परत एकदा
गौरवच्या शिव्या आणि संतापाचा आवाज कानांमध्ये दडे बसवत असतानाच
अचानक काहीतरी आडवं आलं
कचकन ब्रेक दाबायचा तरी पंचाईत च्यायला
मागे माझ्या गाडीच्या ढुंगणाशी हुंगणारी कार घुसलीच असती आत,
म्हणताना हॅझर्ड लाईटस लावत गाडी स्लो केली
थांबवली आणि खाली उतरलो
रस्ता एक लेनचा- एकीकडेच धावणारा
हल्ली डिव्हायडर्स पक्के बांधतात, मागे वळता येत नाही.
संध्याकाळचा धूर साचत चाललेला, रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड अंधुक
गौरव खाली उतरला, “कुत्र्यावर घातलीस साल्या तू गाडी.”
“तुझ्या शिव्यांनी कान भरले होते माझे भडव्या. तिकडंच लक्ष.”
मी खाली उतरलो.
गाडीचं चाक कुत्र्याच्या मानेवरुन गेलेलं
जबड्याची कातडी सरकून आतले दात विचकत उघडे पडलेले
डोळे काचेसारखे चमकत अजूनही जिवंतपणे बघणारे
गाडी मागे घ्यायची तरी मानेचा चुराडा झाला असता
पुढे न्यायची तरी तेच. मागे तुंबत चाललेल्या गाड्या
सिमेंट होईपर्यंत त्याच्या कलेवरावरुन जातील
गौरव म्हणाला, “मागे घे गाडी. रस्त्याच्या कडेला टाकू.
कुत्राच आहे- पोलीसांचा प्रश्न नाही.”
मी गाडी सुरु केली. मागच्या गाडीला खूण केली.
त्यानं कचाकचा हॉर्न मारला म्हणताना गौरव त्याच्याकडे गेला.
मी आरश्यात बघत होतो. गौरवचे शिव्याशाप खायला नवीन माणूस.
गाडी मागे हटली.
मी गाडी रिव्हर्समध्ये टाकली. परत एकदा मान गाडीखाली आल्याचं कळलं
थांबवली. उतरलो. मान तुटली होती. रक्ताचं थारोळं.
गाडीचं चाक रक्ताळलेलं.
गौरवनं मुंडकं उचललं आणि कडेला फेकलं
दोघांनी पाय उचलले. अंग अजून कोंबट होतं आणि पोट टपोरलेलं.
“कुत्री आहे – होती- च्यायला. गर्भार.” गौरवचा आवाज काहीसा नरमलेला.
कलेवर रस्त्याच्या कडेला भिरकावण्याचा विचार बदलला
आम्ही ते काळजीपूर्वक रस्त्याच्या कडेला ठेवलं
जणू काही मानेच्या चिंध्यांमधून पिल्लं चालत बाहेर येतील…
अजूनही कोंबट असलेल्या त्या शरीरात किती जीव जन्माला यायची वाट बघत असतील?
मी खिळल्यासारखा झालो
संध्याकाळ धुरानं गच्च भरली होती-बॉम्ब पडावा तशी
गाड्यांचे दिवे संताप ओतत होते
तलखी, आग आणि हाताला लागलेलं रक्त
पोटाचा गर्भार टचटचीतपणा आणि अनाहूत स्पर्श जिवंतपणाचा
तोही शांत होत जाईल
मी त्या रहदारीच्या पिसाळलेल्या चक्रव्यूहात उभा
आपापल्या जागा परजत उभ्या असलेल्या आम्हा सगळ्यांचाच विचार करत
सभोवतालच्या गर्दीत युगांचे आकांत गजबजत गेले.
खसकन दार उघडत, खाडकन बंद करत
गाडीत बसलो. रक्ताच्या थारोळ्यात चाक बुडवून
परत एकदा ट्रॅफिकमध्ये-
***
आई मुलीशी बोलते
खिडकीतून समोरच्या भिंतीवरचा संध्याकाळचा केशरी उजेड काळवंडत जाताना दिसतो.
हातातलं पुस्तक खूण घालून मी खाली ठेवते
आणि कुकर लावायला उठते.
आईला संध्याकाळीपण गरम भात लागतो म्हणताना.
हल्ली माझेही सांधे बोलतात, हाताची बोटं आखडतात
वाचताना मानेचा सांधा अवघडतो.
