Skip to content Skip to footer

बाकी ठो : पूर्णानंद

Discover An Author

  • Actor

    पूर्णानंद यांनी ललित कला केंद्र, पुणे येथून नाट्य विषयात एम.ए. अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या ते फिल्म व टेलिविजन क्षेत्रात नट म्हणून कार्यरत आहेत.

    Purnanand has completed Master’s programme in Theatre from Lalit Kala Kendra, Pune. He has been working as an actor in film and television industry.

अलार्म चांगला दोन चार वेळा वाजला असेल. स्नूज करत करत मी ९ वाजवले. खरंतर इतक्या उशिरापर्यंत मला झोपायचं नसतं पण पहाटे ५ वाजता होणारी अजान, नंतर ६ वाजता नळाला येणारं पाणी, ७ वाजता येणारा सफाई कर्मचारी…  अशी टप्प्या टप्प्यात झोपमोड होते. मग ती वसूल करायची अस ठरवून मी पुन्हा पुन्हा झोपतो. पुन्हा पुन्हा केल्याने पूर्णत्व येऊन सुख मिळते या भ्रमात आपण नकळत जगतोच. ५ वाजता होणाऱ्या अजानचे मी काही करू शकत नाही. ६ वाजता नळाला येणारं पाणी याचंही मी काही करू शकत नाही. डसबिन फ्लॅट बाहेर ठेवायला हाऊसिंग सोसायटीची परवानगी नाही. तुमचा कचरा तुम्ही घरात ठेवा. त्याचं घरातच विघटन करा असा अजून नियम आलेला नाही नशीब. प्रत्येक ‘सोसायटी’चे आपापले नियम असतात. आपण एकाच वेळी खूप सोसायटीजमध्ये जगतो त्यामुळे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात. काही सोसायटीजमध्ये वेळही पाळावी लागते. झालं सव्वा नऊ वाजले… आता काही अंघोळ करायला नको रात्री झोपण्याआधी केली होतीच ना? तसंही अंघोळ केल्याने मला फ्रेश वाटत असलं तरी मला बघून समोरच्याला फ्रेश वाटत असेल का? साधारण १० लोकांमध्ये सुद्धा आपण  लांबून ओळखू यायचो नाही असं आपलं व्यक्तिमत्त्व. समोर असलेला डिओ कपाटातून काढलेल्या टी शर्ट वर मारला. जीन्स तीच. कधीची? माहीत नाही. म्हणजे फार नाही, एक आठवडा घातली असेल सलग. डागाळलेली जीन्स कळत नाही तसं डागाळलेली माणसं कळायला नकोत. त्यांना नसला होत तरी आपल्याला त्रास होतो या गोष्टीचा. ते डाग मिरवून जगतात. जीन्स धुता येते… माणसांचे काय ?

लिफ्टमध्ये आरसे लावावेत हे ज्याला सुचलं असेल न तो ग्रेट. पब्लिकला चुत्या बनवता आलं पाहिजे. लिफ्टचा वेग तेवढाच असतो तो बदलत नाही पण स्वतःला आरशात न्याहाळत जरा इकडून जरा तिकडून बघत, हलकेच केसाला हात लावत, आतल्या सीसीटीव्हीकडे बघत आपण २१ मजल्यांची उभी झोपडपट्टी उतरून केव्हा खाली येतो कळत नाही. त्यात लिफ्टच्या आत एखादी स्त्री असली की विषय संपला. ती कशीही असली तरी किमान दोनदा तुमची नजर तिच्याकडे जातेच. पाठमोरी असली तर जास्तच… तिला बघत आणि आरशावाल्याला सलाम करत बिल्डींगच्या बाहेर आलो. कंपाउंडबाहेर १०० मीटरवर बस स्टॉप. रेट्रो ऐरीयातून मेट्रो जाणाऱ्या शहरांत असंच असत. सगळं जवळ हाकेच्या अंतरावर, वॉकिंग डिस्टन्स वर. हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, मॉल, मार्केट. फक्त नोकरी वॉकिंग वर नाही ती तुम्हाला फार दूर जाऊन येऊन करावी लागते. ज्या ठिकाणी तुम्हाला पैसा खर्च करावा लागतो त्या सगळ्या गोष्टी जवळ आहेत, सहज उपलब्ध आहेत आणि पैसा कमवायच्या गोष्टी लांबवर. स्टेशन लांब नोकरी लांब. मग त्या लोकलच्या वेळा… हुकलेल्या वेळा… हुकलेलं नशीब. शहराचं, माणसांचं अगदी त्या लोकलचं सुद्धा जिच्यात बॉम्बस्फोट झाला. बाकी ठो.

लांबून बस येताना दिसली. बेस्ट. बीइएसटी. प्रत्येक मोठ्या शहराची सार्वजनिक रस्ते वाहतूक व्यवस्था असते. या शहरात हिला बेस्ट म्हणतात. एक लाल रंगाचा चौकोनी डब्बा, जो क्षमतेपेक्षा जास्त वाहून नेतो माणसं, वजन, अपेक्षा. क्षमतेपेक्षा जास्त वापरली जाणारी शहरं त्यातलं हे एक. आपल्याला शाळेत अंक ओळख शिकवतात ती कशासाठी? तर… या बसच्या भाळी लावलेले नंबर लांबून चटकन ओळखता यावेत. आपल्याला हव्या त्या नंबरची बस आली की नाही हे ओळखता यावं म्हणून शाळा, शिक्षण. बाकी ठो. स्टेशनला जाणारी बस पाहिली की फाळणीच्या वेळी जसे लोक दिसेल त्या गाड्या पकडून शब्दशः पकडून आले – गेले अगदी तो प्रसंग, चित्रपटात पाहिलेला बरं का… डोळ्यासमोर तरळून जातो. ड्रायव्हरच्या समोर आणि बसच्या दोन्ही बाजूला असलेल्या खिडक्यांना लोंबकळता येत नाही अन्यथा आपणही रोज बॉर्डर क्रॉस केली असती. आणि ती करूनही जिवंत राहिलो असतो. रस्त्याची अवस्था आणि बसचे एकूण वजन यामुळे तिच्या चालीचे रुपांतर स्वॅगमध्ये झाले होते. बसच्या दारात असलेली गर्दी बघून काही लोक मागे हटले… मी नाही. आपल्या शरीराचं कडबोळं करून बस मध्ये कसा प्रवेश करायचा हे एव्हाना जमलंय. बसच्या आत घुसलो. सगळ्यांच्या शरीराला स्पर्श होत आपण पवित्र होत जातो. हो पवित्रच. बसची गर्दी, लोकलची गर्दी अनाहुतपणे माणसातले अंतर संपवते. मनाने ते कधी संपेल? कुठल्या प्रवासात? माहीत नाही. पण शरीराने ते संपते. नक्कीच. एकाच वेळेला वेगवेगळ्या जाती पंथ धर्मातल्या लोकांची शरीरं घुसळली जातात. मज्जा. सर्वधर्मसमभाव तो हाच आणि इथेच. तुम्ही कितीही तोंडाला रुमाल लावला तरी डिओ मिश्रित घामाचा वास तुम्ही रोखू शकत नाही. एकूण पृथ्वीवर असलेली हवा या धर्मातून त्या धर्माच्या माणसात येत जात असते. तुम्हाला काय माहीत तुम्ही आत्ता घेतलेल्या श्वासात जो थोडासा कार्बन आला तो कुण्या धर्माच्या माणसाचा उच्छ्वास आहे? बसच्या आत, ट्रेनमध्ये, गावी जाण्याच्या प्रवासात तुम्हाला बसायला जागा मिळाली तर अत्युच्च असं जे तुमच्या आयुष्यात होणार आहे ते हेच. हेच अंतिम सत्य. बाकी ठो. स्त्रियांसाठी काही सीट राखीव असतात. उरलेल्या सगळ्या जागा पुरुषांसाठी असा त्याचा अर्थ होत नाही. परंतु काही हुशार स्त्रिया पुरुषांच्या सीट वर बसतात. त्यांचा विशेष राग येतो मला, उगीचच. मला स्त्रियांविषयी तीनच गोष्टी वाटतात. टोकाचं आकर्षण, माया आणि राग. स्त्रियांनी त्यांना दिलेल्या राखीव सीटवरच बसावं असं नाही, पण यार… आमची गोची होते. मनात सतत असं वाटत राहतं ही कशाला बसली इथे? एका पुरुषाची जागा अडवली ना… मी मुद्दाम तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. समानता आलीये ना? ती माहीत असलेले पुरुषच स्त्रियांना ‘लेट्स बी इक्वल’ म्हणत चांगल्या प्रकारे त्रास देतात. अचानक बेस्ट ड्रायव्हरने ब्रेक दाबले. बाईकवाला बसला कट मारून गेला होता. ड्रायव्हरने मोठ्याने शिव्या द्यायला सुरवात केली. अगदी शेवटच्या प्रवाशाला त्या शिव्या ऐकू जाव्यात, स्त्री-पुरुष भेदभाव होऊ नये असे त्याला मनापासून वाटले असावे. शिव्या अर्थातच स्त्रीलिंगी. हे मला काही नवीन नाही, तसं आता हे कुणालाच नवीन राहिलेलं नाही. सिग्नलला अशा गोष्टी होतातच. तुमचा ग्रीन सिग्नल असला तरी तुम्हाला विना कट पुढे जाता येईलच असे नाही आणि समोर रेड असला तरी तुम्ही थांबालच असेही नाही. आपल्या प्रत्येकाच्या डेली रुटीनच्या प्रवासात एक तरी सिग्नल असतोच जो कुणीही पाळत नाही. आपण स्वतःसुद्धा. मी तर या सिग्नलला नावच दिले आहे. ‘कुठेस रे?’, असं विचारलं की मी सांगतो, ‘अरे, आपल्या न पाळणाऱ्या सिग्नलला आहे, पोचतो १० मिनिटांत.’ सिग्नल ग्रीन झाला, बस पुढे निघाली. या सिग्नलची एक गंमत असते. एकाच रस्त्यावर सरळ रेषेत असणाऱ्या सिग्नलचे एक टायमिंग असतं. पहिला सिग्नल ग्रीन मिळाल्यानंतर तुम्ही साधारण ३० च्या वेगात वाहन चालवले तर पुढचे सगळे सिग्नल तुम्ही पोहचेपर्यंत ग्रीन होत जातात. हा काय नियम नाही… माझं असं निरीक्षण आहे. मी बऱ्याचदा मित्राच्या बाईकवर जात असताना हे निरीक्षण नोंदवले आहे. दोन ओळी लिहिण्यापुरते असले तरी माझ्यासाठी ते पूर्णतः खरे आहे. आपण जगाला उपयोगात येतील अशी निरीक्षणे करू शकत नाहीत, त्यातून पायथागोरसचा सिद्धांत निर्माण करू शकत नाहीत मान्य, पण आपलं रोजचं जगणं थोडं सोप्पं करण्यासाठी आपण आपापले सिद्धांत मांडत असतोच, जगापुढे नाही स्वतःपुढे. उदा. अमुक स्टेशनला भाजी महाग मिळते पण तमुक स्टेशन येईपर्यंत ती निवडून होते, घरी गेल्यानंतरचा वेळ वाचतो. एक तास वाचला म्हणजे एकूणात ती माझ्यासाठी स्वस्तच ना… असे प्रत्येकाचे सिद्धांत असतात. हा हिशोब नव्हे… याला हिशोब म्हणूच नये.

तुम्ही कितीही विचारांत गुंग झालेला असलात तरी बस स्टेशनला आल्यावर तुमची तंद्री भंग होते. याला दरवेळी शब्दच कारणीभूत असतील असे नव्हे… ज्याला बोलायचा मूड नसतो तो सरळ तुम्हाला धक्का देऊन, तुडवून पुढे निघून जातो. ‘ए भाय दिखता नै क्या…’ चे दिवस गेलेत हो. एकमेकांना तुडवत, बाजूला ढकलत, मागे टाकतच उत्क्रांती होते म्हणतात. काय सर्व्हावल का काय ते. इथे उत्क्रांती एकाच गोष्टीत होते ती म्हणजे ‘सगळ्यात आधी’ तुम्ही कुठेतरी असता. तुम्ही असणारा शुक्राणू सगळ्यात आधी अंडाशयात घुसला, कुणाच्या तरी आधी, एवढंच त्यात सुख, बाकी ठो. तिकिटाच्या रांगेत पटकन घुसून तिकीट मिळवणे हे सुद्धा असेच… इथे फरक एवढाच की सगळ्यांना कधी न कधी तिकीट मिळणार असतंच. पण मला याची फिकीर वाटत नाही. मी स्मार्ट दिसत नसलो तरी आपल्याकडे असलेलं कार्ड स्मार्ट आहे. ते मशीनवर ठेवलं नकाशावरून दादर सिलेक्ट केलं. १० रुपये. तिकीट काढलं… ते आलंच नाही. साधारण १५ सेकंदानी पुरेसे पैसे नाही असे त्या तिकीट व्हेंडर मशीनने दाखवले. पंधरा सेकंद आपला माज उतरवायला पुरेशी ठरतात. गुपचूप रांगेत उभा राहिलो. माझ्यामागे झटकन दोन चार आणखी उभे राहिले. किमान शेवटी आपणच असण्याचं सुखही घेता आलं नाही. निम्मी रांग सावलीत निम्मी उन्हात. मी उन्हात… डोक्यावर ऊन. शहरात डोक्यावर ऊन आल्यावरच सूर्य दिसतो. त्याचा डोक्यात प्रकाश पडला. स्मार्ट मुळात असावं लागतं, कार्ड वापरल्याने आपण होत नाही हे लक्षात आलं. काल रात्रीच ते रिचार्ज का करून घेतले नाही असा स्वतःला दोष देत उभा राहिलो. इतक्यात दोन मुली रांग सुरु होते त्या खिडकीच्या दिशेने रांगेला न्याहाळत येताना दिसल्या. बहुतेक रांगेच्या शेवटाकडे जात असाव्यात. मी पाहत होतो. दोघी माझ्या पर्यंत आल्या… आणि अचानक त्यातल्या एकीने मला सरळ विचारलं “दोन विरार काढून द्या ना प्लीज, खूप मोठी रांग आहे.”

तुम्ही असता तर काय केलं असतं ?

मीसुद्धा तेच केलं. ‘तुम्ही आजच्या काळातल्या मुली आहात स्वतः रांगेत उभं राहून घ्या तिकीट, आजकाल सगळीकडे समानता आलीये ना? मग घ्या रागेत उभे राहून तिकीट. स्वतः स्त्री असण्याचं भांडवल कशाला करता?’ असं मी नाही म्हणू शकलो. नकळत, खरंच नकळत मी ‘हो’ म्हणालो… हातात तिकिटाचे योग्य पैसे टेकवत, त्या दोघी स्माईल करत सावलीत जाऊन उभ्या राहिल्या. रांग खूप मोठी होती… ती हळूहळू पुढे सरकत. पाच मिनिटांनी मी पूर्णतः भानावर येऊन विचार करू लागलो. च्यायला, कशाला ‘हो’ म्हणालो मी… आता त्या दोघी बघ कशा सावलीत जाऊन उभ्या आहेत, आयतं तिकीट मिळणार. दोघी गप्पा मारण्यात गुंग झाल्या. त्यातल्या एकीशी माझी नजरानजर होत होती. गोरी, फिक्कट पिवळ्या रंगाचा त्यावर जांभळ्या रंगाची फुले असलेला पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी… म्हणजे सुंदरच. मिडल क्लास सुंदर. केसांचा इंदिरा हेअरकट केला होता. चांगला दिसत होता तिला. पुरुषासारखी हेअरस्टाईल करणारी पहिली स्त्री म्हणजे इंदिराच. किमान माझ्या इतिहासात. पण म्हणजे तिला सगळं माहीत असणार. थोडंफार पुरुषासारखं दिसायचा प्रयत्न करतेय. चाप्टर असणार ही. चष्मासुद्धा घातलाय. चष्मा घातल्याने मुली उगाच सभ्य वाटू लागतात आणि सुंदरही. तिच्या बरोबरची तिच्यापेक्षा दिसायला डावी… तिचं माझ्याकडे लक्ष नव्हते. मी दुसरीपेक्षा जास्त डावा होतो. आपण सतत आपल्यापेक्षा उजवं असणाऱ्या लोकांना प्राधान्य देतो. मैत्रीत, नात्यात, व्यवहारात, समाजात. बाकी ठो.

इंदिरा हेअरस्टाईल असणारीच्या नजरेनं मी अस्वस्थ होत गेलो. काय बोलत असतील दोघी आपसांत. ‘बघ केलं की नाही एकाला तयार. मुलींनी एक स्माईल दिली की जगातली सगळी कामे त्यांच्या मनासारखी होतात. त्यातलं हे एक. झाला की नाही हा बावळट तयार. अगं, कुणी कितीही म्हणू दे शेवटी जगरहाटी बायकाच चालवतात. पुरुष चालवतो हा फक्त आभास आहे या व्यवस्थेचा. त्याला तसंच राहू देऊ. आणि माझ्यासारखी मुलगी याच्याशी अनोळखी असून बोलली ह्यातच हा सुखावला.’ असं टेचात सांगत असणार ही दुसरीला. मला स्वतःचा खूप राग यायला लागला. फसलास तू मित्रा… आता जोवर तिकीट खिडकी येत नाही तोपर्यंत हा नरक तुला प्रत्यक्ष छळत राहणार. तिची नजर, तिचे हास्य, रांगेतले आपण. देवा हे संपव लवकर… ती बसवाली, ही तिकीटवाली, ऑफिसवाली, गाडीवाली, मॉलवाली सगळ्या जणी माझ्या समोर हसत फेर धरू लागल्या मधोमध ही उभी. या पोरीने आपला चमन झिंगा केला. श्या…

खिडकीजवळ येण्याचा खरा काळ जेवढा होता त्यापेक्षा दुप्पट मला तो वाटला. आता मी जांभळ्या फुलवालीकडे एकदा पाहिलं.

“दोन विरार, सिंगल ना?”

तिनं मानेनं होकार दिला, आणि अर्थात स्माईल. मी हसलो नाही. खिडकीत वाकलो.

“भैया, दो विरार देना. सिंगल”    

असे म्हणत पैसे आत टेकवले. आतल्या पुरुषानं माझ्या हातात तिकीट दिलं… मी हात बाहेर काढून तिच्या हातात तिकीट दिलं ती आभार मानून निघाली सोबत तिची डावी. मी वर पाहिलंच नाही. मला नव्हतंच बघायचं वर. आपण हरलेलो असलो तरी जाताना तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू मला पहायचं नव्हतं. ती गेली. मी खिडकीतच होतो… मी आता माझे पैसे आत सरकवले “और एक दादर सिंगल.”

आतला पुरुष म्हणाला “टिकट नही मिलेगा… बाजू हो जाव.”

“भैया, मै लाईन मै आया हूं.”

“हां, तो दे दिया ना टिकट एक ही बार मिलता है… दुसरा लेना है तो फिरसे लाईन में लगो. इतना भीड है… ऐंसा किसी और का निकलके देने लगे तो पिछेवालो को क्या मिलेगा?”

मी त्याच्याशी भांडायला सुरूवात केली. असा काही नियम नाही. मी कितीही तिकिटं काढू शकतो माझा नंबर आल्यावर. मोठ्या आवाजात तो बोलू लागला मी हळू. पण निकराने लढत होतो. इतकी गर्दी असताना फुकटचा परोपकार तुला कुणी शिकवला असे थोडक्यात त्याचे म्हणणे होते. फायनली त्याने खिडकी आतून बंद करून टाकली. आता मागे रांगेत उभे असलेले बोलायला लागले.

“तुम्हारी वजह से हमको कायको तकलीफ… बोल राहा है तो साईड हो जाव.”

चांगले चार पाच वेगळे आवाज आणि वेगळी वाक्ये कानावर आली. सामाजिक रेट्यापुढे मला माघार घ्यावी लागली. लोक काय काय मागे घेतात. मी नाईलाजाने बाजूला झालो. त्याने पुन्हा खिडकी सुरु केली. मोहिनी अस्त्र ऐकून होतो, आज त्याने आपला भेद केला. मी गोंधळून आजूबाजूला बघत होतो. स्वतःला लाखोली वाहत होतो. दुसऱ्या तिकीट खिडकीवरच्या रांगेतला एक मुलगा हे सगळं बघत होता. त्याला मी रिक्वेस्ट केली… त्याने मला त्याच्या पुढे लाईन मध्ये घुसवला. एक दोन जणांचे झाल्यावर माझा नंबर आला. मी दादरचे तिकीट घेतले त्या मुलाला फ्रॉम दि बोट्म ऑफ माय हार्ट  ‘थॅंक्यू’ म्हणालो. आधीची रांग मधून फोडत प्लॅटफॉर्मच्या दिशेनं निघालो. इतक्यात अनपेक्षितपणे ती जांभळ्या फुलवली इंदिरा समोर उभी राहिली.

“अहो, तुम्ही गेला नाहीत अजून?”

“सॉंरी, माझ्यामुळे तुम्हाला तिकीट…”

मी तिला पुढे बोलू न देता तिच्या डोळ्यात खोलवर बघत ‘इट्स ओके’ म्हणून निघालो. उपकार केले तुझ्यावर असा आव नव्हता, खरंच उशीर झाला होता. धावत जिना चढून दुसऱ्या बाजूला गेलो. दादर लागली होती काही मिनिटांनी येणार होती. मी समोरच्या प्लॅटफॉर्मवर पाहिले. विरार लागली होती तीही येणार होती. प्रचंड गर्दी दोन्ही बाजूला. या शहरात प्रवास हेच जगणं आहे, बाकी ठो. महिला वर्गाच्या डब्या जवळ ती मला दिसली. एकटीच होती तिची डावी मैत्रीण दिसेना. म्हणजे ती आधीच्या ट्रेनने निघून गेली होती. हिलाही जाता आलं असतं पण ती का थांबली?? आमच्या दोघांची नजरानजर झाली. मला मेल्याहून मेल्या सारखे झाले… साला, ही थांबली. आपण न तिचे कुणी… आपला काय… मघाशी आपण जो सगळा विचार केला… फक यार… तिचं थांबणं असह्य झालं, मी तिला नीट थॅंक्यू पण नाही म्हणालो. नाव विचारणं तर लांबच. एकदम मला ती आवडायला लागली… आता माझ्यासाठी ती जगातली सुंदर मुलगी होती. मी तिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलो. लगेच जिना चढून पुन्हा तिला कॉफी प्यायला घेऊन जावं असा विचार मनात आला. पुन्हा नजरानजर झाली. दोघांनी स्माईल शेअर केली. मला रहावेना… पण पुन्हा सगळ्या स्त्रियांना आपण गृहीत धरतो हा विचार मनात आला… आई बहीण मैत्रीण बायको काकू मामी मावशी आत्या. अनोळखी स्त्रियांना जरा जास्तच. तिला काय वाटतय हे पण मीच ठरवतोय. नाही नको जायला.  तिची छबी मनात उमटावी म्हणून तिच्याकडे दोन चार वेळा पाहिलं… विरार ट्रेन आली. ती थांबेल का ? आता मला ती दिसत नव्हती. लोकल ट्रेनच्या मधून पलीकडचे काहीच दिसत नव्हतं. दारातच खूप लोक उभे होते. हेच आणि एवढेच ते परप्रांतीय, बाकी ठो. तिने जर ही ट्रेन सोडली तर… तर मीसुद्धा माझी ट्रेन सोडून तिला कॉफी प्यायला घेऊन जाणार असं मी मनाशी पक्क ठरवलं. आज फाट्यावर मारू सगळं… आज तरी. प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेन ३० सेकंद थांबते. तीस सेकंद पुरेशी नव्हे, नव्हे… खूप होती माझ्यासाठी. ट्रेन निघाली… हळूहळू वेग पकडत स्टेशन बाहेर पडू लागली. आता ती मला दिसणार. इतक्यात हे सगळं जसं अनपेक्षित घडलं होतं तितक्या अचानकपणे दादरची ट्रेन माझ्या प्लॅटफॉर्मवर आली. विरार ट्रेन जाण्याची आणि दादर येण्याची वेळ नेमकी एकच. मी काय करू? मी पलीकडे पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ट्रेनमधे खूप गर्दी होती, काहीच दिसत नव्हतं. फक्त एका स्त्रीच्या आवाजातील उद्घोषणा ऐकू येत होती.

“प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलेली लोकल दादरला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल अंधेरी ते बांद्रा, बांद्रा ते दादर या स्टेशनदरम्यान कुठेही थांबणार नाही.”

थांबणार नाही??.

प्रतिमा सौजन्य : मुंबई स्ट्रीट आर्ट

Post Tags

17 Comments

  • डॉ प्रणिल राजेंद्र बडगुजर
    Posted 19 एप्रिल , 2018 at 1:58 pm

    साहेब आपला ब्लॉग अप्रतिम आहे. शब्दांचा वापर अप्रतिम आहे…

  • नितिन जाधव
    Posted 19 एप्रिल , 2018 at 2:02 pm

    वा वा वा…पूर्णा, या लेखातून खुपच छान वास्तविकता अनुभवली.सुंदर लेख आणि छान लिहालायस. खुप खुप शुभेच्छा आणि आभिनंदन.

  • Yogesh Vidyasagar
    Posted 19 एप्रिल , 2018 at 4:09 pm

    Kamaaal !

  • Sahaj
    Posted 19 एप्रिल , 2018 at 4:36 pm

    पुर्णा तू खरंच खूप सुंदर लिहिलयस।
    तुझ्यातला हा नवीन पैलू आज कळला.

    • अजिंक्य देशपांडे
      Posted 20 एप्रिल , 2018 at 8:16 am

      मस्त रे…..छान मोकळा झालायस….👍

  • गणेश बनकर
    Posted 19 एप्रिल , 2018 at 6:25 pm

    वा, खुप छान लिहितोस पुर्णा, तु ग्रेट आहेस यात काहीच शंका नाही👍👌👌👌💐💐💐. Best of luck to your future endeavors.🙏

  • राजेश विजय साळवी
    Posted 19 एप्रिल , 2018 at 7:24 pm

    वा ऽऽ ह!
    पुर्णानंद तु अष्टपैलू आहेस.
    खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
    सुयोग निर्मित”सारे प्रवासी घडीचे ” मध्ये तुझ्यासोबत काम करायला मिळालं हे भाग्यच.
    भविष्यातील नवनवीन प्रांतात तु सरसच होशील ह्यांत तिळमात्र शंका नाही.
    माझ्या कडुन खुप खुप शुभेच्छा!!

  • शंतनू देशमुख
    Posted 19 एप्रिल , 2018 at 11:34 pm

    खूपच जब्राट… मस्त लिहिले आहे.. एकदम झॅंटेमॅटीक…

  • Vinu Kulthe
    Posted 20 एप्रिल , 2018 at 2:41 am

    अप्रतिम पूर्णा….आपल्या यशाचा आलेख असाच उंचावत राहो

  • Kuldeep
    Posted 20 एप्रिल , 2018 at 2:55 am

    Sundar Purna !! Ur writing is so fresh and practical ..!! Keep writing ..:)

  • Nilesh Khalikar
    Posted 20 एप्रिल , 2018 at 11:21 am

    Purana Da khupach maja Ali vachtana!!! I!! 1 no.👍🏻

  • सचिन
    Posted 20 एप्रिल , 2018 at 3:42 pm

    वा! मजा आला पुर्णा!

  • Savita Prabhune
    Posted 20 एप्रिल , 2018 at 8:31 pm

    purnuu!! bhaaariii lihilayas!! ajun lihi ! jhakaas mitra.. tu lihi baaki tho

  • Vinod suryavanshi
    Posted 21 एप्रिल , 2018 at 11:37 am

    फ्ट आणि पैसे कमवायचा आणि ऊडवायचा मुद्दा थेट भिडला.ईंदिरा हेअरस्टाईल वाली गोष्ट पन भन्नाट..बाकी लेख बेस्टच…

  • Abhishek Anand
    Posted 21 एप्रिल , 2018 at 1:24 pm

    Wah, pratyek vakyat jivantpana anubhavla…

  • Uday Deshpande
    Posted 23 एप्रिल , 2018 at 8:52 pm

    Mastare Purna , Navin Kala . Agriculture chhan.

  • स्वरूप हेमंत गोडबोले
    Posted 8 जुलै , 2018 at 9:05 pm

    मला स्त्रियांविषयी तीनच गोष्टी वाटतात. टोकाचं आकर्षण, माया आणि राग…

    क्षमतेपेक्षा जास्त वापरली जाणारी शहरं…

    एकमेकांना तुडवत, बाजूला ढकलत, मागे टाकतच उत्क्रांती होते म्हणतात….
    क्या बात है… बाकी ठो

Leave a comment