Skip to content Skip to footer

Discover An Author

  • Computer Engineer and Writer

    स्वप्नील शेळके हे संगणक अभियंता आहेत. पण, ते इतिहास आणि राज्यशास्त्र शिकवितात. त्यांच्या कविता आणि इतर लेखन विविध मराठी नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहे.

    Swapnil Shelke is computer engineer. But, he teaches History and Political Science. He has published his poetry and articles in various journals in Marathi.

नमस्कार. माझं नाव सारंग पाटील. हाकाराच्या पहिल्या अंकासाठी माझ्या लेखकाला तू लिही असं संपादकांनी सांगितलं. विषय दिला ‘आठवणी’. आता हा माझा लेखक सध्या आध्यात्मिक शोधाच्या अशा एका पायरीवर पोचलाय की जिथे या आठवणी घेऊन जगणं त्याने सोडून दिलेलं आहे. ‘आठवणी’ आणि ‘वैयक्तिक मोक्ष’ यांचं सूत्र काही जमत नाही, असं या लेखकाचं म्हणणं. शिवाय त्याच्या आठवणी या ‘त्याच्या’ आहेत, त्यात ‘संस्थात्मक आकलन’ किती, त्या वाचून कुणाला काय मिळणार, तसेच त्या आठवणी आहेत तशा स्वरुपात सांगता येणार आहेत का? हे त्याच्यासमोरचे  यक्षप्रश्न! पुन्हा त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, त्याची सध्याची प्रेयसी, मित्र असे कुणीकुणी ओळखीपाळखीचे त्यावर काय म्हणणार, याचा विचार करूनही त्याची थोडीफार फाटलेली असणार. नाही म्हणायला त्याच्या काही कविता, लेख वगैरे प्रकाशित झालेले आहेत, म्हणून या पुण्याईवर आपण आपल्या आठवणी सांगण्याच्या आणि इतरांनी त्या ऐकण्याच्या लायकीचे खरंच आहोत का, या संभ्रमातही तो आहे. शिवाय मराठीतली तद्दन थोर आत्मचरित्रं वाचून, हे असं काही आपल्या हातून लिहिलं जाईल की काय, यानेही त्याची छाती दडपलेली आहेच. त्यात आजकाल आपण जे सांगतो आहोत ते आपल्या नेणीवेत तसंच्या तसं असत का, तर बऱ्याचदा नसतंच, हेही त्याला माहीत आहे. अनुभवलेलं बरंचसं, शब्दांच्या आकारातून शाईतून येताना, फुटून-तुटून-मोडून बाहेर पडतं आणि हे इतकं बेमालूमपणे होतं की त्याचं त्यालासुद्धा कळत नाही म्हणे. म्हणजे एखादा अनुभव मांडायचा झाला की तो तसाच्या तसा कुणाच्या सेन्सॉरशिप शिवाय बाहेरच येत नाही इतकी त्याची आतली सेन्सॉरशिप  दराऱ्याची आहे. त्यात आलंच काही बाहेर की ते तसंच्या तसं वाचलं जाईल याची खात्री नाही. मागे एकदा त्याने लफंग्या विचारवंतांविषयी कविता लिहिली होती, तर ती मोदींविरोधी असल्याचे समजून त्याचा सत्कारच केला होता म्हणे पुण्यातल्या एका संध्याकाळच्या कार्यक्रमात. त्यामुळे त्याने आता लिहायच्याच आहेत आठवणी तर एक पात्र तयार करू आणि त्याच्याच तोंडून आपल्या काही आठवणी सोडून देऊ म्हणून काढलेला हा पळपुटेपणाचा मार्ग, म्हणून मी सारंग पाटील.

बरं आणखी एक, हा लेखक वाचन बिचन करत असल्याने सामूहिक कणवेची एक खोड याला लागलेली आहे. त्यामुळे Personal is Political चा मक्ता त्याने माझ्याकडे देऊन तो मोकळा झालेला असावा असाही माझा कयास आहे.

किंवा असंही असू शकतं की आठवणी तर आहेत, पण आठवायच्या नाहीयत या लेखकाला. परंतु त्याच्या आत असलेल्या कुणाला तरी त्या चिकटून बसल्यात कायमच्या, म्हणून तर हा लेखक अधनंमधनं ‘हिलिंग ध्यान’ करत असतो किंवा अधनंमधनं कविता पाडीत असतो. तर त्या आठवणी काळाचा पडदा टर्टर फाडून जसाच्या तसा बघणारा मी सारंग पाटील. मी अजूनही तिथेच आहे. त्या आठवणीत. त्या सहावी ‘अ’ च्या वर्गात किंवा तशाच कुठल्यातरी ठिकाणी ….

मी आजमध्ये कधी नसतोच. मी प्रत्येक वेळी त्या त्या आठवणींइतकाच असतो आणि हा लेखक जे. कृष्णमूर्तींच्या ‘आज’ मध्ये राहणारा सीयर. 

आता तुम्हाला वाटेल की हे भलतंच ‘आध्यात्मिक’ आहे . पण तुम्हाला सांगतो ‘पूर्ण’ असं काही नसतंच सामान्यांच्या जगात.  त्यात आणखीही काही काही असतं . बऱ्याचदा हे आणखी ‘काही काही’ लपवण्यासाठीचं बाकीचं सारं काही येतं अनेकदा. तर या ‘आणखी काही काही’ मध्ये एक गोष्ट नक्की येत असावी; ती म्हणजे फिक्शनमध्ये संदिग्धता ठेवता येते, कुणी दुखावलच तर कल्पना आहे वगैरे सांगून निसटता येतं, शिवाय कसली जबाबदारी घेण्याचा तापही नाही, हे सगळं माहीत असणं.

तर, हे असं सगळं. तर, घुमून फिरून पुन्हा मी सारंग पाटील आणि असा माझा जन्म. माझं नाव मस्तंय ना? या लेखकाच्या आईला तो झाला तेव्हा सारंग हे नाव ठेवावं असं वाटलं होतं. तिनं त्याला अनेकदा हे बोलूनही दाखवलेलं आहे. तेव्हा त्या अपुऱ्या इच्छेची पूर्तता माझ्या या नामकरणात झालेली आहे. पुन्हा आडनावात लोकं जात शोधतात. याने सरळ सांगूनच टाकली. तुम्हाला सांगतो, या लेखकाचा आठवणींच्या बाबतीतच नव्हे तर कोणत्याही अनुभवाच्या बाबतीत ‘विशिष्ट’ असण्यावर फारच जोर आहे बरं का. म्हणजे अगदी पोस्ट मॉडर्निटी का काय म्हणतात ना, त्याच्यात असते तशी ‘सापेक्षता’ याला फार प्रिय. तेव्हा हा म्हणाला, मला आठवणी लिहायला लावल्या, मग आता माझी जात, माझं लिंग, माझा परिसर असं काय काय सेट करून ठेवलं पाहिजे की नाही? मी आपलं निमूटपणे ऐकून घेतलं बाबा आणि म्हंटलं, “कर काय करायचं ते, तसंही तू कसंही खा, लेखक शेवटी फसवाफसवी करणारच!”

 पुन्हा यात गम्मत अशी, आठवणी किती प्रकारच्या असतात. चांगल्या, वाईट. आपल्या चुकांच्या, आपल्या यशाच्या. अशा कितीतरी. आता आपण मराठीत आठवणी लिहितांना कुठे हे लिहितो की बुवा या या वर्षी I lost my virginity म्हणून. का नाही लिहीत? किंवा माझी सातवी प्रेयसी आत्ता इथे इथे असते बुवा. किंवा त्या गल्लीतल्या पलीकडच्या काकूंचा मी मुका घेतलेला आहे बरं का ? किंवा वडील फारच मारके आणि कद्रू होते किंवा इयत्ता नववी आणि दहावी या दोन वर्षात ‘हस्तमैथुन शाप की वरदान’ या विषयाशी संबंधित डॉक्टरेट मिळवण्यापर्यंत संदर्भ साहित्य जमवूनही आजतागायत ती सवय मी सोडवू शकलेलो नाही. हे असं किती आणि काय कोणी लिहितं का आठवणीत ? सर्व आपले ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा बांग्लादेश मुक्तिसंग्राम किंवा जागतिकीकरण किंवा गोध्रा अशा वेळी भारलेला, मंतरलेला, किंवा भयभीत, तणावग्रस्त काळ; त्यात घरी थोरामोठ्यांची रेलचेल असल्याने मी ह्यांवह्यांव त्यांवत्यांव घडत गेलो वगैरे म्हणतात. मग आता या कुरतडणाऱ्या आठवणी लिहायच्या कशा? यावरून एक गोष्ट आठवली बरं का, की माझ्या घरी काही कधी कुठल्या थोराचं नि मोठ्याचं काही येणं जाणं नव्हतं त्यामुळे त्यांच्या घरातल्या चर्चा कानावर पाडीत मी काही घडलो वगैरे नाही. नाही म्हणायला माझ्या आजोळच्या सहकारी साखर कारखान्यातल्या गणपती उत्सवात वर्षाला नाटकसिनेमातले लोक येत असत. मामाची वट असल्याने त्यातले आठदहा त्यावेळी मी फेसटुफेस पाहिलेले होते. पुढे पुण्यामुंबईत आल्यावर त्यांना पुन्हा पाहिल्यावर यांना पाहिल्याचा आपण गावात इतका अभिमान का बाळगत होतो याचा विचार करून मी मनोमन खजील होत आधी मला आणि नंतर त्यांच्यातल्या काहींना यथेच्छ तोंडावर शिव्या दिलेल्या आहेत बरं का.

बरं, तुम्हाला सांगतो हा लेखकय ना याच्या कविता बिविता हे सगळं या गतकाळातल्या आठवणीत इतक्या  गुंतलेल्या आहेत की हा असं भडभडा ओकल्यासारखा तो कविता पाडतो हो. मी सांगतो ना तुम्हाला, Trust me! पुन्हा हा इतका बेरकी कवी आहे की कशाला आठवणी लिहायच्या, च्यायला लिहिता लिहिता कथार्सिस वगैरे झाला तर सगळा दारूगोळा खतम व्हायचा म्हणे. मग पर्याय काय, तर हम पैदा हुये बॉस. सारंग पाटील.    

तर मी सारंग आणि माझी एक लहान बहीण वीणा. आता इथेही पुन्हा तेच. या लेखकाच्या आईला त्याच्या बहिणीचं नाव वीणा ठेवायचं होतं म्हणून माझीही बहीण वीणा. टिपिकल मध्यमवर्गीय सारंग आणि वीणा! या लेखकाला आत्ता बहीण आहे की नाही मला ठावूक नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यानंतर त्याच्या आईच्या पोटात दुसराही मुलगाच होता. बहुधा तो अबॉर्ट झाला. त्याच्या एका कवितेत तर फार फार अपत्यांचा संदर्भ येतो बरं का. काय माहीत हे लोक खरं लिहितात की खोटं? की त्यांना जे खरं वाटत असतं त्यालाच खरं म्हणतात हे? माहीत नाही. कोण करतंय चौकशी, सोडा. हां, पण मला दोन बहिणी आहेत. पाठोपाठ झालेल्या. एकीचं नाव वीणा आणि दुसरीचं नाव दिव्या. या दिव्यावरून आठवलं मी तीन-चार वर्षांचा असतांना दिव्या भारती इमारतीवरून पडून मेली. त्याची इतकी चर्चा आमच्या कॉलनीतल्या आयाबायांमध्ये व्हायची की बास! “…नट्या असल्याच असतात भंगार…”, या एकमतावर ती प्रत्येक चर्चा संपायची. त्यामुळे मलाही त्यावेळी तसंच वाटायचं. पण अधेमधे माझी आई अजूनही म्हणते बरं का, की दिव्या भारती फार छान दिसायची म्हणून. मला आपलं आयुष्यभर वाटत राहतं की दिव्या भारती छान दिसते. मी ‘दिवाना’ लागला कुठेही की बाकी सगळं सोडून देऊन दिव्या भारती छान दिसते म्हणजे कशी दिसते हे अजूनही पाहत राहतो. पण ती पडून मेली याचं काळीजतोड दुःख त्यावेळी मला झालं होतं. या लेखकाचं मला माहीत नाही. किंवा यालाच समांतर राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा याची आई फार हळहळली होती. माझ्या आईचं माहीत नाही. माझीही आई हळहळली असेल कदाचित. मला आत्ता आठवत नाही नीट.

पण मला हे असं काहीच्या काही आत्ता का आठवत असावं?  कसंय ना प्रत्येक आठवणीची एक कळ असते. ती दाबली गेली की ती आठवण वर येते. आणि बहुधा माझ्या  शरीरावर तर अशा कळाच कळायत. ’कळा या लागल्या जीवा’ म्हणा ना. दिव्या नावाची कुणीही मुलगी भेटली की मला मेलेली दिव्या भारती आठवते आणि एक दाट अंधार भरून येतो आजूबाजूला. याला काय म्हणावं आता? मग पुढे पुढे ब्रेकअप नंतरची प्रत्येक प्रेयसी आता आत्महत्या करेल का या भीतीने माझी फाटायची. पण मी काही लेखक नव्हतो बुवा. मी तर फक्त भीती, प्रेम, वासना या टिपिकल मध्यमवर्गीय चौकटीत जगत मरत होतो. लिहिता वगैरे येत नसल्याने मी बिनधास्त दुःख झेलायचो.  या लेखकाने मात्र कवितेत आसरा शोधला असावा असा माझा दाट संशय आहे. भित्रा साला. असो. 

कवितेचं म्हणाल तर या लेखकासाठी ती वेळखाऊ प्रक्रिया आहे. तो मला कधीकधी मूडमध्ये आल्यावर म्हणतो, “गेली २८-२९ वर्षे जगलेलं असं अचानक काहीतरी कवितेतून येऊन जातं. खरा दम खाणं तर कवितेत आहे बॉस. आणि लोक म्हणतात गद्यात कस अन् फीस लागतो. कवितेत आयुष्य पणाला लागतं दोस्ता! पण लोक दम धरत नाहीत आणि कविता बदनाम होते…” वगैरे वगैरे… ही आपली या लेखकाची मळमळय असं मला वाटतं. खरंतर, या झाटूत कादंबरी लिहायचा दम नाही, त्यामुळे हे असलं भुक्कड तत्त्वज्ञान हा फेकत असावा, असाही मला दाट संशय आहे. तर तेही असो. 

जाऊ दे, कवितेचं मरू दे. वरचा भाग लिहून दहा दिवसांच्या वर होऊन गेलेत या लेखकाला. हा लेखक इतका बोरिंग आहे, तुम्हाला सांगतो एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की इतका लागतो इतका लागतो की दुसरं काहीच करत नाही. उदाहरणार्थ, एखादं गाणं आवडलं की ते सलग सात दिवस दिवसाचे बारा तास लाऊडस्पीकर वर लावून ठेवतो. आणि नंतर पुन्हा कधी कुठे ते ऐकायला मिळालं की तिथून पटकन निघून जातो. तसंच या लेखाचं पण झालं. सुरूवातीला एक तास तो या लेखात जाम रमला. नंतर दहा दिवस त्याला लेखाचं नाव मनात आलं की कारण नसतांना शिरशिरी यायची. शेवटी आज दहा दिवसांनंतर मुहूर्त आलाय. तेव्हा नेव्हीगेशन वगैरे द्यायचा त्याचा मूड नाहीय तेव्हा डायरेक्ट आज्जीची आठवण. ऐकायची तर ऐका नाहीतर मरा. हां, तर माझी आज्जी १९९६ साली वारली बघा. तेव्हा मी चौथीत होतो. मध्यमवर्गीय पोरं स्कॉलरशिपच्या परीक्षा देतात आणि यादीत नाव पाहून त्यांचे आईबाप ती वर्षाला शेपाचशे रुपयांची शिष्यवृत्ती घेऊन वारेमाप खुश होत तेव्हाचा तो काळ होता. तर त्या परीक्षेच्या शिकवणीचा माझा पहिला दिवस होता. आज्जी गेल्याचा निरोप आला असावा घरी. माझी शिकवणी बुडणार म्हणून मी मध्येच हे काय काढलं म्हणून नाराज झालो. कधी काही खूप मागावं, घर डोक्यावर घ्यावं असा माझा स्वभाव नव्हताच. या बाबतीत माझा आणि लेखकाचा स्वभाव जरा जुळायचा हां. समोर येईल ते बघावं, आपलं आपण रुसावं, कुठेतरी बसून राहावं, काहीतरी वाचीत राहावं अशी एकलखोर लोकच कविता पाडीत असावीत असं मला वाटतं. तर मीही गपगुमान निघालो. पोचेपर्यंत आज्जीच्या चितेची धग तेव्हढी राहिली होती. पहिल्यांदा दिसला तो खाली मान घालून बसलेला मामा. यात एक गोष्ट आठवतेय मला, आम्ही आमच्या मामाला कधी ‘अरे मामा’ म्हणू शकलो नाही. कारण माहीत नाही. पण मामांना ‘ए मामा’ म्हणायची माझी फार इच्छा होती. आज या लेखकाच्या कृपेने ती इथे पूर्ण होतांना दिसतीय. असो. तर त्यानंतर पुढचं मला काही आठवत नाही. म्हणजे लेखक उठून गेलाय. सोडा.

हा लेखकय ना गेल्या काही वर्षांपासून अधेमधे झोपेत दचकून जागा होतो. त्याला त्याच्या आज्जीच्या कमरेची पिशवी आठवते, तिची नथ आठवते, पितळेचा डब्बा आठवते आणि ती उभीच्या उभी त्याला भर रात्री भर स्वप्नात नेहमी दिसते. मी अनेकदा त्याच्या डोळ्यांनी त्याच्या आज्जीला पाहिलेले आहे. मी तर त्याला नेहमी म्हणतो की बाबा गेलेले लोक असतात आपल्या आजूबाजूला. ते तथास्तु म्हणत असतात आपल्या इच्छांना. तू मागत जा काहीतरी चांगलं. तर तो मला म्हणतो कसा, “मी तर्काधारीत विचार करीत असतो !” मी त्यावर त्याला म्हणालो, “मग भोकात जा !” नाहीतर काय. सोडा. आज्जी त्याची. तो घेईल पाहून. 

लेखकाचे वडील कसे होते, ते मी तुम्हाला नाही सांगणार. मला ते ठावूक असूनही. पण माझे वडील कसे होते हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो. पण कल्पनेतील वडिलांची तुलना लेखकाच्या वडिलांशी तुम्ही करायला जाणार, हे  न कळायला हा लेखक काय इतका मूर्ख नाही बरं का. “But let’s take a risk buddy!” असे म्हणून कूलपणाची हुक्की येऊन हा लिहितोय तर ऐकूयात आपण. तसंही अनोळखी असलं कुणी तरी त्याच्या घरादाराचं वाईटवकटं चवीने ऐकायला कुणाला आवडत नाही. हां, तर माझे वडील. कडक शिस्तीचे. गणिततज्ज्ञ. नळ आणि तोटीचे ते ऐतिहासिक गणित समजावून सांगणारे. हौदाच्या चित्रासहित. त्यामुळे गणितात आपल्याला कायम पैकीच्या पैकी. आणखी सांगायचं म्हणजे ते आणि आई… आपण थोडं थांबूयात का? काल्पनिक पात्राचा संबंध लोक लेखकाशी जोडतात, हे सत्य या लेखकाला आता जास्त मोठं दिसायला लागलंय. त्यामुळे थांबूयाच. मागे एकदा काय झालं याच्या कवितेतील हस्तमैथुन आणि कॉलगर्लचे उल्लेख ऐकून याची आई दहा दिवस रड रड रडली. वरून याला जेजुरीला नेऊन खंडोबाच्या पायावर आपटून आली. कमरेचा काळा करदोटा करकरून बांधून दिला. मोहटा देवीला जाऊन याचं येड काढून आली. एवढं सगळं करण्यापेक्षा कविता लिहायलाच नको, म्हणून याने मग तशा कविता आल्या की फाडून टाकायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून हा आईसाठी जरा जपूनच लिहितो बरं का. माझ्या आईचं असं काही नसतं फालतू. ती शिकलेली नसल्याने तिला कल्पना आणि सत्य यातलं अंतर चांगलंच कळत असावं बहुतेक.  

कवितेत हा काहीही लिहितो, अहो. मी तर चाट होतो. ओल्ड मंक काय, बाया काय. वाट्टेल ते. आईशप्पथ तुम्हाला सांगतो हे बेनं दारूच्या थेंबाला देखील शिवलेलं नाही अजून. इतकं शेळपटंय ते. आणि याच्या कवितेतल्या बाता, सायकोच्या तेराव्या अन फेराव्या प्रेयसीच्या. आता तुम्हाला वाटेल की दारूचा नाद नाही म्हणजे माणूस चांगला म्हणजे पोरीचाही नाद नसेल. पण एक गम्मत सांगतो दोस्तहो, दारू आणि बाई ये अलग चीजे है ! याच्यापैकी फक्त एकाचा शौक असूच शकतो बरं का. दोन्ही एकाच टायमाला पाहिजे असं नसतं. यावरून तुम्ही काय घ्यायचं ते घ्या समजून. असो. मी माझं काही सांगायचं तर त्याच्याविषयीच जास्त बोलतोय नाही का. बहुधा लेखकाची प्रतिभा इथे कमी पडत असावी. कॅरॅक्टर डेवलप नाही करता येतंय त्याला व्यवस्थित असं वाटायला लागलंय. मला विचाराल ना तर ते तितकंस खरं नाही बरं का. लेखक काही अगदीच टाकाऊ नाहीय. पण त्याला घाई फार झालीय लेख संपवण्याची. आपल्याकडच्या लेखकांचा हाच प्रॉब्लेम आहे बघा. त्यांना प्रक्रियेपेक्षा उत्पादनात फार रस पहिल्यापासून.

अर्र, मी जरा अतीच बोलायला लागलोय नाही. तर मी माझंच बोलतो. तर मला पोरी चिक्कार भेटल्या बरं का. शिवाय माझा पहिला सेक्सही फार लवकर झाला बरं का. म्हणजे मी सांगतोय तुम्हाला, “I lost my virginity at 19 !”  आता तुम्ही म्हणाल त्याचा काय संबंध इथे. तू ते कधी केलंस याच्याशी आमचा काय संबंध? त्याने काय फरक पडतो? हे उगाचच बोल्ड करण्याचा प्रयत्न आहे वगैरे. थोडं चिल मारा राव ! मी तुम्हाला सांगतो, कवितेचा आणि व्हर्जिन ‘असण्या-नसण्याचा’ गाढा संबंध आहे बॉस ! खरंतर, ‘सेक्सच्या आधीच्या कविता’ आणि ‘सेक्स नंतरच्या कविता’, याच शीर्षकांखाली कवींनी कविता प्रकाशित करायला हव्यात या मताचा मी आहे आणि बहुधा हा लेखकही. पण ही गोष्ट तो उघड बोलणार नाही. कारण तिथे त्याला त्याच्या ‘आधीच्या’ कविता कोणत्या आणि ‘नंतरच्या’ कोणत्या हे सांगावं लागेल. त्यातही लाजण्यासारखं काही नाही. पण मराठी साहित्यात हे पुरस्कारवाले लोक आहेत ना त्यांना वावडं आहे हो हे असलं खरंबिर बोलायचं.  म्हणजे साला इथे देश जळतोय, लोकं भुकेनं मरतायत, अनागोंदीचं उजवं भगवं राज्य आलेलं असतांना लैंगिक प्रेरणांना निर्मितीच्या केंद्रस्थानी आणायचं म्हणजे काय? हा माज खपवून घेतला जाणार नाही. असं सगळं. त्यामुळे मग तो हे सांगणार नाही कारण पुरस्काराची हाव अजून त्याच्या मनात शिल्लक आहे, मला माहितीय. त्याचं सोडा माझं बोलूया. तर, “I lost it when I was 19.” आमच्याकडे ना ‘सतरा-खतरा’ असं म्हणायचे बरं का. पण माझं दोन वर्ष उशिरा झालं. जाऊ दे. मी ना काही वर्षांपूर्वी जॉर्ज क्लूनी या अभिनेत्याची एक मुलाखत वाचली होती. त्याच्या पहिल्या हस्तमैथुनाची. तो काहीतरी तेव्हा दुसरी तिसरीत होता म्हणे. त्याला ते करताना उंचावरून खाली पडल्यासारखं, तरंगत आल्यासारखं वाटलं. शिवाय बाहेरही काही आलं नाही, असं म्हणाला तो. मी एकदम चाट झालो ते वाचून. आता तुम्ही म्हणाल हे मध्येच काय. माहीत नाही. आठवणी कशाही येतात मला. एव्हाना तुमच्याही लक्षात यायला लागलंच असेल ते. आडव्या उभ्या नाहीतर तिडव्या.

आता गम्मत अशीय की या लेखाचं शीर्षक ‘आठवणी’ असं आहे, हे मला आत्ता पुन्हा नव्याने आठवतंय. आता आठवणी आणि या लेखकाचं सर्जन यांचा काय संबंध आहे हेही ताडून पहायचंय वाचकांना असं काहीसं असावं.  म्हणजे थोडक्यात पुन्हा तेच निर्मितीप्रक्रियेचं गुऱ्हाळ चालवायचंय. पण, समजा या लेखकाने आठवणी सांगतांना थापा मारल्या तर? कसं ओळखणार? काही मार्ग नसतो हो ! मी सांगतो. मी ओळखतो या लेखकांना. थापाडे साले. हा आत्ता सुद्धा मधेमधे थापा मारतोय, Trust me ! पुरावा देऊ का एक. तर ऐका, याची एक कविता आहे.  ‘सायकोच्या अमक्या अन् तमक्या प्रेयसीसाठी’ म्हणून. त्यात काय तर म्हणे त्या ग्रामीण सायकोला त्याचा बाप जत्रेतली गाडी घेऊन देत नाही. या बेण्याच्या बापाने याला कधीच कशालाच नाही म्हंटलं नाही बरं का. नाही म्हणायला हे एवढं मागं मागं मागणारं कार्टं असलं की कोणताही बाप एखादेवेळी करवादून एखाद्या गोष्टीला नाही म्हणणारच की नाही. माझ्याही बापाने एकदा एकवीरा देवीच्या यात्रेत एक दोनशे चाळीस रुपयांची गाडी नको म्हणून मला दापलं होतं. तर मी काही ती गोष्ट खुन्नस घेऊन डोक्यात नाही गाडून ठेवली. पण या लेखकाच्या खुंखार डोक्यात ती गोष्ट रुतून बसली. मग आली असावी याच्या कवितेत ती. हे कवी असेच असतात. सांदीकपारीतलं दुःख उकरून काढतात आणि विकतात.  असं खूप काही आहे आणखी. जाऊ दे. कशाला कुणाच्या पोटावर पाय द्यायचा.   

पुन्हा माझा लेखक ‘कवी’ आहे. म्हणजे तो कविता लिहितो. किंवा तो जे काही लिहितो त्याला तो इतरांचं पाहून कविता म्हणतो. त्याला आता लिहितांना हे कळतं की आपण कविता लिहितोय.त्यामुळे तो आत्ता काय लिहितो तर कविता. म्हणून मीही म्हणतोय बरं का की त्याच्या या कवितेत आणि त्या कवितेत. आपल्याला काय ते आकृतीबंध वगैरे कळत नाही बरं का. मी आपल याचं त्याचं ऐकून म्हणतोय . 

तर आणखी काय, मला कंटाळा यायला लागलाय राव! आता आठवून आठवून ‘आठवणी’ लिहाव्या लागतायत. असं विषय आधी घेऊन-देऊन लेखन करणं हे भ्रष्टाचार केल्यासारखंच आहे असं माझं मतंय. माझ्या संपादकांनी मला फोन करू नये म्हणून फोन बंद करून मला आता चार दिवस उलटून गेलेत. तरीही मला काही सुचत नाहीय. आज संपवायचंच म्हणून मी रोज मनाची तयारी करतोय. पण ते होत नाहीय. माझ्या आठवणीतही असं बरंच काही आहे जे कधीच संपत नाही, संपणारही नाही. प्रत्येक गोष्ट संपवायची, विशिष्ट शेवट करून संपवायची ही कृत्रिम खोड ‘आठवणी’ या कोटीक्रमाला ग्लोरिफाय करत असावी, या मतापाशी मी आता आलेलो आहे. की समर्पक शेवट काय असावा, काय सांगितलं म्हणजे ते परिपूर्णतेकडे जाणार असेल, याचा मेंदूने  विचार करून मी ताणात चाललेलो आहे . मला वाटतं हे इथे थांबवावं, याच्या मागे काय पुढे काय यात न जाता थांबवावं. आठवणींचा आणि ‘कलेचा’, आठवणींचा आणि ‘निर्मितीचा’ अन्योन्य संबंध जोडण्याचा प्रयत्न आता थांबवायला हवा. आत्मचरित्रासारख्या या आठवणीही हा लेखक कलेसाठी म्हणून पुढून मागे जोडू पाहतोय. पण खरंतर आठवणींच्या रीयल टाइम क्षणांमध्ये हे असं काही नव्हतं माझ्यासाठी. हा लेखक लादत चाललाय माझ्यावर काहीकाही. एवढं गणिती का हवं असतं या विचाराने मी तुंबत चाललोय. आणि इथे काहीतरी भयावह लिहिण्यापेक्षा आपण हे असंच अपूर्ण वाटणार पूर्ण चित्र टांगून ठेवायला हवं असं मला वाटायला लागलं आहे. तर थांबतो. थांबू ना. नको. एक काम करू .आता काहीतरी विषय सोडून गप्पा मारू. हा ताज्या आठवणी काढूयात का. म्हणजे प्रेझेंट पर्फेक्ट टेन्स मधल्या. कालची एक आठवण आहे बरं का माझी. मी माझ्या सध्याच्या प्रेयसीबरोबर लिव्ह-इन मध्ये सध्या राहतो. हल्ली ती वेगवेगळ्या कारणांनी अधनंमधनं घरी नसते. तेव्हा एखादी दुसरी मुलगी माझ्या घरी येते. कुणीही. विशिष्ट अशी कुणी नाही. म्हणजे माझं इतर कुणावर तसं प्रेम नाहीय सध्या तरी. जी काही भावनिक ओढ शरीरं एकत्र आल्यावर होते तेव्हढीच फक्त. बाकी असं आठवण येणं वगैरे असं काही नाही. पण त्यातल्या काहींना माझी फार आठवण येते असं त्या म्हणतात. तसं पुरुषी लंपटपणा हे प्रकरण जुनंच आहे, हे मी जाणतो. पण या सगळ्या मुलींची आठवण त्यातून येणारा अपराधगंड माझ्या रोजच्या आठवणीत असतात बरं का. कधी कधी मला रात्रभर त्या सर्वांबरोबर माझा अविलग संभोग चाललाय असं वाटतं. कधी कधी मला असं वाटतं की जेवढ्या आणि ज्या मुली माझ्याबरोबर संबंध ठेवून गेल्यात त्या तेवढ्या आणि त्याच होत्या का? की हीसुद्धा माझी एक कल्पना आहे? मला ठावूक नाही की ती माझी फॅंटसी आहे. पण एक मला नक्की माहीत आहे ते म्हणजे मी काही भ्रमिष्ट नाही. काहीतरी नक्कीच झालेलं असणार. फार पूर्वी असावं किंवा आत्ता सुद्धा. अगदी काल परवा. मला हल्ली काही जबरदस्तीच्या रफ संभोगांच्याच आठवणी का येतात. असं वाटतं, मी बाईला केवळ समागमाचं साधन म्हणून वापरतो. मी तिच्या इच्छांचा मान केवळ संभोगकरिता ते फायद्याचं ठरेल म्हणून ठेवतो. मी तिच्यावर प्रेमही सेक्ससाठीच करतो. मी कायम हेच करत आलोय. माझ्या आठवणीतल्या सर्व प्रेयस्यांच्या नात्यांचा लसावि सेक्स हाच असून, त्याला कंटाळल्यानंतर जगभरातील उत्तमोत्तम तत्त्वज्ञांना लाजवेल असे दाहक तात्कालिक तात्पुरते आणि नंतर टाकाऊ तत्त्वज्ञान मी निर्माण करुन, त्यांनी माझ्या आयुष्यातून जाणेच कसे हितकर आहे हे मी त्यांना पटवून देऊ शकलेलो आहे. एवढे करून माझ्या आत जो काही अपरधगंड निर्माण झाला त्याने माझ्या आत माझं व्यावहारिक नुकसान करण्याइतपत इजा होऊ न देण्यात मी यशस्वी झालेलो आहे. शिवाय झाडून माझ्या सर्व पुरातन प्रेयस्या माझा अजूनही आदर करत असाव्यात असे मला वाटते. त्यांना सत्य कधी कळेल आणि कळले तर काय होईल, या विचाराने अधनंमधनं माझी झोप उडत असते, इतकंच काय ते शल्य! थोडक्यात मी एक गांडु इसम होतो आणि आहे. या लेखकाचं मला माहीत नाही. कवितेच्या निर्मितीमागे इतर कसली पार्श्वभूमी असेल नसेल माहीत नाही पण स्खलनशीलतेची कबुली देऊन मानसिक ताण हलका करणे एवढी ती कायम असली तर मी खूप कविता केल्या असत्या. खरंच. माझ्या नावावर कधी कविता खपल्या नाहीत पण माझ्या आत खूप कविता आहेत. बाकी माणूस म्हणून मी फार काही थोर आजपर्यंत केलेलं नाही. या लेखकानेही नसावं. बाकी स्वतःपुरता पैसे-पाणी तर काय कुणीही कमावतंच. “कवितेत येणारी आक्रमकता आपल्या न्यूनगंडाला झाकण्याकरिताही बऱ्याचदा येते बरं का,” असं मी या लेखकाला कायम सांगत आलेलो आहे, पण तो ऐकून न ऐकल्यासारखा करतो. शिवाय मी आजपर्यंत काहीच उखाडलेलं नाहीय आणि तरीही मी आठवणी लिहितो आहे. यात काय ते आलं. बाप्या म्हणून पोरी हुंगणे हे एवढेच काम मी इमाने इतबारे करीत आलेलो आहे. त्यात मी भरपूर यशस्वी झालेलो आहेही. पण जगाच्या लेखी त्याला वाया गेलेला किंवा लंपट किंवा लिंगपिसाट किंवा इझमच्या भाषेत पुरूषी असे म्हणतात.

… थांबूयात यार आपण जाऊदे. बघ ना, बहुतेक हा शेवटचा भाग वाचल्यावर लेखकाच्या आत्ताच्या प्रेयसीला काही धक्का बसेल की काय म्हणून या कथनात बहुधा चलाख बदल करून त्याला फॅंटसी वगैरे म्हणून जादुई कथन वगैरे करण्याचा केविलवाणा प्रयत्न हा लेखक करायला लागलाय पुन्हा. जाऊदे नको काही बोलायला. थांबूच.

 

Post Tags

Leave a comment