२०२५ ह्या वर्षातला हा शेवटचा अंक, ‘परतण्या’विषयीचा. वर्षाच्या अखेरीस हा अंक आपल्यासमोर येत असला, तरी अंकासाठीची तयारी मात्र आम्ही मागच्याच वर्षी सुरू केली होती. त्याचं असं झालं की, युरोपात आणि भारतात काम करणाऱ्या काही कलाकारांनी आणि संशोधकांनी आमच्याबरोबर कोलॅबोरेट करून अंकाची गुंफण आणि प्रकाशन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आंतरजालावर तसंच छापील स्वरूपात हा अंक प्रकाशित करण्याची योजना होती. त्या दिशेने आमची सुरुवातही उत्तम झाली होती. पण, अंकाच्या गुंफणीसाठी संकल्पनात्मक मांडणीबाबत मात्र आमच्यात एकमत झालं नाही. संकल्पनात्मक स्तरावर, अंकासाठी गुंफण-सूत्र म्हणून आम्हांला ‘परतणे’ ह्या संकल्पनेकडे पाहायचं होतं. पण ‘परतण्या’कडे त्यांना विशिष्ट राजकीय विचारधारेच्या संदर्भातून पाहायचं होतं; तर आम्हांला व्यक्तिगत स्तरावरच्या भाव-भावना, विचार आणि सामाजिक अवकाश ह्यांना छेदून जाणाऱ्या विचार-कल्पनांच्या दृष्टिकोनांतून ‘परतण्या’कडे पाहण्यात रस होता. साहजिकच, आमचे मार्ग वेगळे झाले. पण ह्या निमित्ताने, हाकारा । hākārāच्या माध्यमातून आम्हांला काय करायचं आहे ह्याबद्दल आमच्या विचारांत अधिक स्पष्टता आली. एखादी संकल्पना किंवा एखादा विचार वेगवेगळ्या अंगांनी पाहण्यातून आम्ही समृद्ध होऊ शकतो, ह्यावरचा आमचा विश्वास वाढला. तसंच, चर्चेच्या ओघात जगभरात हाकारा । hākārāपोहोचतो हे आम्हांला जाणवलं. आम्हांला परिचित नसलेल्या वाचन-संस्कृतीतील आणि दृश्य-संस्कृतीतील अभ्यासकांना आणि कलाकारांना हाकारा । hākārāच्या माध्यमातून आम्ही विचार करण्यास प्रवृत्त करतो, ह्याचाही अनुभव आला.
असे अनुभव आम्हांला हाकारा । hākārāची गुंफण आणि निर्मिती करण्यासाठी बरंच काही शिकवून जातात. जे अनुभव आम्हांला येतात, त्यांकडे परतून पाहत आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला आहे. योगायोग म्हणजे, आमच्या ह्या २४व्या अंकात परतून पाहण्याबद्दलची चर्चा मध्यवर्ती ठेवून गुंफण केली आहे.
आपल्याला येणाऱ्या अनुभवांना समजून घेताना आपण थोडं थांबतो, आणि त्याच अनुभवांकडे, किंवा त्या निमित्ताने, इतर गोष्टींकडे किंवा आठवणींकडे परत वळतो. त्यांबद्दल विचार करतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या प्रक्रियेत, एखाद्या विषयावर चिंतन आणि मनन सुरु होतं. कधी एखादं सर्जनशील अभिव्यक्तीचं रूप सापडतं. मला खात्री आहे, व्यापक सामाजिक स्तरावरही असंच होत असणार. व्यक्ती आणि समाज परत जे विचार करतात, आणि ह्यातूनच आपल्याला वेगळी दृष्टी मिळू शकते. हाकारा । hākārāच्या २४व्या अंकात अशी दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. वरवर पाहता, ‘परतणं’ साधं-सोपं वाटतं. पण वरवर दिसण्याच्या पलीकडच्या बहुस्तरीय, तरल आणि विचारप्रवण अनुभूतीचा आविष्कार परतण्यात असल्याचं आपल्याला जाणवेल. आपण सारेजण ह्या ना त्या कारणाने परतून पाहतो. पाहता-पाहता मध्येच थांबतो; कारण आपल्याला काही निसटलेल्या क्षणांची जाणीव होते, मध्येच थांबलेल्या संभाषणाची आठवण होते, किंवा कधीतरी ऐकलेली एखादी सुरावट कानात रुंजी घालत असते. परतण्यासाठी दरवेळेस आपल्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. एखादा आवाज, वास, किंवा अचानक धरलेलं मौन किंवा थांबलेलं संभाषण आपल्याला स्वतःला आत खेचत जातं. आपल्याला जाणवतं की आपण काही बाबी अजून सोडून देऊ शकत नाही. काही गोष्टी, काही अनुभव अजूनही आपल्याबरोबर आहेत. किंवा, आपण काही ओझी अजूनही वाहत नेत आहोत.
‘परतण्या’च्या आमच्या हाकेला प्रतिसाद म्हणून जे साहित्य आलं, ते ‘परतण्या’कडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहतं आहे. ह्यांमध्ये, गाजलेल्या चित्राकृतीकडे पाहणं आहे, साहित्यकृतीचं पुनरावलोकन आहे, तसंच हृदयाला स्पर्श केलेल्या घटनांची उजळणी आहे. ह्या पाहण्याचा रोजच्या आयुष्यावर तसंच आपल्या विचारप्रक्रियेवर आणि भावविश्वावर कोणता परिणाम होतो? घडून गेलेल्या किंवा सोडून दिलेल्या क्षणांकडे किंवा जागांकडे परत जाणं म्हणजे काय असतं? आपण जेव्हा परतून पाहतो किंवा ज्यांना परतून भेटतो, तेव्हा ते बदललेले असतात, की आपलं बघणं बदलतं? ह्या प्रक्रियात्मक कृतीतून कोणती कलात्मक रूपं तयार होतात? ह्या आणि अशा इतर प्रश्नांना समोर ठेवून हाकारा । hākārāच्या ह्या अंकात सहभागी असलेल्या लेखकांनी आणि कलाकारांनी आपली मांडणी केल्याचं आपल्याला दिसेल. काहीजणांनी स्मरणरंजन केल्याचं दिसून येईल, तर काहींच्या साहित्यात स्मरणरंजनाबरोबर चिकित्सक जागलेपणही आपल्याला जाणवेल. काहींचं ‘परतले’पण शांत, तर काहींचं अस्वस्थ, पिच्छा पुरवणारं. काही कलाकारांनी बालपणीच्या आठवणींकडे, कुटुंबातील रीती-रिवाजांकडे, आणि बोलून संपलेल्या तरीही मनात रेंगाळणाऱ्या संवादांकडे परत जाणं पसंत केलं आहे. ह्यांतील, काही कलाकृती व्यक्तिगत अवकाशातून बाहेरील जगाकडे पाहत दैनंदिन जीवनाला आकार देणाऱ्या सामाजिक व राजकीय घटनांवर आणि संघर्षांवर लक्ष केंद्रित करतात. काहीजण पर्यावरणविषयक मुद्द्यांना हात घालतात. पर्यावरणाची मंद गतीत चाललेली हिंसा, अदृश्य होत चाललेल्या अधिवासांची अस्वस्थता, आणि आपल्या पायांखालची जमीन सरकत असल्याची भावना रोहन चक्रवर्तींसारखे चित्रकार मांडताना आपल्याला दिसतील.
२४व्या अंकातील लेखक आणि कलाकार स्वतःच्या सुरात परतण्यातील नाद मांडतात. प्रत्येकजण आपापला अवकाश घेऊन येतो. त्यांचे आंतरिक अवकाश आपल्याला दिसतात. भवतालाविषयीचं त्यांचं भान प्रगट होतं. प्रकाशित साहित्य विशिष्ट भौगोलिक, सामाजिक परिस्थितीत नांगर टाकून असलं, तरी त्यातील विचार आणि ध्वनी ह्यांचे पडसाद दूरवर उमटू शकतात, ह्याची मला खात्री वाटते. अशा प्रकाशित साहित्यापैकी, विल्यम बटलर येट्स ह्यांच्या द टॉवर ह्या कवितेचा चंद्रकांत काळुराम म्हात्रे ह्यांनी केलेल्या मनोरा हा मराठी अनुवादाकडे आपल्याला पाहता येईल. ह्या कवितेत वृद्ध होत चाललेला लेखक आपल्या स्वतःच्या भूतकाळाकडे परतून पाहतो. त्याचं परतून पाहणं स्मरणरंजनातून नव्हे, तर स्वतःला समजून घेण्याच्या आंतरिक प्रेरणेतून आलं आहे. त्याला जाणिव आहे की त्याचं शरीर थकलंय. पण त्याचं मन मात्र टवटवीत आहे, ते निर्मितीसाठी उत्सुक आहे. मग तो वृद्ध जुन्या वास्तूकडे — मनोऱ्याकडे — पाहतो. भेटलेली माणसं आठवतो. आठवणींना उजाळा देतो. जे काही आयुष्यात घडून गेलं आहे, त्याचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागतो. चंद्रकांत ह्यांनी केलेल्या अनुवादाप्रमाणे, कवी येट्स लिहितात :
“काय करावं मी ह्या तर्कविसंगतीचं —
अरे हृदया, अरे त्रासलेल्या हृदया — हे सोंगासारखं,
जीर्ण वय जे माझ्याशी बांधलं गेलंय
जसं कुत्र्याच्या शेपटीला बांधावं?”
येट्स ह्यांच्या कवितेचा अनुवाद वाचताना आपल्याला जाणवतं की कवी मागे वळून पाहतो तेव्हा तो जीवनाचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. असं नाहीये की त्याला सारे अर्थ गवसले आहेत. पण, जी काही धडपड होत असेल, ती आणि आजूबाजूचं घडणं ‘तर्कविसंगत’ वाटून अर्थनिर्णयन मुश्किलीचं झालं असणार. तरी कवी शोध सुरू ठेवतो. मग, गतकाळाबरोबरच नव्हे, गतकाळातल्या स्वतःच्या असण्याशीही तो सोबत करत राहतो. आणि त्यातून त्याला एखादा ‘मनोरा’ दिसू लागतो. असाच एखादा मनोरा आपल्या मनःपटलावरही उमटू शकतो. येट्स ह्यांच्या कवितेबरोबर अमृता प्रीतम ह्यांच्या पंजाबी कवितेचा ऋतुपर्ण सेनगुप्ता ह्यांनी केलेला इंग्रजी अनुवाद आम्ही प्रकाशित केला आहे. अमृता प्रीतम ह्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या इमरोज ह्या आपल्या मित्रासाठी त्यांनी लिहिलेल्या ह्या कवितेत प्रीतम ह्यांचं तरल भावविश्व उलगडतं.
येट्स असो किंवा प्रीतम ह्यांची कविता, काव्यमय भाषेतील लय समजून घेत, त्यातील भावनिक जग जपत आणि त्याची सांस्कृतिक वीण न बदलता अनुवादित होते, तेव्हा तो आंतरिक ऊर्जेतून आलेल्या सर्जनशील कृतीचा भाग बनतो. अशा वेळी, अनुवाद हे भाषा, संस्कृती आणि मन जोडणारे सेतू असतात हा हाकारा । hākārāचा विश्वास अधिक दृढ होतो.
वळून पाहणं म्हणजे ते क्षणाचेअनुभव, सहजी घडणाऱ्या हालचाली, झर्रदिशी समोरून उडून गेलेले पक्षी, आणि अंतर्धान पावलेली माणसं पुन्हा आपल्या भावविश्वाचा भाग बनवणं. अनुभवांकडे एक पॉज घेऊन पाहणं, त्यांना आठवणं, आणि क्षीण होत चाललेल्या आठवणी परत जाग्या करणं. अशा प्रक्रियेतून निर्मिती होते. उडून जाणाऱ्या काळाच्या नोंदी धरून ठेवताना श्रुती रामलिंगय्या आपल्या Time flies, like a harried sparrow ह्या गद्य कवितेत लिहितात : “Time flies when people are around. Things around, running a round. Among the crowd, walking past traffic signals, rarely do I notice a person whole — always drifting, harried like a sparrow. Not knowing why they stopped, or dropped the nesting material held in their beak, to feed on grains and fly off.” अशा तऱ्हेने, श्रुती आपल्या कवितेत कालावकाशाकडे निरखून पाहतात, तेव्हा त्या फक्त काळाची पुनर्भेट घेत नसतात; तर तो त्या अवकाशात परत राहण्याचा काव्यात्म अनुभव असतो.
मला इथं ‘हे सर्व कोठून येते’ हे (विजय) तेंडुलकरी चिंतन आठवतं. ‘हे सर्व कोठून येते’मध्ये कवीचं जागलेपण असतं. कवी सतर्क, सभान असतात. मग, कुणाला विल्यम बटलर येट्स हे इंग्रजी कवी आठवतात, आणि कुणी अमृता प्रीतम ह्यांच्या काव्यप्रतिभेला हाक देतं. तर, अनघा मांडवकर हे अंतर सरत का नाही ? ह्या आपल्या कवितेतून थोर मराठी कवी बा. सी. मर्ढेकर ह्यांच्या कवितेला साद घालतात. अनघा ह्यांच्यासाठी मर्ढेकरांची अजून येतो वांस फुलांना ही १९५१ ह्या वर्षी प्रकाशित झालेली कविता पुनर्भेटीसाठी चिंतनाचं परिप्रेक्ष्य बनते. आजच्या जमान्यातील “माणुसकीचा चेहरामोहरा छिन्नविच्छिन्न” होणं चिन्हांकित करताना अनघा, मर्ढेकरांच्या कवितेतील व्यक्तिरेखा आणि आशयसूत्रं आठवून त्यांना आपल्या स्वतःच्या काव्यसूत्रात गुंफतात. काव्यसूत्राची ही गुंफण त्यांच्या कवितेला संवादी बनवते. मर्ढेकरांच्या काव्यातील भूप्रदेश, व्यक्तिरेखा आणि शब्दकळा त्यांना निर्मितिसूत्रं प्रदान करतात. मर्ढेकरांच्या कवितेकडे परतण्यातून तिथे आणि इथे, काल आणि आज अशा स्थलकालावकाशांची सरमिसळ होत अनघा मांडवकर ह्यांचं काव्यरूप व्यामिश्र बनतं.
२४व्या अंकातील प्रकाशित लेखन वाचताना अजून एक बाब जाणवते, ती म्हणजे, अभिव्यक्तीच्या रूपाविषयीची लेखकांची जागरूकता. परतण्याचा शोध कवीला रूपनिर्मितीच्या शक्यता प्रदान करतो. परतण्यातील पुनरावृत्ती आणि त्यातून आकारणारी नादमयता हे शोधप्रक्रियेचे विशेष घटक. परतण्याच्या समेवर येण्याच्या पुनरावृत्तीतून होणारा निर्मिती-विकास तनवी जगदाळे पुन्हा एकदा ह्या आपल्या कवितेतून दाखवून देतात. सर्जनाची ओढ, ‘फिरून पुन्हा तिथेच येणे’ ह्यामध्ये तनवींना आत्माविष्काराच्या शक्यता दिसत असतात हे त्यांच्या कवितेत पुढीलप्रमाणे दिसते :
“समेचा नियम
फिरून पुन्हा तिथेच येणे
ओंजळभर देऊन-घेऊन
नक्षत्रांचे देणे.”
कलाकाराचं समेवर येणं आणि त्यातून होणारी रूपनिर्मिती ह्या आंतरिक चक्राविषयीचं चिंतन डॉ. केशवचैतन्य कुंटे परतणं… हिंदुस्थानी कलासंगीतातलं ह्या आपल्या लेखात मांडतात. त्यांच्या मते, हिंदुस्थानी कलासंगीताचं सौंदर्यशास्त्र ‘परतणं’ ह्या मूलभूत तत्त्वावर आधारलेलं आहे. संगीत म्हणजे नाद आणि विराम ह्यांचा खेळ असतो; जिथं नादाच्या प्रवासातून पुन्हा विरामाकडे परतणं अनिवार्य असतं. हे परतणं व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाणं आणि परत व्यक्ताकडे येणं असतं. ह्यातून संगीताला पूर्णत्व मिळतं. डॉ. केशवचैतन्य लिहितात : “लय-तालाच्या संदर्भात, तालाचा आरंभबिंदू म्हणजे ‘सम’. तालाचे आवर्तन समेपासून सुरू होऊन पुन्हा समेवरच परतून पुढे चालू राहते. समेवर यशस्वीपणे पोहोचणे हे हिंदुस्थानी संगीतात सर्वोच्च सौंदर्यतत्त्व मानले जाते, कारण समेवर न आल्यास सर्व प्रयत्न विफल होतात.”
परतणं हे फक्त काव्यरूप किंवा संगीतरूप मांडण्यासाठीचं तंत्र नाही, तर ते कलाकाराच्या स्वतःकडे आणि भवतालाकडे पाहण्यासाठीचं तात्त्विक अधिष्ठान बनतं. परतण्यातून जे घडतं त्यातून एक पूर्णत्व प्राप्त होतं. निर्मिती आरून-फिरून एका बिंदूवर येऊन थांबते. त्या बिंदूवर ती एका लयीत फिरत राहते. आणि तिथून परत तिचा पुढचा प्रवास सुरू होतो. काही वेळेस, आपल्याला हवी ती लय मिळत नाही. जे निर्माण केलेलं असतं, ते पुरेसं नसतं, किंवा परतण्यासाठी उशीर झालेला असतो. तरीही, आपण प्रयत्न करतो. पुढे जाण्याची इच्छा बाळगतो. आणि मग आपली हालचाल आकाराला येते. आणि निर्मितीचं चक्र सुरू राहतं.
हाकारा । hākārāच्या टीमसह अंकाचं संपादन करताना मला माझ्या शाळेच्या इमारतीतील खोल्यांच्या रांगेतून — दारांतून, खिडक्यांतून — डोकावत गेल्यासारखं वाटतं. प्रत्येक कलाकाराची आणि लेखकाची अभिव्यक्ती म्हणजे एका खोलीतील एक दृश्य. प्रत्येक खोलीत आम्हाला एक वेगळा अर्थ लपल्याचं जाणवलं. एखादी खोली शांत, दुसरी खोडकर, तिसरी दंगेखोर, तर एखाद्या खोलीतून दिसणाऱ्या जिज्ञासू नजरा. तुमचीही पावलं ह्या खोल्यांकडे वळोत. सोपस्कार म्हणून नव्हे, तर भवतालाकडे निरखून पाहण्याच्या ऊर्मीतून तुम्हांलाही इथले लपलेले अर्थ सापडोत. इथल्या प्रत्येक खोलीत शिरून, ‘परतणं’ काय असू शकतं ते तुम्हीही शांतपणे पाहाल, अनुभवाल. इथल्या प्रत्येक खोलीने आम्हांला विचार करायला प्रवृत्त केलंय. तुम्हांलाही असा अनुभव मिळावा.
चित्र-सौजन्य : विक्रांत कानो
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
- Click to email a link to a friend (Opens in new window) Email
- Click to share on X (Opens in new window) X
- Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
