एक्झेटरच्या झोंबणाऱ्या थंडीत ‘ती’ एका चौकोनी फ्रेममधून माझ्याकडे बघते. माझ्या नाकावर असलेल्या चष्म्यासारख्या यंत्राच्या नेमक्या अंतरावरून ‘ती’ फोकसमध्ये येते. ‘ती’ म्हणजे वर्सोव्यात उभी असलेली कोळी समाजातली बाई या चष्म्यासारख्या यंत्राच्या म्हणजेच ‘स्टेरिओस्कोप’च्या फ्रेममधल्या जागेत आहे आणि सुमारे ११७ वर्षांच्या काळापलीकडून ती माझ्याकडे बघते. गोष्ट आहे 3D फोटोग्राफ किंवा ज्यांना ‘स्टेरिओकार्डस’ म्हणायचे अशा प्रतिमांची.
स्टेरिओकार्डसचा १९व्या शतकात शोध लागला. 3D किंवा त्रिमितीय प्रतिमेचा भास निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ही कार्डं एकाच दृश्याच्या किंचित फरक असलेल्या दोन प्रतिमांनी बनलेली असायची. या दोन प्रतिमा एका फ्रेममध्ये शेजारी शेजारी मांडून, त्यांना विशिष्ट अंतरावररून, एका चष्म्यातून पाहिल्यावर डोळ्यासमोर 3D किंवा स्टेरीओस्कोपिक प्रतिमा निर्माण होत असे.
२०१८ च्या शेवटी यू.के.मधील ‘बिल डग्लस सिनेमा म्युझियम’मध्ये रिसर्च करण्यासाठी माझी निवड झाली. यू.के. मधील छोट्याशा ‘एक्झेटर’ नावाच्या शहरामध्ये हे म्युझियम आहे. इंग्लंडच्या उत्तरेकडे असल्यामुळे एक्झेटर थंड आहे. बिल डग्लस या प्रख्यात इंग्लिश दिग्दर्शकाने जमवलेले सिनेमाच्या इतिहासातले वेगवेगळ्या टप्प्यांवरचे ‘artifacts’ इथे आहेत. उदा. भारतात आणि काही इतर देशात १९ व्या शतकाच्या सुरुवातीला घेतलेले आणि खेळ म्हणून विक्री केलेले हे स्टेरिओकार्डस किंवा 3D फोटोग्राफ्स, त्या काळी चित्रित झालेल्या फिल्मच्या जाहिराती, पब्लिसिटी आणि माहिती पुस्तिका, शांबारिक खरोलिका (मॅजिक लॅंटर्न स्लाइड्स) इ. वस्तू या म्युझियम मध्ये आहेत.
एक्झेटर युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या, सिनेमाच्या सुरुवातीच्या काळाचा इतिहास उलगड़त असलेल्या बिल डग्लस सिनेमा म्युझियममध्ये मी रिसर्च करायला पोचले. गेली काही वर्षे इतर फिल्ममेकींग सोबत ‘डॉक्युमेंटरी इमेजेस’ वर माझे काम आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या मिऱ्या गावामध्ये एका प्रायोगिक कार्यपद्धतीमधून मी, चार तासांची ‘मेनी मन्थस् इन मिऱ्या’ (मिऱ्यावर काही महिने) ही फिल्म शूट केली. या फिल्मचे स्वरूप Documentary Chronicle म्हणजे एका व्यक्तीने लिहिलेली (video) बखर असे होते. काही महिन्यांच्या कालावधीत एका गावातला पुढे सरकणारा काळ, गावातली माणसं, गावात घडणारे प्रसंग यावर ही फिल्म आहे; एका रिसर्चरच्या दृष्टीकोनातून, तिची ‘डायरी’.
