आपल्याला कुठेही सापडलं नाही आपलं प्रतिबिंब तर आपल्या असण्याची साक्ष हरवून बसल्याची भीती आपल्या मनात निर्माण होते. एखाद्याला त्याचं एकटेपण त्रास देतं म्हणजे काय? त्याचं प्रतिबिंबाशिवाय जगणं असतं. एखाद्या व्यक्तीच्या भाषेचं असणं आणि असण्याची भाषा ह्या दोन गोष्टी परस्परजीवी नसतील तर हे असं घडतं. तर तो एक फ्रॉड माणूस आहे असं म्हणता येईल का? बिंब-प्रतिबिंब एकरूप असायला पाहिजे का? अशी आस बाळगणारे किती लोक असतात. ‘बोले तैसा चाले’ असं जगणाऱ्याची पावलं वंदावी असं का म्हणतात? अस्तित्व आणि कवित्व म्हणजे प्रत्यक्ष जगणं नि कवितेतलं जगणं असं म्हणू या आपण, यांच्यातलं अद्वैत हेच तुकाराम महाराजांच्या काव्यसंकल्पनेचं मर्म असं दिलीप पुरूषोत्तम चित्रे म्हणतात. प्रत्येक कवीचं, कलाकाराचं, माणसाचं (मनुष्यत्व आणि अस्तित्व) ध्येय हेच असायला हवं. ध्येय हा शब्द क्षुद्र आहे. त्याला आपण निर्वाणक्षण म्हणू या. व्यक्तीचं लोप पावणं म्हणू या. कवीचं लोप पावणं म्हणू या. आरसा, पाणी ह्यातलं प्रतिबिंब उलटं असतं तरी त्यात आपण रंगतो. रंगतो म्हणजे काय होतं? पण एखादी कुरूप व्यक्ती आरश्यात रमते का? मग ती व्यक्ती आपलं प्रतिबिंब कुठं शोधते? तिचा स्वभाव वागणूक वगैरेविषयी लोकांकडून चांगलं बोललं जातं त्यात तिला आपलं प्रतिबिंब सापडतं. म्हणजे प्रतिबिंब ही वरवरची उथळ गोष्ट आहे का? प्रतिबिंब ही आभासी गोष्ट आहे का?
मी प्रतिबिंबाची व्याख्या काय करतो? ती अमुक अशीच का करतो? माझा जीवनधर्म बिंब सुद्धा नको असणारा आहे. ह्या अश्या उफराट्या जीवनधर्माच्या मुळांशी प्रतिबिंबाची व्याख्या काय असू शकेल? पण मुळात जीवनधर्माची तत्त्वे पक्की असतात काय? माझ्यामते ती तशी पक्की नसायला हवीत. धर्म ही गोष्ट प्रवाही नसेल तर धर्म हा माणसांचा कोंडवाडा होतो. मला माझं बिंब नको आहे तर मला प्रतिबिंब का हवंस वाटेल ? मग मी ते वेगळ्या वाटेने शोधतो. मी माझ्या एका कवितेत म्हटलं आहे की ‘बिंब माझे बुडेल तुझ्या आत, हो इतुकी सजल तरल बाई’. ही एकरुपता म्हणजे काय? असं जे मिलन असतं त्या मिलनाचा नक्की अर्थ काय? एकरूप एकात्म मनोमिलन होणे म्हणजे काय? आम्ही दोघे एकरूप झालो. कुणाशी एकात्मता साधली? तदरूप झालो म्हणजे काय? असा प्रश्न मला नेहमी पडत आला आहे. एखाद्या गोष्टीशी, कलाकृतीशी एकरूप होणे, व्यक्तीशी एकरूप असणे. म्हणजे दोघांची रूपे एक होणे? दोघांची रूपे एक नाही होऊ शकत. अंतर राहातंच. एकात्म होणे म्हणजे दोघांचा आत्मा एकमेकांत मिसळणे. आत्मा एक होणे? शक्य नाही. मनोमिलनही हस्तांदोलनासारखं असतं. दोघांच्या हाताचा उगम आपापल्या शरीरात असतो. दोघांचे हात एकमेकांच्या हातात स्थिरावतात तेव्हा मिळणारी ऊब दोघांची असते. किंबहुना ती कोणाचीच नसते. त्या ऊबेचा अनुभव उबेवरचा मालकी हक्क सोडून घ्यावा लागतो. हात आपल्या मालकीचा पण ऊब कुणाच्याच मालकीची नाही. मला मग अध्यात्मात वापरली जाणारी एकात्मतेची एकरूपतेची संकल्पना जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. तुला तुझे रूप आहे मला माझे रूप आहे. तुला तुझा आत्मा आहे मला माझा आत्मा आहे. जे एकमेकांत विलीन होऊच शकणार नाहीयत. तर दोघांनीही परमात्म्यात विलीन व्हायचे आहे. एकमेकांत परमात्मा पाहिला, एकमेकांतला परमात्मा ओळखता आला, स्वत:तला परमात्मा ओळखता आला तर हे शक्य आहे. दोघांनीही त्या परमरूपात परमात्म्यात विलीन होणे एकरूप होणे म्हणजे दोघांनीही परस्परांशी एकरूप होणे, एकात्म होणे असे मी म्हणतो. आता हा परमात्मा कुठं असतो? एकूण मानवी जीवनाचा अखिलपणा म्हणजे परमात्मा का? आपलं प्रतिबिंब दिसणे ही परमरुपात विलीन होण्याआधीची पायरी आहे का?
त्याची माझी किंवा तिची माझी वेव्हलेन्ग्थ जुळत नाही म्हणजे काय? म्हणजे आमच्या मनाची जडणघडण (Mental Constitution) एकमेकांशी संवाद साधणारी नसते. माझे विचार नि त्या दुसऱ्या व्यक्तीचे विचार वेगळे असतात. म्हणजेच माझ्या विचारांचे प्रतिबिंब त्या माणसाच्या विचारात सापडत नाहीय. अखिल मानवी जीवन एक आहे पण ते जगणाऱ्या प्रत्येकाचं मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे. हे वेगळेपण मान्य केलं की हे वेगळेपणच एकमेकांचं प्रतिबिंब होऊ शकतं. ज्या पाण्यात आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो ते स्थिर असत. वाहत्या पाण्यात दिसलंच समजा आपल्याला आपलं प्रतिबिंब तरी ते एकसंध नसतं. मग ते पाणी म्हणजेच आपलं प्रतिबिंब. पाणी वाहातं म्हणजे काय तर तो त्याचा गुणधर्म आहे. ते स्थिर असतं तेव्हाही हा गुणधर्म त्याच्यात जागा असतो. पण कुणीतरी त्याचं दमन केलेलं असतं.
निसर्गात गेलो की मला त्याच्यात ‘मी’ शोधायचा असतो. तो माझ्या चर्मचक्षूना आणि अंत:चक्षूनाही दिसत नसतो. माझ्या मर्मदृष्टीला जाणवतं की आपण ह्या निसर्गात विलीन झाल्याशिवाय आपण आपल्याला ह्या निसर्गात सापडू शकत नाही. एखाद्या दरीच्या कड्यावर उभं असताना आपल्याला आपलं स्वत:चं भान न राहून त्या दरीत उडी मारावीशी वाटते. समुद्राचा आवाज आपल्याला समुद्रात बोलावतो. नदीचं वाहातं पाणी आपल्याला बोलावतं. भान हरपून आपण एक पाऊल पुढं उचलतोही पण त्याच क्षणी सावध होतो.
बिंब स्वत:ला ओळखू शकलं तर त्याला प्रतिबिंबाची गरज पडणार नाही. बिंब स्वत:ची बुद्धी आणि मन ह्याद्वारे स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न करतं. पण बिंबाच्या बुद्धीला नि मनाला मर्यादा आहेत. ह्या मर्यादा ओलांडणं म्हणजे वैश्विक मनाशी तादात्म्य पावणं. त्या आधी मन आणि बुद्धी हे एकरूप झाले पाहिजेत. कितीतरी वेळा त्यांच्या दिशा एकमेकांविरुद्ध असतात. वैश्विक मनाशी तादात्म्य पावलं की प्रतिबिंबाची काय गरज?
देवळं आवडतात मला. आत गेल्यावर देव झाल्यासारखं वाटतं. हे वाटणं म्हणजे काय? ह्या वाटण्याला आकार आहे का? हे वाटणं म्हणजे एक अवकाश आहे. ह्या वाटण्याशी आपण एकरुप झालो तर बिंब-प्रतिबिंबाच्या भाषेपलिकडे जातो. पण ह्या बिंब-प्रतिबिंबाच्या भाषेपलीकडे काय आहे? बिंब आणि प्रतिबिंबात निर्माण होणारं अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे अवकाश म्हणता येईल का? ह्या अवकाशात माणूस जगू शकतो काय? पण जगणं म्हणजे काय नक्की? हे अद्वैती जगणं द्वैताची आस धरेल. द्वैतात दुसरा आला. मग मला उपनिषदातलं एक सूत्र आठवतं: एकट्याने जीव रमत नाही आणि दुसरा आला की भय वाढतं. भय ही गोष्ट काय असते? भयाच्या असंख्य कल्पना आहेत. आधी दुसऱ्यात आपलं प्रतिबिंब शोधलं जातं. त्याच्या अस्तित्वात आपल्यालाही जागा आहे का हे पाहिलं जातं. अर्थात, ती व्यक्तीही एक स्वतंत्र अस्तित्व असते. ती दुसऱ्याचे प्रतिबिंब ठरेल इतकी मोकळी नसते. तिला तिच्या जगण्याचे तिचे स्वत:चे, तिनं ठरविलेले आयाम असतात. ती एखाद्याचे प्रतिबिंब ठरली तर तिची स्वत:ची आयडेंटिटी नष्ट होणार असते. बिंब आणि प्रतिबिंब एकरूप न होण्यातच त्यांचे असणे आहे.
आपलं असणं शोधण्यात आयुष्य संपतं. नंतर आपण नसतो. आपण नसतो म्हणजे पंचमहाभूतात विलीन झालेलो असतो. आपण आपलं नसणं शोधलं तर? मी कुठे कुठे नाहीय? मी माणसात नाहीय, वस्तूत नाहीय, मी पाण्यात नाहीय कुठेच नाहीय. कदाचित मी वेगळा नाहीय. मी पाणी पाहातो तेव्हा पाणीच मला पाहात असेल तर मला त्यातलं प्रतिबिंब दिसणार नाहीय. माझ्याकडून केवळ पाणीच पाहिलं जाईल अशी अवस्था केव्हा येईल तर मी, मी नसेन तेव्हा. नसण्याचे प्रतिबिंब असत नाही.
******
एखाद्या माध्यमातून दिसून येणारं प्रतिबिंब: एखाद्या प्रदेशातील मानवी जीवनाचं, एकूण समाजमनाचं किवा मानवी मनाचं. हे प्रतिबिंब असतं का? बिंबाच्या नजदीक किंवा आत जाण्याचा प्रयत्न एखादे माध्यम हाताळणाऱ्याच्या मनात असतो. कथा, कविता, कादंबरी, नाटक, सिनेमा, गायन, नृत्य, शिल्पकला अशा अनेक माध्यमातून कलाकार बिंबाकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण ते बिंब त्याला पकडता येत नाही. मग उरतं ते प्रतिबिंब. मुळात एखादी कला ही काय काम करते? किंवा असा प्रश्न आपण उपस्थित करूया की एखादं माणूस कुठल्या एका कलेचा ध्यास का घेतो? लहान वयात आपल्याला साधे परंतु मौलिक प्रश्न पडत असतात. मी कोण, मी इथं का, माझं इथलं काम काय वगैरे. काही लोक हे प्रश्न विसरून आयुष्य जगतात तर काही लोक ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांचा पाठपुरावा करतात. मग तो एखाद्या कलेतून ह्या प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घ्यायला सुरुवात करतात. हे सारं आंतरिक असतं. हा एक आत्मशोध असतो. आत्मशोधातून कलाकाराला कळतं की हे प्रश्न प्रश्नच राहणार ह्याला उत्तरं नाहीत. आत्मशोधाच्या टोकाशी अध्यात्म सुरू होतं.
आरसा हा आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी असतो. पण आपल्या नकळत आपण खरंतर आरश्याची भूमिका चोवीस तास वठवत असतो. आपल्यात कुणा व्यक्तीचं, प्रसंगाचं वगैरे जे प्रतिबिंब पडतं ते आपल्याला जीवन शिकवत असतं. आपल्याच जडणघडणीचा हा आरसा असतो. कुठं आंतर्वक्र, कुठं बहिर्वक्र. ह्या आरशात पडणारी प्रतिबिंबं वेडीवाकडी असतात. ज्यातून विपरित अर्थ निघतो आणि आपल्या जगण्याची दिशा तो अर्थ चुकवू शकतो. एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागली, तर अर्थात ते खरं असतंच असं नाही. तर आपण मनात असं धरून बसतो की ही व्यक्ती वाईट. पण मनुष्य बदलू शकतो ह्याचं ज्ञान केव्हा होतं? आपण स्वत: कसे आहोत हे कळल्यावर. आपण स्वत: कसे आहोत हे कळण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक जगावं लागतं. स्वत:च्या वागण्यावर, बोलण्यावर आणि एकूणच जगण्यावर पहारा ठेवावा लागतो. वर तुकारामाबाबत कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे जे बोलले आहेत की अस्तित्व आणि कवित्व यांच्यातलं अद्वैत हेच तुकाराम महाराजांच्या काव्यसंकल्पनेचं मर्म. हे अद्वैत म्हणजे काय? तर इथं मला ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवातील एक ओवी नमुद करावीशी वाटते.
आरसा आपुलियें। आंगी आपणा पाहे।
तैं जाणणे जाणो लाहे। आपणयाते॥८९॥ (प्रकरण सहावे)
जर आरसा आपल्यातच आपल्याला पाहील, तर ज्ञानरूप आत्म्याला स्वत:चे ज्ञान होईल. ही ओवी मी माझ्या प्रतिपादनाच्या पुष्ठ्यर्थ दिली आहे. आपणच आरसा आहोत. त्या आरश्यात पडणारी प्रतिबिंबं नक्कीच उलटी असणार. डावी बाजू उजवीकडे नि उजवी बाजू डावीकडे. एक असं उदाहरण मला आता आठवलं आहे की आपल्या घराच्या भिंतीवर पोपडे पडल्यामुळे वा खराब झाल्यामुळे काही आकार दिसतात. ते मला वेगळे दिसतील आणि दुसऱ्याला वेगळे दिसतील. ढगांच्या आकाराबाबतीतही तेच. तर दोन व्यक्तींना त्याच ठिकाणी वेगळे वेगळे आकार का दिसतात तर आपण कायम आरश्याच्या भूमिकेत असतो. आपल्यात जे प्रतिबिंब पडतं तेच आपल्याला खरं वाटतं.
*******
ॲब्सर्ड थिएटर किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज किंवा एकूण व्यक्त होण्याची अमूर्त आशयाचा शोध घेणारी ही शैली कशी निर्माण झाली असेल? कुठलाही संदर्भ न घेता व्यक्तीचं मन आणि अमूर्त शैली ह्याची संगती लावताना माझ्या असं लक्षात आलं की हे जग माणसाला दिसतं ते त्रिमितीत, चौथ्या मितीचाही विचार करतो तो पण तो नकळत होत असतो. माणसाची जरतरची भाषा हे एक उदाहरण आहे. जर आणि तरच्या दरम्यान काळ आणि अवकाश दोन्ही आहे. तर माणसाच्या मनाच्या मिती किती आहेत? मोजता येणार नाहीत एवढ्या आहेत. माणसाच्या मनाच्या कितीतरी मितींचा बाहेरच्या जगाशी संवाद होऊ शकत नाही. तसा संवाद व्हायला माणसाच्या मनाच्या मितीला तिचं प्रतिबिंब बाह्य जगात कुठेतरी मिळायला हवं. अशा प्रतिबिंबाला आकार असायलाच पाहिजे असं नाही. एखाद्या प्रतिबिंबाचं निराकारत्व सुद्धा माणूस त्याला स्वत:ला परिचित असलेल्या त्याच्या मनातील निराकारत्वाशी जोडून पाहातो. ते जुळलं तर प्रतिबिंब गवसल्याचा आनंद त्याला होतो. परंतु यात त्याची स्मृती काम करत असते. एखाद्या गंधात कुठलंतरी प्रतिबिंब उमटत असेल तर त्याच्या स्मृतीतला एखादा प्रसंग त्याच्याशी निगडित असतो. तो प्रसंग क्षणभराचा पण असू शकतो. कलाकाराच्या मनाच्या मिती तर त्यालाही अबोध असतात. खरंतर मनाच्या कित्येक मिती सामान्य माणसालाही अबोध असतात. कलाकाराला जेव्हा त्याच्या मनातील एखाद्या मितीशी बाह्य जगातून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही तेव्हा तो बाह्य जगाचा आरसा फेकून देतो. तो फेकल्यावर रूप नाहीसं होतं. आपल्याशी हे जग कुठलाही संवाद साधू शकत नसेल तर आपण ह्या जगातले नाही आहोत आपण उपरे आहोत अशी भावना प्रबळ होते. त्यातून जगाची सर्वमान्य प्रतिमा तोडायची फोडायची इच्छा होते. ती प्रतिमा विरूपित करण्याची इच्छा होते. अशा ह्या जगात जगण्यासाठी कुठलाही हेतू त्याला उरत नाही. हेतू नसलेली कृती ही ॲब्सर्ड असते. मराठीत ह्याला आपण असंगतता असा शब्द वापरू. बाहेरच्या जगाशी संगती लागत नाही तेव्हा ही असंगतता निर्माण होते.
A world that can be explained by reasoning, however faulty, is a familiar world. But in a universe that is suddenly deprived of illusions and of light, man feels a stranger. His is an irremediable exile, because he is deprived of memories of a lost homeland as much as he lacks the hope of a promised land to come. This divorce between man and his life. The actor and his setting, truly constitutes the feeling of Absurdity.
आल्बेर कामूने माणसाचं ह्या जगातलं स्थान अश्या पद्धतीने वर्णन केलं आहे. प्रतिबिंब हे एक इल्युजन आहे. प्रतिबिंबाशिवायचं हे जग बिंबाला उपरं करतं. ‘माणसं मरतात पण ती सुखी नसतात,’ असं एक वाक्य कामूच्या कॅलिग्युला ह्या नाटकात आहे. मरताना माणूस सुखी नसतो हे असंगत आहे. किंवा गमतीनं एक साधं उदाहरण घ्यायचं तर असं म्हणता येईल की अखेर माणूस मरणारच असतो तर त्याला जन्म तरी का दिला जातो. असे बरेचसे मूलभूत प्रश्न पडणाऱ्यांना ही हद्दपारी सहन होत नाही. हे जग जगायच्या लायकीचं नाही असं त्याला वाटून तो स्वत:लाच प्रश्न करतो की आपण आत्महत्त्या का करू नये? ह्या अश्या जगात जगायचं कसं? ह्यासाठी ज्ञानेश्वरांनी आरश्याचाच त्याग करायला सांगितलाय. ह्या जगाला आरसा समजून आपण त्यात प्रतिबिंब शोधायला जातो नि ते कुठं दिसत नाही. तर ज्ञानेश्वर म्हणतात:
दर्पणाचेनि त्यागे । प्रतिबिंब बिंबी रिगे ।
कां बुडी दीजे तरंगे । वायूचा ठेला.॥६१॥ (अमृतानुभव/ प्रकरण पहिले/ ओवी क्रमांक ६१)
जसे आरशाचा त्याग केल्याबरोबर बिंबाच्या ठिकाणी प्रतिबिंब प्रविष्ट होते, अथवा वारा शांत झाल्याबरोबर तरंग पाण्यात नाहीसा होतो. आरशाचा त्याग करणे म्हणजे प्रतिबिंबाची आस न धरणे. पुढे माऊली म्हणताहेत:
नातरी नीदजात खेवो । पावे आपुला ठावो ।
तैशी बुद्धित्यागे देवी देवो । वंदिली मिया ॥ ६२ ॥
स्वप्नासह निद्रा जाताक्षणीच निद्रितपुरुष आपल्या जागृत अवस्थेवर येतो, तसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी बुद्धीचा त्याग करून देवोदेवीचे वंदन केले. एकामध्ये द्वैत सिद्ध करणारी तिसरी उपाधी असते. जसे आरशात पाहणारा एक आहे, पण त्या एकाचे दोन दाखविणारा तिसरा आरसा आहे. आता दोहोंचे पुन्हा ऐक्य करावयाचे असेल तर प्रतिबिंबाचा बाध केला पाहिजे. वेदान्तामध्ये यालाच बाधसमानाधिकरण म्हणतात. दुसरे मुख्यसमानाधिकरण आहे; जसे घटकाशाचे महाकाशाशी ऐक्य करण्याची जरुरी नाही. कारण घट असतांनाही घटाकाशाचे व महाकाशाचे मुख्यसमानाधिकरण आहे. पण आभासाची व कूटस्थाची मात्र एकसत्ता नाही. तिथे आभासाचे कूटस्थाशी ऐक्य करण्याकरता बुद्धीसहित आभासाची बाधा करावयास पाहिजे; म्हणजे देह. इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि बुद्धीगतचिदाभास ही सर्व माझ्या आत्मस्वरुपी विवर्त आहेत म्हणजे सूर्यकिरणांवर विपरित भासणाऱ्या मृगजलासमान मिथ्या आहेत. मी निर्गुण, निराकार, भेदशून्य , सच्चिदानंदरूप आत्मा आहे असे दृढ जाणणे, यालाच बुद्धीचा त्याग ( बाधा) आणि शिवशक्तीचे वंदन समजावे. अशा तऱ्हेने बुद्धित्याग करून सच्चिदानंदरूप शिवशक्तीचे मी वंदन केले. ( वै. विष्णुबुवा जोगमहाराज)
**********
इनोसन्स ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आहे निष्पाप असणं. आपण इथे अनाघ्रात हा शब्द वापरु या. किंवा निरागसता म्हणू. आता ही निरागसता किंवा इनोसन्स कुठं शोधायचा? उलट्या बाजूने पाहू की आपण इनोसन्ट केव्हा नसतो. आपल्यात मी किंवा अहम् असतो तेंव्हा? अहम् आला की सारे गुणावगुण आलेच माणसाचे. ह्या गुणावगुणांना जन्म देणारी बुद्धी आली. आपण इनोसन्ट केव्हा नसतो तर आपण केवळ भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगत असतो तेव्हा. ह्या काळाचं भान बुद्धीच देत असते. मध्येच मला जेकेंची आठवण आली. जे के म्हणतात, केवळ इनोसन्ट माणूसच या क्रूर जगाशी सामना देऊ शकेल. लढा देऊ शकेल. महापुरात जशी नाजुक लव्हाळी वाचतात नि मोठमोठे वृक्ष , डोंगर मात्र कोसळून पडतात. निसर्ग आपल्याला इनोसन्स शिकवू पाहातो पण आपण निसर्गाशी एकरूप होत नाही. निसर्गाचेही काही ठाम असे नियम आहेत. निसर्गाचेही एक विज्ञान आहे. नियमबद्ध असा इनोसन्स असू शकतो? काय असतो तो? मला एक उदाहरण सुचलं आहे की चांदण्यांचा किंवा ताऱ्यांचा आपल्यापर्यंत येणारा प्रकाश हा कित्येकवर्षांपूर्वीचा असतो. पण आपण त्या चांदण्यांच्या प्रकाशात वर्तमान होऊन आनंदून जातो. ह्यातलं विज्ञान कळूनही चांदण्यांच्या प्रकाशात आपण आनंदीत होत असू तर आपण इनोसन्ट आहोत. आपल्या आनंदासाठी आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष करत असू तर आपण इनोसन्ट आहोत का? स्वार्थी माणूस इनोसन्ट असतो का? आपण नक्की ठामपणे बोट ठेऊ शकू असा इनोसन्स आपल्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे. पण आपण तरी कोण ठरविणारे? कविता इनोसन्ट असायला हवी. खरी कविता आपल्या आवाक्यातली नसते. ती नेहमी एक सहज उद्गार असते. अर्थात हेही छातीठोकपणे सांगणं म्हणजे इनोसन्स हरवून बसणं आहे. जन्मापूर्वी, गर्भ धारण करण्यापूर्वी आपण इनोसन्ट असतो का? तर नाही शुक्रजंतूच्या रूपात असतांना आपण खूप स्वार्थी असतो. इतर सर्व शुक्रजंतूना मागे टाकून आपण बिजांड गाठायचा प्रयत्न करतो. मेल्यानंतर आपण इनोसन्ट असतो का? मेल्यानंतर आपण कुठल्या रूपात असतो ते आपल्याला माहीत नाही. मेल्यानंतर आपण नसतो. नसणं-कुठंच नसणं—मी नसणं—हा इनोसन्स आहे का? मरणाही आधी राहिलो मरोनी। मग केले मनी होते तैसे॥ तुकारामाचं हे मरण आपल्याला साधता आलं तर? मग केले मनी होते तैसे.. एकदा मेल्यावर हे जे मन उरलं तुकारामाचं ते कुठलं? तर ते वैश्विक. वैश्विक मन इनोसन्ट असणार. जिवंतपणी मरणं म्हणजे भूतकाळ नाही भविष्यकाळ नाही. केवळ वर्तमान काळ. इनोसन्ट हा नेहमी वर्तमान काळात असतो. कुठल्याही कलेसाठी इव्हन जगण्याच्या कलेसाठीही साधनेची गरज असते ती इनोसन्सकडे जाण्यासाठी. इनोसंट कुठल्याही आपल्या प्रतिबिंबाकडे कसं बघत असेल? प्रतिबिंबाला त्याची त्याची जागा देऊन, त्याच जागी त्याला पाहात असेल. उदा: न्युटन सफरचंदाच्या झाडाखाली पहुडला होता तेव्हा तो नक्की मनाच्या निरागस अवस्थेत असणार. म्हणूनच त्याला प्रश्न पडला की हे सफरचंद खाली पडतं कसं? ह्या प्रश्नातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला.
हाकाराने दिलेल्या विषयापासून खूप लांबचं हे एक प्रतिपादन आहे. प्रतिबिंबाकडे जाण्याआधीचं एक मंथन आहे. विचार मंथन असं मी मुद्दामच म्हटलं नाहीय. विषय वाचून जे मनात आलं ते मी मांडलं आहे.
१. मार्टिन एस्लिन The Theatre of Absurd
२. अमृतानुभव / ज्ञानेश्वर संपादक वै. विष्णुबुवा जोग
छायाचित्र सौजन्य: Tuur Tisseghem https://www.pexels.com/photo/close-up-photography-of-human-left-hand-159333/