गोंदण
गोंदण वाढत जातं भूतकाळापर्यंत,
कपाळ भेदून मेंदूपर्यंत.
त्वचेवरच्या खुणा असं आतपर्यंत भेदून जाणं हट्टाचं काम.
संस्कृतीच्या वाटा आणि संस्कृतीचं ओझं
फिरत रहातं हातावर, कपाळावर.
दगड पुरत नाही!
भवताल पुरत नाही !
तर कोरुन घेतात स्वतःवर
आणि
वाहून नेतात
आपआपल्या
पिढीचा भूतकाळ.
पहाड गोंदनारी म्हातारी
पहाड वाहते.
मोह गोंदनारा म्हातारा,
मोहं वेचून घेतो.
होळीचा घेर, दिवाळीचा नागोबा
सगळं वाहत जातं पुढं ,
गोंदण शोषून घेतं रक्त.
जिवंत – मृत वाहणारं
आणि स्मृती शेवटपर्यंत!
***
बुढी
बुढी चढून येते अंधारभर घाट
दिवसाला कवेत घेऊन उंबऱ्यावर ठेवते,
सुरकुत्यावरुन काढायाचं आपण अंतर उंबऱ्यावरच्या दिवसाचं
आणि घाटावरल्या अंधाराचं
बुढी उतरत जाते घाटभर खाली
रात्रीला पाठीवर घेऊन उंबऱ्यावर ठेवते,
पाठभर वाकावरुन काढायाचं आपण अंतर घाटाखालच्या उंबऱ्याचं
आणि घाटावरच्या उंबऱ्याचं..
***
जेजुरी
रात्र उतरायला लागली की
पिवळ्याधमूक बायांच्या दगडी मुर्त्या पायऱ्या उतरु लागतात.
भारीभक्कम उंबरा विरघळू लागतो नुसत्या चाहुलीने
एकजागी राहून शिणलेल्या कातळी अंगाच्या बाया
उतरतात जेजुरीचा उभा गड
जीर्ण पितळी घंटा मुक्या
डोळे मिटून कोपऱ्या कोपऱ्यात शांत
आवाज स्थिर. रंग स्थिर. समाध्या स्थिर.
पायऱ्या मात्र जागसुध झोपतात,
थोडी जरी गडबड झाली की उंबरा गोळा करू लागतात.
बाया रात्र लपेटून पठारभर खेळ मांडतात.
भाल्याचे खेळ, रंगांचे खेळ.
पिंपळ सोडून लिंबाखाली बसतात भंडारा झटकत
अंधार साजरा करतात दिव्यांच्या नावाने बोटं मोडत.
कधीतरी नंतर चंद्र तळ्यात उतरतो तेव्हा
बाया वायल्या वाटेनं सोडतात पठार
आणि तळ्याच्या काठावर येतात.
महाद्वाराच्या दांडग्या उंबऱ्याला काठावर ठेवून
सगळ्याच जातात खोल आत आत आणि
ओढून आणतात सूर्यसावल्या पुन्हा फांद्यांशी
सावल्यानां रेलून आभाळ सावरतात
आपापल्या वाट्याचं दिवसाचं आभाळ
रात्री काठावर घेऊन येतात दंगा मांडतात
नटता मुरडतात शिनगार करतात
वेणी फणी करतात
देखणं होतं अंग अंग
पिवळा झालेला म्हातारा वाघ्या गड चढायला लागतो.
महाद्वाराशी येऊन उंबऱ्यावर कपाळ ठेवतो
आणि पहाट होते
देव जागा होतो.
तोवर बाया जागच्या जागी येऊन बसलेल्या असतात.
पुन्हा पिवळया होतात.
झोपून जातात गाढ
थकलं भागलं शरीर घेऊन
नव्या रात्रीची वाट बघत
***
नर्मदा
तुझ्या कुशीतून थेट नर्मदेच्या कुशीत
असं माझं स्थलांतर झालं
नर्मदा स्थिरावू देत नाही इथं कुणालाही लवकर
झगडावं लागतं नर्मदेशी,
हट्टानं कुशीत शिरावं लागतं सातपुड्यासारखं.
तू आणि नर्मदा सारख्याच,
एकदा कुशीत शिरलं की मग भरभरून प्रेम,
तसं मी इथं हट्टानं राहिलो.
नर्मदा घेईल कुशीत तेव्हा घेईल,
आपण झगडत राहायचं,
तू सोबत आहे म्हणून सोपं जातं.
डोळ्यांना कातळासारखी माणसं बघायची सवय नाही
लागेल सवय.
होता होईल तेवढं मुळे खोलवर रुजवून फोडील कातळ
पण,
पचवायला लागेल रात्रीच्या ओढयांचा आवाज,
दूरवरचा भयाण रस्ता आणि रात्री संपतील या आशेवर दररोजचा होणारा सूर्यास्त.
Brilliant work, especially – ‘Gondan’ !!!
प्रकाशच्या यातील सर्वच कविता उत्तम आहेत. त्याच्यातील सर्जनाचा हा उत्कट आविष्कार आहे. तो आपल्या पिढीतील जाणिवा, नेणिवा आणि शहाणिवा बयान करणारा एक सजग कवी आहे.