काहीच तासांपूर्वी जळून गेलेल्या चितेच्या शोधात मी तापलेल्या, जळत्या वाळूवरून चालत होतो.
आकाश आणि जमीन दोन्हींमधून ज्वाळा निघत होत्या. कुठंच काही सावली नव्हती. काटेरी झुडपांमधून, घरांच्या मधूनमधून, वाळूच्या विस्तारलेल्या रस्त्यावरून मी चालत होतो. माझ्यासोबत श्रीधरनही होता. आम्ही दोघेही दमलेलो. आकाशात ढग नव्हते आणि सूर्य जणू काही अत्याचार करायसाठीच आग ओकत होता. तहान-भूक विसरली जाईल अशा बेशुद्धावस्थेत मी जात होतो. तेवढ्यात श्रीधरन म्हणाला, “माघारी जाऊ चल”.
आम्ही दोघे क्षणभर थांबलो. आधी कोणीच काहीच बोललं नाही. खरंतर आम्हाला दोघांनाही मागं फिरायचं नव्हतं. त्याला कुठं अग्नी दिला ती जागा पाहिल्याशिवाय आम्हाला माघारी फिरायचं नव्हतं. पण चिता होती कुठं? काही तासांपूर्वीच जळून गेलेली चिता नक्की होती कुठं?
*
रात्र. आधीच मी झोपाळलो होतो. तेव्हा श्रीधरननं मला फोन केला. तो म्हणाला, “तुला कळलं नाही काय? तो गेला! आत्ताच बॉडीला कॉलनीत घेऊन जातायंत.”
मी काहीच बोललो नाही. मी फक्त हुंकार भरत त्याचं ऐकून घेतलं. मृत्यू अपेक्षित होता. त्याला कॅन्सर झालेला आणि गेले काही आठवडे तो बेशुद्धावस्थेतच होता. तरीसुद्धा, आता तो जग सोडून गेलाय, काहीच क्षणांपूर्वी, हे ऐकल्यावर…
तो माझा तसा कोणीच नव्हता. माझा त्याचा फारसा परिचयही नव्हता. मी त्याच्याशी एकदाही बोललो नव्हतो. पण निव्वळ एवढ्या एका कारणावरून, त्याचा माझा काहीच संबंध नव्हता, असं म्हणणं योग्य राहील काय?
मी रात्रभर जागाच राहातो. त्याच्याबद्दलच्या नि माझ्याबद्दलच्याही अनेक गोष्टींचा विचार करत राहातो… त्याची चित्रं, प्रकाश व रंगांचं अज्ञात जग, जगात अडखळत पावलं टाकत आलेल्या बाळाचे भ्रमनिरास, गर्दीतही त्यानं अनुभवलेला तीव्र एकाकीपणा, त्याची दुःखं, त्याचं मौन, त्यानं त्या मौनातून साकारलेलं संगीत, त्यानं रंगांऐवजी केलेला शब्दांचा वापर, त्याचं शब्दांनी चित्रं रंगावणं… यांचे विचार. आणि माझ्याबद्दलचेही विचार, माझं…
हळू हळू मी झोपेच्या अधीन होतो.
सकाळी श्रीधरननं पुन्हा फोन केला. तो म्हणाला, “महाबलीपुरमला या रस्त्यानं फक्त एकच बस जाणार आहे. अकरा वाजता. पण आज मट्टू पोंगल आहे . आपल्याला आत घुसता येईल की नाई…”
“जाऊ या आपण”, मी म्हटलं.
*
बसमधे आत गेल्यावर श्वासही घेणं अवघड होईल, अशी अवस्था. पोराबाळांचा गोंगाट, बायकांचा कलकलाट, पुरुषांचा गडगडाट. शेवंतीच्या कोमेजलेल्या फुलांचा व घामाचा असह्य वास. पण यातल्या कुठल्याच गोष्टीकडं लक्ष न देता आम्ही बोलत राहिलो.
श्रीधरन म्हणाला, “तू त्याला ओळखत नव्हतास हे जरा आश्चर्याचंच आहे. तुझं शिक्षण इकडंच झालं ना. शिवाय तो तेव्हापासूनच चित्रकार म्हणून अतिशय प्रसिद्ध होता…”.
मी म्हटलं, “का कुणास ठाऊक. मी त्याच्याशी ओळख करून घेऊ शकलो नाही. मी त्याला दुरून पाहिलंय. त्याच्याशी ओळख करून घ्यायला हवी, असं मला नेहमी वाटायचं. त्याच्या चित्रांबद्दल तो बोलत असताना मी ऐकावं… त्याच्या लुकलुकत्या डोळ्यांकडं पाहात, त्याच्या शेजारी बसून, कला व साहित्याबद्दल त्याचं बोलणं ऐकावं… असं वाटायचं.. पण तसं कधी घडून आलं नाही. माझा स्वतःचा आळसही याला कारणीभूत ठरला असेल, किंवा माझा भिडस्तपणा… त्याची चित्रं पाहण्यात मी समाधान मानत आलो. ती चित्रं वारंवार पाहताना एक प्रकारचं अमर्याद अध्यात्मिक समाधान मिळायचं, त्यानं निर्माण केलेल्या रंगांच्या जगात मी स्वतःला विसरून पूर्णपणे हरवून जायचो…”
श्रीधरन म्हणाला, “काय माणूस होता! माझी त्याची जुनी ओळख होती. आमची खूप जवळीक होती असं काही मी म्हणणार नाही. पण मी त्याला ओळखायचो. मी आत्तापर्यंत पाहिलेला तो सर्वांत मोठा माणूस होता. लोक त्याच्याबद्दल खूप बोलायचे. चांगली सरकारी नोकरी त्यानं तसं वय बऱ्यापैकी वाढल्यावर सोडून दिली आणि पेंटिंग शिकायला गेला. त्याच्या नातलगांनी यावर खूप शेरेबाजी केली! पण यातलं काहीच मनावर न घेता त्यानं स्वतःला चित्रांमध्ये गुंतवून घेतलं… नाही, मी चित्रांबद्दल जास्त काही बोलू शकणार नाही. ती महान आहेत, असं सगळं जग म्हणतं. ते खरंही असेल. पण मी त्याच्याबद्दल एकच गोष्ट सांगू शकतो. तो महान माणूस होता!
“काही काळ तर तो त्याची चित्रं कोणालाच विकायचा नाही. अमेरिकी, जर्मन, इंग्लिश, कोण कोण लोक वाट्टेल त्या किंमतीला त्याची चित्रं घ्यायला इथं यायचे. पण तो नाहीच म्हणायचा. ‘ही चित्रं विकण्यासाठी रंगवलेली नाहीत. त्या माझ्या जीवाला झालेल्या जखमा आहेत- जीवाला फुटलेल्या कळ्या आहेत, जीवाचे तुकडे आहेत… ते माझ्यासोबतच राहू दे’. नंतर तो असंच स्वगत केल्यासारखं म्हणायचा, ‘त्यांना काहीच कळत नाही. त्यांना माझ्या चित्राबद्दल काहीच माहिती नाही. खरंतर त्यांना कोणाच्याच चित्रातलं काही कळत नाही. पण त्यांच्याकडं पैसा आहे. त्यामुळं ते…’ मग बराच वेळ शांत बसून तो म्हणायचा, ‘कोणीतरी ही चित्रं एखाद्या ठिकाणी साठवून ठेवली तर, एखाद्या चांगल्या जागी, कायमस्वरूपी ठेवली तर! शक्यतो माझ्याच जागी ठेवली तर! त्याहून जास्त काही मला नको… मी पैशासाठी काहीच केलेलं नाही… तर, ही चित्रं एखाद्या चांगल्या इमारतीत, सगळ्या सुविधा असतील अशा ठिकाणी, सगळ्या लोकांना हव्या त्या वेळी येऊन पाहता येतील अशी ठेवता आली तर…’
“एकदा आम्ही बोलत होतो, तर अचानक तो म्हणाला: ‘श्रीधरन, तुला माझी चित्रं आवडतात का? तुला ती कळतात का?’ मी जरा दचकलोच. पहिल्यांदाच त्यानं मला असा काही प्रश्न विचारला होता. मी नुसतंच त्याच्याकडं पाहात राहिलो. तो म्हणाला: ‘खरं खरं सांग’.
“मी दबकत म्हटलं: ‘कला नि चित्रांमधलं मला काहीच कळत नाही. पण मला तू कळतोस. तेवढं पुरेसं आहे’.
“त्यानं अचानक मला मिठी मारली आणि काहीतरी म्हणाला. त्याचा आवाज गहिवरत होता. त्याचे डोळे भरून आले होते. तो काय म्हणाला ते मला कळलं नाही. मीही थोडा अस्वस्थ झालो…
“ही खूपच जुनी गोष्ट आहे. त्यानंतर, मी इथून बाहेर राहायला गेलो ते तुला माहितीच आहे. इथं यायचो तेव्हा मी त्याला भेटायचोच. पण असे प्रसंग अगदी मोजकेच होते. ही कॉलनी बांधत होते तेव्हा मी त्याला एकदा का दोनदा भेटलो होतो. तेव्हा तो किती उत्साहात होता! हे त्याचं आयुष्यभराचं स्वप्न होतं: कोणीही त्रास देणार नाही आणि मोकळेपणानं कलाकारांना काम करता येईल व राहाता येईल अशी ही जागा. इथं फक्त घरं आणि आर्ट-गॅलऱ्या. कलाकारांची कॉलनी, इथं सगळे प्रेमानं आणि विश्वासानं एखाद्या कुटुंबासारखे राहू शकतील…”
त्यानंतर काही क्षण शांततेत गेले. मग श्रीधरन म्हणाला, “पण मी त्याला शेवटचं भेटलो तेव्हा तो आधीसारखा उरला नव्हता. तो जास्त बोलला नाही, विचारात गढल्यासारखा होता. बोलता न येणाऱ्या कुठल्यातरी गोष्टीनं तो आतून त्रस्त असावा. तो पराभूत झाल्यासारखा दिसत होता. मारहाण करून माघार घ्यायला लागलेल्या सैनिकासारखा… हे काही कुठल्या अज्ञात आजारामुळंही झालेलं नव्हतं. पैसा किंवा प्रसिद्धी यांचाही काही संबंध नव्हता, कारण या दोन्ही गोष्टी त्याच्याकडं मुबलक होत्या. कामाचं बळ गमावल्याची काही भीतीही या मागं नव्हती. तो वेगानं चित्रं काढत होता आणि सगळं जग त्याच्या चित्रांचं स्वागत करत होतं.
“पण तरीही तो अस्वस्थ होता. त्याच्या मनात कुठंतरी काहीतरी त्याला सारखं सतावत होतं. पण त्यानं त्यासंबंधी कधीच काही उल्लेख केला नाही.”
त्यानंतर काहीतरी विचार करत असल्याप्रमाणे श्रीधरन म्हणाला, “त्याच्यातल्या बदलामागचं कारण काय असावं याचा मी केवळ अंदाजच बांधू शकत होतो”.
मी त्यावर काहीच बोललो नाही.
कॉलनी आता जवळ दिसू लागली होती. धूळभरल्या रस्त्यांच्या बाजूला झोपड्या, लहान-मोठ्या, इमारती, छपरं… खुल्या मैदानातल्या निसर्गाचा भाग बनलेल्या राखाडी प्रतिमा. अगदी दूरवर, झोपड्या नि वाळूच्या टापूतून लांब पलीकडं सुरूच्या झाडांचं घनदाट बन दिसत होतं.
मी तिथं एखाद्या प्रवाशासारखा उभा होतो. उंच पठारावरून व खडकाळ जमिनीवरून खाली आपल्या प्रवासाच्या अंतिम ठिकाणी- उत्फुल्ल फुलांच्या नि फळांच्या दरीत आलेल्या प्रवाशासारखा मी. मनात आनंदाचे हादरे बसत असताना मला आठवलं: ‘हीच ती जागा! मला बराच काळ हीच जागा पाहायची आस लागून राहिली होती. कलाकारांनी परस्परांविषयी प्रेम आणि विश्वास बाळगत एकत्र राहावं- काम करावं यासाठी त्यानं निर्माण केलेली हीच ती जागा. त्याच्यासाठी हे आयुष्यभर जवळ बाळगलेलं स्वप्न प्रत्यक्षात येण्यासारखं होतं…’
केस वाढवलेले, दाढी राखलेले, गुरू शर्ट व पायजमा घातलेले काही तरूण गेटजवळ उभे होते. ते काहीतरी बोलत व जोरजोरानं हसत होते. श्रीधरन म्हणाला, “आपण गॅलरीत जाऊ या. त्याची अलीकडची चित्रं तिथं आहेत.”
बाहेरच्या तळपत्या सूर्यापासून सुटका करून घेत आम्ही गॅलरीत गेलो, तेव्हा एका नवीन जगात आल्यासारखंच वाटलं. प्रवेशदारापाशीच त्याचा एक मोठा कॅन्व्हास होता: हजारो वर्षांपूर्वीच्या आदिम लोकांची गर्दी, त्यात एका माणसानं धरलेल्या मशालीच्या प्रकाशात दुसरा एक माणूस धावणाऱ्या रानगव्याचं चित्र काढतोय.
मशालीतून निघणारा शेवटचा प्रकाशकिरण सगळीकडं पसरल्यासारखा वाटत होता, सगळी गॅलरी त्या किरणानं प्रकाशमान झाल्यासारखी वाटत होती. चित्राकडं एकटक पाहात मी थांबलो होतो तेव्हा ते चित्र हलतंय असं मला वाटलं- त्यातले लोक आश्चर्यानं काहीतरी बोलत होते, हसत होते.
गोंधळलेल्या पण मजाही वाटणाऱ्या लहान बाळाप्रमाणे मी रंग, छटा व प्रकाशानं उजळलेल्या जगात एकटा उभा होतो.
मनानं मी भूतकाळात गेलो. त्याच्याबद्दलच्या आठवणी माझ्या मनातून पुसता येणार नव्हत्या. त्याची सुरुवातीची चित्रं मला आठवली. सकाळी आंघोळीनंतर कपाळावर चंदनाचा टिळा लावून, ताडाच्या पानांच्या छत्र्या हातात धरून मंदिराकडं चाललेल्या मल्याळी कुमारिका. नारळाच्या उतरत्या झाडाच्या खाली पाण्यात नाव बांधणारा पोण्णनीमधला दमलेला नाविक, एकमेकांशी गप्पा मारणाऱ्या आया व त्यांच्या कडेवरची मुलं.
पिवळा व निळा व लाल, विविध रंगांनी त्यानं निर्माण केलेलं ते अलौकिक विश्व… गॅलरीत इतरही लोक होते. रंगराजन, अली अहमद, शिवसुब्रमण्यम. आपल्या कॅनव्हासकडं बोट दाखवत शिवसुब्रमण्यम एका उंच परदेशी व्यक्तीशी बोलत होते. त्यांचा आवाज सपाट होता, पण ठाम होता. रंगराजन यांच्यासोबत त्यांची तरुण पत्नी होती.
