१९४७ मध्ये मोहम्मद ८ वर्षांचे होते आणि आपल्या कुटुंबाबरोबर पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातल्या सदरपुरा गावात राहत होते. फाळणीची घोषणा झाली त्यावेळी त्यांना आपल्या कुटुंबासहित आपली शेतजमीन सोडून जावं लागलं. पश्चिमेकडे प्रवास करत ते सिधवान-सलीमपुर इथे पोचले आणि पुढचे अडीच महिने तिथेच निर्वासितांच्या छावणीत राहिले.
मोहम्मद आणि त्यांच्या कुटुंबाला त्यानंतर फिरोजपूरजवळच्या पुलावरून सतलज नदी ओलांडून जगरावला नेलं गेलं. नदी ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर लगेच असलेल्या कसूर गावात ते पोचले आणि मग ल्यालपुर मध्ये स्थिरावले. (सध्याचे फैसलबाद )
मोहम्मद १९६९ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडला गेले आणि १९७० पासून ते आपल्या बायकोबरोबर कार्डिफ इथे राहतात. त्यांना ४ मुलं आणि ३ नातवंडे आहेत.
आमचं गाव एकत्र होतं. अमुक एखादा हिंदू, शीख किंवा मुस्लीम आहे असं आम्हाला कधीच जाणवलं नाही. कुणाचं लग्न असेल तर संपूर्ण गाव एकत्र यायचं. कोणाचा मृत्यू झाला तरीही सगळे मिळून शोक व्यक्त करीत. अमुक एखादा हिंदू आहे का शीख, याने काहीच फरक पडायचा नाही.
अचानकपणे, म्हणजे साधारण वर्षभरातच हा वेडेपणा सुरु झाला. मला आठवतंय, लोक घोषणा देत होते – “पाकिस्तान का मतलब क्या/ ला इलाहा इल्ललाह”. कॉंग्रेसला मत द्यायचं की मुस्लीम लीगला मत द्यायचं यावर लोक वाद घालत असायचे. परस्परांच्या धर्माबद्दल समाजात प्रचारकी पद्धतीने तिरस्कार आणि द्वेष पसरवला जात होता. या सगळ्याचा अर्थ काय हे त्या वेळी कोणालाच समजत नव्हतं.
अखेर भारताचे भाग पडले. नेमकी किती लोकं मरण पावली हे कोणालाच सांगता येणार नाही पण हा आकडा लाखांमध्ये होता. कोणालाच नीट न्याय मिळू शकला नाही. जे झालं त्याला लोक जबाबदार नव्हते. राजकारणी जबाबदार होते.
जीव वाचवण्यासाठी लोकांनी घाबरून आपली घरं सोडली आणि छावण्यांचा आश्रय घेतला. आम्हीसुद्धा पाकिस्तानला जाण्याच्या अपेक्षेने सलीमपुरच्या छावणीत अडीच महिने वाट बघत थांबलो होतो. आम्हाला किंवा आमच्या जनावरांना तिथे कधीच अन्नपाण्याचा प्रश्न आला नाही कारण अनेक ‘मुस्लीम नसलेले’ ओळखीचे लोक आम्हाला खायला आणून देत होते. माझ्या वडिलांच्या हिंदू आणि शीख मित्रांनी आमची खूप काळजी घेतली. पण मी अशी लहान मुलं, माणसं पाहिली आहेत जी गवत खाऊन जगली. ते सगळं भीषण होतं, मुलांना त्रास होत असायचा. पण लहान मुलं खायला नको म्हणाली तरी त्यांना दुसरा पर्याय नसायचा. जगण्यासाठी पोटात काहीतरी जावं लागतंच. तो काळ खरंच भयंकर होता.
शेवटी तो कॅम्प पाकिस्तानला हलवण्याची वेळ आली. आमचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांनी आम्हाला सांगितलं की ही एक तात्पुरती व्यवस्था आहे, कारण आपला प्रदेश सोडून जायला कोणीच तयार नव्हतं. दिवसा आम्ही १२-१५ किलोमीटर चालायचो आणि रात्री कुठेतरी मुक्काम करायचो. खायला पुरेसं अन्न मिळत नसल्यामुळे कॅम्पमध्ये राहणारे लोक फार अशक्त झाले होते. रोजचं चालणं त्यांच्यासाठी कठीण होतं.
आमच्यापैकी काही जण असे होते ज्यांनी आपली कुटुंबं गमावली होती, त्यांच्या कुटुंबियांची हत्या झालेली होती. मला आठवतंय, आमच्याबरोबर एक बाई होती, तिला दोन लहान बाळं होती. तिसऱ्यांदा कॅम्प हलला त्यावेळी म्हणजे साधारण ४०-४५ मैल चालल्यानंतर तिचे पाय चांगलेच सुजले. तिच्याकडे चपला किंवा बूट नव्हते आणि तिला बाळांनासुद्धा सांभाळायचं होतं. तिसऱ्या दिवसानंतर मात्र ती दोन्ही बाळांना सांभाळू शकली नाही. एक दिवस तिने त्यापैकी एका बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून दिलं. कारण तिला फक्त एकालाच सांभाळणं शक्य होतं. कित्येक इतर बायका आणि त्यांच्या मुलांबरोबरही असंच घडत होतं कारण लहान मुलं इतकं अंतर चालू शकायची नाहीत आणि त्यांचे पालक त्यांना उचलून घेऊ शकतील एवढी शक्तीच त्यांच्यात नसायची. तुम्ही मागे पडलात तर तुम्ही बहुतेक जिवंत राहणार नाही अशीच परिस्थिती होती.
शेवटी आम्ही एका गावात स्थिरावलो. काही काळाने सरकारने आम्हाला थोडी जमीनही दिली. शीख आणि हिंदूंनी सोडून दिलेली जमीन होती ती. हे १९४७ मध्ये घडलं. माझे वडील १९५८ ला गेले. तोपर्यंत त्यांना आपल्याला आपल्या घरी परत जाता येईल अशी अपेक्षा होती. ते म्हणायचे – “कोणीतरी माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझी जमीन, सगळं एकदम माझ्याकडून काढून घेतं. हे असं नाही होऊ शकत.”
शिक्षण पूर्ण होईपर्यंत, हिंदू आणि शीख लोकांचा तिरस्कार आणि द्वेष करतच मी मोठा झालो. त्यानंतर मी प्रशासकीय सेवेत रूजू झालो. भारत-पाकिस्तान व्यापारासंबंधी कामात मी पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत होतो. त्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा अमृतसरला गेलो तेव्हा तिथलं विश्व संपूर्णपणे नवीनच होतं. मला आश्चर्य वाटलं. हिंदू आणि शीख लोकांनी चक्क माझं स्वागत केलं. लोक मला उत्साहाने घरी बोलवायचे. जेवायला, त्यांच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवायला आमंत्रण द्यायचे. पहिल्या दिवशी मी चक्रावून गेलो. मला पाकिस्तानात जसं शिकवलं गेलं होतं तसं इथे वास्तवात काहीच नव्हतं. हिंदू आणि शीख लोक पाकिस्तानातील लोकांना भेटायला उत्सुक होते. मला त्यांच्यात कुठेच तिरस्काराची भावना दिसली नाही. इथे इंग्लंड मध्येही तेच चित्र आहे. हिंदू, शीख, मुस्लीम यांच्यात इथे भेदभाव नाहीय. विशेषतः पंजाबी लोकांमध्ये तर नाहीच. ते एकत्र आहेत.
‘माझ्या लहानपणीच्या माझ्या ज्या आठवणी आहेत तशा कोणाच्याही नसाव्यात.’ त्या अनुभवातून मी प्रत्येक व्यक्तीचा नितांत आदर करायला शिकलो आहे. मी आत्तापर्यंत इतरांसाठी जगत आलो आहे आणि मला आशा आहे की शेवटपर्यंत मी इतरांसाठीच जगत राहीन.