हे कसलं वर्तमान कोसळलं अंगावर
आपणच आपली काढावी आठवण
तर काहीच आठवत नाही आपल्याबद्दल
रडू येतं पण रडता येत नाही
नपुंसक दिवस आलेयत वाट्याला
आपला चेहरा एवढा धुळीने माखलाय
की कुणीच आपल्याला ओळखत नाहीय
त्यात पाणीही नाही कुठेही निर्मळ
हा चेहरा स्वच्छ धुवून काढण्यासाठी
सगळं पाणीच गढूळ होऊन वाहतंय सगळीकडे
हे कसलं वर्तमान कोसळलंय अंगावर
झाडं उन्मळून पडावीत तसं उन्मळून पडलोय जमिनीवर
पानगळीचा शाप होताच तो आणखीनच वाढत चाललाय
डोळे लावून बसलो होतो आकाशाकडे
वाटलं की आपले हात पोहोचतील पार आभाळापर्यंत
तर आभाळच पांगलंय डोक्यावरून
फुलपाखरांशी हितगुज करायचं स्वप्न होतं
नदीशी, वाऱ्याशी, उजेडाशी मैत्री करून
कात गळून पडावी तसं द्यायचं होतं टाकून
विषुववृत्तावरचं हे अविरत कोसळणं
नि जायचं होतं निघून कायमच अद्भुत अश्या रम्य प्रदेशात
पण वाऱ्यानेही पाठ फिरविली आहे कायमची
आता तर ढगही पांगलेयत
मातीनेही हात काढून घेतला उशाखालून
आणि डोळे पार गारगोट्या होऊन चाललेयत
फास आवळला जातोय गळ्याभोवती काळोखाचा
कुणाला हाक मारावी असं कुणीच उरलं नाहीय
एकटं एकटं एकांत पीत उन्हाळा गोड मानून
जगून झालेल्या कैक दिवसातील
लघुत्तम काळ पकडू पाहतोय
एकट्यानेच ह्या निसरड्या काळात
वेड्यांच्या डोळ्यांत स्वप्नं फुलावीत
असं काहीच नाहीय या विराण पृथ्वीवर
आता वेडा होऊन तरी काय उपयोग
आणि मित्र तर दव दवा दारू मौज मज्या मस्ती
यात गुरफटून डोळे मिटून चाखताहेत फळं उजेडाची
आता तर शेवाळंही पसरत चाललंय हृदयावर
कशाला स्वप्नं पडतील फुलपाखरांची
नाहीतर त्या मोहक पिवळसर फुलांची
खूप रडावं वाटतं
संध्याकाळी एकांत खायला उठल्यावर
पण रडू येत नाही काही केल्या
ह्या मरणप्राय निबिड अरण्यात
***
दृष्टीभ्रम
काळोखाची त्वचा गळून पडत नाही तोवर
तुझ्या डोळ्यांना समुद्र दिसणार नाही
हे माहीत असूनही तू किती वेळा
या पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहणार आहेस
चंद्र आणि चांदणं स्वप्नात पाहिलंय
त्यालाही आता खूप काळ लोटला आहे
पाण्याने कात टाकली तेही खूप जुनं झालं आहे
हातात वाळू घेऊन काळ मोजता येत नाही
वाऱ्याला धुमकेतू फुटले आहेत आणि दाराबाहेर
उल्कापात होत आहे कधीपासून
रस्त्यावर फुलांचा सडा नाही स्वप्नांचं रक्त
ओघळून चाललं आहे ते तुला दिसत नाही
एकच तर हृदय आहे पाण्याकडे
जे मिळालंय त्याला पृथ्वीकडून
किती लोकांना वाटून देशील
ते काय तीळ आहे जो खाता येईल वाटून
सगळ्यांनी या अग्नीवर्षावात
पांघरूण म्हणून ही जी त्वचा तू ओढून
घेतली आहेस तुझ्या व्याधीग्रस्त देहावर
ती तर पिसाट वाऱ्याने केव्हाच उडवून टाकली आहे
आता हा देह म्हणजे केवळ स्वप्नांची कबर
तिच्यावर कुणीही फुलं माळत नाहीत
तुला आकाशापलीकडंच काहीच दिसत नाही
जवळचं पाहायचं म्हटलं तर दृष्टीभ्रम झालाय तुला
वाक्यामागून वाक्य बोलतोय तरी एकही ओळ
पूर्ण होत नाही या मातीवर
तुला ह्या काळाची बखर लिहून अमर व्हायचं आहे
पण तुला कोण सांगेल की तुझे कान काळाचे
षटकोन झाले आहेत केव्हाचेच
उद्या सकाळ होईल किंवा नाही
हे आताच काही सांगता येणार नाही
पण तुझी सगळी स्वप्नं उन्हाच्या तहानेत
विरघळून चालली आहेत नि गुलाब
पारवे होऊन उडून जात आहेत समुद्रापार
तू जे म्हणाला होतास
समुद्र हा हजारो नद्यांचा प्रियकर आहे
नि वाळू ही प्रेमभंगाचं विराट दु:ख
हे सगळं अव्याकृत आहे
दृष्टांतच सांगायचा झाला हत्तीचा
तर त्याला आंधळ्याच्या स्पर्शाची गरज नाही
तुला दृष्टीभ्रम झाला आहे
***
एक दिवस
एक दिवस जेव्हा मी परतून येईन तुमच्यात
तेव्हा मी मी नसेन
मी एक सुखाचा ढग असेन
जो तुम्ही हातावर धरला की त्याचं फुलपाखरू होऊन
तुम्ही उडू लागाल जंगलाच्या अंगणात
रंग तर असे येतील उडून तुमच्या सभोवती
की तुमच्या अंगणातलं झाड न्हावून निघेल रंगीबेरंगी फुलांनी
तुम्ही मला ओळखणार नाही
की मी तोच आहे की आणखी दुसराच कुणीतरी
तुम्ही आश्चर्याने पाहत राहाल माझ्याकडे
माझे पाय उलटे तर नाहीत ना भूतासारखे
याची खात्री करण्यासाठी तुम्ही मला कुंपणाबाहेर ठेवाल
मी एक मुक्त गाणं गाईन
जे गाण्यासाठी मी धडपडत होतो आयुष्यभर
तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही
मीच माझ्या ओठांना शिवून टाकलं होतं दगडाच्या सुतानं
मी हातून नदी काढून दाखवीन
खिश्यातून रुमाल काढून त्यातून आग निर्माण करीन
एखाद्या अतृप्त माणसाच्या आत शिरून त्याच्या
अपूर्ण इच्छांच्या वाळलेल्या झाडाला फळाफुलांनी
टाकेन लदबदून
तुम्ही म्हणजे माझ्या अपूर्ण असलेल्या कवितेतील
तगमगत असलेले निष्पाप मूल
हे मला मरण वाटेवर कळलेलं सत्य आहे
मी आजवर काहीच करू शकलो नाही तुमच्यासाठी
पण मरणापूर्वी काही नाही तरी
थोडीशी ऊब देईल तुमच्या देहाला
शेवटी तुमच्याकडे माझं परतून येणं
हे म्हणजे तुमच्या माझ्यातील आटलेली नदी
पुन्हा जमिनीतून वर येऊन
खळखळ वाहण्यासारखं असेल
एक दिवस मी येईन परतून तुमच्याकडे
देव नाही देवदूत नाही राक्षसही नाही
तुमच्यातील एक सामान्य मासा बनून येईन
नि तुमचं गढूळ पाणी निर्मळ करीत राहीन
***
काळाचं होकायंत्र
कुठल्या दगडाला स्पर्श केला म्हणून
हृदयाला जखम झाली
नि सडत चाललंय सगळं शरीर
वाऱ्याला फुलं फुलवीत असं स्वप्न पाहत होतो रात्रंदिवस
तर काटे उमलून आले आहेत वाऱ्याच्या देहावर
जमिनीत प्रेमाचं बी पेरत होतो दर हंगामात
पण ऋतूच असे नपुंसक येत गेले
की सगळी जमीन नापीक होत गेली
आणि द्वेषाने फुलून गेले आहे अख्ख आसमंत
मला नको असलेलं हिंसेचं गाणं
गाताहेत लोकं या आर्ययुगात
कुठे आहे ते करुणेचं निरामय पाणी
ज्यानं स्वच्छ धुवून टाकलं असतं
आकाशाचं अंत:करण
शांतपणे वाहणाऱ्या पाण्यात
कोण दगड टाकत गेले
की आभाळालाच तडे गेले आहेत
भयंकर वेग घेतला आहे पृथ्वीनं
तिच्या वावटळीत उन्मळून पडलो आहे मी
माती माती राहिली नाही
पाणी तर केव्हाच गढूळ होऊन
वाहते आहे सगळीकडे
प्रेमाचं द्वेषात रूपांतर होऊन
उभं केलंय तुम्ही मला काटेरी वाळवंटात
आणि वाट पाहत आहात माझ्या मरणाची
अमृताच्या वर्षावासाठी
डोळे मिटून बसलो होतो मी
रुणुझुणु वारा वाहत राहील असं स्वप्न पाहत
तर कसला रोग जडला आहे माझ्या डोळ्यांना
की गुलबकावलीच्या फुलांनीही डोळे येताहेत
त्या सर्वहारा सूर्याचे
परिस्थिती एवढी हातघाईवर आली असताना
दुःखाशी दोन हात करायचे सोडून
कशासाठी मी समाधिस्थ होऊ पाहतोय
अजूनही निराश झालो नाही मी
पण हतबल करून टाकलंय मला माझ्याच जंगलाने
माझी जीभच छाटून टाकली आहे
तरीही निरागस मुलं तळमळताहेत
माझ्या आतमध्ये सुटकेसाठी
काळाचं होकायंत्रच बिघडलं आहे
त्यात तुम्हाला तरी कसा दोष देऊ?
माझ्यातला चिरवेदनेचा दिवा तेवढा
अखंड फडफडत राहो
अशी प्रार्थना करीत बसलो आहे
या काळोख्या गुहेतील मरण शांततेत
***
रहस्य
किती साध्या साध्या स्पर्शांनी
रोमांचित होत राहतो आपण
देहाचा स्पर्श असो की झाडांचा
किंवा फुलांचा मातीचा
पाण्याच्या स्पर्शात तर दडून असतं प्रेम पृथ्वीचं
मोरपीस असेल वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
कोमल स्पर्श असेल हातांचा आसुसलेल्या ओठांचा
वा परीसस्पर्श असेल एखाद्या देहाचा
स्पर्शामध्ये जणू चंद्राचं शीतल हृदयच
बर्फाची चादर होऊन प्रतिक्षा करत असते आपली
किती किती पवित्र असतात स्पर्श सगळे
किती तलम असतात स्पर्श सुखावणारे
परीच्या वा फुलपाखराच्या पंखाहून
अद्भुत असतात अंत:करणाचे स्पर्श
ज्याचे हात स्पर्श करतात पृथ्वीच्या पायांना
त्याच्या देहातून तर स्वर्गीय सुख
ओतप्रोत भरून वाहत राहते रात्रंदिवस
स्पर्श नष्ट होत नाहीत की जाळून करता येतात खाक
स्पर्श तर मृत्युच्या अखेरपर्यंत तगमगत असतात
प्रेयसीच्या डोळ्यात
जमिनीच्या आत दडून असलेल्या झऱ्याच्या स्वप्नांना
चुकूनही स्पर्श केला कुणी तहानेनं व्याकूळ झालेल्या माणसाने
तर त्याला कळून येईल की
तहानेतूनच जन्म घेत असते निरागस पाणी
मला स्पर्श आवडतातपण तू म्हणते तसे नाही
मला आवडतात अस्पृश्य स्पर्श
किती रानवट असतात सगळे
अस्पृश्य स्पर्शात आग असते निद्रिस्त
गोठून असतो रंग लालभडक पळसफुलांचा
सूर्याच्या डोळ्यातील धगधगता जाळ तर
कायमच अस्पृश्य असतो डोंगरदऱ्यातील काजव्यांना
कुणालाही सांगायचं नव्हतं मला कधीही
दगडाखाली गवसलेलं अस्पृश्य स्पर्शाचं रहस्य
पण तू आता शुक्राची चांदणी मावळत असताना
विचारते आहेस म्हणून सांगतो
अधीर होऊन जेव्हा मी पृथ्वीच्या ओठांचं चुंबन घेतलं
तर एकाएकी तुझे ओठ विष झाले सकळ
आणि मी वैशाख वणव्यात बहरलेला पळस
शेवटी अस्पृश्य स्पर्शाचंही रहस्य असते
कोमल स्पर्शाहून अगदी कठोर
जे मला कळून चुकलेलं आहे या कठीण कटीबंधात
त्यात तू तर स्पर्शांचे ढगही
वाळवत टाकले आकाशाच्या अंगणात
***
अज्ञातवास
या अज्ञातवासात माझा मलाच
मी ओळखू येत नाहीय
कधी संपणार हा अज्ञातवास?
पाण्याची करुणा आटली
काळोखाला डोळे फुटले
जमिनीतून उगवताहेत रक्ताची धारदार पाती
किती देह बदलून
वावरू एकट्यानेच मी या पृथ्वीवर
माणसं अशी आकाशासाठी हपापलेली
सगळीच्या सगळी आमराई लुटत चालले आहेत
मला वाटलं हा अज्ञातवास संपून जाईल एकदाचा
नव्यानं परतून जाईन मी पाण्याकडे
तर मध्यात हा राक्षस उभा आहे काळोखाचा
दिवस उजाडला की
मी उन्हातान्हात जीव रमवू पाहतोय
अशात अंगावरचे वस्त्रही विरून चालले आहे
असा कोणता गुन्हा केलाय मी
की माझीच माझ्यापासून ताटातूट झाली आहे
या अज्ञातपर्वाला दार नाही
किती दिवस झालेत लख्ख चांदणं पाहून
रडू येतंय मला माझ्याच अनैतिक कृत्याबद्दल
रातकिड्यांनी सगळ्या जंगलात आक्रोश चालविला आहे
काजव्यातून उजेडाऐवजी अंधाराच्या लाटा फुटत राहतात
वारा दु:खाने व्याकूळ होऊन माझ्या कुशीत झोपू पाहतोय
त्यात चंद्राची पानगळ होऊ लागली आहे
अशावेळी मी कुणाकुणाचं सांत्वन करू
पृथ्वीला डोळे फुटतील एक दिवस
तेव्हा तरी माझा हा अज्ञातवास संपून जाईल
या आशेवर मी माझाच चेहरा ओंजळीत घेऊन
या अंतिम पर्वाच्या पायथ्याशी येऊन थबकलो आहे
***
सर तुमचा टी सी आॅफिसचा व्याप पहिला
आणि ही कवीता ही वाचली
सगंळ अदभुत वाटतय …..
कवितेतील सहजता आणि अनुभवातील गहनता सरळ भीडते अंतरंगात.आवाका खूप मोठा आहे तुमचा.अशाच सुंदरतेचे आकाश तुमच्या कवितेतून सदा उमटत राहो.मंगल कामना साहेब.नव्या कोर्या संग्रहासाठी हार्दिक शुभेच्छा !
कवितेतील सहजता आणि अनुभवातील गहनता सरळ भीडते अंतरंगात.आवाका खूप मोठा आहे तुमचा.अशाच सुंदरतेचे आकाश तुमच्या कवितेतून सदा उमटत राहो.मंगल कामना साहेब.नव्या कोर्या संग्रहासाठी हार्दिक शुभेच्छा !
उत्कृष्ट कविता.