स्वतःच्या एका चित्रापुढं उभं राहून अली अहमद एका पाहुण्याला काहीतरी सांगत होते. त्या श्रीमंत पाहुण्याकडं पैसा ही एकमेव संपत्ती होती, हे उघडच कळत होतं. घमेंड आणि उन्मत्तपणा त्याच्या चेहऱ्यावरच दिसत होता. तरुण लोकांप्रमाणे त्यानं त्याचे केस लांब वाढवले होते आणि त्याच्या वयाला न शोभणारे भडक कपडे घातले होते. कलेच्या क्षेत्रात युरोपात घडत असलेल्या बदलांबद्दल अली अहमद त्याच्याशी बोलत होते. शुद्ध इंग्रजीत अली अहमद सांगत होते, “रेखाटन आणि चित्र यांच्यातल्या भेदाविषयी पेगल एकदा म्हणाला होता…”
श्रीमंत पाहुणा आत्तापर्यंत कोणताही रस न घेता हे ऐकत होता, तो एकदम मोठ्यानं म्हणाला, “नॉनसेन्स: पेगल? कोण पेगल?” आणि नंतर स्वतःलाच ऐकू येईल अशा आवाजात कायतरी पुटपुटत राहिला.
या अनपेक्षित वर्तनानं अली अहमदही चकीत झाले आणि त्यांचा चेहरा मलूल झाला. त्यानंतर माफी मागितल्याच्या सुरात ते म्हणाले, “मी काय म्हणत होतो…” पण श्रीमंत पाहुण्यानं अली अहमद यांना वाक्यही पूर्ण करू दिलं नाही. अधीरपणे तो ओरडला, “नाही. नाही. नाही…”
काहीतरी मूल्यवान गोष्ट मागं विसरून आल्यासारखा तो बाहेर निघून गेला.
त्याच वेळी रंगराजनही गॅलरीच्या बाहेर पडले. त्यांच्या हातात त्यांचा कॅनव्हास होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व परदेशी पाहुणाही होता. रंगराजन यांच्या सगळ्या बोलण्यावर त्या पाहुण्यानं हसत सहमतीची मान डोलावली. फक्त मुंबई किंवा कलकत्त्यातील व्यावसायिक अधिकाऱ्यांमध्ये यशाच्या पायऱ्या चढताना दिसणारा आत्मविश्वास रंगराजन यांच्या चेहऱ्यावरूनही ओसंडत होता. शेजारून जाताना ते माझ्याकडं पाहून हसले, पण थांबले नाहीत. त्यांची पत्नी अनिच्छेनं क्षणभर थांबली. मी त्यांना विचारलं, “ओळखलंत का?” हास्याची मोठी लकेर चेहऱ्यावर आणत त्या म्हणाल्या, “अरे हां, गुलाब देणारे! किती सुंदर गुलाब होते ओ!” त्यानंतर आपल्या पतीला गाठण्यासाठी त्या लगबगीनं निघून गेल्या.
आता आमच्यासोबत फक्त अली अहमद व शिवसुब्रमण्यम असे दोघेच उरले. शिवसुब्रमण्यम यांच्या हातात ब्रॉन्झची एक प्रतिमा होती. ती हातात ठामपणे पकडून ठेवून ते दुसरीकडं कुठंतरी पाहात होते, हसत होते. हसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे देवीचे व्रण स्पष्ट दिसत होते. श्रीमंत परदेशी पाहुण्यानं त्यांची ब्रॉन्झची प्रतिमा विकत घेण्यासाठी यावं, असं स्वप्न ते पाहात असावेत, असं मला वाटलं.मला एकदम गळून गेल्यासारखं नि उबग आल्यासारखं वाटलं.
अली अहमद अजूनही तिथं होते. मी आधी पाहिलं तिथंच ते होते. त्यांच्या चित्रापुढं उभे होते. तो विक्षिप्त पाहुणा आता दूर गेला होता. अली अहमद यांना मी विचारलं, “ओळखलंत का?”
स्वप्नातून खडबडून उठल्याप्रमाणे ते एकदम म्हणाले, “काय बोललात तुम्ही? मी तुम्हाला ओळखतो का? हो, हो, अर्थातच.”
अचानक ते शांत झाले. कोड्यात पडल्यासारखे दिसत होते. मी तिटकाऱ्यानं मनात म्हटलं, ‘नाही. यांच्या काही मी लक्षात नाहीये. सभ्य वागायचा प्रयत्न करतायंत फक्त. अजून ते त्या लांब केस असलेल्या नि तरुणांसारखे भडक कपडे घातलेल्या श्रीमंत पाहुण्याच्याच विचारात आहेत’.
अचानक मनात हादरा बसल्यासारखं मला आठवलं: ‘तो मेलाय ना? पण तो मेल्याची कोणतीच खूण इथं दिसत नाहीये.’
या आठवणीनं मला हृदय पिळवटल्यासारखी ठणक बसली.
श्रीधरन म्हणाला, “इथून पुढं… या जागेचा कारभार…. कोण…?” तो अली अहमद यांच्याशी बोलत होता. मनाच्या खोल कपारीतून लाल डोळ्यांनी ते बाहेर आले. म्हणाले, “मी कोणंय ते तुम्हाला माहितेय. त्यानं मला इथं का निमंत्रित केलं, हैदराबादेहून का बोलावून घेतलं, हेही तुम्हाला माहितेय. पण काही लोक जणू काही माहीतच नसल्यासारखं दाखवतायंत… तो महान कलाकार होता, या पिढीतला सर्वांत महान कलाकार होता. सुरुवातीपासूनच तो मला समजून घेत होता… पण आता मला वाटतं…”
अली अहमद यांचे शब्द ऐकत उभं असताना मला आणखीच गळून गेल्यासारखं व तहानलेलं वाटायला लागलं. भांडंभर पाणी मिळालं तर बरं, असं वाटत होतं. फक्त भांडंभर पाणी! पण, मी तसं पाणी का मागितलं नाही, ते कळत नाही. मला तसं काही विचारताच येत नव्हतं. मी श्रीधरनला म्हटलं, “चल निघू”.
दाराजवळ शिवसुब्रमण्यम उभे होते. ते अजूनही हसत होते. मी त्यांना विचारलं, “त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठं केले?” क्षणभर त्यांचं ते मूर्खासारखं हसू चेहऱ्यावरून मावळलं. त्यांनी बाहेर काही अंतरावरच्या एका जागेकडं बोट दाखवलं. तेव्हाही ते बोलले काहीच नाहीत. हात लांब करून बोट दाखवून ते पुतळ्यासारखे उभे राहिले.
जळत्या वाळूवरून आम्ही चालत होतो. त्याच्या प्रेताला कुठं अग्नी दिला ती जागा आम्हाला माहीत नव्हती. आम्ही निःशब्दपणे चालत होतो. थोड्या वेळानं श्रीधरननं विचारलं, “या लोकांना तू ओळखतोस ना?”
थोडा वेळ मी काहीच बोललो नाही. नंतर हळू आवाजात, स्वतःशीच बोलल्यासारखं मी म्हणालो, “ते कोचीनमध्ये दोनदा माझे पाहुणे म्हणून आलेले आहेत.”
श्रीधरननं काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण लगेचच त्यानं स्वतःला थांबवलं.
मी हसलो. पण माझ्या हसण्यात कारुण्य होतं.
नवीनच बांधलेल्या एका घराच्या समोरून आम्ही जात असताना श्रीधरन म्हणाला, “हे रंगराजनचं घर आहे.”
माझ्या डोक्यात खूप गोष्टींचा विचार सुरू होता, त्यामुळं घराकडं माझं लक्ष गेलं नाही. श्रीधरनच्या शब्दांनी माझ्या आठवणींच्या प्रवाहात अडथळा आला. मी त्याला विचारलं, “हे रंगराजनचं घर आहे?” आता मी घराकडं पाहिलं. आपल्या शहरांमधल्या संपन्न परिसरांमध्येच अशा प्रकारची घरं दिसतात. पण घरानं माझं लक्ष वेधून घेतलं नाही. घराच्या चारही बाजूंना उंच भिंती होत्या, त्याकडं माझं लक्ष गेलं. नाही, खरंतर भिंतीकडंही नाही, भिंतींच्या वरच्या बाजूनं रोवलेल्या टोकदार काचेच्या तुकड्यांकडं माझं लक्ष गेलं. क्रूर तिरस्कारानं ते काचेचे तुकडे माझ्या हृदयात घुसले. मी संभ्रमावस्थेत असताना, सर्व शक्तिनिशी ते तुकडे माझ्या कमकुवत हृदयात घुसले. काचेच्या तुकड्यांनी झालेल्या जखमांमधून रक्त घळाघळा बाहेर आलं, माझ्या जीवातून खोलवर अश्रू वाहू लागले, डोक्यापासून पायापर्यंत मी थरथरायला लागलो, तेव्हा श्रीधरनचे शब्द माझ्या कानावर पडले, “बरं वाटत नाहीये का?”
मी हळू आवाजात म्हटलं, “नाही काही.”
माझ्या कपाळावर त्याचा तळवा टेकवत तो म्हणाला, “तुला ताप भरलाय.”
मी काहीच बोललो नाही. श्रीधरनच पुन्हा म्हणाला, “आपण परतूया.”
मी मान नकारार्थी हलवली.
समुद्राची गाज कानावर पडत होती.
मी म्हटलं, “श्रीधरन, तुला समुद्राची गाज ऐकू येत नाहीये का? इथूनही तुला समुद्र दिसत नाहीये! तुझ्यात आणि समुद्रात ते सुरूचं बन तेवढं आहे. पण तेवढ्यामुळं समुद्र आपल्याला सोडत नाही. समुद्र तुझ्या जवळच आहे. तुला तो दिसत नसला तरी तो आहे हे तुला माहितेय. माहितेय ना?” श्रीधरननं विचारलं, “तू वेदान्त तत्त्वज्ञानाचं बोलतोयंस काय?”
“मला वेदान्तात रस नाहीये”, मी उत्तर दिलं.
अचानक मी परत म्हणालो, “श्रीधरन, मला वाटतं या सुरूच्या झाडांपलीकडं, किनाऱ्यावर त्याला अग्नी दिला असावा. चल…”
सुरूच्या झाडांमधून वाट काढत आम्ही बाहेर आलो तेव्हा माझा अंदाज खरा ठरला. आम्हाला दिसलं!
काहीच नाही. समुद्रकिनारी वाळूत एक लहानशी चर खणलेली होती. फुटक्या मडक्याचे तुकडे. अजून पूर्ण जळून खाक न झालेल्या चितेवर वाळूचे कण उडत होते…
समुद्र जोरानं आवाज करत होता.
ती राख आणि फुटक्या मडक्याचे तुकडे यांच्यासमोर समुद्राची गाज नि वाऱ्याचा विलाप ऐकत मी बराच वेळ उभा राहिलो, तेव्हा मला अवर्णनीय समाधान जाणवायला लागलं. मी मनात म्हटलं, “मला हवं होतं ते हेच असावं.” आम्ही माघारी आलो.
परतीच्या वाटेवर आम्ही काहीच बोललो नाही.
छायाचित्र सौजन्य: आर्टट्रेण्ड्स, अ कंटेम्पररी आर्ट बुलेटीन, खंड ११, अंक ३-४, खंड १२, अंक १, जुलै १९७६-७७
‘आत्मविन्ते मुरवुकल’ ही मूळ कथा १९७७ साली ‘भाषापोषिणि’च्या अंकात प्रसिद्ध झाली. के.पी.के. मेनन यांनी केलेला इंग्रजी अनुवाद १९८०साली ‘इंडियन लिटरेचर’ मध्ये प्रसिद्ध झाला. एशिया आर्ट अर्काइव्हने प्रकाशित केलेल्या ‘फिक्शनल कॉनफीग्रेशन: डॉसियर १ -रायटिंग आर्ट’ या प्रकाशनात इंग्रजी भाषांतराचा समावेश केला आहे. विविध भाषातील कला विषयक लिखाणाच्या संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून एशिया आर्ट अर्काइव्ह करिता अवधूत डोंगरे यांनी मेनन यांच्या इंग्रजी भाषांतरावरून हे मराठी भाषांतर केले आहे.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram