Skip to content Skip to footer

‘स्थित्यंतरात’ आणि इतर कविता : प्रथमेश डोळे

Discover An Author

  • फ्रेंच विषयाचे शिक्षक आणि कवी

    प्रथमेश डोळे हे बी. डी. सोमानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यरत असलेले फ्रेंच विषयाचे शिक्षक आहेत. त्यांनी राज्यशास्त्रात आपले पदवी-शिक्षण पूर्ण केले, आणि नंतर मुंबई विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतली. साहित्य, भाषा आणि कविता ह्यांवरील प्रेमामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा प्राप्त झाली. ते फ्रान्समधील कॅम्पेर येथील ब्रिझं महाविद्यालयात इंग्रजी भाषाविषयक सहाय्यक म्हणून कार्यरत होते, आणि २०२२मध्ये ते DALF C2 ही फ्रेंच भाषेतील निजभाषक-समतुल्य प्राविण्याची परीक्षाही उत्तीर्ण झाले. त्यांच्या लेखनाचा गाभा मुंबईच्या जीवनातील वेदनादायी कल्लोळ आणि श्वास गुदमरवणारा शहरी एकसुरीपणा ह्या सगळ्याच्या अनुवादामध्ये दडलेला आहे. त्यांच्या प्रेरणास्रोतांमध्ये नामदेव ढसाळ, दिलीप चित्रे, गॅब्रिएल गार्सिआ मार्क्वेझ, ज्ञानेश्वर, तुकाराम, तसेच नेग्रिट्यूड, दलित कविता ह्यांसारख्या विविध साहित्यिक चळवळींतील कवी, आणि प्रतिकाराची ज्योत जिवंत ठेवणारे असंख्य लोक ह्यांचा समावेश आहे.   Prathamesh Dole is an IBDP French teacher working at B. D. Somani International School. He completed his degree in Political Science and later finished his LLB from the University of Mumbai. However, his love for literature, language and poetry led him to carve a different path for him. He has worked as an English Language Assistant in Lycée Général Auguste Brizeux in Quemper, France and passed his native proficiency exam, DALF C2 in 2022. His oeuvre is primarily rooted in translations of the agonizing tumult of life in Mumbai and asphyxiating urban redundancy. His inspirations include poets like Namdeo Dhasal, Dilip Chitre, Gabriel Garcia Marquez, Dnyaneshwar, Tukaram, poets of various literary movements such as Négritude, Dalit Poetry and countless other humans who kept the voice of resistance alive. 


नग्ननर्तकी 

सगळा उपखंड होतोय एक म्युझिकल मेलडी
इतिहासाच्या समेवर कशी पटकन आलीस तू
तू आणि मी होतो
एकाच देशाचे रहिवासी
तू तरीही परकी वाटू लागलीयेस मला
नग्ननर्तकी

जेवढं अंतर आहे माझ्यात आणि बुद्धात
तेवढंच अंतर तुझ्यात आणि बुद्धात
कुठल्या गाण्यावर नाचतेयस तू ?
उत्क्रांतीच्या गाण्यावर ताल धरलायेस की काय ?

तुझ्यामाझ्यातलं हे अंतर
या अंतराला तुझ्या नाजूक कंबरेवर ठेवून
घसरताना पहावंसं वाटतंय मला

खूप बदललंय सगळं नर्तकी
नाचणाऱ्यांना इथल्या लोकांनी
नाचनारनी म्हटलं
तवायफ म्हटलं
नाचणाऱ्या बाईला आम्ही कोठ्यावर ठेवलं
तू काय नाचतेस
भरतनाट्यम ? कथ्थक ? मोहिनीअट्टम ?
मोहनजोदाडोसी नावाचा नृत्यप्रकार होता का ?

