कलाक्षेत्रात शिक्षण घेताना, एखाद्या विशिष्ट कला-तंत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी, अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या माध्यमांवर आपलं प्रभुत्व यावं तसेच कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात सहजतेने व्यक्त होता यावं यासाठी सराव आणि अनुकरणाद्वारे आपण बऱ्याच गोष्टी शिकत राहतो. पुढे, सर्जनात्मक दृष्यनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये – मग ते चित्र, शिल्प, मुद्राचित्रण असेल किंवा नवीन निर्माण झालेल्या माध्यामांपैकी एखादे रूप असेल तर विशिष्ट आकाराची, तंत्राची किंवा विषयाची (व्यक्तिचित्र, निसर्गचित्र इत्यादी ) पुनरावृत्ती आपोआप घडत राहते. ठराविक परिघातील विविध दृश्य-शक्यता अनुभवण्यासाठी तसेच त्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी परत-परत काम केले जाते. ‘तेच ते’ काम करताना परिणामापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया विशिष्ट काळाच्या मर्यादित चौकटीत घडत असली तरी त्यात ‘बांधली जाण्याची’ प्रक्रिया सुरु असते. वेगवेगळ्या प्रक्रियांच्या मालिकेत एका कृतीचे पुढच्या कृतीशी असलेलं नातं संपत नाही, एक प्रकारचा प्रवास चालूच असतो. जसा काळ पुढेपुढे सरकतो तसतसे कलाकाराच्या हातून निर्माण होणाऱ्या कलाकृतींच्या दृश्य- परिणामांमध्ये टप्प्या-टप्प्याने विषयाच्या दृश्य तसेच अदृश्य क्षेत्रात बदल होत राहतात. स्वतःच्या दीर्घ कला प्रवासात कधी-कधी पुढची वाट दिसेनाशी होण्याची अवस्था येते तेव्हा आपण आधीपासून सरावात असलेल्या आकारापासून, कामापासून जर पुन्हा एकदा सुरुवात केली तर नवीन काही सुचण्याची शक्यता असते.
एखाद्या आकाराच्या आपण इतके प्रेमात पडतो कि तो आकार परत- परत स्वाभाविकरित्या आपल्या सर्जनशील प्रक्रियेत आणि निर्मितीत येत राहतो. आपण मागे वळून बघतो तेव्हा आपण त्यामागची कारणे किंवा संदर्भ लावायचा प्रयत्न करतो. त्या आकारांकडे आपण फिरून परत येतो तेव्हा प्रत्येक वेळेला आपण आशयाच्या कक्षेत काही न काही नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संथ गतीने चालणारी ही प्रक्रिया आणि कामात होणारा बदल वर-वर पाहता दिसेल असे नाही. पण अशा प्रक्रियेतूनच, आशयातील वेगवेगळे पैलू, त्यातील बारकावे समोर येतात आणि त्यातील खोली किंवा विस्तार स्पष्ट होत जातो.
मी १९९१ ते २००० सालापर्यंत भारत भवनच्या मुद्राचित्रण कार्यशाळेत प्लेट-एचिंग या माध्यमात सातत्याने काम केले. सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९९१ ते १९९७ पर्यंत, केलेल्या छायाचित्रांमध्ये ‘पाय’ ह्या आकाराची पुनरावृत्ती सहजपणे होत गेली.
आपण रोज जेंव्हा स्वत:कडे पाहत असतो तेव्हा आपल्याला आपले शरीर जे पायांच्या माध्यमातून जमिनीशी जोडले गेलेले असते ते दिसत राहते. आर्थिकदृष्ट्या स्वत:चा भार स्वत: उचलणे याला आपण ‘पायावर उभे राहणे’ असं म्हणतो. माझ्यासाठी त्या काळात माझ्या कलाविषयक कामातून स्वत:च्या पायावर उभे राहता येणे हा एक मोठा टप्पा होता.
स्वतःला चित्रांमध्ये व्यक्त करताना आपल्या पूर्ण आकृतीपेक्षा त्या अवकाशात स्वतःचे अस्तित्व आजूबाजूच्या वातावरणातील वस्तूंबरोबर अधोरेखित करणे माझ्यासाठी महत्वाचे असते. काम करताना मिळणाऱ्या एकटेपणात, इतस्ततः पडलेल्या वस्तुतः निर्जीव असणाऱ्या पण मला जिवंत वाटणाऱ्या वस्तू, त्या जागेचं विशिष्ट वातावरण किंवा आकार माझ्या कामाचा अविभाज्य भाग बनत असतात.
अॅसिड जसं झिंक धातूच्या प्लेटला हळूहळू खात जातं आणि त्यातून उंच-सखल उत्कीर्ण झालेल्या रेषायुक्त पृष्ठभागाची निर्मिती होत जाते तसं आपल्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेतुन कलानिर्मिती होते असे मला वाटते. निर्मिती प्रक्रियेतून साधले जाणारे अनपेक्षित परिणाम हे आपल्या जीवनातील अचानक घडणाऱ्या घटनांसारखे वाटत आले आहेत.
छायाचित्राच्या मर्यादित प्रती काढण्याच्या, एक कृती पुन:पुनः करण्याच्या घटना चक्रामुळे संयम वाढतो आणि हे माध्यम आपल्याला स्वयंशिस्त आणि चिकाटी शिकवते. एकाच दृश्य प्रतिमेमधे पुढे प्लेटमध्ये काम करून किंवा रंगसंगती बदलून अपेक्षित बदल करता येतात. एकसारख्या दिसणाऱ्या प्रती काढताना एका कामाच्या निर्मितीच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो आणि त्या कलाकृती पासून भावानिकदृष्ट्या अलग होण्यास मदत होते. मर्यादित प्रती काढता येत असल्याने आपल्याकडे ही आपल्या मुद्राचित्रांची संग्रहात्मक नोंद राहते.
मी पहिल्यांदा जेव्हा माननीय प्रभाकर बरवे यांना माझी एचिंगज दाखवायला गेले तेव्हा त्यांना हे काम आवडले होते.
त्यातील अंगठ्यामध्ये अडकलेला अंगठा आणि मुडपलेली दोन्ही बाजूला एकसारखी दिसणारी बोटे हे बारकावे त्यांना दिसले.
मॅजेनटा या रंगाचा वापर करून पाहिला.जमिनीवरील फरशीच्या पॅटर्न मध्ये आकाशाचा तुकडा पाहणे.
हातातून खाली जमिनीवर पडणाऱ्या गोटयांमधून मला जीवनातील गूढता आणि अनिश्चितता अभिप्रेत असते.
सहजतेने खुर्चीवर एका पायावर दूसरा पाय टाकून रेलून बसले आहे. आतील मानवनिर्मित अवकाश आणि बाहेरील हिरवे आकाश यांचे विच्छेदन.
काम करताना आजूबाजूला विखरून पडलेल्या कामासाठी लागणारे सामान आणि अर्थातच मी.
क्लोज अप
फॉल्स बाइटचा (अपघातांनी मिळालेल्या परिणामांचा) जाणीवपूर्वक वापर.
एचिंग प्रिंट मधील आकाराच्या मर्यादा तोडण्याचा प्रयत्न केला. तीन पूर्ण प्लेट्सवर काम करून एकाच वेळेला तीनही प्लेट्सना रंगांचे लेपन करून एका दिवसांत एक अशा प्रती काढून ते काम पूर्ण केले. लागणारा मोठा पेपर मी शिवाजीनगर, पुणे येथील हातकागद कारखान्यातून आणत असे.
आकारांचे प्रमाण बदलले.
फिकट आणि अपारदर्शक इंटयाग्लिओचा एचिंग मध्ये वापर केला.
मानवनिर्मित वस्तूंमधील आपले जीवन
खैरागढच्या इंदिरा कला संगीत विश्वविद्यालयात व्हिजिटिंग फेलो म्हणून आमंत्रित केले होते तेव्हा तिथे हे एचिंग केले. काम करत होते तिथे मागच्या बाजूस जुन्या पडक्या वास्तूचे कमानी दरवाजे आणि आकाश-अवकाशाचे काही भाग कामात दिसू शकतात.
उत्तरायण येथे २०१८ मध्ये झालेल्या शिबिरात हे एचिंग केले होते.एका छापाचित्रासाठी दोन झिंक प्लेट्सचा वापर केला.
Thank you so much Vishakha for sharing these etchings & intelligently deveped re-prints.
This information on your National & international accolades was quite revealing to me of your spectacular achievements over the years.
Congratulations 👏🎉
Very interesting and to the point. Many times, we see article with too much technical jargon, though well written does not help curious readers. Thank you.
एचिंग चा पोत मस्त वाटतोय. अभिनंदन ! आजच्या डिजिटल युगात एचिंग आणि लिथोग्राफ सारखी जुनी तंत्रे काही लोक वापरत आहेत हे बेश्ट !