‘हाकारा’च्या १२व्या आवृत्तीच्या निमित्ताने घराचे, माणसांचे, जगण्याचे, आणि राहण्याचे अनेक पैलू, व्यवहार आणि इतिहास यांचा विचार करता येईल, असा मानस होता. या अंकाची तयारी करत असतानाच मला दिल्लीतलं राहतं घर सोडावं लागलं आणि नवीन घराची शोधाशोध सुरु झाली. गेल्या दीड वर्षातलं हे चौथं घर. दरवेळी घर बदलताना नवीन घर कसं उभं करायचं, कसं सजवायचं, त्यात कोण येईल अशा सगळ्या कल्पना मी करत असते. आणि दर काही काळानी या कल्पनाही बदलत राहतात, घरंही, आणि माणसंही. त्याच काळात सरोवर जैदी यांचा ‘होमिंग अनहोमिंग’ हा लेख वाचनात आला. हा लेख घरपण आणि बेघरपणाचे अनुभव नोंदवत घराची बांधणी, रचना, घराचा इतिहास, त्या मागचं सार यामागचा विचार मांडतो. आणि हे करताना लेखिका घरातले कोनाडे, भिंती, फरशा, खिडक्या, कपाट यासारख्या वस्तू आणि त्या वस्तूतली आपली भावनिक गुंतवणूक, घरातल्या खोल्या, खिडक्या, बाल्कनी, व्हरांडा इथला आपला वावर यातून घर कसं उभं करत असते किंवा नसते, आपल्याकडं येणारे मित्रं, आपले अनुभव, वाटणारी भीती, अस्वस्थता यातून ते अवकाश कसं आकाराला येतं याचं कथन करतात. यात आतलं बाहेरचं, निरनिराळा अवकाश यांच्या परस्पर संबंधातून हे कसं घडत जातं यावरही टिपण्णी करतात. ते वाचताना मला प्रकर्षानी जाणवलं की माझा भवताल त्यात डोकावतो आहे. भवतालात घडणाऱ्या गोष्टींचे परस्परसंबंध आपल्या आजूबाजूला कितीतरी मितींमध्ये उलगडत असतात. दररोज, निरनिराळ्या आकृतीबंधात आणि रूपात.
दिल्लीत मी राहते तो भाग मिश्रवस्तीचा आहे. मोठा बाजार आहे. तिथं सगळं काही मिळत – भाज्या, कपडे, किराणा, मातीची भांडी, रोपटी, धागे-दोरे, सजावटीच्या वस्तू किंवा थंडीत अनेक प्रकारचे गूळ आणि रेवडी आणि उन्हाळ्यात बंटा. इथं गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद, चर्च, असं सगळं आहे, आणि त्यांच्या नावानं एखादा रस्ता आहे, किंवा गल्ली तरी नक्कीच आहे, म्हणजे मस्जिद रोड, गुरुद्वारा लेन इ. असं म्हणतात की ब्रिटीश काळात जेव्हा लोदी गार्डन उभारलं गेलं तेव्हा तिथं राहणारे हे सगळे लोक विस्थापित होऊन इकडं आले, मग फाळणी काळात काही आले, मग अलीकडच्या काळात अफगाणी लोक आले. त्यांच्या बरोबर त्याचं खाणं, बोलणं, व्यवहार, पद्धती सगळं आलं आणि इथं मिसळून गेलं. इथल्या घरांच्या मांडणीतही ते आलं आहे उदाहरणार्थ सज्जे, भिंतीवरचे खांब. स्थलांतर हा या घरांचा गाभा. मीही इथं स्थलांतरित होऊन आले आणि या जागेला माझं घर बनवण्याचा प्रयत्न करतेय. दिल्लीत सर्वसाधारणपणे जाणवत राहतो तो इथला आक्रमकपणा आणि उग्रता, अशा शहराला ‘घर’ बनवणं तसं सोपं नाहीच. पण एकदा राहायचं म्हणलं त्याभोवती आपण भावना आणि गोष्टी गुंफत जातो. आपल्या आजूबाजूची माणसं, रीती, सांस्कृतिक व्यवहार, सामाजिक उतरंडी यांच्यातल्या अन्योन्य प्रक्रियांतून हे घर तयार होतं. वैयक्तिक पातळीवर असो वा सामाजिक, त्यात जुळवून घेणं, तडजोडी करणं, समन्वय साधणं या प्रक्रिया समजून घ्याव्या लागतात.
गेल्या दीड एक वर्षांत दिल्लीतल्या घडामोडी पाहता मी राहते तो भाग, एक वेगळं अवकाश निर्माण करणारा होता असं लक्षात येत गेलं. इथली उघडपणे दिसणारी सरमिसळ आणि तिचे ऐतिहासिक संदर्भ एकीकडे, तर परकेपणा आणि सीमांतीकरण होत चाललेली माणसं दुसऱ्याबाजूला. शाहीनबागमधल्या बायका-मुलं, जामिया आणि जेएनयूचे विद्यार्थी, लॉकडाऊन मधले स्थलांतर करण्यासाठी वणवण भटकणारे कामगार आणि आता दिल्लीच्या बॉर्डरवर ठिय्या मारून बसलेले शेतकरी-शेतमजूर. या शहराला ‘घर’ बनवणं इतकं सोपं नाही याची मला सतत जाणीव करून देणाऱ्या या घटना. आपल्या-परक्याच्या व्याख्या इतक्या टोकदार होत असताना आणि अस्मितांचे खेळ खेळत आपलं अवकाश संकोचत जाताना दिसतं आहे. प्रियांका तुपे हिच्या ‘घराबद्दलच्या नोंदी’मध्ये या संकुचित धारणा कशा आपल्या मनात पेरल्या जातात, हळूहळू खोलवर रुजत जातात आणि तेढ वाढत जाते याचं चपखल वर्णन तिच्या अनुभवातून सांगते. आपला भवताल ढवळून निघत असताना ‘घर’ ही संकल्पना घेऊन अंक काढताना ही देखील पार्श्वभूमी डोळ्यासमोर होती.
घर या संकल्पनेच्या मूर्ततेत आणि अमूर्तेत अनेक पदर आहेत. सरोवर जैदी त्यांच्या लेखात म्हणतात तसं “घर ही व्यवस्था त्यातल्या संकेतातून समजून घ्यायची असेल तर त्यात फक्त कपाटात आपण कपड्यांची कशी रचना करतो याचबरोबर आपल्या स्वतःची, आपल्या भावभावनांची आणि आपल्या दैनंदिन जगण्याची कशी रचना करतो हेही विचारात घ्यावं लागेल. एखाद्या जागेत परकं वाटणं किंवा आपलंसं वाटणं हे ठरावीक काळ, अवकाश किंवा रूपात साचेबद्ध नसतं. तर ते कपडे, मित्र-मैत्रिणी, आजूबाजूचे अनुभव, हवापाणी, झाडं-झुडुपं यासारख्या भौतिक आणि इंद्रियगोचर गोष्टीतून ठरत जातं.” ते आतल्या आणि बाहेरच्या व्यवहार आणि संबंधातून साकारतं. राहतं घर, परिसर, गाव, शहर, राज्य, देश, जग असं चढत्या भाजणीनं आपण ‘घरा’बद्दल विचार करत असतो. पण त्या त्या टप्प्यावर आपलेपण परकेपण जाणवत राहतं, ताणतणाव तयार होतात, मायेचे आणि दुराव्याचे संबंध व्यक्त होत राहतात. नजरीन इस्लामच्या घरातल्या नोंदी अतिशय व्यक्तिगत अशा गोष्टींचे पदर हळुवारपणे उलगडतात. तिचं नाव, स्वतःची ‘ओळख’, तिने ते उघडपणे सांगणं, कधी न सांगता येणं, कुटुंब, घर यातल्या रोजच्या नोंदीतून त्यातले बारकावे तर समोर येतातच. बाहेर दंगली चालू असताना तिची आई रात्रीच्या जेवणासाठी भाजी आणायला बाहेर पडत राहते कारण सगळं सुरळीत चालू असल्याचा आभास स्वतःला करून घेण्याची तिला कदाचित गरज वाटत असते. नजरीनला मात्र घर शोधताना, बाहेर फिरताना, स्वतः ओळख करून देताना परकेपण जाणवत राहतं. छोट्या छोट्या प्रसंगातून ठळक होत जाणं, यातून घरपणाचा हा प्रवास चालू असताना त्यातले अनेक कंगोरे दाखवणाऱ्या अशा कितीतरी प्रसंग, घटना, गोष्टी समोर येत राहतात.
अर्थात गेल्या काही महिन्यात घरपणाचे, बेघरपणाचे संदर्भ जसे एकीकडे अचानक बदलले, तसं दुसरीकडे सगळं जग आपापल्या घरात बंद झालं आणि घर हाच जगभर सर्व प्रकारच्या व्यवहाराचं केंद्र बनलं. लिखाण, वाचन, शाळा, मीटिंग, भाषण, जाहीर सभा, गाण्याचा कार्यक्रम, नाटक, गप्पाटप्पा सगळं एका स्क्रीनमध्ये घडायला लागलं. घराचं अवकाश घरापुरतं मर्यादित न राहता जगभरची दृश्यं, आवाज, घटना, कल्पना त्यात उलगडू लागल्या. प्रगती दळवी यांनी हीच प्रक्रिया उलट बाजूने केली. घरातलं रोजचं रुटीन त्यांनी परफॉर्मन्स मधून फेसबुकद्वारे सगळ्या जगासमोर आणला. त्यात चित्रं काढणं, स्वयंपाक करणं, जेवणखाण, मुलाबरोबरचे खेळ असं साध्या साध्या क्षणांचं त्यांनी फेसबुक लाईव केलं. त्यातला तोचतोचपणा, साचलेपण, लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्यावर आलेल्या मर्यादा आणि त्यांच्या रोजच्या कामातून त्या बाहेरचं जग – राजकीय आणि सामाजिक – आत आणतात, घरात आणि स्क्रीनवरही.
हे पाहताना जाणवतं की ‘घर’ म्हणताना त्यात ‘स्व’च्या पलीकडे जाण्याची सुरुवात आहे. घर म्हणजे आतवर, खोलवर रुतलेलं, रुजलेलं, जोपासलेलं काहीतरी असतं. त्याचे नाना प्रकार, अवस्था आणि मार्ग असतात. कधी कधी ते भोवंडून सोडणारे असतात, कधी आनंददायी ठरतात, तर कधी ते पुरतं हलवून सोडतात. पण घर हे केवळ आतलं, खाजगी नसतं, त्यात बाहेरचं आत येत असतं, एकमेकांवर परिणाम करत असतं. आपल्या सामाजिक संस्कृतिक आर्थिक व्यवहारातून ते घडत जातं आणि त्यातल्या गुंतागुंतीतून घर नावाचं प्रारूप उभं राहतं. ‘हाकारा’च्या या अंकात ‘घरा’बरोबरच्या, घराच्या आतल्या-बाहेरच्या निरंतर चालू असलेल्या अन्योन्य प्रक्रिया समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
घर नसणं, मोकळ्या आभाळाखाली झोपण्यालाच घर म्हणण्यापासून, दर रोज नव्या मित्रांच्या घरी राहण्यापर्यंत आणि आता बऱ्यापैकी मोठ्या स्वतःच्या जागेत राहण्यापर्यंत एकच गोष्ट नीट कळते आहे की घर म्हणजे फक्त भिंती नाही तर भोवतालचा अवकाश, नाती, मित्र, गोतावळा आणि बदलत असतानाच जसे होतो तसे राहण्याचा प्रयत्न करणारे आपण…..मागच्या काही वर्षांत घर या संकल्पनेच्या मुळालाच हादरे बसवण्याचे काम सत्ताधारी करत असताना, तू घर या कल्पनेचा घेतलेला हा आढावा फार वेधक आहे…..आपली घरं, नाती, आपली तहजीब, आणि मिश्र जगण्याची कल्पना जिवंत राहो, तुझ्या घराभोवतालचा मिश्र अवकाशच आपल्या जगण्याचं धारातल आहे ते टिकून राहो…….आमेन
घर,मी एका सार्वजनिक उपक्रमाच्या पाचशे क्वार्टर्सच्या कॉलनीत रहात होतो.बैचलर्सना चार जणांना दोन खोल्यांचे घर,नंतर तसेच ए-सिंगल बेडरूम,बी-डबल बेडरूम,सी-तीन बेडरूम आणि शेवटचं बंगला म्हणजे डी टाईप घरे.डी सोडून मी सर्व प्रकारच्या क्वार्टर्समध्ये राहीलो.घरा प्रमाणे सामान वाढल,पण सवयी बदलल्या नाहीत. या कॉलनीत ग्राउंड फ्लोअर मिळावा साठी स्पर्धा असायची आणि ते मिळावे म्हणून आई-वडील आजारी असल्याची खोटी प्रमाणपत्र दिली जायची.