प्रणव सखदेव

चेहरा

०२

back

अनुपम सैकिया, द बेड, २०१६

माणसाच्या मनात काय चाललेलं असतं याचा कधी पत्ता लागतो का आपल्याला? एखादा माणूस आत्ता आपल्या अगदी शेजारी बसला असेल, आणि त्याचा आपल्याला स्पर्श होत असेल तरी नुसत्या जवळ असण्यातून त्याच्या मनातली खळबळ कुठे समजते आपल्याला? आपण नुसेतच अंदाज घेत काहीतरी बोलत राहतो आणि मग एक दिवस घात होतो! आपण खडबडून जागे होतो, आणि ही जागृतावस्था कायमस्वरूपी आपल्या मनाचा एक तुकडा घट्ट धरून बसते; आठवण होऊन रुतून बसते…

घराच्या गच्चीतून दूरवर दिसणारं खाडीचं पाणी चमकत होतं. खाडीवर बांधलेल्या पुलावरच्या दिव्यांचा प्रकाश पाण्यात सांडत होता आणि डचमळणार्‍या काळ्या पाण्यावर पिवळ्या प्रकाशाचे खेळ सुरू होते.

उन्हाळ्याच्या अखेरचे दिवस होते. पावसाला कधीही सुरुवात झाली असती. भयानक उकडत होतं. अंग घामाने चिकट झालं होतं. आणि त्यात आम्ही दीडेक क्वार्टर रम रिचवली होती. शेवटी रियानने असह्य होऊन टीशर्ट काढला आणि तो उघडाच बसला. गच्चीवरच्या पांढुरक्या एलईडीच्या प्रकाशात त्याचं सावळं अंग ग्लो झाल्यासारखं वाटत होतं. मीही टीशर्ट काढला, पण उघडं बसायला कसंतरी वाटल्याने आत जाऊन बनियन घालून आलो.

दहाचा सुमार होता आणि वातावरण स्तब्ध होतं. जेलीसारखं. मधूनच बिल्डिंगलगतच्या मुख्य रस्त्यावरून एखादी बाइक जायची आणि ही जेली थरथरायची. एखादा ट्रक किंवा कार गेली तर ही थरथर आणखी वाढायची. आणि थोड्या वेळाने ही जेली पुन्हा स्थिर व्हायची.

मी गच्चीच्या भिंतीला टेकून बसलो होतो. भिंतीचा काटेरीपणा बोचत होता. पण तो असह्य न वाटता, हवासा वाटत होता. रियान माझ्यासमोर बसला होता. आमच्या मध्ये अर्धवट भरलेले ग्लासेस, थोडं फायब्रस मांस चिकटलेली चिकन लॉलीपॉप्सची हाडं, लेज, कांदा-टोमॅटो घातलेलं फरसाण आणि अर्धवट खाल्लेला आणि आता थंड झालेला ट्रिपल शेजवान राइस असं काय काय पडलं होतं.

मी त्याला म्हणालो, ‘मला जरा गरगरल्यासारखं होतंय, पोटात कसंतरी होतंय.’

‘मला मस्त वाटतंय. किक लागायला सुरुवात झालीय आता.’ तो म्हणाला, ‘एवढ्यात संपलास? अबे अभी तो शुरुवात हुई है.’

रियान जिमला जायचा. त्यामुळे त्याची बॉडी शेपमध्ये होती. पोट घट्ट होतं आणि दंडाचे मसल्स कडक होते. त्याच्या कुरळ्या केसांमधल्या काही बटा त्याने मलिंगासारख्या सोनेरी रंगवल्या होत्या. तो क्रिकेट प्लेयर होता. शाळेमध्ये आणि नंतर कॉलेजकडूनही तो क्रिकेट खेळायचा. क्रिकेटच्या कोचिंग क्लबमध्ये पहिल्यांदा आमची ओळख झाली, पण नंतर मी तो नाद सोडून दिला होता. तो मात्र खेळत राहिला. कुठल्या, कुठल्या टूर्नामेंटमध्ये त्याने सेंच्युर्‍या केल्या होत्या. त्याच्या पेपरात बातम्याही आल्या होत्या, बक्षिसंही मिळाली होती. तो माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा होता. मी सेकंड इयरला होतो, आणि तो लास्ट इयरला. विराट कोहलीसारखं बॅट्समन व्हायचं हे त्याचं स्वप्न होतं. म्हणून त्याने विराटसारखीच दाढी ठेवली होती. ‘काहीच नाही, तर आयपीएल तरी खेळायचंचे मला. इथे, कल्याणात काही स्कोप नाही रे क्रिकेटबिकेटला. मुंबई ती मुंबई.’ तो सांगायचा, ‘एकदा मी आयपीएल खेळलो, की लगेचच कोचिंग अकॅडमी काढेन इथे. शिवाजी पार्कला, आझाद मैदानला असतात ना तशा.’

‘ग्रेट आयडिया,’ मी तेव्हा त्याला म्हणालो होतो. ‘आपल्या इथे खूप टॅलेंट आहे यार.’

०००

‘अब आएगा असली मजा,’ असं म्हणून रियानने आत जाऊन आपली सॅक आणली. त्यातून सिगरेटचं पाकीट काढलं आणि एक पांढरी छोटी डबी काढली. ‘कडक आणि ताजा माल आहे एकदम, नेहमीच्या म्हातारीकडून आणलाय. एका कशमध्ये डायरेक्ट हेवन!’ अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटांच्या चिमटीत डबीतली एक हिरवट-काळी गोळी धरून, ती माझ्यापुढे नाचवत तो म्हणाला. मग त्याने सिगरेटमधली तंबाखू सावकाशपणे एका कागदावर काढली. म्हणाला, ‘सांभाळून करावं लागतं हं हे. नाहीतर साली फाटून जाते.’ मग त्याने ती गोळी आपल्या तळव्यावर घेऊन चुरली आणि त्या तंबाखूत मिसळली. पुन्हा काळजीपूर्वक तंबाखू सिगरेटमध्ये भरली. आधीसारखी सगळी तंबाखू सिगरेटमध्ये भरली गेली नाही. थोडी तंबाखू उरली. पण त्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. सिगरेटचं फिल्टर जमिनीवर एकदा ठोकलं आणि सिगरेटचा टोकाचा कागद मुडपून ती बंद केली. ती सिगरेट पाहून मला लहानपणी बागेत गेल्यावर दाणेवाला कसे दाणे कागदाच्या कोनात बांधून द्यायचा त्याचीच आठवण झाली.

‘येस, झालं तयार आपलं अंतराळयान!’ असं म्हणून रियान हसला. त्याचे पिवळे दात पांढुरक्या प्रकाशात चमकले.

‘तू किती फ्रिक्वेंटली ओढतोस?’ मी विचारलं.

‘महिन्यातून तीनदा, फारतर चारदा. मुद्दाम गॅप ठेवतो. अॅडिक्शन नाही होत त्याने.’ रियान म्हणाला, ‘मी गूगल कॅलेंडरवर मार्कच करून ठेवतो तारखा.’

‘ओके.’ मी विचारलं, ‘आणि केव्हापासून घेतोएस?’

‘दोनेक वर्षं झाली असतील. आमच्या घराच्या इथे एक देऊळ आहे. तिथे भजनं करणारं मंडळ आहे एक. रात्रभर गात-वाजवत राहतात. एकदा मी त्यातल्या एका म्हातार्‍याला विचारलं की, एवढा कसा स्टॅमिना तुमचा? तेव्हा त्याने मला ही गोळी दिली. पहिल्यांदा घेतल्यानंतर जी काय वाट लागली ना, फुल्टू गोळा झालो यार. काहीच समजत नव्हतं. पण सकाळी एकदम वेगळंच वाटलं, फ्रेश! मग घेत राहिलो. आपल्यासारखे बरेच आहेत, हे समजलं नंतर. लिंक समजत गेल्या, कुठे चांगला माल मिळतो हे कळलं. आता मी स्टॉकच करून ठेवतो. हे बघ…’ त्याने मला ती पांढरी डबी उघडून दाखवली. त्यात सहा-सात गोळ्या होत्या. ‘तुला कधी हवं असेल तर सांग. बाय द वे तू पहिल्यांदाच ओढतोएस ना?’

मी म्हणालो, ‘यप. पण मी आत्ता फक्त ट्राय करणारे. फक्त एकदाच.’

‘हं! मीही असंच म्हणालो होतो पहिल्यांदा.’ रियान हसला. म्हणाला, ‘तुला सांगतो, पण याने माझा गेम सुधारला एकदम. गेमच्या आधी रात्री मी अर्धी गोळी जरी ओढली ना, तरी दुसर्‍या दिवशी कमीत कमी चाळीसेक रन्स तरी करतोच. आणि फील्डिंग तर विचारूच नकोस. एकदा मी गेम खेळायला तंद्रीतच गेलो, तीन रन आउट केले आणि वीस बॉलमध्ये फिफ्टी-टू. मॅन ऑफ द मॅच! आमच्या टीमचा कॅप्टनही घेतो कधीतरी अधूनमधून.’

‘पण कोणाला समजत नाही…?’

‘हॅ… कोणाला समजणारे? लोकल लेव्हलवर कोण करतं यार टेस्टबिस्ट.’

‘पण पुढे… नॅशनल लेव्हलला…’

‘तेव्हाचं तेव्हा. आणि नॅशनलला गेलो तर ना! किती पॉलिटिक्स आहे असतं यार त्यात. पैसे चारा. सिलेक्टर्सची चाटा. त्यात आपण कल्याणचे! बहोत पापड बेलने पडते है. लीव्ह इट.’

रियानने सिगरेट ओठात धरून लायटरने पेटवली. एक दम ओढला. चर्र असा आवाज झाला. नाकातून धूर बाहेर सोडला. कडवट जळजळीत धूर माझ्या नाकातून आत गेला. तेव्हा नाकातले केस जळून जातील असं वाटलं.

माझ्याही नकळत माझा चेहरा जरा घाबरल्यासारखा झाला असावा. म्हणून माझ्या पुढ्यात सिगरेट धरत रियान म्हणाला, ‘डोन्ट बी अफ्रेड. काही नाही होणार. मार बिंधास्त. बम बम बोले!’

त्याआधी मी कधीतरी अधूनमधून सिगरेट प्यायचो. पण भीत भीतच. आई-डॅडीला समजलं तर काय होईल, त्यांना काय वाटेल, ते काय करतील याची मला भीती वाटायची. म्हणून बरेचदा कुठेतरी लांब जाऊन लपतछपत अर्धीच सिगरेट मारायचो आणि मग हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी मिसळबिसळ खाऊनच घरी जायचो. मुद्दामहून जास्त कांदा खायचो. आत्ताही एक मन तयार होतं, ‘घे, काही होत नाही’ असं सांगत होतं, तर दुसरं बिचकत होतं, घाबरत होतं.

मी म्हणालो, ‘मला समजत नाहीये, काय करू मी ते. तुला बावळट वाटत असेन ना मी, यूसलेस.’

रियान म्हणाला, ‘तुला एक सांगू? मला तुझी गर्लफ्रेंड यूसलेस वाटते जास्त. काय चाल्लेलं असतं यार तुमचं. ती तुला भरवते काय, आणि सारखी तुझ्यासोबतच असते. जराही वेळ इकडेतिकडे जात नाही. कायम चिपको!’ त्याने एक दम मारला. ‘बोअर नाही का होत तुला? खरं सांग, आर यू इन लव्ह? तसं असेल तर कठीणे मग.’

