रजिया पटेल

साहित्यातला सल

back

भारत हा एक असा देश आहे की जो बहुविध आहे. धर्म, भाषा, प्रांत, वेगवेगळ्या विचारधारा कितीतरी विविधता. कित्येक वर्ष आपण एक देश म्हणून या विविधतेतही एकत्र आहोत यासाठी भारत ओळखला जातो. विविधता आपल्या देशाची आणि लोकशाहीची एका अर्थाने ताकद  मानली जाते. हे सर्व खरे आहे पण आपण एकमेकांना किती ओळखतो? आपले विविध जाती, धर्म, प्रांत, भाषेतील किती मित्र असतात आणि आपण या विविधतेचा किती आदर करतो हा प्रश्‍नच आहे. आज ज्या पद्धतीने जाती आणि धर्माच्या आधाराने समाजांना एकमेकांपासून दूर करण्याचा वा एकमेकांचे शत्रू म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला जातो हा निश्‍चितच चिंतेचा मुद्दा आहे. मला हा प्रश्‍न थेटपणे अंगावर आला तो मुस्लीम म्हणून. मुस्लीम असे असतात, तसे असतात असं एक चित्र बनवलं गेलं आणि लोक त्याच प्रचारात अडकले. नुसते अडकले नाहीत तर त्या समाजाविषयी एक तिरस्कार आणि शत्रुत्वाची भावना निर्माण करण्यातही हा प्रचार यशस्वी ठरताना दिसतो.

मी मुस्लीम समाजातून येत असल्यामुळे समाजाबद्दल पसरवले जाणारे किती खरे, किती खोटे हे तर लक्षात येत होतेच पण हे ही दिसत होते की माणसं विचार न करता, आपली बुद्धी आणि सद्सद्विवेकबुद्धी न वापरता प्रचाराला बळी कशी पडतात. जेव्हा मी ‘इमेज ऑफ इंडियन मुस्लीम इन कंटेंपररी इंडियन लिटरेचर’ या विषयावर के. के. बिर्ला फेलोशिप अंतर्गत अभ्यास केला तेव्हा साहित्यात मुस्लीम समाज कसा येतो याचं एक उद्बोधक चित्र माझ्यासमोर आलं. मराठी साहित्य मी वाचलं आणि महाराष्ट्राबाहेरचं साहित्य मी वाचलं तेव्हा मला हे जाणवलं की एखाद्या समाजाला ज्याच्या सोबत आपण शेकडो वर्षे एकत्र प्रवास केला आहे त्याला आपण अंतर्बाह्य जाणतो की नाही आणि जाणतो ते कशा पद्धतीने?

मी मराठी साहित्य वाचतांना त्यात मुस्लीम पात्र एकतर अदृश्य आहेत किंवा खलनायक आहेत. अगदीच थोड्या कथा कादंबऱ्यांमध्ये त्यांची सकारात्मक प्रतिमा आहे. मराठी साहित्यातला सुरुवातीचा टप्पा या दृष्टीने पाहिल्यास, आणि जे साहित्य बहुजन समाजातल्या शिकलेल्या पिढीने वाचले कारण ते सहज उपलब्ध होते, या साहित्याने मुसलमान समाजाची खलनायकी आणि तिरस्करणीय प्रतिमा उभी केली. ‘बघा ते कसे आहेत’ उदा. पु. भा. भावे हे मागच्या पिढीतील लेखक ‘मुस्लीम स्त्रियांची करूण किंकाळी’ या लेखात म्हणतात, ‘मुस्लीम समाजातील आडदांडपणा, मुस्लीम समाजातील धर्मवेड, मुस्लीम समाजातील बुरसटलेली वृत्ती, मुस्लीम समाजातील हेकड अराष्ट्रीयता..’ आणि मग अशा समाजात स्त्रियांची स्थिती अर्थातच खूप वाईट असणार हे ओघाने त्यांच्या लिखाणात येतं. थोड्याफार फरकाने अशीच प्रतिमा गो. नि. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, सावरकरांच्या लिखाणात येते आणि साहित्य जुनं झालं तरी ही प्रतिमा मात्र पिढ्यान् पिढ्या चालत राहाते. याउलट दलित साहित्यात मुस्लीम त्यांच्यासारखा म्हणूनच येतो. रतनलाल सोनग्रा यांच्या ‘सोनजातक’ या आत्मकथनाच्या सुरुवातीलाच ‘आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो, त्यावेळी आम्हांला मुसलमानाशिवाय कोणाचे घर भाड्याने मिळणार?’ असं विधान येतं, शिवाय ‘बारा इमामची सवारी उचलण्याचा पहिला मान हिंदुंचा असे, गणपती उत्सवात मुसलमान पोरे आवडीने आरास करत आणि देखाव्यातील भूमिका पार पाडत, माझी आई जैन धर्मातील उपास करी आणि रमजानचा शेवटचा उपासही करी’ असा उल्लेख येतो. म्हणजे सोनग्रा यांच्या साहित्यात दिसणारी एकात्मता भावे, दांडेकर इ. लेखकांना दिसत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने हे बाहेरचे, आतले नव्हेत.

मुस्लीम मराठी साहित्यात हा सल मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उदा. जावेद पाशा कुरैशी यांच्या ‘औरंगजेब आणि जोशी’ या कथासंग्रहात हिंदू मुस्लीम पात्रांचा संवाद असा येतो.

हा सांस्कृतिक संघर्ष आहे

कुणाचा?

हिंदु मुसलमानांचा.

म्हणजे?

‘तुम्ही’ हिंदूंच्या भावना भडकावता.

म्हणजे?

समान नागरी कायदा मानत नाही.

म्हणजे?

तुम्ही गोवंश हत्या बंद करत नाही.

७०% दलित आणि हिंदूही खातात.

उर्दूचे लाड करता.

आमच्या देवतांना मानत नाही इ. इ.

मुस्लीम मराठी साहित्यात हा सल बर्‍याचदा व्यक्त होताना दिसतो. मात्र फकीर मुहंमद शहामिंदे एक वेगळी बाजू समोर आणतात ते आपल्या कवितेतून –

माझी आई,

अशाच एका संध्याकाळी,

बसून घराच्या उंबरठ्यावर

होती म्हणाली सहज एकदा

‘फकील कुछ भी कर, मगर

पीर सुव्हानी की ग्यारवी कर.

 

माझी आई,

अशाच एका संध्याकाळी,

बसून घराच्या उंबरठ्यावर

होती म्हणाली सहज एकदा

‘बेटा उनसे अपनी सगाई नही होती

अपना कुल कान्होपात्रा कूल है

(तिऱ्हाईतांनी इकडे जरूर लक्ष द्यावं)

हमीद दलवाईंच्या लिखाणात मुस्लीम समाजाच्या अंतर्गत समस्या आणि हिंदु मुस्लीम संबंधाची सामाजिक राजकीय पार्श्‍वभूमी येते. मुस्लीम महिलांची जी आत्मकथनं आहेत त्यात मेहरुन्निसा दलवाई यांचं ‘मी भरून पावले आहे’ या आत्मकथनात मुस्लीम संस्कृती आणि हिंदु मुस्लीम एकात्मतेचं फार सुंदर चित्रण तर येतच पण त्यांच्या एका काकांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे. ते उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांची पत्नीही उच्चविद्याविभूषित आहे. शिक्षणाधिकारी आहे. आणि हे लग्न नोंदणीपद्धतीने होऊन कुणीही धर्म बदललेला नाही आणि ही घटना सुमारे पन्नास वर्षापूर्वीची आहे. दुसऱ्या मुस्लीम कार्यकर्त्या आशा आपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला’ या आत्मकथनात ‘सुधा, राजाक्का, शालिनी, अशा खूप जणी या मुस्लीम मुलींच्या मैत्रिणी आहेत. आज असे चित्र दिसेल का? खातूनबी मत्रीकोप यांच्या ‘खातून’ या आत्मचरित्रात ही हिंदू मुस्लीम संबंध खूप एकोप्याचे दिसतात. हुसेन जमादारांच्या आत्मचरित्रात ही ते दिसतं, पण या सगळ्या आत्मकथनांबाबत एकच मुद्दा चर्चिला जातो तो म्हणजे मुसलमानांमधील कर्मठपणा आणि रूढी परंपरा.

मराठीएतर किंवा महाराष्ट्राबाहेरच्या साहित्यात मात्र हे आतलं बाहेरच्यापेक्षा खूप व्यापक विचार मला आढळून आला तो मानवतेच्या निकषावर. म्हणजे अमूक एक मुसलमान म्हणून वाईट आहे किंवा तमुक एक हिंदू म्हणून चांगला आहे यापेक्षा ही प्रत्येक समाजात चांगले लोक असतात, वाईटही लोक असतात. आपण चांगलं ते स्वीकारलं पाहिजे. हे तर त्या साहित्यात दिसलंच पण मी याशिवाय भोवतालच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर एक कॉमेंटही दिसते. उदा. अमरलाल हिंगोरानी या सिंधी लेखकाची ब्रिटिशकालीन भारताच्या पार्श्‍वभूमीवर एक कथा आहे. कथेचं शीर्षक आहे ‘भाई अब्दुल रहमान’ एका प्रकरणात त्याला ब्रिटिशकालीन न्यायालयात उभं केलं जातं: न्यायाधीश अर्थातच इंग्रज आहे. तो भाई अब्दुल रहमानला विचारतो, ‘तुम्हारा धर्म कौनसा है?’ तेव्हा भाई अब्दुल रहमान स्वत:शी म्हणतो, ‘ये तो बडा ही अरुचिकर सवाल है, यदि मुसलमान कहूँ तो हिंदू अप्रसन्न होगे, यदि हिंदू कहूँ मुसलमान नाराज होंगे। और मैने तो कसम खाई है, जो कहुंगा सच कहुंगा तो सच कह दूं? मै हिंदू नही हुं, मै मुसलमान नही हुं जो हु सो हुं।’ तब न्यायाधीशने लेखत्रनकसे कहा – लिख दो, मुसलमान’ म्हणजे एक विशिष्ट ओळख निर्माण करण्याचं एक राजकारण असतंच. असंच वर्णन राही मासूम रझा यांच्या ‘आधा गांव’ या कादंबरीत येतं. धर्माचं राजकारण करणार्‍या हिंदू-मुस्लीम सांप्रदायिक शक्ती हे राजकारण कसं पुढे नेतात याचं वर्णन आहे. गंगौली नावाचं छोटं खेडं, जिथं सर्व लाक मिळून मिसळून राहतात पण कथा नायकाला चिंता तेव्हा वाटायला लागते जेव्हा त्याच्या लक्षात येतं की, ‘इधर कुछ दिनों से गंगौलीमें गंगौलीवालोंकी संख्या कम और सुन्नीयों, शियों और हिंदुओं की संख्या बढती जा रही थी।’ एकीकडे हे राजकारण पण दुसरीकडे वैकम मुहंमद बशीर नावाचे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखक विद्यार्थीदशेत गांधीजींच्या चळवळीशी जोडले गेले आणि त्यांच्या साहित्यात गांधीजींच्या चळवळीत नमक सत्याग्रह ते जेलचे अनुभव येतात. गांधीजींच्या भेटीचं वर्णन करताना ते म्हणतात – ‘जब गांधीजी का आगमन हुआ तब धीरे से वे खुली मोटर में बैठ गए, भीड के बीच से होकर धीरे धीरे मोटर सत्याग्रह आश्रम की ओर बढी, छात्र उस मोटर से लटक रहे थें, मैं भी उनके बीच था। उस कोलाहल में मेरी भी इच्छा हुवी की मैं उस लोकनायक महात्मा को स्पर्श करू. लेकिन किसीने देख लिया तो? आखिर सबकुछ भूलकर मैने धीरे से गांधीजी के दाहिने कंधे को स्पर्श कर लिया गांधीजी मेरी ओर देखकर मुस्कुराए।’ गांधीजी आणि त्यांच्या चळवळीशी ते आयुष्यभर जोडलेले राहिले.

फाळणीच्या राजकारणाबद्दलही या साहित्यात येतं. फाळणी विरोधी असणाऱ्या कितीतरी लोकांचा या साहित्यात उल्लेख येतो. विशेषत: स्त्रियांनी फाळणीला केलेला विरोध. स्वयंप्रकाश यांच्या पार्टिशन नावाच्या कथेत वर्णन येतं -‘भारत विभाजन के वक्त कुर्बानभाई भारत छोडकर नहीं गए। उनका सबकुछ दंगो में लूट जाने के बाद उन्हे मजदूरी, हमारी, कारीगरी, ताले, छतरिया दुरुस्त करके अपना पेट पालना पडा।’ अशी विविध रूपं, विविध प्रश्‍न विविध भूमिका आपल्यासमोर या साहित्यातून येतात. पण यात आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे स्त्रियांनी काय लिहिले याचा शंभर वर्षांपूर्वी मुस्लीम महिला काय लिहित होत्या याचं खूप उद्बोधक संकलन निरंतर नावांच्या दिल्ली येथील संस्थेने केलं आहे. त्यात स्त्रीशिक्षण, पर्दा, दहेज, तलाक, बहुपत्नीत्व, घरात होणारा हिंसाचार, मुलींचं भविष्य अशा विषयांवर तर लिहिलं आहेच पण खादी लोकप्रिय होण्यासाठी काय करावं, लोकशाही म्हणजे काय याच्याही चर्चा केल्या आहेत. या लेखांची शैली लक्ष वेधून घेणारी आहे. उदा. ‘बेचारी दुल्हन’ या लेखात सुलतान बेगम देहलवी म्हणतात, ‘हम समझते थे की कानुनन जिन जानवरोंपर जुल्म मना है वो यही गाय, भैस, बकरी, बिल्ली वगैरह है। लेकिन अब तो दुल्हनों का नाम भी बेजुबानों की फेहरिल में आना चाहिए । दुल्हन कितनी झुके, कितना घुंघट रखे, कैसी चले ऐसे रिवाजों को, रस्मों को कम कर देना चाहिए । फिर घुंघट, जेवर, पर्दा इसपर सोचना चाहिए।’ पहिल्या बायकोला फसवून दुसर्‍या शहरात दुसरी बायको असलेल्या दोघींची ही कथा आहे. त्या ट्रेनमध्ये भेटतात आणि एकमेकीची चौकशी करत नवऱ्यांच्या नावापर्यंत पोचतात आणि मग ‘हाये तुम भी उन्ही की बीबी हो’ हे धक्कादायक वाक्य उच्चारतात.

स्त्रियांच्या लिखाणामध्ये बंडखोरी ही खूप आहे. त्यासाठी इस्मत चुगताई, कुर्रतुल ऐन हैदर, निलाबीबानो, मेहरून्निसा परवेज, नासिरा शर्मा, शगुफ्ता अशी कितीतरी नावे पुढे येतात. या स्त्रियांचं त्यातही मागच्या पिढीच्या असलेल्या इस्मत चुगताई आणि कुर्रतुल ऐन हैदर यांचं लिखाण वाचलं तर त्या काळाच्या ही किती पुढे होत्या हे आपल्याला लक्षात येतं.

रजिया पटेल  मराठीत सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लेखन करतात. त्या सध्या इंडियन इन्स्टिट्यूट अॉफ एज्युकेशन येथे कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *