काळोख पडण्यापूर्वी हळूहळू
हे राहूनराहून
वाढत जाणारे दबलेपणाचे ओझे
किंवा संसर्गजन्य विषाणूसारखी
अंगाला खेटून राहिलेली उदासीनता
जाणवतोय स्पष्ट डोळ्यांना
कोमेजत जाणारा प्रकाश
किंवा हाताशी लागले नाही
मुक्कामाचे ठिकाण
तरी प्रवास संपत आल्याची
दिली जातेय सूचना वारंवार
किंवा अजून पुरेसा
साचून राहिला नाही अंधार
तोवरच नख्यांवर नख्या घासण्याचे
हिंस्त्र आवाज कानावर
म्हणजे
आता कुठल्याही क्षणी आपण नसू
किंवा हमखास तोडले जातील आपल्या
अस्तित्वाचे समूळ लचके!
किंवा जबड्यात मान जखडण्यापूर्वीची
जाणवू लागलीय स्पष्टपणे
मोजक्या श्वासांची अखेरची थरथर
काळोख पडण्यापूर्वीच्या
किंचितशा उजेडात
दबा मारून बसलेले जनावर
कधी उसळी मारून येईल समोर
याविषयी काहीच सांगता येणार नाही आता
अशावेळी पुरेशी सावधानता बाळगून
त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून
धैर्याने सलामी देण्याचं बळ
एकवटत राहणे इतकंच
आपल्या हाती बाकी आहे
***
पारंबी
मी लिहिणार असलेली कविता असू शकते
यापूर्वीच कुणीतरी लिहिलेली
किंवा मी गिरवत असेन शब्द
इतर कुणाच्या कवितेचे तंतोतंत
असेही असेल – थांबले असतील ते
मी करावी सुरूवात आणि नंतर मग बेधडक
हल्लाबोल : हवे तसे शब्द भिरकवण्यासाठी!
कविता लिहिण्याचा मनसुबा असला तरी
कवितेचे नेमके रसायन हाती आले नसेल
किंवा असेही झाले असेल
रोजमर्रा जिंदगी ते नोंदवत असतील
आणि त्या मजकूराला मी कविता म्हणते असेन
एकंदरीत कविता आहेच कवींसाठी
भर ऊनातील घनघोर सावली मुलभूत
म्हणूनच कोणती ना कोणती भाषेची पारंबी पकडून
झोंबत राहतात कवी कवितेच्या झाडाला
वेगवेगळ्या अंगाने, वेगवेगळ्या दिशेने
***
नांगरल्याविण भुई
लेखणीचे टोक
उभे मख्ख खेटून कागदाला
जराही पुढे सरकत नाही
जसा भुईत घुसलेला नांगराचा फाळ
तोंडाला दगड लागल्याने
जाग्यावरच अडून स्तब्ध
एका बाजूला मी
दुसऱ्या या टोकाला कविता
मध्ये विस्तीर्ण
नांगरल्याविण भुई
कितीतरी!
***
दिशा प्रवाहाची
किती वेगाने
सरकतोय हा काळ
बघता बघता आलाच जवळ
निर्वाणीचा टप्पा
मागे बघ कसा गडद धुक्यात
हरवून गेलाय इथवरचा प्रवास
मन अजून पुरते भरले नाही
तोपर्यंत आलेच की ठिकाण
नावेतून उतरण्याअगोदर
एक गोष्ट सांगायची राहील –
अधूनमधून मी
टाकली आहेत फुले प्रवाहात
हाती लागलेच
त्यातील एखादे तर
तुझ्या प्रवासाची दिशा
चुकलीच असे समज
***
काळ
तू आणि मी
भरगच्च यातनांनी
पोखरून गेलेल्या दोन बाजू
कधीपासून शोधतो आहोत एकमेकांना
या अमर्याद अंधारगुहेत
आपण जवळच आहोत की दूर
याचा काहीच अदमास येत नाहीये
काननाकडोळेस्पर्श अशा सर्व संपर्कयंत्रणा
सपशेल कुचकामी ठरल्या आहेत
नक्की काय आणि कशी परिस्थिती आहे
हे समजायला मार्ग नाही
अशा या कठीण काळात
आता आपणास एवढेच करता येईल –
किमान मी मला शोधतो
आणि तू तुला !
पण हा काळ तरी असा कसा स्तब्ध
एकाच ठिकाणी गोठून राहिल्यासारखा?
***
बाकी शून्य
दोन शतकांच्या मांडीवर
गल्लीगल्लीत, चौकाचौकात, मोहल्लामोहल्ल्यात
खेळ रंगात आलेला आहे
या खेळात सर्वांना सहभागी होण्याची सोय आहे
खेळाचा नियम माहीत असो नसो
खेळात निपुणता असो नसो
खेळ खेळण्याची इच्छा असो नसो
खेळात हार होईल हे आधीच माहीत असो
अथवा खेळात जिंकण्याची अजिबात इच्छा नसो
सर्वांना खेळासाठी गृहीत धरण्यात आलंय
त्यादृष्टीने खेळाचा प्रोमो जोरदारपणे केला जातोय
लोक गर्दीगर्दीने गटातटाने खेळण्यासाठी येत आहेत
अजिबात अलिप्त राहिलेल्यांनाही
आवाहन करून बोलावले जात आहे
कधी इच्छेने, नाहीतर अनिच्छेने
त्यांना खेळात ओढण्याची पक्की तजवीज केली जातेय
ह्या गदारोळात हा खेळ कोण नियंत्रित करतोय
याकडे दुर्लक्ष करून लोक इर्ष्येने खेळताहेत
या गटाकडून वजाबाकी तर लगेच दुसऱ्या या बाजूने
भागाकाराचा डाव टाकला जातोय
खेळाचा अंतिम निकाल बाकी शून्य ठरलेला आहे
तरीही दोन शतकांच्या मांड्या खाजवित
लोकांसाठी ह्या एकाच खेळाचा आता
पर्याय ठेवण्यात आलाय
***
उद्या मी असेन नसेन
बाकी आयुष्य
टाकले खुडून
तरी चिवट उदासी
आहेच उगवून!
उद्या मी
असेन नसेन
सर्वांचे हसू
राहो टिकून!
***
बरोबरीने
दारोदार
भटकणाऱ्या व्यथांना
त्यांचे त्यांना
घरदार मिळो!
प्रत्येक पुरुषरक्तात
साखरेसारखी
एक स्त्री
विरघळून जावो!
सासरमाहेरच्या भिंती
नसलेल्या घराघरात
हक्काने लेक
जन्माला येवो!
जात धर्म लिंगाची
गरज न पडता
होवो अर्भकांचा
जन्म निर्धोकपणे!
पुरुषासह स्त्री
स्त्रीसह पुरुष
एकाच पायरीवर
उभे बरोबरीने!
***