-शिक्षक
-सुशीला /वत्सला
-“ती ” पक्षी
-शिक्षकाचा अमेरिकेतला भाऊ
लिहीणाऱ्याला फार चिडचिड करावी लागते म्हणे, फारच मूडी वगैरे वागावं लागतं म्हणे, जगण्याला /असण्याला काही अर्थच नाही असं विचार करतच जगायचं असतं म्हणे त्याने? पण एखाद्या शांत -स्थितप्रज्ञ माणसाबद्दल लिहिताना करायचं काय? सेन्सिबल/ सेन्सिटिव्ह/ सिरीयस माणसानं लिहिताना उगाच त्रागा वगैरे करून काय उपयोग? म्हणजे शांत लिहिणारा शोधावा लागणार किंवा लिहिणाऱ्याला धीरानं घ्यावं लागणार! उगाच हातात दारू घेऊन जगावर त्रागा-आदळआपट करत बारभर/घरभर चिडणारा इथे चालायचा नाही! लिहिणाऱ्याचा स्वभाव महत्त्वाचा, शांत माणसाचं जगणं लिहायला शांत शांतच लिहिणारा हवा! शांत माणसाच्या स्वभावाला त्यानं धक्का लावता कामा नये! लिहिणाऱ्याने शिक्षकावर किंवा शिक्षकाने लिहिणाऱ्यावर स्वभाव लादा-लादी करायला नको. कारण इथे मुद्दा स्वातंत्र्याचा आहे! कोणीच कोणावर काहीच लादून चालणार नाही! “शुभ्र स्वातंत्र्याचा” आकार असतो? असले विचार शिक्षक अंगणात आराम खुर्चीत बसून अनेक तास करत आहे. विचार करून-करून त्याचं डोकं थकून-भागून अर्ध पांढरं पडलं आहे! विचार करता-करता शिक्षकाचा चष्मा जड झाला आहे !
वाचण्याचे मग विचार करण्याचे किंवा विचार करून वाचन करण्याचे असे दोनच संस्कार शिक्षकाने चष्म्यावर केले आहेत. शिक्षक अगदी हाडाचा शिक्षक आहे पण आता त्याची हाडं विचार करून ठिसूळ झाली आहेत! खूप वेळ असेल, पुरेसा पैसा, स्वतःचे छप्पर वगैरे असेल तर विचार करण्याशिवाय कामच काय? तर शिक्षक उत्तम आकार असलेले इस्त्रीचे शुभ्र कपडे घालतो, तसाच शुभ्र विचार आत-बाहेर-शाळेत-वर्गात-सर्वत्र करतो.
शिक्षकाची स्वप्नं सुद्धा आकारबद्ध, सुव्यवस्थित असतात! स्वप्नातही शिक्षक नैतिक/वैचारिक आणि शुभ्र असतो! एका अमूक अमावस्येला मात्र स्वप्नात शिक्षकाने सुशीलेला “मला तुझा कंटाळा आला आहे” असे अभद्रपणे बोलले होते, ते शेवटचे! असे काहीच अनैतिक त्यापुढे घडले नाही, शिक्षकाच्या आकारपूर्ण घरात, आयताकृती सुंदर खोल्या आहेत. रुंद, आयताकृती सोफा, आयताकार टॉप व्यू असलेला टी-पॉय त्यावर आयताकृती इंग्लिश-मराठी मिळून तीन-ताजे न्यूज पेपर आहेत. भिंतीवर आयतच लाइटबोर्ड्स, सिलिंड्रिकल ट्युबलाइट, दाराच्या आयताकृती चौकटी आहेत! खिडकी आणि असावा म्हणून असलेला त्यावरचा पडदा, शास्त्र म्हणून ठेवलेला कोपऱ्यातील जुना टीव्ही हे सुद्धा शुद्ध आयताकृती! थोडक्यात हॉलमध्ये आयताचे साम्राज्य! आयताचा विजय असो! आकाराचे सर्वत्र अधिपत्य असो! बेडरूम मधला जुना लाकडी बेड, टेबल, भिंतीवरचे तेच जुनाट निसर्गचित्र, तेही आयताचेच बनलेले! त्यावरचे त्रिकोणी डोंगर, शिस्तबद्ध रस्ता, गोलाकार सूर्य आणि कधीही उडू न शकणारे पक्षी! ते तेवढे वैशिष्टय, बाकी स्वयंपाकघरही तसेच, गोल, चौकोनी, आयताकारच सगळं!
