पान तिसरे : ७–१–१९८७
बागेतून निघालो तसा मी सावकाश रस्ता ओलांडत होतो. जितुभाईंना घरी पोहोचण्याची घाई झाली होती. आपल्या आकारमानाचीही पर्वा न करता ते रिक्षांच्या मधून वाट काढून समोरच्या बाजूस अधीरपणे वाट पाहात उभे होते. अजून मी सायकलीला चुकवत समोरच्या बाजूस येतो तेवढ्यात त्यांनी प्रश्न केला,
“स्कूटर कुठेय?”
मी म्हटलं, “आचार्य बुक डेपोच्या बाजूला. म्हणजे आपल्याला गोल फिरून जावं लागेल.”
जितुभाई, “चला, जरा पटपट पाय उचला.”
आचार्य बुक डेपोपाशी पोहोचताच लगेच म्हणाले, “कोणती स्कूटर?”
“राखाडी रंगाची.”
“इथं तीनतीन पडल्यायत..”
“हा आलोच.”
त्यांच्या अधिकारवाणीनुसार मला वागावं लागलं. मी स्कूटरची चावी चाचपत पँटच्या मागच्या खिशातून काढली, आणि स्कूटर चालू केली, “कुणीकडे?”
जितुभाई, “अग्निशांति केंद्राच्या बाजूच्या गल्लीत.”
अधीरपणा, उत्सुकता, पोहोचण्याची उतावीळ जितुभाईंना होती. म्हणून तर मला असे हुकूम सोडत होते. मलाही माहीत होतं, हा संबंध अर्ध्या तासापुरता. उद्या दोघंही एकमेकांना विसरून जाऊ. मनात आनंद वा उत्साह नव्हता. संबंधांच्या या परंपरेतल्या एकसुरीपणाचा कंटाळा होता. घर कसं असेल तेही मला ठाऊक होतं. घरात रेक्झिनचे कोच, लहानसा झोपाळा, सीलिंग फॅन आणि टीव्ही, सफेद किंवा निळसर रंगाच्या भिंती.
या विचारातच तिसर्या मजल्यावर पोचलो. ते तर माझ्या पुढे एक जिना चढून गेलेले होते. मी पाहिलं त्यांनी रूम नं. ३०५ बाहेरची घंटी वाजवली. मीही जिना चढून जितुभाईंच्या मागे जाऊन उभा राहिलो. त्यांनाही धाप लागली होती. दार तीन इंच उघडलं.
जितुभाई, “चावी.”
दार बंद झालं.
दोन मिनिटांनंतर बांगड्या घातलेल्या पोरीच्या बोटांत किल्लीचा जुडगा अडकवलेला होता. जितुभाईंनी किल्ली घेतली. बरोबर समोरच्या घराचं कुलूप उघडलं.
आतमध्ये ऑफिसचं टेबल, त्याखाली वळकटी करून ठेवलेलं अंथरूण. जितुभाईंनी पंखा चालू केला. काचेची खिडकी बंद होती. टेबलवर ठेवलेल्या टाईपरायटरवर कव्हर चढवलेलं होतं. कुठे बसायचं ते काही नक्की नसल्यामुळे मी टेबलखाली सरकवलेली खुर्ची काढून त्यावर बसलो. माझ्या तोंडाला त्यांच्या कोटाचा खालचा भाग स्पर्श करत होता. कधी वाऱ्याने कोट माझ्या तोंडावर लपेटलाही जात होता.
जितुभाई, “राहायचं ना इथं?”
आख्खी रात्र त्या हवाबंद खोलीत काढण्याच्या विचारानंच मी थरकापलो.
खोटंच सांगितलं, “सकाळी सहाच्या बसने अहमदाबादला जायचं आहे.”
“इथूनच जा की.”
“घरनं ऑफिसचे कागद घ्यायचे आहेत.. आणि घरी सांगितलंही नाहीये.”
आम्हाला दोघांनाही माहीत होतं की ही शेवटचीच भेट आहे. जितुभाईंनी कोट-टोपी काढली आणि खुर्चीपाशी येऊन उभे राहिले. पहिल्यांदाच ट्यूबलाईटच्या झळझळीत प्रकाशात त्यांचं तोंड पाहिलं. बऱ्याच वर्षांपूर्वीच्या आजारानं देवीचे व्रण मागे ठेवलेले होते. चमकणारं टक्कल, काळसर वर्ण आणि देवीच्या व्रणांमुळे तोंड कुरूप दिसत होतं, त्यातच पातळ ओठांमुळे ते काहीसं क्रूरही वाटत होतं.
उंचनिंच भरभक्कम दिसणाऱ्या शरीरातून घोगरा आवाज आला, “रात्री नऊ वाजता इमारतीचे दरवाजे बंद होतात, तेव्हा लवकर!” म्हणत त्यांनी टाईपरायटर बाजूला ढकलला आणि टेबलवर बसले.
आता माझ्या नजरेसमोर सफेद सदरा, सफेद धोतर अन् त्यातून उभारलेली मांडी दिसत होती. मी वर पाहिलं. देवीचे व्रण असलेला गाल हसत होता. दोन्ही डोळे चिन्यांसारखे बारीक झालेले होते.
त्यांनी म्हटलं, “ठीक आहे ना सगळं?”
मी म्हटलं, “आज राहू दे.”
जितुभाई, “का?”
“पुन्हा कधीतरी.”
“तुला न् मला दोघांनाही ठाऊक आहे.”
“काय?”
“आपण पुन्हा भेटणारच नाही आहोत.”
त्यांनी माझा हात पकडला. माझ्या हृदयातून भावना, परवशता, आकर्षण सारं लोप पावलं होतं. मी चित्रांचा विचार करू लागलो. सबंध कॅनव्हासभर सफेद रंगाचा सदरा, धोतर आणि मधेच झिरझिरीत कपड्यातून दिसणारी मांडी. मी खुर्चीतून उभा होऊ गेलो. त्यांनी माझा हात धरला, बसवलं आणि म्हटलं, “आज काय हरकत आहे?”
“मूड नाहीये.”
“मूडला काय झालं? मी काही केलं?”
“इच्छा नाहीये.”
जितुभाई, “चल, माझ्यासाठी.”
आयुष्यात पुन्हा कधीच न भेटणाऱ्या माणसाखातर मी रात्री नऊ वाजेपर्यंत थांबलो.
चित्र सौजन्य: भूपेन खखर आणि कथा, नवी दिल्ली, २००१. चित्र वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल डॉ. हर्षवर्धन हेगडे आणि अनुप दिवेचा यांचे आभार.
This translation was commissioned by Asia Art Archive (AAA) as part of its publications project, ‘Writing Art‘ which engages with histories of art writing in South Asia, in an attempt to map, compile, translate and republish texts on various platforms. The English translation of this excerpt from Bhupen Khakhar’s short story will be published in AAA’s forthcoming Dossier 3 which is a collection of writings by artists on travel and movement. AAA thanks Piyush Thakkar, Bharat Naik and Katha for their assistance and permissions.