दत्ता पाटील

हरवलेली लय आणि गमावलेले भान



back

नाशिक जिल्ह्यातील चांदवडपासून अठरा किलोमीटरवर पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत खेडेगाव असलेलं आणि जागतिकीकरणानंतर शहरी जगण्याचे विविध तुकडे गावात आणून आज मोठ्या शहरी खेड्यात रूपांतरीत झालेलं एक गाव चौपदरी हायवेला खेटून वसलंय. त्या गावात साधारण सातशे वर्षं ‘कलगीतुरा’ ही लोककला परंपरा जिवंत होती. सबंध परिसरात हे गाव कलगीतुऱ्यासाठी म्हणून प्रसिद्ध होतं. गावात कलगीवाले आणि तुरेवाले हे दोन संप्रदाय होते. कलगी म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे शिव. रात्ररात्र हा खेळ चाले. सायंकाळच्या वेळी गावातल्या कुणा ग्रामस्थाचं निधन झालं, तर रात्री अंत्यविधी न करता सकाळी केला जाई. मग अशा वेळी त्या कुटुंबाला, नातलगांना रात्रभर ‘सोबत’ करण्यासाठी कलगीतुरेवाली मंडळी त्या घराच्या अंगणात वा शिवारात  जमायची आणि त्या शोकाला शक्ती नि भक्तीमय कवनांची उंच लकेरीत गडद अध्यात्मिक लय द्यायची. साधारण सारा देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर असताना आणि टीव्हीच्या आभाळभर सोडलेल्या लहरी पकडण्यासाठी गावातली तरूण आणि मध्यमवयीन सुशिक्षित मंडळी आपापल्या छतावरील अँटीना अधिकाधिक उंच नेण्यात व्यग्र होऊ लागल्याच्या सुमारास कलगीतुरेवाली मंडळी थकून संपू लागली होती. त्यांच्याकडील कवनांच्या हस्तलिखितांची बाडं अडगळीत जाऊ लागली होती. टीव्ही आणि नव्या रंगीत बाजारू संस्कृतीला जागा देण्यासाठी घरातील वापरत्या वस्तू आणि परंपरा अडगळीत टाकण्याचं काम वेगानं चालू झालं. धुगधुगी असलेली कलगीतुरा परंपरा अखेरीस तीस वर्षांपूर्वी संपली. तेव्हा साठ सत्तरीत असलेली माणसंही गेली. शेती आणि कुटुंबसंस्थेत विखंडीकरण आलं. व्यापार आला. नव्या पिढीच्या हाती पैसा येऊ लागला, किंवा पैसा मिळवण्यासाठी नंतरची पिढी सतत व्यग्र राहू लागली. शहरी- भौतिक जगण्याच्या ओढीतून मातीची घरं काँक्रीटनं पोचारली जाऊ लागली. कलगी अथवा जागरणगोंधळाच्या उंच लकेरींच्या अप्रतिम समूहगदारोळात गावच्या गल्लीगल्लीतून माणसांत येऊन मजेत फिरणारे देव रथयात्रेनंतर आणि बाबरी पतनानंतर पुन्हा देवरूपात जाऊन नव्या माणसांनी; नव्याने उभारलेल्या; नवनवीन रंगीत मंदिरांमध्ये जाऊन बसले ! कलगीतुरा बंद झाल्याचंही कुणाला कळलं नाही. पण पाच वर्षांपूर्वी चमत्कार म्हणावा अशी घटना घडली. जी जी घराणी या कलगीतुरा लोकपरंपरेत होती, तेथील नव्या शेतकरी पिढीनं स्थिरस्थावर होता होता चाळिशी ओलांडली आणि त्यातील एकानं स्वत:च्याच घरातील अडगळ काढत कलगीच्या कवनांची जीर्ण हस्तलिखितं शोधून काढली. धूळ झटकत त्या त्या घराण्यातील समवयस्कांना गोळा केलं आणि ठरवलं की, तीस वर्षांपूर्वी नष्ट झालेली ही गावाची कलापरंपरा पुन्हा सुरू करायची! आपापल्या शेती व्यवसायात कमालीचे व्यग्र झालेले असताना, हवं ते पुरेसं स्थैर्य प्राप्त झालेलं असताना आणि त्यानंतर आलेली संगणक युगातील नवी पिढी कमालीची बदललेली असताना, हे उत्खनन का करावसं वाटलं असेल त्यांना? या परंपरेतून त्यांना पैसा नकोय, प्रसिद्धी नकोय, किंवा काहीच हेतू नसताना दिवसभराची कामं आवरून सायंकाळी ही जीर्ण बाडं घेऊन लोप पावलेल्या चाली कधी बाहेर तर कधी आपल्याच पेशीतून शोधत ढोलकी, तुणतुणे,  खंजिरी, दिमडी घेऊन सिमेंट काँक्रीटच्या एखाद्या ओट्यावर बसून घरात सुरू असलेल्या रंगीत टीव्हीच्या आवाजावर मात करीत २०१२-१३ या अतिशय आधुनिक काळात आपली लकेर पूर्वसुरींपर्यंत पोहोचवण्याचा हा अट्टाहास नेमका आहे काय? ही परंपरा पुन्हा सुरू झाली आणि रात्री-अपरात्री निधन झालेल्या गावकर्‍याच्या घराला, नातलगांना, स्नेह्यांना ती रात्र जागून काढण्यासाठी, ती रात्र भरभर पुढे जाऊन उजेड पडून अंत्यविधीपर्यंत सत्वर पोहोचण्यासाठी पुन्हा एक लय मिळाली. कलापरंपरांचं पुनरुत्थान करताना त्यांना नव्या संदर्भांसह पुढे घेऊन जाणं आणि जगण्याच्या लयीसाठी त्या परंपरांचा प्रसार करणं, हे ग्रामीण भागातील नव्वदोत्तर पिढीला कळतंय, ही फार महत्त्वाची सकारात्मक घटना आहे. कारण विचार करताना लक्षात येतंय की, आजच्या कमालीच्या शकलीकरणाच्या, भौतिक–वैचारिक भुलभुलैय्याच्या काळात जगण्याची लय हरवलीये. आणि या उत्खननातून ती शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वरील ही केवळ एक घटना उदाहरणादाखल. नव्वद, दोन हजार आणि दोन हजार दहा या दशकात ज्या काही उलथापालथी झाल्यात अथवा सुरू आहेत, त्यात मराठी नाटकाचंही नेमकं काय झालं, किंवा काय चालू आहे, याचा विचार करता नव्वदोत्तर काळात नाटक लिहिणार्‍यार्‍या पिढीमध्ये ते वरवर मान्य करत असतील वा नसतील तरी वैचारिक गुंतागुंतीतून, अनाकलनीय गतीनं बदलणार्‍या बाह्य स्थितीतून निर्माण झालेली जटीलता त्यांच्यात व्यापून राहिलेली आहे. चित्रपट, टीव्ही वाहिन्यांनी, समाजमाध्यमांनी, इंटरनेटच्या जाळ्यानं एकुणातच बळकावलेल्या अवकाशात संवेदनशीलतेनं विचारपूर्वक ‘जागतिक’ नाटक लिहिणं ही नाट्यलेखकांच्या दृष्टीनं अतिशय आव्हानात्मक बाब झाली आहे. या गदारोळात काही नाटककार परंपरागत कन्फर्ट लयीशी स्वत:चं लेखन बेमालूम कारागिरीतून साकारत जोडून घेतात, तर फार थोडे समकालातील अस्वस्थतेशी जोडून घेत, अवगत असलेल्या परंपरागत लयीचा कन्फर्ट झोन आपल्या कलाकृतीतून झुगारत भाष्य करीत राहतात. 