पण तिथे गोलाकाराची मेजॉरिटी (संपूर्ण वर्तुळ?) हॉलमध्ये जगन्नाथराव आणि भामाबाईचे पारंपारिक आयत आहेत. त्यांना ‘य‘ काळात घातलेले हार आजही तसेच आहेत! दुसऱ्या भिंतीवर आत्ता सुशीला जन्मभर होती तशीच शांत व पवित्रपणे निमूट बसली आहे. फोटोच्या आयतातून डोळे भरून दरवाज्यातून थेट शिक्षकाकडे ती पाहत आहे. तिच्या कपाळावरची वर्तुळाकार टिकली उठून दिसत आहे. आत स्वयंपाक घरात गोल भांड्यातले दूध उतू जाते आहे! शिक्षकाची नजर (सुशीलेच्या नजरेमुळे बहुदा) गोल टिकलीकडे आणि थेट स्वयंपाकघरातल्या दुधाच्या गोल पातेल्यावर स्थिरावली आणि दूध मरता–मरता वाचले! शिक्षकाला Enlightenment कडे जाता–जाता नेमके उतू जाणाऱ्या दुधाकडे जावे लागले .पुन्हा शिक्षक Enlighten होण्यासाठी अंगणात खुर्चीकडे आला आणि पुन्हा चष्मा विचार करू लागला. उतू जाण्याचा ‘आकार ‘ कोणता? स्वातंत्र्य आणि उतू जाण्यात साम्य आहे का? शिक्षक सारखे असेच विचार करतो, त्याचे संपूर्ण आयुष्य आकारातच गेले. सुशीला असताना त्याला आकार नसलेला विचार मनात यायचा नाही, म्हणजे यायचा पण तो फार काळ टिकायचा नाही. ती सगळ्यालाच एक छान आकार द्यायची. निवृत्तीमुळे शिक्षकाकडे आता रिकाम्या आकारांवर विचार करणं शक्य आहे. त्यात सुशीला सुद्धा टिकली लावून आयतात भिंतीच्या आधाराने उभी असल्याने, शिक्षकाचा enlightenmentकडचा ओढा वाढला आहे. भिंतीआधी सुशीला घरभर स्थिरावली होती, ती असताना घराच्या खोल्या आणखीन आयताकृती, देखण्या होत्या. आता नाही म्हटलं तरी सगळं विस्कळीतच झालंय! सुशिलेला एके दिवशी संधिवात/दमा /डायबेटीस वगैरे झाला आणि एके दिवशी ती आयताकृती तिरडीवरून मजल –दरमजल करत भिंतीवरच्या आयतात घुसली. त्यात ती टिकली न काढताच निघून गेल्यामुळे तिचे सुसंस्कृत नातेवाईकांत कौतुक झाले. त्यात तिचे नाव वगैरे पण परंपरा, संस्कारांना साजेसे होते, त्यामुळे एका घरंदाज स्त्रीने जे करायला हवे (बलिदान ,त्याग इत्यादी) आणि तिला जे मिळायला हवे ते (नवऱ्याचे दिर्घायुष्य इत्यादी) सारे तिला भरभरून मिळाले, त्यामुळे त्यापुढे आता मरणाशिवाय होण्यासारखे तिचे काहीच नव्हते, परिणामी सुशीला मेली, जरा सौम्य शब्दात अनंतात विलीन झाली असे म्हणूया! ती आधी होती आणि आता नाही इतकंच! मरण –मरण तरी काय असतं? आधी माणूस असतो आणि नंतर नसतो इतकंच! सुशीलाच पण अगदी तसंच, ती आधी होती, मग ती थांबली, स्तब्ध झाली, तिला जाळले, मग राखेतून शिक्षकाने तिचे चित्र काढून भिंतीवर अडकवले! बस इतकंच ! त्यापुढे भिंतीने तिला आपलेसे केले, तिचा घरातला आकारपूर्ण वावर मृत झाला आणि फक्त वास उरला. शिक्षकाला ती जास्तच–जास्त जाणवू लागली बाकी मरणाने तसे काही फार बदलत नाही. दुधा –बिधा कडे शिक्षकाला जातीने पाहावे लागत इतकंच! सुशीला आणि शिक्षकाचा एक भरीव, spherical आकार होता, आता त्यातून धो –धो काहीतरी वाहून गेलं आणि चाळीस वर्षानंतर एक रिकामा, अस्ताव्यस्त आकार उरला इतकंच, बाकी काही दिसण्याजोगा बदल नाही! जाणवणं वगैरे शुल्लक आणि वैयक्तिक! आतले बदल झाले तरी, ते आतच! आतून बाहेर यायचा क्रांतिकारक रस्ताच नाही! बाहेरचे बदल लखलखीत, महत्वाचे! इथे मात्र बाहेरचा बदल एकच, सुशीलेची भिंतीवर ट्रान्सफर! बेडरूमच्या भिंतीवर उडू पाहणारे पक्षी आणि बाहेर हॉलमध्ये सुशीला! सुख ते एवढे की..सरतेशेवटी तिचा स्वयंपाक घराचा संबंध संपला आणि तिला हॉलमध्ये स्थान मिळाले.
शिक्षकाची शाळा आणि बायको साधारण एकदमच बंद झाले! तसेच निधन झाल्याने सुशीलालाही स्वयंपाकघरातून रिटायर्ड होता आले. शिक्षक आणि ती एकत्र रिटायर्ड झाल्याबद्दल गोतावळ्यात कौतुक झाले! खरं प्रेम –पवित्र नाते वगैरे! इकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहाल वगैरे बांधावा लागत नाही, छोटे –मोठे कोइन्सिडन्स वगैरे पण पुष्कळ होतात.
आतले (तसे क्षुल्लक) बदल बरेच झाले असावेत म्हणा ,सुशीलचे शिक्षकासाठीचे हृदयातले सेल संपले. लग्न झाल्यावर माहेरच्यांनी जावईबापूंच्या वेळा पाळण्यासाठी तिने हृदयात घड्याळ बसवून घेतलं होतं. ते शहीद झालं! शिक्षकाच्या सर्वात आतपर्यंत घुसलेली एकमेव अटॅचमेंट पंक्चर झाली! आता पंक्चर काढता यायचे नाही म्हणे, ट्युबच खराब झाली. सुशीला नंतर शिक्षकाच्या आत रिकामा विचित्र आकार आणि बाहेर रिकामा वेळ उरला! तुरळक –निवडक लोकांना तो आता भूमिती शिकवायचा बाकी वेळ बिना आकाराच्या जगाचा विचार करत आराम खुर्चीत बसायचा! त्यात चोरून सुशीलेकडे बघायचा शिक्षकाला राहून –राहून सारखा enlightenment चा खांब दिसायचाच. कधी एखाद्या जंगलात, एखाद्या जुन्या झालेल्या, पडझड झालेल्या वाड्याच्या अभेद्य खिडकीत, एखाद्या तळ्याच्या काठावर असा, कुठेही enlightenment चा आकार कसा असतो? मोक्षाचा रस्ता गोल कि त्रिकोणी? सगळ्याच गोष्टींना का इतकी शिस्त, सुसूत्रता? असे प्रश्न लिहिणारा आणि शिक्षक असे दोघेही करत बसतात पण त्यांच्या मध्ये एक चौकोनी खिडकी आहे!लिहिणाऱ्याला खिडकीतून लांब मैदानात एक मोठा आयताकृती बोर्ड दिसत आहे. त्या समोर बसून शिक्षक काही तुरळक विद्यार्थ्यांना शिकवत आहे. बोर्डावर right angled triangle, acute angled triangle, obtuse angled triangle वगैरे आकारबद्ध सज्ज आहेत. आजूबाजूने पायथागोरस फिरतो आहे. विश्वकर्माशी सुशीला घराच्या डिजाईनवरून हुज्जत घालते आहे. तो तिला शांत पणे सगळे समजावून देत आहे. घरातले निसर्गचित्र एन्लार्ज्ड दिसत आहेत, पक्षी किंचित जास्ती हवेत गेले आहेत. दोन -चार त्रिकोणी डोंगर चित्राबाहेर सुद्धा आहेत. सुशीलेच्या हातात एक गोलाकार घड्याळ आहे, ती अचानक चौकोनाच्या दिशेने धावू लागते. तिच्या मागे शिक्षक धावू लागतो, सगळे आकार झटपट बदलू लागतात, काटकोन किंचितसा चुकतो आणि पायथागोरस विनाआकार इंटेन्सिटीने संतापतो आणि बोर्ड फेकून देतो. निसर्गचित्र कोलमडून जाते आणि चौकोनी खिडकीला धडकून सुशीला संपते. घड्याळ फुटून त्यात माहित नसलेली विचित्र वेळ दिसू लागते. शिक्षकाच्या चष्म्यातून पाणी वाहू लागते, त्यात विश्वकर्मा वाहून जातो आणि सगळे आकार अंदाधुंद होतात. लिहिणारा फारच चिडचिड करू लागतो! केवढी ही अॅटॅचमेंट, शिक्षकाच्या वेळा पाळण्याच्या नादात सुशीलेने सगळे आकारच चुकवले. खरंतर तिलाच आकारांची एवढी आवड, पण शिक्षकांसमोर सगळे विसरून जाते! शिक्षकही तिच्या मागे धावतो काय..धडकतो काय..रडतो काय! केवढी ही डिपेन्डन्सी! डिपेन्डन्सीला आयताकार काळे झेंडे! निषेध!
इतक्या डिपेन्डन्ट शिक्षकाने स्वातंत्र्याचे कशाला कौतुक गावे? स्वातंत्र्याला अर्थच नाही मग ‘आकाराचा’ तर विचारच सोडा! अॅटॅचमेंट्स वगैरे स्वातंत्र्याची वाट लावतात! त्यामुळे enlightenment चे शुभ्र अवकाश दिसेनासे होते. शिक्षक साला हरामखोर आहे, स्वातंत्र्याचे इतके बोलतो, प्रचंड निकड दाखवतो आणि नात्यात गुरफटतो! सुशीलेला तर लाजच नाही. साक्षात विश्वकर्म्याशी भांडते. शिक्षक तर डायरेक्ट पायथागोरसशी वैर पत्करतो! आता तोच त्याची प्रमेय शिक्षकाला उसनी देईल का? असे सगळे विचार करत लिहिणारा चिडत राहतो, लिहीत राहतो, चिडून-चिडून लिहीत राहतो.
खूप विचार करणाऱ्यांचे असे होतेच पण, त्यातही असे स्वातंत्र्याचा, enlightenment चा आकार शोधणाऱ्यांचे तर होणारच! extremely attached असणारा माणूस स्वातंत्र्याची स्वप्ने पाहतो! विचार एक आणि करणं /वागणं एक!
लिहिणारा आणखीनच चिडू लागला आहे! पण खरं तर लिहिणारा पण असाच आहे, वैचारिक गोष्टी लिहीत बसतो आणि अविचारीच वागत राहतो! मागे एकदा दारू बंदीवर काहीतरी लिहीत बसला, लिहीत बसला, दारू ढोसली आणि गोष्ट पूर्ण केली! सगळे सारखेच!
शिक्षक समाधिस्थ होण्याच्या अधे-मधे चोरून सुशीलेकडे पाहतो आणि विरक्त ज्ञानेश्वरांचा विचारही करतो? लिहिणाऱ्याने ठरवले थांबायचे! नाही लिहायचे शिक्षक आणि सुशीले विषयी. स्वातंत्र्य, मोक्ष-बिक्ष मारूतीच्या शेपटीसारखे infinite दूरवर आहे . ते काही पारंपारिक शिक्षकाडून व्हायचे नाही. शिक्षक आकारातून बाहेर पडणारच नाही. त्याला त्याच्या ३००० स्क्वे.फू.च्या बंगल्यातच बसू दे. लिहिणाऱ्याने शेवटी पेन फेकून दिले आहे.
त्यात गोष्टीकडून बिचारीकडून फार अपेक्षा करतात सगळे! सुरुवात, मध्य, शेवट, हेतू, लॉजिक, सुसूत्रता हवी वगैरे! इथे तर सगळीच गडबड, सुसूत्रता लिहिणाऱ्याच्या आयुष्यातून बेपत्ता, त्याचे गावभर बोर्ड लागलेले (वॉन्टेड -सुसूत्रता) या गोष्टीतही तसेच, शिक्षक हे इथले मुख्य पात्र – मग त्याचे बालपण, शालेय जीवन, एखादा प्रेमभंग मग लग्न असं यायला हवं! सुशीलाचं ठीक आहे, तिचं डायरेक्ट स्वयंपाकघरातून सुरू केलं तरी चालतं! यापैकी काहीच लिहिणाऱ्याने सुरुवातीला स्पष्ट केलेलं नाही, सिक्वेन्सचा पत्ता नाही! त्यात शाळेत भूमिती शिकवणाऱ्या सामान्य शिक्षकाचा एवढा मोठा बंगला कसा काय? त्यात शिक्षक स्वप्नातही एथिकली चादर घेऊनच झोपतो. त्यामुळे शाळेबाहेरच्या शिकवण्या फ्री घेतो, मग बंगला वगैरे बांधण्याचे पैसे आले कुठून? त्यात शिक्षकांचे पगार वेळेवर मिळत नाहीत म्हणे! सुशीलाच्या माहेरहून काही घ्यायचे म्हणले तर शिक्षकाचा ‘बाणा’ मध्ये येईलच! थोडक्यात सगळेच फोल, काहीच उपयोग नाही! लिहिणारा आणखी काहीवेळ चिडला मग आपल्याकडे पाहणारे कोणीच नाही म्हटल्यावर निघून जाऊ लागला. दूर -दूर जाऊ लागला, चौकोनी खिडकीतून लहान -लहान दिसू लागला, शिक्षकाने गोलाकार दुर्बिणीतून पहिले, लिहिणारा हातात बाटली घेऊन चालला आहे, हे त्याला कळले, शिक्षक जरा मनातल्या मनात नाराज झाला! लिहिणारा गोष्टीला अनाथ करून दारू पित आणखी लहान होऊ लागला. शिक्षकाला वाटले थांबवावे बिचाऱ्याला, किती चिडचिडतो! पण लिहिणारा तोपर्यंत infinity पर्यंत पोहोचला. शिक्षक त्याच्या आरामखुर्चीत सगळं संपल्या प्रमाणे बसला, सुशीलाला त्याने भिंतीत बंद केले! शिक्षक आता infinityचा आकार मनात बनवू लागला. लिहिणाऱ्यांसाठी आता खिडकी एक बिंदू उरली, त्याला जाणवले आपण ही एक बिंदू आहोत, आणि शिक्षकसुद्धा एक बिंदू बनून आरामखुर्चीत बसून मोक्षाचा जप करतो आहे. पण बहुदा infinity फारच दूर असेल कदाचित! आरामखुर्चीत बसून infinityला पोहोचता यायचं नाही! शिक्षकाला हलवायला हवं! गोष्टीला कुठे तरी न्यायला हवे! पुढे, मागे, इकडे तिकडे, tends -to -infinity कुठे तरी ! पण तिचे बिचारीचे काही तरी व्हायला हवे! नाहीतर मागच्यासारखी पुन्हा गोष्ट अपेक्षांच्या ओझ्याखाली आत्महत्या करायची! लिहिणाऱ्याला अचानकच पोटच्या गोष्टीबद्दल खूप काही वाटू लागलं! मग लिहिणाऱ्याने बाटली खिशात टाकली आणि तो tends -to -infinity पासून केंद्रापर्यंत पोहोचला! खिडकी मोठी होत स्पष्ट चौकोनी झाली. लिहिणाऱ्याला नंबर लाईनवरच्या शून्यावर पोहोचल्यासारखे जाणवले!
इतक्या वेळात शिक्षकाचा बराच विचार करून झाला होता. आरामखुर्ची पार झिजून गेली! पायथागोरस किती काटेकोर पहा, गोल पृथ्वी षट्कोनी झाली तरी चालेल पण ९०अंश थोडाही हालता कामा नये! सुशीला आणि पायथागोरस खरे सुसूत्रतेचे उपासक, त्यांचेच लग्न व्हायला हवे होते! त्यांचा छान आयत बनला असता! मला असे अडकून राहावे लागले नसते, enlightenmentचा खांब लवकर मिळाला असता. नात्याने, गोतावळ्याने ‘ज्ञान’ जरा लांबच जाते, दुधाच्या उतू जाण्यात अडकणे घातकच तसे! अॅटॅच होण्याआधी डिटॅच व्हायला जमायला हवे! पण म्हणजे आपण चाळीस वर्षे सुशीलेशी खोटेच वागलो! आपण खोटे -आपण गुन्हेगार! दूध उतू गेले तर जाऊदे, दुधाला त्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे! खिडकीतून लिहिणाऱ्याला बोर्डावर ‘नेहमी खरे बोलावे’ असा सुविचार लिहिणारा शिक्षक दिसला, आणि त्याला हसून निघून जाणारी धीट सुशीला पहिल्यांदाच दिसली!
लिहिणाऱ्याने खरं तर रामदास स्वामींसारखं बोहल्यावरून पळून जायला हवं होतं. पण तेव्हा शिक्षकाने छान लग्न केलं!चौकोनी होम वगैरे त्याला तेव्हा आवडला, सातच्या जागी त्याने दोन जास्ती फेरे घेतले! तेव्हा मग शिक्षकाची विरक्ती सुट्टीवर गेली होती का?
शिक्षक अंगणात पक्ष्यांना धान्य घालता-घालता मनात बोलला -“आता आपल्याला कोणाचं च बंधन नाही, तरी आपण घरातच बसून स्वातंत्र्याचा विचार करतो, enlightenment चे अर्थ शोधतो! आकारांपासून दूर जायला हवे, मगच जगण्याचा अर्थ, ज्ञान मिळेल! तडक हिमालयात जायला हवे! दोन-चार स्वेटर घेऊन बॅग पॅक करायला हवी! पण आकाराबाहेरचे जग इतके सोपे नाही! सगळे त्यागून जाणे.. फार कमी जणांना जमेल! एक सरळ रेषा पण फक्त अनंताकडे ‘जाऊ पाहते’ पण पोहोचत नाही! अल्जेब्रा तोकडा पडतो! शिक्षक अचानक घरभर फिरू लागला..त्याला मंत्र ऐकू येऊ लागले! आपण ज्या वास्तूपासून दूर जाऊ पाहतोय तिथंच ज्ञान असेल! आत्मकेंद्री होऊन वास्तुपुरूष मध्यभागी बसला असेल ज्ञान करत! तो ही अल्जेब्रा मधल्या रेषेसारखा अनंताकडे पोहोचू पाहतोय! त्याचा प्रवास मोजण्यासाठी त्याचे चालणे इंटिग्रेट करायला हवे! पण मोजमापातून पुन्हा एक विशिष्ठ आकार तयार होईल, finite असे काही हाती लागेल, नको आकार नको, हट्ट नको! त्यापेक्षा वास्तुपुरूषाला शरण जावे! पण शिक्षकाने “शरण जाणे” वगैरे असले मुद्देच डिसमिस केल्याने शिक्षकाच्या बुद्धीला ‘नतमस्तक होणे’ पटणेच अशक्य होते! लिहिणाऱ्याने दुर्बिणीतून नीट पाहिले, त्याला ज्ञान करणारी सुशीला दिसली आणि हात जोडलेला शिक्षक दिसला!
शिक्षकाने ठरवले चालायचे, धावायचे, उडायचे, कुठेतरी कधीतरी enlightenment चा खांब मिळेलच! तिथे आकाश निरभ्र असेलच! आकार -बिकार नसेलच! सगळं स्वतंत्र असेल! आता भूमितीत अडकायचे नाही, भूमितीचा त्याग, अल्जेब्राच्या पुढे धावायचे.. ज्ञानेश्वरांसारखे ज्ञान मिळवायचे! अवकाशात उडायचे!
असे सगळे ठरवताना शिक्षक बेडरूम मधल्या निसर्गचित्रापर्यंत पोहोचला. एवढा टोकाचा ठाम विचार त्याने आयुष्यात पहिल्यांदाच केला. धावायचे ठरवल्याने किचनमध्ये जाऊन शिक्षकाने बीपी च्या गोळ्या घेतल्या, ग्लुकाँडी प्यावे असा विचार केला तेवढ्यात दरवाज्यावर कोणी तरी टकटक केली! शिक्षकाला समजले, हे भूमितीचे विद्यार्थी असणार! शिक्षक विद्यार्थ्यांशी शिकवणी पुरताच संबंध ठेवायचा! भूमितीच्या बाहेर “बाकी प्रत्येक जण स्वतंत्र हवा” असं शिक्षक म्हणायचा! शिक्षक थोडा हॉल मध्ये येऊन सौम्य पणे म्हणाला “मी भूमितीचा त्याग करावा म्हणतोय” लिहिणाऱ्याला दुर्बिणीतून पाहता.आरामखुर्चीवर बसलेली ‘पक्षी’ दिसते आहे! ती चालत आहे उडत नाही! ती उडणे विसरली आहे! पण ती स्वतंत्रपणे उडू इच्छिते, तिने शिक्षकाचे enlightenment चे खुळ कुठेतरी ऐकले आहे म्हणूनच ती शिक्षकाकडे ‘स्वातंत्र्य’ शिकायला आली आहे!
शिक्षक म्हणाला,”मलाच धावायचे उडायचे आहे तर मी काय शिकवू? आणि मुळात स्वातंत्र्य शिकवता कसे येईल? तुला इच्छा झाली, जाणीव झाली म्हणजे झाले.”
“ती”खुर्चीवरून उंबऱ्यावर आली. शिक्षकाने सुशीलेकडे पाहिले, एथिकली दोन-चार श्वास घेतले! शिक्षकाने किचनमध्ये जाऊन दोन ग्लासात “ग्लुकाँडी” आणले आहे. पक्ष्याला बसायला वेगळी खुर्ची दिली आहे. खुर्ची देताना अर्धा सेकंद थांबून, घाबरत शिक्षक सुशीलाकडे पाहतो आहे, आणि लगेच पक्षाकडे पाहतो आहे!
लिहिणाऱ्याला खिडकीतून काही तरी विचित्रच दिसत आहे. शिक्षकाचा अमेरिकेतला भाऊ टी-शर्ट आणि जीन्समध्ये शिक्षकांसमोर बसलेला आहे. ग्लुकाँडीच्या ग्लासात भाऊ वाईन पीत आहे. शिक्षक मात्र ग्लुकाँडीच्या ग्लासात आकारबद्ध /शिस्तबद्ध ग्लुकाँडीच पितो आहे. हा शिक्षकाचा भाऊ शिक्षकाच्या तुलनेत अगदी अमानुष, अघोरी कृत्ये करतो! अनैतिकतेच्या tends -to -infinity वर तो पोहोचला आहे. तो फार गंभीर वगैरे नाही, तो छान रंगीत आणि व्यवहारी आहे. तो स्वातंत्र्याचा विचार करत नाही, तो अॉलरेडी स्वतंत्र आहे! त्याला काही फालतू नैतिक स्वप्न पडत नाहीत!आपल्या शिक्षकाला तो एकटाच “तू मूर्ख आहेस” असं म्हणतो, म्हणू शकतो! तो नेहमी म्हणतो “व्हॉट आय डू इज एथिकल फॉर मी!”
शिक्षकाला तो त्याच्या सक्सेसफुल तिसऱ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची आणि अन-सक्सेसफुल चौथ्या लग्नाची गोष्ट सांगत आहे. तर चौथा डिवोर्स घेऊन तो ‘Indian gods and their marriages’ वर पी.एचडी. करणाऱ्या त्याच्या एका फ्रेंटसोबत रिफ्रेश होण्यासाठी इंडिया फिरायला आला आहे .
भाऊ म्हणतो ,”दादा, ग्रो अप मॅन!” तू सारखा शिकवत बसतोस, शिकत काहीच नाहीस! ‘सुख’ शिकायला पाहिजे.
शिक्षकाला क्षणभर अनैतिक अॅटॅकच आला!
भाऊ पुढे म्हणाला,”अरे, तू यूएसला ये! मला हाकलून द्यायच्या आधी ये लवकर ! लेट्स चिल! यू नीड अ ब्रेक ब्रो! आय विल इंट्रोड्यूस यू टू वन अॉफ माय एक्स.”
शिक्षक फक्त सताड ऐकत आहे. त्याच्या अंगणातले वातावरणच दूषित झाले आहे. भामाबाई (शिक्षकाची आई) येऊन अंगणभर गोमूत्र टाकून भिंतीत स्थित झाल्या आहेत. थोडेसे गोमूत्र त्यांनी शिक्षकाच्या ग्लुकाँडीच्या ग्लासात सुद्धा टाकले आहे. शिक्षक गटकन गोमूत्रयुक्त ग्लुकाँडी पितो आणि शुद्ध होतो (?)
पक्षी घरभर फिरते आहे. निसर्गचित्रातल्या उडू पाहणाऱ्या पक्ष्याशी बोलते आहे. सुशीला ने आज डोळे मिटून घेतले आहेत. शिक्षक मुक्त विचार करत आज अंगणभर फिरत आहे! आरामखुर्ची आज एकटीच हलते आहे. दुधाने आज स्वैर उतू जाण्याचे ठरवले आहे. दुधाचा स्थायीभाव तसा, दिलेल्या आकारात निपचित पडून राहण्याचा, त्याला बाहेरून आग दिल्यावरच ते मुक्त होऊ पाहते. आकार सोडून उडू लागते. नव्या पक्ष्याच्या घरात येण्याने आधीच सुशीलेचा फोटो ओलसर झाला आहे. स्त्री खरंच किती दिवस जगते. वास्तूत, भिंतीच्या कोनाड्यात, कुठेही..पण जगत राहते. सुशीला पण जगात आहे, ती आहे! वटवृक्षाप्रमाणे सुशीला येऊन शिक्षकाभोवती दोर बांधू लागते. शिक्षक स्थिर होतो. ती शिक्षकाला घट्ट आकार देते. ती एका ऊर्जेने समाधिस्थ झाली आहे. फार पवित्र सूफ़ी वगैरे ऐकू येऊ लागतं, कुठूनतरी जमिनीतून वगैरे!
शिक्षक अंगणाच्या खिडकीतून, जाळीतून दूध उतू जाण्याचा चेहरा पाहतो आहे. पक्षी स्वयंपाकघरातून तेच उत्स्फूर्त दूध पाहते आहे. क्षणभर शिक्षक पक्ष्याच्या डोळ्यात पाहतो. शिक्षक दैवी शक्तीने पक्ष्याचे डोळे बंद करतो. पक्षी जाळीतून शिक्षकाचा चष्मा बंद करते. उतू गेलेलं दूध शिक्षकाला enlighten केल्यासारखं करतं आणि शिक्षक पक्ष्याला बाहेर घेऊन येतो, खुर्चीत बसवतो! ही नक्की कसली enlightenment ? ही फारच लख्ख का? ही दिवाळीच! अचानक शिक्षकाच्या मनात दिवाळीची पारंपरिक रम्य पहाट होते! शिक्षकाच्या अंगाभोवती सुशीलाने बांधलेला वटपौर्णिमेचा बँड आहे. तशाच अडचणीच्या परिस्थितीत शिक्षक पक्ष्याला ग्लुकाँडीचा ग्लास देतो. शिक्षक मनातल्या पाहायच्या सुंदर वातावरणाच्या बोलण्यात येऊन तिला सुख शिकवायला सांगतो आणि आरामखुर्ची थोडी खुर्ची पुढे घेतो. खुर्ची थोडी जडच झालेली असते पण ती तशीच शिक्षक तरुण शक्तीने पुढे घेतो. खुर्चीचे मन मारले जाते पण ठीक आहे, अजून खुर्चीच्या मनाचा विचार करण्याची वगैरे पद्धत रूढ नाही.
तर खुर्ची पुढे घेतल्याने सुशीलाला शिक्षकाचा चष्मा, खुर्ची, शिक्षक काहीच दिसत नाही. पक्षी शिक्षकाचा बँड मोठ्या कष्टाने काढून त्याला मुक्त करते आणि हलक्या आवाजात म्हणते, “सुख शिकायचं ना?” त्यावर शिक्षकाचे ‘हो ‘ विचारण्याआधी आलेले असते. आता सुशीलाच्या फोटोची ओल भिंतीत उतरलेली आहे. पक्षी स्वातंत्र्याचा पहिला पाठ शिक्षकाला शिकवण्याचा लाडाने आग्रह करते! शिक्षक सुखाने सुख शिकू लागतो. शिक्षकाला नवे सुख शिकायचे आहे, सुखातून मुक्तीकडे जायचे आहे. मग त्याला enlighten व्हायचे आहे. किंवा enlighten होऊन मुक्त झाले तरी त्याला चालणार आहे.
लिहिणाऱ्याला खिडकीतून सुंदर पक्षी, तिचे डोळे दिसतात. तिचे ओठ तर त्याला फारच आवडले आहेत. तिचं हे आवडलं, ते तर फारच आवडलं आणि सगळंच आवडलं आहे. शिक्षकाने पक्ष्याचं घरटं लपवून ठेवलं आहे. ती लगेच एक पैसा हवेत गेली आहे. पहिला पाठ सुरु झाला आहे. शिक्षकाला येऊ पाहणारी अनैतिकतेची उचकी त्याने घरट्यात लपवून ठेवली आहे. शिक्षकाला आणखी थोडं, मग अजून खूप सुख शिकायचं आहे. सुशीलाची हक्काची भिंत पूर्ण ओली झाली आहे, कधीही कोसळेल. लिहिणाऱ्याने हिचे कॅरॅक्टरच आता भिंत कोसळायच्या आत मुक्त करायला हवं!
लिहिणाऱ्याला शिक्षकाचं तरंगणारं घर दिसत आहे, त्याला हजारो मुळं दिसत आहेत. फारच लांब, फारच मोठी! त्याच्या सर्वात खालच्या मुळाला enlightenment चा खांब आणि त्याला घट्ट पकडून बसलेली सुशीला दिसते आहे. लिहिणारा धावत -धावत येतो. शिक्षकाचा भाऊ चालत चालला आहे, फारच संथपणे! लिहिणारा धावतो आहे, भाऊ संथच. पण भाऊ पुढे, मग आणखी पुढे, लिहिणारा मागेच मागे!
फायनली पोहोचतो!
भावाने ब्लेझर घातला आहे. त्यावर जानवं आहे आणि सोवळं नसलेलं आहे. पायात स्पोर्ट्स शूज आहेत. डोक्यावर सुंदर-तेजस्वी, पेशवे थाटाची शेंडी आहे! लिहिणाऱ्याकडे प्रश्न आहेत आणि भावाकडे उत्तरं!
पक्षी कशी-कशी कसरत करत गच्चीपर्यंत पोहोचते, तिला अंधुकसे स्वप्न पडते, तिच्या आजीचे आकाशात झेप घेण्याचे क्लासेस चालत, तिला ते आठवू लागते, अचानक अश्या वेळी जुन्या गोष्टी आणि जुन्या व्यक्ती आठवतातच! “जुन्यापासून डिटॅच होऊन खूप उंच विहार करता येणे सोपे, जमीन विसरायला हवी आकाशाशी बॉन्डिंग करायला.” आजी भारी प्रोग्रेसिव म्हणावी लागेल!
लिहिणाऱ्याला वाटलं विसरणं महत्त्वाचं! विसरणं लक्षात ठेवायला हवं! शिक्षकाने पक्ष्याला गच्चीवरून आणखी वर भिरकावले आणि तिचे घरटे जमिनीत खोल पुरून ठेवले. ग्लुकाँडीचा आणखी एक घोट घेतला, मुक्त होण्यासाठी आणखी बळ एकवटून घेतले. पक्ष्याने घरटे समूळ विसरायला हवं! शिक्षकाला वाटलं आपणही आपलं घर जाळून टाकायला हवं आणि फिनिक्स पक्ष्यासारखं घराच्या राखेतून उडून जावे. घर जाळले तर परत यायला काही उरणार नाही! पण तसा हा अघोरी विचार, म्हणून त्याने तो अर्धाच केला बाकी जमिनीत खड्डा करून पुरला! शिक्षकाला वाटलं सगळं पक्ष्यावर डिपेन्ड! पक्षी उडेल उंचच उंच! आणि आपणही त्याच्यासोबत मुक्त होऊ, मुक्तच मुक्त!! शिक्षकाचे काही तरी चुकत होते त्याचा विचार लिहिणारा पुढे करणार होता.
शिक्षकाचा भाऊ लिहिणाऱ्याला म्हणाला,”माणसं जाळून टाक, गोतावळा नको, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला फसवलं, पायातपाय अडकवून ठेवलं हजारो गोष्टीत! लिटरली वाऱ्यावर सोडायला हवं होत! डिटॅच होणं फार महत्त्वाचं, फार आवश्यक आज तर! सगळं मोकळं, मुक्त सोडून द्यायला पाहिजे तू! सगळेच कॅरॅक्टर्स..अंदाधुंद सगळंच! आकारात अडकवून डिटॅच कसं व्हायचं? त्या क्षणी क्रांतीसारखा एक आवाज आला. पक्ष्याला त्या क्षणी उडता आलं, साधारण तीन मजल्याच्या उंचीचं! शिक्षक चोखामेळ्या सारखा घरट्यावर उड्या मारून धुंद नाचू लागला आहे. अचानक सुशीला भिंतीतून “फटा पोस्टर निकला हिरो ” पद्धतीने मुक्त होऊन स्वयंपाकघरात जात आहे, तिने भात कुकरमध्ये लावला आहे. आयुष्यभर भाताला शिक्षक आणि सुशीलाने खाण्याची सवय आहे! पक्ष्याने स्वयंपाकघराचा आकार बदलला आहे, हे सुशीलाला जाणवतं आणि ती भिंतीवर आदळते! तिच्या डोळ्यातून भळाभळा रक्त वाहात आहे! शिक्षक धुंद वाचत-वाचत मुक्त होऊ पाहतोय. शिक्षक डोळे वर करतो, उडणारी सुंदर पक्षी पाहून सुखावतो, सुशीलेच्या रक्ताचा आवाज एेन सुखात त्याला ऐकू येत नाही. लिहिणाऱ्याला दुर्बिणीतून शिक्षकाच्या सुखाचा स्पष्ट आकार दिसतो आहे. शिक्षकाच्या आजूबाजूला हार्मोनियम, तबला, मृदूंग असं सगळं आहे. सगळे धुंदपणे वाजू लागतात. पक्षी आणखी उंचच उंच गेली आहे. अंतिम सुखाचा क्षण येऊ लागतो, सुखाचा राग, सुखाचा स्वर, सर्वात वर!
सुखात रक्ताचा लाल रंग फिका पडतो! फक्त सुखाचा आवाज! “नवे सुख आले कि जुने सुख दुःख बनते किंवा कमी सुख ठरते, नवे सुख जिंकते, नव्या सुखाचा जयजयकार नवे सुख अंतिमाकडे, पक्षी शून्य मंडळ भेदून अवकाशाकडे. शिक्षकाला आकार नसलेल्या मुक्तीचा आभास होतो. आकाशाचा आकार कोणता? शिक्षक पक्ष्याला म्हणतो, मागे पाहू नकोस, अंतिमाकडे जा, ज्ञ ज्ञानाचा, enlightenment चा !
मागे न पाहता पक्षी आणखी वर जाते, मग सुख आणखी सुख होते ! शिक्षक मुक्त होणार असे भाकीत लिहिणारा करतो. सुशीलाचे रक्त वाढूच वाढू लागते! अचानक कुकरची शिट्टी होते, शिक्षक कुकरकडे धावतो! कुकर बंद करतो! लिहिणारा शिक्षकाच्या घरात पोहोचतो! शिक्षक अंगणात, आयताकार चौकटीतून बाहेर येऊन बसलेला दिसतो. त्याच्या हाताला बांधलेला एक दोर खुर्चीला लागलेला दिसतो. पक्षी अंधारात उडू लागते. अंधाराचा आकार कोणता? पक्ष्याला शिक्षकाचा अमेरिकेतला भाऊ विमानावर बसून उडताना दिसतो उडण्याचा आकार कोणता? शिक्षकाचा भाऊ पक्ष्याला ओळखतो, पण ओळखीतून अॅटॅचमेंट नको म्हणून, आणखी वेगात समुद्र ओलांडून निघून जातो! शिक्षक पुन्हा गंभीर विचारात आणि पक्ष्याची वाट पाहण्यात मग्न होतो! पक्ष्याच्या स्वातंत्र्यात आपण आपले वाट पाहणे आड नको यायला! आपण आपले ध्यान करावे! मुक्त व्हायला बंद व्हायला हवे, उतू जायला ध्यान करायला हवे! शिक्षक चष्मा डोळ्यावर ठेवूनच ध्यान करू लागतो. काहीसा अनैतिक होत पक्ष्याशी सेक्स करू लागतो! ‘नेहमी खरे बोलावे’च्या फळ्याखाली पक्ष्याला खेचू लागतो, मागे ओढू लागतो!! शिक्षकाच्या अर्ध्या आकाराला पक्ष्याला ओढून -ओढून बेसिक अविवेकी सेक्स करण्यात सुख वाटू लागते, अर्धा आकार उतू जाणारे दूध बंद करू लागतो, अर्ध्या आकाराला, सुशीला आकार देऊ लागते, पायथागोरस आणि सुशीला मिळून एका उध्वस्थ घराला उभे करू लागतात. अर्धा आकार सुशीलाच्या अंगावर बसून ध्यान करू लागतो, अर्धा आकार पक्ष्याचे पंख कापू लागतो. अर्धा शिक्षक ध्यान करत आहे, मागच्या बोधी वृक्षावर उडणारी पक्षी येऊन बसली आहे. अर्धा शिक्षक वर बघून मान दुखवून घेत आहे! अर्धा शिक्षक जमीन खणून घरटे वर काढत आहे! अर्धा शिक्षक पक्ष्याला पतंगासारखे बांधून तिला उडू देत आहे. अर्धा वाट पाहत आहे. अर्ध्याच्या डोळ्यात विना आकारी अश्रू आले आहेत. अर्धा अंगाला टॉवेल लावून उडू पहात आहे. सारे गोल, त्रिकोणी, चौकोनी चेहरे ते पाहून हसत आहेत. शिक्षकाची खुर्ची आकार नसल्या प्रमाणे एकटी पडून रडत आहे. पक्ष्याला टॉप व्यू मध्ये सगळे ठिपकेच दिसत आहेत. शिक्षकाला डोंगराएवढा पक्षी दिसतो आहे. लिहिणाऱ्याला काहीच दिसत नाही.
शिक्षक उठतो आणि धावतो आणि थकतो, थकण्याला आकार नाही. निराकार थकतो. खूप ध्यान करतो, थकतो. खूप उतू जातो आणि थकतो. रडतो, थकतो. वैचारिक होतो, थकतो सुशीला उलटी धावू लागते, निघून जाते पण मधेच थकते आणि कोसळते. शिक्षक डोळे मिटतो, थकतो! थकून सुद्धा पक्षी दिसत नाही, मुक्ती दिसत नाही. स्वर्ग दिसत नाही, नरक दिसत नाही. लिहिणाऱ्याला आता काहीच दिसत नाही खांद्यावर पक्ष्याला ठेवून enlighten होणारा शिक्षक दिसत नाही, आकार देणारी सुशीला दिसत नाही. उडून गेलेला अमेरिकेतला भाऊ दिसत नाही. त्याला घरट्याच झाड दिसत नाही. त्याला फक्त एक गूढ आवाज दिसत आहे.
लिहिणारा शिक्षकाला मारू लागतो, खूप मारू लागतो, खूपच मारू लागतो, रक्तच रक्त दिसतं, आकार नसलेलं! पक्षी मात्र स्वैर सुखात स्वतंत्र! शिक्षकाने पक्ष्याला मारून टाकावे किंवा उडून जावे, खूप दूर कायमचे! शिक्षकाने लिहिणाऱ्याच्या मनाविरुद्ध वागून पक्ष्याची वाट पाहू नये. लिहिणारा खूप मारतो. सुशीला मध्ये येते, पण लिहिणारा स्वतःचे महत्त्व प्रस्थापित करत तिला भिंतीत दाबतो. शिक्षक जखमी गुलाम, लिहिणारा मालक! शिक्षक थकत धावणारा, लिहिणारा मारणारा. सुशीला वाचवू पाहणारी, पक्षी उडून जाणारी, अमेरिकेचा भाऊ नसणारा!
शिक्षक खिडकीत धावतो, लिहिणारा रडणारा बनतो. मेलेल्या गोष्टीला कुरवाळताना दिसतो, पक्षी मुक्त उडते, गोष्टीच्या आत्म्यास शांती मिळते! शांतीला आकार मिळतो, आत्मा विनाकारी अनंतात विलीन होतो. गोष्टीसोबत धावून थकलेला शिक्षक घरट्याच्या झाडाच्या सावलीत वाट पाहून मरून पडतो, लिहिणाऱ्यावर खुनाचा आळ येतो. लिहिणारा शिक्षकाच्या मृत्यूचे कारण ‘वाट पाहणे’आहे हे सांगतो. पोस्ट मॉर्टम रिपोर्टसुद्धा तेच सांगतात पण न्यायालयात अन्याय होतो, लिहिणारा गजाआड जातो, पक्षी धर्म पाळतो. उडून जातो, खूप उंच जातो आणि बहुदा enlighten होतो. सुशीला भाताचे पिंड झाडाखाली ठेऊन भिंतीत जाते. पिंड पाहूनही पक्षी येत नाही,पक्षी कृतघ्न. शिक्षक enlighten होण्याऐवजी मृत झाला आहे. शिक्षकाचा डिटॅच झालेला भाऊ विमान घेऊन येतो, शिक्षकाला मृत झालेला पाहून रडतो, खूप रडतो, अजूनही खूप रडत आहे. हे दृष्य लिहिणाऱ्याला दिसू शकत नाही, दुर्बीण हरवून गेलेली आहे. गोष्ट आणि शिक्षकाची अंतयात्रा निघते, आणि संपते. लिहिणारा हळहळतो, पक्षी अंतिमाकडे पोहचू पाहतो, सुख सुमधुर होऊ लागते. शिक्षक आणि गोष्ट आकारबध्द जळू लागतात.