सुरक्षा रक्षकाच्या मुलाखतीसाठी एकच हात असलेला हा झेरुझेरु – एक अल्बिनो का आलाय? मला त्यांचा अविश्वास जाणवत होता, पण त्यांच्या नजरांमुळे मी स्वतःला विचलित होऊ दिले नाही. या नोकरीसाठी मी खूप लांबून आलो होतो. मला तिची गरज होती.
माझ्याकडे असलेला सगळ्यात चांगला पोशाख मी घातला होता – लष्करी हिरव्या रंगाच्या विजारीमध्ये खोचलेला गडद निळ्या रंगाचा सदरा. मी माझी टोपी ठीकठाक केली आणि रांगेत उभा राहिलो.
“योना काझादी,” अभ्यागत कक्षातून नाव पुकारले गेले.
माझे हृदय धडधडत होतं पण मी आत्मविश्वासाने, ताठ मानेने मुलाखतीच्या खोलीत गेलो. एका मोठ्या लाकडी मेजाच्या पलीकडे एक महिला आणि तिच्या आजूबाजूला दोन पुरुष बसले होते. त्यांच्यासमोर कागदांचा ढीग होता. मी त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी माझा हात बाहेर काढला. त्या महिलेने मला बसायला सांगितले. मी माझा उन्हाळी चष्मा आणि टोपी काढून ठेवली आणि त्यांच्यासमोरच्या लाकडी खुर्चीवर बसलो. छतावरच्या पंख्याची पाती खोलीतल्या उष्ण हवेला घासल्याच्या आवाज सोडला तर खोलीत शांतता होती.
पिवळा हिजाब आणि मोठ्या बाह्यांचा गडद निळ्या रंगाचा कुर्ता घातलेल्या त्या महिलेने तिची ओळख मरिअम – मानवी संसाधन व्यवस्थापक अशी सांगितली. ते दोन पुरुष म्हणजे पर्यवेक्षक होते. ते ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होते त्यावरून मला लगेच जाणवलं की, त्यांना फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे – एक हात नसलेल्या या माणसाला सुरक्षा रक्षक व्हावं असे का वाटतं?
“आम्हाला तुमच्याविषयी सांगा,” ती महिला म्हणाली.
आणि म्हणून मग, मी त्यांच्यासमोर बसून सांगू लागलो.
“ती काळीकुट्ट मध्यरात्र होती”, मी म्हणालो. वरच्या लाकडी फळीवर धावणाऱ्या उंदरांचा आवाज ऐकत मी माझ्या पातळ गादीवर जागाच पहुडलो होतो. मी झोपण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण बाबा जोसेफ यांनी ते संकुल मी सोडून जाण्याची वेळ आली आहे, असे मला सांगितल्यापासून माझी झोपच उडाली होती. ते म्हणाले की मी आता जवळजवळ अठराचा झालो होतो – कायद्याच्या दृष्टीने एक प्रौढ, आणि रस्त्यावर आयुष्य काढण्याइतका मोठा. पण मी तयार नव्हतो; मला कळतच नव्हतं की जिथे माझ्यासारख्या लोकांविषयी तिरस्कारच भरलेला आहे,अशा सेरेमासारख्या शहरात मी माझी गुजराण कशी करणार?
समोरच्या फाटकाच्या गंजलेल्या बिजागरींच्या करकरण्याचा हलकासा आवाज माझ्या विचारांत शिरला. कदाचित तो माझ्या मनाचा खेळ असेल. ज्याचं आयुष्यच झपाटलेलं असतं त्यांनी माझ्यासारखं विक्षिप्त असण्यात काहीच विशेष नव्हतं. पण तेवढ्यात माझ्या खिडकीच्या बाहेर मला पावलांची चाहूल लागली. मी माझा श्वास रोखून धरला आणि तसाच स्तब्ध पडून राहिलो. घामाच्या धारा कपाळावर ओघळू लागल्या, आणि एका मनोरुग्णातील खोल्यांमध्ये ३० मुलांच्या झोपेतच हत्याकांडाची – आणि मी, योना काझादी, त्यांचे संरक्षण करू शकलो नाही, अशी चित्रे माझ्या मनात तरळू लागली.