आपण रंगभूमी म्हणून जी गोष्ट सातत्यानं बोलत असतो, ती पुणे, मुंबई थोडंफार नाशिक या परिघापुरती गृहीत असते. बरेच नाट्यलेखक या शहरांमध्ये राहाणारे असून, ते मांडत असलेल्या नाटक नावाच्या गोष्टींमधून समकाल कितीही आक्रमकपणे किंवा धाडसाने किंवा प्रांजळपणे ते मांडत असले, तरी त्यांना संहितेतून त्यांना हवी असलेली ‘गोष्ट नीट सांगण्याची’ पद्धत नीट अवगत झालेली नाही, असं आवर्जून वाटतं. गोष्ट सांगण्याची पारंपरिक किंवा नियमानं बांधील अशी कोणतीही पद्धत नसली, तरी ती सांगण्याची नवीन पद्धत तयार करण्याचं धाडस फारच थोड्या कलाकृतीतून दिसतं. पारंपरिक अडगळीतील लय अंगीकारणं, या कृतीकडे केवळ रोमँटीसिजम म्हणून हिणकसपणे न बघता त्यातून आपल्याला गवसलेली नवी समकालीन गोष्ट किंवा जुनी प्राचीन; पण समकालाला सहज भिडणारा प्रवाह निसर्गत: घेऊन आलेली गोष्ट मांडली, तर संज्ञापनातील अडथळे दूर होऊ शकतील, असं  वाटतं. नक्की माहीत नाही, पण नव्वदपूर्व काळ हा तत्कालीन नाट्यलेखकांसाठी ‘नाटककार’ म्हणून साधारण पुढील काही दशके स्थिरावण्याचा, प्रस्थापित होण्याचा काळ होता. नव्वदोत्तर लेखकांच्या पिढीमध्ये हा प्रस्थापित होण्याचा रोमँटिक विचार नसेलच, असं अजिबात नाही. परंतु बदलत्या राजकीय, सामाजिक आणि एकूणच जागतिकीकरणानंतर भौतिक साधनांचं बोट धरून आलेल्या गुंतागुंतीच्या वैचारिक लाटेनं नव्वदोत्तर नाट्यलेखकांच्या वैचारिक शकलीकरणाला सुरुवात झाली. एव्हाना विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’नं, सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’नं, महेश एलकुंचवारांच्या ‘युगान्त’नं, नंतर जयंत पवारांच्या ‘अधांतर’नं पुढील काही दशकांचा नाट्यलेखनाचा रस्ता कसा असेल आणि त्याला मिळणारा नाट्यगृहापलीकडचा प्रतिसाद कसा असेल, हे जणू अधोरेखित करून ठेवलंच होतं! त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली. नव्वदोत्तर नाट्यलेखकांना समकालाशी भिडण्याचं चिंतनशील भान आणि बळही मिळालं. पुण्यामुंबईत राहणार्‍या या नव्वदोत्तर नवीन लेखकांना त्यांच्या त्यांच्या होडीसह या नव्या उसळत्या समुद्रात ढकलताना काठावर साक्षात ही सर्व ज्येष्ठ मंडळी खमकेपणानं उभी राहिली, ही बाब फार  महत्त्वाची. (हे भाग्य या शहराबाहेरील गावाकडच्या नाट्यलेखकांना मिळालं नाही. किंवा गावाकडे, छोट्या शहराकडे नवे नाट्यलेखक काय विचार करताहेत, याकडेही कथित मुख्य प्रवाहाचं लक्ष फार नव्हतं, हा भाग वेगळा.) ही कृती करताना नव्या लेखकांनी ‘प्रस्थापित’ होण्याचा रोमँटीसिझम जराही बाळगू नये, ही अपेक्षा या थोर लेखकांची होती. कारण हे स्वप्न पाहण्याची चैन येथून पुढच्या कमालीच्या गतिमान व नव्या भासणार्‍या गदारोळपूर्ण जगात कोणालाही परवडणारी नसेल, हे त्यांना माहीत असावं. मग नव्या लेखकांच्या या पिढीपैकी काहींनी बंडखोर सुरुवात करत पुढे मात्र प्रेक्षकानुनयी प्रवाह निवडला. अर्थात, ते गैर आहे असं अजिबात नाही. कारण सिनेमांचा भडीमार, टीव्हीची शेकडो चॅनल्स आणि सर्व काही एका क्लिकवर देणारं इंटरनेट या  करमणुकीच्या कोलाहलात मराठी नाटकापर्यंत खेचून आणणारे नवे प्रेक्षक ‘तयार’ करणं हेही त्यांना आवश्यक वाटलं. नाटकनिर्मिती हा अपवाद वगळता, व्यवसायाचा भाग राहिलेला नाही. नाटकं व्यवसाय करतात. पण नाटक करणं हा सरसकट व्यवसाय राहिलेला नाही. सध्या तरी नाटक ही बघणार्‍यांपेक्षा ते करणार्‍यांची तीव्र निकड झालीये, असं चित्र दिसतंय. बघणारा वर्ग तसाही कायम मुंबई-पुण्यापुरता मर्यादित राहिलाय. इतक्या वर्षांच्या संक्रमणातून नाटक उर्वरित महाराष्ट्रात पोहोचण्याचं प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे ही प्रमुख शहरं वगळता अन्य शहरांमध्ये रंगभूमी ही संकल्पना अजूनही अतिशय भाबड्या पातळीवर आहे. छोट्या शहरात किंवा गावाकडे अजूनही ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ किंवा ‘नटसम्राट’च्या पलीकडे नाटक असतं यावर विश्वास नाही. मराठी रंगभूमीवर वेगळी ठरलेली नव्वदनंतरची नाटकं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या शहरांपलीकडे फार पोहोचलीच नाहीत. त्यामुळे या काळातील नाट्यलेखकांची नावं किंवा त्यांच्या कलाकृती या केवळ नाटक करणार्‍या लोकांपलीकडे पोहोचलेल्या नाहीत. त्यावर चर्चाही फार घडताना दिसत नाहीत. त्यामुळे तिथला प्रेक्षक नाटक समजून घेण्याच्या दृष्टीने शिक्षित झालाच नाही, असं विधान करता नाही येणार. कारण खेड्यापाड्यात इंटरनेट आणि टीव्हीचं जाळं पसरलंय. त्याला यू ट्यूबवर, गुगलवर हवं ते मिळू शकतंय. तो ते कशा पद्धतीनं घेतो, हा प्रश्न असू शकतो. रंगमंचावरचं नाटक त्याच्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा दुबळी आहे आणि तरीही प्रयत्नपूर्वक पोहोचवलंच, तर तिथं नाटक सादरीकरणाला आवश्यक असणारी साधनसामग्री जवळजवळ नाहीच! मग रंगभूमीकडे व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून पाहणारे लेखक हे वर उल्लेखलेल्या शहरांपलीकडे घडले नाहीत. ते बव्हंशी नागरी व्यवस्थेतले किंवा खेड्यातून नगरात स्थलांतरीत झालेले आहेत. तेंडुलकर, एलकुंचवार, सतीश आळेकर, शाम मनोहर, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, जयंत पवार यांच्यापर्यंतच्या नाटककारांनी समग्र भानातून आपापलं एक सूत्र पकडत समाजाच्या जाणिवा तळापर्यंत ढवळून टाकण्याचं काम केलंय. मग आजची स्थिती काय आहे? आजची बरीच नाटकं वरवर समाधानकारक, चैतन्याचा आभास निर्माण करणारी; परंतु गिमीकली, प्रेक्षकशरण, आणि मंचीय क्षमता किंवा मर्यादांचा विचार करून लिहिलेली आहेत. सतत संशोधन करून, सामाजिक जाणिवेतून, माणूसपणाची चिकित्सक मांडणी करून, जबाबदारीनं समकालाचं, देशीवादाचं भान ठेवून लिहिणार्‍यांची संख्या नगण्य आहे. नावं घ्यायची झाली, तर राजकुमार तांगडे, आशुतोष पोतदार, प्राजक्त देशमुख, अरूण मिरजकर यासारखे मुंबईपुण्याच्या बाहेरील छोट्या शहरातून आलेले गांभीर्यानं सक्रिय, प्रयोगशील व चिंतनशील लेखक प्रायोगिक रंगभूमीच्या ‘मुख्य प्रवाहा’त कार्यरत आहेत. तरीही, ज्या प्रमाणात गावागावाकडून, छोट्या शहरांकडून कवितांचे तांडेच्या तांडे सर्वत्र येताना आपल्याला दिसतात, त्या प्रमाणात नाटकलेखनाकडे फार कुणी वळत नाही. याचं कारण नाटक हा मुळातच सामूहिक कलाप्रकार आहे. आपल्या जगण्याशी संबंधित प्रश्न अथवा आपलं सद्यस्थितीतलं जगणं गावाकडच्या नाट्यलेखकानं नाटकाद्वारे लिहिलं जरी, तरी त्यासाठी लागणारी सामग्री आणि प्रशिक्षित तंत्रज्ञ, कलावंत यांची मोट बांधण्याची व्यवस्था त्याच्याकडे नाही! (छोट्या शहरात ती मोट बांधण्याचे प्रयत्न मात्र होतात. नाही असं नाही. पण ती मोट बांधणं काय जिकीरीचं असतं, हे जालन्याचे राजकुमार तांगडे, जळगावचे शंभू पाटील, कणकवलीचे वामन पंडित, नाशिकचा सचिन शिंदे, भुसावळचे अनिल कोष्टी यांना विचारा!) गावपातळीवर अगदीच जत्रेत, स्नेहसंमेलनात केलंच कुणी तर तेही फारच हौशी पातळीवर! त्यातून नाटकाबाबत अभिरुची समृद्ध होण्याची कणभरही शक्यता नाही. गावागावाकडे शाळा, विद्यालये किंवा महाविद्यालयात दरवर्षी काही घडत असेल, तर शहरातून नव्या सिनेमांच्या गाण्यांवर ५ वर्षांच्या मुलांपासून साठीतल्या महिला पुरुषांपर्यंत सर्वांना नाचायला शिकवणार्‍या डान्सक्लासवाल्याकडून ’गॅदरिंग’मध्ये नृत्याचे कार्यक्रम बसवून घेणे! त्यावर गावाकडच्याही एकेक शाळा किमान दीड-दोन लाख रुपये खर्च करताना हल्ली दिसतात! तेवढ्या झपाट्यानं शहरातलं नाटक मात्र गावाकडे पोहोचलं नाही. तेवढा खर्चही करायची श्रीमंत संस्थांची तिकडे तयारी नाही. बोहाडे, तमाशे जवळपास संपले आहेत. आमच्या गावालाही टीव्हीवर रामायण सुरू व्हायच्या एक वर्ष आधी शेवटचाच बोहाडा झाला. त्यानंतर तो संपला. दरवर्षी गाणार्‍या रामाचा पार्ट मनोभावे करणारा गोड गळ्याचा टेलर, सीतेचा पार्ट करणारा देखणा मारवाडी युवक, हनुमानाचं सोंग दणक्यात निभावणारा मुस्लीम वस्तीतला पठाण, तीन रात्र रोज पहाटेपर्यंत संबळ व पिपाणीवर शंभर प्रकार अथक वाजवत बोहाडा दणदणून टाकणारे वादक हे सारं एका क्षणात संपलं. संबळवरच्या तालावरून आता कोणतं सोंग येतंय, हे न बघताही ओळखता यायचं. कारण त्या संबळच्या तालांना राम, रावण, मायावी साधू, हनुमान, जांबुवंत, सुग्रीव, शूर्पनखा यासारख्या व्यक्तिरेखांची नावं कित्येक शतकांपासून दिली गेलेली होती. ते संपलं! पण पुढे काय? याची गावाकडेही फार पर्वा केली गेली नाही. कारण तोवर जागतिकीकरणानं गावाकडची नवी पिढी उंदरांच्या शर्यतीत पळायला निघून गेली आणि उरलेली पिढी आपापल्या घरांच्या कच्च्या भिंतींवर बाहेरून टीव्हीच्या अँटेना आकाशाला टेकवण्यात गढून गेली. काही मोजके लोककलाप्रकार शहरात गेले, त्यातून रंगभूमीला नवनवे आयाम मिळत गेले; परंतु रंगभूमीचं अधिक केंद्रीकरण होत गेलं. (मला तर गावाकडून नाशिक शहरात शिकायला येऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर समजलं, की नाटक शिकविणारी महाविदयालयेही असतात म्हणून!) मुळात सांगायचा मुद्दा असा, की मुंबई पुण्यानंतर नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर यासारखी शहरं वगळली, तर नाटक अन्य जिल्ह्यांमध्ये अगदी अभावानंच पोहोचलंय. तालुका पातळीवर तर काहीच नाही! मुळात नाटक कसं पाहायचं असतं, इथूनच सुरुवात करावी लागणार आहे. जी काही कविता कथा लिहिणारी गावाकडची मंडळी आहेत, त्यांनाही हे माध्यम लेखनासाठी कधी हाताळावंसं वाटत नाही. का नाही, याचाही शोध घेतला पाहिजे. अगदी मागे अतुल पेठेंनी गावागावात ‘नाटकभान’ नावाच्या काही कार्यशाळा घेतल्या. तसे उपक्रम व्यापक स्वरूपात राबवले जाण्याची गरज आहे. नाट्यसाक्षरता सर्वत्र तयार झाल्याशिवाय प्रयोगशीलताही व्यापक होणार नाही. प्रयत्न सुरू नाहीत असं नाही. परंतु त्यातून ‘पुढे जाणं’ घडत नाही, हा मोठा प्रश्न आहे. 

