मला पूर्वीपासून ओळखणारी माणसं अजूनही फोटोग्राफर म्हणूनच ओळखतात. पण अलीकडे मात्र ती माझी प्राथमिक ओळख नाही असंच वाटायचं. जरी मी फोटो काढायचे तरी कमाईचं आणि व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून ते वरच्या क्रमांकावर राहिलेलं नव्हतं. एकेकाळी ते तसं होतं, जे नंतर ते बदलत गेलं.
मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना, १९८३-८४ मध्ये, माझ्या हातात आकस्मिकपणे कॅमेरा आला. तोही साधा कोडॅक वगैरेसारखा ‘क्लिक अँड शूट’वाला नाही तर प्रोफेशनल एसएलआर! आता कित्येकांच्या हातात असलेला कॅमेरायुक्त मोबाईल फोन त्याकाळी स्वप्नातही नव्हता, डिजिटल कॅमेरा यायलाही अजून बराच अवकाश होता आणि कॅमेरा ही लक्झरीची गोष्ट मध्यमवर्गीय कुटुंबात दुर्मिळच होती. तरीही आमच्या घरात एसएलआर होता, त्यावर मी माझे फोटोग्राफीचे प्राथमिक धडे घेतले आणि करता करता शिकत बरे फोटो काढू लागले. या कौशल्याला पदवीनंतर केलेल्या जर्नालिझमच्या कोर्समधून व्यवसायाचा मार्ग मिळाला. त्यानंतर आधी वर्तमानपत्रांसाठी, मग स्वयंसेवी संस्थांसाठी काम करता करता मला फोटोग्राफर म्हणून ओळखू लाभली. तीसेक वर्षांपूर्वी मुली, स्त्रिया या क्षेत्रात कमी असल्यामुळे वेगळेपणाचे कौतुकही वाट्याला आले. स्त्रीमुक्ती चळवळीच्या जवळीकीमुळे स्त्रियांच्या दैनंदिन जगण्याचे क्षण मी आपसूक टिपू लागले. या विषयाला धरून काही वर्षांच्या अंतराने दोन प्रदर्शने केली. पहिलं प्रदर्शन ‘स्थिती’ स्त्री म्हणून घडण्याची गोष्ट होतं, तर दुसरं ‘बिनमोल श्रम’ प्रदर्शन स्त्रियांच्या कामाबद्दल, अदृश्य व गृहित धरलेल्या श्रमाबद्दल होतं. मी कामानिमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी जायचे त्यावेळी काढलेली आणि काही आवर्जून फिरून घेतलेली कष्टकरी स्त्रियांची छायाचित्रं होती. दोन्हीही खूप ठिकाणी दाखवली, त्यांचा चर्चेसाठी बराच वापर केला गेला.
त्याही वेळी मी निव्वळ फोटोग्राफी करत नव्हते. त्यासोबत रिपोर्टिंगवजा व्यावसायिक लिखाणही चालू होते. काही कामांमध्ये या दोन्ही कौशल्यांचा एकत्रित वापरही करता येत होता. हळूहळू बाकी कामांनी मला व्यापून टाकले आणि फोटोग्राफी मागे पडत गेली. ती जसजशी कमी झाली तशी तिची संवेदनाही हरवली. मी कॅमेरा तर हातात घेऊन निघायचे, मात्र फोटो घेण्यात पूर्वीची ऊर्मी, सहजता राहिली नाहीय हे मला जाणवायचं, टोचायचं. फोटोंवरही त्याचा परिणाम व्हायचा. आपण एकाच प्रकारचे फोटो काढतोय असं वाटायचं. त्यातला तोचतोचपणा आवडायचा नाही. मग मी फोटो काढण्याचा कंटाळा करू लागले. बॅगेतला कॅमेरा कधीमधीच बाहेर येऊ लागला. गाठीशी अनुभव होता, त्यामुळे काही प्रकारचे, विशिष्ट विषयांचे फोटो अजूनही बरे यायचे, इतरांना आवडायचेही. मला मात्र त्यानं फारसं समाधानी वाटायचं नाही, यात आपण वेगळं काहीच करत नाहीये, कॅमेराच तर फोटो घेतोय असंच वाटत राहायचं. करतेय त्यापेक्षा काहीतरी बरं, वेगळं करायचं होतं. जे जमत नव्हतं ते करायची अपेक्षा होती. पण मनात होतं या अपेक्षेचं दडपण आणि अपेक्षाभंगाची भीती. हे अडसर मी कसे दूर करणार होते?
