मिथकांची ताकद
मिथके भुरळ पाडतात – लहानांना आणि मोठयांना, शहरात आणि गावात राहणाऱ्यांना, कलाकारांना आणि अभ्यासकांना. काळाच्या सारणीतून सरकत आलेली मिथकं भटकी असतात. ती एखाद्या खेडेगावांत रमतात, तशीच शहरातही रेंगाळत असतात. ती एकट्यादुकट्याचा नाही, तर लोकांचा आविष्कार असतात. काही मिथके वेळोवेळी पुनःपुन्हा अवतार घेत प्रगट होतात. काही काळाच्या गुहेत गडप होतात. एकच मिथक नानाविध तऱ्हेने रंगवून मांडले जाऊ शकते. कधी कथाकथनातून, सादरीकरणातून तर कधी चित्रांतून. पूर्वाश्रमीच्या खुणा वागवत; तसेच वर्तमानाचे भान दाखवत मिथके मानवी मनाचा आणि जनमानसाचा ठाव घेताना दिसतात. मिथकातून थेटपणे किंवा प्रतीकात्मकरित्या सांगितलेले किंवा दाखविलेले असते. माणसांना आणि समाजाला करमणूक, चिंतन, संवाद तसेच मूल्य जोपासण्यासाठी मिथके प्रेरणा देत असतात. जन्म, मृत्यू आणि विकास यांच्या नोंदी ठेवत व्यक्ती आणि समाजाला स्वतःकडे आणि इतरांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहायला ती आपल्याला प्रवृत्त करत राहतात. दृकश्राव्य माध्यमे, नाटके, कथा-कादंबऱ्या, संशोधन-प्रकल्प यातून भवताल आणि मानवी मन यातील गुंते समजून घेण्याचा प्रयत्न नेहमीच होत आला आहे.
हाकारा । hākārā च्या अठराव्या आवृत्तीतून मिथकांचे संस्कृती, समाज आणि सर्जनशील रूपांशी असलेले नाते समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. दृश्य-कथन, नाट्य, चिंतनपर गद्य, कविता, गोष्टी, भाषांतर, कथन अशा वेगवेगळ्या अभिव्यक्तीच्या रूपांद्वारे मिथकांविषयी आपल्याला आज काय वाटते याबद्दल लेखक आणि कलाकारांनी मांडले आहे ते या आवृत्तीत समाविष्ट केले आहे. इथे आमचा हेतू, वेगवेगळे लेख निव्वळ एकत्र आणणे किंवा मिथकांविषयीचे भान कालक्रमानुसार कसे बदलत गेले याबद्दलची माहिती आपल्यासमोर मांडणे हा नाही. नॉन-लिनिअर पद्धतीने, आजच्या काळात स्वतःच्या भाषेत व्यक्त होणाऱ्या कलाकार, लेखक आणि संशोधकांना मिथकांविषयी काय वाटते याचे विविधांगी आकलन मांडावे आणि यातून आजचा भवताल थोडाबहुत समोर आणावा असा आमचा प्रयत्न आहे.
हाकारा । hākārāतील साहित्याचे वाचन केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की मिथकांना सामोरे जाताना, एका बाजूला, त्यांच्या मूळ रूपात त्यांच्याकडे पाहणे आणि मिथकीय काळ-अवकाशाविषयी अभिव्यक्त होणे असते. तर, दुसऱ्या बाजूला, मिथकांचा पुनर्शोध घेत त्यांना स्वतःच्या कालावकाशात पुनर्प्रस्थापित करण्याचा विचार असतो. अशा दोन दृष्टिकोनांतून मिथकांचा विचार लेखक, कलाकार आणि संशोधक करत असल्याचे जाणवेल. असे करण्यासाठी, ते स्वतःच्या निर्मिती-प्रक्रिया, संशोधन आणि अभिव्यक्तीसाठी वेगवेगळ्या अभ्यास-पद्धती आणि साधनांचा विचार करत असल्याचेही आपल्याला या अंकात दिसून येईल. अर्थात, मिथकांविषयीचा विचार या दोन बाजूत बंदिस्त करता येणार नाही. चिंतन तसेच निर्मिती प्रक्रिया, अभ्यास पद्धती आणि मांडणी एकमेकांना छेद देत विविधांगाने प्रवास करत बहुआयामी निष्कर्षाकडे जाऊ शकते.
व्यक्तीच्या तसेच समाजाच्या जगण्याचा ठाव घेणारे किंवा ऐहिकतेच्या पल्याडच्या पारलौकिकाचे आकलन मांडू पाहणारे मिथक; अगदी रोजच्या आयुष्यातल्या घटना मांडत असतानाच निसर्ग आणि समाज-संस्कृती व्यवहार किंवा श्रद्धा आणि समजुती यांचे कालातीत दर्शन घडवत असते. उदाहरणार्थ, अंबिका ऐैयादुराई आणि ममता पांड्या यांनी लिहिलेली दिबांग खोऱ्यातली एक गोष्ट: अक्रूची शिंगे वाकडी का असतात? ही अरुणाचल प्रदेशातील दिबांग पर्वतावर राहणाऱ्या इदू मिश्मी लोकांच्यात प्रिय असलेली अक्रू या जनावराची गोष्ट. दोघे लेखक मानववंशशास्त्र आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत आणि ते अभ्यास म्हणून मिथकांकडे पाहतात. अक्रूची गोष्ट आणि त्याबरोबरची श्रोबोंतिका दासगुप्ता यांनी केलेली सुंदर चित्रे दिबांग खोऱ्यात संशोधन करणाऱ्या अशा अभ्यासकांनी जमवलेल्या साधनांपैकी आहेत. राघवेंद्र वंजारी यांनी अनुवादित केलेल्या या गोष्टींतून मानवी, स्थानिक संस्कृतीचा आणि जीवनाचा कशा तऱ्हेने प्राणी अविभाज्य घटक असतात याबद्दल आपल्याला समजते. मिथकांकडे पाहण्याचा असा एक अभ्यास-शास्त्रीय नमुना सादर करण्यासाठी आम्हाला ‘करंट कॉन्झर्वेशन’ या बंगलोरमधून चालणाऱ्या निसर्ग-संवर्धन क्षेत्रातील संस्थेशी सहयोग करता आला हे महत्त्वाचे वाटते.
अठराव्या अंकातील ‘परामर्श‘ विभागात प्रकाशित केलेले लय कुमार यांचे नाटक, अभिलाष जयचंद्र यांची गोष्ट, शक्तिपाद कुमार आणि सुरमा बेरा यांचा छाऊ नाट्य परंपरेवरचा लेख तसेच इशा बॅनर्जी आणि रश्मी दुबे यांनी लिहिलेला उन्या कम्पाडू या कॅरिबियन लेखकाच्या मिथकाधारित कादंबरींवरचा लेख वाचल्यानंतर मिथकाद्वारे होणारा संवाद कसा बहुपदरी आणि बहुआयामी असतो हे वाचकाला नक्कीच जाणवेल. तसेच, ‘दृश्यांगण’ विभागात सादर केलेल्या दृश्य-कथनातून मिथकांना सामोरे जाणे म्हणजे मांडणीसाठी एखादी गोष्ट निवडणे आणि तिचा वेगवेगळ्या रचनेतून आणि रुपबंधातून विस्तार करणे एवढ्यापुरते मर्यादित नसते, हे आपल्याला दिसून येईल. पुढे जाऊन, मिथकाधारित निर्मिती प्रक्रियेतून काल-सुसंगत संकल्पना आणि विचारमूल्ये मांडण्याच्या शक्यता कलावंताला आणि अभ्यासकाला प्रदान करणाऱ्या प्रक्रियेची नोंद घेणे हाकारा । hākārā ला महत्त्वाचे वाटते. असे करण्याने, मिथके आणि आधुनिकीकरण वेगवेगळ्या ध्रुवावर असा पारंपरिक विचार बाजूला ठेवून विरोधाभासांनी भरलेल्या सततच्या बदलाच्या प्रक्रियेत मिथके आणि समाज वावरत असतात हे गृहीतक महत्त्वाचे बनते. एकरेषीय, साचेबद्ध चौकटीत मिथके बसवून त्यांचे गौरवीकरण न करता उतरंडीची, शोषणाची तसेच हिंसेचे प्रगटीकरण करणारी मिथके समाजाची दिशाभूल करू शकतात, याचीही याद ठेवली पाहिजे हेही आपल्याला प्रकाशित सर्जनशील साहित्य आणि दृश्य-रूपातून जाणवेल असा आम्हाला विश्वास वाटतो. मग अशावेळी गरज असते ती मिथकांच्या लवचिकतेवर विश्वास असण्याची आणि त्यांना सबव्हर्ट करण्याच्या सर्जनात्मक स्वातंत्र्य आणि क्षमता मान्य करण्याची. जेरिन जेकॉब आपल्या कवितेतून बायबलमधील मिथकांना प्रश्न विचारत धर्मामुळे संकोच पावलेल्या जागा स्त्रियांनी स्वतःचे अवकाश खेचून आणण्याची बात करतात ते इथे महत्वाचे बनते. मग, काव्यरुपे स्वतःचे असे मुक्तावकाश पुनर्संकल्पित करून त्याची नव्याने मांडणी करण्यासाठी मिथक हे एक निर्मितीक्षम हत्यार बनू शकते याचा विश्वास