मराठी रंगभूमी ही बहुजनांनी तारली, असं कितीही म्हटलं जात असेल, तरी आजवरच्या रंगभूमीनं बहुजनांचं प्रतिनिधित्व केलंय, असं म्हणणं मात्र धाडसाचं ठरेल! मुंबईपुण्याबाहेरील हौशी कलावंतांना गेल्या सहा दशकापासून राज्यनाट्य स्पर्धा नावाचं छान खेळणं व्यवस्थेनं देऊन टाकलंय. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुंबई पुण्याबाहेरील रंगभूमीचा मागोवा वगैरे घेतला जातो, तेव्हा ही चळवळ केवळ या आणि काही किरकोळ एकांकिका स्पर्धांपलीकडे गेलेली नाही, हे लक्षात येते. लेखकानं लिहिलेलं नाटक, त्यातील कंटेंट आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कौटुंबिक या पैकी किंवा या पलीकडच्या त्यानं लिहिलेल्या (किंवा सबटेक्स्ट ठेवलेल्या) आशयाशी दिग्दर्शक, नाटकात कामं करणारी नट मंडळी आणि तंत्रज्ञ ही सर्वच्या सर्व जोवर जोडून घेत नाहीत, आपापल्या कुवतीनुसार विचार करत नाहीत, प्रत्येक प्रयोगावेळी एकत्रित अनुभवानं अचंबित होत नाहीत, (किंवा या सगळ्या शक्यता त्या लेखनातच जोवर आढळत नाहीत) तोवर त्या नाटकाला प्रयोगासह स्वतंत्र व्यक्तित्व प्राप्त होत नाही. या सगळ्या शक्यतांचा विचार करून नाटक करणारे महाराष्ट्रात अगदीच मोजके. तेही मुंबईत. थोडेफार पुण्यात. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जळगावमध्ये तर फारच दुर्मीळ! मुळात नाटकाची चौकट नीट समजून घेता घेताच गिमीक्सचा वापर करून केलेल्या राज्यनाट्य स्पर्धेची, एकांकिका स्पर्धांची भरपूर बक्षिसं येऊन पडतात. त्या वर्षावामुळे आपण करतोय तेच चौकटीपलीकडचं वेगळं नवं नाटक असा समज दृढ होऊ लागतो. आजच्या काळात रंगभूमीला कशापासून धोका असेल तर तो आजच्या बनावट चैतन्यदायी आविर्भावापासून आहे! हे जे काही आपण लेखनातून मांडतोय, रंगमंचीय अवतरणातून मांडतोय, ते फार विलक्षण असून ते जगात पहिल्यांदाच मांडलं जातंय, असा विलक्षण आव आजच्या सगळ्या पद्धतीच्या रंगभूमीवर आणला जातोय. यात व्यावसायिक रंगभूमीचा विचार केला, तर त्यांची गणितं, मागण्याच वेगळ्या आहेत. त्या हिरिरीनं मांडूनही, अमलात आणण्याचा प्रयत्न करूनही तिथं लक्षात राहतात (आणि यशस्वीही होतात) त्या वेगळ्या वाटेच्या, आशयाच्या, विषयाच्या कलाकृती. उदाहरणार्थ, संगीत देवबाभळी. 

