प्रियांका तुपे

घराविषयीच्या नोंदी



back

‘माझं घर’ असा निबंध आपल्यापैकी प्रत्येकानं लहानपणी एकदा तरी लिहिलेला असतो, किंवा चित्र तरी काढलेलं असतं. समजा चित्र काढलं तर आपण एक घर काढतो, समोर एखादं झाड, छोटंसं अंगण, हवं तर कुंपण किंवा रस्ता, मागे डोंगररांग – त्यातून वाहणारी नदी, उगवणारा सूर्य, ढग, पक्षी काढण्यापर्यंत आपल्या कल्पनेची भरारी असते. पण आपल्या चित्रातल्या घराच्याशेजारी आणखी खूप घरं, शेजारी का नाहीत? असा प्रश्न आपल्याला कुणीच विचारत नाही, घराची आपली संकुचित कल्पना अशी बालपणापासून आकार घेत जाते आणि पुढे जाऊन विविध जात-धर्मांचे शेजारी, त्यांचा सहवास, त्यांच्याशी संवाद, सांस्कृतिक देवाण-घेवाण पालक जाणीवपूर्वक घडवून आणतातच असं नाही. माझ्यासोबतही असंच घडलंय. त्यामुळे वर्षानुवर्षं आपल्याच आसपास राहणारी हाडामासाची माणसं, आपल्यासारखंच सामान्य आयुष्य जगतात, वेगळ्या धर्माची असली ती सुंदर माणसं असतात, त्यांची घरं आपल्या घरांसारखीच स्वच्छ किंवा पसारा असलेली असतात, आपल्या घरात केला जातो, तसाच पाहुणचार तेही करतात, हे समजायला वयाची खूप वर्षं जावी लागली. 

माझा जन्म १९९३ च्या नोव्हेंबरमधला. ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत सतत दंगली घडत होत्या. बॉम्बस्फोट, दंगलींचं सत्र सुरूच होतं. माझे आई बाबा तेव्हा मुंबईतल्या वडाळा परिसरातल्या अँटॉप हिल भागात राहत होते. हा भाग तसा मुस्लीमबहुल. आमचं चाळीतलं छोटंसं घर धरून तिथं आठ-दहाच हिंदूंची घरं होती. मी आईच्या पोटात असल्यानं आता दंगलींच्या सावटाखाली, आईची डिलीवरी कशी होणार, असा बाबांसकट सगळ्यांनाच प्रश्न होता. शेवटी आईला तीन महिने आधीच गावी पाठवलं गेलं आणि तिकडेच माझा जन्म झाला. आई मला अजूनही त्या आठवणी सांगते. माझ्या जन्मानंतर, मी लहान बाळ आणि त्यातही मुलगी असल्यानं आम्ही त्या मुस्लीमबहुल भागात राहणं कसं योग्य नाही, हे तिथल्या हिंदू शेजाऱ्यांनी आई-बाबांना सांगितलं होतं. त्यामुळे काही दिवसांतच मला घेऊन आई बाबा कुर्ल्याला शिफ्ट झाले. 

अँटॉप हिलला आमचं भाड्याचं घर आणि दुकान होतं, त्या दुकानात आसपासचे मोठ्या संख्येनं तिथं राहत असलेले उत्तर भारतीय मुस्लीम यायचे. आमचे तेव्हाचे घरमालकही मुस्लीम होते. आई सांगते, तेव्हा सगळ्या आगरी शेजाऱ्यांच्या घरात वरच्या माळ्यांवर लाल तिखटाचं पाणी टोप-टोपभर करून ठेवलेलं असे, चिंध्याचे बोळे करून, रॉकेलच्या टोपात भिजत घालून ठेवलेले असत, सोडा वॉटरच्या फुटलेल्या बाटल्या (की फोडलेल्या ?) जमा करून ठेवलेल्या असत, अचानक ‘शत्रूचा’ हल्ला झाला, तर प्रतिकार करण्यासाठी. ही अशी बेगमी किती तरी महिने आमच्या घराच्या माळ्यावरही होती. पण त्याचा वापर करण्याची वेळ कधी आलीच नाही, असंही आईनं सांगितलं. हिंदूंची सात-आठ घरं संपूर्ण मुस्लीम वस्तीनं वेढलेली होती, तरी त्यांनी अंदाज केला होता, त्याप्रमाणे मुस्लिमांनी काही वस्तीवर हल्ला केला नाही, कुठल्याच हिंदू व्यक्तीला साधं खरचटलंही नव्हतं, आणि तेवढ्या दंग्यातही आमचं दुकान सुरळीत सुरू होतं, दुकानावर एक दगडही पडला नव्हता, हिंदू असण्याच्या विशेषाधिकारानं एवढी  सुरक्षा पदरात टाकूनही माझे आई-बाबा दुसरीकडे शिफ्ट झालेच. कुर्ल्याला आमचे काही नातेवाईक होते, म्हणून तिकडे राहायला गेल्यावर आई-बाबांच्या लक्षात आलं की, तोही मुस्लीमबहुल भाग आहे, मग त्यांनी दोनच वर्षांत पुन्हा चुनाभट्टीला स्थलांतर करायचं ठरवलं. (चुनाभट्टी हे हार्बर रेल्वे मार्गावरचं एक स्टेशन असून कुर्ल्याला लागूनच असलेला एक छोटासा भाग आहे.)

आई-बाबांच्या बोलण्यातून मुस्लीमद्वेष थेट कधी बाहेर पडला नसला तरी त्यांना त्यांच्याविषयी फार प्रेमही नव्हतं आणि त्यांच्याबद्दल बरी मतंही नव्हती. त्यामुळे चुनाभट्टीतल्या कसाईवाडा या भागात जायला आम्हाला बंदी होती. कारण ती मुस्लीम वस्ती आहे. खरं तर कसाईवाड्यात तेजस्विनी बांबुगडे नावाची माझी शाळेतली एक मैत्रीण राहत होती. एकदा तिनं तिच्या वाढदिवसाला सगळ्यांना घरी बोलावलं. चौथीत होते मी तेव्हा, मला तिच्या घरी जायची खूप इच्छा होती पण घरून परवानगी मिळण्याचा काही प्रश्नच नव्हता. मी आईच्या मागे खूपच भुणभुण केली, सगळ्या मैत्रिणी मिळून जाऊ आणि अंधार व्हायच्या आधी परत येऊ आणि उशीर झालाच तर तेजस्विनीच्या बाबांना सोडायला घेऊन येऊ.. अशी माझ्या तल्लख डोक्यातली आयडिया पण आईला मनवू शकली नाही. ती म्हणाली, ‘’तो एरिया मुलींसाठी चांगला नाहीये.. ..तिथं सगळे मुस्लीम राहतात, त्यांच्या घरी मोठमोठ्या तलवारी, सुरे असतात. तुम्हा पोरीपोरींना कुठे मुरगळून टाकतील, कळणार पण नाही.’’ मी रडून गोंधळ घातला तरी मला तेजूकडे जायला मिळालं नाही, कारण तिचं घर कसाईवाड्यात, खरं तर पूर्ण कसाईवाड्यात नाहीच, पण कसाईवाड्याचा डोंगर सुरु होतो, त्या रस्त्यावर होतं. मला आईचा खूप राग आला होता. मी दुसऱ्या दिवशी आमच्या वर्गातल्या आल्ताफला, त्याच्या घरी तलवार आहे का? असं लगेच विचारलं, तो नाही म्हणाला.. ..पण मला तेव्हा त्याचं म्हणणं खोटं नि माझ्या आईचं म्हणणंच खरं वाटलं. 

मी पाचवीत असतानाचा असाच एक प्रसंग अगदी लख्ख आठवतो. एकदा मला बाबांची खूप आठवण येत होती. बाबा कामावर गेलेले. मस्जिद बंदरच्या एका प्रिटींग प्रेसमध्ये ते काम करायचे. त्यावेळी मोबाईल, विडिओ कॉल याचं इतकं फॅड नव्हतंच. नेमका माझा मावसभाऊ त्या दुपारी बाबांना भेटायला मस्जिद बंदरला गेला पण मी मागे लागूनही त्यानं मला नेलं नाही. बाबांच्या प्रेसमधला लॅंडलाईन नंबर आणि पत्ता मला तोंडपाठ होता, दादाला पुढे जाऊ दिल्यावर, आई झोपलीये याची खात्री करून मी आईच्या पर्समधले पैसे गुपचूप काढून एकटीच चुनाभट्टी स्टेशनला गेले. तिथं तिकीट वगेरे रितसर काढून ट्रेनमध्ये बसले. त्यादिवशी ट्रेनमध्ये मी पहिल्यांदा एवढ्या बुरख्यातल्या बायका बघत होते. जरा भीती वाटली, पण त्यातल्या एका बाईनं लहान मुलीला एकटं बघून खरं तर काळजीनं चौकशी केली, पाणी दिलं. माझे बाबा मला मस्जिद बंदर स्टेशनवर घ्यायला येणारेत अशी थाप मारून मी त्यांची नजर चुकवून त्यांच्याकडून येणारे संभाव्य प्रश्न टाळले. मस्जिद बंदरला त्या बायकांच्या घोळक्यासोबत मी उतरले, त्यांना पुढे जाऊ दिलं नि मग दादीसेठ अग्यारी लेनच्या दिशेनं चालू लागले. एव्हाना पाच वाजत आले होते, आजूबाजूला अजानचा आवाज ऐकू येत होता. त्याला अजान म्हणतात, हे तेव्हा माहीत नव्हतं पण तो आवाज कानांना गोड वाटला. आजूबाजूला खूपच खूप माणसं दिसत होती, बहुतेक सगळी पांढरा सदरा पायजमा, गोल पांढरी टोपी घातलेली, दाढी असलेली.. ..काही फळांच्या गाड्या, खजूर, आगरा पेठा विकण्याच्या गाड्यांवरची माणसं लगबगीनं कुठं तरी जात होती, मी घाबरत घाबरतच दोन तीन जणांना पत्ता विचारला, तो विचारताना त्यांच्याकडच्या तलवारीनं त्यांनी मला काय केलं तर.. अशी भीती होतीच. पण बाबांना भेटण्याच्या ओढीनं मी धाडस केलं. अर्ध्या तासानं मी बरोबर पत्यावर पोचले. मला बघून बाबा शॉक्ड! पण अजिबात रागावले नाहीत. मग ते आणि दादा एका मालाची डिलीवरी द्यायला जाईपर्यंत त्यांनी मला प्रेसमधल्या शेठच्या काऊंटरवर बसवलं. तोवर रसूल अंकल आणि बाकी मंडळी मशिदीतून नमाज अदा करून आली होती. बाबांच्या शेठला पण बाहेर जायचं होतं, म्हणून ते माझी जबाबदारी रसूल अंकलवर टाकून गेले. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण अंकल एकदम भारी होते, थोड्या वेळातच आमची दोस्ती झाली. ‘अंकल, तुमच्या घरी तलवारी आहेत का?’ असं मी त्यांनाही विचारलं. त्यांनीही ‘नाही’ असं सांगितलं. आता मात्र मला आई आपल्याला उगाच काही तरी टेपवते असं वाटू लागलं. ट्रेनमधल्या सगळ्या आंटींनी आपल्याला काहीच केलं नाही. पत्ता सांगणाऱ्या अंकलनी पण काही केलं नाही, रसूल अंकल पण आपल्याशी छान वागले, आल्ताफ म्हणाला की, त्याच्या घरी पण तलवार नाहीये. सगळंच कनफ्यूजन.. ..पण आईचं म्हणणं आता खोटं वाटू लागलं. 

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो. आमच्या गावच्या घरासमोर राहणाऱ्या तावरे आजोबांची मुलगी जना मुंबईत गोवंडीला राहत होती, जनामावशी पण त्या सुट्टीत गावी आली होती आणि येताना गोवंडीला तिच्या शेजारी राहणाऱ्या आमच्याच वयाच्या हबीबाला घेऊन आली होती. आम्हा सगळ्यांना नवी मैत्रीण मिळाल्याचा खूप  आनंद झाला होता. हबीबा हिंदीमिश्रित मराठी बोलायची ते ऐकायला फारच मजा यायची आणि गंमत म्हणजे तिच्याही घरी तलवारी नव्हत्या. आम्ही दिवसभर खेळायचो, गप्पा मारायचो, चाफ्याची फुलं गोळा कर, पानांच्या चपात्या बनव नि काय काय.. ..हबीबाचा एक ड्रेस मला खूप आवडला होता, तिनं तो एक दिवस मला घालायलाही दिला. मोठी खट्याळ आणि लाघवी पोर होती ती, सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी. माझ्या आजूबाजूला मुस्लिमांबद्दल असणारी मतं, कानावर पडणाऱ्या गोष्टी या सगळ्याबद्दल मी जना मावशीला विचारलं. तिनं खूप काही सांगितलं. त्यावरून मला एक कळलं की आपल्याला सांगितलं जातं.. तसे काही मुस्लीम घाणेरडे नसतात, ते त्यांची घरं दररोज स्वच्छ करतात. त्यांच्या घरात गायीचं, बैलाचं मांस नेहमीच नसतं. ते आपल्यासारख्याच भाज्याही खातात. जनामावशीला तर हबीबाच्या आईच्या हातची शेपूची भाजी खूप आवडायची. आणि हबीबाला जनामावशीशिवाय एक क्षणही करमत नसायचं.. ..म्हणूनच हबीबाचे आई वडील त्या सुट्टीत त्यांच्या गावी लखनौला गेले होते, पण हबीबा जनामावशीबरोबर आमच्या गावी दोन महिने राहिली होती. 

अशाप्रकारे मुस्लीम लोक आणि मुस्लिमांबद्दल अधूनमधून माझ्या कानावर जे पडत होतं ते आणि प्रत्यक्ष मुस्लिमांचं माझ्याशी वागणं यात खूप फरक होता. नेमकं खरं काय असेल, याबाबत मनात खूप गोंधळ होता, त्यात पुढची काही वर्षं गेली. मग मी दहावीत असताना, आम्ही ज्या भागात राहत होतो, तिथल्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांच्या कट्ट्यावर एक दिवस एक वाक्य भल्या मोठ्या अक्षरात पेंट केलेलं पाहिलं. ‘नसेल भगवा शिरावर, तर बसेल हिरवा उरावर’ असं वाक्य आमच्या ग्रुपमधल्या एका दादानं लिहिलं होतं, बाजूला भगवा झेंडा काढून, ‘भगवा कट्टा’ असं लिहिलं होतं. मला ‘त्या’ वाक्याचा अर्थ समजून घेण्यातच बरेच दिवस गेले. एकदा मी शेजारच्या एका दादाला विचारलंही, तर तो म्हणाला, “हे वरती कसाईवाड्यात राहणारे सगळे मुसलमान, गायी कापून खातात नि गायींची मुंडकी तशीच वरून खाली फेकून देतात. गाय कापतो का आपण? आपल्यासाठी गाय देव आहे, हे या लांड्यांना माहितीये साल्यांना..तरी असं वागतात. माजलेत साले. आणि त्यांच्या घरी कधी जायचं नाही आ..ते खूप घाण असतात..कधी तिकडून चुकून गेलं तरी वासानेच उलटी होते. गटारांमध्ये सगळं लाल पाणी वाहत असतं. सारखं गायी बैल कापून खातात. कशाची शिस्त म्हणून नाही. त्यांच्या अंगाला पण घाण वास येतो. जुम्मा टू जुम्मा आंघोळ करतात. घरात बघशील तर नुसत्या माश्या, आता एवढं मांस ठेवल्यावर माश्या येणारच ना..’’ दादाचं हे ऐकल्यावर मला, तोही थापा मारतोय असं वाटलं. पण मुस्लीमद्वेष, इस्लामोफोबिया, प्रोपगंडा हे शब्द तेव्हा माहीतही नव्हते. एक मात्र खरं की आजूबाजूचे अनेक लोक जवळपास सगळेच मुस्लीम, मुस्लिमांची घरं, वस्ती याबद्दल खूप पूर्वग्रहदूषित धारणा बाळगून होते आणि अजूनही आहेत, शिवाय मी नि माझ्यासारख्या कित्येकांमध्ये या धारणा रुजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.

पण एकेदिवशी मी कसाईवाड्यात जायचं ठरवलंच. सकाळी वॉकला बाहेर पडले नि कुणालाही न सांगता पावलं कसाईवाड्याकडे वळवली आणि तो दिवस माझ्या अनेक धारणांना धक्का देणारा ठरला. हिंदू बहुसंख्याक समाजात, त्यातही तथाकथित उच्चजातसमूहात वाढताना अशा अनेक धारणा माझ्यासारखे करोडो लोक बाळगून असतात. जसंजसं विविध समूहांशी अधिक खोलवरचा सबंध येतो, तशा एकेक धारणा गळून पडतात. तर कसाईवाड्यात गेले होते, तेव्हा सकाळी लोकांची कामावर जाण्याची लगबग सुरु होती, तसा इथं राहणारा वर्ग हा प्रामुख्यानं श्रमिक. त्यामुळे सकाळी असं चित्र दिसणं सर्वसामान्य गोष्ट होती. जसंजसं मी आणखी पुढे, आत-आत जाऊ लागले, तसं माझी तिथल्या माणसांशी नजरानजर होऊ लागली. बहुसंख्याक समाजानं माझ्यावर थोपवलेल्या धारणांमुळे नेणिवेत थोडीशी भीती होतीच, पण ती पुढच्या अवघ्या दहा मिनिटांत पळून गेली नि त्यानंतर आजतायगत मला मुस्लीम वस्त्यांमध्ये, असुरक्षित तर सोडाच पण कधी असहजही वाटलेलं नाही. आणि हा एकाच वस्तीचा वा शहराचा अनुभव नाही, सविस्तर पुढे येईलच. तर कसाईवाड्यात मला आणखी एक प्रफुल्लित चित्र दिसलं ते लहान मुला-मुलींचं. सकाळी सातच्या आसपासची वेळ असल्यानं या मुला-मुलींची मदरशात जायची लगबग सुरु होती. इवल्या इवल्याशा मुली, त्यांच्या वेण्या, त्यांचे रंगीबेरंगी सलवार कमीज, काजळ घातलेले सुंदर डोळे, त्यांच्या हातातला दप्तरवजा बक्सा, आणि त्यांच्याच वयांचे कुर्ता, सलवार, टोप्या घातलेले त्यांचे मित्र लगबगीनं मदरशात जात होते. त्यातल्या एका मुला-मुलीचं इमली खाण्यावरून झालेलं लटकं भांडणं, रुसवा-फुगवा हे सगळं मी बारकाईनं पाहत होते, अर्थात त्यांच्यामागून गपचूप चालता चालता.. ..तर ते भांडणही मला मोठं मजेचं वाटलं होतं. आणि लहान मुलं-मुली इतकी गोड दिसत होती की मला त्यांच्याशी बोलण्याचा मोह आवरलाच नाही. त्या मुलांनी सुरुवातीला मला काही भाव दिला नाही पण नंतर आपापली नावं सांगितली. माझंही नाव विचारलं.. ..आणि मग त्यांना माझ्या डोक्यावर असलेल्या हेडफोन्सचं कुतूहल वाटलं. डोक्यावर काय आहे, हे त्यांना समजून सांगितल्यावर त्यांनाही त्या हेडफोन्सनं गाणं ऐकून बघायची इच्छा झाली. त्यातल्या एका मुलानं ‘दीदी, मलापण गाणं ऐकायचंय’ म्हंटल्यावर मीच अवघडले. कारण गाणं ऐकण्याला इस्लाममध्ये परवानगी नाही, असा माझा तोवर समज होता (प्रत्यक्ष इस्लामबद्दल न वाचता किंवा मुस्लीम मित्र-मैत्रिणींशी न बोलताच) आणि त्यामुळे आपण या मुलांच्या हातात हेडफोन्स दिले आणि कुणी आपल्याला बघितलं तर काय? धर्मभ्रष्ट केला म्हणून इथंच आपल्याला हाणतील, असं वाटून गेलं. ‘लेकीन बेटा इस्लाम तो गाना सुनने की इजाजत नही देता ना,’ असं वाक्य बोलायचं होतं, पण त्यांचं बालसुलभ कुतूहल बघून मी ते मनातच ठेवलं. आणि जो होगा, देखा जाएगा म्हणत त्यातल्या एका मुलाच्या कानांना हेडफोन्स लावले आणि मोबाईलवर गाणं प्ले केलं. त्यांना फारच मजा वाटली. मी आपलं आजूबाजूला कुणी मला टोकतंय का, हे सावधपणे पाहत होतेय. पण तसं काहीच झालं नाही, इतर सगळ्यांनाही त्यातनं गाणं ऐकून पहायचं होतं, पण तोवर त्यांचा मदरसा आला.. ..आणि उद्या भेटू म्हणत मी त्या मुलामुलींना टाटा केलं. कुणीही मला टोकलं नाही, की तू कोण कुठली, इथं काय करतीयेस, असं विचारलं नाही. मला हायसं वाटलं.

पुढे गेले तर काही बायका दारासमोरच रॉकेलच्या स्टोव्हवर भाकरी भाजत होत्या. एक बाई मिसरी घासत दारात बसली होती. कुणाच्या घरासमोर चुलीवर आंघोळीचं पाणी तापत होतं. कुणी दारात बसून मणी ओवण्याची कामं करत होतं. कष्टकऱ्यांच्या वस्तीत अनेकदा असं चित्र दिसतं, की छोटे छोटे हस्तोद्योग (घरी करण्याची मणी ओवणे, राख्या बनवणे इ. कामं) लोक दारात करत बसलेले असतात, विशेषत: बायका. त्यात मुंबईसारख्या शहरात त्यातही मुस्लीम घेट्टोत जागेची अडचण. त्यामुळे दाराबाहेरच्या इवल्या इवल्या जागेचा वापरही लोक करतात. कुठे एखाद्या दाराबाहेर टाकलेल्या बाजेवर मध्येच एखादा म्हातारा माणूस बिडी फुकत पडलेला दिसायचा. तर कुठे कॉलेजला जाण्याच्या वयातली मुलं गाड्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करताना दिसत होती. माझ्याकडे सगळे लोक थोडंसं निरखून पाहत होते, हे खरंच. पण त्या नजरेत दहशत नव्हती तर कुतूहल होतं. एक तर मी ट्रॅक पँट, टी शर्ट, स्पोर्ट शूज या पेहरावात होते, त्यामुळं तिथल्या वातावरणात माझं वेगळेपण पटकन अधोरेखित होत होतं. शिवाय त्याआधी अशा अवतारातली एखादी बाहेरची स्त्री तिथं कधी गेली नसावी, त्यामुळे कुतूहलानं भरलेल्या अनेक नजरा माझ्यावर पडत होत्या, पण असहजता किंवा असुरक्षिततेचा लवलेशही त्यात नव्हता. शिवाय वस्तीतल्या सगळ्याच बायका बुरखा घालणाऱ्या नव्हत्या. अनेकींनी चक्क माझी आई नेसते, तशी गोल साडी नेसलेली होती, कुणी सलवार-कमीज घातलेलं होतं, कॉलेजला जाणाऱ्या एक दोन जीन्स-कुर्त्यातल्या मुलीही दिसल्या, विशेष म्हणजे त्यांच्या अंगावर बुरखा-हिजाब काहीही नव्हतं. बाकी वस्ती थोडी बकाल होतीच. काही गटारं तशीच उघडी वाहत होती, घरं एकदम दाटीवाटीनं बांधलेली होती, सार्वजनिक संडांसांबाहेर रांगा होत्या, अस्वच्छताही होती, पण बाहेरचं कुणी माणूस गेलं तर लगेचच रोगराई होऊन मरुनच जाईल, अशी परिस्थिती नक्कीच नव्हती. गटारं रक्तानं (बकरी, कोंबड्यांच्या) वाहत नव्हती आणि मुख्य म्हणजे खूप किळस वाटून उलटी येईल, असं मला तरी अजिबात वाटत नव्हतं. उलट वेगळ्या प्रदेशातली वेगळी माणसं, एक नवं जगच माझ्यासाठी खुलं झालं होतं. ज्यापासून मला माझ्या बहुसंख्यांक भवतालानं इतकी वर्षं हेतपुर:सर दूर ठेवलं होतं. या अनुभवानं मला बरंच काही शिकवलं. मुस्लीम वस्त्या अस्वच्छ, दाटीवाटीच्या असतात, पण त्यामागे इतर कारणं असतात, हे शहरच मुळात लहान आहे, इथं सगळ्याच कष्टकऱ्यांच्या वस्त्या अशाच असतात, हे माझ्या लक्षात आलं. पुढे जाऊन अर्थात या मागची राजकीय धोरणं, सामाजिक कारणं लक्षात आलीच. त्यानंतर आणखी दोन-तीन वर्षांनी कॉलेज पूर्ण झाल्यावर मी लगेचच पत्रकारितेत आले आणि मग कामाच्या निमित्तानं माझा अनेक मुस्लीम घरांशी आणखी जवळचा संबंध आला. 

२०१६ मध्ये मी मालेगावला गेले होते. डॉ. फारूख मकदुमी यांच्या घरी. फारुख हे २००६ च्या मालेगाव स्फोटांतले आधी आरोपी असलेले, अनेक वर्ष तुरुंगवास भोगलेले नि मग दहा वर्षांनी (२०१६) मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलेले चाळीशीचे एक गृहस्थ. पेशानं डेंटिस्ट. पण उमेदीची पाच ते सहा वर्ष आर्थर रोड जेलच्या अंडासेलमध्ये दहशतवाद्याचा ठप्पा कपाळावर बाळगत व्यतीत करावी लागली. त्यानंतरची चार वर्ष जामीनावर बाहेर नि मग निर्दोष मुक्तता. २०१६ ला त्यांना निर्दोष मुक्त केल्याचा निकाल लागल्यावर लगेचच मी आमचे तेव्हाचे क्राईम एडीटर (सुधाकर काश्यप) यांच्याशी बोलून डॉ. फारुख यांना भेटायला जाण्याचं नियोजन केलं.नाशकात पोचल्यावर मी डॉ. फारुखना कळवलं. मालेगावात ते स्वत: मला मौसम नदीजवळ घ्यायला आले होते. त्यांच्या बाईकवर बसल्यावर मला थंडी वाजतेय, हे त्यांना जाणवलं.. मी काही न बोलताच त्यांनी गाडी एका टपरीजवळ वळवली. चहा पिऊन मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या पत्नीनं खूप प्रेमानं माझं स्वागत केलं. त्यांचं घर बऱ्यापैकी मोठं होतं. घराजवळच फारुखचं क्लिनीक होतं. फ्रेश वगेरे झाल्यावर त्यांच्या पत्नीनं ‘चला, आता लगेच नाश्ता करुया,’ असा प्रेमळ आदेशच दिला. तरी मला वाटत होतं, अरे बापरे.. यांनी आता मला नॉन वेज काही दिलं तर काय? कबाब किंवा इतर काही मी कसं खाऊ शकेन? पुन्हा खायला मी नकार दिला, तर त्यांना किती वाईट वाटेल. (तोवर मी अजिबातच मासांहार करत नव्हते) पण आम्ही त्यांच्या डायनिंग टेबलवर बसलो आणि फारुखच्या पत्नीनं माझ्या प्लेटमध्ये चना चाट आणि फ्रूट सॅलड वाढलं. माझ्या चेहऱ्यावरचे थोडे प्रश्नार्थक भाव पाहून ती म्हणाली, “फारुख को चना चाट बहोत पसंद है नाश्ते मे.. ..और ये डॉक्टर लोग सब हेल्दीही खाते है फ्रुट्स वगेरा.. ..लेकीन आपको पसंद नही है तो मै कुछ और बनाती हू.. ..क्या खाएंगी आप? पोहा बनाऊ?’’ “नाही.. हे छानच आहे..पोहे वगैरे नको’ म्हणत मी, ते सगळं आवडीनं खाल्लं. मालपुवा आणि पाकातले समोसेही खाल्ले. मी  ते सगळं आवडीनं नि भरपूर खातेय, हे पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसलं, ते मी कधीच विसरु शकणार नाही. इथं माझ्या आणखी एका धारणेला धक्का बसला होता की मुस्लीम घरांमध्ये नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळ्या आहारात नि दररोज मासांहारच असतो.. ..पुढे लवकरच मला पुरणपोळी, करंज्या नि अगदी येसराची आमटी आवडणारे अनेक मुस्लीम मित्र मैत्रिणी भेटलेच. अभिनेत्री दिग्दर्शक मैत्रीण रसिका आगाशेनं एका मुलाखतीत मला सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याला (अभिनेता झीशान अयुबला) साबुदाण्याची खिचडी प्रचंड आवडते.

तर मालेगावात डॉ. फारुख यांच्या केसबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली. त्यांनी एटीएस, एनआयए, सीबीआय या तिन्ही तपासयंत्रणांच्या आरोपपत्रांचे समरी रिपोर्ट्सही मला दिले. काहीही नाव नसलेली मी एक साधारण अगदी नवी पत्रकार असताना त्यांनी मला जराही कमी लेखलं नव्हतं, उलट अगदी बारीकसारीक तपशील सांगत, त्यांनी मला बॉम्बस्फोट झालेल्या सर्व साईट्सवर स्वत:च्या बाईकवरून नेऊन आणलं होतं. दिवसभर मी त्यांच्यासोबत बोलत, भटकत होते. मग संध्याकाळच्या नमाजनंतर त्याच खटल्यातला आणखी एक निर्दोष मुक्तता झालेला तरुण मोहम्मद झाएद मला भेटायला फारुखच्याच घरी आला. झाएद ३२ वर्षांचा होता, पण तो पन्नाशी ओलांडलेल्या नि सगळं अवसान गळालेल्या एखाद्या म्हाताऱ्यासारखा दिसत होता. तुरुंगातून सुटल्यावर तो मालेगावला येऊन एका हातमागावर कारागीर म्हणून काम करत होता. खरं तर त्याला बॉम्बस्फोटांच्या आरोपात अटक केली, तेव्हा तो अवघ्या बावीस वर्षांचा होता. यवतमाळच्या एका मदरशात शिकवायचा. बारावी चांगल्या मार्कांनी पास होऊन त्यानं डी.एड. ला अॅडमिशन घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते, रत्नागिरीच्या एका कॉलेजला त्याचा नंबरही लागला. दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला अॅडमिशन घ्यायला जाणार, तोच आधीच्या रात्री पोलिसांनी त्याला उचललं. स्फोट झाला तेव्हा तो नाशिकपासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेल्या यवतमाळच्या एका खेड्यात होता, पण पोलिसांनी प्राथमिक तपासासाठी त्याला जे उचललं ते नंतर तो आपल्या यवतमाळच्या घरी आजतागायत जाऊ शकला नाही. प्राथमिक तपासासाठी त्याला उचललं त्याचं कारण पोलिसांनी सांगितलं की, १९९३ च्या मुंबईत स्फोटांआधी तो ठिकठिकाणी प्रक्षोभक पोस्टर्स लावत होता, त्यामुळे तो एक संशयित आहे. पण झाएदचे आई वडिल अशिक्षित, त्यामुळे २००६ मध्ये २२ वर्षांचा असणारा झाएद १९९३ ला अवघ्या नऊ वर्षांचा होता, ९ वर्षांचं लेकरू प्रक्षोभक पोस्टर्स कसं लावू शकेल, तेही यवतमाळमध्ये.. (मुंबईतल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर) आणि जरी त्याच्याकडून कुणी तसं करून घेतलं असेल तरीही तेव्हा तो कायद्याच्या भाषेत बालक असताना अजाणतेपणी केलेल्या कृत्यावरून (फक्त धूसर शक्यता ) देशात कुठेही स्फोट झाले तरी त्याला संशयित कसं समजलं जाऊ शकतं? हा प्रश्न त्याच्या आई – वडिलांच्या गावीही नव्हता. मनात आलं तरी भारतीय गरीब मुसलमानांना हे विचारायची मुभा नसते.

तर झाएदला पुढे सत्र न्यायालयानंही दोषी ठरवलं. जामीनासाठी प्रयत्न करावेत, अशी आर्थिक परिस्थितीच नव्हती. पण इतर सहआरोपींना सहा वर्षांनी जामीन मिळाल्यावर, त्या ग्राऊंडवर त्याचा जामीनाचा मार्ग थोडा सुकर झाला. यवतमाळहून आई-वडील, भाऊ यांच्यापैकी कुणीही आर्थर रोड जेलमध्ये त्याला वारंवार भेटायला जाऊही शकत नव्हते, प्रवासखर्चाचेही पैसे त्यांच्याकडे नसायचे. भारतीय राज्यव्यवस्थेच्या आणि पोलिसांच्या मुस्लिमांबाबत असलेल्या पूर्वग्रहदूषित धारणांनी एक गरीब नि निर्दोष मुस्लीम कुटुंब उध्वस्त केलं होतं. झाएदला लहान मुलांमध्ये रमायला, शिकवायला खूप आवडायचं, शिक्षक बनणं हे त्याचं स्वप्नं होतं.. ..ते स्वप्न बेचिराख झालं. आजही हजारो मुस्लीम तरुणांची अशी स्वप्नं चिरडली जातात. कुठेही जरा खुट्ट झालं की पोलिस पहिलं कोम्बिंग ऑपरेशन करतात, ते मुस्लीम वस्त्यांतच. मी मुंबईला अनेक वर्षं चुनाभट्टीत राहत असे. आमचं एक नाश्त्याचं दुकान पोलीस स्टेशनच्या अगदीच गेटबाहेर होतं. अनेक पोलिस कर्मचारी, अधिकारी आमच्याकडे दररोज नाश्त्यासाठी येत. तेव्हा त्यांच्या बोलण्यात सतत ‘कसाईवाड्यात आज कोम्बिंग ऑपरेशन आहे’ असे तपशील येत. त्यामुळे कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे कसाईवाडा असं समीकरण का आहे? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. पुढे बाटला हाऊस फेक एन्काऊंटर, भोपाळ फेक एन्काऊंटर, सोहराबुद्दीन केस अशा अनेक खटल्यांचा अनेक बॉम्बस्फोटांच्या केसेसचा बारकाईनं अभ्यास केल्यावर पोलिसांची एक कार्यपद्धती लक्षात आली. कुठंही काही गुन्हा किंवा तणावाची घटना घडली की आधी मुस्लीम वस्त्यांमध्ये जाऊन वाटेल त्या मुस्लीम तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घ्यायचं. त्यातल्या त्यात गरीब, अशिक्षित आणि ज्यांना पुढे मागे फारसं कुणी विचारणारं नाही अशा कुटुंबातल्या मुलांवर थातुरमातुर बाबी पुरावा म्हणून दाखवत (उदा. एखादा तरुण मदरशात शिकवतो. इ.) त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. बाकीच्यांना काही दिवसांनी सोडून द्यायचं, मात्र ठरावीक काळानं पोलिस स्टेशनला हजेरी द्यायला बोलवायचं. पासपोर्ट वगैरे असेल तर जप्त करून घ्यायचा. त्यांना कुठे बाहेर जायचं असेल तर पोलिसांची परवानगी घ्यायला लावायची इ. अशा कार्यपद्धतीनं कधी पोलिसांवरचा तपासाचा ताण हलका होतो तर कधी दुसऱ्या कुणी ठरवून टाकलेले राजकीय कट यशस्वी होतात. राजकीय शक्तींनी एक पटकथा आधीच तयार केलेली असते शिवाय असं करण्यानं हिंदू बहुसंख्यांक राज्यव्यवस्थेला अपेक्षित असलेलं मुस्लिम वस्त्यांचं गुन्हेगारीकरणही आपोआपच होतं. त्यातूनच पुढे, त्यांच्या घरात हत्यारं असतात, ‘ते’ लोक डेंजर असतात अशा धारणा रुजवल्या जातात. प्रत्यक्षात हिंदू – मुस्लिमांचा संवाद झाला तर त्यांच्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होईल, दोघांमधला ऋणानुबंध घट्ट होईल, हेच हिंदुत्ववादी सत्ताधारी वर्गाला नको आहे. 

दुसऱ्या बाजूला मुस्लिमांना, त्यांच्या वस्त्यांना सतत ताणात ठेवणंही राजसत्तेला गरजेचं नि पोषक वाटतं. वर्षानुवर्षं इथं राहणाऱ्या, इथली भाषा, माती, माणसं, संस्कृती आपलीशी केलेल्या मुस्लिमांना सतत एका परकेपणाच्या भावनेत ढकलणं, त्यांना सांस्कृतिक परात्मता येईल, विलगीकरणाचा अनुभव येईल, याची पुरेपूर तजवीज केली जाते. माझा एक मुस्लीम मित्र हडपसरच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहतो. ती सोसायटी तशी मिश्र जातधर्मीय लोकांची आहे पण मुस्लीम सदस्यांची संख्या तशी कमीच – साधारण वीस टक्के. दोन वर्षांपूर्वी ईदनिमित्त घराबाहेर, सोसायटीच्या कॉमन जागेत दिव्यांची रोषणाई करण्याचा प्रयत्न या मित्रानं केला, तर त्याला त्याच्या शेजाऱ्यांनी, सोसायटी मॅनेजर इ. नी रोषणाई करू दिलीच नाही. सार्वजनिक जागेचा वापर ईदच्या रोषणाईसाठी नको, असं सोसायटीतल्या इतरांचं म्हणणं होतं. मात्र इतर सणांच्या वेळी सगळीकडेच रोषणाई केली जायची. “गेली वीस वर्ष मी सोसायटीतल्या गणेशोत्सवात सहभागी होतो. भंडाऱ्याच्या दिवशी लोकांना जेवण वाढण्यापासून सगळं आनंदानं करत आलोय.. हा आपला सण नाही, अशी भावना चुकूनही कधी मनात आली नाही, पण ज्या माझ्या मित्रांसोबत मी हा सण मनापासून साजरा करत आलो, त्यांनी ईदला सोसायटीत रोषणाई करण्याच्या मुद्द्यावर मला अजिबात साथ दिली नाही की, जे चालंलय ते चूक आहे, इतकं बोलायचीही हिंमत केली नाही. त्यामुळे आता मला सर्व कार्यक्रमांमध्ये पहिल्यासारखं सहभागी व्हावंसं वाटतच नाही,’’ परवा हा मित्र उद्विग्नतेनं सांगत होता. 

असाच काहीसा अनुभव नुरल्लम अन्सारी या माझ्या मित्रानं सांगितला. नूरनं प्रेमविवाह केला. नेहा खन्ना नावाच्या त्याच्या पंजाबी प्रेयसीसोबत. नेहाच्या आईला म्हणजेच नूरच्या सासूला दुसरं कुणीही नसल्यानं (त्या विधवा आहेत) त्यानं त्यांना स्वत:च्या घरी राहायला आणलं. नेहाची आई सश्रद्ध हिंदू असल्यानं त्यानं स्वत:च्या घरात त्यांच्यासाठी देव्हारा बनवून घेतला. आजही अनेकदा दिवाळी किंवा अन्य सणांना पूजेचं काही सामान आणायचं असल्यास, नूर ते सगळं त्यांना आणून देतो. त्यांनी बनवलेला प्रसाद आवडीनं खातो. आणि त्या दोघी मायलेकीही रोजे असतात, तेव्हा नूरसाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. ‘’आमचा मुलगा आजीनं देवपूजा केल्यावर टीकाही आवडीनं लावून घेतो आणि नमाजही अदा करतो. दोन्ही संस्कृतीतली माणसांवर प्रेम करण्याची गोष्ट तो शिकतो आहे.’’ नूरनं म्हंटलेली ही साधीसोपी गोष्ट किती सुंदर आहे. तसे नूर आणि नेहा कोणत्याही सामाजिक चळवळींशी जोडलेले किंवा प्रागतिक वर्तुळांमधले नाहीत, पण माणसांवर प्रेम करण्याची शिकवण ते आपल्या मुलात रुजवू पाहतायेत. घरातल्या प्रत्येकाच्या धार्मिक श्रद्धा वेगळ्या असल्या तरी त्या प्रत्येकाला तसा अवकाश मिळावा, असा प्रयत्न करत आहेत, हे खरंच महत्त्वाचं आहे. तरी तो म्हणतो, ‘’ घरात सगळं सुरळीत असलं तरी बाहेरची परिस्थिती बदलली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी सगळ्या सणांना शेजारी आवर्जून यायचे. ईद असल्यावर हमखास. कुणी नाही आलं तर आमच्या घरून डब्बा जायचा. आमच्याकडच्या बिर्याणीची, शिरखुर्म्याची वाट पाहत असायचे लोक. आम्हीही शेजारच्यांकडे कधी एकदा दिवाळीच्या चकल्या, करंज्या बनतायत याची वाट पाहायचो. एकमेकांच्या घरी जाऊन कोणतीही गोष्ट थेट उचलून खाण्यासाठी परवानगी किंवा औपचारिकतेची गरज नव्हती. पण आता खूप अंतर आलंय. शेजाऱ्यांना ईदला बोलावलं तर ते काहीतरी बहाणे करून टाळतात. आज आमचा उपवास आहे.. ..तुमच्याकडे तर नॉन वेज असेल.. ..असं म्हणणारे शेजारी कधीकाळी आमच्या घरात हक्कानं येऊन बिर्याणी खायचे, यावर आता विश्वासही बसत नाही. खरं म्हणजे सर्वसामान्य हिंदु-मुस्लिमांमध्ये चांगले संबंध असतात, पण ग्राऊंडवरची काहीच माहिती नसणारे, अँकर्स दररोज ए.सी. स्टुडिओत बसून विष कालवतात, त्यामुळे हा माहौल अजून बिघडतोय. आता माझ्या मुलाचीही काळजी वाटते. हिंदू मित्रांशी खेळताना, मी त्याला सावध राहायला सांगतो. कोणीही काही बोललं तर उलट उत्तर देऊ नको..शांतपणे बोल, असं मला त्याला नाईलाजानं सांगावं लागतं. लोकांच्या मनात राग, द्वेष इतका भरलेला आहे की एखाद्या लहानशा गोष्टीवरून कधी काय होईल, सांगता येत नाही.’’ नूरच्या आवाजात आता चिंतेचा शिरकाव झालेला असतो. 

ही अस्वस्थता, भीती मी माझ्या इतरही मुस्लीम मित्र-मैत्रिणींमध्ये अनुभवली आहे. घराला जाणीवपूर्वक हिरवा रंग न देणं, इंटिरिअरमध्ये हिरव्या रंगाचा वापर किंवा इस्लामी संस्कृतीची प्रतीकं असलेल्या वस्तूंचा वापर करणं जाणीवपूर्वक टाळलं जातं. इतकंच नाही तर माझ्या एका मुस्लीम मित्राची हिंदू प्रेयसी, त्याला जेव्हा तिच्या घरी बोलवायची, तेव्हा तिच्या सोसायटीत प्रवेश करण्याआधी गळ्यातला स्कार्फ काढून बॅगमध्ये ठेवायला सांगायची. सार्वजनिक ठिकाणी स्कार्फ वापरु नकोस, गाडी चालवताना दुसऱ्याची चूक असली तरी त्यांनी केलेला अपमान सहन कर, अशा तिच्या सूचना असायच्या. इथं ती जे करत होती ते चूक की बरोबर यापेक्षा तिला तसं का वाटत असावं? याचा विचार केला पाहिजे. ज्या माणसावर आपलं निरातिशय प्रेम आहे, त्याला गमावण्याची कल्पना तिला सहन होत नसणार आणि हिंदु बहुसंख्यांक समाजात अल्पसंख्यांकाना चुकण्याची मुभाच नसते, हे जळजळीत वास्तव तिला माहीत आहे. सांस्कृतिक प्रतीकं लेऊन वावरणाऱ्या जुनैद नावाच्या मुलाची या देशात कशी झुंडीनं हत्या केली जाते, हे तिनं पाहिलं आहे. इतरांना असणारे मूलभूत अधिकार मग तो खासगी अवकाश जपण्याचा अधिकार असो की आणखी काही.. ..मुस्लिमांना ते नसतातच, अशीच आपली प्रबळ समाजधारणा आहे. म्हणूनच मग अखलाखच्या घरात जमाव घुसतो आणि त्याच्या फ्रीजमध्ये नेमकं कशाचं मांस आहे, हे बघतो. बरं ते मांस कशाचं आहे, याची खातरजमाही न करता त्याचा जीवच घेतो. आणि मांस कशाचंही असलं तरी आपल्याला मुळात कायदा हातात घेण्याचा किंवा कुणाच्याही घरात घुसून त्याच्या खासगी अवकाशावर अतिक्रमण करण्याचा अधिकारच नाही, हे रुजलेलं नाही. त्यातही मुस्लीम तर आपल्यासाठी दुय्यम नागरिक. सी.ए.ए, एन.आर.सी ची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होईल तेव्हा होईल (आणि तो दिवस दूर नाही) पण तोवर आपल्या असंख्य धारणांनी आपण आधीच मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवून टाकलेलं आहे. आणि दुय्यम नागरिकांनी तर त्यांना मिळेल त्या वागणुकीसाठी, तुटपुंज्या अधिकार-सोयी-सुविधांसाठी कायम कृतज्ञ रहायचं असतं. म्हणूनच दंगलीत सर्वस्व गमावलेल्यांनी, अठरा वर्षांनंतरही पिण्याचं पाणी, संडास, शाळा अशा मूलभूत सोयी सरकारनं दिल्या नाहीत, तरी ब्र काढायचा नसतो; उलट घाबरून रहायचं. याही भावनेचा मी जवळून प्रत्यय घेतला.

२०१७ मध्ये मी गुजरात दौरा केला. विशेषत: अहमदाबाद, नरोदा, नरोदा पाटिया अशा दंगलग्रस्त साईट्स आणि पुनर्वसन केलेल्या कॉलनीजमध्ये मी आठ दिवस फिरत होते. समशाद पठाण या वकील मित्रानं सलीम भाई नावाचे एक रिक्षाचालक गृहस्थ माझ्या दिमतीला दिले होते. सलीम भाई नरोदा केसमधले, तत्कालीन आमदार माया कोडनानी यांच्याविरोधात साक्ष देणारे एक महत्त्वाचे साक्षीदार होते. पुढे माया कोडनानी निर्दोष ठरल्या तो भाग अलाहिदा. तर सलीमभाई आणि मी सिटीझननगरला, एकतानगरला गेलो. त्यांच्याच रिक्षानं आम्ही दिवसभर फिरायचो. अहमदाबादला मिर्झापूर रस्त्यावर एक कॉनफ्लिक्टोरियम आहे – गुजरात दंगलीनंतर उभारलेलं आणि दंगलींदरम्यानच्या घडामोडींचं डॉक्युमेंटेशन केलेलं आणि काही आर्ट इन्स्टॉलेशन्स असलेलं ते म्युझियमसारखं एक स्थळ आहे. तर त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये मी राहत असे. सलीमभाई बरोबर सकाळी आठ वाजता मला घ्यायला येत. मग आम्ही सोबत नाश्ता करून लोकांना भेटायला जात असू. दुपारचं जेवण सोबतच. सगळं झाल्यावर रात्री ते नऊ, साडेनऊला पुन्हा मला मिर्झापूर रोडच्या गेस्ट हाऊसला सोडत. पुन्हा मला हे आवर्जून सांगायचंय की, सलीम भाईंसोबत एका परक्या राज्यात, मी एकटी आठ दिवस फिरत होते, तरी मला एकदाही असुरक्षित सोडा असहजही वाटलं नाही. याउलट ज्यांची आपल्याला इतकी भीती घातली जाते, तीच माणसं या भूमीत कितीतरी असुरक्षिततेत आणि तणावात जगतात, हे मी जवळून पाहिलं. पुनर्वसन केलेल्या ज्या कुटुंबांना आम्ही भेटी दिल्या, तिथल्या घरांमध्ये काही भांडी, काही कपडे आणि अगदी मूलभूत वस्तू वगळता काहीच नव्हतं. टीव्ही, फ्रीज या वस्तूही नाहीत. कारण विचारल्यावर त्या बायकांनी सांगितलं, ‘’आम्ही मुद्दामच घरात जास्त वस्तू ठेवत नाही, कारण कधीही काही होऊ शकतं. जरा कुठे तणावाची परिस्थिती निर्माण झाली की, आम्हाला सगळं सोडून काही दिवसांसाठी दूर कुठल्या तरी नातेवाईकांकडे जाऊन राहावं लागतं. शहर शांत झालं की आम्ही परत घरी येतो, जास्त वस्तू घरात ठेवल्या आणि आपल्या माघारी त्यांची नासधूस झाली तर काय? याचं टेंशनच असतं.. ..तसं झालं तर परत सगळा संसार जमवायला लागणार.. ..त्यापेक्षा हे बरं. घर आणि घरातल्या वस्तूंमध्ये भावनिक आर्थिक गुंतवणूकच नसणं बरं आहे.’’  

हे ऐकून मला धक्काच बसला. आपल्यासोबत काही तरी होणार आहे, दंग्याधोप्यात आपली घरं कधीही उध्वस्त केली जाऊ शकतात, या भीतीसह हजारो माणसं जगतात, हे किती भीषण आहे आणि ती जगतात म्हणजे नुसतीच जिवंत राहतात, साधा स्वच्छ मोकळा श्वासही अक्षरश: घेता येत नाही. संपूर्ण शहरात राहणाऱ्या लोकांनी केलेल्या कचऱ्याचे ढीग आसपास जळत असतात, त्यात ढिगाऱ्यांतच त्यांची मुलं खेळतात, प्रत्येक श्वास प्रदूषित. सकीना नावाची एक माझ्याच वयाची तरुणी भेटली होती. दंगलीत तिचे वडील मारले गेले होते, मग विधवा आईची लेक म्हणून लवकर लग्न झालं आणि पुनर्वसनात मिळालेल्या घरात तिचा संसार सुरु झाला. लग्नाला तीन वर्ष झाली, पदरात दीड वर्षाची लेक आणि नवरा टी.बी. होऊन वारला. कचऱ्याचा धूरच प्रत्येक श्वासातून आत जात असेल, तर आणखी काय होणार? कागदोपत्री नाही तरी मनांतून, धारणांतून आणि राजकीय धोरणांतून ज्यांना दुय्यम नागरिक समजलं आहे, त्यांच्या मूलभूत जगण्याची फिकीर कोण करतं? दुय्यम नागरिकांनी ‘ठेविले अनंते तैसिचे रहावे’ असाच आपला भवताल, भू-सांस्कृतिक, राजकीय परिवेश आहे. त्यात कष्टकरी- श्रमिक मुसलमानांच्या अडचणी आहेतच, घर म्हंटलं की त्याला जोडून येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, मुस्लीम वस्त्यांचं केलेलं गुन्हेगारीकरण, सांस्कृतिक प्रतीकांचं निर्धास्तपणे सार्वजनिक ठिकाणी आविष्करण करण्याचा अवकाशच नसणं, दिवसेंदिवस त्यांना मुख्य प्रवाहातून समाज, राजकारण, धोरणांतून वगळलं जाणं, हे अनुभव आहेतच. पण उच्चभ्रू, उच्चशिक्षित मुस्लिमांचीही त्यातून सुटका नाही, अडचणींच्या तीव्रतेत कदाचित थोडासा फरक पडत असेल, पण, कष्टकरी असो की उच्चभ्रू मुस्लीम.. ..त्यांच्या घरांतल्या स्त्रिया- आपल्या घरातल्या पुरुषांच्या सुरक्षेबाबत, जीविताबाबत सतत काळजीत, तणावात जगतात. 

२०१७ मध्ये मी एड. शाहीद आझमी यांच्या कुर्ल्यातल्या टॅक्सीमेन कॉलनीतल्या ऑफिसमध्ये गेले होते. शाहीद आझमी हे नामवंत वकील होते, विशेषत: बॉम्बस्फोटाच्या केसेसमधल्या, दहशतवादाचे आरोप असलेल्या मुस्लीम तरुणांच्या बचावासाठी ते काम करत. २०१० मध्ये त्यांच्या कुर्ल्याच्या ऑफिसमध्ये घुसून काही लोकांनी त्यांचा खून केला होता. मी २०१७ मध्ये शाहीदचा भाऊ खलीद आझमीला भेटण्यासाठी गेले होते. शाहीदच्याच ऑफिसमध्ये  मी आणि खलीद बोलत बसलो होतो. साडेआठला त्यांची अम्मी ऑफिसमध्ये नुसतंच डोकावून गेली. बोलण्यासाठी थांबलीही नाही. मला ही भानगड कळेचना, माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून खलीदनं सांगितलं की, ‘’भाईचा खून झाल्यापासून गेली सात वर्ष अम्मी रोज संध्याकाळी साडेआठच्या सुमाराला ऑफिसमध्ये डोकावून जाते, अगदी दररोज – न चुकता. मी जिवंत आहे, हे बघून तिच्या जीवात जीव येतो. फक्त तेवढंच बघायला ती येऊन जाते. एक मुलगा गमावलाय आता दुसरा गमावण्याचा आघात तिला सहनच होणार नाही. म्हणूनच अम्मी पलीकडच्याच बिल्डींगमध्ये रहायला आली. ऑफिसजवळ घर असलं की तिला आमच्यावर लक्ष ठेवता येतं.’’ खलीद पुढे म्हणाला, भाईच्या खुनानंतर मीही वकील झालो, पण मी आता गुन्हेगारी खटले लढवत नाही, फक्त सिविल मॅटर्स घेतो.. ..कारण मुस्लीम असून तुम्ही जर दहशतवादाचे आरोप असलेल्या लोकांचे खटले लढवले तर लोक तुमच्याकडे, तुमच्या अख्ख्या घराकडे दहशतवाद्यांचं घर म्हणूनच बघतात. काही नजरा खूप घाबरवणाऱ्या असतात. पण शेवटी आपल्याला इथंच याच लोकांमध्ये राहायचं आहे, त्यामुळे त्यांच्यानुसार स्वत:ला मोल्ड करावंच लागतं.’’ यावर मला काय बोलावं, कसं रिएक्ट व्हावं हे कळतच नव्हतं. खिन्न मनाने मी घरी परतले. 

या सगळ्याच प्रसंगांनी माझी खूप वैचारिक घुसळण झाली, अनेकदा मानसिक त्रासही झाला, अपराधभाव दाटून आला, पण पुढेपुढे हेही जाणवलं की नुसतं आपल्या मनात भावनांचा कल्लोळ दाटूनही प्रश्न सुटणार नाहीतच. या सगळ्या विखारी, इस्लामोफोबिक वातावारणात आपण काय करू शकतो? तर सगळ्यात आधी सगळे पूर्वग्रह बाजूला ठेऊन मुस्लीम मित्र-मैत्रिणींशी मोकळा संवाद करू शकतो. त्यांच्या घरी जाणं, एकत्र खाणं पिणं, सांस्कृतिक-वैचारिक देवाण घेवाण करत करत आपल्या मनातल्या चुकीच्या धारणा बाजूला करू शकतो. आणि मग मी हे सगळं करण्याची सुरुवात केली, अजूनही हा प्रवास सुरुच आहे, अंतिम स्थळ आलेलं नाही, पण लहानपणापासून आपल्याच शेजारी राहणाऱ्या हाडामांसाच्या माणसांचं जगणं, त्यांची घरं, संस्कृती यापासून बहुसंख्याक समूहानं आपल्याला अनभिज्ञ ठेवलं, किंबहुना त्याबद्दल द्वेष पोसला, ही चूक आपण (मी, माझ्या पिढीनं) करता कामा नये, यासाठीच हे एवढं सगळं पाल्हाळीक लिहिण्याचा खटाटोप.                                                                                                                             

चित्र सौजन्य: डॉ. श्रीधर पवार, अर्सलान ऐनोळकर

प्रियांका तुपे या मुक्त पत्रकार आहेत. सध्या इंडी जर्नल या बायलिंग्वल पोर्टलसोबत पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.

7 comments on “घराविषयीच्या नोंदी: प्रियांका तुपे

  1. Prashant

    खूप सुंदर लिहिलंय 👍👍🙏

    Reply
    • दिलीप थोरात

      खूप सुंदर लेख,..पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनामुळे असे घडत आहे याची खात्री पटली.ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव यात फरक असतोच तो छान अधोरेखित केलाय. या लेखामुळे दोन्ही समाजात भाईचारा वाढण्यास मदत होईल, ही अपेक्षा..

      Reply
  2. Ravindra Shinde

    हे स्वानुभव लिखाण अंगावर काटा उभा करते..
    काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा वाचून विचार करायला लावणारा लेख..

    Reply
  3. Jameer Kazi

    Priyanka, khup chan lihle ahes. Mi hi gali 21 yrs marati media madhye full-time kam karto, sudhakar kashyap maza changla mitr ahe, aapn ekda bhtyala hae, hi paristhiti thodifar kashi sudharu shaku aata sati praytn karuya. Maza no. 9594097600 ahe

    Reply
  4. Nilima

    खरंच… सगळ्यांना आपल्या नागरीक बनण्याच्या जडणघडणीत काही समुदायांबद्दल किती द्वेष, विषमतेची मुल्यं याच समाजात रुजवली जातात याचं प्रत्येकाला परिक्षण करायला लावणारा लेख..

    Reply
  5. Asita Ajgaonkar

    Thank you!हा फार महत्वचा लेख आहे. तो खूप लोकांपर्यंत पोचायला हवा!

    Reply
  6. Abhisule

    It is sad reality. And everyone has to realise that treating everyone equally is responsibility of people in power.

    Just the way we say boys need to be educated to increase respect for girls, in similar way it is responsibility of majority to handhold minority and maintain balance in society.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *