Skip to content Skip to footer

याद: फैज़ अहमद फैज़/‘अलख’ निरंजन

Discover An Author

  • Writer, Theatre Director and Translator

    ‘अलख’ निरंजन (निरंजन पेडणेकर) हे नाट्यलेखक, दिग्दर्शक व अभिनेता असून सोनी रिसर्च येथे शास्त्रज्ञ म्हणूनही काम करतात. त्यांनी मराठी-हिंदी-इंग्रजीमध्ये स्वतंत्र नाटके लिहिली आहेत तसेच अनुवादित केली आहेत. 'उच्छाद' या त्यांच्या नाटकाला २०२३ सालचा झी नाट्य गौरव पुरस्कार मिळाला आहे. 'शाही पहरेदार', 'बंगाल टायगर ऍट द बगदाद झू' आणि 'उपाश्या' सारखी नाटके त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. २०१८ साली त्यांना भारतभरातून पाच रंगकर्मींना दिली जाणारी तेंडुलकर-दुबे शिष्यवृत्ती मिळाली आहे. ते उर्दू गझल व मराठी कविताही करतात आणि त्यांनी अनेक कवितांचे या भाषांत भाषांतरही केले आहे.

    'Alakh' Niranjan (Niranjan Pedanekar) is a scientist by profession. He writes, translates poetry, and is actively engaged in theatre.

  • Author

    फ़ैज अहमद फ़ैज (१९११-८४) हे पाकिस्तानचे नामांकित उर्दू कवी आणि गझलकार. त्यांची क्रांतिकारी कविता जगभरातल्या वाचकांना आपली वाटत आली आहे.

    Faiz Ahmed Faiz (1911-84) was a well-known Urdu poet known for his ghazals and nazm. He was a prominent political voice of Pakistani poetry.

आठवण
 
माझे एकाकी अरण्य
त्यात हलतात खास
तुझ्या आवाजाची छाया
तुझ्या ओठांचे आभास
 
माझे एकाकी अरण्य
तिथे दूर पाचोळ्यात
तुझ्या मिठीचे गुलाब,
जाईजुई फुलतात 
 
माझ्या कुशीत जागतो
तुझ्या श्वासांचा वणवा 
धगधगे हळूहळू
त्याचा गंधित गोडवा
 
थेंबथेंब चमकते
आकाशाच्या आरपार
तुझ्या चिंब नजरेच्या
कुंद दवाची किनार
 
तुझ्या एका आठवाने
कसा ठेवला क्षणात
माझ्या बेचैन मनाच्या
गालावर आज हात —
 
जरी विरहात गेली
आज उदास प्रभात
असे वाटते मनाला
आली मिलनाची रात
 
– ‘अलख’ निरंजन

(फैज़ अहमद फैज़ यांच्या ‘याद’ या प्रसिद्ध नज़्मचे मराठी रूपांतर)

 

दश्त-ए-तन्हाई में ऐ जान-ए-जहाँ लर्ज़ां हैं
तेरी आवाज़ के साए तिरे होंटों के सराब
दश्त-ए-तन्हाई में दूरी के ख़स ओ ख़ाक तले
खिल रहे हैं तिरे पहलू के समन और गुलाब
उठ रही है कहीं क़ुर्बत से तिरी साँस की आँच
अपनी ख़ुशबू में सुलगती हुई मद्धम मद्धम
दूर उफ़ुक़ पार चमकती हुई क़तरा क़तरा
गिर रही है तिरी दिलदार नज़र की शबनम
इस क़दर प्यार से ऐ जान-ए-जहाँ रक्खा है
दिल के रुख़्सार पे इस वक़्त तिरी याद ने हात
यूँ गुमाँ होता है गरचे है अभी सुब्ह-ए-फ़िराक़
ढल गया हिज्र का दिन आ भी गई वस्ल की रात

रात गेली

सारे तुझे नि माझे स्मरण्यात रात गेली
अलवार चांदण्याच्या दुखण्यात रात गेली

विझली कधी, कधी अन् पेटून दुःख झाली
वाऱ्यात वात इवली हलण्यात रात गेली 

कित्येक वेष ल्याला कोणी सुगंध वेडा
चित्रात सूर कुठले रचण्यात रात गेली

आली झुळूक रमली श्वासांमधे फुलांच्या
त्यांना नवी कहाणी सुचण्यात रात गेली

ठोठावल्या कडीने दारावरून हाका
नुसतीच वाट त्याची बघण्यात रात गेली

एका सुखावणाऱ्या आशेत जीव गेला
एका सतावणाऱ्या झुरण्यात रात गेली

– ‘अलख’ निरंजन

(फैज़ अहमद फैज़ यांच्या ‘मक़्दूम की याद में’ या ग़ज़लचे मराठी रूपांतर)

 

“आप की याद आती रही रात भर”
चाँदनी दिल दुखाती रही रात भर
गाह जलती हुई गाह बुझती हुई
शम-ए-ग़म झिलमिलाती रही रात भर
कोई ख़ुशबू बदलती रही पैरहन
कोई तस्वीर गाती रही रात भर
फिर सबा साया-ए-शाख़-ए-गुल के तले
कोई क़िस्सा सुनाती रही रात भर
जो न आया उसे कोई ज़ंजीर-ए-दर
हर सदा पर बुलाती रही रात भर
एक उम्मीद से दिल बहलता रहा
इक तमन्ना सताती रही रात भर

कोण?

जीव झाला कासावीस
आलं आहे दारी कोणी?
कोणी नाही, कुठे कोण?
कुठे कोण? नाही कोणी
जरी असेल पांथस्थ
आला थकून भागून,
घडीभर विसावेल
आणि जाईल निघून 
आता सरलीय रात
उभा अंधार आटला
आणि ताऱ्यांचा पाचोळा
भरकटून पांगला
इमारतींचे दिवेही
आता किती झोपाळले
अंधारात पिल्यागत
काजळले, ठेचाळले
एक एकेकटी वाट
वाट बघून आंबली
हातपाय पसरून
तिनं पथारी ताणली
आली कुठूनशी धूळ
वाटेवर विसावली
सारे पावलांचे ठसे
हाती घेऊन धावली
वाती, पणत्या, कंदील
टाका विझवून दिवे
प्याले भरा काठोकाठ
कोऱ्या सुरयांनी नवे
झाली खिडक्या नी दारं
झोपेवीण अंदाधुंद
त्यांना आवळून घट्ट
कुलुपांनी करा बंद
कोणी नाही, कुठे कोण?
कुठे कोण, नाही कोणी
फार येणारच नाही
आता इथे कधी कोणी

– ‘अलख’ निरंजन

(फैज़ अहमद फैज़ यांच्या ‘तनहाई’ या प्रसिद्ध नज़्मचे मराठी रूपांतर)

तनहाई

फिर कोई आया दिल-ए-ज़ार नहीं कोई नहीं
राह-रौ होगा कहीं और चला जाएगा
ढल चुकी रात बिखरने लगा तारों का ग़ुबार
लड़खड़ाने लगे ऐवानों में ख़्वाबीदा चराग़
सो गई रास्ता तक तक के हर इक राहगुज़ार
अजनबी ख़ाक ने धुँदला दिए क़दमों के सुराग़
गुल करो शमएँ बढ़ा दो मय ओ मीना ओ अयाग़
अपने बे-ख़्वाब किवाड़ों को मुक़फ़्फ़ल कर लो
अब यहाँ कोई नहीं कोई नहीं आएगा

काम आणि प्रेम

काम केले जरा, प्रेम केले जरा
भाग्यशाली किती लोक होते पहा
प्रेम ज्यांच्या मते काम होते खरे
ज्यांस कामावरी प्रेम होते पुरे
अडकुनी राहिलो आजवर बावरा
काम केले जरा, प्रेम केले जरा
काम प्रेमामधे लुडबुडू लागले
प्रेम कामामधे धडपडू लागले
शेवटी ग्रासलो आणि दोघांस या
हाय अर्ध्यावरी सोडले मी बघा!

(फैज़ अहमद फैज़ यांच्या ‘कुछ इश्क़ किया कुछ काम किया’ या प्रसिद्ध नज़्मचे मराठी रूपांतर)


कुछ इश्क़ किया कुछ काम किया
वो लोग बहुत ख़ुश-क़िस्मत थे

जो इश्क़ को काम समझते थे
या काम से आशिक़ी करते थे

हम जीते-जी मसरूफ़ रहे
कुछ इश्क़ किया कुछ काम किया

काम इश्क़ के आड़े आता रहा
और इश्क़ से काम उलझता रहा

फिर आख़िर तंग आ कर हम ने
दोनों को अधूरा छोड़ दिया

रेखाचित्र: चैताली बक्षी

Post Tags

Leave a comment