प्रायोगिक, प्रादेशिक स्तरावर का होईना, रंगभूमीवर कामं करताना बॅकड्रॉपला व्यावसायिक किंवा मुख्य प्रवाहातील प्रायोगिक रंगभूमीवर एक नजर आपली असतेच, हे वास्तव नाकारता येणार नाही. असं असणं गैर काहीच नाही, आक्षेप हा आहे की, प्रादेशिक रंगभूमीवर कामं करणार्‍या मंडळींना इतकी वर्षं होऊनही कथित मुख्य प्रवाहातील रंगभूमीचा आवाकाच अजून नीट लक्षात येत नाहीये. जे काही प्रयत्न होतात (काही अपवाद सोडून) त्यात आवच मोठा आहे. चौकटी तोडण्यासाठी मुळातच लेखकासह रंगकर्मींना समाजव्यवस्था, तिचा इतिहास, तिचं वर्तमान, त्यातील मानवी संवेदना या सगळ्यांचा आवाका असणं प्रचंड आवश्यक आहे. चौकटच नीट आकळली नाही तर तोडणार कुठून? नाटक समृद्ध करायचं असेल, तर चौकट तोडावीच लागते का, असा प्रश्न विचारू नये! चौकट नीट समजून घ्यावी, किमान! ती समजली की तिथंच चौकटीत पारंपरिक रंगभूमी करत बसायलाही हरकत नाही. त्यानं बिघडत काही नाही, पण मग फक्त तुमचा हा कन्फर्ट झोन रंगभूमीला आळशी करतो. मग चौकटी मुद्दाम तोडायच्या का? चौकटी मुद्दाम तोडाव्या लागतच नाहीत. त्या नीट कळाल्या की, आपल्यातील सजग आणि सुजाणपणच त्या भेदायला उत्सुक होत असतं. थिएटरच्या चौकटी मुद्दाम तोडल्या जात नसतात. किंवा तसा चौकटी मोडण्याचा स्टान्स घेऊन नाट्यक्षेत्रात कार्यरत आविर्भावाचं फार पुढे काही होत नाही. मुळातूनच बंडखोरीची चमक असावी लागते. अर्थात. प्रचलित प्रवाहापासून फटकून राहून ही बंडखोरी विकसित होत नसते. तर त्या प्रचलित प्रवाहात सहभागी होऊनच तो प्रवाह नीट समजून घेता येतो आणि त्यातूनच पारंपरिक चौकटी तोडून आपल्याला हवी तशी कलाकृती निर्माण करण्याच्या शक्यता तयार होतात. आणि या पद्धतीच्या कलाकृती हीच त्या निर्मात्याची म्हणजे रंगकर्त्याची संवादाची भाषा असते. तुमची भाषा आणि तुमचं व्यक्त होणं हे तुमचंच होण्यासाठी तुम्हाला भवतालचं प्रचंड भान येणं गरजेचं आहे. एकांकिका स्पर्धांत, राज्य नाट्य स्पर्धेत लाखोंची बक्षिसं मिळवूनही तुमच्या शहरातली हौशी रंगभूमी आहे तिथंच असेल, तर या स्पर्धा बंद केलेल्या काय वाईट? विजय तेंडुलकरांनी या आशयाचं यापूर्वीच विधान केलंय. त्यांनी  म्हटलंय, ‘‘हौशी रंगभूमीने सरकारी नाट्यस्पर्धांची पाठ सोडली नाही किंवा सरकारी नाट्यस्पर्धा बंद करून महाराष्ट्र सरकारने नाट्य अकादमीसारख्या योजना मनावर घेतल्या नाहीत, तर हौशी रंगभूमी म्हणजे व्यावसायिक रंगभूमीला मालाचा पुरवठा करणारी पेठ होऊन राहील. स्पर्धांपलीकडे तिला अस्तित्व उरणार नाही व याच लायक वा नालायक परीक्षकांना उद्देशून नाटके करणारी कमअस्सल व किंचित व्यावसायिक रंगभूमी हे तिचे मूल्य ठरेल. हौशी रंगभूमीवर अधिक सातत्याने प्रयोग (एक्सपरीमेंट) होण्याने त्या रंगभूमीचे महत्त्व वाढेल. तसेच, प्रयोग योजनाबद्ध व शिस्तीचेही असावे लागतील. या प्रयोगांना नियमित नाट्यशिक्षणाचीही जोड द्यावी लागेल. यासाठी मोठी नाट्यगृहे – जी आजच हौशी व प्रायोगिक रंगभूमीला फारशी उपलब्ध होईनाशी झाली आहेत – सोडून, या रंगभूमीने कायम स्वरूपाचे छोटे हॉल्स, बखळी, इत्यादी अनुकूल स्थळं मिळवून तिथे आपले प्रयोग आणि अन्य उपक्रम यांद्वारे आपापला प्रेक्षक बांधून घेणे अपरिहार्य ठरणार आहे.’’