सिनेमाच्या इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात बहुतांश ‘actuality’ किंवा वास्तवाचे प्रत्यक्षरूप दाखवणाऱ्या हलत्या प्रतिमांचे शोज होत असत. उदा. १८९६ मध्ये लुमियेर ब्रदर्सचा कोलाब्यातल्या वाॅटसन्स हॉटेल मध्ये झालेला भारतातला पहिला शो यात ‘Train Moving into the Station’, ‘Worker’s Leaving a Factory’ असे एकच शॉट असलेल्या, ज्यांना ‘actualities’ म्हणत किंवा ‘वास्तवाचे प्रत्यक्षरूप’ दाखवणाऱ्या इमेजेस प्रदर्शित केल्या होत्या. सिनेमाची वास्तव प्रत्यक्षात दाखवण्याची किमया ही त्याच्या सुरुवातीच्या काळात जगाला भारून टाकत होती. सिनेमा आणि फोटोग्राफी या दोन्हीचा सुमारे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला याचमुळे व्यावसायिकरित्या वापर होऊ लागला.
१९३६ मध्येच स्टेरिओग्राफी किंवा 3D फोटोग्राफी चा जन्म झाला. १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत ‘स्टिरिओकार्डस’ ची ‘कमर्शियल टाॅइज’ किंवा खेळ म्हणून इंग्लंडच्या मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय कुटुंबात विक्री होऊ लागली. (आपण सगळ्यांनी या खेळाचं प्लास्टिक रूपांतर – 3D Viewmaster म्हणून बघितलं असेल.)
यात बऱ्याचश्या प्रतिमा जगभरातल्या देशांचे ‘वास्तव’ दाखवणाऱ्या होत्या. विकीपिडियावर पहिले तर स्टेरिओस्कोपना जगातले पहिले “व्हर्चुअल टुरिझम यंत्र” असे संबोधले आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक कंपन्यांनी आपले फोटोग्राफर्स जगभरात पाठवून ही 3D ‘स्टेरियोकार्डस’ बनवण्याची सुरुवात केली होती. त्यांची जाहिरात थोडक्यात ‘इंग्लिश जनतेला घरबसल्या जग पाहाण्याची संधी’ अशीच होती.
इथे या फोटोग्राफीच्या इतिहासाच्या कथेत भारताची एन्ट्री होते. साम्राज्यवादाच्या अत्युच्च टोकाचा काळ होता. ब्रिटिश साम्राज्यातल्या देशातले, वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो किंवा त्या देशाचे वास्तव प्रत्यक्षात दाखवणाऱ्या प्रतिमा इंग्लंडमध्ये आणून ब्रिटिश प्रेक्षकवर्गांचे माहितीपर मनोरंजन करणे असा या इंग्लिश कंपन्यांचा हेतू असायचा. हा व्यावसायिक उपक्रम असून टुरिझमची सुरुवात इथून होते हे मानायला हरकत नाही. फोटोग्राफ्सचं, सिनेमॅटिक प्रतिमांचं – वास्तवाचे प्रत्यक्षरूप ‘record’ करणारे तंत्र, म्हणून स्थान पक्कं झालं होतं. म्हणजेच आपण बघत असलेल्या प्रतिमा या त्या ठिकाणच्या वास्तवाच्याच प्रतिनिधी आहेत याबाबत ब्रिटिश जनतेच्या मनात शंका नव्हती. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत असलेला भारत हा, त्या ‘दूरवरच्या’ ठिकाणांपैकी एक होता. जिथे ब्रिटिश जनतेपेक्षा काहीसं वेगळ्या, विचित्र पद्धतीने जगणारी, आपल्यापेक्षा ‘इतर/वेगळी’ अशी लोकं राहात होती. हे फोटोग्राफ्स आणि नंतरच्या actuality films ही प्रतिमा पक्की करत होते.
बिल डग्लस सिनेमा म्युझियम मध्ये माझ्या अभ्यासाचा विषय १९०० ते १९३० मध्ये निर्माण झालेल्या भारतावरील ‘actuality प्रतिमा आणि लेखन सामग्री (textual material)’ असा होता. भारतातल्या संस्कृतीच्या वास्तवाचे प्रत्यक्षरूप दाखवू पाहात होत्या त्या प्रतिमा, आणि त्यांच्या भोवती लिहिल्या गेलेल्या जाहिराती, पुस्तकं आणि तत्कालीन कथनं वर्णन इ.
त्या काळातल्या वास्तवाच्या हलत्या प्रतिमांना अजून पूर्णपणे माहितीपट म्हणता येत नव्हते, किंबहुना त्यांना तयार करण्यामागचा हेतू हा स्पष्टपणे जे समोर आहे ते दाखवणे, असा होता. त्यामुळे ‘इतर’ संस्कृती आणि देश दाखवणाऱ्या फिल्म्स या काळात आल्या, त्यांच्यामध्ये त्यांच्यानंतर आलेल्या माहितीपटांसारखी कथनासंबंधीची मार्मिकता नाही, म्हणून इथे त्यांना वास्तविकतावादी चित्रपट म्हणले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या नावावरून स्पष्ट होते. ‘थ्रू इंडिया विथ आवर किंग अँड क्वीन’ (१९१२), ‘थ्रू रोमँटिक इंडिया ‘ (१९२२), यातील पहिली फिल्म, किंग जॉर्जच्या भारत फेरीचे वर्णन, एकामागोमाग एक शहरांची दृश्ये दाखवून करते. या फिल्म्सच्या प्रदर्शनात एक कथन करणारा ‘निवेदक’ जो त्या काळात प्रवास वर्णनासाठी प्रसिद्ध असेल असा माणूस पडद्याच्या बाजूला उभा राहून मनोरंजक निवेदन करत असे.
या प्रतिमांच्या साठ्यामधली 3D स्टेरिओकार्डस, तत्कालीन फोटोग्राफी, साम्राज्यवाद, इंग्रजेतर संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टीकोन यांच्याबद्दल विलक्षण बोध देतात.
म्युझियममधली स्टेरिओकार्डस बघताना स्टेरिओस्कोपमधून हळूहळू फोकसमध्ये येणारी प्रतिमा, एका चौकोनी छोट्या फ्रेममधलं अगदी जिवंत परिमाण असलेलं 3D जग यांच्यामुळे खरोखरीच एका खेळाचा आनंद निर्माण होतो. मात्र या प्रतिमा त्यांच्या मूळच्या प्रेक्षकांपेक्षा माझ्या खूप जवळच्या आणि ओळखीच्या होत्या.
म्युझियममधला असाच एक ३६ स्टेरिओकार्डसचा सेट – ‘सनबीम टुर्स कम्पॅनियन टू इंडिया: जाहीर करतो, ‘आमचा उद्देश, आमच्या बरोबरच्या प्रवाशाला भारताबद्दलची कल्पना देणे आहे.’ (our purpose here is to give the Sunbeam Tourist, a general idea of the country .) या ३६ कार्डांच्या सेटमधून ११७ वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातले प्रसंग दिसतात. या सेटच्या शीर्षकाचा दावा भारताबद्दलची कल्पना देण्याचा असूनही तो इंग्लिश फोटोग्राफर मुंबई आणि मुंबईच्या बाहेरची ठिकाणं वगळता फारसा फिरलेला नसावा असे दिसते. वर्सोव्यातील ती सुरूवातीला उल्लेख केलेली कोळी समाजातली बाई, तिच्या मैत्रिणी, अशाच एका स्टेरिओकार्ड मधल्या. म्युझियममधल्या थंडगार रूममध्ये बसून या प्रतिमांकडे 3D यंत्राच्या चष्म्यातून बघताना एक काळाचं वर्तुळ पूर्ण केल्याचा भास होतो. माझ्यासारखी दिसणारी, प्रश्नचिन्ह डोळ्यात घेऊन फोटोग्राफरच्या लेन्समध्ये रोखून बघणारी माणसं मला त्या चष्म्याच्या 3D जगात दिसतात. वेगवेगळ्या स्टेरिओकार्डसमधून भारतीय जीवनातले निरनिराळे दैनंदिन प्रसंग आणि त्यांच्यातली माणसं मला दिसतात.
“प्रीपेअरिंग बॉम्बे डक” नावाच्या, “इंडिया ३” नंबरच्या कार्डमधून रांगेने उभ्या राहिलेल्या कोळी बायका आपल्या सुकवलेल्या बोंबिलांसोबत दिसतात. त्या फोटोग्राफरकडे मिश्कीलपणे बघत, एक बाई, सर्वात पुढे ठळक दिसते. या सोबत असलेल्या माहितीपुस्तिकेत या दृश्याची माहिती लिहिताना असं लिहिलंय, “या दृश्यात ठळक दिसणारी बाई, एक अंगावर फारसे कपडे नसलेल्या मुलीला अट्टाहासाने प्रत्येकवेळी फोटोग्राफमध्ये बोलावत होती.” त्या लहान मुलीचा नग्नपणा जणू काही त्या फोटोग्राफरला चिडवतो, असं वाटतं. आम्ही तुमच्या नियंत्रणात नाही असे त्या बाईचे खेळकर मिश्कील हसू म्हणत असेल. त्या 3D चष्म्यातून दिसणारं एका शतकापूर्वीचं वर्सोव्याचं शुभ्र आकाश, मला अचानक ओळखीचं, जवळचं वाटतं. चष्म्यातून डोळे बाहेर काढल्यावर एका राखाडी इंग्लिश आकाशाचं भान परत येतं.
‘इंडिया ११’ नंबरच्या ‘लेपर्स‘ नावाच्या स्टेरिओकार्ड मधून तत्कालीन ‘लेप्रसी’ झालेल्या लोकांच्या बहिष्कृत वसाहतीचं दृश्य दिसतं. ब्रिटिश राज्यकारभारामध्ये अशा वसाहती असत. त्या बहुतांशी दुर्लक्षित आणि दरिद्री अवस्थेत असत. या स्टेरिओकार्डसमध्ये अशा एका वसाहतीतली माणसं गेटच्या बाहेरून टिपली आहेत. फोटोग्राफ घेण्याकरता त्यांना गेटजवळ बोलावलेही असेल. बऱ्याच फोटोंमध्ये बाजूला उभा असलेला ब्रिटिश पोलिस खात्यातला भारतीय हवालदार दिसतो. मर्जी नसलेला, हाताची घट्ट घडी घालून नजर रोखून एक मुलगा गेटच्या पलीकडून घोळक्यातून कॅमेरा लेन्समध्ये बघतो. प्रातिनिधिक म्हणून असलेल्या या प्रतिमा, माणसांना स्वत्व नसलेले एक सार्वजनिक उदाहरण बनवतात आणि जणू काही हा हाताची घडी घातलेला मुलगा या कल्पनेला फोटोमधूनच छेद देतोय.
ही स्टेरिओकार्डस बघताना, त्यांच्यात आणि माझ्यामध्ये एका नवीन जिवंत काळाची निर्मिती होते. फोटोग्राफीने बनवलेल्या तत्कालीन आणि तेव्हापासूनच्या भारतीय माणसांबद्दलच्या व्याख्यांना उलगडायचे असेल तर त्यांच्याकडे सक्रीय पद्धतीने बघायला हवे. प्रतिमा आणि त्यांच्या व्याख्या कश्या बनल्या, त्यांच्या मागे सत्तेची कोणती समीकरणं आहेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या प्रतीमेच्या घडवणुकीतून तिच्या मागचा विचार कसा स्पष्ट होतो हे समजून घेतले पाहिजे.
या 3D जगात डोकावून बघताना मी त्या ११७ वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश फोटोग्राफर आणि त्याचे प्रेक्षक यांच्या नजरेतून नाही, तर आपले ओळखीचे प्रसंग, माणसं, एका फिल्ममेकर – संशोधकाच्या नजरेतून बघते. जसा तत्कालीन ब्रिटिश दृष्टिकोन भारतीय माणसांना स्वतःच्या कल्पनेतून पाहातो, तसेच मी इथे (भारतीय) स्त्री संशोधक म्हणून माझ्या कल्पनेतून या माणसांकडे बघते.
इथे एक प्रश्न येतो. मुळात वास्तवाचे प्रत्यक्षरूप म्हणून फोटोग्राफिक इमेजकडे बघणे आणि ही इमेज त्या वास्तवाचे प्रतिनिधित्व करते असे समजणे, यात काय फरक आहे? ‘रेप्रेजेंटेशन ’ ही संकल्पना विशेषत: इथे बघायला हवी. वास्तवाचे प्रत्यक्ष दिसणारे ‘एक’ रूप असले तरी फोटोग्राफिक इमेज, त्या वास्तवाला रेप्रेजेंट किंवा त्याचे प्रतिनिधित्व करते का? हा प्रश्न विसाव्या शतकाच्या शेवटच्या चार दशकांमध्ये ॲन्थ्रोपोलॉजिकल चर्चांमध्ये आणि एखाद्या संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या कल्चरल थिअरीमध्ये सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक ठरला. ‘रेप्रेजेंटेशन’ या संकल्पनेला वेगवेगळ्या पद्धतीने आव्हान देण्यात आले. ‘रेप्रेजेंटेशन’ म्हणजे थोडक्यात एखाद्या स्थल-काल वस्तूंचे किंवा कोणत्याही प्रत्यक्ष रूपाचे प्रतिनिधी म्हणून एखाद्या इमेजकडे बघणे.
साम्राज्यवादाच्या काळात अशा Representative model of thinking (प्रातिनिधिक विचार पद्धती) मधून निघालेल्या ज्ञानाचा साम्राज्यवादी विचारसरणीचे आणि संस्कृतीचे समर्थन म्हणून वापर केला गेला. कोणाचे प्रतिनिधी? कोणत्या प्रेक्षक वर्गासाठी? कोणाच्या दृष्टीकोनातून प्रातिनिधिक? हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. उदा. या स्टेरिओकार्डसमध्ये एका ‘आपल्यापेक्षा (ब्रिटिशेतर) वेगळ्या आणि किंबहुना आपल्यापेक्षा कमी सुसंस्कृत जीवनपद्धतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे.
एक सत्ताधारी संस्कृती आपल्या वर्चस्वाखाली असलेल्या संस्कृतीला ‘अन्य’ (other) बनविते याचे हे उदाहरण आहे. उदा. या स्टेरिओकार्डसमध्ये माणसांना उभे करून दाखविण्याचा उपक्रम आहे. लायटिंगमध्ये कोणत्याही छटा नाहीत, कारण अर्थात त्या फोटोग्राफरचा हेतू हे लोक ‘दाखविणे’ असा आहे. या प्रसंगांना दाखवणे यामधून त्यांच्याकडे एका संस्कृतीचे प्रातिनिधिक म्हणून बघितले आहे. त्यांच्यातल्या व्यक्तींना विशिष्ट माणसांचा दर्जा दिलेलाच नाही. हा गुण बरेचदा लेन्समधून येतो. दृश्य दाखविणाऱ्या वाईड-लेन्सचा जास्त वापर आहे. ही लेन्स एक सरसकट दृश्य दाखविते. माणसांना व्यक्ती असल्याचा दर्जा, त्यांचे आपापसातले वैयक्तिक संबंध आणि परिस्थिती दाखवणे हा, लेन्स आणि खूप वेळा सीनची निवड, प्रकाश अशा तांत्रिक आणि वैचारिक दोन्ही गोष्टींचा परिपाक असतो. आणि तरी देखील त्या प्रतिमेला एखाद्या विचाराचे प्रतिनिधी समजण्याला आता चिकित्सक नजरेने बघितले जाते.
तसेच, कोणत्याही ज्ञानाकडे किंवा त्या ज्ञानाला आकार/ फॉर्म देणाऱ्या चिन्हाकडे – म्हणजेच शब्द, इमेज, नाद – यांच्याकडे त्या ज्ञानाचेच प्रतिनिधी म्हणून बघणे संशयास्पद ठरले आहे. कारण त्या ज्ञानाला आकार देण्यामागे, घडविणाऱ्याचा दृष्टिकोन निर्णायक ठरतो. ज्या घडवणुकीच्या विचाराला पूरक अशाच आकारामध्ये ती गोष्ट किंवा ज्ञान साकारते. आपण बघत असलेले जरी फोटो असले तरी त्यांना बनविण्याचे कितीतरी निर्णय त्या फोटोग्राफरच्या विचारसरणी आणि दृष्टिकोनातून आले, हे आपण बघितले.
बिल डग्लस म्युझियममधल्या या इमेजेस, आणि या इमेजेसबरोबर लिहिले गेलेले त्याच काळातील लिखित संच म्हणजे पब्लिसिटी पुस्तिका, प्रवास वर्णनं, माहिती पुस्तिका इ. वरुन आणखीन एक बाब लक्षात येते. या प्रतिमा अशा विचाराच्या प्रतिनिधी होत्या जो साम्राज्यवादाला पूरक होता. त्या पुढे प्रवास करतात का? आणि कशा पद्धतीने करतात याचा विचार करायला हवा. जेव्हा एखाद्या विचाराच्या प्रातिनिधिक प्रतिमा कालांतराने इतर प्रसार माध्यमांमध्ये पसरतात तेव्हा तो विचार बदलतो का?
माहितीपटांमधून तर दिसतंच, परंतु हिंदी (किंवा लोकप्रिय – ‘पॉप्युलर’) चित्रपटाचे उदाहरण घेतल्यास काय दिसतं? हिंदी चित्रपटांचा स्वत:चा मोठा इतिहास आहेच. परंतु, सुरुवातीच्या ‘अॅक्चुअॅलिटीज’च्या काही टेकनिकचा आणि प्रतिमांचा परिणाम पुढेही या चित्रपटात दिसतो. म्हणजे बासू चॅटर्जींना जेव्हा ‘छोटीसी बात’ मधल्या गाण्यांमध्ये मुंबईचे रस्ते एका सामान्य पद्धतीने, सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून दाखवायचे होते. तेव्हा जवळजवळ ‘डॉक्युमेंटरी’ वाटतील असे मुंबईच्या रस्त्यांचे शॉटस् त्यांनी घेतले. त्यानंतर ‘मसान’ सारख्या चित्रपटात युरोपियन प्रेक्षकवर्गाला ओळखीचे वाटणारे बनारसच्या घाटांचे चित्रण केले आहे. तो घाट वाईड लेन्स आणि स्थिर शॉटमधून दाखविला आहे. एखादे स्थळ दाखविता येणे या फोटोग्राफीच्या गुणाचा इथे स्पष्ट वापर दिसतो.
या दोन उदाहरणांमधला फरक असा की बासू चॅटर्जींचा चित्रपट सामान्य भारतीय माणसांना प्रेक्षक मानून बनविला होता, तर ‘मसान’ जागतिकीकरणानंतरच्या काळात युरोपियन प्रेक्षकवर्गामध्ये विक्रीसाठी बनवला होता. म्हणजेच दृष्टिकोन आणि प्रेक्षकवर्ग कोण आहे यामुळे इमेजच्या बनावटीवर परिणाम होतो.
तसंच बऱ्याच हिंदी चित्रपटात ब्रिटिशकालीन फोटोग्राफर्सनी, ज्या पद्धतीने जुनी मुंबई दाखवली, तशीच मुंबई आत्ताही दिसते. उदा. ‘सत्या’ फिल्म्सच्या सुरुवातीचे व्ही.टी. स्टेशनचे शॉटस्. हे इथे सांगण्याचे कारण केवळ असे की आपल्याच संस्कृतीकडे, स्थळांकडे, माणसांकडे, इमेजमधून बघायच्या परंपरा कुठून आल्या, हे माहीत असणे गरजेचे आहे. यात काही नवल देखील नाही. कारण, फोटोग्राफी आणि फिल्मच्या सुरुवातीच्या काळातल्या इमेजेससुद्धा व्यावसायिक कारणांसाठी घेतल्या होत्या. कमर्शियल इंडस्ट्रीज या लोकप्रिय किंवा लोकांना माहीत असलेल्या परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न करत असतात, मग त्या कितीही प्रतिगामी असोत, याचे काही आश्चर्य वाटणार नाही.
हा पेपर रेप्रेजेंटेटिव फ़ॉर्म्युलेशनस म्हणजे प्रातिनिधिक विचार पद्धतीतून आलेले – शब्द, नाद किंवा प्रतिमा – आणि ब्रिटिशकालीन स्टेरिओकार्डस वर आहे. याचे कारण असे की बिल डग्लस म्युझियम मधील प्रतिमा आणि लेखन संच यांचे माझ्या फ़िल्मसशी काही साम्य आहे. ब्रिटिशकालीन लेखक, फोटोग्राफर्स आणि छायाचित्रकार हे ही एका संस्कृतीवर भाष्य करत होते. आताच्या काळातली डॉक्युमेंटरी मेकर म्हणून मीसुद्धा माझ्या फिल्मसमधून एका समाजाकडे अभ्यासक दृष्टिकोनातून बघते. मग या ११७ वर्षांपूर्वीच्या प्रतिमा आणि मी बनवलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये कोणते फरक आहेत?
कल्चरल स्टडीज आणि व्हिजुअल ॲन्थ्रॉपोलॉजी या दोन्ही फिल्ड्स एखाद्या समाजाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करतात. व्हिजुअल ॲन्थ्रॉपोलॉजी विशेषतः त्या समाजाच्या अभ्यासातून निर्माण झालेले फोटोग्राफ्स, फिल्म आणि इतर दृक- श्राव्य माहिती यांच्याशी निगडीत आहे. या दोन्ही फिल्ड्स गेल्या ६० वर्षांमध्ये प्रगल्भ झाल्या आहेत आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांना आणि त्यांच्या घडवणुकीला संवेदनशील झाल्या आहेत. बि. ड. म्युझियममधील संशोधनाचा भाग म्हणून या ११७ वर्षांपूर्वीच्या प्रतिमा आपल्याला कोणत्या पद्धतीने जिवंतपणे बघता येतील, याचा विचार मी मांडला.
डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग मधून आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांना सार्वजनिक वस्तू न बनवता, माझा अनुभव, माणसांतले परस्पर संबंध माझ्या माध्यमामधून दाखवणे हा माझा उपक्रम असतो. तसेच बिल डग्लस म्युझियममधील संशोधनातून एका ब्रिटिशकालीन व्हिजुअल परंपरेचा अभ्यास झाला. आणि फिल्ममेकर म्हणून काही नवीन मुद्दे समोर आले. माणसांना त्यांचे स्वत्व परत देण्यात आणि आपल्याच बघण्यात काहीतरी नवीन येऊ शकते हे मान्य करण्यात नवनिर्मितीच्या शक्यता आहेत. माणसांना, स्थळांना, काळाला, प्रसंगांना ठरावीक निष्क्रीय साच्यामध्ये न टाकता, त्यांना केवळ एखाद्या विचाराचे प्रतिनिधी न बनवता त्यांच्याकडे संवेदनशील पद्धतीने बघण्यातून नवीन प्रतिमा घडू शकतील.