जेरिन यांची कविता किंवा सहज यांची दृकश्राव्य निर्मिती देते. या संदर्भात, प्रतीक्षा खासनीस आणि सहज राहाल या दोन कलाकारांची अंकातील मांडणीही महत्त्वाची ठरते. हे दोघेजण वेगवेगळ्या कला-परंपरेत आणि अभिव्यक्तीत आपापली निर्मिती करणारे. प्रतीक्षा नाटक करणारी तर सहज दृष्यपरंपरेत काम करणारा. दोघेही गतकाळातील गोष्टी, विधी आणि परंपरा समोर ठेवून आपली नाट्यात्म आणि दृश्य-निर्मिती करतात. आपापल्या गोष्टी सांगण्यासाठी मिथकांचा आधार घेत असले तरी मिथकांची कसून तपासणी करत स्वतःच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यविषयक धारणांशी ते जोडून घेतात. यातून आपल्या लक्षात येते, की इतिहास किंवा वर्तमानातले साध्या-साध्या तसेच पेचात टाकणाऱ्या प्रसंगांकडे सजगपणे पाहण्यास मिथक उद्युक्त करत असते. कलाकाराचे हे पाहणे त्या कलाकाराला तसेच त्याचा आस्वाद घेणाऱ्या रसिकाला विशिष्ट असा दृष्टिकोन प्रदान करू शकते. यालाच, प्रतीक्षा लिहिते त्याप्रमाणे, ‘मिथकाची ताकद’ म्हणता येईल. मिथकाची ताकद – मिथकांच्या माध्यमातून प्रति-मिथकांचे जग साकारण्यातही आहे. इथे, आपल्याला जाणवते, की मिथके फक्त पुराणकथा किंवा धार्मिक कथांत नसतात. मिथके इतिहास, संस्कृती, वारसा आणि ओळख. एका बाजूला ते गौरवाने मान उंचावायला लावतात पण त्याचवेळेस, दुसऱ्या बाजूस, संकुचितपणाचे वा शोषणाचे प्रतिनिधित्व करणारे मिथक एखाद्या व्यक्ती आणि समाजाला मान खाली घालायला लावू शकते. आणि म्हणून एखादा कलाकार मिथक आणि समाजातील नातेसंबंधांना प्रश्न विचारत आपले स्वतःचे रूप निर्माण करण्याचे आव्हान स्वीकारतो.
याचा अर्थ असा नाही, की या नव्या अंकाच्या मांडणीत विशिष्ट असे विधान आम्ही करू इच्छितो. त्यापेक्षा, एखाद्या मिथकाला वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात कोणकोणत्या मार्गाने सामोरे जाऊ शकतो आणि त्याला प्रतिसाद देण्याच्या काही शक्यता आम्ही मांडू इच्छितो. खरेतर, मिथके इतकी बदलत राहतात आणि प्रवाही असतात की त्यांना विशिष्ट निष्कर्षांत बांधून ठेवणे किंवा त्यांचे संग्राह्य रूप सादर करणे जवळ-जवळ अशक्य असते. त्यामुळे, मिथकांकडे पाहण्याची एखाद्या व्यक्ती आणि समाजाची प्रक्रिया काय असते आणि ती कशी आकारास येते याबद्दलच्या नोंदी आणि त्या आधारे काही एक आकलन तेवढे आपण मांडू शकतो.
गेली सहा वर्षे हाकारा । hākārāचे अंक वर्षातून तीनदा प्रकाशित होत आहेत. दुबई-स्थित शारजाह आर्ट फाऊंडेशन या समकालीन कला आणि संस्कृतीविषयी अभ्यास करणाऱ्या आणि प्रदर्शने आयोजित करणाऱ्या संस्थेच्या अनुदानातून ‘हाकारा’ने १९३० ते १९६० च्या दरम्यान मराठीमध्ये कलाविषयक जे लिखाण नियतकालिकांतून प्रकाशित झाले आहे याबद्दलचे संशोधन केले आणि निवडक लेखांचे इंग्रजीत भाषांतर करून चित्रगोष्ट: Art Writings in Marathi (1930s–1960s) संपादित ग्रंथाची निर्मिती केली. अलीकडे, या ग्रंथाचे प्रकाशन शारजाह आर्ट फाऊंडेशनने केले. त्याच्या वेबसाईट वरून हा ग्रंथ मागवता येईल. लवकरच, चित्रगोष्ट हा संपादित ग्रंथ भारतात वाचकांसाठी उपलब्ध होईल. हाकारा । hākārā च्या वाढत्या व्यापाबरोबर मदत करणारे कलाकार आणि अभ्यासकही वाढत आहेत हे आम्हाला बळ देणारे आणि उत्साह वाढवणारे आहे.
अठराव्या खेपेचा अंक वाचून आणि पाहून आपल्याला काय वाटले हे जरूर कळवा.
छायाचित्र सौजन्य: सहज राहाल