कुणी विचारलं तुला घर कसं हवं? तर मला घराची अशी नेमकी प्रतिमा नजरेस येत नाही, येतात ते आजवर राहिलेल्या घरांचे कोपरे जिथे मी रमले. त्यातून साकारतं माझं घर. अगदीच लहानपणापासून मी क्वचित दोन वर्षांपेक्षा अधिक काळ एका घरात राहिले असेन. त्यामुळे नेहमीच असं झालंय की, जेव्हा एखाद्या घराची आपल्याला आणि घराला आपली सवय होतेय तेव्हाच ते घर बदलायला लागत होतं. त्यामुळे मला कायमच अनेक वर्ष एकाच घरात, एकाच परिसरात, सारख्या माणसांच्या गोतावळ्यात राहणाऱ्या माणसांचं कुतूहल आणि आकर्षण वाटतं. पप्पा फिरतीच्या नोकरीवर, त्यामुळे त्यांची बदली होईल तिथे जवळपास आमचं कंत्राटी घर असायचं. सगळंच बस्तान सतत नव्याने बसवायला लागायचं. म्हणून मग आजवर जेवढ्या घरात वावरले तेवढ्या घरातले कोपरे मला हवे असलेले मेंदूत साठवून ठेवलेत. तसं म्हटलं तर दहा दिशांनी घर बघता येतं. प्रत्येक दिशेकडून घर निराळं दिसत असतं. माझ्या मनातल्या घराचा आराखडा निरनिराळ्या घरांनी साकारतो. माझ्या घराचे दहा कोनाडे हवेत मला दहा दिशांसारखे.. हे दहा कोनाडे हरेक घरातल्या वातावरणाचे, गंधाचे, हवेचे, हालचालींचे, आवाजांचे, एका घरातून दुसऱ्या घरात नेलेल्या वस्तूंचे, रंगांचे, अनुभवांचे. आज स्वतंत्र राहायला लागल्यावर सुरु केलेय यादी या दहा कोनाड्यांची.
कोनाडा १
पप्पांचं पोस्टिंग महाराष्ट्राबाहेर झालेलं आणि माझा जन्म नुकताच झालेला. त्यात आईची तब्येत नाजूक त्यामुळे मग पप्पा एकटेच नोकरीच्या ठिकाणी आपलं बस्तान बसवायला निघून गेले. इकडे आई, मी आणि माझी मोठी बहिण माझ्या मूळ गावी (पप्पांच्या गावी) राहिलो. गावी आमचं मोठं कुटुंब. जवळपास ४०-४५ माणसांचं जेवण एकाच चुलीवर व्हायचं. त्यामुळे गोतावळा मोठा होता. माझी वयाची ८ वर्ष म्हणजे दुसरीपर्यंत मी गावच्या घरात राहिले. घर दुमजली मोठंच्यामोठं. पूर्वेच्या दिशेला पुढचा दरवाजा, बाहेर मोठं खळं. दरवाज्यातून आत आलं की आडवी लांबच्या लांब पडवी मग ओटी आणि ओटीच्या भोवतीने सर्वांच्या खोल्या तीन काका आणि आमची खोली. वर सारखीच मांडणी तिथे मग भावांच्या खोल्या. पप्पा धकटे त्यामुळे बाकीची सर्व भावंडं वयाने पप्पांच्या आसपास. त्यामुळे मी ८ वर्षांची होईस्तोवर भावांची आणि बहिणींची लग्न झालेली. अशात मग बाळंतपण वर्षाला ठरलेलं असायचं. गावाच्या घरात बाळंतिणीसाठी २ नंबर काकांची खोली मोरी जवळ असल्यामुळे राखीव असायची. घरात बाळ जन्माला आलं की जवळपास २ महिने तरी त्याची वस्ती या खोलीत असायची. मी या घरात राहिले तिथपर्यंत ६ बाळंतपणं या घरात झाली. नकावड्या बाबू-बायला बघायला आम्हा पोरा-टोरांची गर्दी तिथंच असायची. त्या काळात या खोलीतून एक विलक्षण असा गंध दरवळायचा. शेणी, निखारे, ओवा यांच्या धुरीचा खोलीत मिसळलेला गंध, बाळाचा, बाळंतिणीच्या कपड्यांचा, वेखंड, बाळगुटी, भाजकं खोबरं, काळीमिरीची भुकी, मेथीचे लाडू, बाळंतपणाच्या ओल्या कपड्यांचा वास, हे सगळेच गंध सतत रुजलेत मनात. ती खोली जरी काही काळासाठी रिकामी झाली तरी तो गंध मुरून राहिलेला होता त्या खोलीत. आजही ज्या ज्या ठिकाणी राहते तिथे आसपास कुठे ओव्याच्या धुरीचा गंध आला, तर ही खोली नजरेस येते. माझ्या भूतकाळातले अनेक श्वास या गंधासोबत मी घेतलेत त्यामुळे हा कोनाडा अपरिहार्य जागा घेतो माझ्या घराच्या आखणीत.
कोनाडा २
चौथीत होते मी तेव्हा.. आम्ही मुंबईत राहत होतो तेव्हा वाशिनाक्यात. गावातून आता मुंबईत राहायला आलेलो आम्ही. इथं सगळंच वेगळं होतं. चाळीत भाड्याने घर घेतलं होतं पप्पांनी. खोली जेमतेम गावाच्या घरातल्या खणा एवढीच. त्यातच एका बाजूला किचन ओटा नी मोरी. संडासला सार्वजनिक संडासात जायचं. हे सगळंच सवयीचं व्हायला जरा वेळ गेला. गावी मोकळं ढाकळं असणारं सगळं इथे आकसलं. पण शाळा सुरु झाली म्हणून जरा तरी जीव रमत होता. शाळेतनं बाईंनी खाजगी शिकवणी लावायला सांगितली होती अजून चांगला अभ्यास व्हायला म्हणून. आईने ती गोष्ट मनावर घेतली आणि जवळच तिथं असणाऱ्या क्लासमध्ये मला घातलं. माझ्या वर्गातली बरीच पोरं याच क्लासमध्ये होती, म्हणून आईने ओळखीने याच क्लासमध्ये टाकलं. पण ही मुलं तशी माझ्याशी कमीच बोलायची. म्हणून शाळेत होतो तेवढा अभ्यास पुरतो हे आणखी क्लास-फीस कशाला? असंच मला वाटत होतं. कारण बोलायला किंवा मिसळायला इथंही कुणी नव्हतं. क्लासमध्ये कधीच माझं लक्ष लागलं नाही. पण एक झालं त्या दादाच्या घरातली खिडकी मला आवर्जून लक्षात आली. झाडाची मोठी ढोली असते तशी मोठी गोल खिडकी होती तिथे. मुंबईत एवढी मोठी खिडकी आणि एवढं मोठं घर मी पहिल्यांदा बघितलं आणि मला गावाच्या घराची आठवण तिथे यायची. क्लास संपेपर्यंत मी याच खिडकीत बसून राहायचे. या खिडकीतून समोर डोंगर दिसायचा..हिरवागार.. ऊन-पाऊस-थंडीत तो डोंगर झाडाझुडपांनी भरलेला असायचा. ती खिडकी मला गुहेचा दरवाजा वाटायची. जी त्या डोंगरात असेल असं मला वाटायचं. आणि तेव्हा चंपक, छान-छान गोष्टी, अलिफलैला, यातल्या गोष्टींमुळे ते खरंही वाटलं. मी नवीन होते त्यामुळे ना शाळेत ना क्लासमध्ये मित्र-मैत्रिणी झाले नव्हते. मी गावातून आलेली म्हणून सहज मैत्री सुद्धा कुणी करेना. मग या खिडकीत बसून मी खूप किस्से रंगवायचे क्लास संपेपर्यंत. ज्यांच्याशी जेमतेम बोलणं होई, त्यांना मी या खिडकीची गंमत सांगितली. माझी मैत्री झाली. मग आम्ही त्या खिडकीत अजून गोष्टी रंगवत होतो. पण हे जेमतेम पाचवीला गेल्यावर पावसाच्या महिन्यापर्यंतच. कारण पप्पांची बदली झाली आणि आमची रवानगी रत्नागिरीला झाली. पुन्हा सगळं सोडून नवं बस्तान बसवायला आम्ही निघालो. ही माझी खिडकी, गोष्टी आणि नवे संवगडी सुद्धा मागे राहिले. असा एक कोपरा आहे घराचा जिथे ही खिडकी असेल ढोलीसारखी आणि पलीकडे जर्द हिरवा डोंगर नी मागे सुटलेल्या खूपशा गुहेच्या गोष्टी.
कोनाडा ३
सलग तीन खोल्यांचं हे आमचं नवं भाड्याचं घर होतं. सतत फिरतं बिऱ्हाड असल्यामुळे सामान तसं बेताचं. जेवणाची भांडी, मांडणी किचनमध्ये लागली. मधल्या खोलीत नव्याने घरात आलेलं लोखंडी कपाट, आईची शिलाई मशीन, देव्हारा. एकदम बाहेरच्या खोलीत दोन खुर्च्या आणि अभ्यासाचं टेबल. पप्पांनी खास आमच्यासाठी बनवून घेतलं होतं. बाकी घर तसं रिकामं होतं. त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवल्या की आजूबाजूच्या झाडांचा, वाऱ्याचा, कावळा, दयाळ, कुवा कोंबडीचा, टिटवीचा, कुकू कुम्बियाचा (भारध्वज), भुर्ल्यांचा आवाज, आणखी कसल्या चिमुरड्या पाखरांचा आवाज मिसळून एक धून तयार व्हायची. याची साथ द्यायला आईच्या पैजणांचा आवाज त्यात मिसळायचा. तिचा डावा पाय जरासा आखूड त्यामुळे तिच्या पायातल्या पैजणांची धून लगेच ओळखू यायची. आजवर जिथे जिथे राहिलो तिथे तिथे ती कुठं बाहेर गेली आणि परत आलेय हे समजायचं असेल तर तिच्या या पैजणांचा आवाज ही आमची खूण असायची. तर तिच्या पैजणांची छनछन या बाकीच्या आवाजात मिसळायची आणि एक लय निर्माण व्हायची तंद्री लावणारी. खास असा एक कोपरा अगदी ढोलीच्या खिडकीच्या बाजूचा मी आरेखून ठेवलाय माझ्या घरात.
कोनाडा ४
पप्पांची नोकरी रत्नागिरीत कायम झाली पण आमचं घर नाही. मुंबईतून आलो आणि पहिल्यांदा ज्या सलग तीन खोल्यांच्या घरात आम्ही राहत होतो तिथे आजूबाजूला सखल जमीन असल्यामुळे आजूबाजूला पाणी साठायला लागलं. पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसात पाणी घरात शिरलं तेव्हा ते लोटून बाहेर काढायला मजा आली. पण पावसाने जोर धरला आणि पाण्यानेही. मग आई पप्पांनी खोली बदलायची ठरवली. पप्पांच्या मित्रांच्या मदतीने आम्हाला ऐन पावसाळ्यात खोली मिळाली. ही नवी खोली बिल्डींगमध्ये होती दुसऱ्या मजल्यावर. १बीएचके. आयताकृती हॉल होता या घराचा. वर सिलिंगमधून लाईट सोडलेल्या. छतापासून जमिनीपर्यंत सलग मोठी खिडकी. हॉलच्या भिंतींना फिकट लिंबासारखा रंग होता. खिडकीतून भरमसाट प्रकाश घरात येत होता. पप्पांना खास ही गोष्ट आवडली होती. कामावरून घरी आले की ते या खिडकीजवळ बसायचे. रात्री मी आणि दीदी हॉलमध्ये झोपायचो. रात्री लाईट घालवले, पडदे बंद केले तरी या खिडकीतून रात्रीचा प्रकाश हळूच हॉलभर पसरायचा. सुरुवातीला हा प्रकाश अंगावर यायचा पण मग हाच प्रकाश जेव्हा मनाने जड वाटायचं, घरात काही झालं, माझ्या मनाविरुद्ध काही घडलं, कंटाळा यायचा; तेव्हा हाच प्रकाश, घराचा रंग माझा कैक रात्रींचा सोबती झाला. आता पुन्हा या घरात कायमचं जास्त काळ राहणं कधी होईल माहित नाही पण हा प्रकाश मी डोळ्यात साठवून घेतलाय माझ्या. असा प्रकाशाचा कोनाडा घरात जागा घेईल माझ्या.
कोनाडा ५
आमचं रत्नागिरीतलं हे बिल्डिंगमधलं घर आमचं कायमचं होईल असं आम्हाला कुणालाच वाटलं नाही. पण आमच्या मालकांनी ते घर विकायचं ठरवलं आणि आम्ही सुद्धा आता पप्पांची नोकरी संपेपर्यंत रत्नागिरीतच राहणार होतो, त्यामुळे हे घर विकत घेण्याचा आई-पप्पांनी विचार केला. आमचं मूळ गाव सुद्धा जवळ असल्यामुळे मग आम्ही गणपतीला, दिवाळीला, शिमग्याला, असेच मध्ये-अधे गावाच्या घरी जायला लागलो. या घराने दिलेली ही सगळ्यात आवडती गोष्ट होती माझ्यासाठी. गाव जागं राहिलं या घरामुळे माझ्या मनात. माझी जवळपास १० वी ते १५ वी ची वर्ष याच घरात गेली. आणि एक दिवस माझ्यावर या घरातून एकटीने बाहेर पडण्याची वेळ आली. पदवी पूर्ण झाली आणि मास्टर्स मी मुंबईत विद्यापीठात जाऊन करायचं ठरवलं. घर सोडून मुंबईत होस्टेलला आले. घरापासून, माझ्या माणसांपासून लांब असं एकटं राहणं सुरुवातीला खूप जड गेलं. आईने फोनवर सांगितलं की, तू गेल्यावर घरही ओकंबोकं वाटायला लागलं. हे ऐकून मला अजूनच परकं झाल्यासारखं वाटलं. हे कुणाला सांगून समजणार नव्हतं. कारण घरी हे दुःख देणारं होतं आणि इथे प्रत्येकजण या अनुभवातून जात होता. मग माझी खोली हाच माझा आधार बनली. एकटा विद्यार्थी राहिल अशीच या खोलीच रचना होती. पुढे २ वर्ष ही खोली माझं घर झाली. परीक्षेच्या वेळी माझा रात्रभर जागरणाचा अभ्यास, असाईनमेंट पूर्ण करताना पुस्तकांचा आठवडाभर असणारा पसारा, खाऊची पडलेली पाकीटं, इतर मैत्रिणी रूमवर आल्यावर केलेल्या पार्ट्या, मी रोहनच्या प्रेमात पडले तो क्षण, आमचे झालेले वाद, फोनवरून अनुभवलेले प्रेमाचे प्रसंग, जवळकीची ओढ, घरची आठवण येऊन डोळ्यात आलेलं पाणी आणि वाटलेलं एकाकीपण, दिल्ली क्राईम वेबसिरीज बघून मुलगी म्हणून या जगातील असणारी असुरक्षितता, माझी स्वनं अस बरंच काही या खोलीत साठलं होतं या काळात. या आठवणी मला जतन करायच्या आहेत एका स्वतंत्र कोनाड्यात जिथे माझं विश्व अनेक दिशांनी आकार घेईल.
कोनाडा ६
मास्टर्स झालं, पुढे नोकरी करायची असं ठरवलं. घरी परत ये असं घरचे म्हणत होते पण तिथे माझ्या आवडीच्या प्रकाराच्या कामाच्या संधी नव्हत्या आणि त्यासाठी मला मुंबईत राहणं अपरिहार्य होतं. मग मी मुंबईला माझं घर करायचं ठरवलं. मास्टर्स झालं; होस्टेलची खोली सुटली. सुरुवातीला नातेवाईकांकडे राहिले. पण ते माझ्या कामाच्या वेळापत्रकानुसार जुळणारं नव्हतं. कारण या शहराला सकाळी ४ ते रात्री १२ अशी कामाची ठरलेली वेळ आहे आणि याच घड्याळात सगळे फिरत असतात आणि माझं या वेळेशी कधीच जुळलं नाही. मी माझ्या वेळेनुसार काम करणारा प्राणी. त्यामुळे नातेवाईकांचं घर मला लाभलं नाही. आता लगेच एकटं भाड्याने राहणं पैशांकडून जमणार नव्हतं म्हणून मग ४ मुलींबरोबर एकत्र राहिले. रूम जेमतेम. त्यात मी घरून काम करणारी. गणितं माझीच चुकत होती म्हणून मग मी बोरिवलीत लायब्ररीत जाऊन काम करायला लागले आणि तिथेच बसून पुस्तकंही वाचायचे. लायब्ररी बंद होईस्तोवर हेच माझं घर झालं. चारीबाजूने पुस्तकांच्या कपाटाच्या भिंती, मधोमध बसायची लांबसडक टेबलं, चहुबाजूने कुणीतरी कुणासाठी तरी सांगितलेल्या हजारो गोष्टी आणि निश्चल शांतता. असा घरात एक कोनाडा हवाच आहे. जिथे आजूबाजूच्या कोलाहलातून, गर्दीतून, गतीतून कुणाच्या गोष्टी धड ऐकायला मिळत नाहीत त्या शांतपणे ऐकता येतील, वाचता येतील.
कोनाडा ७
खुप घरं बघितली. प्रत्येक घराचा आकार, रचना, उंची, खोली, रंगसंगती एकाहून वेगळी. माझ्या घराची रचना ही या प्रत्येक घराची आठवण करणारी असावी हेच वाटत राहतं. जेणेकरून मला माझे काही अविस्मरणीय क्षण पुन्हा पुन्हा अनुभवता येतील. या घरांची विशेष बाब आहे माझ्या मनात. म्हणजे आजवर जेवढ्या घरात राहिले त्या घरांच्या भिंतीच्या रंगाचे ठसे उमटलेत नजरेच्या पटलावर. गावच्या घरात चूल म्हणून तिथल्या भिंती विना प्लास्टरच्या. धुरामुळे त्या भिंती आपसूकच मातकट, काळपट झालेल्या. जणू त्या भिंतीचा तोच नैसर्गिक पोत असावा. एका घरातल्या भिंती कोवळ्या पानांच्या रंगासाख्या. पावसाळ्यात पत्र्यातून पाणी गळून जिथे पाणी साचेल तिथे बुरशी लागायची आणि काळ्या-पांढऱ्या रंगांचे नाना आकार भिंतीवर उमटायचे. पाणी सुकून गेलं तरी हे आकार कायम राहायचे. चित्रकाराने कागदावर आकारांचं टेक्स्चर केल्यासारखं. काकणे काकींच्या घरात राहायला आलो तेव्हा त्यांना आम्ही घरात राहायला येण्याआधी निक्षून सांगितलं होतं की आम्हाला घराच्या भिंतींना हलका पिवळा रंग मारून दिला तरी चालेल किंवा आम्ही करून घेतो. पण नवा भाडेकरू राहायला येण्यागोदर त्याला मालकांनी खोलीला रंग काढून देण्याची पद्धत असल्यामुळे त्यांनीच रंग काढला. यातली गंमत अशी की त्यांनी भिंतींना हलका पिवळा ऑईलपेंट रंग काढला. का तर तो जास्ती काळ टिकतो म्हणून. आम्हाला खोली लगेच हवी होती त्यामुळे त्याच रंगात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. बाकीच्यांना कुणाला हा रंग आवडला नसला तरी मला हा रंग जाम आवडला. माझ्यातला चित्रकार याच भिंतींवर पोसला गेला. कारण स्केचपेनने भिंतीवर काही काढलं तरी ते लगेच पुसलं जायचं मग भिंती आणि आईचा मार, ओरडा यापासून मी असे दोन्ही शाबूत राहायचो. या केवळ भिंती नव्हत्या माझ्यासाठी. कोणे एकेकाळी डोकं टेकून विचारांना सोबत करणाऱ्या, नवी उर्जा जागवणारा आधार होता माझ्यासाठी. त्या भिंती सोबती असायच्या. त्या घरांपासून त्या मला विलग करता येणार नसल्या तरी त्या जागत्या ठेवायला हव्यात माझ्या घरात.
कोनाडा ८
लाकडाचा माच, बाजूला सरपणासाठी काढलेली लाकडं, भाता, ऐरण, अण्णांची हत्यारं, आजूबाजूला पसरेली राख आणि त्यात आम्हा तिघींचा मांडलेला भांड्या-भांड्याचा खेळ. साधीशी खुपी. म्हणून शेणाने सारवलेल्या मातीच्या भिंती, वर गवत टाकून केलेलं छप्पर. माझा मामाकडचा महाल. हा शक्यतो हुबेहूब माझ्या घरात उभा करण्याचा आटोक्याने प्रयत्न करतेय. आज तो माझ्या मामाच्या घरातून नामशेष झालाय, नवं घर बांधलं म्हणून. पण तो माझ्या नोंदीत कायम आहे. अण्णांकडे भात्यावरची कामं कधीतरी यायची म्हणून मी, दीदी आणि बाय (मामाची मुलगी) आम्ही तिकडे गेलो की या खोपीत आमचा संसार थाटायचो. आईचं माहेर खाडी किनाऱ्यालगतच. त्यामुळे शिंपले, करपं, शंख, वाळू, खडे, करवंट्या, वापरेल्या बामच्या बाटल्या, खराब झालेल्या पोफळी, पोचे नारळ हीच आमची भातकुली होती. डोक्यावर टॉवेल गुंडाळले की आमचे मोठे केस व्हायचे, एखादी ओढणी अंगाला गुंडाळली की साडी, मग आमचं आमचं घर तयार व्हायचं आणि जेवण खाणं शिजायचं. मी पाचवीला होते, आम्ही रत्नागिरीत होतो तेव्हा. एक दिवस अचानक मामाचा फोन आला बाय आजारी आहे. धड जेवत नाही, खात नाही, खाल्लं की उलट्या करते असं सगळं मामा सांगत होता. तिला रत्नागिरीत आणतोय. तिच्या तपासण्या झाल्या. तिची अन्ननलिका बंद होतं आलेली जेमतेम पातळ पदार्थ जातील एवढीच जागा आहे आणि हा आजार तिला जन्मजात आहे हे आम्हाला समजलं. ऑपरेशन हाच उपाय शिल्लक राहिलेला. तिला लगेच कोल्हापूरला हलवलं. तिथे डॉक्टर म्हणाले मुलीचं वय ६ वर्ष आहे, ऑपरेशन नंतर कदाचित ती पॅरलाईज होण्याची शक्यता आहे. सगळ्यांनी किमान बाय जगेल म्हणून ऑपरेशनला हो म्हटलं. पण कदाचित बायची तशी तयारी नव्हती. त्या रात्रीचं बाय गेलं. आम्ही सगळेच मामाकडे गेलो. बाय अवघी ६ वर्षांची म्हणून तिला जाळणार नव्हते. खोपीत पुरायचं ठरलं. जेणेकरून ती घरात राहील. ते वातावरण आजही अंगावर काटा आणतं. सगळे नातेवाईक खोपीत गेलो. मामा जीवाच्या आकांताने रडत होता. मामीची, आईची तर शुद्धच गेलेली. या सगळ्यात माझं लक्ष खोपीतल्या खेळायच्या भांड्यांवर होतं. त्या भांड्यांसाठी बाय उठावी असं वाटतं होतं. पण ती गेलीच निघून. जगायचं अर्धवट सोडून. नंतर कधीतरी मी ती भांडी माझ्या घरी आणली. बायची खेळणी म्हणून. कारण पुन्हा आम्ही मामाकडे भांड्यांनी खेळलोच नाही. मग मामाने जुनं घर कोसळून नवं बांधलं तेव्हा ती खोपी सुद्धा गेली. तशी खोपी उभी करायची आहे. अगदी हुबेहूब. कदाचित मला अजून वाटतं की बाय येईल तिथे माझ्यासोबत शिल्लक राहिलेले भांड्यांचे खेळ खेळायला.
कोनाडा ९
मन घाली पिंगा पिंगा भोवती गाजे रानवारा गुज सांगे हिरवाईचं मला मातीचा निवारा
शहरात जास्त राहतेय मी. आधी शिक्षणानिमित्त, आता कामानिमित्त. घर बदलणं ही आता सवयीची गोष्ट झाली माझ्यासाठी. माझ्यासाठी ती घर ही केवळ भावना न राहता ती केवळ तात्पुरती गरजेची बाब झालेय. आधीच्या घरांसारखं मन असं कोणत्या चौकोनात रमत नाहीयेय. वर्षागणिक घर बदलावं लागतं. त्यामुळे घर होतच नाही ते. त्यात शहरात घर म्हणजे एकमेकांवर रचलेले ठोकळे. आजूबाजूला असेच अनेक मजली ठोकळे. जे पहाटे घाईने काही वेळासाठी उजळतात आणि रात्री उशिरा केव्हातरी झगमगतात. संपूर्ण दिवस इथे कुणी राहतं, ही घरं आहेत अनेकांची असं म्हणताच येत नाही. निर्जीवपण जाणवत राहतं सतत. आणि ठोकळ्यांची रचना अशी की आपणच आपल्याला दिसू नये. आदिम अवस्थेपासून दूर घेऊन जाणारी शहरांची रचना असं नेहमीच वाटतं मला. अशावेळी गाव आठवतं मला नेहमी. खरंतर आमची वाडी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली. भोवतीनं सगळं जंगल. माझं बालपण, अगदी रत्नागिरीत कायमचे राहायला आल्यावर सुद्धा सतत गावी जात असल्यामुळे तसं गावातच गेलं. आजूबाजूचा निसर्ग हा रोजचा घटक होता आमच्या जगण्यातला . प्रत्येक ऋतूत त्याचं रुपडं वेगळं मग ते आमच्या व्यवहारात सुद्धा यायचं. बाहेर ढग दाटून एकत्र आले की पावसात घर भिजून हळवं व्हायचं. एक दमटपणा सर्वत्र भरून रहायचा. लावणीचे दिवस असायचे, त्यामुळे ओल्या मातीची पायचळ घरभर असायची, त्या सोबत येणारा मातीचा नी रानाचा वास. हिवाळ्यात हेच घर अगदी टणक व्हायचं हवेतला गारठा आपल्यात मुरवून थंडीची कडाकी आणि भिंतीची उब आमच्यात भरायचं. कापणीचे दिवस जवळ यायचे. भाताच्या पेंड्यांनी खळं भरून जायचं. रानातले दवाचे थेंब खळ्यात विसावायचे नी सकाळी ठिपक्यांचा सडा खळंभर पडलेला असायचा. अशावेळी वाटायचं रात्री निरभ्र आकाशात चांदण्याचा खच असायचा तोच या पेंड्यांवर दव म्हणून पडत असेल. उन्हाळ्यात एक पिवळसर चुलीतल्या मंद आगीसारखा प्रकाश घरभर पसरायचा. वाऱ्याच्या झुळकेबरोबर ऊन घरात शिरायचं. या दिवसात घरं मोकळी असायची. रात्री मळीत आम्ही सगळेच झोपायचो. दिवसभर तापलेली जमीन मग रात्री पोटातला थंडावा बाहेर उत्सर्जित करायची आणि मग हलकेच सारं थंड थंड व्हायचं. निसर्गाशी बंध जोडलेला असायचा नेहमीचं. या शहरात ते हरवून गेलंय. माझ्या घराचा कोनाडा निसटू द्यायचा नाहीयेय.
कोनाडा १०
चिरे, माती, वाळू, दगड, सिमेंट, पत्रे, कौलं, रंग, सजावटीचं सामान यांनीच फक्त घर उभं राहत नाही. तिथे माणूस, निसर्ग यांच्या साहचर्याने उभी राहते घर नावाची वास्तू. माणसाच्या गोष्टी, त्यांचे आवाज, घडण-बिघडण त्यात असतं. प्रत्येकासाठी हे स्वतंत्र असतं. माझ्यासाठी घर ही संकल्पना चित्रासारखी आहे. घराच्या वेचलेल्या तुकड्यांचं अनुकरण करून शक्य तेवढं ते जिवंत करणं. सतत फिरता मुक्काम सटवाईनं कपाळी गोंदवला माझ्या. मग एक घर असं झालंच नाही आणि सगळी घरं माझी नाहीत. आता जे कोनाडे हवेत तेच सोबत घेऊन एका घनदाट जंगलात ते उभे करायचे आणि निसर्गाशी असलेला सहसंबध आपलासा करायचा नी आपला घरबदलीचा हा संचार थांबवायचा. माझ्या नजरेचा हा दहावा कोनाडा ज्यात आधीचे नऊ कोनाडे तपशिलासहित घोटलेत. सतत या घरातून त्या घरात फिरणं अलिप्त करत जातंय माझ्यापासून मला. हे वेळीच लक्षात घेऊन आज रीतसर मांडामांड केली माझ्या मनातल्या घराची. जेणेकरून कोनशिला बसेल घराची आणि उभं राहिल माझं संचारमुक्त घर.