मी प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला पण ‘देव’ माझ्यासाठी नेहमीच एक भ्रम होता – जरी माझी आजी आणि बाबा जोसेफ – माझे पालक वारंवार सांगत असले की तो खरोखर आहे, तरीही.
अगदी नवजात बाळ असल्यापासूनच मी एक ‘भूताचं मूल’ म्हणून हिणवलो गेलो होतो. लोक म्हणायचे, माझी आई सैतानासोबत झोपली होती त्यामुळेच माझी त्वचा आणि डोळे पांढरेफटक, निस्तेज आहेत आणि माझे केस मक्याच्या रंगाचे. लोक येताजाता माझ्याकडे बोट दाखवून मला ‘झेरुझेरु’ म्हणायचे. जेव्हा जेव्हा ते माझ्याजवळ असायचे तेव्हा तेव्हा माझ्यातील सैतानापासून त्यांचा बचाव करण्यासाठी ते चापट्या मारून घ्यायचे. माझ्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांची आणि डुगडुगणाऱ्या डोक्याची त्यांना भीती वाटायची.
पण त्या रात्री मी माझ्या आजीने दिलेली जपमाळ घट्ट पकडून बसलो आणि म्हणालो, “देवा, जर तू असशील, जर तू माझे ऐकत असशील तर आमचे रक्षण कर.”
आपल्या कमकुवतपणाचा स्वीकार करणे मला पराभवासारखे वाटत होतं – पण तरीही माणसातील सैतानापेक्षा बाहेर कुणीतरी अधिक शक्तिशाली असेल यावर विश्वास ठेवावा, असे मला वाटत होतं. कुठे होता देव जेव्हा आम्हाला क्रूर पद्धतीने अपमानित केले गेले आणि मारले गेले? त्याची ती शक्ती कुठे होती जेव्हा धारदार हत्यारांनी आमचे हातपाय तोडले गेले? आणि जेव्हा त्याने आम्हाला निर्माण केले तेव्हा काय त्याच्याकडचे मेलॅनिन संपलं होतं?
अल्बिनोंना ‘मायावी’ असं संबोधून त्यांचे अपहरण आणि हत्या सुरु झाल्या. अल्बिनोंच्या हाडांपासून बनवलेल्या औषधामुळे श्रीमंती आणि समृद्धी प्राप्त होईल, असे मांत्रिक वैदूंनी लोकांना सांगितले आणि अल्बिनो जेवढा कोवळा तेवढा औषधाचा प्रभाव अधिक!
या अफवा पसरायला सुरवात झाली तेव्हा मी माझ्या आजीसोबत – बिबी घासियासोबत सिवंदा नावाच्या गावात राहात होतो. काही झाडे आणि गवताने शाकारलेले छत असणाऱ्या लाल मातीच्या झोपड्यांचे मैदानी प्रदेशातील एक गाव म्हणजे सिवंदा. इथली लाल मैदाने सर्वत्र ढगांच्या छायेत गुरफटलेली होती.
आम्ही एका टेकडीवर राहत होतो, कोंबड्यांची पिल्ले पाळली होती, कसावाचे झाड लावलं होतं आणि आमच्या घरासमोरील जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यावर बाजरी पिकवत होतो. खालच्या बाजूच्या उजाड दरीमध्ये वापरात नसलेल्या सोन्याच्या जुन्या खाणी विखुरल्या होत्या. दूरवर व्हिक्टोरिया गोल्ड या खाणीचे अल्युमिनियमचे चकाकणारे छप्पर दिसायचं. लोकांना तिथे जाण्यास परवानगी नव्हती, पण कधीकधी लोक सोने चोरण्यासाठी आत घुसत असत.
अल्बिनोंच्या अपहरणाच्या बातम्यांना जोर आला तेव्हा मी नुकताच प्राथमिक शाळेत जाऊ लागलो होतो. पंतप्रधानांनी हे हत्याकांड थांबवण्यासाठी खूप विनंत्या, आवाहने केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
माझी शाळा आमच्या घरापासून ५ किलोमीटर अंतरावर दरीच्या पलीकडे ख्रिस्ती मिशनरी आणि चर्चच्या जवळ होती. सूर्यकिरणांपासून मला वाचवण्यासाठी माझ्या तोंडाभोवती एक कापड गुंडाळून माझी आजी रोज सकाळी मला घेऊन शाळेत जायची. ती वयोवृद्ध पण धीराची होती आणि संरक्षणासाठी तिच्या कमरेभोवती एक धारदार चाकू बांधल्याखेरीज कधीच बाहेर पडायची नाही. तिने तिच्या गळ्यात एक जपमाळ घातली होती. मला नेहमीच तिच्यासोबत असताना खूप सुरक्षित वाटायचं. लोक तिला घाबरायचे, तिला चेटकीण म्हणायचे. पण बिबीने मला त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सांगितलं. एके दिवशी ते स्वतःच त्यांच्या दुर्लक्ष करण्याला कंटाळतील.
या सुमाराला अल्बिनोंविषयीच्या त्या अंधश्रद्धा सिवंदाला पोहोचायला सुरवात झाली. गरीब खाणकामगार आमची हाडं शोधू लागले.
एके दिवशी सकाळी मी आणि माझी आजी शाळेला जात असताना एका कुंपणातून हत्यार उगारलेले दोन खाणकामगार आमच्या पुढ्यात येऊन उभे ठाकले. जेव्हा त्यांनी मला पकडलं तेव्हा आजीने मारलेली किंकाळी अजूनही माझ्या कानात घुमते. तिच्या चाकूने तिने केलेला प्रतिकार आणि त्यांच्या हातातून मला ओढून घेण्याचा केलेला प्रयत्न मला आठवतो. माझ्या मासांतून आरपार होत त्यांच्या चाकूने तोडलेली माझी हाडं मला आठवतात. त्यावेळीच्या भोवळ आणणाऱ्या तीव्र वेदना, वाहणारे रक्त आणि माझ्या आजीचे माझ्यासाठी थरथरणारं शरीर मला आजही आठवतं. देवाचे मौनही मला आठवतं.
माझी आजी माझे रक्षण करता करता मेली. मिशनच्या एका कामगाराला मी नंतर सापडलो. मी जिवंत आहे हा एक चमत्कारच आहे, असं लोक म्हणाले. माझ्या हाताचा पुढचा भाग माझ्या कोपराला कसाबसा लटकला होता. लोकांनी मला लुबोन्डो रुग्णालयात आणलं जिथे माझा हात कापावा लागला. मला नंतर किवुलिनी मनोरुग्णालयात हलवण्यात आलं.
किवुलिनीचा अर्थ ‘सावलीमध्ये’. मला तिथे राहण्यासाठी आणलं तेव्हा मी नऊ वर्षांचा होतो. ही जागा सेरेमा शहराच्या बाहेर होती. संरक्षक भिंतींच्या आत लाल भाजक्या विटांच्या भिंती आणि वर फुटलेल्या काचेचे छप्पर असलेली ती इमारत अर्धा एकर जागेत पसरली होती. त्यामध्ये मुलांसाठी मोठी झोपण्याची खोली, काही वर्ग, कोंबड्या आणि डुकरे पाळण्याची जागा आणि एक छोटीशी भाज्यांची बाग होती. बाबा जोसेफ यांनी २००७ मध्ये त्यांची पत्नी आणि मुलाची गुंडांच्या टोळीने हत्या केल्यानंतर हे संकुल सुरु केलं. तेव्हा नेमकं काय घडलं होतं याविषयी ते कधी बोलले नाहीत, पण मी वृत्तपत्रात ती बातमी वाचली होती. इथे आम्हा सगळ्यांच्या कहाण्या सारख्याच होत्या : माणसांची शिकार करणाऱ्यांपासून पळून जाण्याच्या – काहीजण तर त्यांच्या जन्मदात्यांपासून पळून आले होते.
मी माझ्या अंथरुणातून उठलो; मी तेथे नुसताच पडून राहून काहीतरी होण्याची वाट पाहू शकत नव्हतो.
“धैर्य म्हणजे भीतीचा अभाव’, असं नसतं, मुलांनो,” बाबा जोसेफ आम्हाला सांगायचे, “मला ठाऊक आहे की तुम्ही सगळे घाबरलेले आहात, पण घाबरलेल्या परिस्थितीतही कसं जगायचं, हे तुम्ही शिकायला हवं.”
मी हळूच चवड्यांवर चालत खोलीच्या कोपऱ्याकडे गेलो आणि तिथे ठेवलेल्या हत्यारांच्या साठ्यामधून एक भाला काढून घेतला. शस्त्र हातात घेऊन मी त्यांच्यासारखा हत्यारा बनू शकलो असतो पण मी ‘हत्यारा’ होणं नाकारलं.
मी चवड्यांवरच दरवाज्याकडे गेलो आणि थरथरत्या हाताने मी कुलुपाची किल्ली फिरवली. मुलांच्या झोपायच्या खोलीचा दरवाजा उघडला. भिंतीच्या पलीकडच्या बाजूला मुलींची झोपायची खोली होती, पण ते तिथून निघून गेले आणि त्यांनी दुसऱ्याच दरवाज्यातून प्रवेश केला. माझ्याव्यतिरिक्त इथे असणारी दुसरी प्रौढ व्यक्ती म्हणजे सोफिया. ही मुलींचा सांभाळ करायची आणि स्वयंपाकघरात मदत करायची.
माझ्या गळ्यात अडकवलेली शिटी वाजवून मुलांना आणि बाबा जोसेफना सावध करण्याचा मी विचार केला – त्यांचे घर रुग्णालयाच्या भिंतीपलीकडेच होते. पण मी ठरवलं की मी कशाचाही सामना करायला समर्थ आहे, हे सिद्ध करायची हीच संधी आहे. मी लोखंडी फाटकाजवळच्या सुरक्षा रक्षकाच्या छोट्या शाकारलेल्या खोलीकडे माझा मोर्चा वळवला. आमचा सुरक्षा रक्षक सायमोनी तिथे नव्हता. फाटक किंचितसं उघडलेलं होतं, आणि कुलूप-किल्ली उघड्या कडीवर लटकत होती. त्यानेच त्या घुसखोरांना आत येऊ दिलं होतं, हे स्पष्ट होतं.
भीतीने माझे काळीज धडधडू लागलं, पण काही झालं तरी मी त्या रात्री मरणार नाही याची मनाशी खुणगाठ बांधली. मी फाटक ओढून घेतलं, कडी लावली, कुलूप जागेवर ठेवलं आणि किल्ली माझ्या खिशात टाकली. नंतर मी सावधपणे घराभोवती फिरू लागलो.
दृष्टीक्षेपात कुणीच नव्हते. चंद्राच्या लख्ख प्रकाशात झाडांच्या गडद सावल्या जमिनीवर पडल्या होत्या.
मी मुलांच्या वर्गाजवळ फिरलो. खोल्यांना कुलूप होतं. मी कोंबड्यांच्या खुराड्यात आणि डुकरांच्या जागेतही डोकावलं, पण प्राणी अजिबात विचलित झाले नव्हते. कचऱ्याच्या खड्याजवळही कुणी नव्हतं, किंवा भाजीच्या बागेमध्येही. आता एकच जागा राहिली होती ती म्हणजे दफनभूमी.
एक लहान मुलगी लीना एका आठवड्यापूर्वी मलेरियाने वारली होती. आम्ही तिचे शव कुंपणाच्या दक्षिण बाजूला, कोंबड्यांच्या खुराड्यामागे एका मोठ्या झाडाखाली पुरलं होतं. हे हत्यारे आमचे मृतदेहसुद्धा उकरून काढत असत आणि मृत शरीराचे भाग घेऊन जात. लीना दोन महिन्यांची असताना तिची आई तिला इथे घेऊन आली होती. ज्यांच्या शरीराचे सर्व भाग जागच्या जागी, धडधाकट आहेत अशा मोजक्याच मुलांपैकी लीना एक होती. मनोरुग्णालयाने तिचे बाहेरच्या जगातील त्या हत्याऱ्यांपासून तर रक्षण केलं होतं, मात्र ते तिला डासांपासून वाचवू शकले नाहीत.
तेव्हा दफनभूमीत तिची आई तिच्या मुलीच्या मृत्यूमुळे खूप रडली होती, ते खूप विसंगत वाटलं होतं. मी तिच्या रडण्यातील सच्चेपणाविषयी साशंक होतो. माझ्या आईप्रमाणेच तिनेही तिच्या अपत्याला, लीनाला टाकून दिलं होतं. चार वर्षे लीना आमच्यासोबत राहिली, या काळात त्या बाईने एकदाही भेट दिली नाही. लीना आजारी असताना सोफियाने तिला न्हाऊमाखू घातलं आणि तिची तब्येत पूर्ववत आणण्यासाठी झटली. सगळे धोके पत्करून सोफियानेच तिला सेरेमा रुग्णालयात नेलं आणि तिच्या अंतिम श्वासापर्यंत ती तिच्याबरोबर राहिली.
इतर काही मुले लीनासाठी रडली होती. काहीजण मृत्यू म्हणजे काय हे समजण्यासाठी खूपच लहान होते, काहींनी थोडा शोक केला आणि त्याचं जगणं पुन्हा सुरु झालं. मला लीनासाठी वाईट वाटलं होतं पण तिला सर्वसामान्य मृत्यू आला याचं मला समाधानही वाटलं होतं. मी स्वतःसाठी अशाप्रकारच्या मरणाचीच अपेक्षा करत होतो – एक असा मृत्यू जो माझ्या पांढऱ्या कातडीमुळे ओढवलेला नसेल.
सायमोनीच्या आणि ते घुसखोर लीनाचे शव उकरून काढत असतील या विचारांनी माझ्या पोटात कालवाकालव झाली.
ती घुसखोर एक महिला होती. जेव्हा सायमोनी जमीन उकरत होता तेव्हा ती बाई डुलत होती – जणू काही हातांचा पाळणा करुन बाळाला झोपवतेयं. माझ्याकडे त्यांची पाठ होती. ती महिला हळूहळू हुंदके देत असल्याचं मला ऐकू आलं, आणि तिच्या रडण्याच्या आवाजाने मला संताप आला. आधी कुणाला ठार करावं – आमचा सुरक्षा रक्षक की ती बाई – हेच मला कळेना.
अगदीच असह्य झाल्यावर मी नेम धरला आणि निशाणा साधला. भाला सायमोनीच्या पाठीला लागला, त्याच्या शरीराला स्पर्श करून तो जमिनीवर आपटला. तो किंचाळला, त्यानं फावडे टाकलं आणि तो धडपडून पडला. त्या बाईने त्याला कसलीच मदत देऊ केली नाही. ती जिथे होती तिथेच हातामध्ये कापडात काहीतरी गुंडाळलेले घेऊन हुंदके देत उभी राहिली.
मला त्यांची वेगळीच प्रतिक्रिया अपेक्षित होती – कदाचित अपराधीपणाची किंवा लाजेची, किंवा अगदी प्रतिशोधाची. पण सुरक्षा रक्षक उठून उभे राहण्याचा प्रयत्न करताना, धक्का बसल्यासारखा आणि भयभीत वाटला. ती बाई नुसतीच एकटक बघत राहिली. मी रक्ताळलेला भाला पुन्हा उचलून तो परत सायमोनीवर फेकला. पण मी त्याला ठार मारू शकलो नाही. मी शिटी वाजवत घराच्या दिशेने धावत सुटलो.
मुले आत भांबावून रडवेली झाली होती. त्यातील अनेकांनी याआधीही असे हल्ले अनुभवले होते त्यामुळे हल्लेखोर परत आले असं वाटलं.
मी त्यांना जेवणाच्या खोलीत एकत्र जमण्यास सांगितलं. मुलांनी हत्यारे गोळा करून दरवाज्याभोवती सुरक्षाकडे करेपर्यंत सोफिया आणि इतर मोठ्या मुलींनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं. बाबा जोसेफ काही शेजाऱ्यांसोबत धावत आले. त्यांनी त्यांच्या हातात रायफल धरली होती. मी त्यांना आत येऊ दिलं आणि फाटकाला परत कुलूप लावलं.
एका श्वासात मी त्यांना सायमोनी आणि त्या बाईबद्दल सांगून टाकलं. बाबा जोसेफनी पोलिसांना फोन केला.
ते दोघे अजूनही तिथेच होते. सायमोनी त्याच्या गुडघ्यांवर बसला होता, त्याचा चेहरा वेदनेने ग्रासला होता. “कृपा करून आम्हाला मारू नका; मी काय घडलंय ते स्पष्ट करतो,” तो रडत बोलला.
बाबा जोसेफ रायफल रोखून धरत मागे सरले आणि त्याला बोलू दिलं.
ती बाई २० किलोमीटर अंतर चालून कानझेरावरून तिच्या तीन आठवड्यांच्या मुलाला घेऊन या निवाऱ्यात आली होती, सायमोनीने आम्हाला सांगितलं. तो निवडणुकांचा काळ होता, आणि लहान बाळांच्या अवयवांना चांगलीच मागणी होती. तिच्या नवऱ्याला त्यांच्या बाळाचा मृतदेह विकायचा होता. दरम्यान, सुईणीने तिला किवुलिनीविषयी सांगितलं होतं आणि म्हणून तिच्या बाळाचा मृतदेह घेऊन भल्या रात्रीच तिने घर सोडलं होतं. सायमोनी फक्त तिला मदत करत होता.
पोलीस आल्यानंतर त्या बाळाचे दफन केलं, सायमोनीला रुग्णालयात नेलं आणि पोलीस तिच्या नवऱ्याला आणि त्या दुष्ट मांत्रिकाला अटक करण्यासाठी निघून गेले.
आम्ही मुलांना परत झोपवेपर्यंत पहाटेचे जवळजवळ ४ वाजले होते. ते सर्व परत झोपायला गेल्यानंतर मी सुरक्षारक्षकाच्या खोलीत बसलो आणि सूर्योदय पाहू लागलो. सूर्य जरी माझा शत्रू असला तरी, पहाट नेहमीच चांगले काही घडण्याचा आशावाद घेऊन येते. कदाचित बाबा जोसेफ बरोबर होते. कदाचित आता माझी त्या सुरक्षित कवचातून बाहेर पडण्याची वेळ आली होती.
मी एका अशा माणसाविषयी ऐकले होते जो गावोगावी फिरून लोकांना त्याच्या त्वचेला स्पर्श करायला सांगायचा.
“मी माणूस आहे,” तो लोकांना सांगायचा. “जर मीच इतका गरीब असेन तर माझ्या अवयवांमुळे श्रीमंती कशी येईल? माझ्यामध्ये कोणताच सैतान वास करत नाही. माझे डोळे सतत उघडझाप करतात ते सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे. मी म्हणजे माझं पांढरं कातडं नव्हे. मी माणूस आहे.” कदाचित यालाच धैर्यशील असणं, म्हणत असावेत – तुमच्या शत्रूच्या नजरेला नजर भिडवून त्यांना तुमच्यातील माणूस बघायला लावणं.
सकाळी मी बाबा जोसेफना मी दार या शहरात जाणार असल्याविषयी सांगितले – एक असे शहर जिथे सर्व काही शक्य आहे. त्यांनी त्यांच्या बागला येथे राहणाऱ्या नातेवाईकांकडे मी सुरक्षित राहू शकेन असे सांगितलं.
बसमध्ये मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका मसाई माणसाशेजारीच बसलो होतो. त्याने सांगितले की त्याच्या शहरात सुरक्षा रक्षकाच्या खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत. मी अर्ज केला. म्हणून आता मी इथे आहे.
त्या मुलाखतीनंतर, मी बागलाकडे जाणारी गाडी पकडण्यासाठी बसस्थानकावर गेलो. ते स्थानक वाहने आणि लोकांनी गजबजलेलं होतं. मी त्या गर्दीच्या मधोमध, गर्दीचा एक भाग होतो. कुणीही माझ्याकडे नजर रोखून पाहात नव्हतं, कुणालाही माझ्या हातांविषयी किंवा त्वचेच्या रंगाविषयी, अल्बिनो असण्याविषयी काहीही देणंघेणं नव्हतं. सर्वांनी आपल्याकडे दुर्लक्ष करणं, हे खरोखर अदभूत होतं. सर्वसामान्यासारखं असणं हेच असामान्य वाटत होतं. आणि त्या अनेक अनोळखी माणसांनी भरलेल्या बसमध्ये, पहिल्यांदाच मला, मी माणूस असल्यासारखं वाटलं. सेकेई या सुरक्षा कंपनीकडून मला नोकरीसाठी बोलावणे येईपर्यंतचा तो महिनाभराचा काळ मला खूपच मोठा वाटला. त्यांनी मला एक संधी देण्याचं ठरवलं होतं. मी त्यांना सांगितलं होतं की कुणालाही हवी असते ती फक्त एक संधी.
About Global Villager Challenge
Flatworld Language Solutions is based in Pune and working in language services since 2013. The company works in and provides major language services like translation, interpretation, coaching, and corporate training. Team FLS is a group of focused, inspired, and driven professionals who are headed to give foreign language learning a whole new perspective.
In addition to this FLS Comes up with different language-related initiatives. The vision and thought is to Open various avenues of careers for the future as well as present India and to initiate and improve the ‘World Readiness’ of the youth of the nation.
Global villager Challenge is a very important initiative amongst various initiatives. This is a literature translation competition where the enthusiasts and students have to translate literary texts to Marathi from foreign languages. The students, enthusiasts, and professionals knowing would love to be a part of this competition. This competition gives the language professionals a break from their routine translation work and students or enthusiasts get to know another aspect of their language.
This is the fifth year of this competition. The response and the participant number is growing every year. English, French, Russian, German, and Japanese are the language categories for this year. Every year we come up with a specific theme for the contest. This year’s theme was literature written by female authors around the world.
As the competition is online, anyone from all over the world with knowledge of the Marathi language can participate in the competition.
The competition started on the 8th of August. Our Judges are usually senior fellows working in respective language areas for more than 15 years. This year Sunil Ganu sir was the Judge for the English language category. Dhanesh Joshi was the judge for the German Language Category. Anagha Bhat mam was the Judge for the Russian Language Category; Nandita Wagale was the judge for French Language Category and lastly, Swati Bhagwat mam was the judge for the Japanese Language Category. Judges have all the discretion, right from selecting the texts to selecting the right criteria for examination.
Following are the winners of the contest:
1. Satish Kawathekar: German
2. Manisha Sathe: Japanese
3. Supriya Shelar: English
4. Bhagyashree Kulkarni: Russian
5. Mugdha Kale: French
Following are the runners up of the contest:
1. Anvaya Sardesai: German
2. Snehal Deshpande: Japanese
3. Priyanka Shejale: English
4. Pranali Shinde: Russian
5. Dnyaneshwari Khade: French