नूपुर देसाई

अडथळ्यांचं अवकाश


back

परवाच एका कार्यशाळेसाठी मी ‘इंटेलेक्च्युअल बर्डहाउस’* नावाचं पुस्तक वाचत होते. ते पुस्तक मुख्यतः ‘कलात्मक संशोधन’ (आर्टीस्टिक रिसर्च) या विषयाभोवती गुंफलेलं आहे. पुस्तकात दिल्याप्रमाणे, दृश्यकलाकार चित्रं काढताना, शिल्पं तयार करताना संशोधनही  करत असतात. संशोधन करणं शोध घेणं ही काही नवी बाब नाही.  रंगद्रव्य, कागदाचे प्रकार, रंगांची मिश्रणे, रासायनिक प्रक्रिया याचा सखोल अभ्यास चित्रकार करत आले आहेत. तसंच, वैज्ञानिक पद्धती, अभियांत्रिकी रेखाटने यापासून कला इतिहासातील तंत्र, प्रतिमा, कारागिरीपर्यंत वेगवेगळया विषयांचा यात समावेश होतो. साधनांचा अभ्यास करताना ते इतिहासाचा धांडोळा घेतात, तत्त्वज्ञानाचा विचार करतात, राजकारण आणि अर्थकारणाचा मागोवा घेतात. मी वाचत असलेल्या पुस्तकाचे संपादक अशा अभ्यास पद्धतीचा अवलंब करून होणाऱ्या कलानिर्मितीला ‘बॉर्डर क्रॉसर’ अशी संज्ञा वापरतात. हे बॉर्डर क्रॉसर्स किंवा सीमा लांघणारे नवी मांडणी करू पाहातात. उदाहरणार्थ, अरबस्तानात विकसित झालेल्या गणिती पद्धती या युरोपातील पुनरुज्जीवन काळातील चित्रकलेचा पाया ठरल्या किंवा भारतातील नीलिमा शेख यांच्यासारख्या चित्रकार नैसर्गिक रंगद्रव्यांवर, ‘पिछवाई’ सारख्या चित्रं काढण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करतात. अलीकडच्या काळात संशोधन करणे हाच कलाव्यवहार असाही विचार प्रवाह दिसतो आहे.  एकातून एक गोष्टी उलगडत जायच्या आणि त्यातून नवी कथनं समोर येतील का हे पाहायचं असा यामागचा संशोधकांचा  दृष्टीकोन.

कलात्मक संशोधन या प्रकाराला काही विशिष्ट ऐतिहासिक क्रम किंवा कथन आहे असं नाही, ती बऱ्यापैकी व्यापक संकल्पना आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने वापरली जाऊ शकते. पण त्यातला माझ्यासाठी लक्षणीय भाग असा की ही संशोधनाची पद्धत एकवचनी नसून बहुवचनी आहे, त्यात निरनिराळे प्रकार आणि पद्धती सामावल्या आहेत. ती अकादामिक संशोधन पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. कलात्मक संशोधन या भिंती ओलांडून अटकळीच्या, परिकल्पनेच्या खुल्या अवकाशात घेऊन जाऊ शकते, अशी ‘बर्डहाउस’च्या संपादकांची भूमिका. ते म्हणतात तसं, ‘we created both an open architectural structure – birds fly in and out – as well as a site for polyphony of voices.’ त्यात अनेक शक्यता आहेत, नव्या वाटा आहेत, आणि अनेक आवाजांचं मिश्रण आहे. याउलट, अकादमिक संशोधन हे बहुतेकवेळा गुणात्मक पद्धतीवर आधारलेले असते. त्यात एक प्रकारची वस्तुनिष्ठता असते, मापनाच्या पद्धती असतात. तसे जरी नसले तरी या पद्धती विकसित होताना पुराव्यांवर आणि प्रत्यक्ष ज्ञानावर आधारल्या  जातात. आणि त्यातूनच हळूहळू संशोधनाच्या साचेबद्ध चौकटी उभ्या राहतात. या चौकटी इतर पद्धतींना, विचारांना खुलेपणाने स्वीकारायला मज्जाव करत राहिल्या. विद्यापीठांमध्ये आंतरविद्याशाखीय काम चालू असले तरी त्यातून संशोधनाच्या पद्धतीच्या भिंती बऱ्यापैकी तशाच उभ्या आहेत, संशोधनाच्या वाटचालीत अवरोध उभा करतात. संशोधनाच्या पातळीवर या भिंती अर्थातच विशिष्ट सामाजिक ऐतिहासिक संदर्भात उभ्या राहिल्या हे खरं आहे आणि त्यामुळेच त्या नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत. आपण कृत्रिमपणे उभे केलेले अडसर आहेत. आणि नव्या शक्यता, नवी परिमाणं, नवी मांडणी यांचा मोकळेपणाने विचार करायला ते अटकाव करत असतात.

हे असे कृत्रिम अडसर आपल्या सभोवती सुद्धा सतत दिसतात, जाणवतात, अंतर्मुख करतात. संशोधनाच्या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जगण्यात अडथळे आपल्यासमोर उभे ठाकतात. त्याबद्दल  विचार  करताना  असंही  लक्षात  येतं की मानवी संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये आपणच ते निर्माण केले आहेत. बऱ्याचदा असे ठाशीव रूपात दिसतात तर काही वेळा ते अगदी सूक्ष्म पातळीवरदेखील अस्तित्वात असतात. आपल्या सामाजिक सांस्कृतिक रचना, उतरंडी, आपला इतिहास, सामूहिक आठवणी, आपले मनोव्यापार अशा कितीतरी गोष्टी या अडथळ्यांना कारणीभूत ठरतात. कधी कुटुंबव्यवस्था हा अडथळा उभा करत असते, तर कधी धर्म किंवा जातव्यवस्था, कधी लिंगभावाच्या रचना अशा भिंती तयार करत असतात तर कधी भाषिक व्यवस्था आणि चिन्हे असे अडसर आणत असतात. बऱ्याचदा यातल्या एकापेक्षा जास्त गोष्टी एकत्र काम करत असतात, परिणाम करत असतात. म्हणजे अगदी व्यक्तिगत पातळीवर विचार करायचा झाला तर स्वतःभोवती आपण बांध घालत असतो – रोजच्या जगण्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, अनिश्चिततेची भीती टाळण्यासाठी, त्रासदायक परिस्थितीपासून बचावण्यासाठी. आपण ‘स्व’भोवती अशी अनेक पुटं चढवत असतो. विद्या कुलकर्णी या अंकातल्या त्यांच्या फोटो-कथनातून याच मनोव्यापाराचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक विषयांवरील संवेदनशील छायाचित्रकार म्हणून काम केल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात बंदिस्त खोल्यात राहताना त्या फोटोचा विषय म्हणून ‘स्वतः’कडे वळल्या. हा प्रवास अर्थातच सहज सोपा नव्हता. खासकरून स्त्री म्हणून स्वतः असं गुंतणं हेदेखील त्यांना अवघड वाटत होतं. सेल्फ पोर्ट्रेट काढताना तांत्रिक गोष्टी तर होत्याच पण स्वतःच्या खाजगी विश्वात घुसणं आणि ते इतरांसमोर उघडपणे मांडणं यात मानसिक अडसर अधिक होते. आपल्या मनोव्यापारातील गुंतागुंत फोटोच्या माध्यमातून पुढे आणताना मानसिक अडसर त्यांना या मालिकेच्या प्रक्रियेत पार करावे लागले.

आपल्या मनोव्यापाराचे खेळ कधीकधी बरेच पुढे जातात आणि आपल्या वास्तवाचा ताबा घेतात. बऱ्याचदा हे खोल मनातले विचार व्यक्त न होता फिरत फिरत, एकमेकांत गुंतत मनाला कुंपण घालत राहतात. वंदना भागवत यांच्या एका कवितेत ओळी आहेत:

माझ्या डोक्यात विचार सुरु असतो

ही तर काही ऐकणार नाही

पुन्हा पुन्हा त्या मानसोपचार-तज्ज्ञाला तेच ऐकवत राहाणार-

आवाज खरे असतीलही पण ते तिच्या कानातले आहेत

तेव्हा इतरांना ते ऐकू जाणार नाहीत हे तिनंपण ऐकलं पाहिजे.

तिनं कशाला विश्वाचं आर्त तिच्या मनी घ्यायचं?

या प्रकारचे अडथळे अर्थातच आपल्याला नकोसे वाटतात किंवा त्यावर उपाय शोधायची गरज भासते, ते ओलांडायची तीव्र इच्छा असते. पण दरवेळी ते नकारात्मकच असतील असंही नाही. एखादी आतली खोलवरची वैयक्तिक गोष्ट जेव्हा व्यक्त रूपात समोर येते तेव्हा अडथळा मर्यादा घालणारा, नियंत्रण ठेवणारा उरत नाही. हर्षिता बथवाल त्यांच्या नसरीन मोहमदी यांच्याबद्दलच्या लेखात हेच मांडतात. नसरीन मोहमदी मध्ययुगीन आणि आधुनिक वास्तुकला, सुफी रचना, अरब वाळवंट, बौद्ध तत्त्व यांचे संदर्भ घेतात, पण त्यातून स्वतःच्या कल्पना विश्वाला सामोरे जात रेषांच्या आकृती साकारतात. आणि याच रचना पार्किनसन्स सारखा दुर्धर आजार झालेला असताना त्या चिकाटीने करत राहतात. हात सतत थरथरत असताना त्या सरळ, सलग रेषा कागदावर उमटवत राहतात. सतत बदलत जाणारा काळ प्रकाशाच्या खेळातून आणि रेषांतून टिपताना, नसरीन यांच्या चित्रांत अवकाश, काळ, प्रत्यक्ष स्थळ, अशा सीमा राहत नाहीत. त्यांनी अनुभवलेलं भवतालचं जग आणि त्यांचं आत्मत्व हे या रेषांतून एकत्रपणे प्रकट होतं. तेव्हा स्व आणि इतर हा भेद त्यात उरत नाही. त्याला त्या त्याला त्या ‘उंबरठा’ पार करण्याची उपमा वापरतात. त्याचबरोबर, अवकाश आणि काळ यांच्या गुंतागुंतीतून नसरीन सारखे कलाकार रूप आणि आशयाचे अडथळे कसे पार करतात तेही यातून आपल्याला दिसतं. पुढे जाऊन असंही म्हणता येतं की शारीर मर्यादांचे अडसर लांघत नसरीन सारख्या कलाकार त्यांनाच आपल्या कलानिर्मितीची ताकद बनवतात. त्यात हर्षिता बथवाल ‘वाट पाहण्या’च्या कृतीवर भर देतात. चिकाटीने, एकाग्रतेने ही रेषा ओढण्याची कृती काळाच्या संदर्भात पाहताना त्या म्हणतात की नसरीन यांची कलानिर्मिती म्हणजे ‘काळाच्या पटावर उलगडत जाणारा सतत संघर्ष आहे.’ या वाट पाहण्याच्या कृतीत वेळ वाया घालवणं नाहीये तर काळाचा अनुभव घेणं आहे, आपल्या अस्तित्वाबद्दल जागरूक असणं आहे, भवतालाकडे आणि स्वतःकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणं आहे. नसरीन मोहमदीच्या डायरीच्या पानातील दोन ओळी बथवाल उद्धृत करतात: “Waiting is a part of intense living” आणि “Complete concentration and awareness on waiting and patience- resulting in thoughts and action.”

हे वाट पाहणं व्यक्तिगत असू शकतं तसंच सामाजिक आणि राजकीयही. अशावेळी शांतपणे वाट पाहण्याची कृती दुमत किंवा विरोध दाखवायची कृती ठरते. ते करताना त्या कृतीबद्दल पूर्णपणे जागरूक असणं आणि वाट पाहण्याच्या या कृतीलाच एक भलामोठा अडथळा म्हणून उभा करणं हे एका पूर्णपणे वेगळ्या संदर्भात आणि अवकाशात घडताना दिसतं. देशाच्या राजधानीच्या सीमांवर गेले वर्षभर ठाण मांडून बसलेले शेतकरी – ज्याकडे राजकीय कृती किंवा हे परफॉर्मेटीव कृती म्हणून पाहता येईल – अशा आंदोलनातून सरकारनी आणलेल्या कृषीकायद्यांना विरोध करत आहेत. साहिल कल्लोळी त्यांच्या दृश्यमालिकेतून या अडथळ्याकडे राजकीय प्रतिरोधाचे साधन म्हणून बघतात. शेतकऱ्यांनी उभा केलेला हा अडथळा सरकारी धोरणाविरुद्ध आहे पण अतिशय सर्जनशील पद्धतीने त्यांनी तो पुढे नेला आहे. जेवणाच्या  लंगरपासून लायब्ररी व छोट्या शाळेपर्यंत आणि कपडे धुण्याच्या मशीन पासून तात्पुरत्या बांधलेल्या घरांपर्यंत अनेक गोष्टी यात केल्या जात आहेत. पोलिसांनी आणि सरकारने जरी तारेची कुंपणे घालून, सिमेंटचे मोठाले ठोकळे टाकून, बंदुकधारी पोलीस तैनात करून या आंदोलनाला थोपवण्याच्या प्रयत्न केला आहेच. पण त्यांना अडकाठी न मानता तिथे शांतपणे बसून राहण्याच्या कृतीतूनच अडथळ्याचा अर्थ या आंदोलनाने बदलून टाकला आहे.

वाट पाहण्याची शेतकऱ्यांची ही कृती मात्र रिकामी नक्कीच नाही. त्यात दैनंदिन जगण्यातले व्यवहार आहेत, आणि सामूहिक कृतीतून उभ्या राहणाऱ्या रचनादेखील. हा अडथळा त्यामुळेच आंदोलनाचा गाभा आहे. साहिल कल्लोळी या लेखात म्हणतात की:  “हा अडथळा जैविक आहे.  त्याची नाळ जमिनीशी आहे.” असे मोठे आणि छोटे अडथळे आपल्या सामाजिक सांस्कृतिक रचनांना धक्के द्यायला, त्यात आवश्यक ते बदल करायला गरजेचे ही आहेत. त्यासाठी कप्पेबंद रचना न ठेवता खुल्या, मोकळीकीच्या आणि संवादाच्या रचना असे या पुढचे मार्ग असू शकतात. सुरुवातीला उल्लेखलेल्या पुस्तकातल्या ‘बर्डहाउस’ या उपमेसारखं या रचनांमध्ये आपल्याला सहज आत-बाहेर विहार करू शकता येईल आणि अडथळ्यांना धक्के देत किंवा अडथळ्यांनाच आपली ताकद बनवत हा खुला संचार घडवता येईल. अशा अडथळ्यांचे अवकाश ‘हाकारा’च्या या १४व्या आवृत्तीत व्यामिश्र रूपात आपल्यासमोर घेऊन येत आहोत. 

*इंटेलेक्च्युअल बर्डहाउस: आर्टीस्टिक रिसर्च अॅज प्रॅक्टिस, संपादक: उटे मेटा बोअर, फ्लोरियन डॉम्ब्वा, क्लाऊदिया मारीस, मायकेल श्वाब, कोनिग बुक्स, २०१२

छायाचित्र सौजन्य: आकाशलीना बासू


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *