Skip to content Skip to footer

स्पर्शाचं जग : आशुतोष पोतदार

Discover An Author

  • Writer, Translator, Editor and Faculty

    आशुतोष पोतदार हे नाटककार, एकांकिकाकार, कवी, कथाकार, अनुवादक, संपादक आणि संशोधक-अभ्यासक असून ते मराठी आणि इंग्रजी ह्या भाषांत लेखन करतात. त्यांची नाटक, कवितासंग्रह, अनुवाद, आणि संपादित ग्रंथ ह्या प्रकारांत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते पुण्यातील फ्लेम विद्यापीठामध्ये रंगभूमी आणि प्रयोग-अभ्यास विभाग (अभिकल्प, कला आणि प्रयोग प्रशाला) येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून साहित्य आणि नाटक ह्या विषयांचे अध्यापन करतात. आशुतोष हाकारा | hākārā-चे संपादक आहेत.

    Ashutosh Potdar is an award-winning Indian writer known for his one-act plays, full-length plays, poems, and short fiction. He writes in both Marathi and English and has seven published books to his credit. He is currently an Associate Professor of Literature and Drama at the Department of Theatre and Performance Studies (School of Design, Art, and Performance) at FLAME University, Pune. He is the editor of हाकारा | hākārā.

स्पर्श, स्पर्शभावना, स्पर्शज्ञान आणि स्पर्शभान हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत; आणि ते विश्वाच्या निर्मितीकाळापासून अनुभवले आणि चर्चिले जात आहेत. या सर्वांबद्दलची प्रत्येकाची समज वेगवेगळी असू शकते. पण सर्वांसाठी सामायिक असणारा अनुभव आणि मुद्दा म्हणजे, भवतालाविषयीच्या जाणिवा आणि नेणिवा स्पर्श या संवेदनेतून आकाराला येतात. चव, गंध, दृष्टी आणि श्रवण या इतर ऐंद्रिय संवेदनांबरोबर स्पर्शातूनही माणसं भवतालाचं आकलन करून घेत एकमेकांशी तसंच निसर्गातील विविध घटकांशी संवाद साधत असतात. लहानग्या मुलाला उराशी कवटाळण्यापासून ते पुस्तकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्याने हळुवार हाताने एखादं पुस्तक कपाटात नीट जपून ठेवण्यापर्यंत — स्पर्शाच्या अभिव्यक्ती बहुआयामी आहेत. स्पर्श ही बहुरूपी संवेदना, अर्थपूर्ण गोचर शब्दरूप उभं करण्यापासून ते धूसर, अमूर्ततेचं दृश्यशिल्प घडवण्यापर्यंत कलाकारांना आणि विचारवंतांना प्रेरणा देत असते. 

हाकारा | hākārāच्या २२व्या आवृत्तीत आम्ही ‘स्पर्श’ हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्शाकडे पाहण्याचे सर्जनशील तसेच चिकित्सक दृष्टिकोन समजून घेताना, या विषयावरील कलाकाराची आणि अभ्यासकाची भूमिका, निर्मितिप्रक्रिया, आणि स्पर्शविश्वाचं सामाजिक तसंच सांस्कृतिक परिप्रेक्ष्य हे पैलू या आवृत्तीतील प्रकाशित साहित्यात मांडले आहेत. स्पर्शाचं वर्णन असतं, स्पर्शाचं भान असतं, स्पर्शाची जाणीव असते, तसंच स्पर्श हा स्टिम्युलसही असतो. स्पर्शाचं हे बहुआयामी असणं आपल्याला हाकारा | hākārāच्या २२व्या आवृत्तीतील मांडणीमध्ये दिसून येईल.

हाकारा | hākārāतील एम्बरेसिंग द टॅकटाईल स्पेस: शेपिंग अन इंटरॅक्टिव्ह अँड इमरसिव म्युझियम  या आपल्या निबंधाची सुरुवात करताना ऋतुपर्ण गुप्ता स्पर्श-भावनेचं आणि स्पर्श-अनुभवाचं सुंदर वर्णन करताना लिहितात त्याप्रमाणे, एखाद्या मंदिरात प्रवेश करताच नंदीच्या दगडी मूर्तीवर हळुवार हात फिरवून परमेश्वराचा आशीर्वाद घेणं असो, किंवा चर्चमध्ये मेणबत्ती पेटवणं असो — माणूस स्पर्शाच्या आधारे वास्तव स्वरूपातील जगणं आणि अध्यात्म यांची सांगड घालत असतो. म्हणजे, स्पर्श-संवेदनेचा पट नेहमीच्या जगण्यापासून ते पारलौकिकापर्यंत, तरलतेपासून ते अस्वस्थतेपर्यंत, प्रेम आणि आस्थेपासून हिंस्रता आणि घृणेपर्यंत अनेकविध विचारांनी आणि भावनांनी व्यापलेला व्यामिश्र असतो. 

अंधत्वावर आणि बहिरेपणावर मात करून आपणा सर्वांना सकारात्मकतेची प्रचंड प्रेरणा देणाऱ्या हेलन केलर यांना जाणवलेला स्पर्श त्यांना ‘स्पर्शिक कंपनां’च्या जाणिवेपर्यंत घेऊन जातो.हेलन केलर यांच्या लेखाच्या प्राजक्ता पाडगांवकर यांनी केलेल्या स्पर्शाची ताकद या अनुवादामध्ये केलर यांची स्पर्शिक कंपनांविषयीची जाणीव वाचावयास मिळेल. हेलन केलर लिहितात : “स्पर्शिक कंपने आहेत, जी त्वचेच्या स्पर्शापुरती मर्यादित नाहीत. ती त्वचेत, नसांमध्ये, हाडांमध्ये प्रवेश करतात, जसे की, वेदना, उष्णता आणि थंडी. ढोलावरची थाप मला छातीपासून खांद्याच्या हाडांपर्यंत जाणवते. रेल्वेचा खडखडाट, पुलावरून जातानाचा खणखणाट, आणि दळणवळणाच्या समग्र साधनांचा आवाज, त्यांतून  बाहेर पडल्यावर देखील पिच्छा सोडत नाही. जर कंपने आणि गती मला एकत्रितरीत्या कितीही काळाकरता जाणवली, तर मी स्थिर उभी असताना पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटते. जेव्हा मी ट्रेनमधून उतरते, तेव्हा फलाटावर गरगरल्यासारखे वाटते, आणि मला स्थिरपणे चालणे कठीण होते.”

आपल्या शब्दकळेने प्रभावित करणाऱ्या विनोद कुमार शुक्ल या प्रतिभाशाली हिंदी लेखकाला भावणारा स्पर्श केलर यांना सामोरं जावं लागलेल्या परिस्थितीपेक्षा वेगळ्या परिस्थितीतून येतो. तरीही, वाचकाला त्यात साधर्म्य जाणवू शकतं. हाकारा | hākārāसाठी शुक्ल यांच्या तीन कवितांचे अनुवाद करणाऱ्या अनघा मांडवकर शुक्ल यांच्या कवितेविषयीच्या नोंदीत हे साधर्म्य आपल्याला जाणवतं. त्या लिहितात: ”विनोद कुमार शुक्ल ह्यांच्या सब कुछ होना बचा रहेगा ह्या कवितासंग्रहातली ‘आँख बंद कर लेने से’ ही कविता ऐंद्रिय संवेदनांच्या आपल्या प्रचलित संकल्पनेविषयी पुनर्विचार करायला लावणारी कविता आहे. दृष्टीवर डोळा ह्या शारीरिक अवयवाची मक्तेदारी नसून, अंध म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी स्पर्शच दृष्टीचे माध्यम कसा बनतो, हे ह्या कवितेतून प्रत्ययास येते.” 

अशा तऱ्हेने, आपल्याला दिसून येतं की स्पर्शभान असणारी संवेदनशील व्यक्ती — ध्वनी, दृश्य, शब्द, हालचाली, हातवारे किंवा एखादी चिन्हभाषा घेऊन — काहीतरी ‘म्हणत’ राहते. पण त्याच वेळी या सर्वांपलीकडे असणारं, अव्यक्त राहणारं एक स्वतंत्र स्पर्शविश्व असतं. आणि अशा विश्वाकडे पोहोचण्याचे मार्ग सर्वजण आपापल्या परीने शोधत असतात. 

हाकारा | hākārāच्या या आवृ्त्तीतील मांडणीची सुरुवात ‘स्पर्शा’त असणाऱ्या भाषिक आविष्करणांतून झाली असली, तरी स्पर्शाकडे स्टिम्युलस म्हणून पाहात या आवृत्तीतील लेखक, कलाकार, अनुवादक आपापल्या परीने स्पर्शविश्वाचं दर्शन घडवताना दिसतील. स्पर्शातील शारीरिक भावना; मानवी मन, शरीर आणि सर्जनशीलता यांतील नातेसंबंध; स्पर्श, अभिलाषा आणि अधिकारवृत्ती; विचारसरणीचा स्पर्श, भक्तिरूप आदर आणि अ-स्पर्श, आणि अस्पृश्यतेतून येणारं मूर्तिभंजन अशा विविध पैलूंना हाकारा | hākārāची मांडणी स्पर्श करू पाहते. 

स्पर्श ही संकल्पना संस्कृतिसापेक्ष असते. ‘हात लावणं’ ही क्रिया विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात आकारलेली आणि प्रभावित झालेली असते. वस्तुसंग्रहालयाच्या संदर्भातून स्पर्शाबद्दलचं आपलं चिंतन मांडताना ऋतुपर्ण रॉय संग्रहालयातील वस्तूंबद्दल निरीक्षण नोंदवतात की, जर संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूंकडे आकर्षित होऊन कोणी त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे अशी भावना एखाद्याच्या मनात निर्माण होऊ शकते. या आणि इतर भावना आणि विचार बरोबर घेऊन जेव्हा आपण एखाद्या वस्तुसंग्रहालयात प्रवेश करतो, तेव्हा तेथील ऐतिहासिक मूल्य असलेल्या वस्तू पाहणाऱ्याच्या मनातील सौंदर्यजाणीव जागृत करतात; पण त्याच वेळेस, त्या वस्तूंमधील ऐतिहासिक वा सामाजिक वास्तवही व्यक्तीला त्यांच्या दिशेने आकर्षित करत असतं. अशा तऱ्हेने, संग्रहालयाला भेट देणाऱ्या व्यक्तीला, ऋतुपर्ण रॉय यांच्या मते, “एक विशिष्ट मिश्रण अनुभवायचे असते — वास्तवाचे आणि अविश्वसनीय सौंदर्य आणि (मांडणी) कौशल्याचे”. वस्तुसंग्रहालयातील अ-स्पर्शतेच्या अनुभवांमुळे अनेकदा माणसं संग्रहालयांपासून दुरावत जातात. यावर उपाय म्हणून, काही संग्रहालयं अ-स्पर्शतेला पर्याय शोधताना दिसतात. एका बाजूला, स्पर्श-अनुभवाचे वेगवेगळे पदर उलगडून दाखवत, तर दुसऱ्या बाजूला, फक्त स्पर्श-संवेदनेवर विसंबून न ठेवता संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना बहुसंवेदनात्मक अनुभव देणाऱ्या कृती-कार्यक्रमांवर किंवा मांडणीवर भर दिला जातो. अशा प्रकारे, संग्रहालये स्पर्शात्मक किंवा अन्य अनुभवाशी अधिकाधिक संवादी स्वरूपाचे नाते उलगडत संग्रहालय-भेटीचा अनुभव अधिकाधिक मोहक बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

वस्तुसंग्रहालयातील वस्तूंना स्पर्श करण्यास जशी मनाई असते, तसाच काही वेळा विशिष्ट रोग झालेल्या व्यक्तीचा स्पर्श  टाळला जातो; तर काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला स्पर्श करणं किंवा तिला स्पर्श करू देणं हे निषिद्ध समजलं जाऊन, विशिष्ट व्यक्तीला आणि विशिष्ट समाजाला अस्पृश्य मानण्याच्या क्रूर कृती आणि विचारसरणी अस्तित्वात असतात. स्पर्शातून, भाषेतून आकारणाऱ्या संपर्क, सहवास, साहचर्य, सहकार्य या संबंधांच्या पायावर मानवी समाज-संस्कृती उभी असते. त्याच समाज-संस्कृतीत विशिष्ट माणसांशी, समूहांशी संपर्क व संबंध नाकारणाऱ्या अस्पृश्यतेच्या संकल्पनेच्या दिसून येणाऱ्या छटा स्पर्शविषयक सामाजिक-सांस्कृतिक भूमिकांतील, संकेत-प्रघातांतील गुंतागुंतींचं दर्शन घडवतात.

या संदर्भात, जयवंत दळवी यांच्या स्पर्श या मराठी कथेचा आशुतोष पोतदार यांनी इंग्रजीत केलेला अनुवाद उद्बोधक आहे. ही कथा, कुष्ठरोग झालेल्या एका स्त्रीला सोसाव्या लागलेल्या शारीरिक वेदनांचं, तो आजार बरा झाल्यावरही तिला सामोरं जावं लागलेल्या अपमान-अवहेलनेचं, आणि तिच्या एकाकी मनोव्यापारांचं सूक्ष्म-सखोल चित्रण करते. या कथेतून स्पर्शाच्या अभावाच्या मानसिक आणि भावनिक परिणामांचं मार्मिक चित्रण केलं आहे.

या आवृत्तीतील, गायत्री लेले, स्वाती बचाराम कांबळे आणि अजिंक्य घवते या तीन लेखकांच्या अनुक्रमे व्यक्तिगत कथन, कथा आणि संशोधनपर लेख या स्वरूपाच्या लेखनातून, लिंगभेदावर तसंच सामाजिक आणि वर्गभेदांवर पोसलेल्या समाजात वर्चस्व, सत्ता, अधिकार, शोषण, आणि शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पना यांमधून आकारणाऱ्या स्पर्शाच्या सामाजिक-सांस्कृतिक आयामांबाबतची मांडणी केली आहे. 

गायत्री लेले स्पर्शविश्वाच्या तटबंदी या आपल्या मराठी लेखात खाजगी आणि सार्वजनिक अवकाशात स्त्रीला सामोरं जावं लागणाऱ्या अनुभवांतून येणाऱ्या स्पर्शभानाची चर्चा करतात. त्या लिहितात:

“माझं स्पर्शविश्व नेमकं कसं आहे, त्याचा आकार नेमका काय आहे, याची माझ्या मनात ठोस कल्पना नाही. स्पर्श म्हटलं की काही टिपिकल मुद्दे पुढे येतात, आणि त्यांचा संबंध प्रामुख्याने भीती, लाज, संकोच वगैरे भावनांशी जोडला जातो. स्त्री-पुरुषांमधल्या शरीरसंबंधात होणाऱ्या नानाविध प्रकारच्या स्पर्शांची चर्चा कधी उघडपणे होत नाही, किंबहुना तशी ती होऊही नये असंच एक सार्वत्रिक मत दिसतं. त्यात तसं काही वावगंही नाही, कारण हे क्षण प्रत्येकासाठी वेगळे आणि अत्यंत खासगी असतात. परंतु स्पर्शाचं जग तेवढ्यापुरतं मर्यादित नसतं. विशेषतः स्त्रियांना खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात बऱ्याचदा नकोनकोशा स्पर्शांना सामोरं जावं लागतं. त्याबाबतचे अनेक कठोर कायदे करूनही गुन्हे घडत राहतात, आणि त्यामुळे त्यांचं स्पर्शविश्व भीतीने आणि संशयाने व्यापून जातं. कधीतरी कुणा पुरुषाचा चुकून वा अनवधानाने झालेला स्पर्शही थरकाप उडवतो. त्यामुळे स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी अस्पर्श राहण्याची धडपड करत राहतात.” 

तर, स्वाती बचाराम कांबळे यांच्या द डायकोटॉमी ऑफ टच  शेतमजूर स्त्रियांना तथाकथित उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय जमीनदार वर्गाकडून मिळणारी अस्पृश्यतेची वागणूक चित्रित करताना लिहितात: 

“The landlady set a small plate on the ground, then quickly stepped back, as if even being near them was hard work. 

Mangala and all the other women working in the field knew the drill well. They could not take the plate until their landlady had moved far enough, until there was no chance of their hands touching. 

Only when the landlady had turned and walked away did Mangala pick up the plate. It had cold – leftover rice, thin watery dal and a small serving of chutney. She ate quickly, not for the taste, but to fill the void in her stomach.”

अजिंक्य घवते यांचा अ ग्रामर ऑफ टच: कास्ट अँड अन/टच/अबिलिटी हा लेख भारतातील जातिव्यवस्थेसंबंधीचं स्पर्शाचं व अस्पृश्यतेचं रूप विशद करून दाखवतो. प्रा. अनिकेत जावरे यांचा Practicing Caste: On Touching and Not Touching हा ग्रंथ भारतातील जातिव्यवस्थेबद्दल मूलभूत मांडणी करतो. प्रा. जावरे, तसंच इतर काही अभ्यासकांनी केलेल्या मांडणीचा आधार घेत घवते आपली विश्लेषणात्मक मांडणी पुढे नेतात. घवते आपल्या लेखात मांडतात त्याप्रमाणे जातिरचनेत असणाऱ्या शोषण व्यवस्थेमुळे स्पर्श निव्वळ संवेदनांच्या स्तरावर राहत नाही तर तो खोलवर रुजलेल्या सामाजिक व्यवस्थेचा भाग असतो. ते लिहितात:

“The caste system has long structured touch as a regulation, distinction, and exclusion site. In this context, touch is not merely a sensory act but a profoundly social one, carrying different meanings and ethics based on caste hierarchies. The Brahmin and Dalit bodies are not merely biological entities but socially constructed surfaces of meaning, marked by the ethics of touch, purity, and defilement.”

या पार्श्वभूमीवर, स्पर्शाचे नीट आकलन करून घ्यायचे असेल तर स्पर्श आणि सामाजिक संघटन यातील नात्यांची चोख तपासणी होणे गरजेचे आहे असे महत्वाचे प्रतिपादन करत घवते आपल्या लेखात पुढे लिहितात: 

Understanding this requires an examination of the different modalities of touch and their societal organization. I first explore its sensory modalities — the organs, objects, and theories that shape how touch is understood and regulated — before moving to the different elements and forms of touch, in a genealogy of untouchability.”*

घवते यांच्या मांडणीत प्रा. सुंदर सारुक्काई या ज्येष्ठ तत्वज्ञ आणि अभ्यासकांच्या मांडणीचाही आधार आहे. आवर्जून नोंदवावीशी वाटणारी एक बाब म्हणजे, हाकारा | hākārāच्या याच आवृत्तीत, प्रा. सुंदर सारुक्काई यांच्या, अनुवादविद्येमधील भाषांमधील भेदांना, अंतरांना महत्त्व देत आलेल्या पारंपरिक सिद्धान्तांच्या ऐवजी सध्या मांडल्या जात असलेल्या भाषांमधील साम्यांना, परस्परांना स्पर्श करण्याच्या क्षमतेला महत्त्व देणाऱ्या आधुनिक सिद्धान्तांकडे लक्ष वेधणाऱ्या भाषणाचा माया निर्मला यांनी केलेला अनुवादही आम्ही समाविष्ट केला आहे. 

एकंदरीत पाहता, स्पर्श या व्यापक, विविधांगी संकल्पनेविषयी, त्यातील व्यामिश्रता पाहता, ठोस असं अनुमान करता येणं आणि निष्कर्ष नोंदवता येणंही मुश्किलीचं ठरतं. हाकारा | hākārāच्या या आवृत्तीत लेखक, कलाकार, अभ्यासक, अनुवादक यांच्या सहकार्याने जीवनव्यापी स्पर्शसंवेदनेच्या शक्य तितक्या कंगोऱ्यांना आम्ही स्पर्श करू पाहिला आहे. स्पर्शाचा आम्ही सर्वांनी घेतलेला हा शोध आपल्या मनाला स्पर्शून जाईल, अशी आम्ही आशा करतो. 

Tile Image: Unknown artist, Visitation. Alabaster, 14th-century Spain. Fitzwilliam Museum, Cambridge.

Post Tags

Leave a comment