Skip to content Skip to footer

कातडीखालच्या जाणीवा: आरती रानडे

Discover An Author

  • Writer and Scientist

    आरती रानडे यांनी बायोमेडीकल क्षेत्रात डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेट केले असून त्या सध्या अमेरिकेत स्टेम सेल्स आणि लिव्हर मॉडेल्स या विषयात संशोधन करत आहेत. फोटोग्राफी आणि डूडलींग बरोबरच त्यांना हायकिंग, रनिंग आणि सायकलींगची आवड आहे.

    Aarati Ranade is a scientist working in the field of Stem Cells and Liver Models in the US. She is also interested in translation, photography, doodling, hiking and cycling.

ती एक सायंटीस्ट आहे. हार्डकोअर सायंटीस्ट. हायपोथेसिस, प्रयोग, डाटा, अ‍ॅनालीसीस, अपयश, निराशा – पुन्हा नवीन उमेद, नवीन हायपोथिसीस, नवीन डाटा, कधीतरी थोडं हाताला येणारं यश हेच तिचं डे-टू-डे आयुष्य, रुटीन. कोणाला  सांगण्यासारखं, दाखवण्यासारखं तिच्या रोजच्या जगात काहीही घडत नाही. तिचं जग काहीसं प्रायव्हेट, कोणालाच चटकन न दिसणारं. पण तरीही, बाहेरून फार मोनोटोनस, बेरंगी, रूक्ष वाटणार्‍या तिच्या जगात आतमधे, खोलवरच्या लेयर्स मधे, त्या स्पेसमधे  एक प्रकारचा सुक्ष्म ड्रामा घडत असतो.  खूप काही मंथन होत असतं, बीलीफ्सला तडे जात असतात, कंडीशनींग चॅलेंज होत असतं. घडत असतं, तुटत असतं, नवीन काही घडत असतं, संदर्भ बदलत असतात, शब्दांत पकडता आलं नाही, मांडता आलं नाही तरी तत्वज्ञान उलगडत असतं. फोकस्ड लाईटमधे, रंगीबेरंगी मेकअप केलेल्या आणि विविध टेक्स्चरचे कपडे घातलेल्या सेल्सची लयबद्ध हालचाल, त्यांच्या मधले संवाद, डायनॅमिक्स पाहणं म्हणजे तर त्या थेटरच्या अंधारात स्टेजलाईट्स मधे कसलेल्या, ताकदीच्या नटांमधली सहज पण इंटेन्स अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखं. मायक्रोस्कोपमधून बघताना एका पेशींचं दुसर्‍याकडे होणारं उत्स्फूर्त आकर्षण, पडद्यावरच्या एखाद्या उत्कट रोमँटीक लव्ह सीन पेक्षाही नाट्यपूर्ण अनुभूती देणारं. एखाद्या अवयवावर आपली सत्ता प्रस्थापित करु पाहणार्‍या, प्रचंड प्लॅन करुन, पाथवेज चेंज करुन शिस्तबद्धपणे हल्ला करणार्‍या सेल्स मोठमोठ्या सत्ताधिशांची, युद्धांची, राजनीतींची आठवण करुन देणारा. तिच्या बाहेरून स्तब्ध वाटणार्‍या आयुष्याचा डोह आतून हा असा कायमंच विचारांनी गढुळलेला. 

अताशा ती उंदरांच्या जगात वावरते. ह्या खास जेनेटीकली मॉडीफाईड उंदरांना ‘ह्युमनाइझ्ड’ करणं हे तिच्या प्रयोगाचं बाह्य स्वरुप. वर वर पाहता ती जरी उंदरांवर प्रयोग करत असली, तरी आत मधे एका लेव्हलला तिच्यावरच प्रयोग होत असणार. असावा असं वाटतं तिला. जाणवत राहतं हलतंय, सलतंय, दिसतंय काहीतरी आत. पण खूपदा हाती लागण्याआधीच हुलकावणी देऊन पसार होतं ते. बुडबुड्यासारखं  क्षणभर तयार होणारं, क्षणात फुटणारं ते ‘आतलं काहीतरी’ कधी कधी उफाळून येतं प्रचंड रुप धारण करून आणि उभं राहतं तिचंच एक नवं रुप, घट्ट पाय रोऊन तिच्याच समोर.

लॅबमधे ‘ह्यूमनाइझ्ड’ उंदरांवर प्रयोग करताना, हरवलं-गवसलं च्या अधल्यामधल्या प्रदेशात अनुभवलेल्या ह्या काही नोंदी तिच्या मनातल्या, तिच्या पर्सनल डायरीतल्या.

गेले तीन महिने प्रयोग चालू आहे
आणि आज मात्र मी नर्व्हस फील करतीये.
कितीही वेळा केली असली सर्जीकल प्रोसीजर
तरीही
दर प्रयोगात लाइट्चा झोत अंगावर पडल्यावर
काही क्षणांचं टेन्शन यावं 
कसलेल्या नटालाही
तसंच टेन्शन मलाही.
हळूहळू उजाडतय बाहेर.
ही वेळ चिंतनाला चांगली असते म्हणे.
मी मात्र ऑफीसच्या काचेच्या खिडकीतून 
नुसतीच बाहेर बघतीये
अंधाराचा प्रकाश होताना
पहाटेचा दिवस होताना.

नर्व्हसनेसनं मधूनच थंड पडणारे तळहात
आपसूकच घट्ट बिलगतात हातातल्या कॉफीच्या गरम मगाला
शेजारच्या स्मार्टफोनवर पाहिले जातात मेसेजेस
व्हॉटसॅपवरचे
टाईपलं जातं निरर्थक ह्म्म किंवा
नको इतका अर्थपूर्ण
स्मायली.
सगळ्याच रीफ्लेक्स अ‍ॅक्शनस, प्रतीक्षिप्त क्रीया, इनव्हॉलेंटरी.

काही क्षण नजर खिडकीबाहेर 
मग तळहातावर.
व्हॉट्सॅपवर ‘बाय’ टाइप करताना घेतलेला
कॉफीचा शेवटचा कडवट घोट.
ह्या जगातून त्या जगात प्रवेश करण्याची 
हीच ती नेमकी वेळ. 
हाच तो नेमका क्षण.

बाहेरच्या जगाचं शरीरभर पसरलेलं अस्तित्व
धुवुन टाकतीये मी आता
शॉवरच्या पाण्याखाली.

सर्जरीसाठीचा ब्लू स्क्रब
अंगावर चढवून एका
वेगळ्याच जगात प्रवेश होतो माझा.
ह्या साध्या गबाळ्या कॉटनच्या कपड्यात पण
एक कमालीचं सेक्स अपील आहे खरं !
आरशात पाहून केस बांधताना 
क्षणभर मनात
चमकून गेलेला विचार
माझा कॉनफीडन्स वाढवतोय
नकळत.

एकदा या चेंजिंग रूम मधे आलं
की बाहेरच्या जगात नेणारे
परतीचे दरवाजे बंद.

एखाद्या अंधार्‍या गुहेनं खेचून आत घ्यावं  
तसं
हा दरवाजा मला घेऊन जातो
मंद लाल प्रकाशात,
कंट्रोल्ड जर्म फ्री वातावरणात
उंदरांच्या जगात.
माझे लुकलुकणारे डोळे
अंधाराला सरावण्याचा
प्रयत्नात गुंतलेले. 
रॅकवर ठेवलेले उंदरांचे पिंजरे
आणि त्यातले हालचालींचे
सूक्ष्म आवाज टिपतात माझे कान.
चाळीतल्या खोल्यांमधल्या
बारीक बारीक हालचालींचा
उत्सुकतेने कानोसा घ्यावा तसे.

प्रयोगासाठीची आयुधं 
सुस्तावून
निवांत पडलेली.
धारदार कात्र्या, चिमटे, निर्जंतूक कापूस,  सुया
आणि अवयवांची लेबलं लावून ठेवलेल्या
विविध आकाराच्या बाटल्या. 
लेबलं लावून ठेवलेले
प्रयोगासाठीचे उंदीर
काही काळे काही पांढरे
काही मेल काही फीमेल
काही प्युअर काही जेनेटीकली मॉडीफाईड.

एखाद्या पिंजर्‍यापाशी रेंगाळते मी
सतारीच्या तारा छेडाव्यात किंवा
हळूवार फिरवावी पियानोच्या कीज वरून बोटं
तशी पिंजर्‍याच्या जाळीवर
फिरणारी माझी बोटं.
बाहेरच्या जगाचे वास पाण्यानं
धुवून टाकले तरीही
माझ्या शरीराचा गंध 
उंदरांना जाणवतो.
चेतवतो.
पिंजर्‍यात त्यांची वाढलेली हालचाल
वासाच्या मागावर जाणं
शेपटी जोरजोरात हलवणं. 
कोलांट्या मारणं.
सगळ्याच रीफ्लेक्स अ‍ॅक्शनस, प्रतीक्षिप्त क्रीया, इनव्हॉलेंटरी. 

आता त्यातलाच एक जास्त गोजीरवाणा उंदीर
आपसूकच माझं लक्ष वेधून घेतो आणि
मी त्याला नाजूकपणे ठेवते माझ्या तळहातावर.
आधी अस्वस्थ, पण मग सरावतो तो ही हळूहळू
आणि चालू लागतो माझ्या हातावर
मनगटापासून कोपरापर्यंत.
नवीन जग एक्स्प्लोअर करण्यात त्यालाही थ्रील वाटत असणार.
आता तो निवांत बिनधास्त विसावतो
माझ्या तळहाताच्या खळग्यात.
विश्वासानं, त्याची हक्काची जागा असल्यासारखा. 
हा निश्चिंतपणाच 
नेमका
मला अस्वस्थ करतो.
पहिली जाणीव 
मांजरासारखं
खेळवून मारणार आपण
त्या जीवाला याची.
पण क्षणात झटकते विचार
सरसावते ग्लोव्ह्ज
चढवते डोळ्यावर प्प्रोटेक्टीव्ह चष्मा
आता
एकामागून एक 
कमी अधिक गोजीरवाणे 
उंदीर उचलतीये मी
त्यांच्या शेपट्या पकडून. 
आणि 
ठेवतीये त्यांना 
कार्बन डायऑक्साईड चेंबर मधे.

गॅस मीटर वरचा काटा 
वेगानं सरकत
लाल पट्टीपाशी येऊन
थांबलेला
थरथरत.
लाल सिग्नलपाशी 
अस्वस्थ गाड्या 
फुरफुरत राहतात तसा.

गॅस चेंबरमधे गुदमरणारे उंदीर
हुंगणारे
सुटकेचा मार्ग शोधणारे
काचांवर धडका देणारे
नखं रुतवणारे
मुतणारे
हगणारे
मोकळ्या हवेसाठी तडफडणारे
संघर्ष संपला
की गपगुमान
जागच्याजागी
निपचित पडणारे.
पाहताना
का कोण जाणे मलाही
घुसमटतात
नुकत्याच वाचलेल्या पुस्तकातल्या
नाझी कॉनसेंट्रेशन कँपची वर्णनं.

अर्धमेले उंदीर आता सर्जरी टेबलवर
टाचण्यांच्या आधारे जेरबंद केलेले
अगदी
खिळ्यावर ठोकलेल्या 
येशूसारखे.
त्यांची एका बाजूला कलणारी मान
सावरताना नकळत
गळ्याखालच्या मऊशार केसातून
हात फिरवण्याचा मोह
नाहीच टाळू शकत मी
आजही.

मग अल्कोहोलचे बोळे
सराईतपणे चालवली जाणारी कात्री
चिमटयांनी हलकेच उचलली गेलेली त्वचा
आणि 
उघडलेल्या पुस्तकासारखा
आतले अवयव 
स्पष्ट वाचता येणारा
उंदीर.
अजूनही अर्धमेलाच.

मनात प्रोसीजरची उजळणी
हृदयात घुसून रक्त काढणारी सुई
ट्युबमधे उडणारी
लालभडक रक्ताची पिचकारी. 
यकृत, मुत्रपिंड एक एक अवयव
देहापासून वेगळे होऊन
भरले जातात बाटल्यांमधे
लावली जातात झाकणं
बाटल्यांना.
आणि माझ्या संवेदनाशील मनालाही.

सगळं कसं व्यवस्थित
क्रमवार
रीट्न, रीव्हाईज्ड, अ‍ॅप्रूव्ड प्रोटोकॉलप्रमाणे
शिस्तबद्द.

आता शेवटची स्टेप
उंदराच्या मेंदूपर्यंत पोचण्यासाठी
शीर धडापासून वेगळं करण्याची
कवच उकलण्याची. 

पहिल्या उंदराची मान
गिलोटीनसारखी
कात्रीत पकडून तोडताना
जोर लावताना
पहिल्यांदा येतोच शहारा अंगावर
होतातच खांदे घट्ट
जातातच आवळले ओठ
घेतला जातोच दीर्घ श्वास
सोडला जातोच सुस्कारा

मग दुसरा उंदीर, मग तिसरा
माझे खांदे हळूहळू रीलॅक्स होताहेत
आतड्याला पडलेला पीळ सुटायला लागलाय

सराईतपणे 
काम करणारी मी.
प्रतिकार न करणारे उंदीर.

‘कट कट’ हाडं मोडत 
तुटताहेत माना.
भेदली जाताहेत मेंदूभोवतीची
सुरक्षिततेची आवरणं.
माझ्या उजव्या हाताला
वाढतीये रांग
लालसर लुसलुशीत मेंदू 
भरून ठेवलेल्या
थंडगार पांढर्‍या बाटल्यांची.
आणि 
डाव्या हाताला
गोजीरवाण्या शांत पहुडलेल्या
मेंदूहीन थंड मुंडक्यांची.

सातवा, आठवा, नववा..
आणि आता मी चक्क इंजॉय करतीये
ही प्रोसेस.
त्यातही जितक्या सफाईदार पणे होतंय काम
तितका आनंद जास्त.

चटक लागलीये मला
धडापासून त्याचं शीर वेगळं करण्याची

पंचवीस, सव्वीस, सत्तावीस..

लॅबमधे या उंदरांना ‘ह्यूमनाईझ्ड ‘ करता करता
उफाळून आलेत 
माझ्यातलेच
अ‍ॅनीमल इंस्टींक्ट्स.

आता  
लेबल लावलेल्या बाटल्या 
कोंबलेल्या अवयवांसकट 
वाट पाहात थांबलेल्या.

रिकामे पिंजरे थिजलेले.
नवीन प्रयोग, नवीन लेबल्स, नवीन उंदरांच्या 
प्रतिक्षेत थबकलेले.

गॅस चेंबरही अजगरी  
सुस्तावस्थेत नीद्रीस्त. 
मीटरचा काटा शांत स्तब्ध स्थितप्रज्ञ.
प्रोटोकॉल प्रमाणे. वेल प्लॅन्ड. 
वेल एक्झिक्यूटेड.
सगळं जसं असायला हवं तसं.

पण नाही ! वेट..
सगळंच जसं असायला हवं तसं नाहीये.
आत्ता काहीतरी वेगळं घडतंय इथं. 
प्रोटोकॉलच्या बाहेरचं. 
ह्या कंट्रोल्ड वातावरणात
जाणवतंय कोणा परक्याचं अस्तित्व.
सराईत कान, डोळे 
भिरभिरताहेत 
त्या स्पेस मधे
त्याचा आदमास घेण्यासाठी. 

सर्जरी  टेबलवरचा 
ब्राईट स्पॉटलाईट 
आता हळूहळू विझत चाललाय.
त्या मंद लाल प्रकाशात मिसळत जातोय काळोख. 
आणि त्या काळोखात
समोरच्या भिंतीवर उमटत जातीये
लार्जर दॅन लाईफ भासणारी
वेडीवाकडी
काळी करडी 
प्रचंड मोठी सावली
माझ्यामधल्या जनावराची.

Post Tags

11 Comments

  • Anant Sonawane
    Posted 20 ऑक्टोबर , 2017 at 7:03 am

    Simply superb writing! A comoletely new, fresh and shocking reading experience! Keep writing Chiku!

  • Dhanashri
    Posted 20 ऑक्टोबर , 2017 at 8:53 pm

    आरती, अंगावर काटा आला वाचताना. आपण शेवटी मनुष्य’प्राणी’ हेच खरं.

  • विनय बापट
    Posted 21 ऑक्टोबर , 2017 at 6:41 am

    अप्रतिम,
    लेखिका माणसांच्या आदिम प्रेरणांडा नवीन संदर्भात लक्षवेधक पद्धतीने शोध घेते. शेवट आधुनिकता प्रगती या संकल्पना नेमक्या काय आहेत आधुनिक होण म्हणजे नव्यान जनिवर होण्याची प्रकिया आहे का? असा एक वेगळाच प्रश्न ही कथा निर्माण करते. आणि आमल्या आधुनिक होण्यिवर संशोधनावर प्रगतीवर प्रश्न निर्माण करत माणसितील पशू मारण्याच संशोधन कुठेच चाललेल नाही हे सूचित करताना लेखिका नकळत पणे भारतीय अध्यात्म परंपरेकडे निर्देश करते आणि या कथेची सखोलता वाढते

    • विनय बापट
      Posted 21 ऑक्टोबर , 2017 at 6:48 am

      आदिम प्रेरणांचा नव्यान जनावर होण्याची प्रक्रिया आधुनिक होण्यावर

  • Jayshree bagul
    Posted 21 ऑक्टोबर , 2017 at 8:31 am

    अप्रतिमेतील ,सवेदिमनातील डॉ रहि मानूस च ते ऑपरेशन,करताना आलेला अनूभव हा -ताचा थरपाक करतात ,ऊदिर ऐक जीवच,पण त्याचा जीव घेताना उडालेली तारांबळ, मनातील सोशीकता जीवघेणी ,येकाचा मेदु काढंताना ,दुसऱ्याचा मेंदू शात ठेऊन केलेलं संशोधन,त्यातील त्यावर शबद तरलता ,अगावर येनारा शहारा हे खरं संशो -धन मस्त लिहिलंत.शुभेछा

    • प्राची बापट
      Posted 5 जून , 2020 at 8:12 pm

      आरती शब्द आणि संवेदना गोठवून टाकणार लिहिलं आहेस ग,, त्यांची त्वचा सोलून बघताना तुझं इतकं सोलवटल गेलं की त्याच्या वेदना वाचकांचे मन सोलवटून टाकतात. माणूस म्हणून प्रगतीचे एक एक नवीन शिखर सर करत असताना आपण आपल्या पायाखाली काय जळतं आहे ते कधी बघतच नाही, नाही का? कदाचित तू म्हणतेस तसं हे आपल्यातले animal instinct असावं पण मग एक प्रश्न येतो मनात जर माणूस असून प्रगतीच्या एका टोकावर येऊन सुद्धा जर आपण ते सोडून देऊ शकत नसू तर प्राण्यांनी, पक्ष्यांनी किंवा अगदी जीवाणू विषाणू ह्यांनी का बरं सोडावं ते? त्यांचं तर ते basic instinctच आहे ना, नाही का? विचार करू तितकं अजूनच कळेनासं होतं बघ. माणसांमध्ये वाद झाला तर आपण म्हणतो की प्रत्येकाचा दृष्टिकोन जो तो आपल्या जागी बरोबर, सत्य व्यक्ती सापेक्ष आहे वगैरे वगैरे. मग तोच नियम प्राणिसृष्टीला पण लागू नाही का होतं, ह्यावर काही उत्तर दिलंस तर छान वाटेल, बाकी लिहिलं आहेस उत्तम खूप आत जाणार, खोलवर मुळापासून विचार करायला लावणारं, सुंदर

  • डाॅ. धनराज धनगर
    Posted 21 ऑक्टोबर , 2017 at 9:28 pm

    अतिशय वास्तवाशी सत्य, वेगळ्या प्रतिमा आणि प्रतिके, आशयगर्भ मांडणी यामुळे हे लेखन अप्रतिम ठरते. आपल्या लेखन प्रवासास हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

  • डाॅ. धनराज धनगर
    Posted 21 ऑक्टोबर , 2017 at 9:29 pm

    अतिशय वास्तवपूर्ण सत्य, वेगळ्या प्रतिमा आणि प्रतिके, आशयगर्भ मांडणी यामुळे हे लेखन अप्रतिम ठरते. आपल्या लेखन प्रवासास हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन

  • Sangeeta Abhyankar
    Posted 22 ऑक्टोबर , 2017 at 7:34 am

    अप्रतीम डॉ आरती… मीच हे सगळं करतेय… अनुभवतेय… असं वाटलं वाचताना…

    waiting for more…

    संगीता अभ्यंकर, गोवा

  • विनायक
    Posted 23 ऑक्टोबर , 2017 at 5:15 am

    जबरदस्त!!

  • namita
    Posted 23 ऑक्टोबर , 2017 at 3:01 pm

    अत्यंत प्रभावी लिहिलंय. शहारा आला, मधेच कसंतरीही वाटलं..पण या लिखाणाची तिच पावती खरी !

Leave a comment