आजही तितक्याच प्रभावीपणानं लागू होणारं हे विधान आहे. रंगभूमी, रंगदेवता वगैरे भाबड्या भक्तीला आता डोळसपणा लाभला पाहिजे. नटराजापुढे समया लावणं, अगरबत्त्या ओवाळणं वगैरे श्रद्धा नैसर्गिकपणे टिकल्या तर ठीक. (ते करावंसं वाटलं नाही, तरी काही बिघडत नाही. कर्मकांडातून सुटका होणं हाही विकासाचाच एक भाग आहे.) मुळात प्रादेशिक स्तरावरचं नाटक समृद्ध झालं पाहिजे. प्रादेशिक स्तरावर भवतालाचं भान असणारा नाटककार प्रादेशिक स्तरावर राहायला तयार नाही. त्यालाही पटकन मुख्य प्रवाहात येण्याची असोशी आहे.

समकालीन भवताल हा त्या त्या वेळच्या कलाकृतीतून संक्रमित होत असतो. किंवा तो व्हावा, हा आग्रह असायला हरकत नाही. कलेला समकालीन जगण्याचा गंध प्राप्त व्हावा. नाटक करणार्‍यांनी इतिहास वाचायला हवा. समाजशास्त्राचे भान ठेवायला हवे. भाषेचे तर हवेच. नाट्यशास्त्राचे नियम नाटक करता करता शिकता येतात. पण आधी शिकलात तरी चालेल. नियम शिकल्याशिवाय ते ‘मोडणं’ही शिकता येत नाही ! नाटक हे केवळ करमणुकीचे माध्यम नाही. ते केवळ सौंदर्यशास्त्राच्या आविष्काराचे प्रदर्शन नाही. आपापल्या पिढीचे नाटक आपणच डिझाईन करायचे असते. प्रगल्भ आशयाला उपलब्ध आधुनिक तंत्राची प्रगल्भ जोड देऊन परिणामकारकता कशी वाढवता येईल, याचा विचार केला जावा. थोडक्यात, नाटक करत  राहावे, नाटक सापडत जाईल आणि जगणंही!

शेवटचा महत्त्वाचा चिंतनीय भाग म्हणजे, नवीन लिहिणार्‍यांमध्ये असलेला अभ्यासाचा अभाव आणि परफॉर्मन्सच्याच अनुषंगानं केलं जाणारं लेखन. अलीकडच्या काही ‘गाजलेल्या’ एकांकिका पाहिल्या, तर उगाचच भाषेत आणली जाणारी कृतकता, सतत काहीतरी ‘घडलंच’ पाहिजे, या हट्टातून केली  जाणारी गिमीक्स, एकूण ‘विचारा’चा अभाव आणि संवादांना क्षणाक्षणाला दिलेला लाहीबाज तडका! विशेष म्हणजे प्रेक्षकांना शांतपणे परिणामकारक अनुभूतीच्या तळापर्यंत घेऊन जाणारं लेखन बाजूला ठेवत ऐकू येणार्‍या जल्लोषाचा आणि सिनेमॅटिक मांडणीचा निकष लावत अशा कलाकृतींना सर्वोत्कृष्ट ठरवणार्‍या संयोजकांना, परीक्षकांनाही जबाबदारीनं नव्या रंगभूमीकडे पाहण्याची गरज आहे. नाट्यलेखन हा स्वतंत्रच अविष्कार आहे. तो दिग्दर्शकशरण नसायला हवा, अथवा प्रेक्षकशरणही नसायला हवा. गेल्या दशकभरात धार्मिक आणि जातीय उन्मादाच्या काळात एका अतिशय विचित्र संक्रमणातून आपण जात असताना समकालीन लेखकांचं या काळाकडे नीट लक्ष नाही. हे दुर्लक्ष जाणतेपणातून असेल, तर ते भ्रष्ट असावेत, किंवा करमणूकप्रधान असावेत, किंवा नाटक हे केवळ चार घटका करमणुकीचं साधन त्यांना वाटत असावं. हे दुर्लक्ष अजाणतेपणातून असेल, तर ही बाब त्याहून अक्षम्य आहे! माझ्यावर सातत्यानं सोशल  मीडियातून, अन्य माध्यमांतून जातीय, धार्मिक आणि सांस्कृतिक उन्मादाचा भडीमार होत असतानाही मी नाटक लिहिताना या भडीमाराच्या परिणामातून सेल्फ सेन्सॉरशीप लादून घेत रूचेल तेवढंच लिहित असेन, तर ते अक्षम्य आहे. समाजमनावर खोलवर परिणाम करून अनिष्टाविरुद्ध उभं राहण्याचं बळ देणार्‍या नाटकांवर कायमच संस्कृतीरक्षकांचे, सत्तेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हल्ले झाले. हे हल्ले करण्याची प्रवृत्ती मुळापासून  बंद होईपर्यंत आणि ही वृत्ती पुन्हा कधीच उसळून येऊ नये यासाठीही नाटक लिहित राहावं लागणार आहे. हे करताना आपल्याला छोट्या शहरांकडे, गावागावांकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. सर्वकालीन पाणी टंचाईच्या प्रखर दु:खाला समकालीन एका पाणीटँकरपुरतं उत्तर घेताना सबंध आयुष्यच पणाला लावलेल्या संपूर्ण गावाचं एका रात्रीचं जगणं मी ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकातून मांडलं होतं. पाण्याचा टँकर प्रचंड संघर्षानंतर येणार आहे, ही बातमी मिळाल्यापासून ते प्रत्यक्ष तो टँकर येईपर्यंत त्याची गावाबाहेरच्या माळावर ३६ तास वाट पाहात बसलेल्या पन्नास घरांच्या गावाची ही गोष्ट मी लहानपणी भोगलेल्या पाणीटंचाईतूनच आली आहे. या प्राचीन प्रश्नाला समकालीन उत्तर शोधण्याचा हा माझा प्रयत्न होता. मला वाटतं, हे सूत्र फार महत्त्वाचं आहे. हे उकरत राहणं, स्वत:ला उपसत राहणं फार महत्त्वाचं आहे. नव्या नाटककारांनी हा एकुणातला बदल टिपणं गरजेचं आहे. त्यावर नाटक केलंच पाहिजे असं नाही. पण या बदलाकडे सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे. एकुणात आलेलं सध्याचं एकमेकांविषयीचं कमालीचं अविश्वासाचं वातावरण फार धोकादायक आहे. अत्याधुनिक विज्ञानयुगाचे, सर्वसमावेशकतेचे कमाल गोडवे गात असतानाच अचानक सुरू झालेला सनातन कोलाहल; नाटककारांना अव्हेरून चालणारच नाही. शेती, पाणी, भक्तिपरंपरेचे बदललेले आयाम, बदलती गावं, त्यातून समाजाचे बदलते स्वरूप, गावाकडील उद्ध्वस्त होत चाललेला किंवा केला जाऊ लागलेला कृषक समाज, त्याची विस्कळीत कुटुंबव्यवस्था आणि या सगळ्या प्रश्नांचे शहरांवर, महानगरांवर पडणारे प्रचंड प्रभाव आणि या प्रभावातून भिरभिर झालेला प्रचंड संख्येनं असलेला विखंडित वर्ग एका विशिष्ट छताखाली आणण्याचे सुरू असलेले प्रयत्न आणि या प्रयत्नांना मिळू लागलेलं यश, या सगळ्या गदारोळातही माणसातील खोलवरच्या चांगुलपणाशी सुरू असलेलं पारंपरिक माणूसपणाचं सूक्ष्मसं संगीत – या सगळ्या भवतालाकडे दुर्लक्ष करून लिहिता कसं येईल? दुर्दैवानं या कोलाहलाकडे नव्या नाटककारांचं नीट लक्ष नाही! आणखी टाळाटाळ केली, तर पुढील दशकांना देण्यासारखं आपल्याकडे काहीच उरणार नाही!

दत्ता पाटील हे नाशिकस्थित नाटककार व लेखक आहेत. त्यांच्या हंडाभर चांदण्या या नाटकास महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार व मटासन्मानसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

10 comments on “दत्ता पाटील: हरवलेली लय आणि गमावलेले भान

  1. केशव निवृत्ती कासार

    दत्ता, आजच्या काळात मराठी नाटकाच्या मर्यादा आणि शक्यतांच्या बाबतीत अतिशय मूलगामी आणि तितकंच चौफेर असं चिंतन तुझ्या लेखातून आलंय. ग्रामिण अवकाशात नाट्यविकासाच्या साधनांचा अभाव आणि त्यामुळे धूसर झालेल्या शक्यता यांचा उहापोह अतिशय तळमळीने केलायस. तसेच चमत्कृतिपुर्ण ‘गिमिक्स’च्या मागे लागून पोकळ आशय असलेली नागरी नाट्य चळवळ याचाही लेखाजोखा व्यवस्थित मांडलायस !

    Reply
    • Datta Patil

      केशव, तु्झ्यासारख्या संवेदनशील चित्रकार आणि आस्वादकाची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार मोलाची आहे.

      Reply
  2. धनंजय वाखारे

    दत्ता, तू जे लिहितोस ते मनाला भिडते. खरं आहे की या कोलाहलातील माणूस टिपण्याची गरज निर्माण झाली आहे.

    Reply
    • Datta Patil

      धन्यवाद धनंजय. तुझ्यासारख्या कर्तबगार आणि कलात्मक जाणिव असलेल्या पत्रकाराने नाशिकमधील सांस्कृतिक चळवळीला कायम साथ दिली आहे.

      Reply
  3. शंभु पाटील

    दत्ता जी
    आसपासच्या कोलाहलात तुमचं लिखाण अंतर्मुख करत , ते आनंद देत अस म्हणणार नाही , पण तस ही म्हणेल ….कारण अंर्तमुख करताना ते पीळवटून टाकत . रंगमंच इतरांसाठी करमणूक असेल पण आपल्या साठी तर जगायची जागा आहे .एकाच वेळी हे स्वतः ला सोलून काढणं आहे आणी समृद्ध होणं आहे . ही अनुभूती तुमच्या लिखाणात आहे .

    Reply
    • Datta Patil

      दादा, तुमच्या आणि आमच्या पिढीत बारीक फटीएवढंच अंतर आहे.. परंतु आम्ही खूप शिकलो तुमच्यासारख्या व्रतस्थ रंगधर्मींकडून… नवं नाटक शोधताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ मित्रांची कायम मदत होत असते. तुमची या लेखावरची प्रतिक्रिया ही माझा आणि प्रादेशिक रंगभूमीवर काम करणाऱ्या माझ्या अनेक सन्मित्रांचा हुरूप वाढवणारी आहे

      Reply
  4. प्रविण कांबळे

    “हरवलेली लय आणि गमावलेला भान”
    ‘कलगीतुरा’ ह्या लोककलेचे उदाहरणअतिशय सुंदर…
    हे उदाहरण देउन नाटककार दत्ता पाटील यांचा लेख आजच्या रंगभूमी आणि रंगकर्मी साठी अतिशय महत्वाचा समजून घेण्याचा आणि रंगभूमी विषयी भान देणारा रंगकर्मींना समृद्ध करणारा हा लेख आहे,असे मला वाटते.सर्व रंगकर्मीनी तो वाचावा असे मनापासून वाटते निदान ग्रुप वरील रंगकर्मींनी वाचावा आणि आपल मत पोस्ट करावे ग्रुप वर.आपल्या शहरातला,आपला हक्काचा नाटककार आपल्या हजारो प्रश्नाचे उत्तर देणारा हा फायदा आपण जर मनापासून नाटक करीत असू तर नक्कीच घेतला पाहिजे.
    एक प्रश्न
    राज्यनाट्य स्पर्धा प्रचंड दूरदृष्टी असणारे आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाणांनी सुरू केल्या, का केल्या ? त्यांचा हेतु त्यांची दृष्टी मी कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्या स संदर्भातले कधी काही तपासले ही नाही,कालांतराने राज्यनाट्य स्पर्धेत प्रचंड बदल अपेक्षित आहेत पण कुठल्याही लॉजीकने स्पर्धा बंद करा,बंद झाल्या पाहिजे
    अस ऐकन,वाचन त्या राज्यनाट्य स्पर्धा सुरु होण्यावरच शंका उपस्थित करतात अस वाटत.
    त्या,का,तो इथला विषय नाही अस मला वाटत,रंगकर्मीं भले पुढे राज्य नाट्य स्पर्धेच्या रंगभूमीवर आणि नाटकाताच काम करत नसेल पण त्याचा रंगभूमीवरचा तटपुंजा अनुभव त्याच्या रोजच्या जगण्यात कुटूंबात समाजात एक दृष्टी देऊन जातो त्याची म्हणून एक अनुभूती असते आनंद असतो तो काम करतो,जगण्याचा मंच समृद्ध करतो, कारण उपलब्ध राज्य नाट्य स्पर्धेचा मंच.!
    अतुल पेठे यांचा नाट्यभान हा उपक्रम गावागावात घेतलेली शिबीरे,{अपेक्षा नाटका विषयी भान}. पुढे काय झालं माहीत नाही पण एक होऊ शकले असते नाट्यभान च रींगण महाराष्ट्र भर फिरलं असत जर पेठेंनी शासनाच्या सांस्कृतिक विभागाला सामाऊन घेतले असते तर
    पेठेची भूमिका हेतु शासनाला नक्कीच पटले असते किंवा त्यांनी पटवून दिले असते आणि त्यांच्या कडे प्याटर्न होता “कचराकोंडी” आणि आहे ,अतिशय सुंदर असा माहितीपट ‘काचाराकोंडी’ अतुल पेठे यांनी केला सफाई कामगारांच्या आरोग्याचा भीषण प्रश्न त्यांनी पुणे महानगर पालिकेच्या निदर्शनास आणून दिला त्यातून पुणे महानगर पालिकेने अतिशय महत्वाच्या माहितीपटाची निर्मिती केली ‘कचराकोंडी’ अतिशय महत्वाचा प्रश्न पुणे नगरपालिकेच्या माध्यमातून अतुल पेठे यांनी मार्गी लावला आणि त्या मुळे कामगारांच्या आरोग्या विषयी नवीन नियम करण्यात आले
    नाट्यभान च रींगण शासनाने फिरवले असते तर नक्कीच अपेक्षीत चित्र असतं,जर अतुल पेठे शासनाशी बोलले असते तर !
    परत एकदा हंडाभर चांदण्या सुंदर निर्मिती
    कुठल्याही जाहिराती शीवाय
    थिएटर तारखांच्या नेटवर्कींग शिवाय महाराष्ट्र भर हंडाभर चांदण्या चा यशस्वी लढा उभारणारे नाटककार दत्ता पाटील,दिग्दर्शक/अभिनेता सचिन शिंदे धन्यवाद 🦚
    प्रविण कांबळे
    मयुरी थिएटर नाशिक

    Reply
    • Datta Patil

      खूप धन्यवाद प्रवीण मित्रा… तुझी नाटकाबाबतची प्रचंड तळमळ मी सतत पहात आलोय. राज्यनाट्य स्पर्धेबाबतही आपण अनेकदा बोललो आहोत. बरोबर आहे तुझं म्हणणं. स्वरूप बदलण्याच्या गोष्टी गेली १५ वर्ष सुरू आहेत. परंतु ते न घडता सरकारीकरणच वाढत चाललंय. आता पुढचा काळ आणखी कठीण आहे. चळवळींचं स्वरूपच वेगळं असेल. या कठीण काळातही रंगभूमीचा प्रवाह चिरंतन चालू ठेवणं, संवाद चालू ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे.

      Reply
  5. गिरीश पतके

    दत्ता,

    लेख आवडला. एकंदरितच तू घेतलेला आढावा चांगला झाला आहे. फक्त एकच शंका आहे, ती म्हणजे “तेंडुलकर, एलकुंचवार, सतीश आळेकर, शाम मनोहर, प्रेमानंद गज्वी, शफाअत खान, जयंत पवार यांच्यापर्यंतच्या नाटककारांनी समग्र भानातून आपापलं एक सूत्र पकडत समाजाच्या जाणिवा तळापर्यंत ढवळून टाकण्याचं काम केलंय.” असे विधान लेखात येते. समग्र भान आल्यानंतर केवळ एखाद्या सूत्राचा विचार करण्याची आवश्यकता उरते का ?

    गिरीश

    Reply
  6. VinayKumar Sakharam Shukla

    दत्ता पाटील सर नमस्कार. हरवलेली लय आणि गमावलेले भान वाचून विलक्षण रखरखीत काहीतरी उणे असल्याची जाणीव झाली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *