कात्रजला राहायला येऊन ५ वर्षे होऊन गेली. माझा फ्लॅट अगदी साधा आहे. गल्लीच्या टोकाला बिल्डिंग असल्याने रहदारी आणि धूळ तशी त्यामानाने कमी. पण मेंटेनन्स नसल्याने आवार नेहमी धुरकट असते. त्यात घराची फरशी शुभ्र पांढऱ्या रंगाची आहे, त्यामुळे थोडी जरी घाण झाली तरी लगेच उठून दिसते.
आई – आप्पा सुद्धा तेव्हाच आले होते माझ्याकडे राहायला. त्यामुळे आधीपासूनच फरशी पुसायला मावशी लावल्या होत्या. आता त्यासुद्धा म्हाताऱ्या व्हायला लागल्या आहेत. लॉकडाऊन चालू झाला तेव्हा त्यांना वाटले की आम्ही त्यांना बंद करू. पण असली पांढरी फरशी साफ ठेवायची तर रोज फडके पडलेच पाहिजे होते. त्या येतच राहिल्या. पण आता काम झाल्यावर त्या फडके काही नीट धुवेनाश्या झाल्या. त्या काम करून गेल्या आणि फरशी वाळली की फरशीला चिकटलेली धूळ पायाला चिकटू लागायची. बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा तळपाय काळे पडत आहेत असं दिसू लागलं होतं. नाहीतर लॉकडाऊन आधी पाय दिवसभर मोज्यात, बुटात, ऑफिसातच. आधी तळपाय नेहमी गोरे असायचे माझे.
सुरुवाती – सुरुवातीला आई सांगायची मावशींना, फडके व्यवस्थित धुवा. पण लॉकडाऊन जसा चालू झाला तशी आप्पांची तब्येत खालावत चालली होती. त्यामुळे नंतर आई मावशींकडे दुर्लक्ष करू लागली. माझे तळपाय आता रोज काळे पडू लागले होते. आप्पांच्या तळपायाची रोज रात्री आग व्हायला लागली होती. अन्न पण पचत नव्हते. लिव्हरचा त्रास आधीपासूनच होता, तोच बळावला होता. लॉकडाऊन असूनसुद्धा बरेच डॉक्टर बघितले. माझे आणि आप्पांचे रोज खटके उडू लागले होते कारण तसेही आमचे काही वर्षांपासून पटतच नव्हते. त्यात आजार बळावल्याने त्यांचे चित्त अजिबात थाऱ्यावर नसायचे. अनेक महिने असेच भांडणात गेल्यावर आताशा मी रागात म्हणू लागलो होतो की मला त्यांच्या बरोबर अजिबात राहायचे नाही. मला सहन करणेच जड झाले होते. आई बरोबर पण माझे फारसे पटत नव्हतेच. आप्पा उगाच माझ्याकडे कराडच्या घराची मालकी बिलकी काढत. कधी म्हणत की सतरा लाख टाक आणि कराडचे घर विकत घे. मला अश्यावेळी फार फार वाईट वाटत असे. रोजरोजच्या भांडणाचा मनस्ताप आता मला सहन होत नव्हता. एक वर्षाहून अधिक काळ आप्पा कराडच्या घरी जाऊ शकले नव्हते. लॉकडाऊन संपला तरी त्यांची तब्येत खालावत चालली होती.
एक दिवस सगळ्यांनी कराडला जाऊन यावे असे ठरले. आमच्या घराचा जिना बंद असला तरी हवा खेळती रहावी म्हणून जिन्याच्या भिंतीला वरपासून खालपर्यंत जाळी होती. त्यामुळे आम्ही घरी पोचलो तेव्हा जिना नुसता धुळीने माखलेला होता. चढून वर जाईपर्यंत हवेत नुसती धूळ उडाली. दार उघडून आत आलो तर सगळे घर सुद्धा धुळीने भरलेले होते. तरी नशीब तोंडाला मास्क होता. ती धूळ आणि जाळ्या नुसते वर वर साफ करायचे एकाला तीन हजार का कितीतरी द्यावे लागले. तरीसुद्धा त्यानंतर आम्ही दिवसभर धूळ झाडून घर साफ करतच होतो.
मी अनेकवेळा आई – आप्पांना समजवायचा प्रयत्न केला होता की कराडचे घर आपण भाड्याने देऊया. घर मोठे, जिन्याची जाळी आणि भर चौकातल्या रहदारीमुळे एक दिवसही झाडले नाही तर घरभर धूळ व्हायची. त्यात पुण्याला आल्यापासून कराडला येणे कमीच झाले होते. चार महिन्यांतून एकदा गेले की आई एक दिवस साफसफाई करे, एक दिवस राही आणि परत पुण्याला येई.
लॉक डाऊन नंतर तर आम्ही एक वर्षभराने कराडला आलेलो. धुळीने सगळ्यांचीच तब्येत खराब झाली. त्यानंतर आम्ही परत पुण्याला गेलो आणि आप्पांना दवाखाना लागला. दीड दोन महिन्यात आप्पा वारले. रविवारी सकाळी ICU मध्ये असताना ते गेले. मी आदल्या रात्रभर ICU च्या बाहेरच होतो. सकाळी ६ च्या सुमारास मला आत बोलावलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं हृदय थांबलं आहे. ICU मध्ये आत येताना खूप आधीच चप्पल काढून यावे लागले होते. त्यामुळे ICU खूप चकचकीत स्वच्छ होते. आप्पांना CPR देत होते आणि मी लांबून बघत होतो. डॉक्टर म्हणाले फोन करून बोलावून घ्या सगळ्यांना. माझे तळपाय तेव्हा लख्ख स्वच्छ होते.
सगळे सोपस्कार पूर्ण करून पुण्याहून आम्ही कराडला आप्पांना लगेच घेऊन आलो. चुलत भावाला घराचं कुलूप तोडून धूळ झाडून घ्यायला आधीच सांगितलं होतं. आल्याबरोबर आप्पांना अंगणात ठेवलं. सगळ्यांनी एकामागून एक, गरम पाण्याने त्यांचे तळपाय चोळून धुतले. आता परत कधीच त्यांच्या पायाला धूळ लागणार नव्हती. स्मशानाकडे न्यायला त्यांना उचललं. मला पायात चप्पल घालण्याचं भानच नाही राहिलं. मला आप्पांचाच खूप राग आला. मी कॉलेजला असताना त्यांनी दारू सोडावी म्हणून मी पायात चप्पल घालणं सोडून दिलं होतं. काही दिवस काही वाटलं नव्हतं. पण नंतर प्रोफेसर आपुलकीने विचारू लागले तेव्हा शरम वाटू लागली होती. तेव्हा माझे पाय रोज काळेकुट्ट व्हायचे आणि मी ते रोज आप्पांना दाखवायचो. त्याचा काही उपयोग झाला नव्हता. आता त्यांना शेवटचं नेताना सुद्धा माझे पाय मातीने भरायचे ते भरलेच.
त्यांच्या तिसऱ्याला नेवैद्य घेऊन त्यांच्या अस्थी वेचायला परत सगळे स्मशानात गेले. तेव्हा मी मुद्दामच पायात काही घातले नव्हते. गुरवाने काही बाही पूजा केल्या. मला सांगितलं की दोन्ही हातांनी त्यांच्या अस्थी गोळा करायच्या. आप्पांची राख आणि लाकडाची राख एक झाली होती. आप्पा गेले. त्या राखेत हात घालणं फार विचित्र वाटत होतं. शेवटी राखच होणार असेल तर एवढा मान अपमान करून काय झालं. सगळे एकामागोमाग एक आले आणि त्या राखेत हात घालून एक एक अस्थी गोळा करू लागले. ते सगळं झाल्यानंतर कावळ्याला नेवैद्य दिला, त्यानं लगेच शिवला आणि सगळ्यांनी हायसं केलं.
रितीप्रमाणे, पुढचे काही दिवस सगळं घर आतून बाहेरून साफ करायचं ठरलं. आप्पांना ज्या दिवशी आणलं होतं तेव्हा जुजबी झाडलोट झाली होती. दहाव्यापर्यंत एवढं मोठं अख्खं घर, जिना, गच्ची कोपऱ्या कोपऱ्यातून झाडून पुसून काढली. अंथरूणे धुवून काढली. तेरावा येईपर्यंत खोकल्यानंतर येणारा बडका काळपट येऊ लागला होता. मग मात्र मी हात आखडता घेतला. तोवर इकडेपण फरशीला एक बाई मिळाली होती. जरी ती वर वर रोज फरशी झाडूपूसू लागली होती तरी चौकातली रहदारी तर दिवसभर होती. पुसलं तरी थोड्याच वेळात पायाला धूळ परत लागायची.
आता मला स्वतःचे तळपाय काळपट दिसण्याची सवय लागून गेली आहे. पायात ऑफिसचे बुट घातल्याला एक वर्षाच्या वर होऊन गेलंय. अनवाणी असण्याची सवय लागलीये. पायाला भेगा पडल्या आहेत. त्यात धूळ नेहमीच साचते, त्यामुळे कितीही घासलं तरी काही उपयोग नाही. आता मला स्वतःचे तळपाय काळपट दिसण्याची सवय लागून गेली आहे.
Beautiful. Simple. Heart touching.
ह्या कथेत मध्ये मध्ये खूप मोकळ्या जागा आहेत. त्यातून बरीच हवा येत राहते. धूळही येत असावी. पण ते महत्वाचे नाही. मोकळ्या जागा मनाला भरता येतात, हे महत्त्वाचे आहे .