गाणारं वाळवंट
कोण जाणे कधीपासून तो या वाळवंटातून फिरतोय.
“ती बघ, ती बघ” म्हणून उठलेल्या वावटळीचं
वादळात रूपांतर होताना बघतोय,
त्यात सापडतोय,
भरकटतोय,
मूळ जागेपासून कैक दूर फेकला जातोय.
मैलोनमैल पसरलेल्या एकाच पटलावर
कोण जाणे तो कधीपासून फिरतोय.
निपचित पडलेली, तापलेली वाळू नेहमीप्रमाणे
एक-एक नखरे दाखवायला सुरुवात करते.
तापून-तापून तिला आलेली चमक
त्याला भलती-सलती स्वप्नं दाखवतीए,
भुलवतीए,
घुमवतीए..
व्याकुळ होऊन तो नजर फिरवतोय;
क्षितिजासाठी? पाण्यासाठी? मरूद्यानासाठी?
अथांग पसरलेल्या वाळवंटातल्या गुलाबासाठी?
की आणखी कशासाठी?
‘मनाशी काय बोलायचं इथे आहेच कोण ऐकायला’
म्हणून त्याच्या तोंडून बाहेर पडतायत शब्द;
त्यांचे उमटणारे नाद,
ओबडधोबड,
मुठीतल्या वाळूसारखे विरून जाणारे,
थंडगार अन् तापलेल्या वाळवंटातले,
त्याची आजन्म मदार असलेल्या उंटाच्या
अंगभूत चालीच्या तालाबरोबर एकरूप झालेले.
सगळा सफरनामा नादमय होत चाललाय..
अन् बाहेर लोक नवल करताहेत ‘वाळवंटाचं गाणं कसं झालंय’?!
***
तू
तुझ्या अंगभूत झळाळीनं
सत्य-असत्यातलं द्वंद्वही
विरून जातं..
तुझ्यासारखंच.
***
तो
समोरच्याला आरपार भेदणाऱ्या
त्याच्या तेज नजरेला असलेली
चिरंतन दुःखाची किनार
अचानक कातर करून जाते
अपार करुणा भरलेले ते अविचल डोळे
आपल्या हृदयाचा ठाव घेऊन
आपण दिसत असूनही बघायचं टाळत असलेली
सृष्टी बघण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतात,
कुठलं शाश्वत सत्य सांगत असतात?
आपल्याला दुभंगवत असतात..
अर्थात दुभंगणारे आपण स्वतःच!
तो मात्र सहजपणे तिकडे बोट दाखवून
स्वतः केव्हाच फिरता झालेला असतो..
***
प्रतिबिंब
अवकाशाच्या अनंतात स्वतःचं प्रतिबिंब बघत असताना,
अचानक
आपला दर क्षणी होणारा मृत्यू झर्रकन समोर तरळून गेला,
आणि,
स्वतःतल्या अंगभूत अर्भकत्वाची जाण मुळापासून उमलून आली.
गर्भकाळ्या पोकळीतून हरक्षणी जन्मलेल्या शक्यतांनी धारण केलेल्या आदीम रानकस्तुरीनं मग सगळं भवताल घमघमवून टाकलं..
***
प्रिय आबा,
कोवळ्या उन्हाच्या उबेसारखी
आश्वस्त करणारी तुझी माया
गुरफटून घेऊन स्वतःतच रमायला लावणारी
नितळ,
निखळ,
मऊसूत,
पारदर्शी.
मिटल्या डोळ्यातून पाझरत राहणारी..
उत्तम! तुमच्या कविता प्रकाशित झालेल्या बघून फार आनंद झाला. अजून लिखाण या स्वरूपात वाचायला नक्की आवडेल 🙂
नक्कीच!
धन्यवाद. 😊
अद्भुत
धन्यवाद. 🙏
Excellent poems 👌👌
Thank you 😊