हे अंतर सरत का नाही ?
‘अजून येतो वास रुळांना,
अजून चाके लाल चमकती;
रांगत, खुरडत मातीमधुनी
अजून मुंग्या भाकर खाती…’
मर्ढेकर,
तुमच्या कवितेतलं ते ढोर
अजूनही मोजत बसलंय
अस्मानाचा भगवा रंग
आणि
समोरचं नागवं पोर
ह्यांतलं अंतर…
तुम्ही अस्वस्थ झाला होतात पाहून,
देशांच्या नि वंशांच्या सत्ताकांक्षांच्या अग्निवर्षावात
होरपळलेलं विश्वाचं अंतर !
तुम्हाला पाहावी लागली होती,
एका संस्कृतीच्या दोन डोळ्यांमध्ये
अमिट अंतरांचा अश्वत्थामी शाप कोरून गेलेली
ठसठसती रक्तरेषाही…
तसं तर, तुमच्या जन्माआधीही
आणि तुम्ही गेलात, त्यानंतरही
अशी कितीक अंतरं घेत राहिलीयत
कितीकांचा ग्रास…
इतिहास वाचताना नि वर्तमान भोगतानाही,
अंतरं कधी जातीच्या दगडांनी
माणुसकीचा चेहरामोहरा
छिन्नविच्छिन्न करताना दिसली;
कधी धर्माच्या शस्त्रास्त्रांनी
निष्पापांचे बळी घेताना दिसली;
तेव्हा नेहमीच कानांत ठणकत राहायचे
तुमचे शब्द —
‘दगडामधला देव पाहतो
कुठे जाहली माझी फत्ते…’
नापामच्या स्फोटात
होरपळलेल्या वस्त्रहीन शरीरानिशी
जिवाच्या आकांताने
व्हिएतनामच्या रस्त्यावर धावणाऱ्या
त्या पोरीची किंकाळी
ऐकूच गेली नाही युद्धखोरांना
युद्धाच्या नगाऱ्यांच्या कानठळी आवाजांत,
हे पहिल्यांदा जाणवलं होतं;
तेव्हा खूप विसरायचा प्रयत्न करूनही
आठवत राहिलेलं,
जे तुम्ही लिहिलं होतं खूप आधीच —
‘… शिजत्या मांसामधून कोणी
स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा…’
अगदी काही वर्षांपूर्वीही,
देश म्हणजे काय,
स्थलांतर म्हणजे काय,
निर्वासित म्हणजे काय,
हे काहीही माहीत नसलेल्या
अश्राप आयलनचं
समुद्राच्या कुशीत विसावलेलं कलेवर पाहिलं;
तेव्हाही डोळ्यांसमोर आलं होतं
तुमच्या कवितेतलं
भगव्या अस्मानासमोर
उभं असलेलं नागवं पोर;
आणि अंतरात कळ उठली होती,
ह्या दोघांतल्या अंतरावर मस्तक शिणवून…
मर्ढेकर,
तुमची ही कविता मरत का नाही ?
अस्मान
आणि
पोर
ह्या दोघांतलं हे अंतर सरत का नाही ?
अलीकडेच,
पक्कं ठरवलं होतं की,
काही करून दूर जायचंय
तुमच्या ह्या भकास कवितेपासून;
पण काल पुन्हा आठवलात तुम्ही…
भाकरीसाठी
घरदार, गावशिवार सोडून जगायला बाहेर पडलेली,
शहरांची, महानगरांची वेठबिगारी करून शिणलेली,
आणि गरज सरताच नकोशी ओझी म्हणून
दूर भिरकावली गेलेली
ती माणसं
आपल्या उरल्यासुरल्या अस्तित्वांना
पाठुंगळीस घेऊन घरांकडे परतताना
थकूनभागून रुळांवर कधी कशी विसावली,
आणि अक्षरशः किड्यामुंग्यांसारखी चिरडली गेली…
रुळांवर विखुरलेल्या
त्यांच्या देहांच्या लक्तरांसोबत उरली
त्यांची मळकी चिरगुटं
नि
भाकरतुकडे…
हे सारं घडलं काल पहाटे,
तेव्हा आकाशातून हे शांतपणे पाहत बसलेला,
आदल्या पौर्णिमरातीचा
दुधाळ ढेरपोट्या चंद्र
आणि
रुळांवरच्या रक्ताळलेल्या भाकऱ्या
ह्यांतलं जीवघेणं अंतर पाहून
थरकापलेल्या काळजात प्रश्न उमटला —
मर्ढेकर,
तुमच्या कवितेतल्या त्या ढोराला
अस्मानाचा भगवा रंग
आणि
समोरचं नागवं पोर
ह्यांतलं अंतर
येईल का मोजता
कधीतरी ?
आणि ह्या प्रश्नाच्या पाठोपाठच,
प्राणांतून कोसळत राहिले कर्कशपणे
तुमच्या शब्दांचे विटंबित प्रतिध्वनी —
“तरिही येतो वेग रुळांना,
तरिही चाके लाल धावती;
रांगत, खुरडत मातीमधुनी
तरिही मुंग्या भाकर खाती…”
(संदर्भित मूळ कविता : अजून येतो वास फुलांना, बा. सी. मर्ढेकर.)
***
परतीचा रस्ता
आकाशाकडे जाण्यासाठी हजारो रस्ते असतात म्हणे;
ते धुंडाळत राहतात तो एक रस्ता,
जो आला होता त्यांना घेऊन
आकाशातून ह्या मृण्मय विश्वात;
कारण तोच एकमेव परतीचा मार्ग असतो त्यांच्यासाठी !
पण अशा कुठल्यातरी रस्त्याने इथे आलो होतो,
ह्यापलीकडे अजून काहीच आठवत नसतं त्यांना
त्या रस्त्याविषयी,
नाळ तुटल्या क्षणापासून…
खरं तर, आठवण्याची गरजही नसते तशी काही;
पृथ्वीवर वावरण्यासाठीही हजारो रस्ते असतातच की !
त्यांच्यातले काहीजण नाद सोडून देतात
आकाशाकडे परतण्यासाठीचा तो रस्ता शोधण्याचा;
आणि रमून जातात इथल्या वाटा-वळणांत.
त्यांच्यातल्या काहींना मात्र
कितीही वर्षं लोटली तरी
अनोळखी, परकेच वाटत राहतात
इथले धूळमातीचे रस्ते;
त्यांची भिरकटती पावलं शोधत राहतात
आकाशाकडे परतण्यासाठीचा तो रस्ता
वाट चुकलेल्या कोकरांप्रमाणे…
त्यांतले काहीजण
आकाशमाहेराच्या भेटीलागी आसावून
आर्त आळवणी करीत बसतात;
जिचे शून्य झंकार निनादत राहतात
प्रार्थनास्थळांच्या पवित्र पोकळ्यांत !
त्यांच्यापैकी इतर काहींची भिस्त असते
आपल्या बुद्धिसामर्थ्यावर;
परतीचा मार्ग शोधण्यासाठी
ते करीत राहतात
जळ-स्थळ-अंतराळाचं उत्खनन
अविरतपणे, अथकपणे !
त्यांच्यातल्या काही खुळ्यांना असं भासतं की,
आकाशीची वीज दाखवू पाहतेय
काही खूण जणू त्या रस्त्याची;
म्हणून ते नक्षत्रं होऊन
धरू पाहतात तिचा हात
आणि जळून, होरपळून खाक होतात !
त्यांच्यातल्या काहींना तर असं ठामपणे वाटत असतं की,
पक्ष्यांना नक्कीच ठाऊकंय तो रस्ता,
आणि पक्षी सांगतात गुपितं
फक्त झाडांना;
म्हणून ते रुजून येतात झाडं बनून !
पक्ष्यांनी सांगितलेल्या खुणा शोधत
झेपावूही लागतात त्यांचे माथे आकाशाकडे उंच उंच,
पण तितकीच करकचून रुतत जातात
त्यांची मुळं चिखलमातीत खोल खोल;
आणि मग
ना इथले ना तिथले असे अधांतरी तडफडत
ते ढाळत राहतात पारिजाती आसवं !
त्यांच्यापैकी काहीजण तर न राहवून
शोधून काढतात
आदिम अंधारगुहेचा ठावठिकाणा,
आणि निषिद्ध मानल्या गेलेल्या
तिच्या गर्भात प्रवेश करतात;
एका दंतकथेवर विश्वास ठेवून की,
त्या गुहेचं दुसरं दार उघडतं म्हणे,
निळ्या प्रकाशाच्या मार्गावर…
त्या गुहेच्या गर्भातून चाचपडत, ठेचकाळत चालताना
हळूहळू त्यांची नजर काळोखाला सरावते;
आणि त्या लालसर तमप्रकाशात
त्यांना दिसतात अवतीभवती
अस्थिपंजर कलेवरं
त्या गुहेतून आधी प्रवास केलेल्यांची…
तरीही विचलित न होता
ते अखंड चालत राहतात,
शोधत राहतात गुहेचं दुसरं दार;
आणि एका क्षणी पोहोचतात
अशा एका ठिकाणी,
जिथे पुढची वाटच खुंटते !
त्या गुहेचं दुसरं टोक बंद केलेलं असतं
एका अजस्र प्रस्तरशिळेने;
तिच्यावर दिसते त्यांना एक चित्राकृती
त्यांच्या आदिपूर्वजाच्या जन्मक्षणावरची…
त्यांना माहीत असते ती कहाणी :
साक्षात आकाशातल्या बापाने
आपली हुबेहूब प्रतिकृती म्हणून
साकारलं होतं त्या आदिमाला
धूळमातीतून !
त्या चित्रात दिसतात दोघे पितापुत्र;
आणि दिसतं —
आदिमाला चैतन्यस्पर्श देऊ पाहणारी
त्या जन्मदात्याची उजवी तेजस्वी तर्जनी
नि तो स्वीकारू पाहणारा
त्या आदिमाचा डावा डगमगता तळहात
ह्यांतलं थोडकंसं अंतर,
दिसेल न दिसेलसं…
असं म्हणतात की,
निष्पाप चमकत्या डोळ्यांचं लहानगं पोर
इवलाल्या बाळमुठी उंचावून खेळत असतं,
तेव्हा खरं तर,
त्याला दिसत असते ती आकाश-तर्जनी
दिसेल न दिसेलशा अंतरावर;
जिला स्पर्श करण्यासाठीच
ते असतं धडपडत निरागसपणे !
त्या अश्रापाला ठाऊक नसते का ती दुसरी कहाणी ?
त्यांना मात्र गुहेच्या बंद दारावरचं ते चित्र पाहताना आठवते
आदिमाची ती दुसरी कहाणीही :
ते थोडकंसं अंतर अस्वस्थ करत राहिल्यानेच जणू,
त्या आदिमाने आत्मज्ञानाच्या निषिद्ध अंधाऱ्या मार्गावर
टाकलं होतं एकदा पहिलं पाऊल;
आणि ह्या आज्ञाभंगाने संतापलेल्या त्या आदिपित्याने
आदिमाला शाप देऊन,
त्याला आपल्यापासून तोडून टाकून,
केली होती त्याची हकालपट्टी
पुन्हा धूळमातीत…
ती कहाणी ऐकलेली असते त्यांनी अनेकदा,
पण आता त्या गुहेच्या टोकाशी पोहोचल्यावर
त्यांना आकळतो त्या कहाणीचा खरा अर्थ;
आणि जाणवतं हेही की,
त्या बंद शिळेपलीकडेच आहे तो रस्ता,
जो घेऊन आला होता आदिमाला
आणि घेऊन येतो त्याच्या सर्व शापित वंशजांना
चिरंतन अंधाराने माखलेल्या ह्या गुहेमध्ये;
जी घेऊन जाते त्यांना मृण्मय विश्वात !
आणि त्यांना मागे परतता येऊ नये म्हणून
त्यांच्या तोंडावर कठोरपणे
गुहेचं ते दार लगेच बंद केलं जातं
अजस्र प्रस्तरशिळेने…
गुहेत प्रवेश केल्या केल्या
कोवळ्या जाणिवेवर आदळलेल्या
त्या शिळेवरच्या चित्राची स्मरणखूण
मिटलेली नसते स्मृतीतून,
नाळ तुटल्यावरही;
म्हणूनच की काय,
मुक्या बाळनजरांना
आभास होत राहतात
आकाश-तर्जनी
दिसेल न दिसेलशा अंतरावर असल्याचे !
इतक्या तडफडीनंतर, इतक्या प्रयासांनंतर
असे काहीजण पोहोचतात अखेरीस,
आकाशातून मृण्मय विश्वात घेऊन आलेल्या
त्या रस्त्यापासून इतक्या थोडक्या अंतरावर;
एवढं कळण्यासाठीच की,
आकाशपरतीचा तो रस्ता
त्यांच्यासाठी बंद केला गेलाय
कायमस्वरूपी…
“का ? कशासाठी ?
का साकारलं धूळमातीतून
नि बनवलं मात्र स्वतःसारखं ?
कशासाठी ठेवलं ते थोडकंसं अंतर ?
का दिसेल न दिसेलसं ते अंतर मिटवण्याच्या प्रयत्नांना
ठरवलं पाप, अक्षम्य अपराध ?
आणि स्वतःच जन्म देऊन
का, कशासाठी दूर लोटलं स्वतःपासून ?
का ? कशासाठी ?”
आदिमाप्रमाणेच
निषिद्ध मार्गावर पाऊल टाकण्याचा अपराध केलेल्या
त्याच्या वंशजांचे प्रश्नाक्रोशही
विरून जातात त्या गुहेच्या गर्भात…
शापितांच्या धूळमाखल्या आक्रोशांमुळे
अंधाऱ्या गुहेच्या बहिऱ्या दारापलीकडचा
अदृष्ट निळा प्रकाशमार्ग खुला होत नाही !
चक्र सुरूच राहतं तरीही —
प्रार्थनांची आवर्तनं,
अंतराळाची उत्खननं,
खुळ्या नक्षत्रांची होरपळ,
आसवांचा पारिजाती दरवळ,
निषिद्ध वाटेवरचे विफल प्रवास,
निरागस बाळनजरेला होणारे आभास —
ह्यांतलं काहीच बदलत नाही !
अर्थात,
ह्यांतल्या कशाकशानेही
दूरस्थ निळ्या निर्मम पोकळीला
पाझर म्हणून फुटत नाही !
आकाशाकडे जाण्यासाठी हजारो रस्ते असतात, म्हणे;
ते धुंडाळत राहतात तो एक रस्ता,
जो आला होता त्यांना घेऊन
आकाशातून ह्या मृण्मय विश्वात;
पण तो त्यांना काही केल्या गवसत नाही…
तो त्यांना काही केल्या गवसत नाही…
(संदर्भित मूळ कलाकृती : द क्रिएशन ऑफ अॅडम, मायकेल अँजेलो.)
***
चित्र प्रतिमा सौजन्य : शूज, व्हिन्सेन्ट व्हॅन गॉघ, १८८८.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
