंगाचा वायलचा झगा आणि मोठी हॅट घालून माझ्या आणि जेमच्या मधून चालली होती. “कारण टॉमनं जो गुन्हा केलाय असं लोक म्हणतायत त्यामुळे,” ती म्हणाली. “लोकांना त्याच्या घरातल्या कोणाशीच विशेष संबंध नकोय.”
“त्यानं काय केलंय कॅल?”
कॅलपर्नियानं सुस्कारा सोडला. “मिस्टर बॉब एवेलनं त्याच्या पोरीवर बलात्कार केल्याचा आरोप टॉमवर ठेवलाय आणि त्याला अटक करून तुरुंगात टाकायला लावलंय ..”
“मिस्टर एवेल?” माझ्या आठवणीत काहीतरी हललं. “म्हणजे दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावून घरी जातात त्या एवेल्सपैकी हे कोणी आहेत का? ॲटीकस तर म्हणाला होता ते लोक पार बेकार आहेत म्हणून.. ..मी ॲटीकसला दुसऱ्या कोणाबद्दलही असं बोलताना ऐकलेलं नाही. तो म्हणाला..”
“हो तेच आहेत ते.”
“एवेल्स काय लायकीची माणसं आहेत हे मेकोम्बमधल्या सगळ्यांनाच माहितेय. मग हेलनला काम द्यायला आवडेलच की सगळ्यांना.. ए कॅल, बलात्कार म्हणजे काय?”
“ते तू मिस्टर फिंचनाच विचार,” ती म्हणाली, “तेच तुला माझ्यापेक्षा नीट समजावून सांगतील. भूक लागली का आता? सकाळी रेव्हरंडनी बराच वेळ घेतला ना प्रवचन संपवायला. सहसा नाही इतका वेळ लावत.”
“आमच्या पाद्र्यांसारखेच आहेत ते.” जेम म्हणाला. “पण तुम्ही अशी का प्रार्थना म्हणता?”
“अशी म्हणजे? कोणाच्यातरी एकाच्या मागून?”
“हां, तेच.”
“हं, मला आठवतंय तेव्हापासून ते असंच आहे.”
जेम म्हणाला की, एखाद्या वर्षाचा निधी साठवून ठेवला तर प्रार्थनेची काही पुस्तकंही आणता येतील.
कॅलपर्निया हसून म्हणाली, “त्याचा काही उपयोग नाही. त्यांना कोणाला वाचताच येत नाही.”
“वाचता येत नाही?” मी विचारलं, “कोणालाच?”
“हो,” कॅलपर्निया मान डोलावत म्हणाली. “फर्स्ट पर्चेसमध्ये फक्त चार लोकांना वाचता येतं .. मी त्यातली एक. “
“कॅल, तू कुठल्या शाळेत जायचीस?”
“कुठल्याच नाही. थांब हां, मला पहिल्यांदा अक्षरं कोणी शिकवली बरं ? हां, मिस मॉडी ॲटकिन्सच्या आत्यानं. मिस बडफोर्डनं.. .. “
“तू इतकी मोठ्ठी आहेस?”
“मी मिस्टर फिंचपेक्षाही मोठी आहे.” कॅलपर्निया हसून म्हणाली. “किती ते माहीत नाही मला. एकदा किनई, आम्ही असंच आठवायला बसलो. माझं वय किती असेल त्याचा अदमास घ्यायला.. तर त्यांच्यापेक्षा थोडंसंच आधीचं आठवतं मला. तेव्हा मी काही फार मोठी नसेन त्यांच्यापेक्षा. पुरुषांना बायकांपेक्षा कमीच आठवतं नाहीतरी.”
“तुझा वाढदिवस कधी असतो कॅल?”
“मी आपली ख्रिसमसलाच साजरा करते. लक्षात ठेवायला सोपं पडतं.. ..खराखुरा वाढदिवस कधी ते माहीतच नाही मला.”
“पण कॅल,” जेम तिला अडवत म्हणाला, “तू मुळीच ॲटीकसइतकी म्हातारी दिसत नाहीस.”
“काळ्या लोकांचं वय इतक्या लगेच दिसून येत नाही,” ती म्हणाली.
“हां, त्यांना वाचता येत नाही म्हणून असेल. कॅल, झीबोला तूच शिकवलंस?”
“हो मिस्टर जेम. त्याच्या लहानपणीही शाळा नव्हतीच. पण मी शिकवलं त्याला.”
झीबो कॅलपर्नियाचा थोरला मुलगा. तसा विचार केला असता तर कॅलपर्निया बरीच मोठी असल्याचं माझ्या लक्षात आलं असतं. ..झीबोची स्वतःचीच पोरं आता अर्धवट वयाची होती.. पण मुळात मी कधी तो विचार केलाच नव्हता.
“त्यालाही तू आमच्यासारखंच प्रायमर घेऊन शिकवलंस?” मी विचारलं.
“नाही, मी रोज त्याला बायबलमधलं एक पान लिहायला लावायचे. आणि मिस बडफोर्डनी मला ज्या पुस्तकातून शिकवलं तेही होतं.. ..मला ते कुठून मिळालं माहितेय?” तिनं विचारलं.
आम्हाला काही ते माहीत नव्हतं.
कॅलपर्निया म्हणाली, “तुमच्या फिंच आजोबांनी दिलं मला.”
“तूही घाटावर राह्यचीस?” जेमनं विचारलं. “कधी बोलली नाहीस आम्हाला.”
“हो तर. मी तिकडेच वाढलेय. बडफोर्ड लोकांचं घर आणि घाट एवढ्या जागेतच. सारखी फिंच नाहीतर बडफोर्ड लोकांकडेच कामाला असायचे मी. तुमच्या आईबाबांचं लग्न झालं तेव्हा मी मेकोम्बला आले.”
