शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर
डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना आणि इतर तीन कविता
5
back
डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना
डेरेदार वृक्षांच्या सावलीतून बाहेर पडताना,
काळजाला टोचणाऱ्या सुचिपर्णी सुया
गिरवतील त्यांच्या कपाळी लिहिलेलं
टोकदार भवितव्य.
केवळ हिशोबी तरतूद वगैरे ठीक पण,
झाड वाट्टेल तेव्हा जबान्या द्यायला तयार होईल?
भूतकाळाच्या तळाशी गळ टाकून बसलेला तू
आता तरी पराभूत उद्यानांचा सूड उगवायची शपथ
देशील काय तुझ्या तीक्ष्ण अंदाजांना?
वाती जाळत अंधाराची वाट पाहत
बसलेले तुझे मलूल पाय,
केवळ गडद शाईतील फसवी इंद्रिये
बधिर होण्याची शक्यता घोळवत
राहतील.
शक्यतो बेचव तपासकार्य चालूच ठेव.
तुझ्यासाठी राखून ठेवलेला काथ्याकूट राहील तसाच
अन् बाकी जेमतेम विचकट हावभाव विरघळू दे
कणखर सालीच्या
एकसुरी वृक्षांनी आक्रमिलेल्या सावलीत.
तू मात्र पुढे हो तसाच,
नकोसच संकोच करु त्या सावलीभोवती
फेर धरण्याचा,
कारण व्याकरणाचे स्पष्ट नियम
तुलाही लागू होतील.
सावलीतून बाहेर पडण्याचं धारिष्ट्य तर ठेव!
***
तीर्थरूप.. अर्करूप!
मानेचं हाड बाक आल्यानं
अधिकच वाकलेलं,
कडक झालेलं,
शेवटाला माखलं
तुपाने गावरान...
गालाचं हाड वर आल्यानं
नाकाचा शेंडा अधिकच तरतरीत,
पण तरीही
आखीव रेखीवपणा शाबूत
तंतोतंत!
खोल गेलेल्या आवाजातील
जरब, क्षीण होत गेल्याची नोंद कोरलेली
मनपटलावर कायमचीच.
नंतरच्या बऱ्याच रात्री आणि
दिवसाही
ठसकलेला संथ आवाज
कानात घुमल्याचा भास होऊन गलबलून
आलं. वेडात निघालो त्यापायी.
थापी, रंधा, नैल्या, वळंब्यात
कासावीस गुतलेला जीव,
त्याची घालमेल खूपदा बोलून
दाखवलेली.
उभी जिंदगानी अगदी दोरीतलं जगणं,
'बांधकामात गहूभर देखील दोष असून चालत नाही'
ही त्यांच्यातील कारागिराची शिस्त
जणू पालुपदच!
शेवटून दुसऱ्या रात्रीचं अजब वागणं
थोर मनात साठवणं तसं मुश्किलच.
कधी नव्हे ती
चहा सोबत खाल्लेली बिस्किटं
दिलासा देणारी ठरावीत इतकं
आशादायी चित्र रात्री सोबतच
गडद होत गेलेलं...
कोणत्या शपथा देत असतील त्याच्यासह
त्याच्या आतील
हॅम्लेटला, त्याच्या आतील हॅम्लेटच्या अन्
त्याच्याही बापाची भूतं?
स्मरणांचं यथार्थ लिंपण
अवघ्या आयुष्याभोवतीच घातलेलं
अभावाच्या परिपक्वतेनं:
माणसाचं निरंतर 'पेटणं' हे
विझण्यासाठीच.
***
रोज एक-एक बोट
कमी-कमी होत जाणार
तुमच्या समर्थनाखातर
उंचावलेलं.
भाषावार तिरस्कार, घृणा
आणि अपशब्दांचा कोष
संपादिला जाईल.
हळू-हळू चांगली माणसंही
लगोलग नाहीशी होतील.
अभिव्यक्तीच्या दर्पणाला
असंख्य तडे जातील.
आजवर जपलेल्या असंख्य
भाव-भावना, गोडवा, गाभूळ संवेदना
यांची जिवंत समाधी केली जाईल.
कवितेतील प्रेम, रास, राग, लावण्य
दूषित होईल.
जगण्याचा श्वासही ह्या कोंडमाऱ्यात
अचेत होईल.
अविनाशी अंधारही तुमच्या
मालकीचा नसेल.
कदाचित हे सर्व घडेल.
कदाचित हे सर्व घडेल!
***
काही पाणीदार गोष्टी
घरा-दारावर नेहमी कोसळणारा
दुरान्वयी बेताल अवकाळी,
कोसळू पाहणाऱ्या खिन्न भिजट भिंती,
शिमिटचे दोनपाखी पत्रे,
बेताल ठणक्यावर धावणारी एकूण-एक पन्हाळी
हुप्प्यानं गेल्या साली कोच पाडलेली,
काही पोरांनी छतावर पाय देऊन
तडा गेलेल्या,
तर काही अगदी जुनाट म्हणून
कुचकामी!
एकूणच
काहीतरी बिनसल्यासारखं
घर गळतंय
याच्याही खूप अगोदर–
उन्हाच्या कसोशीनं चेकाळून शेणखत
भरताना, आतून-आतून खूप घामाळून
पावसाची केलेली मनोमन आर्जवे आठवतात.
त्यातून निरुत्तरीत ढेकळांवर बरसणारा तू
मला आतुर आणि मुक्त करून गेलास,
जणू काही पुन्हा माघारी परतायचंच नाही असं ठरवून.
वर्तमानात सबंध उपखंडातील
पट्टीचे तज्ज्ञ पावसाचे अंदाज
बांधत असतीलही पण
चिक्कार पडला किंवा बोंब ठोकली म्हणून
धारेवर धरणारे पारावरचे गप्पीष्ट यांच्या
सासुरवासाला अजिबात न कंटाळता
नेमेचि येणारा!
पाचटाचं जुनाट सप्परच की (हो सप्परच!)
आणि तशात
घरात नणंद-भावजयी दोन्हीही लेकुरवाळ्या...
घोटाळणारं वावधान आणि अचानक छप्पर एकाएकी पाचटासकट गायब!
'पोर्शन संपला'
असं जाहीर करताच आवाक होऊन पाहणाऱ्या
मुलींसारखं पाहत आम्ही सर्व तंतोतंत निरुपायी!
पण त्यातही आजीनं हेटाळणीखोर पद्धतीनं
खरपूस समाचार घेतलाच!
त्यानं तो लज्जित नाही झाला तरच नवल!
***
चित्र सौजन्य: कानो एईतोकू
शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर हे महाविद्यालयीन स्तरावर १३ वर्ष इंग्रजी विषयाचे अध्यापन, संशोधन आणि अनुवादकार्य, कविता लेखन, प्रासंगिक लेखन करतात. तसेच ते तरल कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाकरिता ग्रंथ-अन्वेषक आणि वक्ता म्हणून कार्यरत आहेत.
Very nice poems.
अतिशय सुंदर लेखन तक्ते सर
मनाला भावणाऱ्या कवितांचे आपण लेखन करतात याचा मनस्वी आनंद वाटतो
गहिरे विश्वात नेऊन सोडणाऱ्या कविता
Very nice poems. sirji
इंगजीच्या प्राध्यापकाकडे मराठीचे शब्दभंडार
खूप भारी कविता
मनाला भावणाऱ्या कविता. छान कवितांचा संग्रह आहे