फ्रेडरिक नित्शे (१८४४-१९००) हा जर्मन तत्त्वज्ञ होता. त्याने अनेक कविता, कथा, समीक्षा अशा प्रकारचे लिखाण केले. इतिहास, संस्कृती, शोकांतिका, कला, आणि विज्ञान असे बरेच विषय नित्शेच्या पसाऱ्याचा भाग होते. नित्शे नास्तिक होता. त्याचे वडील पाद्री आणि आई धर्मभोळी होती. त्याचे वडील खूप लहानपणी गेले आणि त्यानंतर आईनेच त्याला वाढवले. नित्शेने त्याच्या आयुष्यात अनेक बऱ्या-वाईट गोष्टी अनुभवल्या. तो खूप चांगला विद्यार्थी होता. पुढे काही वर्षांनी तो चांगला प्राध्यापक देखील झाला. काही वर्षे तो सैन्यात होता. प्रेमभंग, आजारपणे आणि अहंकारामुळे होणार त्रास. यातून एकंदरीतच त्याचे आयुष्य चढ उतारांचे गेले. त्याची लिखाणाची शैली खूप इवोकेटीव्ह होती. स्वतः मध्ये संवेदना जागृत करणारी, सतत काही तरी तेवत ठेवणारी. माझ्या सारख्या कलाकाराला त्याचे लिखाण केवळ ज्ञानोचीत करणारे नव्हे तर उद्युक्त करणारे वाटते. उद्युक्त या अर्थाने की त्यांत प्रचंड ऊर्जा आहे. ध्येय-धारणेसाठी आणि नवविचारांसाठी जागे ठेवणारे सामर्थ्य त्यात आहे. या सामर्थ्याने कलाकाराला बळ-प्रेरणा मिळते. त्याच्या विचारांचे ओझे वाटत नाही. नित्शेने भल्याभल्याना भुरळ घातली आहे. मार्टिन हायडेगर, लुडविग विटगेन्श्टाईन, अर्न्स्ट युंगर, जॉन डेव्हिड्सन, रिल्के, वॉलेस स्टिव्हन अशा तत्त्वज्ञांवर, लेखक-कवींवर त्यांचा प्रभाव दिसून येतो. नित्शेच्या कामांवर बरीच चर्चा झाली, होत राहील. नवनवीन मत-विचार, तर्क-वितर्क होतात. कौतुक होते आणि टीकाही होतात. याचे कारण म्हणजे नित्शेचे तत्त्वज्ञान आणि लेखन सर्वानाच विचार करायला लावणारे असे आहे.
नित्शेने अस्तित्ववादाबद्दल बरेच लिहिले आहे. वैयक्तिक अस्तित्वाच्या आणि स्वातंत्र्याच्या खुणा जपायला आणि त्या मान्य करायला विचाराची बैठक असावी लागते. प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक वूडी ऍलन म्हणतात तसे अस्तित्ववादाच्या परीक्षेत एकही उत्तर न लिहीतासुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळतात. मराठीत विंदा करंदीकरांनी ‘नित्शे दर्शना’मध्ये त्याच्या तत्त्वज्ञानाची ओळख अतिशय सुंदररित्या करून दिली आहे. नित्शेचे लिखाण हे “related to everybody in general but nobody in particular”म्हणजे सामान्यतः सर्वाना आपले वाटते परंतु विशेषतः ते व्यक्तिगत नसते, असे काहीसे आहे आहे. कलाकाराला ते खूप जवळचे वाटले तर त्यात काही नाविन्य नाही. याचे कारण असे, कारण तो सर्वाधिक काळ खळबळीत राहतो. खरे तर तो खळबळ जगतो.
“One must still have chaos in oneself to be able to give birth to a dancing star.”
नित्शेचे हे वाक्य ‘दस स्पोक झरतृष्ट्र’मधील आहे. नित्शेला ‘झरतृष्ट’सुचले ते एका तळ्याकाठचा दगड पाहून! झरतृष्ट्रहा झरतृष्टवादाचा जनक. झरतृष्ट्रला नित्शेने एका वेगळ्या पद्धतीने मांडले आहे आहे. नित्शेचे ‘दस स्पोक झरतृष्ट्र’म्हणजे झरतृष्ट्रची भाषणे आणि प्रवास यांची काल्पनिक वर्णने असणारी गाथा आहे. इथे नित्शे शब्दांचा खेळ चांगला रंगवतो. एक सारखे वाटणारे पण भिन्न भावनांच्या आणि अर्थाच्या छटांचे शब्द मला विलक्षण वाटतात. इथे केऑस अथवा खळबळीबद्दल लिहिले आहे, नित्शे म्हणतो ती खळबळ म्हणजे एक विस्तार आहे. नित्शेने स्वत्वाची प्रशंसा केली. तो एक अस्तित्ववादी होता त्याने ह्या खळबळीला वैयक्तिक पातळीवर, सर्जनशीलतेप्रमाणे बघितले की जिथे स्वातंत्र्य आहे. हा केऑस म्हणजे नवोन्मशालीन बळ आहे. खळबळ हे निर्मितीचे एक वेगळे लक्षण आहे. हा ‘सोज्वळ’ गोंधळ आपल्याला व्यक्तिगत पातळीवर प्रकट होण्याचे, निर्मिती करण्याचे, अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य बहाल करतो.
वर उधृत केलेले नित्शेचे उद्गार मी काही वर्षांपूर्वी वाचले होते. ते कुठल्या पुस्तकातील आहे किंवा कुणाचे उद्गार आहेत हे काहीच माहित नव्हते. नंतर कळले की ते नित्शेचे वाक्य आहे. पण, आता लक्षात येते की त्या उद्गाराबरोबर एका नव्या प्रवासाची सुरूवात होते. स्वतःचा शोध, शोधातून होणा-या जाणिवा, कलाकृतीची निर्मिती असे अनेक मुद्दे आपल्या मनात येऊ लागतात. नित्शेच्या वाक्याने मनाला उर्जा मिळते.
नित्शेचे हे वाक्य म्हणजे जणू विचार-मालिकांची साखळी आहे असे मला वाटते. या सगळ्या गोष्टी एकाच खळबळीचा भाग आहेत परंतु त्याच्या वेगवेगळ्या आंतरिक अवस्था आपल्याला सापडत जातात. यासाठी स्वतःचा शोध खूप महत्त्वाचा ठरतो. या प्रवासामध्ये स्वातंत्र्याची जाणीव होते. प्रचंड खळबळ माजते आणि अभिजात कलाकृती निर्माण होतात. हे इतके सरळ आणि सोपे भासते ते नित्शेच्या शैलीमुळे पण हळूहळू लोणचे मुरावे तसे प्रगल्भ होत जाते.
स्वतःचा शोध घेत असताना अनेक गोष्टी दृश्यमान होतात. स्वातंत्र्य असते पण त्याची जाणीव होतेच असे नाही. ही जाणीव झाल्यानंतर आपला गाभा आपल्याला गवसतो. स्वतःचा शोध म्हणजे काही अंशी स्वतःची ओळख करून घेतल्यासारखे आहे. अनेक जीव कलाकार असतात. काही जण स्वतःला ‘कलाकार’ म्हणून जाहीर करतात, तर काही आतल्या आत मान्य करतात, तर काहींना कळत देखील नाही. कलेला आदी ही नाही आणि अंत ही नाही. कलाकार पूरक जोडणी करत असतो. हे जे स्वातंत्र्य आहे ते म्हणजे सर्जनशीलतेची नवीन क्षितिजे गवसणे. कलाकाराला कुठलेही बंधन नसते. असेलच तर ते झुगारून तो पुढे जातो. हा बिंब-प्रतिबिंबांचा खेळ आजन्म चालू राहतो. ज्या गोष्टी सापडतात त्या पुनःपुन्हा वेगवेगळया रूपात प्रकट होत राहातात. कलेच्या विश्वात प्रक्रियेचे क्रमिक पुस्तक नसते. कला- शोध काळाच्या चिमटीत पकडायचा म्हटले तर अवघड होईल. कलाकाराचे आयुष्यच असे असते. यावेळेस जीव आर्त हाक मारतो. हा शोध म्हणजे विरहिणी आहे. स्वतःला हा विरह गवसला की प्रवास थोडा सुखकर होतो. विरह गवसायला हवा यासाठी कारण विरहामध्ये उलथा पालथ घडवण्याची प्रचंड शक्ती आहे. स्वत्वाची शहानिशा करण्याची मग गरज राहत नाही. त्याची कलाच बोलू लागते.
मर्यादा या मर्यादा न राहता रूंदावत जाणाऱ्या कक्षा भासू लागतात. बोथट झालेल्या जाणिवा पुन्हा एकदा संवेदनशील होतात. हा प्रवास ज्याचा त्याने करावा आणि जपावा. आतल्या आत ह्या छोट्या मोठ्या खळबळी सुरू राहतात.
कलासक्त जीव अत्यवस्थ होतो. त्याला अनेक प्रश्न पडतात. कोण? कुठे? कसे? कधी? कसे? किती? असे अनेक आचार- विचारतंत्र या पलीकडचा प्रवास सुरू होतो. यातूनच आकाराला येते खळबळ! कुठेतरी नेणारी, अव्यक्ताची अनुभूती देणारी खळबळ म्हणजे कलाकाराचा सोज्वळ गोंधळ! ही खळबळ कधीही थांबत नाही. ती पार्श्वसंगीतासारखी असते. जीवाच्या मनोदशेप्रमाणे तिचे राग, रंग आणि पोत बदलत असतात. यामध्ये कल्पनांना सत्य पेलण्याची जबाबदारी घ्यावी लागते. सत्य पचवण्याची शक्ती मिळते. या जबाबदारीची जाणीव देखील खळबळीमुळेच होते. विचार, भावना, साठलेल्या इच्छा, सुप्त हेतू, सळसळते उद्देश, कलाकाराला होणाऱ्या यातना, मिळणारा आनंद, नित्य साधनेचे परिणाम, जुने संदर्भ, नवे तपशील, पडणारे प्रश्न, न मिळणारी किंवा पुरी-अपुरी पडणारी उत्तरे, स्वप्न, कष्ट, अशी सगळी घुसळण हा खळबळीचा गाभा. नित्य साधना आणि रियाजातून प्रत्येक कलाकाराला एका विशिष्ट टप्प्यांच्या जिन्यावरून चढ-उतार करावा लागतो आणि या छोट्या खळबळींच्या राज्यात त्याला अनेक संधी मिळतात.
यामध्ये अहंकारासारख्या गोष्टी विरून जातात. स्वतः बद्दलचे अचकूल समज गळून पडतात. खरे तर कलाकाराला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव त्याच्या कलाकृती करून देत राहतात. तो भानावर येतो ते भ्रामिक वाट धूसर झाल्याने पण जो मृगजळाला फसत नाही कारण त्याला तहानच लागलेली नसते, त्यामुळे हे सगळे घडणे महत्त्वाचे. नित्शे म्हणतो तसं कुठला ही कलाकार रिऍलिटीला सांभाळून घेत नाही. तो त्याचं विश्व निर्माण करतो. कलाकार आणि त्याचे अंतरंग हे कायम एकमेकांच्या संवादात असतात. कलाकाराला स्वतःहून स्वतःचे अंतरंग दिसावे. इतरांची शेरेबाजी केवळ अहंकार आणि स्वाभिमानाची परीक्षा घेत असते. राहतो तो कलाकार आणि त्याचा अर्क असतो. आता गर्भार वारे वाहू लागतात आणि तारा जन्माला येतो. कलाकारासाठी हे दृष्ट असते. त्याच्यासाठी ही कलाकृती स्वतःचा भाग असते. एखाद्या स्त्रीला मूल व्हावे तसे हे सगळे कलाकाराला होत जाते. अगदी सहज, विशुद्ध आणि तरल! कुठली कलाकृती निर्माण करता असताना कलाकार ती तयार होण्यापूर्वीच सतत मूर्तरूपात पाहत असतो जी इतरांच्या दृष्टीने खूप अलौकिक शक्ती आहे. या गोष्टी म्हणजे कलाकाराच्या गर्भाचे बिंब आहे . नवनिर्मितीसाठी हा प्रवास खूप महत्त्वाचा ठरतो. लांबून पाहिल्यावर गोष्टी छोट्याच दिसतात. जवळ जावे तसे तपशील अधिकाधिक स्पष्ट होत जातात. कलाकाराच्या बाबतीत हे असेच होते. तो जितके हे सगळे लांब ठेवतो किंवा अंतर बाळगतो तेवढे ते वरवरचे भासते. जेव्हा खोल आणि जवळ जातो तेव्हा त्याच्या अंतरंगाची लक्षणे ठळक होतात. कुठलीही कलाकृती किंवा नित्शेचा ‘डान्सिंग स्टार’हा सुमार नसतो. तो दर्जा ठरवण्यासाठी निर्माण केलेला नसतो. हे प्रत्येकाचे या विश्वातील एक छोटेसे योगदान असते. अभिजात कलाकृतीची निर्मिती अथवा कशाचाही जन्म दीर्घकालीन परिणाम आणि बदल घडवत असतात. नवीन क्षितिजे दिसू लागतात. कलाकृतीला मूर्तरूप मिळाल्यानंतर विलक्षण आनंद होतो. रसिक आणि त्याचा निर्माता दोघे हा आनंद अनुभवू शकतात .
‘खळबळ’ एखाद्या कलाकाराला समृध्द नाचाचा प्रत्यय देत असते. नर्तकीला ही खळबळ खूप जास्त बोचते आणि सोसावी लागते कारण, नर्तिका आणि तिची कलाकृती अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या करता येत नाहीत. नर्तकीला ते स्वतः पासून वेगळे करून दाखवत येत नाही. वर्षानुवर्षे सादर केली जाणारी, रोजच्या रियाजाचा भाग असणारी किंवा ध्यानात, मनात, सतत जिवंत असणारी कलाकृती नवनव्या रूपाने जन्माला येते. दरवेळेला खळबळ निर्माण होते, स्वतःचा शोध, मग उसळणाऱ्या खळबळीच्या लाटा आणि त्यातून उदयाला येणाऱ्या कलाकृती या सादरीकरणाचा भाग बनतात. सगळे एकमेकांशी समरस होतात.
कला-प्रक्रिया एक अमर्याद आणि अथांग खळबळ आहे. पण, नित्शेचे वाक्य वाचल्यानंतर हा प्रवास आपल्याला एका आवर्तनात बसवता येतो. कधी गती, तर कधी लय बदलते. असेच अनेक तारे जन्माला येत राहतात. साधना आणि पद्धती या प्रत्येक कलाकारात वेगळ्या असतात. एकाच पद्धतीने मार्गक्रमित झालेल्या नसतात. कलाकाराच्या स्वतःच्या चौकटीत देखील छोटी-छोटी बंडे होत राहातात. कधी नवीन प्रवाह उदयाला येताना दिसतात. यामधून कलाकाराची आपली शैली विकसित होते. कधी पंथ निर्माण होतात. लहान-मोठे इतिहास घडवले जातात. नित्शेचे खळबळीचे चिंतन सजीव,-निर्जीव, नीटनेटक्या आणि विसकटलेल्या गोष्टीं, गवसलेल्या वाटा- दिशा, स्फुरलेल्या कल्पना, घेतलेल्या भराऱ्या अशा सर्वांना बांधून ठेवते असे वाटते. खरंतर, हे सारे नकळतच एकत्र ठेवलेले असते. पण, नित्शेचे शब्द भान देतात. शब्दांनी ते जपता येते. नित्शेचे शब्द खळबळीच्या गर्भात खोलवर साठवून ठेवता येतात. खळबळीचे आवर्तन मांडतात. नवनिर्मितीची ऊर्जा देत राहातात.
Beautiful.very nice write up.Though I was not knowing him your write up gave a beautiful glimpse of his personality,his work & his thought process.u write v.well.
Thanks
खरंच! हा एक नवा दृष्टिकोण आहे. यावर बोलुच. सर्व प्रथम तुझं उदंड कौतुक.
तुझ्या जन्माची वेळ आठवली.
क्षणभर डोळे पाणावल.
तुला शुभेच्छा! प्रतिभेच्या नव्या नव्या पातळ्या गाठण्याचं आभाळ तुला लाभो.
सुनील भाटवडेकर
Great article. It’s really inspiring and innovative. I am overwhelmed with joy reading through the lines. I believe that there is a light at the end of the tunnel. Keep up your with such writeup. Wish the energy ignite further and elevate your thoughts.