“ते पुस्तक कोणतं होतं गं कॅल?” मी विचारलं.
“ब्लॅकस्टोनचं कमेंटरीज.”
जेम थक्कच झाला. “तू झीबोला त्यातून शिकवलंस?”
“हो मिस्टर जेम, का बरं? काय झालं?..” कॅलपर्नियानं घाबरून तोंडावर हात ठेवला. “माझ्याकडे तेवढी दोनच पुस्तकं होती. तुमचे आजोबा म्हणाले की मिस्टर ब्लॅकस्टोन फार छान इंग्लिश लिहायचे म्हणून ..”
“म्हणूनच तू बाकीच्यांसारखी बोलत नाहीस.” जेम म्हणाला.
“बाकीच्यांसारखी म्हणजे?”
“बाकीच्या काळ्या लोकांसारखी. कॅल, पण चर्चमध्ये तू त्यांच्यासारखीच बोलत होतीस..”
कॅलपर्निया शांतपणे चक्क दुहेरी आयुष्य जगत होती हे माझ्या ध्यानातच आलं नव्हतं. आमच्या घराबाहेर तिचं स्वतंत्र अस्तित्त्व होतं, तिला दोन भाषा उत्तम बोलता येत होत्या ही कल्पनाच नवीन होती. “कॅल,” मी विचारलं, “तू त्या.. ..त्या तुझ्या लोकांशी निगर लोकांच्याच भाषेत का बोलतेस ?..ती भाषा अशुद्ध आहे तुला माहितेय नं?”
“अं..हे बघ.. पहिली गोष्ट म्हणजे मी काळी आहे. ..”
“म्हणून काही तू त्यांच्यासारखं बोललं पाहिजेस असं नाही. तुला नीट बोलायला येत असतानाही..” जेम म्हणाला.
कॅलपर्नियानं डोक्यावरची हॅट किंचित तिरकी करत डोकं खाजवलं. मग काळजीपूर्वक ती हॅट दोन्ही कानांवर दाबून धरली आणि ती म्हणाली, “तसं सांगणं जरा कठीण आहे. आता समजा.. तू आणि स्काऊट घरी जाऊन काळ्या लोकांसारखं बोलायला लागलात तर तुम्ही वेगळे पडाल, हो किनई? मग मी चर्चमध्ये, शेजारीपाजारी गोऱ्या लोकांसारखं बोलायला लागले तर? त्यांना वाटेल मी जादा आगाऊपणा करतेय.”
“पण कॅल, तुला शुद्ध भाषा बोलता येते,” मी म्हणाले.
“आपल्याला येत असलेलं सगळंच सांगत सुटायची गरज नसते. सभ्य स्त्रीला शोभत नाही ते.. ..आणि दुसरी गोष्ट, आपल्यापेक्षा जास्त येणारं माणूस आपल्या आजूबाजूला असलेलं कोणालाच आवडत नाही. ते चिडतात. शुद्ध भाषा बोलून काही ते बदलणार नाहीत. त्यांना स्वतःलाच शिकायची इच्छा असेल तरच बदलतील. त्यांना शिकायचंच नसेल तर आपण तोंड बंद ठेवायचं किंवा त्यांच्याच भाषेत बोलायचं. एवढं सोडून आपण दुसरं काहीच करू शकत नाही.”
“कॅल, मी तुला अधूनमधून भेटायला आले तर चालेल ?”
तिनं खाली वाकून माझ्याकडे पाहिलं, “मला भेटायला म्हणजे काय सोन्या? मी रोजच भेटते की तुला.”
“तुझ्या घरी गं,” मी म्हणाले, “असंच कधीतरी.. तुझं काम झाल्यावर? ॲटीकस न्यायला येईल मला.”
“तुला हवं तेव्हा ये,” ती म्हणाली. “आम्हाला आवडेलच तू आलीस तर.”
आम्ही रॅडलींच्या घराशेजारून चाललो होतो.
“तिकडे व्हरांड्यात बघ.” जेम म्हणाला.
मी रॅडलींच्या घराकडे पाहिलं. त्या घरातलं पिशाच्च झोपाळ्यावर ऊन खात बसलं असेल अशीच माझी अपेक्षा होती पण तो झोपाळा तर रिकामा होता.
“अगं, आपल्या व्हरांड्यात बघ,” जेम म्हणाला.
मी रस्त्यापलीकडे पाहिलं. आमची प्रेमळ, ताठ कण्याची, कडक शिस्तीची अलेक्झांड्रा आत्या तिकडे झुलत्या खुर्चीत अशी काही बसून होती जशी रोजच बसत असावी.
१३
“कॅलपर्निया, माझी बॅग पुढल्या खोलीत ठेव,” अलेक्झांड्रा आत्याचं सलामीचं वाक्य हे होतं. तिचं दुसरं वाक्य होतं, “जीन लुईस, डोकं खाजवू नकोस.” कॅलपर्नियानं आत्याची जड बॅग उचलली आणि खोलीचं दार उघडलं. “मी घेतो,” असं म्हणून जेमनं बॅग घेतली. आतल्या खोलीतल्या फरशीवर ती बॅग आदळल्याचा आवाज आला आणि नंतर बराच वेळ तो आवाज उदासपणे रेंगाळत राहिला. “ए आत्या, तू सहज भेटायला आलीस ?” मी विचारलं. अलेक्झांड्रा आत्या क्वचितच घाटावरून इकडे भेटायला यायची. तिच्या प्रवासाची एकंदर ऐट असायची. तिच्याकडे गडद हिरव्या रंगाची ब्यूक गाडी होती आणि एक काळा ड्रायव्हरही होता. गाडी आणि ड्रायव्हर दोघांना अगदी कळा आली होती. आज मात्र ते कुठे दिसत नव्हते.
