गायत्री लेले

जात-जाणिवांचा  निरंतर प्रवास



back

‘माझा अविस्मरणीय प्रवास’ असा काही विषय शाळेच्या निबंध स्पर्धेत दिल्यावर एकाच एका ठरावीक पद्धतीने तो लिहावा, अशी अपेक्षा असते. मग मुलं साधारण आपल्या गावी किंवा आजोळी केलेल्या प्रवासाचे वर्णन करतात. समजा मोठ्या माणसांना असं लिहायला सांगितलं, तर ते एखादा देशांतर्गत केलेला प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासाचे वर्णन करतील. त्या आठवणी सुखद असतात आणि सतत आठवाव्या अशा असतात. 

पण या प्रवासांमुळे माणूस म्हणून आपण बदललो का..? आधी कोणी वेगळेच होतो, आणि आता कोणी निराळे झालोय का..? याचा आपण फार विचार करतोच असं नाही. नीट पाहिलं तर शरीराचा, मनाचा आणि विचाराचा कुठलाही प्रवास आपल्यातल्या माणसाला सतत घडवत आणि बदलत असतो. कोणीतरी म्हणून ठेवलंय ना, की एक व्यक्ती कुठलीही नदी दोनदा ओलांडू शकत नाही. कारण पुढच्या वेळेस ती तिथे येते, तेव्हा पूर्णतः नवी व्यक्ती झालेली असते.

प्रवास माणसाला बदलतात ते असे. इथे मला माझ्या जातविषयक जाणीवा कशा बदलत गेल्या, आणि या  प्रवासात मला काय अनुभव येत गेले, याबद्दल बोलावेसे वाटते. या प्रक्रियेने मला बदलले, घडवले, समृद्ध केले. अजूनही ते अविरत सुरू आहे. 

मी एक सर्वार्थाने प्रिव्हिलेज्ड व्यक्ती आहे. जात, पोटजात, वर्ग, धर्म, शिक्षण, प्रदेश, सामाजिक- सांस्कृतिक-भौगोलिक परिस्थिती अशा अगदी सगळ्या बाजूंनी. आधी म्हटलेल्या सगळ्या प्रिव्हिलेजेससहित मी जर एक पुरुषही असते, तर कदाचित शंभरात शंभर गुण मिळाले असते. बाई असल्याकारणाने थोडे गुण कमी होतील कदाचित, पण त्याचेही कधी काही विशेष वाटले नाही. हाही एक प्रिव्हिलेजच. या सगळ्या प्रिव्हिलेजेसमुळे आपोआपच डोळ्यांवर एक पडदा आला होता. कॉलेजमध्ये कधी ढसाळ तर कधी चित्रे, विंदा आणि बापट, कविता महाजन वा प्रिया तेंडुलकर, गौरी देशपांडे असं काहीबाही वाचत असे. त्यामुळे आपल्यापलीकडच्या जगाशी थोडीफार ओळख होती. पण तसं वाचून आपण आपल्या सुरक्षित, उबदार जगात परत येऊ अशी खात्री नेहमीच होती. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नव्हती, डोक्यावरचं छप्पर जाणार नव्हतं. त्यामुळे वाचनातून येणारे उमाळे खऱ्या अर्थाने आतपर्यंत झिरपले नाहीत. 

मग मी राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घ्यायला मुंबई विद्यापीठात दाखल झाले. खऱ्या अर्थाने माझं जग विविधतेने नटलेलं होऊ लागलं. वेगवेगळ्या स्तरांतले, जातसमुहांतले, धर्मांतले लोक त्या ठिकाणी एकत्र शिकत होतो. आता शिक्षण एका वेगळ्या ‘सिरीयस’ लेव्हलवर गेलं होतं. शिकण्यातली मजा काय असते हे कळू लागलं होतं. 

एकदा आम्ही काही मित्र कॅंटीनमध्ये डबा खात बसलो होतो. समोरून एक विद्यार्थी भडक रंगाचा, मजेदार मजकूर लिहिलेला टी शर्ट घालून येत होता. ढसाळ आणि चित्रे वाचलेली मी या मुलाला तेव्हा फिदीफिदी हसले. म्हणाले, ‘काय हे! असे कपडे कोण घालून येतं इथे!!’ माझ्या बाजूला बसलेला माझा मित्र अजिंक्य  म्हणाला, ‘तू का हसतेस त्याला? कदाचित त्याच्याकडे असे एक-दोनच टीशर्ट्स असतील, अशी शक्यता नाहीये का?” .. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. मला माझीच लाज वाटली. हा अजिंक्यसोबतच्या पुढच्या प्रवासातला महत्वाचा क्षण होता. पुढे काही वर्षांनी आम्ही लग्न केले. 

त्याच्याशी लग्न होणं हे माझ्यासाठीचं मोठं स्थित्यंतर आहे. माझ्या अनेक कल्पना आणि जाणिवांना छेद देणारं, सतत आव्हान देणारं असं हे नातं आहे. हा माझ्यासाठी एकत्र शिकण्याचा प्रवास आहे, आणि अनेक गोष्टी ‘अनलर्न’ करण्याचाही. ते सोपं-सहज नाही. पण अशक्यही नाही. 

त्याच्या घरात मी पहिल्यांदा जेव्हा आंबेडकरांचा फोटो पाहिला, तेव्हा माझ्या मनात चरकलं होतं.  पुढचे अनेक दिवस माझ्या टिपिकल ब्राह्मणी-मध्यमवर्गीय मनाला टोचत राहिलं, की “एवढ्या आयडेंटिटी असर्शनची काय गरज आहे! त्यांना मानता, तर त्यांना खऱ्या अर्थाने वाचा आणि समजून घ्या ना!! व्यक्तिपूजा कशाला करता!!!” वगैरे.  

पण मग नंतर कळत गेलं की पुस्तकांच्या पलीकडचे आंबेडकर दलित समाजाला कळतात, जवळचे वाटतात. मग भलेही त्यांचे शब्द वाचता येत असतील वा नसतील. त्यांचे विचार कळत असतील वा नसतील. पण त्यांना ते जसे आपलेसे वाटतात, तसे मला वाटत नाहीयेत. आंबेडकर जसे त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा पाया वाटतात तसे मला वाटत नाहीत. त्यामुळे त्यांचं लिखाण वाचूनही ते मला पूर्णतः आकळत नाहीत. 

एकूणच, आंबेडकरांचं अस्तित्व दलित समाजासाठी ज्या पद्धतीने महत्त्वाचं आहे, त्याला मी रिलेट करू शकत नव्हते.  या एकूण सामाजिक-सांस्कृतिक अज्ञानातून टिपिकल कमेंट्स मारल्या जातात. हाही एक प्रकारचा पूर्वग्रह आणि गंड आहे, हे मला हळूहळू समजत गेलं. कदाचित बाहेरून बघताना आपल्याला केवळ मूर्ती, फोटो आणि उत्सव दिसतो. आतल्यांसाठी ते त्यांच्या असण्याचे आणि जगण्याचे सेलिब्रेशन असू शकते. बऱ्याच चर्चा आणि मतभेदांनंतर अशा वेगवेगळ्या शक्यता मला दिसू लागल्या.

पुन्हा, त्यांनी ‘काय केलं पाहिजे आणि काय नको’ हे मी कुठल्या अधिकाराने म्हणते आहे? मी स्वतःला (आणि पर्यायाने स्वतःच्या जातीला) उच्च समजते का? असे प्रश्न मला आपोआप पडू लागले.

त्याचा परिणाम असा झाला की आता कोणत्याही घरात आंबेडकरांचा फोटो असेल, तर मला ‘वेगळं’ असं काही वाटत नाही. माझ्या डोळ्यांना बुद्धाची मूर्ती खटकत नाही. असं असलं, तरीही मी सगळं डोळे बंद करून स्वीकारते आहे का.. तर तसंही नाही. समावेशक दृष्टी बाळगणं, पण त्याचबरोबर व्यवस्थांमधील दोष ठळक दिसणं, समजून घेता येणं आणि शोषक-अन्याय्य-अनिष्ट पद्धतींना आव्हान देत राहणं हा फार मोठा प्रवास आहे. तो कसा करता येईल याचा सखोल विचार करायला हवा.

उदाहरणार्थ, लग्न झाल्यानंतर मी कोणत्याही प्रकारची विवाहसूचक चिन्हे स्वीकारण्यास नकार दिला होता. यात नवऱ्याचे आडनाव न स्वीकारणे, मंगळसूत्र-कुंकूटिकली-जोडवी वगैरेला नकार देणे, पेहरावात बदल न करणे या सगळ्या गोष्टी मी अधिकाधिक ठामपणे अमलात आणल्या. माझ्या नवऱ्याचे वडील हे आधी पँथरमध्ये, आणि नंतर राजा ढाले यांच्या मास मूव्हमेंटमध्ये सक्रिय होते. तसेच अतिशय मृदू स्वभावाचे आणि पुरोगामी होते. (त्यांचा गेल्या वर्षी कोविडमुळे मृत्यू झाला.) त्यांना माझे म्हणणे पटत होते, आणि तो मला आधार होता. परंतु तसेच विचार घरातल्या आणि समाजातल्या इतर मंडळींचे नाहीत. हिंदू धर्म नाकारला तरी हिंदू पुरुषप्रधान पद्धती फार कोणी नाकारताना मला दिसले नाही.

त्याचदरम्यान मी सुरेश सावंत यांचा ‘धम्माकडून धर्माकडे’ हा  लेख वाचला होता. काही नवबौद्ध घरातील स्त्रिया काळ्या मण्यांऐवजी पांढरे मणी असलेले मंगळसूत्र परिधान करतात. मण्यांचे रंग बदलले तरी त्यात अभिप्रेत असलेली पुरुषप्रधानता जात नाही, अशा अर्थाचा त्यात उल्लेख होता. याशिवाय लेखात अनेक अशा नवबौद्ध  ‘प्रथांचा’ त्यांनी  समाचार घेतला आहे आणि धम्म स्वीकारताना ‘विविध प्रकारचे पुरोगामीत्व संकलित करण्याची मधमाशी वृत्ती जोपासायला हवी’ असेही म्हटले आहे.

आमच्या लग्नामुळे आंबेडकरी समाजातील अशा अनेक प्रकारच्या माणसांशी माझी प्रत्यक्ष आणि त्यांच्या लिखाणातून ओळख होत गेली- कट्टर, पुरोगामी, मध्यममार्गी, समावेशक दृष्टिकोन बाळगणारे, मवाळ,  दुराभिमानी असे अनेक प्रकारचे लोक आणि गट जसे प्रत्येक समुदायात दिसतात, तसे दलित समाजातही आहेत. मी जर कायमच ‘बाहेरची’ असते तर मला हे आंतरसंबंध आणि कलह कदाचित दिसले नसते. पण आता थोडीफार ‘आतली’ (तरीही बाहेरची) अशा काहीशा विवक्षित गटात मी मोडत असल्याने या सगळ्याशी जवळून ओळख होते आहे हे नक्की.

जे आंबेडकरांच्या फोटोचं, तेच सहा डिसेंबरच्या उत्सवाचं. माझी या उत्सवाशी पहिली ओळख झाली होती ती अकरावीत. माझी शिवाजी पार्कला राहणारी एक वर्गमैत्रिण बोलता बोलता सहज बोलून गेली, की ‘आम्ही तर या काळात तीन चार दिवस बाहेरच जातो बाई.. किती ती गर्दी, किती ती घाण, किती तो आवाज’ वगैरे. मला तेव्हा नीटसं काही कळलं नाही, कारण मी शहराच्या अगदी दुसऱ्या टोकाला राहायचे जिथे मी कधी याबद्दल ऐकले नाही. एवढं नक्की वाटलं होतं, की जसंकाही मुंबई शहर आरशासारखं लख्ख आहे, आणि या एकाच दिवशी जी काही घाण माजायची ती माजत आहे.. असे कसे होईल? पण मग तो विषय तिथेच संपला.

पुढे युनिव्हर्सिटीत असताना मी सहा डिसेंबरला शिवाजी पार्कला गेले. फिरले, पुस्तकं पाहिली, विकत घेतली. त्यावर एक छोटी फेसबुक पोस्ट लिहून काही फोटो शेअर केले. इतर कुठल्याही उत्सवात भेटणाऱ्या उत्साही माणसांप्रमाणेच इथे मला माणसे भेटली होती. इतर कुठल्याही उत्सवात असते तसे गाणे बजावणे, घोषणा वगैरे तिथे होत्या.. आणि एकत्र येण्याचा जसा आनंद लोकांना इतरवेळी होतो, तोच आनंद मला इथेही पसरलेला दिसला. शिवाय अनेक छोटी मोठी पुस्तकं मिळाली, जी इतरवेळी सहजासहजी मिळाली नसती. हे सगळे मी तिथे लिहिले होते.  गर्दीत जाऊन सगळे प्रत्यक्ष पाहिले आणि मीही त्या गर्दीचा आपोआप एक भाग झाले. 

हे माझ्या एका नातेवाईकांनी फेसबुकवर वाचलं. मग त्या आजोबांनी मला विचारलं, इतकी वर्षं मी इथे राहतोय.. तिथे पुस्तकं वगैरे मिळतात माहीत नव्हतं मला. 

..हे ऐकून वाटलं, आजोबांनी वयाचा मोठा पल्ला गाठला होता आणि अनेक प्रवास आयुष्यभर केले होते. हा एकच प्रवास राहून गेला. फक्त दोन गल्ल्या तर ओलांडायच्या होत्या. पण त्यांना तो कधी करावासा वाटला नाही.

माझ्या लिहिण्यामुळे ते हा प्रवास करतील का? मला माहीत नाही. पण आमच्या संवादातून एक खिडकी उघडल्याचा मला भास झाला, हे मात्र खरं. 

अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे, जिथेतिथे घडणाऱ्या आरक्षणावरच्या चर्चांना नेमकं कसं सामोरं जायचं हे मला काही वर्षे कळत नव्हतं. विशेषतः अशा चर्चा जेव्हा कॉलेजमधल्या माझ्या तासांमध्ये घडत असत तेव्हा बहुतेक विद्यार्थी हे आरक्षणाच्या विरोधात टोकाचा सूर लावत असत. अशा विद्यार्थ्यांची संख्या नेहमीच जास्त असते आणि त्यांच्या रेट्यापुढे इतर आवाज आपोआप दबले जातात. यात ‘आंबेडकरांनी दहा वर्षांसाठीच रिझर्वेशन मागितले होते’ ही अर्ग्युमेंट सर्वसामान्यतः पुढे केली जाते. ‘सगळेच मागासवर्गीय मागास नसतात, सगळेच ब्राह्मण श्रीमंत नसतात’ हा तसाच एक मुद्दा. “आम्हाला एवढे जास्त मार्क्स होते, पण ऍडमिशन नाही मिळाली, पण ‘त्यांना’ मात्र कितीही कमी गुण मिळोत पण ऍडमिशन फिक्स असते ” हे तर सततचं पालुपद आहे. एक शिक्षक म्हणून मला त्या गदारोळात आपली बाजू कशी मांडावी हे सुरुवातीला कळत नसे. 

हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले, की या चर्चांमध्ये दोन मुद्दे सतत समोर येत आहेत. एक म्हणजे मेरिटचा मुद्दा, आणि दुसरा म्हणजे ‘आरक्षणाचा पाया आर्थिक निकष असायला हवा’ हे जोरकसपणे मांडले जाणारे गृहीतक. अनेकांशी चर्चा केल्यावर आणि स्वतःला तपासल्यावर एक नक्की लक्षात आले की ‘मेरिट’ हे मुळात अतिशय सापेक्ष आहे. त्याची एकच एक व्याख्या करू शकत नाही. आणि परीक्षेत मिळणारे मार्क्स हे त्याचा निकष असूच शकत नाही. जर मी स्वतःला मेरिटोरियस म्हणत असेन, तर त्याला कोणते घटक कारणीभूत आहेत? त्या घटकांमध्ये माझ्यात नैसर्गिकरित्या असलेल्या ‘टॅलेंट’चे योगदान किती आहे आणि मला माझ्या जातीमुळे आणि वर्गामुळे मिळालेले पोषक वातावरण, सोशलायजेशन आणि प्रशिक्षण याचे योगदान किती आहे, या सगळ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे विचार व्हायला सुरुवात झाली. 

दुसरा मुद्दा आर्थिक निकषांचा- हा निकष मुळातच अपुरा आहे हे लक्षात येऊ लागले. व्यक्तीचे उत्तम शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती तिला जातीयतेपासून वाचवेलच असे नाही. आर्थिक समृद्धी तुम्हाला सामाजिक अधिष्ठान देईलच असे नाही. त्यामुळे वर्ग आणि जात यांना जे सहजपणे एकजीव करतात किंवा तसे करून जातीचे अथवा जातीयतेचे अस्तित्व नाकारतात, ते एकतर जाणूनबुजून ढोंग करतात किंवा त्यांना मुळात जात, वर्ग आणि लिंगभावामधल्या ताण्याबाण्यांची फारशी कल्पना नसते या निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचले. 

हे माझ्या मनात अधिकच पक्के झाले ते पायल तडवीच्या आत्महत्येनंतर. मुंबईसारख्या ‘कॉस्मोपॉलिटन’ शहरात अशाप्रकारच्या घटना सर्रास घडतात, घडू शकतात हे वाचून माझ्यातला शिक्षक हादरला. संस्थात्मक पातळीवर जातींप्रती संवेदनशील वातावरण कसे निर्माण करता येईल, दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना पोषक, समावेशक आणि सुरक्षित वातावरण  कसे देता येईल, जातीमुळे मिळालेले किंवा नाकारले गेलेले प्रिव्हिलेजेस इ. वर आणखी खुली चर्चा कशी होईल,  याबाबत मी आपोआप विचार करू लागले. 

मला याची जाणीव आहे, की मोठे बदल घडवून आणायला बराच काळ लोटेल. पण आपण आपल्या पोझिशनवरून काय करू शकतो याचा किमान विचार होणे गरजेचे आहे असे मला वाटते. कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये या सगळ्या चर्चा करण्यासाठी मुक्त व्यासपीठे असणे आणि नसली तर ती तयार करणे ही पहिली पायरी असू शकते. एक शिक्षक म्हणून यात खारीचा वाटा उचलणे मला आवश्यक वाटते. 

*

याच संदर्भात दुसरी एक गोष्ट. मी जवळजवळ पंधरा वर्षे शास्त्रीय संगीत शिकले आहे. मला स्वतःच्या कलाविषयक जाणिवा खूप समृद्ध वाटत असत. ‘शास्त्रीय संगीत म्हणजे सगळ्या प्रकारच्या संगीताचा पाया’ वगैरे धारणाही पक्क्या होत्या. बाकी लोकसंगीताशी तसा काही संबंध आला नाही. भीमगीते, विद्रोही जलसे वगैरे तर कुठे दूरदूरपर्यंतही दिसले नाहीत. मुळात शास्त्रीय संगीताच्या परीघात हे कुठे बसतच नाही. त्यामुळे ‘ते’ संगीत कधी खरं संगीत वाटलं नाही. जे थोडेफार लोक याबद्द्ल बोलायचे तेही नाक मुरडून किंवा कुचेष्टेने. मग पुढे एका वर्कशॉपला गेलेले असताना एक मुलगी भेटली जी भीमगीतांवर पीएचडी करत होती. मला तेव्हा वाटलं की, हा काय खरंच पीएचडीचा विषय होऊ शकतो का?.. मग जरा नीट शोध घेतला आणि एक नवंच जग दिसू लागलं. कदाचित ते माझ्या आजूबाजूचंच जग होतं, पण मला कधी दिसलं नव्हतं. माझ्या ‘कलेच्या’ आणि ‘सौंदर्याच्या’ व्याख्यांमध्ये भीमगीतांचे शब्द, चाली आणि सूर याआधी कधी बसले नाहीत. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. एकतर माझ्या मनावर असलेले ‘शुद्ध भाषेचे’ संस्कार. या शुद्ध आणि ब्राह्मणी भाषेच्या पलीकडे असलेलं जग आणि संगीत ? एकतर निकृष्ट किंवा कमी महत्त्वाचं आणि म्हणून सहज बेदखल करण्याजोगं.. अर्थात असं थेट कोणी बोलून दाखवलं नव्हतं. पण कळत नकळत या विचारांचा पगडा मनावर होता. दुसरे म्हणजे, ‘सुरेल संगीत’ म्हणजे काय याच्या डोक्यात बसवल्या गेलेल्या घट्ट धारणा. लोक कदाचित बेसूर गातील, पण आयुष्याचा त्यांना गवसलेला सूर मात्र ते उत्तम पकडतील, ही शक्यताच नाकारलेली. हळूहळू या धारणा बदलत गेल्या, तसा लोकसंगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. मी एका बाजूला या संगीताला खिजगणतीतही न धरणारी मंडळी आजूबाजूला आणि घरातही पाहिली होती.. आणि नंतर ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे गाणं लागल्यावर डोळ्यांत  पाणी येणारी माझ्या नवऱ्याची आजी पाहिली. माझं मन त्या अश्रूंकडे ओढलं गेलं आणि इतक्या वर्षांच्या कंडीशनिंगला सुरुंग लागू लागले.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा परीघ मला आता वेगळा दिसतो. त्यातली जातीयता, कट्टरता आणि उतरंड मला अस्वस्थ करते. आता कोणी म्हणेल, की हे तर सगळीकडे असते.. पण मला मात्र इतकी वर्षे ते नीट दिसले नव्हते आणि आता दिसायला लागल्यावर न दिसल्यासारखे मी करू शकत नव्हते. कुठल्याही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत कोण लोक सर्वाधिक संख्येने आहेत याकडे आपोआप लक्ष जाऊ लागले. बहुतेक कार्यक्रमपत्रिका पाहिल्यास नवव्द टक्के जनता ब्राह्मण असते आणि त्यातही कोकणस्थ ब्राह्मण अग्रेसर असतात. क्वचितच कोणी मुस्लिम वा दलित – बहुजन नावे दिसतात. पण ही व्यवस्था त्यांचेही यथावकाश ब्राह्मणीकरण करते. 

याबाबत मी माझ्या एका ओळखीच्या एका ब्राह्मणेतर गायिकेशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. तिने तो संवाद फारसा वाढवला नाहीच, शिवाय आपण कसे साधनेत आणि रियाजात मग्न असतो आणि इतर गोष्टी त्यासमोर फुटकळ आहेत याचे रम्य वर्णन केले.

मला अजून एक अत्यंत अस्वस्थ करणारी आणि खटकणारी गोष्ट म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. पुन्हा, ही एक अशी गोष्ट आहे जी अनेक वर्षे मला जाणवली नव्हती. परंतु हळूहळू मला या व्यवस्थेला वर्षानुवर्षे मिळालेली अधिमान्यता आणि त्याचे झालेले सामान्यीकरण लक्षात येऊ लागले. अर्थात या परिघात ती अपरिहार्यदेखील आहे, कारण लिखित ज्ञानापेक्षा मौखिक ज्ञान आणि प्रत्यक्ष तालीम यांना शास्त्रीय संगीताच्या परिघात पर्याय नाही आणि त्यामुळे गुरुची गायकी आत्मसात करण्यासाठी त्या व्यक्तीचा सहवास लाभणे महत्त्वाचे असते. हे सगळे मुद्दे मला मान्य आहेत. यामुळे शिष्य घडतात आणि नावारूपाला येतात हेही मी पाहिले असले तरीही इथेच होणारी लोकांची घुसमट आणि त्यांना पडणाऱ्या मर्यादाही ध्यानात येऊ लागल्या. गुरुप्रतीच्या या आदराचे सार्वजनिक प्रदर्शनही सतत करावे लागते. जसे, प्रत्येकवेळी गुरुचे नाव घेताना कानाला हात लावणे, सगळीकडे गुरूंच्या पायाला हात लावून नमस्कार करणे, कार्यक्रमात सादर करणाऱ्या कलाकाराचे गुरु कोण आहेत याला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व या गोष्टी प्रकर्षाने ध्यानात येऊ लागल्या. अनेक क्लासेसमध्ये गुरूंना फक्त ब्राह्मण शिष्य आहेत हेही लक्षात यायला लागले. ही गुरु शिष्य-परंपरा फक्त जुन्या पिढीतच आहे असे नाही. अगदी तरुण कलाकारसुद्धा स्वतःला गुरु म्हणवून घेतात आणि तीच उतरंड पुढे चालवतात. तरुण कलाकार जेव्हा वर उल्लेखलेले सगळे सिम्बॉल्स तसेच्या तसे अमलात आणताना दिसतात तेव्हा माझे मन अधिकच अस्वस्थ होते. या परिघातील कलाकार कलेच्या बाबतीत वेगवेगळे स्तुत्य प्रयोग करत असतात. पण कलेच्या भोवती जी जात, धर्म आणि संस्कृतीची पक्की तटबंदी उभी केलेली आहे ती फोडायला सबळ तरुण हात हवेत. ते मला सद्यस्थितीत दिसत नाहीत. 

या सर्व कारणांमुळे मी आपोआपच या व्यवस्थेपासून दूर झाले. हे ठरवून नाही, तर अगदी नैसर्गिकरित्या घडले, ज्याचा मला बराच क्लेशही झाला.

हल्लीच मला यावर एक उत्तर मिळाले. माझे या कलेवर प्रेम उरले नाही का? तर तसं नाहीये. अजूनही मी गाणं म्हणते, आणि तीच गाणी गाते जी लहानपणापासून शिकले आहे. या संगीतप्रकाराशी मला काही प्रॉब्लेम नाही, पण तिच्याभोवती निर्माण केल्या गेलेल्या व्यवस्थेशी आहे.  स्वत्व आणि सन्मान राखून पुन्हा एकदा या व्यवस्थेशी जोडून घेता येईल का?.. मला आत्ता हे माहीत नाही. पण त्यादृष्टीने प्रवास कसा करावा, याविषयी मनात विचार सुरु आहे.

माझ्या जातजाणिवा विकसित होत जाण्याच्या प्रवासातले हे काही टप्पे. मी वारंवार म्हटल्याप्रमाणे, हा प्रवास निरंतर सुरु राहील. कधी त्रास होईल, कधी स्वतःला दुरुस्त करावं लागेल. पण एकदा डोळे उघडले की ते झाकून घेणं अशक्य आहे, हे मात्र आता पक्कं कळलं आहे. पुढची वाट धूसर आहे, त्यावर खाचखळगे आहेत. पण तरीही त्यावर चालायचे आहे हे नक्की.

[/credit]

[/credit]

गायत्री लेले मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र विषयात पी. एचडी. प्राप्त केली असून लिखाण, शास्त्रीय संगीत आणि कवितेची त्यांना आवड आहे.

5 comments on “जात-जाणिवांचा निरंतर प्रवास: गायत्री लेले

  1. प्रा. रामचंद्र गायकवाड

    लेख वाचनीय आणि जाणिवा समृद्ध करणारा आहे

    Reply
  2. Prabuddha Maske

    जात वर्गाचे विशेषधिकार व जाणीवा तोडून केलेला प्रवास प्रेरणादायी व महत्वाचा आहे..

    Reply
  3. दा.गो.काळे

    हा लेख खूपच महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण जाणीवांमधून विकसीत झालेल्या सुंदर मनाचा आहे.हा वरपांगी अनुभवांचा सार नाही.हा त्या व्यक्तीसहित समाज मनापर्यंत झालेला प्रवास आहे.आपण आतबाहेर वेगवेगळी बोलणारी माणसंही पाहिली आहेत.बाहेर समाजाभिमुखता दाखवणारी आत आपली सनातनता न सोडणारी.आपण मेरिटचा विचार करताना,आर्थिक निकषांना समोर जातांना कधी त्यांच्या शैक्षणिक वयाचा विचार करतो का?अनुसूचीत जाती जमातीचा विचार करताना १९५६ हा त्यांच्या अस्मितांचा जन्म आहे.त्यांच्या स्वप्नांचा उमेदींचा काळ लक्षात घेतला तर आजचे शैक्षणिक विकासाचे वय फक्त २०/२५ च्या वर जात नाही.गायत्रीताई खूप चांगला प्रवास उपलब्ध करून दिलात.धन्यवाद.आशुतोष तुम्ही आम्हास खूप चांगल्या विषयांकडे घेऊन जाता.तुम्हाला कीती धन्यवाद देऊ ?
    आपला आभारी आहे.
    दा.गो.काळे

    Reply
  4. Sandhya Shirish Shetye

    खूप छान प्रवास वर्णन. आतापर्यंत घोड्याच्या डोळ्यावर जशी झापड बांधलेली असते तशी माझ्याही डोळ्यावर सापड बांधलेली होती ती दूर करण्याची मदत तुमच्या लेखाने झाली. आता नजरेचा परीघ वाढला.
    खूप धन्यवाद 🙏🏽

    Reply
  5. Piyush Todkar

    खूप सुंदर. जात, वर्गीय विशेषाधिकारांपासून तोडून घेत माणसाची अशीच मानुषी वाटचाल घडत राहो. या प्रवासात सगळ्यांना हे वास्तव कळतच जातं, कमीअधिक प्रमाणात अनुभव सारखेच असतात. आपण हे सगळं खूप छान गुंफलं. प्रेरणादायी!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *