चं प्र देशपांडे
कहाणी आणि इतर कविता
५
back
कहाणी
आपली कहाणी सांगेल
सगळेच आभासी असल्याने
काहीच नसण्याची यशोगाथा
ती सांगेल मतांच्या अवडंबरामुळेच
तयार झालेले पाताळयंत्री लपाछपीचे जग
जे या जगाच्या नाकावर टिच्चून
उपभोगते गुप्त जगणे
उघडाइतक्याच प्रभावीपणे
आभासी आणि नसलेले
आपली कहाणी उघड्या पाडेल
अनुरूपतेच्या मर्यादा
आणि सर्वमान्य तुरुंगांतून
फुटून निघण्याचे
अविरत नाइलाजाचे खोटेपण
आपल्या कहाणीची स्वप्ने असतील
कधीतरी उघड होण्याची कधीतरी
झेंडा फडकावण्याची अनैतिक बंडाचा
आपले हेतू निर्मळ पण अपराधी असतील
सापडलो तर विध्वंस करणारे असतील
बिचाऱ्या बऱ्याच आभाश्यांचा
एकमेकांना अडवत आपण कसे पोचलो
या निर्मनुष्य स्वर्गात हे खूपच
सनसनाटी असेल आणि
नाही नाही म्हणत झालेले तुझे समर्पण
तुलाही कळलेय आता आपल्या कहाणीचे इंगित
जे असणार जगाच्या आवाक्याच्या बाहेर
आपली कहाणी असेल वा नसेल
पण आता नि:संकोचपणे एकत्र जगू कारण
आपण आता आत्मवंचनेस पुरेसे सोकावलेले आहोत
***
हक्क
तो नसतो हक्क
ते असते हळूहळू उमलत जाणारे अधीन होणे
ती नसते मागणी
ते असते अर्पण होण्याची ऑफर देणे
त्या व्यक्ती खूपच रिच असतात
असंख्य कथांच्या निर्मात्या
मग त्या रस्त्यावर झाडू मारत असोत
की केबिनमधल्या सुगंधी बॉस असोत
जगात वावरताना त्यांना समजत असतात
निसर्गाच्या खट्याळपणातून निर्माण होणाऱ्या
अदृश्य लपवल्या जाणाऱ्या असंख्य मानसिक हालचाली
त्याही अदृश्यपणे मनात हसत वाहू देतात ते प्रवाह
प्रॉब्लेम एकच असतो
बरोबर-चूक आधी ठरलेले असते
आणि मनांचे स्वातंत्र्य प्रवाही असते
मनांना असते सवय
उत्तेजक आंतरद्वंद्वाची
सवयच नव्हे तर असते आकर्षणही
यातूनच प्रवाहातला एखादा बिंदू होतो यशस्वी
आणि करतो तयार हक्काचे वर्तुळ
त्यातून एखादी वा अनेक
जखमाही शक्य असतात
पण त्या स्वत:ची ओळख
पक्की करणाऱ्या असल्याने मोहकही असतात
गाजवणारी वा गाजवून घेणारी
कोणतीच व्यक्ती नसते अनभिज्ञ
ओळख पक्की करता करता
ओळख विसरूनच जाण्याची असते ती घटना
कुणी नसतेच तिथे तर घटना तरी कसे म्हणणार
***
माशी
खिडकीच्या काचेतून सरळ
एक माशी आत येताना पाहिली
आणि दरदरून घाम फुटला
घरात मी एकटाच आणि हे अघटित
तिच्यावर लक्ष ठेवले
तिच्या पंखांचीही स्तुती
करायची तयारी ठेवली
आधी ती
पुस्तकांच्या कपाटाच्या
काचेतून थेट आत गेली
आणि पुस्तके कुरतडू लागली
त्यांत बरेच संदर्भग्रंथ होते
साहित्याचे नाटकाचे इतिहास होते
तिच्या आकाराच्या मानाने
बरीच केली तिने नासधूस
तिच्या नुसत्या असण्याने
दिसण्याने माझे जगच धोक्यात आले
आता एकच भीती वाटू लागली
ही माझ्या मनातही शिरू शकेल की काय
या घरात हे असे चालू आहे
हे कुणाला कळणारही नव्हते
पण तिला मात्र मनाचा कोपरा न कोपरा
दिसणार होता माझ्याच आयुष्यात
का आलीय ही या विचारात असूनही
तिला कोणताही विरोध नाहीच करायचा
हेच ठरवलेले होते ही तर पूर्ण
आयुष्यावरच शिंकणारी माशी होती
***
स्त
तुमचे स्वस्थ असणे
म्हणजेही
त्रस्त असणेच असते
कारण तुम्ही स्वत:च
टाकलेले असते स्वत:ला
काळापुढे
तुम्हाला फस्त
करत राहण्यासाठी
तरीही तुम्ही
गस्त घालत राहता
स्वत:भोवती जगणे
आपणच केलेय
स्वस्त हे माहीत असून
खस्ता खाव्या लागल्या
तरी पुढे मस्तीत जगण्याचे
ध्येय असावे
या एकाच विचाराने
सतत व्यस्त राहात
आपण रजा नाही घेतली
एकही दिवस
कुणी वास्तपूस्त
करो ना करो
आपण जरा जास्तच
हळवे होत जगत गेलो
शेवटी वस्तीला आलो
तेव्हा रात्र सुस्त पसरत होती
धास्तावत पस्तावत
जगण्याचा फाटताना
पुस्तकी दस्त
***
आराम
एकशे वीस तीनशे बनारस
लावून बसलेला ए टी एम वॉचमन
छोट्या खुर्चीवर त्यातल्या त्यात आरामात
पाय पसरून हातात वर्तमानपत्र बघत
दुर्लक्ष करतो इस्राएलकडे
सीरियाकडे इव्हन श्रीलंकेकडे
त्याच्या मेंदूत चालू असलेले हे दुर्लक्ष
बाहेरून कुणाला दिसत नाही
मस्त खाऊन पिऊन सुखी वाटतो तो
पण साहेब काय म्हणाले ते तो सविस्तर वाचतो
पण तेही शेतकरी कायदा आणि
अभिव्यक्ति स्वातंत्र्य असले निरुपयोगी बघून
तो फक्त मनोमन आदर बाळगतो
आणि समजून राहतो मनात
साहेब होणे सोपे नाही
मध्येच शेजारचा पुणेकर फूटवेअर
वाला येऊन विचारतो काय विशेष बातमी
हा साठलेल्या रसामुळे बोलू नाही शकत
म्हणून त्याला पूर्ण पेपरच देऊ करतो
तो नको नको म्हणतो येतो परत म्हणतो
याला साले कोडे सोडवावे तर शब्दही नाहीत
माहीत तो पोझिशन बदलून बसतो
जाहिरातींचे पान बघत
आराम बसायची तर आहे नोकरी
फुकटचा तर मिळतो पगार
हे त्याला त्याच्या भावाचे शब्द आठवतात
इषापेक्षा कंटाळा जीव खातो एड्या
तो मनात म्हणतो
***
तिजोरी
तुला मी ओळखतच नसताना
तू कशी आलीस स्वप्नात
हे जरी कळलेच नाही तरीही
नंतर तू आलीस प्रत्यक्षातही
हे मात्र मी
माझ्याबाहेर जाऊ दिले नाही
मी शिताफीने बंद केले
तुझ्याही मनाचे दरवाजे
चाखवत तुला
मी निर्मिलेल्या
गुप्त झऱ्याचे पाणी
ते पाणी होते एक
गुप्ततेचा खजिना
नुसते धुंद करणाराच नव्हे
तर विस्मृतीतही नेणारा
हे तुला कळेपर्यंत आपोआप
तू सरावली गेली होतीस
या जगाबाहेरच्या अंधाराला
आता तुलाही बाहेर नव्हते पडायचे
या नसलेल्या जगातून कारण
असल्याचे नाही करण्याची ही गुप्त जादू
सतत भारून टाकत होती तुलाही
जणू माझ्या मनाची आज्ञा असल्याप्रमाणे
आता डावपेच राहिलेच नव्हते
तुला काही थांबवायचे नव्हते
आणि मला काही कंट्रोलही
करायची गरज नव्हती
सगळे सेफ चालणार होते
आपल्या अमर्याद आभासी तिजोरीत
***
अवडंबर
माझ्याही डोक्यात असतातच ना
बरोबर-चूकचे आडाखे
आणि माझ्या फायद्याचे बडिवार
जे मला माहीत असते आहेत
ब्रेक नसलेले अवडंबर
सदोदित तयार असणारे
मरायला वा मारायला
या मूर्ख खेळातून
सुटून जाण्यासाठी
मी बोलतो सुखदु:खांबद्दल
स्वप्नांबद्दल आणि भासांबद्दल
जे खेळत असतात सर्वांतच
कधी उघड कधी गुप्तपणे
मी बोलतो विकृतींबद्दल
ज्या असतात असंवेदनशील
आणि लपवलेल्या
नैतिक अवगुंठनात
मी मते सांगण्या ऐवजी
सांगतो
आवाक्याबाहेरचा भूलभुलैया
जो घडवतो मतांचा नरक
मी काहीतरी लपवतो आहे असे समजून
काहीजण मला म्हणतात आपमतलबी
ढोंगी मध्यमवर्गीय कुंपणावरचा आणि निर्लज्ज
***
चं प्र देशपांडे मराठी नाटककार आणि विचारवंत आहेत. आतापर्यंत अनेक कविता आणि वीसहून अधिक नाटकांचे लेखन देशपांडे यांनी केले असून नाट्यलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा दातार पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा राम गणेश गडकरी पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. देशपांडे यांनी लिहिलेल्या विविध नाटकांचे प्रयोग मराठी आणि इतर भारतीय भाषांमधूनही होत असतात.