शिल्पा कांबळे

स्टेशन ते स्टेशन

back


नाही! मला ही शिक्षा मंजूर नाही.” जजसमोर पहिल्यांदाच तो एवढा मोठ्याने ओरडून बोलला नि मग बेंचला पकडून हमसाहमशी रडू लागला. अश्रूंची जुजबी किंमत करणारी मोजकी माणसे कोर्टरूममध्ये हजर होती व त्यांचे सर्व लक्ष उंच खुर्चीवर बसलेल्या जजकडे होते.

इकडे बुद्धी, अनुभव व सत्ता यांचे शक्तीशाली दोर हातात असणाऱ्या जजना आरोपीचे हे वर्तन अपेक्षितच होते. ते थोडे थांबून, पण ठामपणे म्हणाले, “यंग मँन, याचा विचार तू अपघात करतांना करायला हवा होता.”

एसी असूनही आरोपीच्या सर्वांगाला घाम फुटला आणि सहा महिन्यापूर्वी घडलेला तो प्रसंग त्याच्या डोळयासमोर धूर होत पसरला.

घाईघाईत गाडी रिवर्स करतांना एक सहा वर्षाच्या शाळेतून परतणाऱ्या मुलीचा चिंधी झालेला चेहरा. आधी कधीच न पाहिलेला, नंतरही कुणी पाहू न शकणारा, भविष्याच्या असंख्य शक्यता नष्ट झालेला निष्प्राण चेहरा.

अपिल करूनही पुन्हा तीच शिक्षा कायम. त्याने वकीलाकडे बचावासाठी पाहिले. खरंतर रग्गड फी घेऊन आपले काम चोख केलेल्या वकिलाला त्याच्या श्रींमत अशिलाला मिळणारी ही शिक्षा अपेक्षितच होती. वकिलाने मान खाली घालून घडयाळात पाहिले. अजून बरोबर १६ तासांनी आरोपीची एका झटक्यात न संपणारी व बरोबर वर्षभर चालू राहणारी शिक्षा सुरू होणार होती.

जजने टाईपिस्टकडे वाक्य फेकली. आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्याचे ड्रायव्हिंग लायसेंस कायमस्वरूपी जप्त करण्यात यावे. निष्काळजीपणे गाडी चालवून इतरांच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी सरकारने हा अभिनव कायदा पास केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी कठोर शिक्षा ठोठावण्यात येत आहे. नाव..वय.. निवासाचा पत्ता.. यांना उद्यापासून दररोज ३६५ दिवसांसाठी विरार ते चर्चगेट असा सेकंड क्लास रेल्वेप्रवास सकाळी ८ ते ९.३० या वेळात करण्याची शिक्षा देण्यात आलेली आहे. प्रवास सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी त्यांनी विरार रेल्वे पोलिसी दप्तरात तर प्रवास संपल्यानंतर दहा मिनिटात त्यांनी चर्चगेट रेल्वे पोलिसी दप्तरात आपली हजेरी रहावी. अपिल डिसमिस.


ती फुलपाखरांच्या वयाची होती नि तो..चुकलंच. ती फुलाच्या वयाची होती नी तो तिच्यासाठी वय विसरून भुंगा झाला होता. सत्तेचाळीस वय हे तसे मोठेच ना लग्न करण्यासाठी, पण शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवणे मग परत चांगली नोकरी सुरू कऱण्यासाठी बाजारात आलेले नवीन शिक्षण घ्यायचे. असे करण्यात वेळ सुपर फास्ट गाडीसारखा धाड धाड निघून गेला. आपलं स्वतःचं लग्न हातातून निसटलेल्या आजारी आईचं त्याच्या मोठ्या बहिणीला सारखं टुमण असायचे की वेळेवर लग्न करा म्हणून. पण बहिणीची लग्नाची वेळ निघून गेली..चुकलंच ते. बहिणीने मुद्दाम लग्नाची वेळ जाऊ दिली. सुरवातीला कारण मिळत नव्हते. मग आई आजारी पडल्यानंतर तिला संभाळण्याचे असे काही एक कारण बहिणीने मनाशीच ठरवून टाकले.