तुझे आणि बुद्धाचे डोळे सारखे वाटतात
त्याला नाचता आलं नाही कधी
एकही कपडा न घालता
संस्कृतीच्या छाताडावर तू गेली चार हजार वर्षं नाचते आहेस
तुझं गाव कुठलं नर्तकी ?
तू असशील कदाचित
मंदिरातली नर्तकी
अशा देवाच्या मंदिरात ज्याचं अस्तित्व आम्हांला मान्य नाही

किती वर्ष झाली नाचतेयस
तुझं प्राचीन अंग दुखत नाही का गं ?
तुझी नग्नता बोचतेय आमच्या दैवी अस्मितेला
तुझ्या नग्नतेचा हायड्रोजन बॉम्ब फुटेल
आमच्या प्रार्थनास्थळांवर

नर्तकी,
एखादा पंचक्रोशीतला आर्किओलॉजिस्ट आणावा
महापंडित तो करील तुझी प्राणप्रतिष्ठापना
तेव्हा जाग येईल तुला
तू म्हणशील
“What rubbish! मी नर्तकी नव्हतेच कधी,
मूर्खांनो, हडप्पा कुळातील लोकांच्या मंदिरातली
मीच होते कुलदेवता.”

तू हो ना जिवंत अशी
बोल ना आमच्याशी
किती वर्षं निघून गेली तुझ्यातून
किती गोष्टी असतील तुझ्याकडे 

१९४७ साली तुझ्या-माझ्यात ओढली एक रेघ
तू होतीस तेव्हा देशच नव्हते
आर्यावर्त, द्राविडनाडू नव्हता
राम, येशू, महंमद, बुद्ध कुणीही नव्हते

पण हे नग्ननर्तिके
तू होतीस
तेव्हा कविता होती
नृत्य होतं
Come my dear
Let’s dance…

*

स्थित्यंतरात

या ऋतूंच्या अघोरी स्थित्यंतरात
कसे भ्रमिष्ट होत जातात मुंबईचे केविलवाणे क्षण
लोकलच्या कोपऱ्यात
मी उसवतो भाषेची परिस्थितीजन्य गृहीतकं
पावसाचे उरलेसुरले थेंब झटकत उघड्या अंगाने उभा सीएसटी स्टेशनवर
करत जातो जुळवाजुळव
ऋतूंच्या आणि भाषेच्या व्याकरणाची
या शहराचे एकसूत्री कोलाहल
गर्दीत गुदमरून गेलेली स्वगतं
करू पाहतो गोळा
भरतो खिशात आणि चालू लागतो वेगाने
आजूबाजूच्या असंबद्ध समागमाशी
छातीच्या बेताल गाण्याशी
पायांच्या स्वयंभू चालीशी
या सगळ्यांशी जुळवून घेत येऊ पाहतोय समेवर
शहराच्या गर्भात क्षणोक्षण बहरत जायचा करतो प्रयत्न
आणि प्रयत्नपूर्वक पाठमोरं होत जातं शहर
अलिप्त इतिहासावर आलेल्या शेवाळ्यासारखं
निसटून जातं आठवणीतून
भुयारी रेल्वेत वाट चुकलेलं चिमणीचं पिल्लू
रोजचाच म्हातारा पायरीवर संसार मांडून बसलेला
व्हिक्टोरियन घड्याळ डोळे विस्फारलेलं
शेवटच्या पावसाच्या शेवटच्या डबक्यात
निसटून गेलेल्या शहराच्या प्रतिबिंबावर
खाळकन पडतो बूट
डबक्याडबक्यात उभारलेल्या मुंबईच्या पावसाळी प्रतिसृष्टी
होत जातात इतिहासजमा
आठवणीतून पाझरलेल्या कवितेसारख्या
आणि आपण ढकलत जातो स्वतःला
शहराच्या अघोरी स्थित्यंतरातून.

*

Post-1991

गॅलरीतून डोकावणारी
ही भयाण रात्र असते
माझ्यापुरती.
त्या रात्रीच्या तळहातावर मी ठेवतो
माझा पोस्ट-1991 एरा
आणि त्या एराचा अत्याधुनिक कोलाहल.
ही रात्र माझी
माझ्यापुरती

आत्ता किती वाजले असतील स्लोव्हेनियात
झोपली असेल का सारा ?
पोस्ट-1991 आहे ती सुद्धा
साराची आई उकरत बसली असेल
इतिहासाच्या खपल्या
खपलीखाली लपलेला टिटो तिला स्पष्ट दिसतो.

मी झोपतो तेव्हा जागे होतात
माझे मेक्सिकोमधले मित्र.
आलेहंद्रा सुद्धा जाते कामावर
दिएगो एकटाच राहतो त्याच्या खोलीत
त्या दोघांना माझ्यापर्यंत पोहोचायला
या रात्रीचा अडथळा वाटत नाही
पोस्ट-1991वाले आहोत आम्ही.

पोस्ट-1991वाले माझे मित्र
लिथुएनीआची दारिया
कझाक अझिया
तुर्कमन बखत्यार
किरगिझ गुलदस्तान
हे सगळे आजही
क्रुश्चेव्हच्या वाढलेल्या पोटाला स्मरून
व्हॉटस्अप ग्रुपमध्ये
रशियन बोलतात

इजिप्तमध्ये झाली असेल संध्याकाळ
रानुआने तिचा हिजाब काढून ठेवला असेल
ती भेटली तेव्हा तिच्या डोळ्यांत
सुएझ कालवा दिसत होता.
आम्हां दोघांमधल्या शांतता
बोट बनून तिच्या डोळ्यांतून
सतत वाहत होत्या
“हा हिजाबबिजाब नको घालू, दे फेकून,”
असं मी म्हटलं तरी ती रागावली नाही.
अजून
असे अवयव वेगळे करता येत नाहीत
पोस्ट-1991 एरामध्ये.
गमाल अब्दुल नासेर
रानुआच्या आधुनिक हिजाबात गुदमरून मेला.

ही रात्र माझ्यासाठी
इतरांसाठी हे वेगवेगळे प्रहर
आपली रात्र कधीच नसते आपली
मला नको असतानाही आठवतंय पॅरिस
आठवतंय कॅम्पेर
पोस्ट-1991चा व्हर्चुअल कोलाहल
आमचे
नॉन-सोव्हिएटिक डिप्रेशन्स
सुजलेले इन्फ्लेशन्स
या शतकाच्या संडासात
जगभर पसरलेला पॅन्डेमिकचा
गू
एका रात्रीत फ्लश करू पाहतेय माझी कविता

रानुआ
सारा
साराची आई
दिएगो
आलेहंद्रा
तुमच्यासाठी जेव्हा ही रात्र
रात्र असेल
तेव्हा मी असेन
एकविसाव्या शतकाच्या त्वचेवर आलेला
बाविसाव्या वर्षातला
सत्तावीस वर्षांचा
घाणेरडा डाग.

*

आधारशिले, कविते

शरीरात कोलेस्टेरॉलसारखं वाढत जातंय अस्तित्ववादी नोकरीधंद्याचं प्रश्नचिन्ह
शहरभर पसरलेल्या फ्लायओव्हर्सच्या मांड्यांची कामोत्सुक भोगलोलुपता
एकमेकांत अडकलेली लोकलची गर्दी
या शरीरातून त्या शरीरात फिरणाऱ्या वेदना
असाहाय्य गर्दीच्या मर्मस्थळात लागलेली ही अघोरी संचारबंदी
तलावपाळीच्या हिरव्या पाण्यावर पहुडलेल्या जर्द पानांचं एकाकीपण आणि
सेकंदाच्या चटईवर इतरत्र सांडलेला हा मायक्रोस्कोपिक सुशेगाद
हे असंच फिरत राहतंय गोलाकार दिवसाचं विलंबित अस्तित्व
कसे अणि कधी आलो आपण इथवर ?

आठवतंय का ?

कर्बलाच्या मैदानात ऐन युद्धाच्या प्रसंगात हुसैनला दिलं होतं आपण आपल्याच ओंजळीतून चंद्रभागेचं मधाळ पाणी
“रामकृष्णहरी” म्हणत कसा समेवर नाचला खुस्रो वारीत
मेरीच्या ओठांवर मराठीतून आलेली अंगाई
बेथलेहेम शहरात पत्ता विसरलेले आपण
कुरुक्षेत्र ते वॉटर्लू
मेसोपोटेमिया ते मोहेनजोदडो
हिपशिया ते कन्नगी
इतिहासाला आई मानून जगलो आपण
हे उत्तरेच्या भांडवली चकचकीत इतिहासा
हे दक्षिणेच्या हिरव्याकच्च पठारावरच्या कुत्र्याच्या विष्ठेएवढ्या इतिहासा
हे पश्चिम समुद्राच्या अमेझॉनी जादुई इतिहासा
हे पूर्वेच्या मावळतीला आलेल्या सिद्धार्थी इतिहासा
हे बर्फथंड उच्चवासांच्या इतिहासा
हे सैन्याची क्षितिजमिठी घेऊन येणाऱ्या खैबरखिंडी इतिहासा
कशी साद घातली आपण सगळ्याच देशांना, दिशांना
फिरलो इतिहासाच्या नंदनवनात आपली हिरवी बुबुळे घेऊन

आता आठवतो का त्यांतला एखादा तरी तुकडा ?
आठवतं, कसा चिरडला होता गांधी
पोकळ युटोपियाच्या शिळेखाली
टाकला गांधी पेपरश्रेडरमध्ये
ढकलला माळ्यावर, तुडवला रस्त्यात
तरी सापडलाच थेरडा
बाबरीचा मलबा उचलताना एका विटेखाली

किंवा गाझापट्टीत मलमपट्टी करताना
सापडला त्याच्या समग्रतेचा भयावह चेहरा
मरता मरत नाही तो
लोकलमध्ये स्वतः उभं राहून तो इतरांना सीट देतो

हे सगळं आठवतंय
इतिहासजमा झालेलं कोवळं वर्तमान
ही कालातीत होत जाणारी शब्दकळा कायमची संपलीये
आता आयुष्याच्या प्रत्येक पूर्णबिंदूवर शोकांतिकेचं भयावह मॉन्युमेंट उभं आहे

हा सगळा गतकाळ करता येतो रिवाइंड माझ्या कवितेत
कविता असते काजळकोरा निनादी अंधार ज्यावर उताणे पडतात प्रकाशाचे दवबिंदू वामकुक्षी घेणाऱ्या आजोबांसारखे
कवितेत लाटांचे डोंगर होतात
इतिहासाची आणि वर्तमानाची भेसळ करता येते कवितेत
कवितेत घालता येतो गोंधळ, सावळा गोंधळ
कवितेत मरत नाहीत कुठल्याच चळवळी, कुठलेच उठाव
कविता होते सिसिफसचा पाणवठा
नीरोला चपराक मारून ताळ्यावर आणते कविता
कविता शब्दकोशाची तावदानं फोडून वाहू देते भाषेला
कविता होते भाषेचा डिव्होर्स-लॉयर
करते भाषेचा आणि व्याकरणाचा घटस्फोट

कविता असते त्या असंख्य शब्दांमध्ये जे कधीच कवितेत आले नाहीत

कविते, तू नको ना मरूस माणसांसारखी
नको होऊस इतिहासजमा
कविते,
जिभेला मेंदूशी जोडणाऱ्या शेवटच्या तारेला तू बळ दे
ती तुटलीच तर तुझ्या दोन्ही हातांनी गच्च धरून ठेव

कविते, तू विलास घोगरेला जिवंत कर
तू रोहित वेमुल्लाचा फास ढिला करून टाक
तू पुन्हा जन्माला घाल ढसाळ
तू उभार पुन्हा बाबरी
कविते, आधारशिले, तू सगळं ठीक कर

*

साकडं

गल्ली-मोहल्ल्यांच्या, जाती-जमातींच्या, खंड-उपखंडांच्या, देश-राज्य-जमाव-आडनाव, बाप-पणजोबा, रक्ताच्या-बिनरक्ताच्या, शेजारपाजारच्या युगांच्या आणि नॅनो-सेकंदांच्या,
थिसिस-अँटी-थिसिसच्या, क्लास-स्ट्रगलच्या, आणि राजेशाह्यांच्या-लोकशाह्यांच्या, परक्यांच्या-आपल्यांच्या, शोभिवंतांच्या-जातिवंतांच्या-दलितांच्या, देवांच्या-भुतांच्या, मॅटरच्या आणि अँटी-मॅटरच्या
सगळ्यांच्याच महाभयानक अवाढव्य इतिहासा,

दमलास का रे ?
तुला धाप नाही का रे लागत ?
का कोणी साधं विचारतही नाही तुला ?
पाणी किंवा कॉफी
एखादा बूड टेकायला बेंच

डार्विनच्या यजमाना,
तुला ग्रंथालयांच्या धुळीची आण आहे बघ
थोडं सावलीशी बस
अनंतकालच्या ययात्या,
तुला म्हातारपणाचा शाप कुणीच कसा दिला नाही ?
रस्ता चुकलेले, असंख्य खुश्कीचे मार्ग शॉर्टकट शोधणारे

ही युद्धं
तुझं आकारमान मोजण्याचं एकक
तुझे राजे, खलिफा, पैगंबर, तुझे आमीर उल मोमीनईन, आणि ह.भ.प.,
चक्रवर्ती आणि दळभद्री
सूतकाते
तुझी बोकाळलेली मश्रुमी साम्राज्यं
तुझे सत्रप, सरंजामी दिवटे, आणि बडवे तुझे
आणि लोकलच्या चौथ्या सीटवर
बसलेले.
यार सगळ्या महाभागांचे अद्वितीय वंशज.

इतिहासा,
जिथे हवेचा श्वास कोंडला जातो
अशा दादर स्टेशनवर सुद्धा तू गुदमरत नाहीस.
कुठली लोकल किती साली किती वाजता किती सेकंदाने किती माणसांच्या कालवणात कशी लेट झाली
याची पक्की नोंद सापडते तुझ्या वहीत
सबंध मानवतेच्या चिटणीसा,
तू विस्तारत नाहीस
लुव्र म्युझियममधून फिरणाऱ्या बुबुळांसोबत.
तुला वाटत नाही का घ्यावंसं
एखाद्या अजस्र रोमन पुतळ्याचं
गहिरं चुंबन.
तुझ्या बोटांना जाणवलीच नाही
ओल्याकच्च काळ्याकुट्ट प्राचीन नग्नमूर्तीची अंगभूषा

आम्ही घातलंय तुझ श्राद्ध
जिवंतपणी
आता इतिहासाच्या पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून आम्ही बोंबा मारतोय
तू काढ बाहेर तुझ्या क्रांत्या, महायुद्ध, उत्क्रांतीच्या महारुद्री पारंब्या, सगळी शस्त्रं तुझीच आहेत.
तुलाच आहे अर्पण सगळी प्रगती-अधोगती.
तू जाहीर कर तुझ्या मिलचा ताळेबंद.
आणि जा संपावर
एवढ्यात भैरवी गाऊ नकोस.

चॅट-जीपीटीचे खिळे ठोकून तुलाच चढवू सुळावर
नवख्रिस्ता. स्क्रीनवर होतंय तुझं रिजरेक्षन.
किंवा हीपशिया मारली तशी तुझी औलाद नागडी करून टांगावी पाठ्यपुस्तकात
अलेक्झान्ड्रियाच्या लायब्ररीत जाळून टाकलेली तुझी राख फुंकून खाल्ली आहे.
आम्ही निराकार निष्कलंक निरावयव ढोबळमान
तुझ्या इक्वेशनमध्ये न बसणारे
तुझ्या संघटित कटाच्या मासग्रेव्हांची प्रेतपेरणी
कुठल्या आलेखात शोधू तुझी आकडेमोड?

इतिहासा
आत्ता कुठे लागलाय सूर स्थलकालाचा
डॉक्टर आंबेडकर
तुला सुचलेली एक कविता
१५ ऑगस्ट
तू गायलेलं एक निर्मळ गाणं
मार्क्वेझ
तुझं स्वप्न जादुई.
तुझ्यावर चाललाच खटला मानहानीचा तर हे सगळेच येतील बघ साक्ष द्यायला तुझ्या बाजूने.

“History of all hitherto existing societies is the history of class struggles.”
मार्क्सच्या या सूत्रापाशी येऊन थबकला असशीलच
तुझं गुपित उघडं पाडलं त्याने
नागडं केलं तुला त्याने या एका वाक्यात
तेव्हा सूड घेण्याचा मनसुबा आखून टाकलाच असशील ना एक लालबुंद उच्छ्वास.

इतिहासा,
वाटतं तुला करावं ग्राईंड कॉफीसारखं
तुझ्या टेक्टॉनिक प्लेट्सची आवर्तनीय हालचाल
तुझ्या सगळ्याच भाषांचे सगळेच पूर्वज चक्रधरीय
तुझे श्रोडिंगरी तर्क-वितर्क, फिल्ड इक्वेशन, अरबो-खरबो हायझनबर्ग तुझे अनिश्चित.
किंवा स्वामी, महाराज आणि बुवा-बाबा
क्वांटम मेकॅनिक्सचा केसांनी गळा कापणारे
राम आणि बीम
तुकाराम आणि बिकाराम
दगडफेक आणि अणुबॉम्ब
सगळ्यांचं ग्राईंड करून ब्रू करून पिऊन टाकावं एकदाच तुला.

इतिहासा,
मला नको आहेत
तुझ्या दळभद्री ग्लॅडिएटर्सचे रक्तरंजित तमाशे कुरवाळणारे अभेद्य कोलोसियम्स
नको आहेत
तुझ्या शार्दूलविक्रीडिताची काटकोनी गृहीतकं
गळफास बनून येणारी सुभाषितांची लांबच लांब रांग.
रागावू नकोस
तुझं शिळंपाकं झालेलं अस्तित्व आता बाहेर काढ फ्रिजमधून.
मला नको आहेत
तुझे भीष्म आणि ऑथेल्लो
राधेय जगला तुझ्या वटवृक्षाचं बांडगूळ बनून
मला नको आहेत
तुझ्या कपड्याला लागलेले त्याच्या कवचकुंडलांचे डाग

इतिहासा,
मला चाखून बघायचंय, तुझ्या प्राचीन देवालयातल्या रतिशिल्पावर पांघरूण बनून आलेलं हिरवंकच्चं शेवाळ.
तुझी स्वप्नं टाक ना माझ्या भुकेकंगाल ओंजळीत
पॅनारोमिक व्ह्यूने तुझा काढावा फोटो.
तुझ्या कोठडीवजा गोदामात सडत पडलेलं आमचं पिढ्यान्पिढ्या गंजलेलं आत्मभान फर्मेंट होणारं
आम्हांला आता पाहू दे कोलटकरी विशुद्ध अश्रू भरलेल्या डोळ्यांनी

इतिहासा,
तू जमाती, वंश, सबंध देश कुस्करून दाखवलेस
ठेचून दाखवलेस
आमच्या आवाज चढवून ओठांतून उचंबळून आलेले ब्र
तू मोजून दाखवलेस प्राक्तनाच्या पाठीतले सगळेच खंजीर.
तू महानाट्याच्या शेवटच्या भरतवाक्यातही नांदी गाऊन दाखवलीस
तू मारून दाखवलंस
चिरून दाखवलंस
उलगडून दाखवलंस सत्य आणि झाकूनही दाखवलंस
फसवूनही दाखवलंस
पण आता
फक्त एकदा
पॉज बटन दाबून
सावलीशी बसून
डोळे बंद करून
प्रेमाने
हसून दाखव

*

चित्र-सौजन्य : भाग्यश्री डांगे

Post Tags

Leave a comment