जे मला माझ्या फोटोत सापडत नव्हतं ते मला इतर फोटोग्राफरच्या फोटोत दिसत होतं. मला ज्यांचं काम आवडतं त्या फोटोग्राफरना मी फॉलो करायचे. ज्यातलं एक अगदी वरचं नाव म्हणजे इंद्रजित खांबे. त्याच्या फोटोत सहजता, साधेपणा असतो. अगदी रोजचा आपल्या आसपासचा परिसर, माणसं असतात आणि त्यातले नेमके क्षण इतके जिवंतपणे टिपलेले असतात की हे सगळं आपल्या समोर आत्ता घडतंय असं वाटतं. मी माझ्या फोटोंमध्ये जे मिस करायचे ते मला या फोटोंमध्ये दिसायचं. इन्स्पायर करायचं. आणि या वर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रत्यक्ष इंद्रजितकडूनच शिकण्याची संधी मला मिळाली. ‘फाईंडिंग युअर क्रिएटीव्ह व्हॉईस’ या नावाने त्याने घेतलेल्या ऑनलाईन कोर्समध्ये मी सहभागी झाले. कोर्सआधी प्रत्येकाने आपापले पूर्वीचे काम शेअर केले होते. माझे तर काही खूपच आधीचे होते. “तुम्हाला येतंय, कामात सातत्य नाहीये फक्त,” हा इंद्रजितचा फिडबॅक होता. नेमकं मी कुठे अडखळते आहे हे त्याला दिसलं होतं, जे मला आश्वासक वाटलं. हा प्रवास कुठे नेणार होता याची जराही कल्पना नव्हती.
इंद्रजितच्या फोटोप्रमाणेच त्याच्या शिकवण्यातही साधेपणा आहे. करून बघायला प्रवृत्त करण्याची क्षमता आहे. ‘जे समोर आहे, म्हणजे जे ‘दिसतंय’, त्याचे फोटो काढू नका, तुम्हाला जे ‘वाटतंय’ त्याचे फोटो काढा’ – हा मनातल्या फोटोच्या अधिकाधिक जवळ जायचा मूलमंत्र त्यानं दिला. फोटोंचा ‘रियाज’ करा, म्हणजे रोज फोटो काढा हे सांगितलं. फोटो चांगले येतायत की वाईट याचा विचार न करता वेगवेगळ्या प्रकारे काढून बघा म्हणत मनावरचं दडपण दूर केलं. माझा फोटोंचा विषय ‘होम विदीन मी’ (माझ्या मनातलं घर) हा होता. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असताना घेतलेला मनातल्या घराचा शोध. विषयानुरुप जे मनात येत होतं त्याचे फोटो मी काढू लागले. समोर जे ‘दिसतंय’ त्यापलीकडे जायचे मार्ग शोधू लागले. कधी ते सापडायचा, तर कधी नाही. फोटो काढणं, दाखवणं, फिडबॅक घेणं, त्यानुसार सुधारणा करणं, पुन:पुन्हा फोटो घेणं, निवडणं, एडिटींग करणं असं करता करता कोर्सचा महिना सहज संपला. समोर मी काढलेले असंख्य फोटो होते. बरे वाईट सगळ्याच प्रकारचे. ते कसे आलेत यापेक्षाही आनंद या गोष्टीचा होता की कधीतरीच बाहेर येणारा कॅमेरा महिनाभर हातात होता आणि मनात सतत फोटोचेच विचार होते.
या कोर्समध्ये मी दोन नव्या गोष्टी करायला शिकले. पहिली सेल्फ पोट्रेट, दुसरी फोटो कोलाज किंवा डिप्टीक म्हणजे दोन स्वतंत्र फोटो जोडून एक वेगळाच फोटो तयार करणं. खरं तर सेल्फ पोट्रेट हा फोटोचा प्रकार माझ्या विषयाच्या अगदी जवळ जाणारा होती. मनातलं घर शोधताना मी स्वत:ला बाजूला कशी ठेवू शकणार, का शरीर हेच तर आपलं आद्य घर. पण मला तर स्वत:चे फोटो काढायला फारसं आवडायचं नाही, इतर कुणी काढावेत अशी इच्छाही फारशी व्हायची नाही. आपण कॅमेरामागंच राहायचं असतं, हा आजपर्यंतचा समज माझा कंफर्ट झोन झाला होता. जो मला तोडावा लागणार होता. सेल्फ पोट्रेट काढणं म्हणजे स्वत:ला दाखवणं, व्यक्ती म्हणून तसंच आणि विषय म्हणूनही. आणि त्याही आधी तुम्ही स्वत: स्वत:कडे पाहायला तयार होणं. तुम्हाला जसं वाढवलं, घडवलं जात त्यात तुम्ही स्वत:कडेही दुसऱ्याच्या नजरेतूनच बघायला लागता. सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेची ही पुटं कितीही उतरवली तरी उरतातच. पण फोटोग्राफर म्हणून आपण किती सहज इतरांच्या खाजगी विश्वात घुसत असतो. मग स्वत:ला स्वत:चा विषय करायला काय हरकत आहे, या भावनेनं मी हे चॅलेंजही घ्यायचं ठरवलं.
मनाची तयारी झाली तरी सेल्फ पोट्रेट घेतानाची तांत्रिक आव्हानं फोटो काढायला लागल्यावरच समजली. त्यातलं मुख्य आव्हान होतं मी ज्या जागेवरून फ्रेम बघते तिथेच – म्हणजे त्याच उंचीवर, त्याच कोनात – कॅमेरा/फोन सेट केला पाहिजे. कधी कधी कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला की भागायचं. पण जरा वेगळ अँगल असताना किंवा टॉपवरून फोटो घेताना ट्रॉयपॉडचा उपयोग व्हायचा नाही, कधी त्याचे प्रतिबिंब समोरच्या काचेत, वस्तूत दिसायचे. मग ते घालवण्यासाठी कॅमेरा कधी खुर्चीच्या पाठीवर, कधी गच्चीच्या कठड्यावर फिट करावा लागला. कॅमेरा हव्या त्या जागी फिट्ट झाला की सेल्फ पोट्रेटचे निम्म्याहून अधिक काम झाले. कॅमेरा टायमर सेट करायचा, त्या वेळात फोटोग्राफरच्या भूमिकेतून बाहेर पडत सब्जेक्टची भूमिका बजावायची. म्हणजेच कॅमेरासमोर हवी ती जागा घ्यायची. हे असंच सतत कितीहा वेळा, फोटो मनासारखा येईपर्यंत, करायचा पेशन्स ठेवायचा.
कॅमेऱ्याच्या नजरेतून स्वत:कडे बघण्याचा फील वेगळाच असतो. मला जाणवलं की सेल्फ पोट्रेट घेणं ही खूप खाजगी गोष्ट आहे. स्वत:शी स्वत:चा संवादाचा प्रयत्न आहे. कोणत्याही इंटिमेट संवादासाठी प्रायव्हसी लागते. कोणाच्याही वा कसल्याही अडथळ्याशिवाय मिळणारा शांत, निवांत एकांत लागतो. ज्यात केवळ आपला व आपल्यापुरता विचार करायची मुभा आहे असा भरपूर वेळ लागतो. स्वत:ला हवा तसा वेळ न घेणं, न मिळणं हाही एक मानसिक अडसर. जो कदाचित प्रत्येकाच्याच वाट्याला येत असेल, पण स्त्रियांना त्याची झळ अधिक बसते हे निश्चित. स्वत:ला बाजूला ठेवत इतरांसाठी करायची, इतरांचा विचार करायची सवय अंगवळणीच पडलेली असते त्यांच्या. लॉकडाऊनच्या काळात मी घरात एकटीच असल्याने माझ्याकडे माझ्यासाठी मुबलक वेळ होता. त्यात कसलाच, कोणाचाही जराही अडथळा नव्हता. कोणत्याही क्षणी उठून कुठेही फोटो घ्यायचा मुक्त अवकाश होता. ही वेळाची श्रीमंती नसती तर हे फोटो तयार झाले असते का, हा प्रश्नही मला अजूनही सतावतो.
चित्रकार मनात असलेल्या गोष्टीचं चित्रं काढतात. फोटोग्राफीचं तसं नाही, जे प्रत्यक्षात आहे ते क्षणच फोटो टिपतो. पण समोर आहे म्हणून ते दिसतंच असं नाही, ते बघता यायला पाहिजे. पाहणं आणि दिसणं यातले अदृश्य अडसर दूर करता यायला पाहिजेत. जे या कोर्सनं मला शिकवलं. इंद्रजित आणि त्याची या कोर्सची सहकारी फोटोग्राफर सुहिता शेट्टी दोघेही आपल्या कलेवर प्रेम करणारी माणसं. सुरुवातीपासून ते फोटो स्टोरी तयार होईपर्यंतच्या प्रत्येक पायरीवर त्यांची साथ होती. केलंय त्यापेक्षा आणखी वेगळं करून बघायला उद्युक्त करत करत त्यांनी मला पुन्हा फोटोग्राफीच्या खूप जवळ आणलं. अपेक्षांचं ओझं न घेता, स्वत:कडे बघायचं धाडस करत आणि स्वत:साठीचा वेळ काढण्याची मुभा घेत फोटो घेतले आणि ‘माझ्या मनातलं घर’ साकारलं. मला फोटो ‘दिसायला’ लागले. ते घेण्यातला आनंद पुन्हा सापडला.
आवडला लेख.
I really like the way you write
शब्द आणि फोटोने हा साधलेला संवाद खूप भावला.
excellent write up.