“तुमच्या बाबानं सांगितलं नाही का तुम्हाला?” तिनं विचारलं.
जेमनं आणि मी नकारार्थी माना हलवल्या.
“विसरला बहुतेक. अजून आला नाहीये नं तो?”
“नाही. दुपार उतरेपर्यंत येत नाही तो.” जेम म्हणाला.
“हं तर, तुमच्या बाबानं आणि मी मिळून असं ठरवलंय की थोडे दिवस मी इथे येऊन राह्यचं.”
‘थोडे दिवस’ याचा मेकोम्बमधला अर्थ तीन दिवसांपासून तीस वर्षांपर्यंत कितीही होऊ शकायचा. जेमनं आणि मी एकमेकांकडे चोरटी नजर टाकली.
“जेम आता मोठा होतोय आणि तू ही,” ती मला म्हणाली. “आम्ही असं ठरवलंय की तुझ्याबरोबर एखादं बाईमाणूस असलेलं बरं. जीन लुईस, आता काही वर्षातच तुला कपडे, तरुण मुलं या सगळ्याचं आकर्षण वाटायला लागेल..”
आता या वाक्याला मी पुष्कळच उलट उत्तरं देऊ शकले असते: एकतर आमच्याबरोबर राहणारी कॅल ही बाईच आहे, तरुण मुलांचं आकर्षण वाटायला मला अजून बरीच वर्षं आहेत आणि कपड्यांचं आकर्षण मला कध्धीच वाटणार नाही.. ..पण मी गप्प बसले.
“आणि जिमी काका?” जेमनं विचारलं. “ते पण येणारेत?”
“छे, छे. ते घाटावरच राहणारेत. तिकडचं सगळं बघतील ते.”
“तुला आठवण नाही येणार त्यांची ?” हा प्रश्न विचारताक्षणीच आपण फारसं हुशारीचं काम केलेलं नाही हे माझ्या लक्षात आलं. जिमीकाका असले काय आणि नसले काय, फारसा फरक पडत नव्हता. ते कधी काही बोलायचेच नाहीत. अलेक्झांड्रा आत्यानं माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं.
तिच्याशी आणखी काही बोलायचं मला सुचेना. खरं म्हणजे मला तिच्याशी कधीच काही बोलायला सुचायचं नाही. याआधी आमच्यात झालेल्या वैतागवाण्या गप्पा मी आठवायला लागले. “कशीयेस तू जीन लुईस?” “मी बरीये आत्या. तू कशीयेस?” “मीही बरीये. थँक्यू.” “काय करतेस तू सध्या?” “काही नाही.” “काहीच करत नाहीस तू?” “नाही.” “तुला मित्रमैत्रिणी असतील नं?” “हो, आहेत ना.” “मग तुम्ही सगळे मिळून काय करता?” “काही नाही.”
आत्याला मी अगदी मंद वाटत असणार. मी आळशी असल्याचं एकदा ती ॲटीकसलाही सांगत होती.. ..मी ऐकलं होतं ते.
या सगळ्यामागे नक्कीच काहीतरी गडबड होती. पण आत्ता तिच्याकडून ती गोष्ट काढून घ्यायची मला मुळीच इच्छा नव्हती. आज रविवार. अलेक्झांड्रा आत्या उघडच चिडचिडलेली दिसत होती. बहुधा तिच्या रविवारी घालायच्या अंतर्वस्त्रामुळे असणार. तशी ती जाड नव्हती पण धष्टपुष्ट होती. तिनं घातलेली अंतर्वस्त्रं म्हणजेच कॉर्सेट तिची छाती पार वर उचलून धरत होती, कंबरेला घट्ट आवळून पार्श्वभाग आणखी मागे ढकलत होती आणि एकेकाळी अलेक्झांड्रा आत्या वाळूच्या घड्याळासारखी कमनीय असल्याचं सुचवत होती. कसंही बघायला गेलं तरी ते दृश्य फार भयानक दिसत होतं.
नातेवाईक मंडळी भेटायला आल्यानंतर जी एक हलकीशी उदासीनता पसरून राहते त्यातच उरलेली दुपार टळली. रस्त्यातून मोटारीचा आवाज ऐकू आला तशी ती उदासी कुठल्याकुठे पळाली. ॲटीकस माँटगोमरीवरून घरी परत आला होता. जेम स्वतःचा आब वगैरे सगळं विसरून माझ्याबरोबर धावत धावत त्याला भेटायला गेला. त्यानं ॲटीकसची ब्रीफकेस आणि बॅग ताब्यात घेतली. मी त्याच्या कुशीत घुसले. त्यानं माझ्या गालाचा पुसटसा कोरडा मुका घेतल्यावर मी विचारलं, “मला पुस्तक आणलंस? आत्या आलीये इथे, माहितेय तुला?”
ॲटीकसनं दोन्ही प्रश्नांची होकारार्थी उत्तरं दिली. “तुला आवडेल ना ती आपल्याबरोबर राहिली तर?”
हो, खूप आवडेल असं मी म्हणाले. ते साफ खोटं होतं पण काही काही प्रसंगात खोटं बोलावंच लागतं. शिवाय एखादी गोष्ट तुमच्या हातातच नसेल तर कायमच खोटं बोलावं लागतं.
“आम्हाला वाटलं की तुम्हाला दोघांना जरा मदतीची गरज लागेल.. ..अं, म्हणजे त्याचं असंय स्काऊट,” ॲटीकस म्हणाला, “मला आणि तुम्हाला सगळ्यांनाही मदत व्हावी म्हणून आत्या इथे आलीये. मी काही दिवसभर तुमच्यासोबत राहू शकत नाही आणि हा उन्हाळा चांगलाच कडक असणारे.”
“हो ना,” त्यानं बोललेला एक शब्दही न कळून मी म्हणाले. मात्र मला असा संशय होता की, इथे यायची कल्पना ॲटीकसची नसून आत्याची स्वतःचीच होती. “या घराच्या भल्यासाठी अमुक एक केलं पाहिजे,” असले वटहुकूम काढण्यात आत्याचा हातखंडा होता आणि मला वाटतं आमच्याकडे येऊन राहायचा तिचा निर्णय त्याच प्रकारात मोडणारा होता.
मेकोम्बनं तिचं स्वागतच केलं. तिच्यासाठी मिस मॉडी ॲटकीन्सनं केलेल्या अक्रोड केकमध्ये इतकी दारू होती की तो खाऊन मी सुस्तावलेच. मिस स्टीफनी क्रॉफर्ड तासंतास अलेक्झांड्रा आत्याला भेटायला येऊ लागली. बहुतेक वेळा त्या दोघींना बोलताना पाहिलं तर मिस स्टीफनी मान हलवत “हो नं, हो नं, काय पण” असलं काहीतरी म्हणत असायची. शेजारच्या मिस रेचलनं आत्याला दुपारी कॉफीला बोलावलं आणि मिस्टर नॅथन रॅडली तर चक्क पुढल्या अंगणात येऊन, “तुम्हाला भेटून फार बरं वाटलं,” असं तिला म्हणून गेले.
ती येऊन स्थिरस्थावर झाली आणि आमचं आयुष्य आपापल्या गतीनं पुन्हा सुरू झालं. अलेक्झांड्रा आत्या जशी काही कायमच आमच्याबरोबर राहतेय असं वाटायला लागलं होतं. मिशनरी समाजाच्या बैठका बोलावून त्यांना खाऊपिऊ घातल्यामुळे यजमानीण म्हणून तिचा भाव वधारला. (कोणत्या ना कोणत्या आमिषाला भुलून बाटलेल्या ख्रिश्चन लोकांबद्दलचे अहवाल असल्या बैठकांमध्ये नजरेखालून घातले जात. अशा बैठकांसाठी लागणारे सुग्रास पदार्थ ती कॅलपर्नियाला करू द्यायची नाही). मेकोम्बच्या लेखनिक मंडळात सामील होऊन ती त्याची सेक्रेटरीसुद्धा झाली. कोणत्याही गावात तिच्यासारखी माणसं सापडणं आता दुर्मिळच होतं. तिच्या वागण्या बोलण्यात एक उच्चभ्रू ऐट होती, कोणतीही नैतिक शिकवण असूदे, ती ती लगेच उचलून धरायची. ती जणू जन्मापासूनच औपचारिक बोलायला शिकली होती आणि गावगप्पा करायची तिची सवय अगदी असाध्य म्हणावी अशीच होती. अलेक्झांड्रा आत्या शाळेत असताना ‘स्वतःबद्दल शंका वाटणे’ ही गोष्ट शिकवत नसावेत. त्यामुळे तिला त्याचा अर्थच माहीत नव्हता. तिला कधीही कंटाळा यायचा नाही आणि कंटाळा येण्याचं जरासं जरी लक्षण दिसलं तरी ती लगेच तिचे राजेशाही अधिकार वापरायची. म्हणजे काय तर, कसली ना कसली व्यवस्था लावायची, सल्ले द्यायची, धोक्याच्या सूचना करायची आणि इशारे द्यायची.
गावातल्या इतर घराण्यांमधल्या कमतरतेवर बोट ठेवायची आणि त्यावरून आमचं घराणं किती भारी आहे हे दाखवण्याची एकही संधी ती सोडायची नाही. जेमला तिच्या या सवयीचा राग यायच्या ऐवजी आश्चर्यच वाटायचं: “आत्यानं जरा सांभाळून बोललं पाहिजे..थोडं जरी खोलात गेलो तरी मेकोम्बमधल्या बहुतेक सगळ्या लोकांशी आपलं नातं लागेल.”
सॅम मेरीवेदर या तरुण माणसाच्या आत्महत्येचं कारण ठासून सांगताना अलेक्झांड्रा आत्या म्हणाली, “त्यांच्या घराण्याच्या रक्तातच तसली विकृती आहे.” एखादी सोळा वर्षाची मुलगी चर्चमध्ये प्रार्थना चालू असताना खिदळली की आत्या म्हणणार, “दिसतंच आहे. पेनफील्ड घरातल्या सगळ्या बायका मुळी अशाच चंचल!” मेकोम्बमधल्या प्रत्येक माणसात असा काहीतरी अनुवांशिक गुणधर्म होता म्हणे: कोणाचं दारूचं व्यसन अनुवांशिक, कोणाचं जुगाराचं व्यसन अनुवांशिक, कोणाचा दुष्टपणा अनुवांशिक तर कोणाचा विनोदी स्वभाव.
एकदा असंच आत्यानं आम्हाला खात्रीपूर्वक सांगितलं की मिस स्टीफनी क्रॉफर्डची इतरांच्या गोष्टीत नाक खुपसायची सवय अनुवांशिक आहे. तेव्हा ॲटीकस म्हणाला, “अगं, तसाच विचार केला तर चुलतभावंडांशी लग्न न करणारी फिंच घराण्यातली आपलीच पिढी पहिली आहे. मग फिंच घराण्यात अगम्यगमन अनुवांशिक आहे असं म्हणतेस की काय?”
तर त्यावर आत्या म्हणे, “नाही. उलट त्यामुळेच आपले सगळ्यांचे हातपाय लहान लहान आहेत.”
मला तिचं अनुवंशिकतेचं खूळ कधी समजलंच नाही. माझी अशी समजूत झालेली होती की आपल्याला जी काही बुद्धी मिळालीये त्याचा चांगल्यात चांगला वापर करून घेणारी माणसं हुशार असतात. पण एखादं कुटुंब जितका जास्त काळ एखाद्या प्रदेशात तळ ठोकून असेल तितकं ते कुटुंब चांगलं असं अलेक्झांड्रा आत्याचं मत होतं आणि ती ते आडवळणानं बोलूनही दाखवत असे.
“तसं असेल तर एवेल्स चांगलेत असं म्हटलं पाहिजे,” जेम म्हणाला. बुरीस एवेल आणि त्याची भावंडं ज्या कुटुंबात जन्मली होती ते चांगलं तीन पिढ्या मेकोम्बच्या उकिरड्याच्या मागच्या बाजूला एकाच ठिकाणी तळ ठोकून होतं आणि प्रांताकडून येणाऱ्या निधीवरच त्यांच्या तीन पिढ्यांची भरभराट झाली होती.
अलेक्झांड्रा आत्याच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य होतंच म्हणा. मेकोम्ब हे गाव तसं बरंच जुनं होतं. फिंचच्या घाटाच्या पूर्वेला वीस मैल अंतरावर ते होतं. म्हणजे इतकं जुनं गाव असूनही नदीपासून बरंच आत होतं. अर्थात सिंकफिल्ड नावाच्या एका माणसानं मूर्खपणा केला नसता तर मेकोम्ब नदीकाठच्या आणखी जवळ असलं असतं. पार पूर्वीच्या काळी त्यानं फाट्यापाशी एक खानावळ चालू केली. त्या भागातली ती एकमेव खानावळ. सिंकफिल्डचा देशभक्तीशी काहीही संबंध नसल्यानं त्यानं रेड इंडियन्सना आणि बाहेरून इथे येऊन स्थायिक झालेल्यांना सारख्याच प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा पुरवला. त्याला फक्त व्यवसायाशी मतलब होता. आपण अलाबामातले आहोत का आणखी कुठले ते त्याला माहीतही नव्हतं आणि त्याची त्याला पर्वाही नव्हती. नवीनच तयार झालेला प्रांत वस्ती करण्यासाठी कसा शांत आणि निवांत आहे याची दवंडी पिटता यावी म्हणून गव्हर्नर विल्यम वायट बिब यांनी सर्वेक्षण करणारा एक गट तिथे पाठवला. नवीन प्रांताचा बरोबर मध्य काढून तिथे प्रांताचं प्रशासकीय केंद्र स्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे होतं. त्या गटातले सगळेजण सिंकफिल्डचे पाहुणे म्हणून त्याच्याकडे राहिले. त्यांनी आपल्या यजमानाला म्हणजे सिंकफिल्डला त्याची जागा मेकोम्बच्या हद्दीत येत असल्याचं सांगितलं आणि प्रशासकीय केंद्राची संभाव्य जागा दाखवली. सिंकफिल्डनं स्वतःची मालमत्ता आणि जागा राखून ठेवण्याचं धाडसी पाऊल उचललं नसतं तर मेकोम्बचं मुख्य केंद्र विन्स्टन स्वॉम्पच्या मध्यभागी झालं असतं. ती जागा तर अगदीच भकास आहे. त्याऐवजी सिंकफिल्डच्या खानावळीच्या आसपास मेकोम्बची वाढ झाली. म्हणजे त्याचं झालं असं की, एके दिवशी संध्याकाळी सिंकफिल्डनं आपल्या पाहुण्यांना बेक्कार दारू पाजली. मग त्यांना आपापले नकाशे आणि तक्ते आणायला लावले. त्यानंतर इकडून थोडं अंतर कमी करा, तिकडून थोडं वाढवा असं करत करत स्वतःच्या सोयीनुसार प्रांताचा मध्य काढून घेतला. मग दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांचे तक्ते आणि पाठीवरच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन गॅलन दारू देऊन त्यांची बोळवणही केली. गव्हर्नरसाठीही गॅलनभर दारू पाठवली.
तर अशाप्रकारे मुळात सरकारी कारणानं वसल्यामुळे मेकोम्बच्या वाट्याला अलाबामातल्या त्याच्या एवढ्या इतर गावांसारखा गलिच्छपणा आला नव्हता. सुरुवातीच्या काळात गावातल्या इमारती दणकट होत्या, न्यायालय दिमाखात उभं होतं आणि रस्ते चांगले रुंद होते. मेकोम्बमध्ये व्यावसायिक मंडळींचं प्रमाण बरंच होतं. दात काढायचा असेल, गाडी दुरुस्त करून घ्यायची असेल, हृदय तपासून घ्यायचं असेल, पैसे जमा करायचे असतील, मन ठिकाणावर आणायचं असेल, खेचराची तपासणी करून घ्यायची असेल तर लोक मेकोम्बला यायचे. मात्र सिंकफिल्डचं वागणं कितपत शहाणपणाचं होतं हा वादाचा मुद्दा होताच. त्या काळात वाहतुकीचं साधन एकच होतं. ते म्हणजे नदीतल्या बोटी. पण त्यानं मात्र हे नवीन गाव नदीपासून इतक्या आत वसवलं की प्रांताच्या उत्तरेकडून एखाद्याला काही वस्तू आणायला मेकोम्बला यायचं असेल तर दोन दिवस लागायचे. त्यामुळे शंभरेक वर्षं तरी गाव तेवढंच राहिलं. कापसाची शेतं आणि लाकूडकाम करणारे कारखाने यांच्या मधोमध वसलेल्या बेटासारखं.
अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळेस मेकोम्बकडे तसं दुर्लक्षच झालं. मात्र लष्करी राजवटीत आणि आर्थिक महामंदीच्या काळात मेकोम्बला वाढण्यावाचून पर्याय उरला नाही. त्याची ही वाढ आतल्या आत झाली. नवीन माणसं इतकी क्वचित येऊन तिथे स्थायिक व्हायची की त्याच त्याच कुटुंबातली माणसं त्याच त्याच कुटुंबांमध्ये लग्न करू लागली . पार त्या दोन्ही कुटुंबातली माणसं एकमेकांसारखी दिसायला लागेपर्यंत. मधूनच कोणीतरी माँटगोमरी किंवा मोबाईलवरून बाहेरच्या माणसाला घेऊन यायचं. पण त्यामुळे क्वचितच काही फरक पडायचा. माझ्या लहानपणी हे सगळं साधारण तसंच होतं.
मेकोम्बमध्ये जातीव्यवस्था होतीच. पण माझ्या दृष्टीनं ती अशी होती: म्हातारी माणसं आणि वर्षानुवर्षं शेजारी राहिलेली सध्याची पिढी एकमेकांना चांगलीच ओळखून होती. एकमेकांची वागण्याची पद्धत, स्वभावातले बारकावे, इतकंच काय हातवारे करायची पद्धतसुद्धा ते गृहीत धरून चालायचे. या सगळ्या गोष्टी पिढ्यान् पिढ्या चालत येऊन आणखी ठळक झाल्या होत्या. तेव्हा क्रॉफर्ड घरातलं एकजण दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसणं सोडेल तर शपथ, मेरीवॉटर घरातल्या दर दोन पिढ्यांमागे एक कोणीतरी विकृत असतोच, सगळे डेलाफिल्ड अव्वल खोटारडे आहेत, सगळे बडफोर्ड असेच चालतात असली विधानं म्हणजे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली माहिती होती: डेलाफिल्डकडून चेक घेताना आधी हळूच बँकेला फोन करून खात्री करावी , मिस मॉडी अॅटकीन्स खांदे पाडून चालते कारण माहेरून ती बडफोर्ड आहे. मिसेस ग्रेस मेरीवॉटरनं लिडिया ई. पिंकहॅमच्या जिनच्या बाटल्या उघडून त्यातली जिन चाखून बघितली तर त्यात काsही विशेष नाही.. ..तिची आईही तेच करायची.
अलेक्झांड्रा आत्या मेकोम्बमध्ये अगदी बेमालूम मिसळून गेली होती पण माझ्या आणि जेमच्या आयुष्यात मात्र तिला असं मिसळता आलं नव्हतं. ही नक्की ॲटीकस आणि जॅक काकाचीच बहीण आहे ? असा प्रश्न मला खूपदा पडायचा. इतका की, जेमनं कधीकाळी रचून सांगितलेल्या आणि आता अर्धवट आठवणाऱ्या लहानपणी अदलाबदली झालेल्या भावंडांच्या गोष्टी मला खऱ्या वाटायला लागायच्या.
ती आमच्याकडे आल्यानंतरच्या पहिल्या महिन्याभरातली ही अगदीच किरकोळ निरीक्षणं होती . तसंही जेमशी किंवा माझ्याशी बोलण्यासारखं तिच्याकडे काही नसायचं आणि आम्हीही तिला फक्त जेवायच्या वेळेस आणि रात्री झोपायला जायच्या आधी भेटायचो. उन्हाळ्याचे दिवस होते आणि आम्ही बाहेरच असायचो. अर्थात एखाद्या दुपारी पाणी प्यायला आत पळाले की मला बाहेरची खोली मेकोम्बमधल्या बायकांनी भरलेली दिसायची. त्या काहीतरी पीत, कुजबुजत, पंख्यानं वारं घेत बसलेल्या असायच्या. मग आत्या मला बोलावणं धाडायची: “जीन लुईस, ये, या सगळ्याजणी आल्यायत त्यांच्याशी बोल की.”
मी दारात येऊन उभी राहिले की मग मात्र आत्याच्या चेहऱ्यावर मला बोलावल्याचा पश्चात्ताप दिसून यायचाा. सहसा मी चिखलानं बरबटलेली किंवा वाळूनं माखलेली असायचे .
“हे बघ लीलीशी बोल. तुझी बहीण आहे ती,” एके दिवशी दुपारी असंच मला बाहेरच्या खोलीत पकडून ती म्हणाली.
“कोणाशी?” मी विचारलं.
“तुझी चुलतबहीण लिली ब्रूक,” अलेक्झांड्रा आत्या म्हणाली.
“आमची बहीण आहे ती? मला नव्हतं माहीत.”
अलेक्झांड्रा आत्या कशीबशी हसली. त्यातून लिलीची माफी मागितल्याचं दिसत होतं तशीच माझ्याबद्दलची ठाम नापसंतीही दिसत होती. लिली ब्रूक निघून गेल्यावर आता आपली काही खैर नाही असं माझ्या लक्षात आलं.
आमच्या बाबानं मला फिंच घराण्याबद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं किंवा आपल्या मुलांमध्ये घराण्याचा काहीही अभिमान पैदा केला नव्हता ही खूपच वाईट गोष्ट होती. तिनं जेमला बोलावणं धाडलं. तो दबकून माझ्याशेजारी सोफ्यावर येऊन बसला. ती खोलीतून बाहेर गेली आणि एक जांभळ्या रंगाचं वेष्टण घातलेलं पुस्तक घेऊन परत आली. त्यावर ‘जोशुआ एस. सेंट क्लेअरची प्रवचने’ असं छापलेलं होतं.
“तुमच्या एका भावानं लिहिलंय हे,” अलेक्झांड्रा आत्या म्हणाली. “फार छान माणूस होता तो.”
जेमनं त्या लहानशा पुस्तकाकडे निरखून पाहिलं. “हाच का तो जोशुआ दादा? खूप वर्षं तुरुंगात होता ना हा?”
अलेक्झांड्रा आत्यानं विचारलं, “तुला काय माहीत?”
“म्हणजे काय, ॲटीकसनं सांगितलं. विद्यापीठात शिकत असताना म्हणे तो एकदा बराच वैतागला आणि त्यानं म्हणे विद्यापीठाच्या मुख्यांनाच गोळ्या घालायचा प्रयत्न केला . नुसता उकिरडे फुंकत हिंडतो हा असं म्हणत पिस्तुलानं त्याला गोळ्या घालायला बघत होता. पण ते पिस्तुल त्याच्याच हातात फुटलं म्हणे. ॲटीकस म्हणाला की, त्याला सोडवायला घरच्यांना पाचशे डॉलर्स मोजावे लागले.. ..”
अलेक्झांड्रा आत्या आता करकोच्यासारखी ताठ झाली होती. “पुरे.. बघते मी काय करायचं ते.”
झोपायच्या आधी मी जेमच्या खोलीत पुस्तक आणायला म्हणून गेले. तेवढ्यात दारावर टकटक करून ॲटीकस आत आला. जेमच्या पलंगावर एका टोकाला बसून त्यानं मवाळपणे आमच्याकडे पाहिलं आणि तो हसला .
“अं..” असं काहीतरी म्हणत तो थोडा खाकरला. प्रत्येक शब्दागणिक तो आता खाकरणार की काय असंच वाटायला लागलं. एकदाचा हा म्हातारा व्हायला लागला असणार असंच मला वाटून गेलं . पण तो तर नेहमीसारखाच दिसत होता. “तुम्हाला कसं सांगायचं ते मला नीटसं कळत नाहीये,” त्यानं बोलायला सुरुवात केली.
“सांगून टाक ना काय ते,” जेम म्हणाला. “आम्ही काही केलंय का?”
आमचा बाबा चक्क चाचरत होता. “नाही, मला असं म्हणायचंय की.. ..म्हणजे तुमच्या अलेक्झांड्रा आत्यानंच मला सांगायला सांगितलंय तसं.. .. म्हणजे बेटा, तुला माहितेय नं की तू फिंच आहेस?”
“हो, असं म्हणतात खरं,” डोळ्याच्या कोपऱ्यातून बघत जेम म्हणाला. त्याचा आवाज चांगलाच चढला होता, “ॲटीकस, काय झालंय?”
ॲटीकसनं पायावर पाय टाकून हाताची घडी घातली. “मी तुम्हाला आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय.”
जेम आणखीनच वैतागला. “मला माहितेय ते सगळं,” तो म्हणाला.
ॲटीकस एकदम गंभीर झाला. त्याच्या त्या खास वकिली निर्विकार आवाजात तो म्हणाला: “तू आणि जीन लुईस कुठल्या साध्यासुध्या घराण्यातले नाही आहात असं तुमच्या आत्यानं मला सांगायला सांगितलंय . पिढ्यान् पिढ्या चांगलं वळण .. .. ..” ॲटीकस थांबला. मी पायावर वळवळणारा एक चपळ लाल किडा पकडायच्या मागे होते.
“चांगलं वळण असलेल्या घरात तुम्ही जन्माला आलाय ,” मी तो किडा पकडून चिरडल्यावर तो बोलायला लागला . “तुम्ही तुमच्या घराण्याच्या नावाला जागलं पाहिजे.. ..” ॲटीकस नेटानं बोलत होता: “तिनं मला सांगायला सांगितलंय की तुम्ही चांगल्या घरातल्या मुलामुलींसारखं वागलं पाहिजे. तिला आपल्या घराण्याबद्दल तुमच्याशी बोलायचंय. इतकी वर्षं मेकोम्बच्या दृष्टीनं आपल्या घराचं काय महत्त्व आहे ते तिला तुम्हाला सांगायचंय. म्हणजे आपण कोण आहोत याची जरा तुम्हाला कल्पना येईल आणि त्याला साजेसं वागावं असं तुम्हाला वाटेल.” एक आवंढा गिळत त्यानं बोलणं पूर्ण केलं.
मी आणि जेमनं थक्क होऊन एकमेकांकडे आणि मग ॲटीकसकडे पाहिलं . त्याचं शर्टाच्या कॉलरकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं दिसत होतं . आम्ही त्याच्याशी काही बोललोच नाही .
मी जेमच्या टेबलावरचा कंगवा उचलला आणि दातांच्या बाजूनं तो टेबलाच्या कडेनं फिरवायला सुरुवात केली . “आवाज बंद कर तो,” ॲटीकस म्हणाला.
त्याच्या आवाजातला तुटकपणा मला चांगलाच झोंबला. तो कंगवा अजून अर्ध्या वाटेतच होता. तेवढ्यात मी तो खाली आपटला. काहीही कारण नसताना आपल्याला रडू फुटतंय हे मला जाणवलं , पण मला ते आवरेनाच. हा माझा बाबा नव्हता. माझा बाबा कधीच असले विचार करायचा नाही. माझा बाबा कधीही असलं काही बोलायचा नाही. अलेक्झांड्रा आत्यानं काहीतरी करून त्याला असं वागायला लावलं होतं . तिकडे जेमलाही असंच एकटं वाटत असणार. तोही गोंधळून उभा असलेला डोळ्यात जमलेल्या पाण्याआडून मला दिसला. त्याचं डोकं एका बाजूला कललं होतं.
निघून जाणार तरी कुठे? पण तरीही मी निघून जायला वळले आणि समोर ॲटीकसच दिसला. त्याच्या शर्टात डोकं खुपसून मी त्या तलम निळ्या कापडामागे चाललेले बारीकसारीक आवाज ऐकत राहिले: त्याच्या घड्याळाची टिकटिक, स्टार्च केलेल्या शर्टाचा हलकासा करकर आवाज, त्याच्या श्वासाची संथ लय.
“पोटात गुरगुरतंय तुझ्या,” मी म्हणाले.
“माहितेय मला,” तो म्हणाला.
“सोडा घे जरा,”
“घेईन,” तो म्हणाला.
“ॲटीकस, हे सगळं असलं वागून फरक पडेल? म्हणजे तुला खरंच .. ..?”
डोक्याच्या मागच्या बाजूला मला त्याच्या हाताचा स्पर्श जाणवला . “कसलीही काळजी करू नकोस.” तो म्हणाला. “ही काही काळजी करत बसायची वेळ नव्हे,” हे ऐकल्यावर तो पुन्हा आमच्यात आल्याची मला खात्री पटली. माझ्या पायातली ताकद परत आली आणि मी मान वर करून विचारलं , “तुला खरंच असं वाटतंय की आम्ही तसं सगळं करावं म्हणून? फिंच घरातल्या लोकांनी कसं वागायचं असतं ते सगळं काही मला आठवत नाहीये..”
“नकोच आहे आठवायला. सोड ते.”
तो दाराशी गेला आणि दार लावत खोलीतून बाहेर पडला. जाताजाता त्यानं ते दार जवळजवळ आपटलंच होतं पण शेवटच्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं आणि ते हळूच लावून घेतलं . मी आणि जेम बघतच राहिलो. तेवढ्यात दार पुन्हा उघडलं आणि ॲटीकस आत डोकावला. त्याच्या भिवया उंचावल्या होत्या आणि चष्मा नाकावरून घसरला होता. “मी दिवसेंदिवस जोशुआ दादासारखा होत चाललोय का रे? माझ्यासाठीही घरच्यांना पाचशे डॉलर्स भरावे लागतील?”
तो काय करायचा प्रयत्न करत होता ते आता मला समजतंय, पण शेवटी ॲटीकस पडला पुरुष! असली कामं बायकाच करू जाणे !
[author]
टू किल अ मॉकिंगबर्ड ही हार्पर ली या अमेरिकन लेखिकेनं १९६० साली लिहिलेली पुलित्झर विजेती कादंबरी. कादंबरीत वर्णन येते ते १९३० च्या दशकातले. ही कथा आणि त्यात येणारी पात्रं लीच्या लहानपणाच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर बेतलेली आहेत. ती साधारण १० वर्षांची असताना अलाबामा राज्यातल्या मन्रोव्हील नावाच्या तिच्या गावात घडलेल्या एका घटनेभोवती ही कथा फिरते.
स्काऊट नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीच्या दृष्टीकोनातून आपण ही गोष्ट ऐकतो. तीसच्या दशकातली जागतिक आर्थिक महामंदी, वर्णद्वेष, बलात्कार अशा गंभीर विषयांची पार्श्वभूमी असूनही नर्मविनोदी शैलीतल्या या कादंबरीनं झपाट्यानं लोकप्रियता मिळवली आणि आधुनिक अभिजात वाङ्मयात स्थान मिळवलं.
दक्षिण अमेरिकेतल्या मेकोम्ब नावाच्या एका निवांत काल्पनिक गावातली माणसं, त्यांच्या वागण्यातले बारकावे, स्काऊट, तिचा भाऊ जेम आणि त्यांचा मित्र डील यांचे निरागस खेळ आणि निरीक्षणं, हळूहळू तो निरागसपणा संपत जाऊन त्यांना येत जाणारी समज, स्काऊट आणि जेमचा वकील बाप अॅटीकस, त्याचं आपल्या मुलांबरोबर असलेलं नातं, त्याची न्याय्यी वृत्ती, दक्षिण अमेरिकेतले गोरे शेतकरी आणि काळे मजूर ह्यांचे परस्परसंबंध, आर्थिक महामंदीची झळ बसल्यानं आलेली भयंकर गरिबी अशा कितीतरी गोष्टी या कादंबरीतून समोर येतात.
हार्पर ली या लेखिकेची ही पहिली आणि एकमेव कादंबरी. त्याचा पहिला खर्डा तिनं ‘गो सेट अ वॉचमन’ या नावानं लिहिला होता. दोन वर्षापूर्वी तिच्या निधनानंतर तो प्रकाशित करण्यात आला.
आश्लेषा गोरे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी केलेली मराठी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. वाचन, भाषाभ्यास आणि नाटक यामध्ये त्यांना रुची आहे.[/author]
[credit]
टू किल अ मॉकिंगबर्ड च्या भाषांतराचा पहिला भाग इथे वाचू शकता.
टू किल अ मॉकिंगबर्ड च्या भाषांतराचा दुसरा भाग इथे वाचू शकता.
टू किल अ मॉकिंगबर्ड च्या भाषांतराचा तिसरा भाग इथे वाचू शकता.
टू किल अ मॉकिंगबर्ड च्या भाषांतराचा चौथा भाग इथे वाचू शकता.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