तर त्या ३२० स्केअर फूटाच्या खिडकी उघडत नसलेल्या घरात त्याने पहिल्यांदा तशी मैत्री झालेल्या त्याच्या गर्लफ्रेंडला आणले. आजारी आई इस्त्री केलेली साडी व सोन्याचे दागिने घालून पलंगावर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसानंतर अशी तरतरी दिसत होती. बहीण खाण्याचे चुरचुरीत पदार्थ खुर्चीवर ठेवून, टिव्हीवर कॉमेडी शो लावून वहिनीशी गप्पा मारत बसली होती..चुकलंच ते.

मैत्रिणीने आताच त्याला व्हॉट्सअप केला होता. नो नो. खरं कारण तुझं घर सेंट्रलला नि माझं आॅफिस वेस्टर्नला आहे हेच रे..


त्याचे बायकोवरच्या प्रेमाला हनिमूनपर्यंतच आयुष्य होते. अवलक्षणी बायकोची सर्व लक्षणे तिच्यात होती. खोटे बोलणे, इतरांशी तुलना करणे, नसलेल्या संपत्तीची हाव धरणे, सासू सासऱ्यांशी भांडण करणे, हाॅटेलचे जेवण याच्या पैशाने खाणे, स्वतःचा पगार सेव्ह करणे, वस्तू फेकून मारणे, इंग्रजीत शिव्या देणे, पोलिस स्टेशनची धमकी खरी करणे हे आणि इतर खूप.

तिच्या मैत्रिणींशी ती शेअर करायची ती अवलक्षणी नवऱ्याची सारी लक्षणे त्याच्यात होती. इनसेंसिटीव्ह असणे, पाॅर्नचा नाद असणे, न धुतलेल्या पँटी वापरणे, घरकाम न करणे, तीन वेळा गरम जेवण लागणे, माहेरच्या माणसांशी तुसडेपणा करणे, पगार पार्ट्यांमध्ये उडवणे, हिऱ्याचे दागिने न घेता येणे हे आणि इतर खूप.

त्यांना दोन मुले होती, दोन नोकऱ्या होत्या, दोन वेळापत्रके होती. एक सामायिक किचन व बेडरूम होते.

नेहमी सारखे युद्धानंतरचे नुसतेच तहाचे दिवस चालले असतांना, आज त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला होता. बायकोचा मोबाईल पासवर्ड हॅक केल्याचा त्याचा आनंद थोडावेळही टिकला नव्हता. व्हिडीओ क्लिपचे शूटींग एकदम अनप्रोफेशनल होते पण नायिकेचे शरीर त्याच्या रोजच्या सवयीचे होते.

घटस्फोट..स्टेशनजवळ..शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या माझ्या घराचे हफ्ते भरायला काय तुमचा बाप येणार होता.


वर्गयुद्धाची परिभाषा कळण्याआधीपासूनच तो त्याच्या होमोसेपियन सेपियन पूर्वजांसारखा हिंसक होता. दुसऱ्यावर होणारा अन्याय तो सहन करू शकायचा नाही. स्वतःवर होणारा अन्यायाचा तर प्रश्नच येत नव्हता. परधर्मीय, परजातीय, परप्रांतीय व परवर्गीय माणसांना तो शत्रूवत समजायचा. श्रीमंत शेजाऱ्यांनी रात्री मोठ्याने गाणी लावली की त्याच मध्यरात्री त्यांच्या वायरचे कनेक्शन कट करण्याच्या गँगचे नेतृत्व त्याच्याकडे असायचे. घरी असा तर काॅलेजातही तसाच होता. होयरे वर्गाच्या मैत्रिणीचा हात त्याने त्याच्या पँटीपर्यंत कधीच येवू दिला नाही. हां, हे करतांना त्याच्या मनोनिग्रहाची कसोटी लागली. पण तोपर्यंत त्याने क्रांतीप्रतिक्रांतीची शेकडो पुस्तके वाचली होती. पुढे यथावकाश मिळालेली नोकरीही तो गुलामासारखी नाही तर मालकासारखी करीत होता. दुपारी सॅंडवीच खाताना रस्त्यावरच्या मुलांसाठीही आठवणीने चार पार्सल घेणे, फसविणाऱ्या मोलकरणीला परत परत उधारीने पैसे देणे, जुन्या मित्रांच्या दारूचा खर्च जबाबदारीने करणे, वडीलांच्या खासगी मालमत्तेवरचा आपला हक्क सोडून देणे, यासारख्या गोष्टी करून तो त्याच्यापुरता तरी आदर्शवाद जपत होता.

तर आज पहिल्यांदा अशी दुप्पट पगारवाढ झाल्याने त्याने स्वतःवरच सूड घ्यायचा निश्चय केला. तावातावाने फलाटावर जाऊन एक वर्षाचा फर्स्टक्लासचा पास त्याने काढला. आता दररोज सकाळी संध्याकाळी सर्वहरा तो व इतर सर्व यांच्यात तीव्र वर्गलढा होणार होता.


तिने चहा पीत पीत पेपर खोलला व वाचण्याचा प्रयत्न केला.तामिळनाडूमध्ये जलकट्टुला परवानगी मिळाली. बिनमहत्त्वाची बातमी. तिने पान उलटले तर पुढच्या पानांवर जाहिरातीच जाहिराती. ती तिथेच थांबली व पेपर ठेवून दिला. वाचायला तिला वेळही नव्हता. आता घरातून निघायले हवे. .१५ ची महिला लोकल गेली की ट्रेनमध्ये चढायला शक्यच होत नसते. ती धावत फलाटावर पोहचली तेव्हा खरंच ८.१५ची ट्रेन तिच्या डोळ्यासमोरून निघून गेली होती. उगाच पेपर वाचत राहिलो, तिने पोटावर हात फिरवीत गर्भातल्या बाळाला सांगितले. तीन महिन्याचा इवलासा गर्भ तो पण आईचे सगळे मनातले त्याला कळायचे. आपल्याकडून होईल ती मदत ते आपल्या नोकरीदार आईला करायचे. उलटया नाही की चक्कर नाही की पोटात मळमळ नाही.

त्याची आई आता जोर लावून, धक्का बुक्की करत ट्रेनमध्ये घुसत होती. तिला जमत नव्हते. चवथी ट्रेनही हातातून निसटली. इंडीकेटर अमानुष होत होता. वारंवार आॅफिसला दांड्या मारून कसे चालेल. नंतर आठव्या महिन्यात सुटी नको का मिळायला, तिने परत पोटावर हात फिरवित बाळाला सांगितले. बाळाने श्वास रोखला. मग आईने खांद्यावरची पर्स पुढे घेतली, ओढणीची गाठ मारली, मोबाईल रूमालात गुंडाळला नि थेट जलकट्टूच्या शर्यतीत उडी घेतली.

बैलाच्या शेपटीला करकचून पिरगाळणारी गर्दी. बाळाने जन्माआधीच रक्ताची अंघोळ केली होती.


जेंट्सच्या डब्यात. शी! तो डबा काय लेडीजसाठी असतो. मंदा तिच्या मैत्रिणीवर खेकसली.

मैत्रीण मंदाला फार वर्षापासून ओळखते म्हणून तिच्या या खेकसण्याला ती लाईटली घेवू शकते. मंदा व तिच्या मैत्रिणीने एकाच दिवशी डिपार्टमेंट जाॅईन केले होते. दोघींचा लंच ग्रुपही एक होता. दोघींनी एकाच वर्षी खात्याअंतर्गत परीक्षा पास केली. पण मग मंदा पुढे गेली व तिची मैत्रीण मागेच राहिली. किंवा आॅफिसमधल्या हेडक्लार्कला वाटते तसे मंदा मागे राहिली तिची मैत्रिण पुढे गेली. लग्न झाले म्हणून मैत्रिणीने प्रमोशन घेतले नाही आणि इकडे मंदाचे लग्नच झाले नाही व तिने त्यावर्षी प्रमोशनही घेतले.

मंदाला मंगळ होता हे लग्न न जुळण्याचे कारणही असू शकेल पण आता मंदाने आपल्या बॅचलर लाईफस्टाईलशी जुळवून घेतले होते. स्वभाव चिडचिडा झाला होता पण दर महिन्याला फेशियल करत असल्याने चेहऱ्यावर तुकतुकी होती. मंदाच्या मैत्रिणीला तिच्याबरोबर पार्लरमध्ये जायला कधी जमायचे तर कधी जमायचे नाही. मंदाचे घर व मैत्रिणीचे सासर दोन्ही शेजारी शेजारी होते.

रोजच्या प्रमाणे आताही दोघी एकत्र आॅफिसवरून निघतील. दोघींची घरे वेस्टर्न लाईनला आहेत. पाच पंचवीसला निघाले की पाच चाळीसपर्यंत दोघी चालत स्टेशनजवळ येतात. ब्रिज क्राँस करण्यासाठी पळत गेले तर सात व चालत गेले तर दहा मिनिटे लागतात. जर सात मिनिटात ब्रिज क्राॅस झाला तर पटकन पाच एकोणसाठची विरार लोकल मिळते. नाहीतर त्याच्या नंतर एक अंधेरी व दुसरी बोरिवली लागते. म्हणून जर ही विरार सुटली की दुसरी विरार यायला दहा मिनिटे लागतात व लेडीज डब्याजवळ पळत पळत गेले तरी सीट मिळत नाही व पुढचा प्रवास उभ्याने.

पण एकदा गरोदर राहण्यापूर्वी मैत्रीण तिच्या नवऱ्याबरोबर सुटीवर पर्यटनाला गेली होती. मंदा त्या दिवशी एकटीच धावत धावत फलाटावर आली. समोर जेंट्स डबा. ट्रेन सुरूच झालेली. एकतर आतमध्ये घुसा नाहीतर दहा मिनिटांनतरची दुसरी ट्रेन. मंदाने डब्यात उडी घेतली. स्टेशन येत येत गेली तसा डबा खचाखच भरत गेला. सगळे पुरूष. घामावाले, अत्तरवाले, धक्का वाचवणारे, चोरून बघणारे, मोबाईल मध्ये रमलेले, हिंदी बोलणारे, गुजराती समजणारे, मराठीत शिव्या देणारे. मंदाच्या शरीरापेक्षा वेगळे शरीर असणारे.

तेव्हापासून खूप वेळा मंदा न धावता सावकाश ब्रिज क्राॅस करते व विरार लोकलचा जेंट्स डबाच पकडते.


त्याचे नाव अशफाक शेख होते व तो गोवंडीच्या झोपडपट्टीत रहात होता. झोपडपट्ट्या तर तुम्ही खूप पाहिल्या असतील. अंधारलेले रस्ते, गुदमरलेले श्वास, अंघोळ न केलेली मुले, आंबलेले जेवण, डोक्यातल्या उवा काढणाऱ्या बायका, खोकल्याची उबळ आलेले म्हातारे नि काम सुटलेली मुले. पण गोवंडीची झोपडपट्टी या सर्वसाधारण झोपडपट्ट्यांपेक्षा भयानक व बदबूदार होती.

तर अशा या बकाल वस्तीत राहणारा आरिफ असा बस्तीसारखा नव्हता. त्याला रोज अंघोळ करायची, शर्टावर सेंट मारायची, ताजे जेवण खायची आणि मस्जिद बंदरच्या वखारीच्या दुकानावर कामाला जायची सवय होती. अंगावरचा घाम काढणाऱ्या कोणत्याच कामाला तो ना करायचा नाही. चूपचाप न कुरकुरता हातगाडीवरून वखारीतील माल पाहिजे तिथे देवून यायचा. त्याची एकच कमजोरी होती कुणीही गालीगलोच केलेला त्याला सहन व्हायचा नाही. त्याचा शेठही चांगला माणूस होता. लस्सी बोल, नाष्टा बोल, चहा बोल मागेल तेव्हा उचल बोल तो अमनला नाराज होवू द्यायचा नाही. अमनवर एकदम भरोसा असलेल्या शेठचा प्रॉब्लेम एवढा होता की त्याची जबान गंदी होती. शेजाऱ्याची वखार उघडली नि त्याची वखार जर उघडली नाही की शेठ अमनला आईबहिणीवरच्या शिव्या द्यायचा.

मग आज अकबरने निर्णयच घेतला. टायमावर पोहोचायचेच. पनवेल का ट्रेन फुल, बेलापूर का ट्रेन फुल नेरल का ट्रेन. अंदर नही जानेको मिला ना. अकबर थरथरत्या पायाने थेट गाडीच्या टपावरच चढला. तिकडे अजून सहासात सराईत मुले त्याच्याआधीच उभी होती. नावापुरती थांबलेली गाडी परत वेग घेवू लागली. गार वारे पोरांच्या अंगावर येऊ लागले. अकबरला केस विस्कटलेले अजिबात आवडायचे नाहीत. तो हाताने केस मागे करू लागला. तेवढ्यात आजूबाजूची मुले चटकन खाली बसलेली त्याला दिसली. ५००० व्होल्टची ओवरहेड वायर गाडीच्या डोक्यावर मुंडवळ्यांसारखी लटकत होती. अकबरला कुणीतरी झटकन खाली खेचले. आजच्या दिवसापुरता तरी त्याचा जीव वाचला होता.


जगाचा पसारा कोणत्या नियमांनी चालला आहे, कोण शिक्षा देतो कोण शिक्षा भोगतो, ज्यांनी कुणाचे वाईट केलेले नसते अशा माणसांचेही वाईट होते का, नेमके आपल्या परिवारातच असे का व्हावे? साटमकाकांना यासारखे प्रश्न त्यांच्या पत्नीचे आजारपणाचे कळल्यावर छळू लागले होते. कॅन्सर सारखा शरीरावर पसरणारा आजार. त्यात खर्च फार. पण प्रश्न नुसता पैशांचा नव्हता. पैसे साटमकाकांकडे होते. मुलाचे लग्न, त्याचा प्लँट, त्याचे लग्न होऊनही त्यांची बँकेत, शेअर मार्केटमध्ये सेविंग होते. कांकूची केमो झाली त्यादरम्यानच काकूंनी वीआरएस घेतली. साटमकाकाना रिटायरमेंट घेवून सहा महिनेही झाले. पण घराला पूर्वीसारखी सुखशांती लाभत नव्हती. सगळे करून झाले.स्वामींचा मठ, रेकीचे सेशन, हास्य क्लबची मेंबरशीप, अनाथ मुलांना अन्नदान. पण कशाने म्हणून कशाने काकू शांत होत नव्हत्या. मुलासुनेने नोकरीतून कितीही वेळेचे दान टाकले तरी त्यांचे कण्हणे बंद व्हायचे नाही. आजाराच्या आठवणी चंदनासारखे त्यांचे मन जाळीत रहायच्या आणि साटमकाका त्या आगीत होरपळत रहायचे.

मग साटमकाकांनी एक केले ते रोज डबा भरून नेहमीसारखे आॅफिसला बाहेर पडू लागले. सेक्शनमधील स्टाफने खूप दिवस हसून स्वागत केले. बसायला खुर्ची दिली. मग काही महिन्यांनी स्टाफच्या वागण्याबोलण्यातील आर्जव कमी झाले हे जाणवताच साटमकाका आॅफिसच्या जवळील गार्डनमध्ये जाऊन डबा खावू लागले. दररोज चार पाच तास तिथे निघून गेले की ट्रेनच्या प्रवासात दोन–अडीच तास सहज निघून जायचे. सकाळी संध्याकाळी त्यांचा जुना ग्रुप त्यांना परत भेटू लागला. डब्यामध्ये खणखणीत आवाजात भजनाचा डाव रंगू लागला..जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.

चित्र सौजन्य: सुधीर पटवर्धन

शिल्पा कांबळे या आयकर अधिकारी आहेत. त्यांच्या मराठीमध्ये कथा, नाटक, कविता प्रकाशित झाल्या आहेत.

2 comments on “स्टेशन ते स्टेशन: शिल्पा कांबळे

  1. लता संदीप परब

    खुपच छान कथा

    Reply
  2. प्रणव

    गोष्ट आवडली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *