लहान होते..मोठ्या गटात होते शाळेत. तो वर्ग म्हणजे आगगाडीचा सरळ, लांब डबाच. त्या वर्गाला दोन दरवाजे होते, त्यातला एक कायम बंद असायचा. पण ते दार काचेचं होतं. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची गंमत पाहता यायची. मी अनेकवेळा तिथेच असायचे. तिथून त्यावेळी समोरच्या मैदानात खेळणारी मोठी मुलं दिसायची, त्यांचा हेवा वाटायचा. आपल्याला का सोडत नाहीत बाहेर, मोकळं ? त्यांचं ते मोकळं जग हवंहवंसं वाटायचं. पण मग थोड्या वेळानंतर शाळा सुटायची. आम्ही पण मोकळे व्हायचो, त्या रेल्वेच्या डब्यातून. तेव्हाचा तो काळ आणि आत्ताचा हा काळ. साम्य एकच, आपण सारे बंद आहोत. आपल्याच दाराआड. तिथून बाहेर येण्यातला आनंद, ते स्वातंत्र्य कधी मिळेल, माहीत नाही! कुणालाच.
जरी बाहेर येता आलं तरी, बाहेरचं हे जग असेल का पहिल्यासारखं ? परिसर, तिथला तो मूठभर निसर्ग, माणसं, ते रस्ते, त्या जागा, इमारती, असेल का पहिल्यासारखं? गेले जवळपास पाच महिने मी बोलतेय स्वत:शी. माझ्या स्वत:तच असलेल्या भूमिकांसोबत. हा वाद – संवाद शिकवत गेला, देत गेला. आपण किती आपण असतो, असतो की नाही. खूप काही, उगीचच शोधत असतो का आपण? जगणं फार साधं, सरळ, सोपं असतं. आपण ते पहात नसतो, फार वळणं देतो का आपण जगण्याला? नसावं ते सरळ असं वाटतं अनेकदा. पण सरळ रेषेतही अनेक बिंदू असतात. त्यांचं ते सूक्ष्म वर्तुळ असतंच की प्रत्येक रेषेत, तसंच जगण्यातही. एका न दिसणाऱ्या विषाणूने माणसाला एक संधी दिलीये, “माणूस” म्हणून स्वत:ला तपासून पाहण्याची. आपण घेणार का ही संधी? आमचं चुकलं हे कबूल करणार का? असे अनेक अनेक प्रश्न. मनातलं काहूर, कधी शब्दांचं, कधी चित्रांचं. मला मांडायचं होतं, तसंच, सुचलेलं, तुटलेलं, अधुरं राहिलेलं, दूरवर दिसलेलं, विचारांनी गुरफटलेलं, गुदमरलेलं, मोकळं होऊ पाहणारं खूप काही.. ..मला मांडायचं होतं, मला सांगायचं होतं. स्वत:ला पडलेल्या अनेक प्रश्नांना सामोरं जायचं होतं, सोबती म्हणून, आई म्हणून, मित्र म्हणून, कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून.
चीनमधे सुरू झालेला हा विषाणू जगभर फैलावत होता. हळूहळू पकड घट्ट करत होता. शाळा, महाविद्यालयं, एका मागोमाग सारं बंद होत होतं. वर्तमानपत्र, माध्यमांमधून एकच बातमी. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात होतं. पण हा विळखा लक्षात यायला बराच वेळ लागणार होता. इतर वेळी गर्दीने तुडूंब असलेले रस्ते हळूहळू रिकामे होत होते. आपला स्वभाव सोडत होते. हे सारं नवीन होतं. हे शहर लहानसं, टुमदार असल्यापासून मी पाहतेय. इतके मोकळे असायचे रस्ते की नक्की, आपली वाट कुठली, कुठून चालायचं असा विचार करायचे शाळेत जाताना. तिथपासून त्याची ती गर्दी दिवसागणिक वाढताना पाहिलेली. ती कधी कमी झालीये असं पाहण्यातच नाही. पण हेही पाहिलं. खूप वेगळ्या पर्वाची सुरुवात होती ही, हे आज चार महिन्यांनंतर कळतंय. तेव्हा मात्र सारं धुसर होतं. पुढे बरंच काही पाहायचं आहे, पचवायचं आहे हे आधीच कळलं असतं तर!. ..आयुष्य हे अशा जर-तर ने भरलेलं असतं आणि त्यातून पुन्हा निष्पन्न काहीच होत नाही ही शोकांतिका. एकीकडे रस्ते ओस पडत होते, तर राज्यं बंद होत होती, राज्याच्या सीमा इतर राज्यांना बंद झाल्या. देश बंद होत होता. कोणतंही समीकरण मांडावं याच्या पलीकडलं होतं हे. तरीही आयुष्यातील काही गणितं काहींना सुटतच नाहीत, त्यांच्यासाठी आयुष्य गुंततच जातं, काहींना ती गणितं सुटल्याचा भास होतो, तर काहींसाठी याही पार जाऊन आयुष्य सुरु होतं.
ही शहरं ज्यांनी वसवंली ती माणसं, ते कामगार, ते मजूर परत निघाले होते. त्यांच्या मूळ गावी. ते पाहताना सुरुवातीला त्याची गहनता कळत नव्हती. पण प्रत्येक नवीन दिवसासोबत ह्या आपल्याच माणसांचेच प्रश्न गुंतत होते. खूप विचित्र भावनांनी मन अस्वस्थ होतं. ही अस्वस्थता कधी शब्दांमधून मांडली तर कधी चित्रांमधून.
“ कुठे निघाली आहेत ही माणसं ? आणि का? हे शहर त्यांचं नाही? की शहराने त्यांना कधी आपलं म्हंटलंच नाही. घरातलं जे काही ते एका लहानशा गाठोड्यात सामावलं? शेकडो किलोमीटरचं अंतर चालत जाणार. कधी पोहोचणार? पोहोचतील तेव्हा स्वत:मध्ये उरलेले असतील ते? कुठे हरवला हा शहरातला माणूस? माणसाचे प्रकार असतात का? शहरातला माणूस, गावातला माणूस, वरचा माणूस, खालचा माणूस.. ..नक्की माणूस म्हणून कुठे उभे आहोत आपण? आणि सगळेच जर एकसारखे आहोत, तर आपल्यातल्याच अनेकांना वेगळी वागणूक का? काही लोक सुरक्षित आणि काहींची इतकी उपेक्षा की, त्याचं जगणंही इतकं स्वस्त व्हावं. पुन्हा हे जे पायी निघाले आहेत, ते कसे पोहोचणार ? काय खाणार? त्याच्या त्या लहान मुलांचं काय? ते कसे इतके दूर पायी चालणार?…”
रोजच्या रोज हे लोंढे वाढत होते. शहर बंद होतं. पण ही माणसं मात्र एका प्रवासाला निघाली होती. तो प्रवास लादलेला होता. त्यात खूप वेदना होत्या, न संपणारे प्रश्न होते. तो प्रवासही कधीच संपणारा नव्हता. फक्त त्यांच्यासाठीच नाही, तर तो पाहणाऱ्या प्रत्येकासाठी. ज्या शहरांना त्यांनी उभं केलं, त्या उंच इमारतींना स्वत:च्या कष्टांनी पूर्ण केलं, आज त्याच शहरात त्यांच्यासाठीच जागा नव्हती. हे होणं चुकीचं आहे, हे कळत असतानाही हे होत होतं. घराच्या गॅलरीत उभं राहिलं की बऱ्यापैकी हिरवा तुकडा दिसतो. तेवढंच काय ते समाधान, सध्याच्या ह्या कठीण काळात. त्या हिरव्या रंगाच्या पुंजक्यातून अचानक माणसांच्या रांगा येताना दिसायच्या. कसं पाहत होते मी ह्या सगळ्याकडे? माणूस असण्याची लाज वाटत होती. आपलीच, आपल्यातलीच काही जणं ही अशी निघाली होती. त्याचे व्रण उमटत होते. मनावर तर होतेच पण विचारातही होते. त्या मजुरांचे चेहेरे समोर दिसायला लागले, ते बोलतायत, मला प्रश्न विचारतायत आणि माझ्याकडे गप्प राहण्यावाचून दुसरं उत्तर नाही हे जाणवत होतं.
“ गेले कित्येक दिवस सकाळ झालीये असं वाटत नाही. उजाडतच नाहीए. संध्याकाळ नंतर काळोख गडद, गडद आणखी गडद होत जातो. त्यात आम्हाला पुढचं काही दिसत नाही.. आणि आम्ही तर कुणालाच दिसत नाही. भविष्य तर अंधारात असतंच आमचं.. ..पण आता वर्तमानही”..एक मजूर.
हे निस्तेज चेहेरे दिसतच होते. करडे, कोरडे, भेगाळलेले भाव असायचे त्या चेहेऱ्यांवर. त्यांच्या आयुष्यातले रंग पण आपण ठरवतो का? ते रंग सारे मातकट असतात. कसलीच ऊर्जा नसलेले, आणि आता तर ते शहरच सोडून निघालेले. ह्या शहराने घास दिला, पण घर दिलं नाही. त्या लेकरांचे खेळ मात्र इथेच राहिले. एखादा पिशवीत तो काय काय नेणार होता? त्याची ती पिशवी तेवढी मोठी असती तर जन्मभूमीतून इथे यावंच लागलं नसतं ना? लिहितानाही प्रश्नच अधिक होत होते. डायरी पुरणारच नाही अशा वेदना अवतीभवती दिसत होत्या. पण लिहायचं होतं. कारण मी जिवंतपणी अनुभवलेला, हा मानवी इतिहास होता.
“ अनेक जण निघाले होते. कर्म नगरी सोडून जन्म नगरीकडे. किती जणांना तिने आत येऊ दिलं हा प्रश्न आहेच. नक्की कशासाठी गेलास तू? घराच्या ओढीने! की, हे शहर आसरा देणार नाही म्हणून. आणि त्या मूठभर सामान मावणाऱ्या पिशवीत काय घेऊन गेलास ? त्या पुलाच्या खाली एक मोडकं प्लास्टीकचं बदक सापडलं त्यादिवशी. तुझ्या लेकराचं खेळणं होतं का ते ! त्यावर बोटांचे काळे ठसे होते. छोट्या हातांचे..ते हात मात्र इथेच राहिले. पुलाखाली.. त्या तिथे एका कोपऱ्यात ते बदक आहे अजून. लेकराची वाट पाहतंय..”
ह्या विषाणूने माणसाला एक संधी दिलीये का ? पुन्हा एकदा जगण्याची. विचार करून जगण्याची. त्या विचारात केवळ माणूस नसावा, स्वार्थ नसावा, तर निसर्गही असावा. काहीतरी शिकण्याची पुन्हा एक संधी. तुमचं आरोग्य हे वैयक्तिक नाही, तर ते सार्वजनिक आहे. समाजाचाच एक भाग आहे, जे आपण इतरांसाठी आणि स्वत:साठी जपलं पाहिजे. आपण आजही समष्टीचा विचार करत नाही. का? माणूस जर समुदायात राहणारा प्राणी असेल, तर संपूर्ण समुहाचा विचार व्हायला नको का? म्हणूनच, मला वाटतं, हे बंदिस्त होणं, माणसाने माणसापासून दुरावणं, सामाजिक, मानसिक कोंडी होणं, आर्थिक घडी नव्याने घालणं, घरासारखाच परिसराचा विचार करणं, आणि पुन्हा हे केवळ विचारात न राहता, त्यावर कृती करणं.. ..ह्यासाठी हा वेळ आहे. स्वत:कडेच नव्याने पाहण्याची संधी, ती घेतली पाहिजे. माणूस म्हणून आपण वाढलोय का, हे तपासून पाहायला हवं. अनेकदा एक व्यक्ती म्हणून आपल्याला स्वत:वरही काम करावं लागतं, तेव्हा ही संधी जायला नको.
माझ्या मनात हे चक्र सुरूच होतं. दिवस तसा छापील होता, पण प्रश्न वेगळे होते. ते थेट माझे नव्हते, पण तरीही माझ्यांचे होते. मला अस्वस्थ करत होते. एखाद्याच्या वेदनेने जीव कासावीस होणं हे मला मी जिवंत असण्याचं लक्षण वाटतं. म्हणूनच डायरीत चित्र होती, तसेच शब्दही. पण ह्यांच्या वेदना कमी होत नव्हत्या. कशातूनच त्यांचं असणं मांडतां येत नव्हतं. चित्रातले रंगही तिथपर्यंत पोहोचत नव्हते आणि ना शब्द त्यांचं काम करत होते. तरीही मन थांबत नव्हतं. त्याला मोकळं व्हायचं होतं.
माझ्यासारखंच एक लहान मनही काहीतरी लिहित होतं. त्याच्या लिहिण्यातला बदल दिसत होता. वाचता येत होता आणि पोहोचतही होता. स्मित दहा वर्षाचा आहे, अनेकदा मनातले प्रश्न, विचार तो शब्दातून मांडतो. ह्या दिवसामधेही त्याच्यासोबत चर्चा सुरूच होत्या. मग तो एखाद्या दिवशी त्याची डायरी मला वाचायला द्यायचा, तो लिहितो,
“(कोरोनाच्या आधी) दर रविवारी मुंबईला जातो. तिथे जहाँगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एन्.जी.एम्.ए) ला जातो. चित्र पाहतो. आमच्याकडे बऱ्याच चित्रकारांची पुस्तकं आहेत. ए.ए.आलमेलकर, प्रभाकर बरवे, अमृता शेरगील, जामिनी रॉय, व्हिन्सेंट व्हॅन गॉग, तुलुझ लोत्रेक. मला व्हॅन गॉगची ‘स्टारी नाईट’, ‘माय सेल्फ’ ही दोन चित्रं फार आवडतात. मी अधून मधून कॅनव्हासवर चित्र काढतो तेव्हा, मी धावतोय असं मला वाटतं.” (स्मित कबीरची डायरी)
आमचं काय सर्वांचच फिरणं बंद झालेलं. पण ह्या लहान मनात खूप काही सुरू होतं. त्याच्या नंतरच्या लेखनात मला तो काहीतरी शोधतोय, कशाची तरी वाट पाहतोय हे जाणवत राहिलं. खूप लहानसं, वाढतं मन आहे त्याचं. पण त्याही मनात, ह्या पायी जाणाऱ्या माणसांबद्दल अनेक प्रश्न होते. कधी ते मनातच ठेवले, कधी बोलून दाखवले. “आपण निसर्गासमोर काहीच नाही,” हे झालेल्या चर्चेतून तोच आम्हाला सांगत होता.
“काही प्रश्नांना उत्तरं नसतात, ती शोधावी लागतात आणि ती देखील स्वत:ला. पुन्हा योग्य किंवा अयोग्य हा एक वेगळा गुंता आहे. काही क्षणांना सारेच योग्य असतात, चुकीची असते ती परिस्थिती. तिला सामोरं जाताना प्रत्येक जण स्वत:ला योग्य वाटेल ती वाट निवडत असतो. ती प्रत्येकासाठी वेगळी असते आणि अनेकदा प्रत्येकाची योग्यच असते,” पण त्या दहा वर्षांला हे सारं सांगताना, त्याचं लहानपण घ्यायचं नव्हतं. पण चर्चा होत होत्या. माणसांबद्दल, शहरांबद्दल, जगण्याबद्दल आणि त्याच्या सारख्याच मुलांबद्दलही. एप्रिलमध्ये अशाच एका घरगुती चर्चेत विषाणू बद्दल बोलताना एकदा म्हणाला,
“ म्हणजे निसर्ग श्रेष्ठच ना. कसं त्याने सगळ्यांना घरात बसवलंय. आणि माणूस स्वत:ला इतका हुशार समजतो, पण घाबरूनच घरात बसलाय ना! म्हणजे ममा, निसर्गचक्रात माणूस नसेल तर निसर्गाला काहीच फरक पडत नाही.”
आई म्हणून त्याचं जग मी पाहतच आलेय. स्मित होमस्कुलींग करतो, म्हणजे खरंतर त्याने काय करायचं हे तो ठरवतो. त्यानिमित्ताने फार फिरणं होतं आमचं. शहरं, राज्य, रोडट्रिप्स करून भटकणं हा आमचा जिव्हाळ्याचा विषय. त्यात विविध वयाची माणसं भेटतात, त्यांच्या सोबत हा बोलतो. फिरतो. ह्यातून त्याला काय मिळालं, हे नंतर काही दिवसांनी, त्याच्या गोष्टीतून, चित्रातून बाहेर येतं. कधी मला देतो वाचायला, कधी नाही. पण त्याच्या आत बरंच काही असतं. अनेकदा विषयांच्या चर्चेतून ते समोर येतं.
हा लॉकडाऊनचा काळ त्याच्यासोबत काय करायचं, हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात त्यानेच सोडवला. रोज संध्याकाळी दोन तास फिरणं आणि दोन तास खेळणं हे बंद झालं. खाली भेटणारे मित्र, इतर माणसंही स्वत:च्या घरांमध्ये बंदिस्त झाली. शाळा परीक्षेच्या आधीच बंद झाल्या त्या आजही सुरू झालेल्या नाहीत. सारं केवळ ‘बंद’.. अशा वेळी मग दिवसातला काही वेळ ठरवून आम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. त्यात त्याने वाचलेली, आम्ही वाचलेली पुस्तकं असतात, एकत्र पाहिलेले जुने सिनेमे असतात, आमच्या लहानपणातल्या गोष्टी असतात, अगदी राजकारणही असतं. कोरोनाच्या फैलावामुळे शाळा बंद झाल्या. स्मित आधी दोन वर्ष शाळेत गेला आहे. पण ह्या शाळा बंद असल्या तर काय काय होईल ह्यावर बोलताना तो म्हणाला, “मोठ्या इंग्रजी शाळेत जाणाऱ्या मुलांना कदाचित हे शाळा बंद असणं इतकं जाणवणार नाही. कारण त्यांचे आई, बाबाही त्यांचा अभ्यास घेऊ शकतात, पण मी ज्या शाळेत होतो, तिथे माझ्या मित्रांच्या आई घरकाम करत होत्या. एका मित्राचे बाबा शुजच्या दुकानात कामाला होते. त्यांचं शिक्षण नसतं म्हणून त्यांना आपल्या मुलांना शिकवायचं असतं ना. त्यांना कसा येणार मुलांचा सगळा अभ्यास घेता? ..माझ्या त्या मित्रांसाठी तरी शाळा सुरू व्हायला हव्यात.”
नेहमीच अशा गप्पांमध्ये तो स्वत:चं असं वेगळं मत मांडतो. आमचं बोलणं नाही पटलं तर, मला नाही हे पटत असं स्पष्ट सांगतो. ह्या सगळ्यानंतरही खाली जाणं, एकट्यानं भटकणं ते सारं त्याला आठवत होतं. मग त्याने एका डायरीत खूप माणसंच काढायला सुरुवात केली. तिला नाव दिलं, ‘आपली माणसं’. प्रत्येक चेहेरा वेगळा. त्याच्या लेखनात इमारतीच्या परिसरातली झाडं, बागेतली बाकं, माणसं यायला लागले. तो सांगत नव्हता, पण लिहीत होता. आई म्हणून हे पाहताना मला सलत होतं, आणि मूल वेगळ्या नजरेने ह्या दिवसांकडे पाहतंय ह्याचं समाधानही होतं. तो टिपतोय त्याचा अवतीभवतीचा परिसर, त्यात त्याचे असे घटक. जे कागदावर उतरत होते. शब्दांतून, चित्रांतून. जसे बाहेरचे घटक येत होते, तसेच घरातल्या वस्तूही नव्याने चित्रात येत होत्या. त्याच्याही आणि माझ्याही. जसं हे काम होतं, तसंच घरातली कामंही आम्ही सगळे मिळून करत होतो.
लॉकडाऊन झालं आणि मला एका पुस्तकाचं चित्रांचं काम आलं. त्यामुळे हे तीन महिने चेतन आणि स्मितनेच घरही सांभाळलं, माझा वाटा तसा कमीच राहिला. इतर वेळीही स्वयंपाक आम्ही दोघंही करतो, तसाच तोही सतत स्वयंपाक घरात असतो. ह्या दिवसात रोज भांडी घासणं, नवीन पदार्थ शिकणं हे सुरू होतं.
खेळण्याचा वेळ असा जात होता. अजून एक गोष्ट ह्या काळात झाली. बरेच सिनेमे पाहिले. घरी टिव्ही नसल्याने, बराच वेळ बाहेर भटकणं आणि पुस्तकात जातो. बाहेर पडणं बंदच असल्याने, सिनेमांसोबत मैत्री झाली. ऋषीकेश मुखर्जी, बासु चटर्जी, सत्यजीत रेंची ‘पथेर पांचाली’ हे त्याला आवडले. अमोल पालेकरांचा गोलमाल, तर खट्टामिठा, बावर्ची त्याने पुन्हा पुन्हा पाहिले. एका संध्याकाळी, ह्या सिनेमांबद्दल बोलताना म्हणाला,
“ सगळं साधं पण छान वाटतं ह्यामध्ये. कुटुंबातल्या माणसांबद्दल खूप आहे ह्या सिनेमांमध्ये. मला हे सगळे आपलेच असल्यासारखे वाटतात. अशोक कुमार तर आजोबांसारखेच दिसतात आपल्या. आणि ह्या माणसांना एकमेकांबद्दल प्रेम आहे, पण ते त्यांनाच कळत नाही.” काही वाचलेल्या पुस्तकांचे इंग्रजी, मराठी सिनेमे पाहिले. “मग पुस्तकात तो विषय अधिक छान आहे, जवळचं वाटतं, आतपर्यंत जातं, पण सिनेमात खूप कृत्रिम वाटतं,”अशाही प्रतिक्रिया आल्या.
मुलांना जे कळतं ते त्यांनी आपल्याला सांगितलंच पाहिजे, हा हट्ट आमच्या घरात नाही. तेव्हा अनेकदा, त्याच्या मनात जे काही चाललेलं असतं ते तो लिहितो किंवा बऱ्याच दिवसांनी आम्हाला सांगतो. लॉकडाऊनमध्ये दिवसातला सर्वात अधिक वेळ तो वाचत असतो. अनेकदा एकच पुस्तक वाचण्याची त्याची दहावी, बारावी वेळ असते आणि ते पुस्तक प्रत्येक वेळी नव्याने भेटतं असं तो म्हणतो. कधी शब्दांचे खेळ – एक शब्द मी सांगायचा, दुसरा त्याने. कधी लेखकांची आणि पुस्तकांची नावं, कधी गोष्टी, कधी शिवणकाम, ह्या साऱ्यातून त्याचा दिवस छान जातो. कधी आम्ही काहीच करत नाही, फक्त आभाळ, समोरचा डोंगर पाहत बसायचं.
खरंतर आई म्हणून, माझंच मन अस्वस्थ होतं, अनेकदा. ह्या लहान मुलांना असं बंद घरात ठेवणं, समोरच्या चार फूट मोकळ्या जागेतून दिसणारं तेवढंच आभाळ. आणि हे अजून किती काळ, माहीत नाही. घरातली चार माणसं सोडली तर कुणाचा संपर्क नाही, कुणीच भेटत नाही. चुकून खाली गेलोच तर लांबूनच हात करायचा, जवळ जायचं नाही. माणूस, त्यांचा स्पर्श ह्याशिवाय नातं कसं असू शकेल ! पण सध्या हेच हिताचं आहे, आपल्याही आणि इतरांच्याही.
कोरोनाच्या आधीचं जग आठवलं की ते सत्य होतं की, हे स्वप्न आहे असं पुन्हा पुन्हा वाटतं. किती सहज होतं जगणं. माणूस माणसाला भेटत होतं. नेहमी दिसणारे चेहेरे दिसले नाहीत तर काहीतरी अपूर्ण वाटायचं. मोकळ्या हवेतील मोकळा श्वास एक उत्साह देऊन जायचा. माझ्या घरातून मुख्य रस्त्यावर आलं की, एक मोठा सिग्नल लागतो. तिथे गाडी उभी राहिली की, एक लहान मुलगी सोनचाफा घेऊन यायची. ओळखीची झालेली. तिचा रंगही सोनचाफ्यासारखाच होता, चमकणारा. आता गेले कित्येक महिने मीच बाहेर गेले नाही. पण तिची आठवण येते आणि तिच्यासोबत येणाऱ्या त्या गंधाची पण. इतकं गणिती जगावं लागेल ह्याची कल्पनाही केली नव्हती. तसंही, जे कल्पिलेलं नसतं तेच वास्तव म्हणून समोर येतं आणि मग प्रत्येक पावलावर हादरे बसतात. स्वीकारा किंवा नाकारा, पण सत्य तेच असतं.
माणसाला कळेल का माणुसकीचं मोल ! की, त्याची उजळणी तशीच मागून पुढे सुरू राहील? आपण स्वत: इतकाच, किंबहुना जास्तच निसर्गाचा विचार करायला हवा हे उमजेल आपल्याला?
पुस्तकाचं पान उलटलं की, गोष्ट तशीच पुढे सुरू राहते. पण हे दिवस तसे नसणार. आधीचं सहज, सरळ जगणं त्याला पुन्हा ती लय गवसेल का, कुणास ठाऊक !
वैयक्तिक, मी ह्या दिवसात जशी आई होते, तशीच एक कलाकार होते, एक व्यक्ती म्हणून ह्या दिवसांकडे पाहत होते, पाहतेय. खूप अस्वस्थ झाले, निराश झाले, हसले तशी रडलेही. माणसांचे पायी जाणारे लोंढे पाहून, त्यांच्या त्या पावलांच्या खुणा मनावर खोल उमटत होत्या. भंपक, खोटं, दिखाऊपणाचं असणारं हे शहरी आयुष्य गेले अनेक वर्ष बोचतंय, त्याचा खोटेपणा ह्या काळात जास्त अधोरेखित झाला. माणसाला चांगलं जगण्यासाठी फारच कमी जिन्नस लागतात, ह्याची अनुभूती आली. आणि पुन्हा त्या कमीतही सारं पूर्णच आहे हे जाणवलं. आपण नेमकं आपल्या जगण्याचं काय करतो, गुणाकार, बेरीज की भागाकार ? मला वाटतं, वजाबाकीच जास्तं. त्यात आणि जगणंच वजा वजा होत राहतं, बाकी उरते ती तर दिखाव्यापुरती.
गेले चार महिन्याहून अधिक आपण घरात आहोत. निसर्गात मात्र काही बदल झाला नाही. तो त्याचं काम चोख करतोय. तो कोपऱ्यावरचा अमलताश त्याच्याच वेळेला बहरला, खालचा निंबही छान पिवळा झालेला, कांचन दाट हिरवा होऊन उजवीकडे उभा आहे, समोरच्या गवताचा मखमली स्पर्श पायांना नाही तरी डोळ्यांना जाणवतोय. पावसाचे काळे पांढरे ढग जसे गोळा होतात, तसा समोरच्या डोंगराची रेष कधी धूसर दिसते कधी गडद. जगाच्या जगण्याची ही जी कूस बदलली आहे, त्यातून नवीन येणारा दिवस आणि जुना गेलेला दिवस ह्यात साम्य असेल की नाही हे सांगतां येणं अवघड आहे. पण आपण जुने कसे होतो आणि आपण नवीन असणार आहोत की नाही हा विचार मला ह्या दिवसांनी करायला लावला. शहर, इथलं जगणं आणि माझ्या विचारांची दिशा ह्यात असलेला विरोधाभास ह्या दिवसांनी अधिक ठळक केला. आपण आपल्यासाठी म्हणून जगण्याची जी काही उद्दिष्टं ठरवली आहेत त्यांना प्रत्त्यक्षात आणण्याचा हा काळ आहे. ह्या दिवसांमधली ही अनिश्चितता स्वीकारायला हवी. ती नाकारून आपल्याला ह्या दिवसांसाठी पर्याय शोधता येणार नाहीत.
पायी परतलेल्या माणसांसोबत मी पण थोडी थोडी त्यांच्या सोबत गेले, असं मला पुन्हा पुन्हा वाटतं. माझ्या चित्रांनी, शब्दांनी हे माझं असणं मांडायला मला नेहमीच साथ दिली. पालक म्हणून आलेली अस्वस्थता, त्यातून बाहेर येताना घडलेला संवाद, स्मितपेक्षा आम्हालाच माणूसकी शिकवून गेला. चित्रातले आकार पूर्ण नसले तरी, त्या रेखाटण्यातून मी मांडत होते. माझ्या रेषांमधून त्यांच्या त्या वेदना मला सोबत ठेवायच्या होत्या. मी आजही ते रेखाटते,लिहिते, ते पूर्ण असतं का? हा प्रश्न अलाहिदा.
लहानवयात त्या शाळेच्या बंद दारामागे माझं असंच एक जग होतं. इयत्ता वाढली आणि जग बदलत गेलं. ते तसंच दाराआडून जसं सुंदर दिसतं तसंच सुंदर असणार अशा मला वाटायचं. ते तसं नसतं, जगताना अनेक छटा समोर येतात आणि त्या जगण्याचाच भाग असतात ह्याची खात्री होत गेली.
ह्या साऱ्यानंतर जग कसं असेल, हा विचार प्रत्यकाने स्वत:पुरता करायचा आहे, बाहेरच्या जगाच्या आधी आपलं एक स्वत:चं असं जग असतं. त्या जगात तो खरा असतो किमान असावा. माणूस खूप वेगाने पुढे जातोय. पण पुढे म्हणजे नक्की कुठे? आपण थांबायचं विसरलोय, ती आठवण व्हावी म्हणून नेहमीच्या जगण्याला आलेला हा स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. ह्या अवघड दिवसांना आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. त्यासाठी बुद्धीच्या जोडीनेच मनाची सोबत हवी, आपल्यांची सोबत हवी. तेव्हा आपल्या शहरातून निघून गेलेल्या ह्या आपल्याच माणसांचा विसर पडायला नको.
Beautiful imagery!
Really realistic article . Its the reflection of same thoughts that came in my mind then and now during the lockdown period.