मी बाळू वाळूसारखा वाहत गेलो दूर वर दूर देशी संस्कृतीच्या खुणा शोधत मी वाळू बाळू सारखी नाही फिरले देशा परदेशात वाहत गेले मात्र गात्र शाबूत ठेवून किनाऱ्यापर्यंत सागरांच्या सांगोपांग सदेहाभोवती किनार अंथरली आवर्तनात पायांचे ठसे पुसले शतकोंशतकांचे रेती रितीने * मी बाळू वाळू सारखा चाळून चालून दाणेदार झालेलो. तेलकट तुपासरखा रेतीदार कणीदार बळकट दणकट वाळू मी बाळू सारखी नाहीं झाले. मी वाळूच चाळणीतून गळाले बिगाऱ्याच्या हाताने कामकरणीच्या पायाने तुडवली पगाराच्या आशेने कंत्राटदाराने पळवले विकले ट्रक टेम्पोतून शहरात आणलं, दूर प्रांती नेलं, कामात बांधलं - बांधकामात बरं का भिंतीत कोंबलं अगदी मी अनारकलीच बाई कदाचित बाळूला ही वाटत असेल मी अनारकली असेल किंवा भविष्यात होणार म्हणूनच तर हे रूपक आणि ही उपमा लडिवाळ लाडीगोडी * असू द्या म्या गवळण बरी बरं का बरखा बाय तर काय म्हणत व्हते, हो अनारकली, या शतकाची कंत्राटदाराने विकलं बिल्डरांनी बांधलं बंगलं इतरांनी बांधल्या इमारती फ्लॅटच्या ब्लॉकच्या अन मी अभिसरिका असंच ना ? आवं व्हय म्हणा की मी तशातली न्हाय हाय पण कंत्राटदार अवं तो इनामदार व्हता धरणग्रस्त झाला, सरकारनं त्याला परमिट दिलं वाळू उपश्याच, वाहण्याचं अन विकण्याचं सुद्धा अन आता. आता वो बया म्हणतो कसा मी होणार आमदार, खासदार वाळूच्या जोरावर कलेक्टर बोलतात बोली लिलाव कंत्राटदार करतात चाळणी चढाव * वाळू मी दस्यु मध्ययुगातली की अध्ययुगातली धरणाच्या भिंतीत बसवलं उजव्या डाव्या कालव्यात पाटात मलाच जास्त कोंबलं भुळभुळीत सिमेंटासोबत सिमेंटानं मिठीत घेतलं म्हणावं तर तोंडाला लेप फासल्यावाणी तोंडानाकात डोळ्यात बसलं ओल धरून कोरडं झालं कालांतराने घट्ट मिठीमारुन * पहिला किष्णा म्हून आला अन भेटला गणप्या पेंध्या म्हणावं तरी काय बाय अन आता हा बाळ्या माझ्यापुढे गवळण सोडून कविताच करेल म्हणतो बोलता बोलता ! साहित्य आणि संस्कृती साठीची धडपड नाहीतर काय हाय काय आणि नाही काय उगीच मेलं * मी बाळू वाळूला शोधत गावोगाव फिरतो नद्या बुडाल्या धरणाधरणात गावागावासोबत अंतरंगात वाळू गावं बुडाली बुडाली गावं वाळूचे भाव चढतात राव कंत्राटदार, बिल्डर, भाऊसाहेब, तालुका सदस्य, तहसीलदार, जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार गावकरी, पंच, सरपंच सारे सारे भागीदार * तर काय म्हणत होते धरण-कालव्याचं, हो की बया माह्यासोबत खडाखडी लहान मोठी मी गोलंमटोल गारगोटी वर्गी आडवा आला उभा बसविला दगड गोटा अगदी नर्मदेचा सुद्धा माझं मधल्यामधी मरण ना हात ना पाय हालचालीला ना हाक ना बोंब करायची पाळी आवं तिकडं अमेरिका खंडात दक्षिणेत बरं का माया इन्का बाळूच सांगतो बरं का संस्कृतीच पुराणी माझा संबंधच नाय हाय सगळं आकार विकारांचा मांडणी कारभार सांध्या बांध्यानी जोडलेला गाभा सांधलेला माह्याविना भी लावणी सजली की बया फड उजवला म्हणा की! * बया आपलं नाम्या ज्ञान्या एक्या तुक्या नदीतीरा अंघोळीला आलं त्यांचं पाय माझ्या माथी सारा देह रोमांचित रांगला पतित पावन म्हणा तसं होऊन गेलं चिखलात मी आनंदी झाले अहिल्येवानी जीवन न्यावून निघाले पुन्हा पुन्हा आता सागरतीरी पंढरपुरी घेईल विश्रांती वाळवंटी युगे युगे जनी आली दळण घेऊन जोंधळयांसोबत मी पण भरडली चुकार तिच्या जात्यात कबीराच्या म्हणण्याप्रमाणं नाही राहिले साबूत दोन चाकाच्या मध्ये ना राहिले आसाभोवती चिटकून कमाल म्हणाला तसा कणी कणी झाले माती पिठात मिसळला अंतरंग रोमांचित देह नैवद्य केला नामाच्या पांडुरंगाला बाई मी अंतर्धान पावले जनीच्या मुठीतनं देव भेटला नाही कसं म्हणू विटेवर दिसला नाही तसा व्हय व्हय वाळवंटात फिरतो सवंगड्यांसोबत चंद्रभागेतीरी माझेंचं सगेसोयरे न्हातात झेलतात आनंदाच्या उड्या थंड पाण्यात गरम वाळवंटात मीच वाळू गाळातली बाळकिष्णाच्या हातातलं दही जसं माझं अंग रोमांचित वारंवार वाळू वाळू जन्ममरणांती चाळू गाळू भव भवंती भावा अंती कण ना कण अंगाचा विरघळतो अन मी साक्ष परिवर्तनाची पुंडलिकाची वीट विठ्ठला म्होरंची बाळू बालकिष्णाच्या लीला न्याहळतो डोळा पहावी पंढरीगत जनीचे जात्यावरील गाणे गुणगुणतो वाळूवर वाळवंटात बघ ही वाळू आता चालता बोलता कविता करते स्थिती स्थापकत्वाचे गुणधर्म सांगते ती विटेत दडून बसली युगयुगांती वाळूची रेती बनून पुन्हा सीतेची अग्नी परीक्षा देऊन स-आकार संजीवन विटेवर वीट रचून भिंत चालली ज्ञानयाची चांगदेवाचा केव्हढा तो पाहुणचार मी धन्य झाले त्या सोहळ्यात करताना पाहुण्यांचे आदरातिथ्य बाकी जनांचा उगा मानापमान सनातन्यांच्या केव्हढा तो गर्व असा तुडविला पायी पायी मला आठवली स्थिती घाण्यातील यज्ञाचे रचिता मंडल भूमंडळी प्राणांची आहुती देती विभूती माथी माझ्या. आदरातिथ्य करताना पांडुरंगाचे पुंडलिकाच्या हाती लागले पटकन भिरकावली मला अवकाशात समोर उभा विराट विठ्ठल पाहुणचार स्वीकारला चिडीचीप विटेवर साधला पवित्रा अंगी हाताचा कटीवर भार परी पितांबर लोळे भोवती पवित्रा रंगला मातापिता सामोरी युगकर्ता आणला दारी भक्ताने. * युगेयुगे सोसला सासुरवास चटक्या फटक्यानी यांची झाले वीट विठोबा डोईवर घेऊन मी सावधानता पाळली पुंडलिकाची मांडी आईबापाच्या उशाला नाही कसं म्हणू मी तवापाष्ण घट्ट घट्ट सर्व वारकरी संप्रदायात ठोसलं तुझ्यावाणी अन तू बाळू वारीत पाहतो देवळा भोवती इमारती अन देवळं इमारतीत गावात शहरात माझ्या अविष्काराचं भावीक शिल्प. * मी बाळू वाहत गेलो तर्काच्या अनुषंगाने ही वाळू वाहत आली युगे युगे पांडुरंगाआधी आदरतिथ्यासाठी घट्ट बनून पुंडलिकाहाती वीट झाली विठ्ठलाची बांधून ठेवला समुदाय संप्रदाय दैवविलास की अंतर्विरोध कणकणांचा. * मी वाळू वाहून आणलं मला किनाऱ्यावरून नदीतुन पात्रातून डोहातून उपसा झाला पदर ओढला द्रौपदीचा म्हणा हवं तर दरबारात मांडतात पंच सप्त तारांकित महालात मंडपात माजघरात ग्रॅनाईट मार्बल खाली अंथरतात धड पिलर बीम मध्ये चेळुन बसवतात घट्ट निम्मी खडी चतकोर लोखंड छटाक सिमेंट बटीक मी कौरवांच्या धुत खेळातील मंतरलेली घडी पालथी न पडणारी जशी कवडी संगती सोबतीला दास्य संस्कृतीच नाही का ? * मी वाळू बंडखोर म्हणा हवं तर वाहत राहिले पाण्याच्या प्रवाहातून वळणात लवण्यात लपून दडून राहिले शांत निपचित उन्हातान्हात पडून राहिले युगे युगे पूर आले धाकवून नेले पुढच्या वळणाला सोशिक मी सोसत राहिले धाक पोहचत राहिले गावाला दुसऱ्या तिसऱ्या रगडल्या कोरा झाले गोल रूप बदलीत मी रेतीच्या कणांची अपारदर्शक मी काचेची गारगोटी मुरमासोबत ठिसूळ झालेली कोरडी माझी त्वचा इमारतीसोबत मी अभिसारीका झाले अन उडत गेले आकाशात ढगाला कवटाळले सूर्यकिरणांना अंगावर घेतलं पावसाच्या थेंबाला झेलताना ओलं चिंब झालं अंग नवख्या स्पर्शाने आठवलं कुठं डोहाचं धाकलपणं अन कुठं नवठाळीचं अवखळी रांगडं झोंबनं काय म्हणू बाय आता ज्ञानोबाला हे वो कसं कळलं * मी बाळू भिरकवतो मुठीतील एक खडा नदीपार पाण्याच्या पाठीवरून मोजतो वळयांची संख्या टप्पा टप्पा दूर दूर गोल गोल माझे फिरणे अंगाला पाणी नाही शिवत पल्याड जाईपर्यंत काय असत वलयवलयात विचारा मला वाळूला जन्ममृत्यूचा पट काळ देण्याघेण्याची धावपळ आरंभ अंताचा भवसागर मोक्ष निर्मोहाचा अवकाश छंदी छंद चंद फिरतो मंद डोहाच्या तळी आनंद कंद बसला ऐकत तुक्याची तळमळ तळाचा मळ गाळ पाण्यात वह्या बुडविल्या कोणी ? दरडावून जाब विचारला वाळूला * मला तर ठाव नाय उत्तरात उत्तरली बाय पाण्याला ठाव हाय किनारा दोन्ही कडचा साक्षी घ्या किनाऱ्यावर म्हटलं मी तळाला निपचित पदस्पर्शाचा गाळ पंत आले महंत आले गलबला केला ऐकले बोल वर वर खोल खोल सोड सोड पाण्यात महात्म्य वरखाली खालीवर ध्वनीची स्पंदने दिवसरात्र रात्रंदिवस एक नाही तेरा तेरा गात नामोरव विठ्ठल विठ्ठल वाळूच मी शहारले स्पर्शाने गाथेच्या गाळाचा थर गेला वाहून मनाहून मनापासून कागदावरच्या शाईसारखं नव्हतं पक्क विरस निरस त्रास त्रास मी साधला संवाद शेजारणींशी शेजाराणींनी कळविले शेजारी शेजाराणींना तेराव्या दिवशीं निरोप पोहचला पंढरीत पांडुरंगाला देवच तो तात्काळ तत्क्षणी प्रकटला डोक्यावर गाथा घेऊन देवाच्या पायाखाली पुन्हा पुन्हा पावन होताना शहारून गेलं अंगाचं सगळं अवयव गाळ गेला मळ गेला गेली मळ मळ तळ मळ तुक्याची गळी पांडुरंग देवाला माणसाचं केव्हढं अप्रूप नाथ ही आलं वारंवार स्नानाला आलं गेलं, गेलं आलं, करत बसलं आंघोळ मी बया बघतच बसले नाथांचे न्हानं काय बया दशा पूजेची घाटावर पायउतार नामदेवांचा काय सांगावं कित्येक नद्या पार केल्या घुमान पोहचले प्रत्येक वेळी भेटीचा योग आडात नाही पडले वेढ्यात वेडात नदीकाठी डाव मांडीला वाळवंटातले खेळ खेळले उन्हातान्हात विठुरायाची लेकरं सोबत अंगा खांद्यावर घेऊन फिरले हिंदोस्थान एकदाच कलकलाट ऐकला पोरांचा नको वाटलं हे जिणं लाजिरवानं डोहाच्या तळातलं आईबापांच्या वियोग, मी चरकलेच दगडावर दगड घासून चमडीला चटका बसावा पाण्यात झटकाच विजेचा ढगातून डोहात. कर्मवैफल्य की आत्माभिमान दृगमुडता की दांभिक सामाजिकता मी बया काळीठक्कर पडले तवापाष्ण शतकानुशतके पाहत राहिले कित्येक जीवांचे आततायी जीव घेणं अनाठायी अविचारी डोंगरमाथा ते अथांग समुद्रधुनी आत्मदहन आत्महत्या गळफास खोल खोल अति खोल डोह * चिंब झाली चिमणी चिमूटभर पाण्यात न्हाऊन निघाली बाळू ने वाळूचा खडा फेकला अलगद हाताने एकाग्र चिमणी उडून गेली आभाळात चक्राकार * मी वाळू हजारो वर्षे घरंगळत सावरले अंतरंग चाळ चाळ चाळली वाळू घोळ घोळ घातला पिंगा मोठ मोठी लहानसहान वेगळ्या सगळ्या चाळण्या सीमेगणिक गावं गावागणिक माणसं माणसागणिक भाषा भाषेगणिक संस्कृती इतिगताची तथागताची रेतीच्या थराथरात सापडते पुरातन देहाची सनातन संस्कृती विसावलेला देह आकार सदृश्य शिल्प म्हणा घोटीव गाठीव भरीव जन्माची माती करून उरलेलं अवशेष विशेष हे की माणसाची ही माती झालेली अन मी तर पाषाणाची वाळू * चाळून चाळून भाषेच्या जंजाळात डोकावले शब्दातून वाळूवानी गुळगुळीत झालेले घासून घसरून वापरून वापरून शतकानू शतके गोटेच गोटे तापी नर्मदेचे थोर झाले अश्वत्थाम्याच्या शोधात भाषा गुळगुळीत शेवाळी मवाळ आत कणखर टणक डी एन ए वाळूचे अनादी काळाचे आळवावरील बिंदू पाण्याचे तेलखाणीतील वाळूमय द्रव की द्रवमय वाळू वाळूत घडला इतिहास तेलाचा वाळवंटात भूगर्भ तेलाचं समागम सौख्य धर्म अधर्माचं काळी रेती काळ्या बेटात नैतिक सहजतेचा सुरती संगाचा अक्षय अक्षय अभय अभय देश आला सीमा आल्या कारण आलं तर्क आलं तत्त्वं आलं राजकारण झालं, युद्ध झालं, झालं वादविवाद जागा कमी संवादाला बाद कसे होतील सर्व गारदी, फिरंगी, तालिबान, गरेबान गद्दार. * चिनाब रावी बियास सतलज गंगा जमुना ब्रह्मा सरस्वती तापी नर्मदा चंद्रभागा कावेरी भामा इंद्रायणी कृष्णा गोदावरी घरी अंगणी वाहती रेती न हाती रहाती वाळू मी अगाध ल्ह्याले वैखरीचे बोल नाचती नागडी नार वळणावळणावर चमकती गार आकाशात चांदण्या नदीतील तारे किनारी सारे ओंजळभर चाळ गळ्यात माळ माजतो माळ डोंगरी मळ्यात पावलात गाळ चिखलाची पैंजण हिरवे रान पारवे भान देश आला शिवा आल्या वाद आला वादी आलं नदी काठी भेटी गाठी साठ मारी सोटा मोठा धाव आली घाव बसले वाळूवर जगणं वाळूवरची चूल वाळूवर जाळ वाळूवरचे चटके फटके फटाके बाजी मारली सीमापार शिवा दुभंगल्या वाळूकारणे * मी बाळू वाळूच्या वानावर भाळू लागलो गाळू लागलो तेल वाळवंटात डांबराचे मळे, पेट्रोकेमिकलच्या फॅक्टऱ्या मॅटर वाढला कलाकलाने, चढला चढनीतील शेअर चढ्या बाजारात देशोदेशी पाहिला रब अरबांनी मी गरीब मुलूखमुलूखाचा बेकार चुकार चकार शब्द न उच्चारता दंगलीत दगड फेकतो अंमलदारांच्या सरंजामी चिथावणीखोर भाषणाविरुद्ध. * मी बाळू खेळलो कुस्ती गरम वाळूत मध्यान्ही चितपट केलं सवंगड्याला नदीकाठी दाट वाळूत अनवाणी चालत राहिलो वळणावर काटेरी रान मळईच्या वावरात वाढलेली तणांच्या मुळांनी घट्ट धरून ठेवलेली वाळू अन रेती कुस्तीच्या पाहिलवानचं पिळदार अंग संगाशी जसं * वाकड्या वळणावर पाण्याचा थाट डोह खोल उथळ पाणी, खळखळ फार पायाखालची वाळू सरकते धावत्या धारेत तोल सांभाळायला आधार हवा टेकू होत नाही हवेचा जोर फेकून फेकून वाळू हाताने थकलेले खांदे झुकलेले तोल शरीर तरंगते पाण्यावर अवचित हा बाळू पाण्यात पोहतो बालपणापासून बैलांची जोडी डोहात धुतो गाय म्हशींसोबत पहुडतो वाळूवर घेतो ऊब पोटा-पाठीला वाळूच ती गुणग्राही ऊर्जाधारी उघड्यावरील गरमागरम भर मध्यान्ही उघडा नागडा संग क्षणात भिजतो पाण्यात रक्त वाहते धमन्यात जोरात ताजातवाना काळ ऊर्जा विस्मरणात ही धावते सळसळ वाळूची संगत अशी विसरू कशी. ***