‘नाही, नाही,’ मी सारवासारव करत म्हणालो, ‘कसंय ना, मीनल आणि मी शाळेत असल्यापासून एकत्र आहोत. आणि आमच्या घरचेही चांगले ओळखीचे आहेत. सो, असं वाटतं सगळ्यांना. पण आम्ही चांगले मित्र आहोत फक्त.’ विषय बदलण्यासाठी मीच त्याला उलट प्रश्न विचारला, ‘तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का नाही?’

‘गर्लफ्रेंड? नो वे. अजून माझी अनुष्का भेटलीच नाहीये मला.’ मग तो स्वतःवर खूश होत हसला. म्हणाला, ‘पण ज्यूनिअर कॉलेजमधली एक शूटिंग करणारी आवडली होती मला. मी आणि ती एकदा तिच्या घरी कोणी नसताना भेटलो होतो…’

‘मग? काय झालं?’ मी उत्सुकतेने विचारलं.

‘किसिंगविसिंगची ड्राय मजा झाली, पण ओल्या पार्टीला नाही म्हणाली. गप घरी आलो. मग नाद सोडला तिचा. सरळ अनुभवी भाभीलाच भिडलो. आमच्या फ्लॅटसमोरच्या.’ माझ्या हातात सिगरेट देत तो म्हणाला, ‘तू व्हर्जिन आहेस, हो ना?’

माझी काहीतरी घोडचूक असल्यागत मी शरमून मान खाली घातली. म्हणालो, ‘तुला कसं समजलं पण?’

‘तू ज्या एक्साइटमेंटने मला विचारलंस ना मगाशी पुढे काय झालं, त्यावरून!’ आणि तो जोरजोरात हसायला लागला. माझ्याकडे बोट दाखवून म्हणू लागला, ‘स्साला व्हर्जिन घोडा!’ हसत राहिला. आता त्याचे डोळे वेगळे दिसत होते आणि बोलण्याची लयही बदलली होती.

मी त्याच्यासमोर कानकोंडा झालो. मला खूपच अपमानित झाल्यासारखं वाटलं. मला त्याच्या हसण्याचा राग यायला लागला. आणि मग मला माझाच राग आला. मी लहानपणापासून सुरक्षित वातावरणात वाढलो होतो, मला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी स्ट्रगल करावा लागला नव्हता. मला काही ध्येयंबियं नव्हती. मला फक्त डिग्री घ्यायची होती आणि मग डॅडीचा बिझनेस माझ्यासाठी तयार होता. आयफोनच्या ल्यूसिड स्क्रीनसारखं माझं सगळं आयुष्य स्मूथ गेलं होतं. आणि आता त्याचाच मला कंटाळा आला होता. मला काहीतरी हॅपनिंग हवं होतं, एक्साइटमेंट हवी होती. मी हातातली सिगरेट ओठाला लावली आणि दोन-तीन दम मारले. चांगले आतपर्यंत नेले. आणि एका घोटात टॉप टू बॉटम रमचा कच्चाच पेग मारला.

‘ये हुई न बात…’ रियानचा आवाज मला आता लांबून कुठूनतरी एेकू येऊ लागला.

०००

मी जायंटव्हीलमध्ये बसलो. ते फिरू लागलं. मी गरागरा फिरू लागलो. वर गेलो, खाली आलो. खाली येताना माझ्या पोटात गोळा उठला. मी ओरडलो. कोणाच्यातरी हसण्याचा आवाज येत राहिला. मी वेगाने फिरू लागलो.

आणि एका क्षणाला, सगळं फिरायचं थांबलं. काही क्षण स्थिरता. मी मलाच पाहत होतो. स्थिर. आणि मग माझ्या भोवतीचं सगळं जग फिरू लागलं. मी स्थिरच. जग फिरत होतं.

आणि एकाएकी व्हॅक्यूम क्लिनरच्या नळीतून सगळी धूळ झटक्यात आत ओढली जावी, तसं माझ्याभोवतीचं सगळं जग माझ्या आत खेचलं गेलं. मी सगळं तटस्थपणे पाहत होतो. आणि मग माझे तुकडे तुकडे झाले…

०००

मला जाग आली तेव्हा पहाटेचे पावणेचार होत होते. मी बसल्या जागीत आडवा झालो होतो.

माझ्यासमोर रियान बसला होता. माझ्याकडे एकटक पाहत होता. ‘काय, कशी झाली ट्रिप?’ त्याने मला हसत हसत विचारलं. म्हणाला, ‘मरण्याआधी प्रत्येकाने एकदा तरी याचा अनुभव घ्यायला पाहिजे.’ त्याने माझा हात हातात धरला. त्याचे तळवे ओले आणि गार होते. तो स्पर्श मला आईने आपल्या बाळाचा हात हातात धरावा तसा वाटला.

रियान सिगरेटचे दम मारत म्हणाला, ‘तू हा एक्सपीरियन्स कधीच विसरणार नाहीस आयुष्यभर. यानंतरचा तू आणि याआधीचा तू यात खूप फरक असेल आता. फक्त तुला ते पेलता आलं पाहिजे…’ तो एकदम गप्पच झाला. त्याला पुढे काहीतरी बोलायचं होतं. पण त्याला ते शब्दांत मांडता आलं नसावं.

मी म्हणालो, ‘मला आत्ता खूप भूक लागलीये.’

‘अंडी आहेत?’

‘हो, फ्रीजमध्ये आहेत.’

‘वॉव! मी ऑम्लेट्स करतो. हा चखणा चिवडत बसायचा वैताग आलाय.’ तो डुलत डुलत आत गेला.

मी पडल्या पडल्याच आकाशाकडे पाहिलं. ते काळं-करडं दिसत होतं. ओला वारा वाहत होता. कुठेतरी पाऊस पडत होता. मला वाटलं की, कोणीतरी पाहतंय आपल्याकडे. तोच वीज चमकली आणि गडगडाट झाला. पाऊस पडायला लागला. पहिल्यांदा थोडी भुरभुर होती. मग मोठे मोठे पाण्याचे थेंब अंगावर पडू लागले. मी तसाच पडून राहिलो, भिजत राहिलो. ग्लासात पाणी साठत होतं, त्यात मी थोडी-थोडी रम ओतली…

‘धिस इज फॉर यू सर, टू एग्ज ऑम्लेट.’

मी ग्लास घेऊन आत गेलो. तसंच ओल्या अंगाने पावसाच्या पाण्याने भरलेले पेग पीत पीत आम्ही ऑम्लेट्स खाल्ली.

०००

प्लेट्स ठेवायला मी किचनमध्ये गेलो आणि बाहेर आलो. पाहतो तर, रियान गच्चीवर भिजत भिजत नाचत होता. नागडा!

मी म्हणालो, ‘प्लीज, रियान आत ये. शेजारचे पाहतील तुला साल्या. मला बूच लागेल.’

‘कोण पाहणारे? आत्ता झोपलेत सगळे सुखाने. आणि पाहिलं तर पाहू देत. सगळे असेच तर असतात.’

‘प्लीज. माझ्या आई-डॅडीला…’

‘कमॉन हर्ष, काय आई-डॅडी करतोएस? माझ्यासोबत डान्स करायला ये त्यापेक्षा. पहिलाच पाऊस आहे हा. किती स्वच्छ आणि छान वाटतंय बघ.’ रियान म्हणाला, ‘आतून धुऊन निघाल्यासारखं. क्लीन.’

वीज कडाडली आणि गडगडाट झाला. आता तो नाचायचा थांबला. तो माझ्याकडे पाहत होता. एकटक. माझ्याकडे बघून तो किंचित हसला. त्याच्या हास्यात एक वेडसरपणाची झाक होती. मी त्याला आत ओढण्यासाठी त्याच्या जवळ गेलो. पण तो दूर सरकला. तो अजूनही हसत होता. मला कसंतरीच झालं. पोटात ढवळवलं. कदाचित तो दारूचा, उलटसुलट कसंही खाण्याचा आणि त्या गोळीचाही परिणाम असावा. मला उलटीसारखं होत होतं. मी झटकन आत, वॉशबेसिनापाशी गेलो आणि भडाभडा ओकलो.

वॉशबेसिनमध्ये पिवळसर ऑमलेट, चिकन, दाणे आणि लाळ असा सगळा राडा झाला. मला पुन्हा एकदा भडभडून आलं. मी जोरात नळ सोडला, तसं सगळं भसकन वाहून गेलं. तोंडावर दोन-तीनदा पाणी मारून मी गच्चीकडे गेलो.

आता रियान गच्चीच्या कठड्यावर उभा होता. साधूच वाटला मला तो तेव्हा. त्याने डोळे अर्धवट मिटले होते. त्याची काळी दाढी भिजली होती आणि केस ओलेकंच होऊन पाणी निथळत होतं. त्याने हात पसरले होते. तो वर आकाशाकडे पाहत होता. डोक्यावरून वाहत जाणारं पावसाचं पाणी त्याच्या तोंडावरून, मानेवरून, छाती-पोट-जांघा असा प्रवास करत गच्चीच्या आउटलेटमधून वाहून जाणार्‍या पाण्यात मिसळून जात होतं.

मी स्वतःशीच पुटपुटलो, ‘हे पाणी नंतर नदीत, आणि मग समुद्रात जाईल.’ मग मला काय झालं काय माहीत; मी पटकन टेबलावर ठेवलेला माझा मोबाइल फोन घेतला आणि त्याचे पाच-सहा फोटो काढले.

रियानने माझ्याकडे पाहिलं. त्याचा उभट चेहरा शांत होता. सरळ नाकाचा शेंडा भिजून लालसर झाला होता. त्याच्या काळ्या डोळ्यात खळबळ नव्हती. डोळ्यांखालची काळी वर्तुळं गडद भासत होती. सिगरेट ओढून काळे पडलेले, वातडलेले ओठ आता पावसात भिजून मऊ पडले होते.

मी अजून एकदा क्लिक करणार तोच रियानने पाण्यात सूर मारावा तसं आपलं अंग सरळ खाली झोकून दिलं. आठव्या मजल्यावरून सरळ खाली.

मी पाहत राहिलो. आत्ता तो तिथे होता, त्याचे फोटो माझ्या मोबाइल फोनमध्ये होते, आणि आता तो तिथे नव्हता.

मी धावत कठड्यापाशी गेलो. ‘रियान…’ हाक मारली.

माझ्या पोटात पुन्हा एकदा ढवळू लागलं. पण मी तसाच दार उघडून लिफ्टने खाली गेलो.

०००

रियान खाली निपचित पडला होता. मला तिथेच उलटी झाली.

सोसायटीचा वॉचमन आला आणि म्हणाला, ‘बाबूजी ये कैसे हुआ? क्या हुआ?’ पण मला त्याचं म्हणणं एेकूच आलं नाही. मी ते स्वच्छ धुतलं गेलेलं अस्तित्व उलटं केलं.

तो चेहरा मी कधीच विसरू शकत नाही. त्या चेहर्‍यावर आनंद होता की दुःख होतं हे मला कळलं नाही. कधीच कळलं नाही.

प्रतिमा सौजन्य: अनुपम सैकिया

प्रणव सखदेव हे लेखक व कवी असून त्यांचे कथासंग्रह व कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. फिक्शन लिहिणं ही त्याची पॅशन असून त्यांना स्वयंपाक करायला खूप आवडतो. सध्या ते संपादक आणि अनुवादक म्हणून मराठी प्रकाशन संस्थांशी संलग्न आहे.

3 comments on “चेहरा

  1. Satyapalsingh Rajput

    interesting story…

    Reply
  2. abhijit jagtap

    Vikrut, Saumya Ani mendula khshanat zinzinya ananara dolas likhan
    Faar avadla

    Reply
    • शिल्पा कांबळे

      प्रणव चांगली कथा आहे….पण पटकन संपवलीस….अजून वाचायची होती.

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *