डोळे बंद करून घेतल्याने
डोळे बंद करून घेतल्याने
नाही मिळवली जाऊ शकत दृष्टी अंधाची
ज्याच्या चाचपडण्याच्या अंतरावर आहे संपूर्ण
जसं ते असतं दृष्टीच्या अंतरावर.
अंधारात भल्या पहाटे एक खग्रास सूर्य उदय पावतो
आणि अंधारात एक निबिड अंधार पसरत जातो
चांदणं अधिक काळे डाग असतील
चंद्राचे नि ताऱ्यांचे.
चाचपडूनच जाणता येऊ शकतं क्षितिजाला
दृष्टीच्या भ्रमाला
की ते कोणत्या कोनाड्यात ठेवलंय
जर का ते ठेवलं असेल तर.
कोणत्या अंधाऱ्या शिंक्यात
टांगून ठेवलाय
कोणत्या नक्षत्राचा अंधार.
डोळे मिटून पाहणं
म्हणजे अंधासारखं पाहणं नव्हे.
झाडाच्या सावलीत, वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला
तऱ्हेतऱ्हेच्या आवाजांच्या मध्ये
खुर्ची विणत असलेला एक अंध
जगावर सर्वांत जास्त प्रेम करतो
तो काहीएका जगाला स्पर्श करतो आणि
पुष्कळशा जगाला स्पर्श करू इच्छितो.
तुला माझ्या स्पर्शाची लालसा आहे
तुला माझ्या स्पर्शाची लालसा आहे
पण माझ्या स्पर्शाच्या केवळ आभासाने
तू अशी संकोचून-मिटून जातेस
की तुझं जे काही म्हणून फूल आहे
त्याची मिटून कळी व्हावी
जेणेकरून तुला स्पर्शून मी
पुन्हा एका फुलासारखं उमलवावं.
निराश होऊन एक माणूस बसला होता
निराश होऊन एक माणूस बसला होता
(त्या) माणसाला मी नव्हतो ओळखत
निराशेला ओळखत होतो
म्हणून मी त्या माणसापाशी गेलो
मी हात पुढे केला
माझा हात धरून तो उभा राहिला
मला तो नव्हता ओळखत
माझ्या हात पुढे करण्याला ओळखत होता
आम्ही दोघं सोबत चाललो
दोघं एकमेकांना नव्हतो ओळखत
सोबत चालणं ओळखत होतो.
***

विनोद कुमार शुक्ल (१९३७)
विनोद कुमार शुक्ल हे अग्रणी हिंदी साहित्यिक आहेत. त्यांचे दहा कवितासंग्रह, चार कथासंग्रह, आणि सहा कादंबऱ्या हे लेखन प्रकाशित झाले असून, जगातील बहुतांश प्रमुख भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद केला गेला आहे. त्यांच्या कविता Granta, Metamorphoses, and Modern Poetry in Translation अशा ख्यातनाम आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्येही समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यांच्या काही साहित्यकृतींची नाटक व चित्रपट ह्या माध्यमांत रूपांतरेही केली गेली आहेत. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द सन्मानित आहे. व्यक्तिमन, मानवी नातेसंबंध, निसर्ग, आदिवासी जीवन इत्यादी आंतरिक व बाह्य वास्तवांतील अनेकविध विषयांना कवेत घेणारे, तसेच मिताक्षरी व दीर्घ ह्या दोन्ही आवाक्यांत सारखेच प्रभावशाली ठरणारे काव्यलेखन करणाऱ्या विनोद कुमार शुक्ल ह्यांना २०२३ साली ‘पेन/नाबोकॉव्ह’ ह्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने, आणि २०२४ साली ‘ज्ञानपीठ’ ह्या भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मानाने गौरविण्यात आले आहे. विनोद कुमार शुक्ल ह्यांच्या 'सब कुछ होना बचा रहेगा' ह्या कवितासंग्रहातली 'आँख बंद कर लेने से' ही कविता ऐंद्रिय संवेदनांच्या आपल्या प्रचलित संकल्पनेविषयी पुनर्विचार करायला लावणारी कविता आहे. दृष्टीवर डोळा ह्या शारीरिक अवयवाची मक्तेदारी नसून, अंध म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी स्पर्शच दृष्टीचे माध्यम कसा बनतो, हे ह्या कवितेतून प्रत्ययास येते. त्यांच्या इतर काही कवितासंग्रहांतही स्पर्श ही संवेदना आणि संकल्पना केंद्रस्थानी असलेल्या अजून काही कविता आहेत. त्यांपैकी केवल जड़ें हैं ह्या कवितासंग्रहातली 'तुम्हें मेरे स्पर्श की लालसा है' ही अल्पाक्षरी कविता प्रेमाच्या नात्यातील शारीर-भावनिक स्पर्शाच्या ओढीचे उमलणारे-उमलवणारे उत्कट रूप टिपते. आणि अतिरिक्त नहीं ह्या कवितासंग्रहातल्या 'हताशा से एक व्यक्ति बैठ गया था' ह्या कवितेत कथित ओळखीपाळखीपलीकडच्या मानवीय सह-वेदनेच्या, त्यातून घडणाऱ्या साथ-सोबतीच्या निर्व्याज रूपातील स्पर्शाचे दर्शन घडते. विनोद कुमार शुक्ल ह्यांच्या ह्या कवितांतील ह्या प्रगल्भ भावचिंतनपर आशयाचा मूलनिष्ठ अनुवाद म्हणजेच शब्दानुवाद करण्याचा हा प्रयत्न आहे. ह्या कवितांतील आशयाला वैशिष्ट्यपूर्ण आकार देणारी त्यांच्या काव्यशैलीतील अल्पाक्षरत्व, प्रासादिकता, सहजसंवादीपण, विरामचिन्हांचे अल्पतम योजन, ओळीतील शब्दांचा अर्थ-भावाच्या सूक्ष्म छटा सूचित करणारा क्रम, आणि काव्यगत ओळींचा सप्रयोजन विन्यास ही वैशिष्ट्ये अनुवादातही शक्य तितकी यथामूल जपू पाहिली आहेत. काही ठिकाणी, जिथे मूळ कवितेत विशिष्ट शब्द योजलेले दिसत नाहीत, पण ते तिथे अध्याहृत आहेत, असे जाणवले; तिथे थोडे स्वातंत्र्य घेऊन अनुवादात त्यांसाठी मराठी शब्द योजले आहेत. उदाहरणार्थ, जैसे दृष्टि की दूरी पर — जसं ते असतं दृष्टीच्या अंतरावर. तसेच, अल्पाक्षरी रचनांतील शब्दयोजनाची अर्थसंपृक्तता आणि हिंदी-मराठीतील भाषिक प्रयोगांमधले फरक (उदाहरणार्थ, हिंदी 'तुम्हें' - मराठी 'तुला') ध्यानात ठेवून, हिंदी व मराठी ह्या दोन्ही भाषांमध्ये समानार्थी / सदृशार्थी आढळणाऱ्या शब्दांबाबत, कुठे हिंदी-मराठीत समान असलेला शब्द योजायचा (उदाहरणार्थ, 'लालसा'), आणि कुठे हिंदीहून भिन्न मराठी शब्द योजायचा (उदाहरणार्थ, 'जानता'करिता 'जाणत'ऐवजी 'ओळखत'), ह्याविषयी शक्य तितके तारतम्य राखू पाहिले आहे. अनुवादामध्ये, मानवी नाती, जीवन आणि विश्व ह्यांविषयी आपली जाणीव समृद्ध करणारा ह्या कवितांमधील कविसंवेदनेचा संस्पर्श जपण्याचा व पोहोचवण्याचा यथामती प्रयास केला आहे.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram