Skip to content Skip to footer

जटिल धुळधुसिर : आशुतोष पोतदार

Discover An Author

  • Writer

    आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक, भाषांतरकार, संपादक आणि संशोधक आहेत. आशुतोष यांच्या नावावर नाटक, कविता संग्रह, भाषांतर तसेच संपादने अशी सात पुस्तके असून ते मराठी आणि इंग्रजीमधून लेखन करतात.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer of several one-act and full-length plays, poems, and short fiction. He writes in Marathi and English with seven books to his credit. He is Associate Professor of literature and drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art and Performance), FLAME University, Pune. 

‘हाकारा’चा नवा अंक साध्या दिसणाऱ्या, कधी श्वास कोंडवणाऱ्या तर कधी आपल्या नजरेपासून लपून राहणाऱ्या सूक्ष्म अशा धुळीभोवती गुंफला आहे. धुळीच्या जागा जिथे तिथे असतात – छपरावर, भिंतीवर, जमिनीवर, पानांवर, खिडक्यांवर, सांदीकोपऱ्यात आणि प्रकाशाच्या तिरप्या किरणांत. धूळ नाही अशी जागा सापडायची नाही. धूळ आवडते अशी दुर्मिळ व्यक्ती सापडली तर ती शास्त्रज्ञ किंवा कलाकार लोकांत. धूळ झटकण्याची कृती माणसाच्या जन्मापासून सुरू आहे असं वाटतं. धूळ जागा बदलेल पण ती असेल. जन्माला आलं की धुळीत खेळणे हा जन्मसिद्ध हक्क असतो म्हणूनच कदाचित संत ज्ञानेश्वरांनी लिहिले असेल ‘जटिल धुळधुसिर अंगणी बाळ-चंद्र खेळता दिसे’. त्याचवेळेस, धुळीत मिसळणे हे चिरंतन सत्य. धुळीने माखलेल्या त्या विशाल अवकाशात कृष्णाच्या मुखात यशोदेने सारे ब्रह्माण्ड पाहिले. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीने धुळकटलेल्या चार भिंतींच्या आड रामायण-महाभारतादि विश्व उलगडून पाहिली असतील. त्या चार भिंतीआड  हळुवार भावना आणि स्पर्श जाणवून आपल्यातल्या तो/ती/ते ला  स्वतःच्या अस्तित्वाच्या असलेपणाची ओळख झाली असेल. लपून छपून काहीतरी बोलण्याची जागा धुळींनी भरली नसेल तर गुपित सांगण्याच्या नाट्यातले नेपथ्य आपण हरवून बसू. उत्कटतेच्या भाषेचे प्रगटीकरण करण्याची हीच ती जागा जिथे धुळीच्या मुळाक्षरांनी मानवी रहस्याचे महाकाव्य रचले जाऊ शकते. 

नको असलेली, डोळ्यात खुपत राहणारी, स्वतःला हवी तशी जागा करून ठेवून अढळत्व प्राप्त झालेली काव्यमय वाटणारी धूळ कलाकार आणि अभ्यासकांना खुणावणारी वाटली तर आश्चर्य वाटायला नको. दृश्यस्वरूपात दिसणारी स्थिर चित्रकृती वाटण्यापासून ते तिच्यावर काव्य रचण्यासाठी धुळीलाच आपल्या मांडणीचा विषय बनवून अनित्य आणि क्षणभंगुर जीवनाचे सूचन मांडणाऱ्या विचारवंतांची, कवी-कलाकारांची मांदियाळी आपल्याला दिसू शकते. 

प्रगल्भ आणि संवेदनशील प्रतिभावान धुळीकडे असं काही पाहातात की, शर्मिला फडकेंच्या भाषेत सांगायचं तर, ते ‘धूळ’ या शब्दाचा मायनाच बदलून टाकतात. मग त्या कमल देसाई (१९२८-२०११) असोत, मान रे (१८९०-१९७६) आणि मार्शेल दुशां (१८८७-१९६८) असोत किंवा साय गुओ चांग (१९५७) हे चीन मधले कलाकार. हे सर्वजण धुळीतले सौंदर्य ते टिपतातच. पण, बाजूला पडलेले आणि अव्हेरलेले रोजच्या जगण्यातल्या सामान्यत्वातले साचलेले कण, कमल देसाई म्हणतात त्याप्रमाणे, घासून पुसून “चिंचेने लखलखीत घासलेल्या कळशीसारखे” ते चमकवून टाकतात. असे प्रतिभावान रूढ अर्थाने सुंदरतेतलं सौंदर्यतत्व शोधण्याच्या पलीकडे जात धुळीसारखे बाजूला पडलेले जे काही – वस्तू, व्यक्ती, समूह तसेच निसर्गातल्या वेगवेगळे घटक – अशा सर्वाना स्वतःचा पैस देण्याचे प्रयत्न करतात. इथे साय गुओ चांग चिनी कलाकाराचे उदाहरण देता येईल. चांग बंदुकीतल्या दारूची धूळ आपल्या नाटकीय स्थापत्य चित्रणासाठी वापरतात. बंदुकीतली दारू चीन मधल्या प्राचीन, परंपरागत जगण्यातल्या व्यवहाराचा भाग. पण, कलेसाठी बंदुकीची दारू पारंपरिक साधन नाही. पण, तेच चांग यांच्यासाठी अभिव्यक्तीचे एक साधन ठरते. बंदुकीतल्या दारूच्या धुळीला समोर ठेवून काही तरी उभे करणे म्हणजे एकाच वेळेला जे काही चालू आहे त्याबद्दल आदर आणि विफलता दाखवणे. एकाच वेळेला मर्त्य जे जे काही दाखवताना त्यातले अविनाशी सौंदर्य मांडणे. याचाच अर्थ, चांग यांच्यासाठी धुळीचे कण म्हणजे फक्त विस्थापित होत राहणारे मोघम कण नाहीत तर कणांना अवकाश देणाऱ्या समष्टीशी नाते जोडू पाहण्यासाठीच्या प्रक्रियेतील एक टप्पा. 

सर्वसाधारणपणे बोलायचे तर, धूळ म्हणजे मर्त्यपणाचा अविष्कार. धुळीच्या रूपातून नश्वरतेविषयी चिंतन टी एस इलियट या महान कवीनेही मांडले आहे. आपल्या द वेस्ट लँड या दीर्घ कवितेतल्या ‘द बरियल ऑफ द डेड’ या पहिल्या तुकड्यात ते लिहितात: “सर्वजण त्याच ठिकाणी जातात; सर्वजण येतात धुळीतून, आणि मिळतात धुळीला सर्वजण“. मर्त्यपणाला चिरंतनाचे रूप देण्याचे असे प्रयत्न मानवी संस्कृती करत आली आहे. जे टिकणारे नाही त्याला एक आकार देणे. पूर्ण नसलेले पण पूर्णत्वाची आस धरण्याची प्रबळ इच्छा असण्याच्या मानवी धडपडीतून धुळीकडे पाहिले गेले. पण, इलियटसारखे कवी नश्वरतेपुरतंच बोलून थांबत नाहीत. ‘सर्वजण येतात धुळीतून’ असे म्हणत ते नवनिर्मितीबद्दलही भाष्य करतात. बायबल मधल्या ‘जुना करारा’तला विचार पुढे नेत इलियट मृत्यूबद्दलची माणसाला असलेली भीती शब्दबद्ध करत धुळीद्वारे मृत्यूनंतर आपण विसरलो जाण्याच्या भीतीवर ते प्रकाशझोत टाकतात. मृत्यूनंतर आपली ओळखसुद्धा धुळीसारखी उडून जाईल ही ती मानवी भीती. अर्थात, या भीतीपायी वेगवेगळ्या संस्कृतीत मृत्यूनंतरही अमर राहण्याचे मार्ग सुचवले गेले आहेत. त्यातला, एक म्हणजे जिवंतपणी आपल्या कर्तृत्वाचा न पुसता येईल असा ठसा उमटवण्याचा मार्ग. या व्यतिरिक्त, विसरले जाऊ नये या हेतूने वेगवेगळ्या संस्कृतींत विधी परंपराही जन्माला आल्या. एका अर्थाने, कर्तृत्व सिद्ध करण्याचे मार्ग आणि परंपरागत विधीपरंपरा म्हणजे उडत्या धुळीला गोठवण्याच्या दर्शनीय आणि प्रतीकात्मक कृतीतून मानवी अस्तित्वाला येनकेन प्रकारे चिरस्थायी करण्याचे प्रयत्न. थोडक्यात काय तर, जन्माला येणारे सारे धुळीत मिसळते इतक्यापुरते धुळीचे आकलन मर्यादित नसते. कारण, धुळीकडे पाहणे म्हणजे निव्वळ कणांकडे पाहणे नसते. तर भू-आकाशाच्या पार्श्वभूमीवर स्थिर आणि अस्थिर, घट्ट आणि सैल, हरवणे आणि मिळवणे यामधल्या रिकाम्या जागांचा शोध घेण्याची ती जटिल धूसर प्रक्रिया असते.  

जटिल धूसर प्रक्रियेत धूळ म्हणजे मृतप्राय हे ठोकळेबाज गृहीतक मोडून पडतं. अभिव्यक्तीसाठी आणि चर्चेसाठी धुळीचा विषय घेतला यातून आपल्या लक्षात येते की धूळ मृतप्राय नसते. टी एस इलियटने म्हटलंय आणि आपल्याही सहज बोलण्यात येते तसे शेवटी सगळे धुळीला मिसळतात. पण, तशाच धुळीतून नवे जीवन सुरू होते. म्हणजे, मरणात धूळ असते तशी ती जगण्यातही असते. आणि म्हणून ती जटिल बनते. वरवर पाहता, धूळ हे विनाशाचे आणि मानवी मर्त्यतेचे प्रतीक बनले आहे. पण जेव्हा इलियटने लिहिलेले “मूठभर धुळीत तुम्हाला भीती दाखवतो” हे वाचतो तेव्हा वाटते की भीती दाखवण्यासाठी धूळ नाही तर धूळ स्वतःच भीती आहे. एकाच वेळेस मर्त्य आणि अमर्त्य, नसणं आणि असं, विनाश आणि निर्मिती यामध्ये धूळ उडत राहते. 

कधी निरुपद्रवी तर कधी त्रास देणारी धूळ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या आपल्या विचार आणि भावविश्वाचा भाग बनून गेली आहे. धुळीची नानाविध रूपं, आकार, रेखाटनं, प्रतीकं आणि त्यामागच्या भावभावना विचार ‘हाकारा’च्या नव्या अंकात आपल्याला दिसतील. एका बाजूला, तरल, दिसलेपणाच्या पलीकडे जाऊन प्रतिमांच्या रूपात काळ अवकाशाचा ठाव घेणारं धुळीचे गोष्टीवेल्हाळ रूप हिमांशू स्मार्त आपल्या ‘माळावरच्या धुळीत’ या लेखात दाखवतो. तो लिहितो, “धूळ म्हणजे बंध सैलावलेली माती. धूळ म्हणजे भवाच्या प्रत्येक नमुन्याचं-अंशांचं सर्वात्म सूक्ष्मपण. धूळ म्हणजे मागे पडत जाणाऱ्या काळाची पूड. धूळ म्हणजे ग्रीष्मातल्या अष्टौप्रहर उष्णतेनं अत्तरासारखं उडून जाणारं आपल्या बाह्यरूपाचं कणपण.” दुसऱ्या बाजूला, उठता बसता ‘डिजिटल’अनुभव घेणाऱ्याला स्पर्शात्म संवेदनांच्या पल्याड त्या डिजिटलीय अवकाशात धूळ कोणत्या स्वरूपात असू शकेल याचा अदमास घेत, कल्पना करत त्याबद्दल विचार तसेच दृश्य मांडणी करण्याचा प्रयत्न सोनम चतुर्वेदी करताना दिसते. डिजिटलीय – आभासी  अवकाशात धूळ आपल्याला नेहमी दिसते तशी नाही पण मग ती आहे कशी आहे या महत्त्वाच्या प्रश्नाला सामोरी जात सोनम तिच्या डिजिटल जर्नल मध्ये वास्तव आणि आभासी जगातले परस्परावलंबी नात्याचा आढावा घेत खेळणाऱ्या धुळीची दृश्य मांडणी करते. 

वास्तव आणि आभासी जगातल्या मोठ्या अवकाशात एकमेकाला छेद देत, वेळोवेळी आपलेसे करत, तसेच एकमेकांची अदलाबदल करत तरीही स्वतंत्र असणाऱ्या बहुविध जगांची निर्मिती ‘धुळी’ च्या नजरेतून होणे आपणा सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. धुळीच्या स्वरूपाचे  आकलन करून घेण्याच्या प्रक्रियेत वास्तव म्हणजे  खरेपण किंवा आभासी असते ते खोटे अशी सुलभता राहत नाही. खरेपणाची ताकद वाढवण्यासाठी ‘आभासा’ची मदत होते तर आभासी जगातले सत्य आकळण्यासाठी ‘वास्तव’ जगाचा टेकू लागतो. अशा प्रक्रियेत, असणं आणि नसणं, जगणं आणि मरणं या दोन ध्रुवांना सहजतेने बांधणारी धुळीची ताकद वास्तव आणि आभास अशा ध्रुवात्म मांडणीला लांघून सत्याचे नवे अन्वयार्थ लावण्यास मदत करते.  निव्वळ परिणाम काय साधला यातून अन्वयार्थाचे आकलन होणार नाही तर प्रक्रियेकडे तितक्याच डोळसपणे पाहावे लागेल असे ‘हाकारा’ तून प्रकाशित होणाऱ्या साहित्य आणि कलाकृतीतून आम्ही मांडत आलो आहोत. शहरात आजूबाजूला चाललेल्या सततच्या बांधकामात आणि पाडापाडीत रुची घेणारा एम प्रवात हा कलाकार हाकारात प्रकाशित आपल्या दृश्य मांडणीच्या टिपणात लिहितो त्याप्रमाणे, एखाद्याचे अनुसरण करणे हा वाढीचा स्थायीभाव असला तरीही ती वाढ अनुभवण्यासाठी प्रवात सारख्या कलाकारांना प्रक्रिया महत्त्वाची वाटते कारण इथे कलाकार भिंतीसारख्या घन-वृत्तीच्या अंतरंगात शिरून तिथले वेगवेगळे पदर उलगडून पाहू शकतो. बसलेली आणि डोळ्यात उडणारी जटिल धूळ असे वेगवेगळे पदर उलगडून दाखवेल या आशेने ‘हाकारा’ची आवृत्ती आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. 

चित्र सौजन्य : Photo by Shelby Miller on Unsplash

Post Tags

4 Comments

  • नीरजा
    Posted 18 जुलै , 2021 at 10:24 am

    जबरदस्त संपादकीय. इलियटच्या दोन ओळींना किती विविध अंगानं उलगडलं. खूपच छान. बाकी वाचतेच. पण धुळीला मानाचं पान दिल्याबद्दल अभिनंदन!!!

    • आशुतोष
      Posted 18 जुलै , 2021 at 1:03 pm

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  • Savita Talele
    Posted 29 जुलै , 2021 at 10:09 am

    Poetic, subtle yet going deep within, reflective words woven around the metaphor of DUST. Simply Enchanting !!!

Leave a comment