पुस्तकातून बाहेर पडल्यावर आईचा वावर हलके हलके जाणवायला लागतो
तिनं नुकतंच तिचं पोलकं रफू करुन ठेवलं आहे
तिनं गाऊन घालावा यासाठी जंग जंग पछाडूनही ती साडीच नेसते
पदरही पिन लावून नीटनेटका लागतो म्हणताना पोलकी रफू करावी लागतात
ती ते करते.
आता तिला देवासमोर दिवा लावायचा आहे.
तिची ठरलेली कामं ती नेमक्या वेळेला करते
त्यातूनच तिला आधार मिळत असावा बहुतेक
तिच्या हातांचा कंप वाढला आहे
तिनं निरांजन लावायचं नाही असं बजावल्यामुळे मी उदबत्ती काढून तिच्या हातात देते.
कुकर चढवताना गॅस लावला की ती उदबत्ती पेटवते
आणि देवासमोर लावते.
त्या धुरासारख तिचं अस्तित्व
वजनरहित विखरलेलं
हाडांवरुन निसटलेली चुरमुळ्या पडलेली कातडी
आणि अजूनही नेमक्या गोष्टी टिपणारे डोळे.
आठवणीच निसटतात अलीकडे
काळाचा गोंधळ होतो- दूरच्या जवळ-जवळच्या दूर-असा काहीसा.
मी कुकर लावून खुर्चीवर टेकते
डोळे तापलेले असतात
ताप आल्यासारखे.
केसाला लावलेलं रबर हल्ली सारखं गळून पडतं.
आईचा शांतपणा आपल्याकडे असणं दुरापास्त
विस्फोटत चाललेल्या जगाच्या तुकड्यांमधून हिंडायचं म्हणताना.
आई हट्टानं तेल लावून देत असते माझ्या डोक्याला
तिला वाटतं माझे केस तिच्यासारखे व्हावेत- दाट.
का असावं तिनं इतक्या दिसण्याच्या चिंतेत?
तेही तिच्या साठ वर्षांच्या मुलीच्या?
जगाचं भान कवेत घेताना माझ्या मनात रुतलेले असतात काही किंतु तिच्याबद्दलचे
माझा परीघ कौटुंबिक ठेवणारी आई
आजही तेच संदर्भ सांभाळते.
दिवसभर मी प्रयत्न करत असते तिनं वेगळ्या गोष्टींमध्ये हिंडावं म्हणून
ती फक्त चिरेबंद श्रोता असते माझा
माझ्या लढायांबद्दल तिला केवळ कीव असते आणि काहीसा रागही
हुंडा देणार नाही म्हणून मोडलेली लग्नं. मग घटस्फोट घेतला म्हणून. प्रतिष्ठित नोकरी सोडून नसत्या कामात पडली म्हणून.
पण चार भक्कम भिंतींचं घर आणि दोन घासांचं जेवण तर देते आहे ना मी तिला?
तिनं देणीघेणी-सणवार-लग्न-कुटुंब यांतून उभं केलेलं सगळं बिनसलं तेव्हा कोण आलं?
तिनं ओठ घट्ट मिटून घेतलेले असतात
डोळे मिटून घेतलेले असतात
’काल रात्री गौरी आकाशातून उतरल्या आणि घरात आल्या
कामवाल्या बाईंना सांगत होते मी पुरणपोळी करायला
मी त्यांना म्हटलं दहा माणसं जेवायला यायची आहेत भांडी घासा आणि पोळ्या करायला घ्या–’
आईला आज्ञा सोडायला फार आवडतं- आता थकली आहे.
आई अस्फुट आवाजात बोलत असते.
तिला तिचंच घर दिसत असतं आणि घरातले सण, जाती धर्माच्या भानासहित.
तिच्या घरातल्या प्रतिष्ठेचा पाया- परंपरेनं देऊ केलेला कालव्यय.
मी करावेत असं ती म्हणत नाही हल्ली. तीच करत राहाते तिच्या मनात
ते तिचं चिलखत असतं माझ्या वावरण्यापुढे.
मी पूर्वी चिडायची. त्याखेरीजच्या कितीतरी अर्थपूर्ण गोष्टी तिला निरर्थक वाटतात म्हणून.
पण ती अभेद्य तिच्या दैनंदिनीत त्यामुळे
आता केवळ कुतुहल.
मी पानं घेते
आई देवीचं स्तोस्त्र म्हणत असते ती उठून जेवायला येते
’तुझ्या लहानपणीच्या आठवणी सांग ना.’ असं कितीवेळा मी म्हटलं तिला
पण ती फक्त मोठी आई रोज वीस जणांचा स्वयंपाक करायची ते सांगते.
आणि रात्री भांडी घासून झाल्यावर रॉकेलच्या दिव्यात तिनं वाचलेल्या पुस्तकांविषयी-
नावं आठवत नाहीत पुस्तकांची, विषयही आठवत नाहीत, खोदून विचारलं तर
चिरोट्याला तांदळाच्या पिठीचं साटं लावायचं असं सांगते
पुस्तकांचं काय झालं असेल तिच्या त्या?
मी सोडून दिलं आहे.
’संध्याकाळी देवीचं स्तोस्त्र का म्हणतेस?’ मी सहज विचारते.
जेवताना तिनं परत तिच्या घरात शिरु नये म्हणून.
तिचा अस्फुट आवाज काहीसा किनरा होत उघडतो
’भीती वाटते. अंधार असतो ना. माजघरातून काही आणायचं म्हटलं तरी नको वाटतं.
माजघरातल्या फडताळात विनूमामा आहे. त्यानं धरलं तर परत?
मग देवीचं स्तोत्र मोठ्यांदा म्हणायचं म्हणजे आपल्याकडे लक्ष राहात सगळ्यांचं.’
’विनूमामा कशाला धरेल तुला?’
’विनूमामानं किशीला धरलं होतं ना मागे. फडताळात असतो बसलेला.’
ती पुढे बोलत नाही. जेवत राहाते. जेवते आहे तेही विसरते.
ती अंथरुणावर पडते तेव्हा मला जाणवतं की बंद फडताळं आहेत तिच्या मनात.
एखादं उघडलं तरी बरीच माणसं बाहेर येतात त्यातून आणि मग ती घाबरते
मग माणसांपेक्षा देव्हारे सुरक्षित वाटत असतील का?
तिच्या जगात तिला धीर देणारं कोण असेल?
मी नाही?
माझ्या विस्तारलेल्या जगात येण्यासाठी तिच्याकडे संदर्भ नाहीत.
स्वेटर, मफलर, मोजे असा कडेकोट बंदोबस्त करुन ती निजते
कोणीही तिला हात लावायचा नाही असा इशारा देत असल्यासारखी.
मी आज तिच्याजवळ जाते.
’डोक्याला मालिश करुन देऊ?”
ती निर्विकारपणे मफलर सोडते.
मी हळुवारपणे तिला मालिश करत असते
डोक्यावरुन खाली मानेवर आणि पाठीवर थोडं तेल चोळायला म्हणून तिचे कपडे काढते
सुकत चाललेल्या कबऱ्या पानांवर काळे ठिपके उमटतात तसे डाग तिच्या वाकलेल्या नितळ अंगावर
माझ्या कोरड्या रखरखीत हातांना तिचं मऊसूत झिजलेलं अंग नरमावत जातं
तिची छाती चोळून देताना सुरकुतलेल्या स्तनांवर तपकिरी स्तनाग्रं उभरतात
दोन मुलं आणि नवरा यांच्याआधी यांनी काय सोसलं असेल?
असं मनात येतं आणि मी हळुवारपणे तिच्या अंगावर कपडे चढवते.
’आज झोपते इथेच तुझ्याजवळ.’ मी म्हणते.
तिच्या जुन्या साड्यांची रजई अंगावर ओढून मी तिच्याजवळ पडते.
रात्रीतून ती हुमसताना ऐकू येते. ती तिच्या हातांनी काहीतरी दूर सारत असते.
मी तिला थोपटायला लागते, तेही हात ती तिच्या कापणाऱ्या हातांनी दूर करु पाहाते.
’आई, अगं मी आहे. जागी होतेस का?’ मी तिच्या अंगावरुन हात फिरवते.
ती जागी होते. तिच्या डोळ्यांत ओळख नसते. मग हळूहळू ती शांतावते.
थोड्यावेळानं ती माझ्या कुशीत शिरते.
’मला जवळ घे. थोपट.’ म्हणते.
मी तिला थोपटत राहाते.
तिची शिणलेली काया सैलावते.
सकाळच्या कोंबट पिवळ्या उन्हात आम्ही जाग्या होतो.
***
छायाचित्र सौजन्य : कोयल रहेजा
1 Comment